राणीबागेचा राजा - (फोटो आणि विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 June, 2022 - 16:34

विडिओ आधी बघितला तरी चालेल
Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI
-----------------------------------------------------

राणीबाग आणि भायखळ्याच्या गल्ल्यांमध्ये खेळण्यात माझे बालपण कसे गेले हे आपण मागील पाणघोड्याच्या भागात पाहिले.
https://www.maayboli.com/node/81192

त्यामुळे राणीबागेशी माझी एक वेगळीच नाळ जुळली आहे. जेव्हा लोकं म्हणायची छ्या राणीबागेत आता काही राहिले नाही तेव्हा फार राग यायचा. जसे काही वाघ सिंह हत्ती घोडे, या नावे ठेवणार्‍यांच्या दारात झुलतात, जे चार प्राणी बघायला मिळताहेत ते बघावे आणि खुश राहावे तर नावे कसली ठेवत आहात.

पण त्याच वेळी वाईटही वाटायचे. कारण यात तथ्यही होतेच. हरीण, सांबर, नीलगाय, काळवीट, मगरी, माकडं जरी खोर्‍याने असली, गजराज लांबून दर्शन देत असले, झालंच तर पाणघोडाही अध्येमध्ये पाण्याबाहेर येत असला, कधी मोर पिसारा फुलवत असला, कधी नाग फणा उभारत असला, पक्ष्यांचीही रेलचेल असली तरी ज्या प्राण्यांना खास बघायला आपण प्राणीसंग्रहालयात जातो, ज्यांच्या रुबाबदार शरीयष्टीचे आबालवृद्धांना आकर्षण असते, त्या जंगलच्या राजा म्हणवले जाणार्‍या वाघसिंहांची कमी होतीच. लहानपणी केव्हातरी भायखळ्याला मामाकडे सुट्टीत राहायला जायचो तेव्हा रात्रीच्या शांततेत वाघाच्या डरकाळीचा आवाज यायचा हिच काय ती त्याची शेवटची आठवण होती.

नाही म्हणायला मध्यंतरी पेंग्विन नामक पक्ष्यांचे आकर्षण आले होते. पण त्यावरूनही लोकांचे चिडवणेच फार झाले. व्यक्तीशः मलाही कधी मुद्दाम जाऊन ते पक्षी बघावे असे वाटले नाहीत. आजवर मी ते पाहिले नाहीत.

मी स्वतःही कैक वेळा लेकीसोबत राणीबागेत गेलो. पण मलाही तिथले ईतर प्राणी बघण्यात फारसा रस नव्हता, ना लेकीला होता. आम्ही आपले दर विकेंडला छान खेळून यायचो. कारण विविध प्रजातीच्या झाडांची रेलचेल असलेले एक उद्यान म्हणून ते तेव्हाही छानच होते. पण मुद्दाम प्राणी बघायला म्हणून आमच्या राणीबागेत या असे कोणाला सांगायचो नाही.

आणि मग एके दिवशी कानावर खबर आली की राणीबागेत वाघांची एक जोडी आली. रॉयल बंगाल टायगर. आणि ईतरही बरेच नवनवीन प्राणी आले. त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि आकर्षक पिंजरे तयार केले गेले. एकूणच राणीबागेचे सुशोभिकरण झाले. राणीबागेत जाणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढू लागली... आणि रविवार, दिनांक २२ मे २०२२, या दिवशी तब्बल २६ हजार १७३ लोकांनी राणीबागेला भेट देत एक विक्रम रचला.

पण दुर्दैवाने आता आम्ही मुंबईहून शिफ्ट झालो होतो. तिथले घर अजूनही आहे, पण वरचेवर जाणे बंद झाले होते. त्यामुळे आता आपल्याला आपल्याच राणीबागेत जायला मुहुर्त शोधायची गरज होती. नाही म्हणायला लेकीने तिच्या आई आणि मावश्यांसोबत मला टांग देत एक धावती भेट दिली होती. राजालाही ओझरते बघून आलेली. पण ते समाधान होण्यास पुरेसे नव्हते. आणि वर्कलोडमुळे माझाही प्लान नेहमी बनता बनता फिस्कटत होता.

अखेरीस या विकेंडला तो मुहुर्त लागला. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपल्या होत्या. त्यामुळे मे महिन्याची विक्रमी गर्दी आता झेलावी लागणार नव्हती. तसेच पावसापाण्याचे दिवस असल्याने लोकं लांबचा प्रवास करून मुद्दाम राणीबागेत यायची शक्यता कमी होती. याऊलट आम्ही मात्र पावसाळी कबूतरं असल्याने आम्हाला पावसातच जास्त फिरायला आवडते. तरी शनिवारचा सुट्टीचा दिवस, आपल्यासारखेच अजून पावसात बागडणारे जीव संध्याकाळच्या वेळी गर्दी करतील हि शक्यता होतीच. त्यामुळे आम्ही सकाळीच जायचे ठरवले. मुलांनाही ट्रेनने जायची हौस होती. त्यामुळे जितके पहाटे जाऊ तितके ट्रेनच्या गर्दीच्या दृष्टीनेही चांगलेच होते.

गूगल जिंदाबाद. राणीबागेचा टाईम चार साईटवर चेक करून कन्फर्म केला. सकाळी ९.३० वाजता प्रवेशद्वार आमच्यासाठी खुलणार होते. लगोलग एम-ईंडिकेटर अ‍ॅपवर वाशीहून ट्रेनचा टाईम बघितला. वाशी ते डॉकयार्ड आणि तिथून १० मिनिटे टॅक्सीचे असा हिशोब करत बरोबर सव्वानऊ वाजता आम्ही पोहोचणार होतो. कोण म्हणते मुंबई लोकल पावसात ऊशीरा धावते, वा मुंबईत वेळेवर टॅक्सी मिळत नाही. बरोब्बर सव्वानऊ वाजता मी माझ्या दोन पोरांसह राणीबागेच्या प्रवेशद्वाराशी हजर होतो.

साडेनऊ वाजता जेव्हा मेन गेट खुलले तेव्हा आमच्या सोबत कॉलेजच्या सहासात मुलामुलींचा ग्रूप, एक दहापंधरा साडी नेसलेल्या बायकांचे भगिनीमंडळ आणि एक चौकोनी कुटुंब ईतकेच जण होते. ते सारे आमच्यासोबतच आत आले आणि विखुरले गेले. पण तिकीटघर कुठे आहे हे फक्त मलाच ठाऊक असल्याने मीच एकटा योग्य दिशेने गेलो. आज किती हजारांचा आकडा गाठणार होता कल्पना नाही, पण त्यात पहिले तिकीट काढून पहिले आत प्रवेश करायचा मान आम्हीच पटकावला. कसलं प्राऊड फिलींग झाले. पोरांनाही कौतुकाने सांगितले, बघा तुमचा बाप तुम्हाला सर्वात पहिले राणीबागेत घेऊन आला. पण त्यांना त्याचे काही पडले नव्हते.... असो Happy

पण आत जाताच ... आहाहा, गर्द झाडी, मोकळे रस्ते, वातावरणात गारवा, आणि आमच्या स्वागताला नुकताच सुरू झालेला रिमझिम पाऊस. योग्य मुहुर्त साधला आहे याची मनोमन खात्री पटली.

थोडं पावसात भिजून घेतले. त्या तयारीनेच गेलो होतो म्हणा. म्हणजे छत्री रेनकोट काही न नेता. दहा मिनिटात राणीबागेसह आम्हाला भिजवून तो पसार झाला आणि पुन्हा ढगांमागून सुर्यकिरण डोकावू लागले. बागेतला पहिला फोटो मी तिथे काढला...

१) आहाहा वाटावे असे उघडझाप करणारे पावसाळी वातावरण

IMG_20220621_234408.jpg

गेटवरच्या मामांकडे आतली खबर काढली होती. वाघ कधी बघायला मिळेल विचारले तर दहा साडेदहा पर्यत ऊठून पब्लिकचे मनोरंजन करायला बाहेर येतो म्हणाले. त्यामुळे थेट तिथे न जाता काचेच्या तावदानांतले कासव आणि सर्प बघत पाणपक्ष्यांकडे मोर्चा वळवला.

२) पाणपक्ष्यांकडे मोर्चा

IMG_20220621_234435.jpg

तसे हे पक्षी आधीही होतेच. पण पिंजर्‍यातले ते पक्षी कितीही छान वाटले तरी सतत बघून बोअरच व्हायचे. आता मात्र तिथे कायापालटच केला आहे. त्या पिंजर्‍यालाच ईतके मोठे केलेय की त्या आत एक छोटेसे जंगल वसवले आहे. आता त्या पिंजर्‍यात आपल्यालाही प्रवेश मिळतो. त्यात असलेल्या लकडी पुलावरून ईथून तिथे छान रमत गमत पक्षी बघत जाता येते. आम्ही अगदी सकाळची वेळ पकडल्याने आणखी भारी वाटत होते. पावसानेही आवरते घेतल्याने छान उजाडले होते. गर्दी तर दूरची गोष्ट, त्या पिंजर्‍यात आम्ही आणि पक्ष्यांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे पक्षीही मनसोक्त बागडत होते. तिथला सिक्युरीटी गार्ड गाईडचे काम करत आम्हाला झाडाझुडपात लपलेले एकेक पक्षी आणि त्यांची घरटी दाखवत होता. त्यामुळे एखाद्या विशेष अतिथी सारखे पक्ष्यांच्या घरात जाऊन पाहुणचार घेतल्यासारखे वाटत होते.

३-४-५-६) पाणपक्ष्यांच्या राज्यात

IMG_20220621_234523.jpg
.
IMG_20220621_234451.jpg
.
IMG_20220621_234540.jpg
.
IMG_20220621_234506.jpg

आमच्या अंदाजापेक्षा बरेच जास्त वेळ आम्ही तिथे रमलो. त्यामुळे मग ईथेतिथे जास्त वेळ न दवडता थेट राजाच्या दरबारात हजेरी लावायचे ठरवले. वाटेत गजराजांचे दर्शन तेवढे घेतले. तसेच गोरील्लाच्या मांडीवर बसून फोटोही काढला. तो नकली असल्याने काही बोलला नाही.

एव्हाना दहा वाजले होते, तरी लोकांची वर्दळ काही वाढली नव्हती. प्रभात फेरी जिंदाबाद.

७) चिटपाखराची मागसूस नसलेले शांत शांत रस्ते

IMG_20220621_234641.jpg

८) तोफेच्या तोंडी द्यायलाही एखादी शिकार गवसत नव्हती

IMG_20220621_234700.jpg

अरे हो, जाता जाता वाटेत, Sloth Bear अस्वलाला त्याच्या घरच्या जंगलात दुरूनच आणि पाठमोरे पाहिले. त्याच्या पलटायची मग फारशी वाट न बघता, तो एका वेळच्या जेवणाला ४ हजार ते १० हजार वाळव्या (termites) खातो ही माहिती वाचून तिथून निघालो.. ते थेट वाघाच्या जंगलाकडे!

९) Sloth Bear अस्वलाचे घर

IMG_20220621_234801.jpg

१०) पाठमोरा अस्वल स्पॉटेड

IMG_20220621_234726.jpg

आता सकाळचे साडेदहा वाजले होते. सर्व राणीबागेतली तुरळक गर्दी एकीकडे आणि वाघाच्या ईलाक्यातील गर्दी एकीकडे. त्याला 'जंगलाचा राजा' का म्हणतात हे त्याच्या दर्शनाला जमलेली गर्दी बघूनच समजले. आणि हो, तो तश्याच थाटात फेर्‍या घालत होता. रुबाबात चालत होता. जिथे जिथे तो जात होता, सर्व कॅमेरे त्या दिशेने वळत होते. आम्ही तर त्याच्या जोडीनेच पळत होतो. एक क्षण नजर हलू नये ईतके देखणे जनावर. मग लक्षात आले की या आठवणी कैद करायला हव्यात, आणि कॅमेर्‍याची आठवण झाली.

ईतक्यात त्याला पोहायची हुक्की आली. कदाचित त्याच्या आंघोळीची वेळ झाली असावी. आणि बघता बघता तो पाण्यात ऊतरला. चक्क पोहू लागला. काचेजवळ येऊन पोहता पोहताच लोकांना हाय हेल्लो करू लागला. फोटो काढायचे थांबवून मी विडिओ मोड ऑन केला आणि सभ्यतेचे सारे निकष धाब्यावर बसवून त्याची आंघोळ शूट करू लागलो. एखाद मिनिटाची घटना पण राणीबागेत यायचे सार्थक झाल्यासारखे वाटले. पोरांनाही काहीतरी स्पेशल दाखवले याचे समाधान मिळाले.

(वाघाच्या आंघोळीचा आणि एकूणच विडिओ लेखाच्या सुरुवातीच्या वा शेवटच्या लिंकमध्ये बघू शकता. जाताना तो आम्हाला शेपटी ऊंचावून बाय करूनही गेला Happy )

११-१२) राजा आपल्या रुबाबदार चालीत आंघोळीसाठी जाताना...

IMG_20220621_234929.jpg
.
IMG_20220621_234957.jpg

१३) वाघासोबत आमच्या घरच्या वाघीणीचा फोटो टिपायचा एक प्रयत्न. जो हाणून कसा पाडता येईल याची काळजी उपस्थितांची गर्दी घेत होती.

IMG_20220621_234853.jpg

एकदा वाघ बघून मन तृप्त झाल्यावर मग एक बिबट्या तेवढा पाहूया म्हटले आणि ईतर प्राण्यांची भेट मग पुढच्या वेळीसाठी राखूया म्हटले. तसेही आता येणेजाणे होतच राहील.

१४) हे कोल्हेबुवांचे घर - पण दर्शन देण्याच्या मूडमध्ये नव्हते. आम्हीही मग त्यांना जास्त भाव न देता पुढे निघालो.

IMG_20220621_234829.jpg

१५) हा बिबट्याचा ईलाका - ईथून तरसही दिसतो. पण दोघांनाही बघायला गर्दी वाघाच्या तुलनेत कमीच. बिचारे तरसतच राहतात.

IMG_20220621_235021.jpg

तरी बिबट्याचे दर्शन वाघाच्याच विडिओत घेता येईल.

१६) साडे नऊला सुरू झालेली भेट साडे अकरापर्यंत आवरली. तरी या एका प्राईम लोकेशनला तसा शुकशुकाटच होता Happy

IMG_20220621_235046.jpg

पण तुम्ही जर वेळ काढून एकदाच येणार असाल आणि सर्व प्राण्यांशी एकाच भेटीत ओळख करायची असेल तर खालचा नकाशा जरूर नजरेखालून घाला Happy

१७) बागेचा नकाशा

IMG_20220621_234619.jpg

अवांतर - एक विनोद त्या दिवसापासून आमच्या घरात फार फेमस झालाय. त्याचे झाले काय, माझ्या लेकीने त्याच्या धाकट्या भावाला सांगितले आपण उद्या 'राणीच्या बागेत' जाणार आहोत. तेव्हापासून तो कुठे फिरायला गेला होता असे विचारताच म्हणतो, राणीच्या मागे गेलो होतो Proud

अरे हो, विडिओची लिंक पुन्हा एकदा देतो,

Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉल chi फेरी झाल्यावर मला वाटलेलं अजून वरच्या मजल्यावर जायचेय पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी आता संपलं असे सांगितले
>>>
Lol आई ग्ग.. अगदी अगदी.. आम्हालाही वाटले की अजून वरचा मजला आहे आणि खरा माल तर तिथेच आहे Lol

यातून आपण हे शिकलो की व्हॉटसपच्या पोस्ट फेकाफेकी असतात आणि मायबोलीवर ऋन्मेषचे धागे विश्वासार्ह असतात.. ते बघूनच आपली ट्रिप प्लान करा Proud

आजूबाजूचे चांगले खादाडी ऑपशन्स काय आहेत?
Submitted by अमितव on 22 June, 2022 - 21:37 >>
जवळच लाडू सम्राट आहे.. एकदम झक्कास नाश्ता मिळतो..आम्ही तीथे भरपेट नाश्ता करून राणीची बाग फिरायला गेलेलो.. बागेत कॅंटीन आहे पण तीथे काही खाल्लं नव्हतं.. बाहेर येईपर्यंत लंचची वेळ झालेली म्हणून आधी दत्त बोर्डींगला गेलो.. तीथे थोडी खादाडी केली पण मासे फार काही आवडले नाही मग तीथूनच दोन मिनिटांवर माजघर आहे.. तीथलं जेवण आवडलं

म्हाळसा, सॉलिड स्टॅमिना आहे >> मुंबईत मला कितीही फिरवा..त्याच त्याच जागी शंभर वेळाही जायला आवडतं आणि मी दर भारत भेटीत एक दिवस तरी जीवाची मुंबई करत फिरते

हँगिग गार्डन आणि म्हातारीच्या बूटाला क्वचित जायचो. वर पडते फार.>> टॅक्सीनेच तर जायचं असतं

अवांतर : पक्षीप्रेमींसाठी पूर्व उपनगरात ऐरोळी उपनगरातून वाशी खाडीतले पक्षी पाहाण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे. सकाळी तिथे खाडीत बोटीतून पक्षी निरीक्षण करता येते. मोसमात म्हणजे नोव्हेंबर ते मार्च पर्यंत स्थलांतरित पक्षी इथे उतरतात. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेमिंगो आणि तत्सम पक्षी हे मुख्य आकर्षण. लाईफ जॅकेट वगैरे घालून बोटीतून व्यवस्थित फिरवून आणतात. खादाडीची सोय मात्र नाही.

वाशी खाडीतले पक्षी पाहाण्यासाठी
मिनी सी शोअर का काय म्हणतात. तिथे बरेच वर्षांपूर्वी bnhs वाल्यांची फ्री गाईड टूअर होती त्यात गेलेलो सकाळी सातला. तेव्हा खूप गर्दी होती पक्ष्यांची. पण नंतर स्वत: गेलो तर काहीच नव्हते.

कुणाला मुंबईतील बागांची फ्री भेट हवी असेल तर
https://facebook.com/groups/489182804511346?group_view_referrer=search

हा फेसबुक ग्रूप पाहा . दर महिन्याला एक भेट असे १११ कार्यक्रम झाले. पुढच्या कार्यक्रमाची पोस्ट तिथेच येते.

जवळच लाडू सम्राट आहे.. एकदम झक्कास नाश्ता मिळतो. >> अगदीच. फार जवळ नाही. टॅक्सी करावी लागेल. पण जावे तिथे.

वर पडते फार.>> टॅक्सीनेच तर जायचं असतं >>> हो ते ही आहे, पण तरी मुलांना कॅबमध्येही १५-२० मिनिटेच बसवते. गिरगाव चौपाटी आली की पेशन्स संपतात. आणि वर जाणे नको वाटते. बाकी गेटवे, मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, राणीबाग, धक्का वगैरे सारे लवकर येते. या हँगिंग गार्डनलाच वर जायचे असल्याने जास्त वेळ लागतो.

वाशी खाडीतले पक्षी पाहाण्यासाठी
मिनी सी शोअर का काय म्हणतात.
>>>

मिनी सीशोअर नाही. तिथे खाडी नाही तर होल्डींग पाँड आहे. अर्थात तिथेही पक्षी येतात. सीजनला फ्लेमिंगो आणि ते सी गल्स समुद्रपक्षी तर खोर्‍याने असतात पाण्यावर. जोडीला कबुतरेही असतात कारण लोकं दाणे टाकतात. आम्ही बरेचदा पडीक असतो त्या पक्ष्यात. पण तिथे पक्षीनिरीक्षण होत नाही. हिरा म्हणत आहेत ते वेगळे. माझीही ईच्छा आहे बरेच दिवसांची की पहाटेच घ्यावा असा एखादा अनुभव. मला खादाडीत रस नसतो सकाळीच सकाळी. उपाशीही मजा लुटू शकतो. पण फिरणे पोरांसोबतच होत असल्याने अश्या जागी जाणे होत नाही. एकदा एकटेच जाऊन अनुभवून यायला हवे. अगदी अभ्यासू चिकीत्सक वृत्ती नसली तरी निसर्गाच्या सानिध्यात जाणे कोणाला आवडत नसावे..

खादाडी ऑपशन्स

राणी बाग + नेहरू सेंटर
किंवा
राणी बाग+ गेटवे+ म्युझिअम
असं करतो.
बॉम्बे जिमखान्याकडून एसएनडीटी कडे जाताना वाटेतल्या गल्लीत टपऱ्या आहेत तिथे मुलांना आवडेल असे खाणे मिळते. पुढे चर्नीरोड स्टेशनसमोरून जाताना एक 'सह्याद्री' आहे. स्वच्छ आणि मस्त. पण दुपारी एक ते अडीच गर्दी असते. फ्लोरा फाउंटनला समोर जन्मभूमी गल्लीत एक डोसासेंटर चांगले होते ते बंद झाले.
सीएसटी स्टेशनसमोरच्या टपऱ्यांबद्दल काय बोलणार त्या सर्वांना माहीत आहेत.
सँढर्सट रोड स्टेशनसमोर प्रभू यांचे भट खानावळ आहे. शाकाहारी जेवण. काळबादेवी भागातून मेट्रोकडे गेल्यास विविध खादाडी स्टॉल्स/दुग्धालये आहेत. मुसलमानी पद्धतीचे महमदली रोडवर. शेवटी चर्चगेट/सीएसटी कडे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे AC local train प्रवास करून फटाफट परत येता येते.

Srd छान पोस्ट. मला ती नावे लक्षात राहत नाही. पण त्या त्या भागात गेले की कुठे जाऊन खायचे हे कळते.

जाई
@ लाडू सम्राट - लालबाग परेळला - मिठाईवाला आहे + महाराष्ट्रीय नाश्ता. बसून खायची सोय आहे हॉटेलसारखी. जवळपास सगळेच पदार्थ चवदार. मिठाईसुद्धा चांगली असावी. शक्यतो आम्ही तिथे घ्यायला जात नाही. पण मागे एकदा आमच्या ऑफिसमध्ये कसल्याश्या ओकेजनला मी तिथली मिठाई वाटलेली. लोकं येऊन विचारत होते.

https://www.google.com/search?q=thane+creek+flamingo+sanctuary&tbm=isch&...

खूप छान ठिकाण आहे हे. ठाणे ते वाशी पुलापर्यंत छान सफर होते. आधी बुकिंग करावे लागते आणि बोटीची एकच फेरी सकाळीच असते. पक्ष्यांना त्रास होईल अशा प्रकारे अंदाधुंद होड्या चालवीत नाहीत. कधी कधी इंजिनसुद्धा बंद करून बोट नुसती तरंगत ठेवतात

परळ नाक्यावर एक छितरमल ( नाव आठवत नाही.),आणि दादरला एशियाड बस सुटतात त्यासमोरचा एक दूग्धालयवाला, तसेच सायन स्टेशनजवळचा 'यु.पी.डेअरी फार्म हे तीनही रसमलाई साठी आणि इतर बंगाली मिठायांसाठी चांगले. पण खवा /माव्याचे पदार्थांसाठी मोहनी नी मिठाई- भुलेश्वर.
सुतरफेणी - 'डी. दामोदर' दादर टीटी. पटेटी सणाच्या वेळी हमखास मिळते.

_______________
शिवडीच्या खाडीत फ्लेमिंगोज यायचे,- होय.
पण तो कोस्टल रोड काढताहेत ना तो तिकडेच येणार म्हणून लोचा झाला आहे. आणिक आगार चेंबूरकडून होडी करणे महागडे काम आहे. पण ऐरोली खाडीने सगळ्यांना मागे टाकले आहे.
_______________
राणीबाग लेखासारख्याच माहितीचे धागे मुंबईतील इतर मायबोलीकरांनी लिहिले तर उपयुक्त होतील.
हिंदुस्तान टाईम्स पेपरवालेही असे माहितीचे पान देतात. कालाघोडा फेस्टिवलचे ( फेब्रुवारी पहिला आठवडा) सध्याचे प्रायोजक तेच आहेत.खूप फंड देतात.

मध्यंतरी शिवडी न्हावाशेवा समुद्रीपुलासाठी चाचपणी चालली होती तेव्हा बातमी आली होती की तिथे वाढलेल्या हालचालींमुळे पक्ष्यांचे प्रमाण कमी झालेय.

सुतरफेणी - 'डी. दामोदर' दादर टीटी>> हि कायम मिळते आणि त्या सुतारफेणीला तोड नाही.. अमेरीकेला येतानाही दोन पाकीटं घेऊनच येते

या मे महिन्यात कोकणातून मुंबईत येताना ऐरोली ब्रिजवरून खाली बघितलं तर फ्लेमिंगो दिसले आम्हाला. लांब होते, पण ओळखू आले.

दामोदर = सुतारफेणी + कचोरी (हे आमचे कॉम्बिनेशन)

शिवडी जेट्टीच्या ईथे एकदा पक्षीनिरीक्षणासाठी जायचा प्लान बनवलेला, आठेक वर्षांपुर्वी असावा. पण तो जमला नाही. आणि मग नंतरच्या वर्षाला बातमी आली की पक्ष्यांचे येणेजाणे कमी झाले वा बंद झाले तिथे. मजा नाही राहिली वगैरे.
ऐरोलीचे बघायला हवे आता..

हे काल सागर विहार, वाशीला दिसले. फ्लेमिंगोच असावेत. असे आजूबाजूची लोकं बोलत होते. उशीर झाल्याने आणि पावसाने अंधारून आल्याने फोटो अगदीच क्लीअर नाहीत

IMG_20220627_221045.jpg

फ्लेमिंगो असावेत किंवा नसावेत.. बहुतेक नसावेत. पण वाशी पुलापाशी क्वचित् अगदी तुरळक दिसतात. खरे तर आता सध्या सीझन नाही फ्लेमिंगो इथे दिसण्याचा. आणि त्यांचे आणि इतर स्थलांतर करणाऱ्या पक्षांचे थवे फक्त ठाणे खाडीच्या ठाणे भांडूप पट्ट्यात दिसतात. काही हौशी आणि दर्दी लोक नावाड्याला पैसे देऊन तुरुंब्यापर्यंत नेतात बोट, पण ती समुद्र सफर असते. पक्षीनिरीक्षण नव्हे. आणि वाशी पूल ओलांडून पलीकडे जाणे हे अधिकृत कार्यक्रमात अजिबात नाही.

लोकं फ्लेमिंगो म्हणूनच बघत होते. एका वाशीच्या मित्रानेही ईथलेच फोटो ग्रूपवर फ्लेमिंगो नाव देऊनच खपवले होते.
जर फ्लेमिंगो नसेल तर कोण हा प्रश्नही सोबत आलाच. मुलगी म्हणाली क्रेन बर्ड असेल. तो गूगल करून पाहिला. फ्लेमिंगोही गूगल करून पाहिला. दोन्ही फोटो बाजूबाजूला ठेवता हे क्रेन नाही तर फ्लेमिंगोच्या जवळ जातात असे वाटते.

हो, म्हणूनच हा फोटो आणखी झूम करून क्रॉप केला आणि त्यानंतर पायांचा काटकुळेपणा आणि मानेपासूच चोचीपर्यंत असलेला बाक हे गूगलवर दिसणार्‍या फोटोंशी पडताळून पाहता मलाही फ्लेमिंगोच वाटले.

मुंबईत फ्लेमिंगो पक्षी मुख्यत: कच्छ आणि राजस्थान मधून येतात. काही थवे मध्य आशियातून अफगानिस्तान पाकिस्तान मार्गेही येतात.
ह्या मार्गाने येणाऱ्या पक्ष्यांची अफगानिस्तान, गिलगिट प्रांतात शिकार होते. मागे काही वर्षांपूर्वी वाचनात आले होते की हे पक्षी आता स्थिरावू पाहात आहेत. तसेही फ्लेमिंगो हे फारसे मायग्रेटरी पक्षी नाहीत. तेव्हा ठाणे खाडी हाच त्यांनी पर्मनंट address केला असेल कदाचित.

छान लेख आणि माहिती.
सगळे फोटो नेत्रसुखद.
शाळेत असताना एकदा मुंबईत खास मुंबई बघायला गेलेले आईबाबांबरोबर. तेव्हा मुंबई दर्शन म्हणून एक एसटी होती. सकाळी आठ ते संध्याकाळी सात अशी. दिवसभरात मुंबई दाखवायचे. पहिलच ठिकाण हे होत. थोडं थोडं आठवतंय. बरीच ठिकाणं दाखवत असतील मला फक्त राणीची बाग आणि म्हातारीचा बूट एवढंच आठवतंय.

धन्यवाद अस्मिता, वर्णिता

@ वर्णिता,
मुंबई दर्शन ट्रिपचा कधी अनुभव घेतला नाही. पण एक दोन मुंबईकर मित्रांनी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना फिरवायला म्हणून मुंबई दर्शन ट्रिप केलेल्या त्यांचे अनुभव काही छान नव्हते. खूप घाईघाई होते. आणि काही आपल्याला ईटरेस्ट नसलेलेही बघावे लागते. म्हणजे त्यापेक्षा मुंबईत राहणार्‍याच रिकामटेकड्या मित्रमंडळी नातेवाईकांना पकडायचे आणि त्यांच्यासोबत हवे तसे प्लान करून फिरायचे. ते बेस्ट Happy

खादाडीचे वर काही ऑप्शन्स सुचवलेत पण ते सगळे वॉकेबल डिस्टन्स मधे आहेत की कसे ? राणीचा बाग प्लॅन करतोय. पण ट्रेनने जाणार सो चालत जाण्यासारखे काय काय आहे आजूबाजूला आणि खाण्याच्या जागा पण Happy

Pages