आफ्रिकेतील अतर्क्य - भाग ३

Submitted by रुद्रसेन on 4 August, 2022 - 08:56

आम्ही शिळे मागे जाऊन उभे राहिलो. आमच्या समोर थोड्या अंतरावर तो मांत्रिक आणि घरमालकाची निपचित पडलेली मुलगी दिसत होती. मांत्रिक आता शांतपणे गुडघ्यावर बसून होता. त्याचा बाजूच्या शेकोटीचा विस्तव मंद होत होता. अचानक एक मोठी डरकाळी आम्हाला ऐकू आली ती एवढी मोठी होती कि माझा अंगाचा थरकापच उडाला, घरमालक पण भ्यायला पण बोलला काही नाही, जंगलामधून ती डरकाळी आलेली होती. त्या डरकाळी नंतर जंगलामध्ये एक विचित्र शांतता पसरली आमच्या आजूबाजूला देखील ती जाणवली इतकी कि मला माझा श्वासाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. एखादा वाघ किंवा अजून कोणता हिंस्र प्राणी आला तर काय होईल या विचाराने खरंतर माझा कापरं भरलं. तो प्राणी त्याचा अणकुचीदार दात्तांनी आणि हिंस्र पंजांनी आपलं शरीर एका खाटकासारखं सोलून काढेल किंवा आपलं शरीर सुद्धा उरणार नाही असे बारीक बारीक तुकडे करेल. पण नंतर वाटलं एवढे डरपोक आपण केव्हापासून झालो.

मग वाटलं अरे हट, जास्तीत जास्त काय होईल मरूनच जाऊ ना. असंही कोण राहिल आहे मागे आता आपल्या. असा विचार करत असताच मंत्रीकासामोरच्या शिळेमागे असणाऱ्या झाडांमागे खुसपूस झाली. मी आणि घरमालक कान टवकारून पाहू लागलो. झाडांच्या मागून कोणीतरी पुढे येत असल्याचा आवाज येऊ लागला तसा मांत्रिक खाली नमन करत असल्याप्रमाणे जमिनीवर झुकला. झाडामागून एक मोठी काळी आकृती समोर येऊ लागली, आम्ही वाट पाहत होतो ते पिशाच्च आलेलं होतं. मी अक्षरशः डोळे विस्फारून पाहू लागलो. घरमालक त्या पिशाच्चाला पाहताच आमच्या समोरच्या शिळेवर हात ठेवून डोके खाली झुकवून उभा होता. ती आकृती नक्की कशी होती सांगता येत न्हवत, चांगली ८-९ फूट उंच असून, एखाद्या झाडाप्रमाणे दिसत होती. डोके उभट लांब असल्याप्रमाणे दिसत होते. हात झाडाच्या फांद्यान्प्रमाणे लांबलचक होते. पाय पण लांब आणि रुंद होते. एकूणच एका झाडासारखा तिचा आकार असावा असा अंदाज मी बांधला. ती आकृती जशी शिळेच्या जवळ आली तस वातावरण खूप शांत झालं जणूकाही आम्ही जंगलात नसून मोकळ्या मैदानातच उभे आहोत.

मांत्रिक हात खाली वर करत त्या आकृतीला उदेशून स्वागत केल्यासारखे काहीतरी बोलू लागला. त्या पिशाच्चाने मांत्रिकाकडे पहिले आणि घोगऱ्या आवाजात काहीतरी विचारले तो आवाज एवढा भयप्रद होता कि माझा जागी एकदा भित्रा मनुष्य असता तर कधीचाच बेशुद्ध पडला असता. त्या मांत्रिकाला बोलल्यानंतर ते पिशाच्च जवळच निपचित पडलेल्या मुलीजवळ गेलं आणि आपल्या हाताने तिच्या भोवती एक रिंगण तयार केलं त्यासरशी त्या मुलीच्या आजूबाजूची धूळ उडाली आणि वरच्या बाजूने निघून गेली.

मी हा सगळा प्रकार डोळे फाडून पाहत होतो उभ्या आयुष्यात असला अद्भुत प्रकार मी पाहिलेला न्हवता. जणू काही गोठल्याप्रमानेच मी उभा होतो. त्या पिशाच्चाने त्याच घोगऱ्या आवाजात मांत्रिकाला काहीतरी सांगितले तसे मांत्रिकाने मान डोलावली. मांत्रिकाने त्याच्या पुढ्यात असलेल्या मुलीला उचललं आणि त्याचा मागे असणाऱ्या शिळे जवळतिला झोपवलं, नंतर घरमालकाने आणलेल्या कोंबडीच्या मुंडकेवजा देह त्या मांत्रिकाने त्या पिशाच्चाच्या पायाजवळ ठेवला. त्या पिशाच्चाने दोन्ही हात बाजूला करत वर पाहत घोगऱ्या आवाजात काहीतरी उद्गार काढले त्यासरशी त्याच्या आजूबाजूची जमिनीवरची खूप सारी धूळ उडू लागली आणि त्या धुळेचे मोठे रिंगणच तयार झाले. घरमालक अजूनही शिळेवर डोके ठेवून होता. मी शिळेच्या बाजूने थोडासा झुकून ते दृष्य पाहण्याचा प्रयत्न करू लागलो, तो त्या धुळीचे लोट माझा पर्यत पोहोचले डोळ्यांमध्ये धुळीचे काही कण गेल्याने माझे डोळे चरचरले आणि मी थोडासा मागे सरकलो आणी तिथेच घात झाला. मागे सरकले असता माझा पाय एका झाडाच्या वाळलेल्या काटकीवर पडला आणी काड.. असा आवाज झाला आणि तिथेच घात झाला.

तो आवाज ते पिशाच्च आणि मांत्रिक यांपर्यंत पोहोचला. त्या आवाजासरशी त्या पिशाच्चाची मान गर्रकन आमच्याकडे वळाली. त्याने तसे पाहताच मी चटकन शिळेमागे लपलो पण आता त्याचा काही एक फायदा न्हवता. त्या पिशाच्चाला कळाले होते कि त्याचा कामामध्ये कोणत्यातरी माणसाने अडथळा आणलेला आहे. आणि आपल्या कामामध्ये अडथळा आणलेला त्या पिशाच्चाला चालणार न्हवतं असं मांत्रिकाने आधीच सांगितलेलं होतं आणी तसं करणाऱ्याला ते सोडत नाही हे देखील सांगितलं होतं. त्यानंतर ते पिशाच्च त्या मांत्रिकाला मोठ्या आवाजात बोलू लागले त्याचा आवाज ऐकून मी आता खरोखरच भयाने गोठून गेलो. आणी त्या पिशाच्चाच्या आवाजाने घरमालक भानावर आल्यासारखा दचकून हात झटकून उभा राहिला. मांत्रिक पण पिशाच्चासमोर हात जोडून काहीतरी बोलू लागला तसं त्या पिशाच्चाचा आवाज आणखीनच वाढला. घरमालकाला काय होत आहे तेच कळेना .शिळेमागे असल्यामुळे पुढचे दृष्य त्याला काही दिसत न्हवते. अचानक मांत्रिकाचा जोरात किंचाळल्याचा आवाज येऊ लागला, तस मी आणी घरमालक शिळेमागून डोकी काढून समोर पाहू लागलो तर आमची बोबडीच वळाली त्या पिशाच्चाने मांत्रिकाला गळ्याला पकडून वर उचलले होते. आणि मांत्रिक जमिनीपासून ३-४ फूट वर लटकत होता. त्याचा तोंडाकडे पाहत ते पिशाच्च गुरकावत होते एकंदरीत आमच्या तिथे असण्यामुळे त्याला भयंकर राग आला होता त्यामूळेच तो मांत्रिक आत्ता अशा अवस्थेत होता. घरमालक तर तोंडच पाणी पळाल्याप्रमाणे मटकन खालींच बसला.

त्या पिशाच्चाचा सेवक असणाऱ्या त्या मांत्रिकाची हि दशा आहे तर आपलं काय होईल हे विचार येताक्षणी माझा मेंदू तीव्र गतीने काम करू लागला माणसापुढे जीवाचा प्रश्न उभा राहिल्यावर तो कसलेही काम मागे पुढे न पाहता करू लागतो. ते पिशाच्च मांत्रिकाला गळ्याला पकडून उभं होता मांत्रिक ओरडतच होता. आणि माफी मागत असल्यासारखे हातवारे करत होता. त्या पिशाच्चाला अधिकच राग आला आणि त्याचा मागे असलेल्या एका मोठ्या शिळेवर त्याने त्या मांत्रिकाचे शरीर एका चेंडूप्रमाणे भिरकावून दिले. मांत्रिक लोळागोळा होऊन कण्हत पडला ते पिशाच्च त्याचाकडे वळून अजून त्याला काहीतरी बोलू लागलं. बस्स मी मनात म्हणालो हाच मोका आहे इथून पळ काढण्याचा नाहीतर त्या मांत्रिकापेक्षाही जास्त आपली अवस्था भयानक होईल.

मी घरमालकाला गदागदा हलवून बोललो “ मुलीला उचल पटकन आपल्याला निघायला हवं इथून”

घरमालक एका तांद्रिक असल्याप्रमाणे पिशाच्च त्या मांत्रिकाला कसे यातना देत आहे पाहत होता त्याचं माझा बोलण्याकडे लक्षच न्हवत. पिशाच्चाने मांत्रिकाला परत त्याचा नरड्याला धरून शिळेला टेकून वर उचलले. मला वाटले कि आता काही खरे नाही. हे पिशाच्च मांत्रिकाला यातना देण्यात व्यस्त असेपर्यंतच आपल्याला वेळ आहे नन्तर आपली काही धडगत नाही. घरमालक तंद्रीतून बाहेर यायचे काही नाव घेईना. तसं माझा डोक्यात काय आलं काय माहित वैतागून मी त्या घरमालकाला एक जोरदार कानाखाली लगावली तसं तो घरमालक भानावर आला आणि गाल चोळत माझाकडे निष्पाप नजरेने पाहू लागला.

“ मुलीला उचल जा लवकर आपल्याला पळायला हवं आता. “ मी परत एकदा त्याला म्हणालो.

घरमालक भेदारल्यामुळे जागचा हलेना पण तो निदान भानावर आलेला होता. मग मी स्वतःच मुलीला घ्यायला दुसऱ्या शिळेमागे गेलो. पिशाच्च मांत्रिकाला पकडून उभंच होतं त्याची पाठ माझाकडे होती त्याचाच फायदा घेऊन मी त्या मुलीला हळूच पायाला धरून ओढलं तशी ती थोडीशी कण्हली याचा अर्थ ती शुद्धीवर येत होती. चाललेल्या प्रकारची त्या बिचारीला काहीच कल्पना न्हवती. मी शेकोटीतून जळणारी एक लाकूड हळुवारपणे घेतलं आणि मुलीच्या तिच्या पायाला धरून ओढलं आणि हळूच खांद्यावर टाकलं, सावधपणे पाउल टाकत शिळेच्या बाजूला येताच पिशाच्चाने गर्रकन मान मागे वळवली. त्याची पूर्ण मान माझाकडे वळाली जणू काही मानेमध्ये हाडेच नसावीत. ते पाहून माझा पाचावर धारण बसली आणि मी घरमालकाकडे पाहून जोरात ओरडलो

“ पळ लवकर आत्ता”

आणी मागचा पुढचा विचार न करता मुलीला खांद्यावर घेऊन आणि चटकन दुसऱ्या हातात विस्तवाचे लाकूड लायटरने पेटवून मशाल घेऊन पळू लागलो. तसं जोरदार डरकाळी फोडल्याचा आवाज मागून ऐकू आला इतका कि पूर्ण जंगल दणाणून जावं. पळता पळता मी मागे वळून पाहिलं त्या डरकाळीच्या आवाजाने घरमालक पूर्ण भानावर येऊन माझामागे जीवाच्या आकांताने पळत होता आणि पिशाच्चाने हाताने मांत्रिकाचे डोके धडावेगळे केले होते. आणि त्याचा शरीराची छिन्नविच्छिन्न अवस्था तो करत होता.

आता प्रसंग बिकट होता ते पिशाच्च कधीही आमच्यामागे येणार होतं जीवाच्या आकांताने मी पळत होते खांद्यावर मुलीच्या ओझ्याने वेग थोडा मंद पडू लागला. घरमालक तर तोंडाने कसलातरी आवाज करत माझाही पुढे पळत होता. मला माझा वेग वाढवावा लागणार होता. अचानक मागून अजून एक डरकाळी ऐकू आली कदाचित पिशाच्च भयंकर चिडलेले असावे ते आमच्याच मागावर असून ते आता सहजासहजी आम्हाला सोडणार न्हवते. मी माझा सैन्यदलातील प्रशिक्षण आठवून खांद्यावर ओझे असतानादेखील वेग वाढून कसे पुढे जावे या तंत्राचा वापर करत माझा वेग वाढवला. घरमालक पुढे पळत असल्यामुळे आणि हातातील मशालीमुळे मला मार्ग मिळत होता. वाटेत येणाऱ्या झाडाझुडुपांची पर्वा न करता मी आता वेगात पळू लागलो.
मागून आवाज जवळ येत होता पिशाच्च आता आमचं अगदी जवळ आल्यासारखं वाटत होत. मागे वळून पाहावं ते कुठे आहे असं म्हणून मी मागे पहिले एवढ्यात अचानक एका दगडाला पाय लागून माझा पाय अडखळला आणि माझा तोल गेला. हातातली मशाल मी बाजूला भिरकावली आणि मुलीला काही लागू नये म्हणून तिला घट्ट पकडले. आणि तिला पकडूनच जमिनीवर पडलो. झाला आता काही खरं नाही ते पिशाच्च आमची अवस्था नक्कीच मांत्रिकासारखी करणार. मुलगी अजूनही अर्धवटच शुद्धीत होती पडल्यामुळे ती जरा जोरात कण्हली. माझा हातातून मशाल पडल्याने बाजूला पडलेल्या वाळलेल्या गवतांमध्ये लगेचच आग लागली. आणि आमच्या आजूबाजूला आग पसरू लागली. घरमालकसुद्धा पळता पळता थांबला आणि मागे पाहू लागला. ते पिशाच्च मोठ्याने आवाज करतच जवळ आला. मी मरणाला सिद्ध झालो वाटलं बस्स एवढचं आयुष्य आपलं संपलं सगळ.

आपल्यामुळे या बापलेकीचा जीव मात्र जाणार या विचाराने याही अवस्थेत मन विषण्ण झालं. एवढ्यात ते पिशाच्च जवळ आले. आणि मोठ्याने गर्जना केल्यासारखे ओरडले तो आवाज एवढा भयानक होता कि मी माझे दोन्ही कान हाताने झाकून घेतले. आमच्या आजूबाजूला पूर्ण आगीच्या ज्वाळा पसरल्या भोवतीच्या झाडाझुडपानी पण आग पकडली. पिशाच्च बीभत्स पणे लांबूनच ओरडू लागले. इतक्यात माझा माझा लक्षात आले आमच्या आजुबाजूला असलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे पिशाच्च जवळ येत नाहीये.

अरे हो खरंच कि कदाचित आगीला ते ओलांडू शकत न्हवते. आग हि त्या पिशाच्चाची कमजोरी असावी. असं वाटून क्षणाचाही विलंब न करता मी बाजूला पडलेल्या मुलीला पटकन उचलून खांद्यावर घेतले. बाजूला पडलेली मशाल परत हातात घेतली.

आणी घरमालकाला म्हणालो “ हे बघ पिशाच्च आगीमुळे पुढे येत नाहीये, तू मुलीला खांद्यावर घे आणि जोरात पळत सूट मी आलोच तुझा मागे”

त्यावर घरमालकाने होकारार्थी मन हलवली. आणि माझाकडून त्याने मुलीला आपल्या खांद्यावर घेतले आणि पळू लागला. मी सुद्धा त्यामागे पळत पळत आजूबाजूला दिसेल त्या झाडांना झुडूपांना मशालीने आग लावत पळू लागलो. आम्ही पिशाच्चाला बरेच मागे सोडले कारण आम्ही पडलो तिथे खूपच वाळलेले गावात होते ज्याने आग खूपच भडकली होती. भडकलेल्या आगीचा फायदा घेऊन आम्ही धावतपळत जाऊ लागलो. त्या पिशाच्चाचे भयंकर चित्कार अजूनही ऐकू येत होते पण ते आता लांबून येत होते. त्याला आगीचा लोळ ओलांडून पुढे येत येत न्हवते. देवाची कृपाच कि काय मला मशाल पेटवण्याची बुद्धी झाली आणि दैवयोगानेच आमचा जीव कसाबसा वाचला होता. आम्ही पळत पळत गावानजीक आलो. आता मागे वळून पाहिलं तर कोणीच न्हवत म्हणजे आम्ही त्या पिशाच्चाला मागे टाकले होते. तरीही तसचं पळत पळत आम्ही घरमालकाच्या घराजवळ आलो आणी आजूबाजूला न पाहता एकमेकांशी एक अक्षरही न बोलता तडक आमच्या घरामध्ये शिरलो.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना शक्ती मधून निर्माण झालेली कथा.आणि अशा कथा भारतात खूप आहेत.बिलकुल नावीन्य नाही.
उगाच आफ्रिकेला बदनाम करु नका.
देव,भूत हे अस्तित्वात असतील तर सूक्ष्म रुपात असतील. energy ची एक अवस्था.बिग बँग ची मूळ अवस्था.
अगदी सूक्ष्म रूपांत
असे पाच फूट आणि दहा फूट नाही.
बकवास कथा

Aahat, Sony tv वर होती.आणि भारतात अनेक चॅनेल वर horror chya नावावर कॉमेडी चालू असते.
Aahat तर नी कॉमेडी सिरियल म्हणून बघत असे