चक्राता परत एकदा- (भाग २/२)

Submitted by वावे on 24 June, 2022 - 05:56

आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/81819

बंगलोरच्या त्या दोन कुटुंबांनी ही सहल अगदी भरगच्च आखलेली होती. चक्राताला येण्याआधी ते अजून दोन ठिकाणी दोन दोन दिवस फिरून आले होते. सकाळी लवकर, म्हणजे साडेसातलाच त्यांनी नाश्ता सोबत पॅक करून घेतला आणि ते बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघाले. एकाच दिवसात बुधेर आणि टायगर फॉल्स, अशी दोन्ही ठिकाणं त्यांनी केली.

आम्ही नेहमीप्रमाणे नाश्ता वगैरे करून नऊ-साडेनऊला देवबनला जाण्यासाठी गाडीत बसलो. हा रस्ता बुधेरपेक्षा वेगळ्या दिशेला जातो. चढण आणि वळणं तर अपरिहार्यच, पण रस्ताही खूपच खडबडीत आहे. मधे एका ठिकाणी सैन्याची प्रशिक्षणाची छावणी आहे. तिथून बरंच पुढे गेल्यावर दोन रस्ते फुटतात. एक देवबनला जातो आणि दुसरा खडांबाला. आधी देवबनला गेलो. गाडीतून उतरून व्यासशिखरावर चढायला सुरुवात केली. बुधेरच्या मानाने ही चढाई खूपच कमी आहे. इथेही देवदार वृक्षांची सावली आहेच. तिथे दोनतीन गायी चरत होत्या. इथे देवदारांचे बरेच ’कोन्स’ मुलांनी गोळा केले.

वाटेत विविध प्रकारची फुलं दिसली.
Deoban_flowers1.JPG

Deoban_flowers2.JPG

Deoban_flowers3.JPG

Deoban_flowers4.JPG

व्यासशिखरावर पोचलो. तिथे सावलीसाठी एक घुमटी बांधलेली आहे. इथून लांबवरची, नंदादेवी, बद्रिनाथ, केदारनाथ अशी बरीच शिखरं दिसतात. पण त्यासाठी हवा स्वच्छ असावी लागते. गेल्या वेळेस आणि याही वेळेस हवा स्वच्छ नसल्यामुळे मला काही ही शिखरं बघण्याचं भाग्य मिळालेलं नाही.

तिथे बसून जरा वेळ विश्रांती घेतली. त्या घुमटीच्या छपराच्या आतल्या बाजूवर लोकांनी आपापली नावं कोरून ठेवलेली आहेत. तिथे बाहेर एका खांबावर संगमरवरी फरशी बसवलेली आहे आणि त्या फरशीवर एक संस्कृत श्लोक कोरलेला आहे. व्यासांची स्तुती करणारा हा श्लोक आहे. पण त्या फरशीवरसुद्धा लोकांनी दगडांनी रेघोट्या कोरल्या आहेत.

तिथे बसून, लाडू खाऊन, पाणीबिणी पिऊन आम्ही खाली उतरलो. उतरताना काही छोटे छोटे पक्षी दिसले. त्यातला ग्रे-हेडेड कॅनरी फ्लायकॅचर हा पक्षी आम्हाला हॉटेलजवळसुद्धा दिसला होता. बाकीचे पक्षी नीट दिसले नाहीत. खाली येऊन डब्यातून आणलेलं जेवण जेवलो. इथेही माश्यांनी बराच त्रास दिला.

जेवण झाल्यावर थोड्या वेळाने गाडीत बसून आम्ही खडांबाला जायला निघालो. तिकडे ’लॅमरगियर’ नावाचं गिधाड दिसेल, अशी आम्हाला आशा होती. गेल्या वेळेस हे गिधाड आम्हाला छान दिसलं होतं. डावीकडच्या डोंगरामागून ते गिधाड उडत आलं होतं, पायात धरून आणलेलं हाड त्याने खालच्या कातळावर टाकून फोडलं , मग ते खाली उतरलं आणि त्याने ते हाडांचे तुकडे खाल्ले होते. या वेळेसही हे सगळं दिसावं, अशी आमची इच्छा होती.
’खडांबा’ म्हटलं, तरी प्रत्यक्षात खडांबापर्यंत जायची गरज नव्हती. जिथे जायचं होतं, ती जागा खडांबाच्या आधीच वीसेक किलोमीटरवर होती. एका वळणावर मला आठवलं, की हीच ती जागा, जिथे आम्ही गेल्या वेळेस बसलो होतो. पण शंका नको म्हणून मी गेल्या वेळेस काढलेला या दरीचा फोटो शोधला. खाली खोल दरीत दिसणारी घरं, बाकीचं दृश्य जुळलं. जागा बरोबर होती. रस्त्याच्या डाव्या बाजूला उंच कडा, उजवीकडे खूप खोल दरी. अशा या रस्त्यावर मधूनमधून रस्त्याच्या कडेला मुद्दाम जरा मोकळी सपाट जागा ठेवलेली असते. समोरासमोर दोन वाहनं आली, की गरज पडली तर या जागेचा उपयोग गाडी बाजूला घेण्यासाठी करता येतो. अशा मोकळ्या जागेवर आम्ही थांबलो आणि लॅमरगियरची वाट बघत बसलो.

khadamba.JPG

पण छे, बराच वेळ थांबलो तरी लॅमरगियर काही आलं नाही. गेल्या वेळेस आलेलो असताना आम्ही आठजण आणि शिवाय दोन ड्रायव्हर, असे दहाजण होतो. शिवाय किकांसारखी अनुभवी व्यक्ती सोबत होती. पण आत्ता आम्ही चौघं आणि एक ड्रायव्हर, एवढेच. किती वेळ थांबायचं हा प्रश्न होताच. शेवटी तासभर थांबलो आणि लॅमरगियर काही दिसत नाही, असं म्हणत नाईलाजाने परत निघालो.

येतानाची वाट त्या मानाने लवकर सरली आणि वेळ होता म्हणून आम्ही चक्राता मार्केटला जाऊन मोमो खायचं ठरवलं. चविष्ट मोमोज खाल्ले. बाजारातून थोडा राजमा खरेदी केला. बुरांशचं सरबत, म्हणजे आपण जसं कोकम सरबताचं सिरप तयार करतो, तसं बुरांशचं सिरप मात्र बाजारातून न घेता ड्रायव्हरच्या ओळखीच्या एका मुलाकडून उद्या घेऊ, असं ठरवलं. प्रत्यक्षात मात्र ऐन वेळी तो मुलगा ठरलेल्या जागी उगवलाच नाही, त्याचा फोनही लागला नाही. त्यामुळे दुसर्‍याच एका माणसाकडून ते सरबत आम्ही घेतलं.

आता हॉटेलमध्ये परत आल्यावर ’बॅगा भरणे’ हे काम होतं. ते पार पाडलं. दुसर्‍या दिवशी सकाळी नऊसाडेनऊला निघायचं होतं. बंगलोरचे पाहुणेही त्याच दिवशी निघणार होते. ते लवकरच निघाले. आम्हाला तशी काही घाई नव्हती कारण डेहराडूनहून दिल्लीला जाण्याची ट्रेन संध्याकाळी पाच वाजता होती. इथून डेहराडूनला दुपारी पोचून, तिथे जेवून मग रेल्वे स्टेशनवर जाऊन बसायचं, असं ठरवलं होतं. आम्ही नाश्ता करून मग निघालो.

चक्राता सोडताना वाईट वाटत होतंच. हा सुंदर परिसर आणि देवदारांचा सुगंध सोडून पुन्हा गजबजलेल्या जगात जायला नको वाटत होतं.

flowres1.JPG
ही हॉटेलच्या परिसरातली काही फुलं.

rhododendron.JPG

ही र्‍होडोडेंड्रॉन, म्हणजे बुरांशची फुलं आहेत.

डेहराडूनहून येताना बराच वेळ लागला असला, तरी आत्ता परत जाताना त्या मानाने लवकर पोचलो. फारशी भूक लागली नव्हती. हाताशी वेळ आहे, म्हणून डेहराडूनची सुप्रसिद्ध फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघूया असं ठरवलं. चक्राताकडून डेहराडूनमधे पोचण्याच्या रस्त्यावरच ही इन्स्टिट्यूट आहे. तिथे बाहेर तिकिटं काढून आत गेलो. ह्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉरेस्ट्री (वनविद्या) या विषयावर पदवी आणि डॉक्टरेटचं शिक्षण दिलं जातं. तब्बल २००० एकर जमीन त्यांच्याकडे आहे. एक बॉटॅनिकल गार्डन आहे, पण तेव्हा ते बंद होतं. आम्ही मुख्य इमारतीतली संग्रहालयं तेवढी बघितली. एकूण पाच की सहा आहेत, त्यापैकी तीन पाहिली.

या संस्थेची इमारत फार छान आहे. ब्रिटिश काळातली आहे. लाल रंगाच्या भिंती आणि घुमट असलेले कमानदार छतांचे लांबच लांब व्हरांडे.

FRI1.JPG

FRI2.JPG

FRI3.JPG
संस्थेचा परिसरही सुंदर आहे.

FRI5.JPG

एका भिंतीवरील कलाकृती

आम्ही पाहिलेल्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय जंगलातल्या झाडांना होणारे विविध रोग आणि त्यासाठी कारणीभूत असणारे जीवाणू-बुरशी वगैरे, या विषयावर होतं. अशा रोगांमुळे खराब झालेले लाकडाचे नमुने तिथे ठेवलेले आहेत.
दुसर्‍या संग्रहालयाचा विषय ’टिंबर (लाकूड)’ हा होता. भारतात विविध कारणासाठी वापरल्या जाणार्‍या लाकडांचे नमुने होते, ती झाडं कुठल्या प्रदेशात उगवतात हे नकाशावर दाखवलेलं होतं. भरपूर प्रकारच्या लाकडांचे नमुने (प्रत्येकी एक पॉलिश न केलेला आणि एक पॉलिश केलेला) बघायला मिळाले. इथेच एका ७०० वर्षं वय असलेल्या देवदार वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद घेऊन ठेवलेला आहे. १९१९ साली या झाडाचं आयुष्य संपलं. तेव्हा त्याच्या खोडावर दिसणार्‍या वलयांवरून त्याचं वय ७०४ वर्षांचं असावं असं ठरवलं गेलं. या आडव्या छेदावर केंद्रापासून ते बाहेरच्या कडेपर्यंत अनेक समकेंद्री वर्तुळं दिसतात. त्यापैकी अधल्यामधल्या वर्तुळांवर त्या त्या वर्षी घडलेल्या ठळक घटना नोंदवलेल्या आहेत. कुतुबमिनारच्या उभारणीपासून सुरुवात करून ते जालियनवाला बागेतल्या हत्याकांडापर्यंत घटना आहेत. केवढा मोठा कालपट! हे संग्रहालय मला खूपच आवडलं. (तिथे आत फोटो काढू देत नाहीत. पण गूगल केल्यावर या खोडाचा फोटो पहायला मिळतो.)
तिसरं संग्रहालय ’सिल्विकल्चर’ या विषयावर होतं. जंगलांचे प्रकार, भूगोलानुसार ते कसे बदलतात, ते नकाशांवर दाखवलेलं आहे. हे नकाशे ’इंटरॅक्टिव्ह’ आहेत, म्हणजे नकाशासमोर वेगवेगळी बटनं आहेत. आपण समजा ’पानझडी’ असं लिहिलेलं बटन दाबलं, तर भारतात जिथे जिथे पानझडी जंगल आहे, त्या त्या ठिकाणी नकाशात दिवे लागतात.
हेही संग्रहालय आम्हाला आवडलं.
आता भूकही लागली होतीच आणि फिरून फिरून आम्ही दमलोही होतो. त्यामुळे जेवायला गेलो. जेवून मग रेल्वे स्टेशनला गेलो. ड्रायव्हरला निरोप दिला. चारपाच दिवस त्याच्याबरोबर प्रवास करून आमची चांगली ओळख झाली होती. चांगल्या गप्पा झाल्या होत्या.

स्टेशनमध्ये शिरताच समोर आमची शताब्दी एक्स्प्रेस उभीच होती. गाडी सुटायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे डब्यात फारसं कुणी आलेलंच नव्हतं. मला उगाचच त्यामुळे ’ही नक्की आपलीच गाडी आहे ना?’ अशी शंका यायला लागली. शेवटी मी परत एकदा बाहेर जाऊन गाडीवरचं नाव आणि नंबर, यांची खात्री करून घेतली. Lol गाडी बरोब्बर पाच म्हणजे पाच वाजता सुटली! रात्री अकराला दिल्लीला पोचलो.

दुसर्‍या दिवशी दिल्लीला दिवसभर हॉटेलमध्ये थांबून संध्याकाळी शहरात थोडं फिरण्याचा विचार होता. कारण चक्राताच्या थंडीतून आम्ही दिल्लीच्या उन्हाळ्यात येऊन पडलो होतो! त्यामुळे दिवसा उन्हातून फिरण्याची इच्छा अजिबात नव्हती. त्याप्रमाणे संध्याकाळी निघालो. इंडिया गेट आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या परिसरात पोचलो.

India_gate_0.JPG

नक्की आवर्जून जाऊन बघावं असं हे स्मारक बांधलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक योद्ध्याचं स्मरण इथे केलेलं आहे. सुरुवातीला परमवीर चक्र मिळालेल्या वीरांचा विभाग आहे. युद्धाच्या काळात असामान्य शौर्य गाजवलेल्या योद्ध्यांना परमवीर चक्र दिलं जातं. प्रत्येक योद्ध्याचा छोटा पुतळा (बस्ट), त्या त्या लढाईची आणि त्यांनी गाजवलेल्या शौर्याची थोडक्यात माहिती, असं स्वरूप आहे. गुलाबाच्या, मोगर्‍याच्या आणि इतरही अनेक प्रकारच्या फुलझाडांनी हा सगळा परिसर सुशोभित केलेला आहे.

NWM1.JPG

तिथून बाहेर पडून मग आतल्या बाजूला, म्हणजे युद्धस्मारकाच्या केंद्राच्या भागात गेलो. इंडिया गेटजवळ असणारी अमर जवान ज्योत आता इथल्या ज्योतीत विलीन केली आहे. या केंद्राच्या भोवती अनेक वर्तुळाकार भिंती बांधलेल्या आहेत. या सर्व भिंतींवर १९४७ पासून ते आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलं आहे, त्या असंख्य सैनिकांची नावं कोरलेली आहेत. भारताच्या कानाकोपर्‍यातल्या या सैनिकांची नावं वाचताना खूप वाईट वाटतं. सैनिक युद्धाला कारणीभूत नसतात. युद्धाला कारणीभूत असणार्‍या चुका वेगळ्याच माणसांच्या असतात. पण प्राण जातात सैनिकाचे.

काळोख पडायची वेळ जवळ आली होती. इथे रोज एक कार्यक्रम असतो. रोज एका-एका हुतात्मा सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते ( पत्नी येऊ शकत नसल्यास कदाचित मुलांना, नातवंडांना बोलावत असतील) अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र वाहिलं जातं. आम्ही गेलो त्या दिवशी १९७१ च्या युद्धात हुतात्मा झालेल्या एका हरियानाच्या सैनिकाच्या सहधर्मचारिणीच्या हस्ते हा कार्यक्रम होता. लष्करी शिस्तीत तो कार्यक्रम पार पडला. सत्तर-पंच्याहत्तर वय असणार्‍या त्या आजी व्हीलचेअरवर आल्या होत्या. जेव्हा त्यांच्या पतीची लढाईतली कामगिरी माईकवरून सांगितली जात होती, तेव्हा त्यांना भावना अनावर झाल्या. आमच्यासारख्या प्रेक्षकांची बरीच गर्दी होती. टाळ्या न वाजवण्याची कडक सूचना होती. कार्यक्रम संपताना तिन्ही दलांचे झेंडे खाली उतरवले गेले.

NWM2.JPG

या ठिकाणी एक गोष्ट प्रचंड खटकली. ती म्हणजे, आपण जिथे आलो आहोत, त्या जागेचं गांभीर्य न ठेवणारे पर्यटक! मी रायगडाबद्दल लिहितानाही हे लिहिलं होतं. राष्ट्रीय युद्ध स्मारक ही हसरे सेल्फी काढण्याची जागा नाही, नसली पाहिजे. या बाबतीत खरोखरच काहीतरी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे असं मला वाटतं. काही काही देवळांमध्ये, उदा. जगन्नाथपुरीला देवळाच्या परिसरात कॅमेरा, मोबाईल न्यायलाच बंदी आहे. तिथे आपण तो नियम पाळतोच ना? मग राष्ट्रीय युद्ध स्मारकासारख्या ठिकाणीही असा काही तरी नियम केला पाहिजे, ज्यामुळे हा थिल्लरपणा कमी होईल. सेल्फी काढण्यासाठी इतर अनेक जागा असतात. सेल्फीच असं नाही, तर तिथे वावरतानाची शिस्त न पाळणं (जिथे बसू नका असं स्पष्ट लिहिलेलं आहे तिथे बसणं वगैरे) हेही खटकतं. तिथे असलेले सुरक्षा कर्मचारी शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात.

NMW3.JPG

असो.

रात्री कनॉट सर्कलला थोडा वेळ भटकलो. जेवलो. हॉटेलला येऊन झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी चेकआऊट करून विमानतळावर गेलो. तिथेच जेवलो. संध्याकाळी पुण्याला पोचलो.

moon_plane.JPG

येताना दिसलेला चंद्र.

चक्राता पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा ऑक्टोबर महिना होता. वेगळ्या ऋतूत तिथे परत एकदा जाऊन तिथला निसर्ग आणि पक्षी बघण्याची माझी इच्छा होतीच. ती पूर्ण झाली. अर्थात, एकटीने कॅंपला जाणं वेगळं आणि कुटुंबासोबत जाणं वेगळं. ’फोकस’ निश्चितच बदलतो. पण एकटीने गेलेली असताना पाहिलेले सुरेख पक्षी, तिथला निसर्ग हा घरच्यांसोबत परत पहावा असंही वाटत होतंच. मुलांनाही हा अनुभव खूपच आवडला. नवर्‍यालाही चक्राता खूप आवडलं. त्यांनाही तिथे पुन्हा जावंसं वाटतंय याचा अर्थ सहल सुफळ संपूर्ण झाली. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही भाग छान

राष्ट्रीय युद्ध स्मारक ही हसरे सेल्फी काढण्याची जागा नाही, नसली पाहिजे. >>>>> अगदीच. त्यामानाने वाघा बॉर्डरला एकदा जाणे झालेले तिथला अनुभव छान होता. तिथल्या परेडमुळे आपसूकच देशभक्तीचे एक भारावलेले वातावरण तयार झालेले. आचरटपणा करावा असे मनातही येऊ नये. लोकांनी पाकिस्तान सैन्याचाही आदर ठेवलेला आणि बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानला जाणार्‍या बसलाही उत्स्फुर्तपणे हात हलवून निरोप दिलेला.

दुसरा भाग आल्यावर लगेच वाचून काढला . छान लिहिले आहे . संग्रहालय फारच देखणे आहे . युद्ध स्मारकाविषयी लिहिलेल्या प्रत्येक ओळीशी सहमत . सुशिक्षित असून लोक असे का वागतात कळतच नाही .

सुंदर झालेत दोन्ही लेख. छान फोटो आणि माहिती!

कचरा करणे, जिथे जाऊ तिथे आपली नावे कोरणे असली कृत्ये करून लोकांना काय मिळते kalat नाही Sad युद्ध स्मारकाच्या परिच्छेदाशी अगदीच सहमत...

खूप सुंदर ट्रीप आणि वर्णन!

या ठिकाणी एक गोष्ट प्रचंड खटकली. ती म्हणजे, आपण जिथे आलो आहोत, त्या जागेचं गांभीर्य न ठेवणारे पर्यटक! मी रायगडाबद्दल लिहितानाही हे लिहिलं होतं. राष्ट्रीय युद्ध स्मारक ही हसरे सेल्फी काढण्याची जागा नाही, नसली पाहिजे. > खूपच पटलं.

हा भागदेखील आवडला. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची इमारत आणि परिसर फारच सुंदर आहे.
युद्धस्मारकाच्या पुष्पचक्र-कार्यक्रमाबद्दल माहिती नव्हते. कधी भेट दिली तर हे आवर्जून लक्षात ठेवेन.

मस्त.

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे फोटो आवडले, विशेषतः कमानींचा पहिला फोटो.

युद्धस्मारकाच्या इथे होणार्‍या या कार्यक्रमाविषयी माहिती नव्हतं.

धन्यवाद रायगड, राधिका, मनीमोहोर आणि ललिता-प्रीति.
युद्ध स्मारकातल्या कार्यक्रमाबद्दल आम्हालाही आधी माहिती नव्हतंच. तिथे गेल्यावर कळलं.
प्रत्यक्ष तो कार्यक्रम सुरू असताना सगळ्या प्रेक्षकांनी शिस्त पाळली होती. एरवी त्या स्मारकाच्या परिसरात फिरताना मात्र खूप बेशिस्त/ गांभीर्याचा अभाव जाणवला.
माझ्या एका दूरच्या नातेवाईकांना वीसेक वर्षांपूर्वी अतिरेक्यांशी लढताना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांचं नाव मी तिथे शोधण्याचा प्रयत्न करत होते. ते दाक्षिणात्य असल्याने मला माहिती असलेलं नाव आणि तिथलं नाव यात तफावत होती ( नाव-आडनाव या स्वरूपात मला माहिती होतं, तिथे आद्याक्षरं वेगळी होती) तेव्हा तिथली सुरक्षा व्यवस्था बघणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खूप आपुलकीने आणि सहृदयतेने मदत केली.

<<<इथे रोज एक कार्यक्रम असतो. रोज एका-एका हुतात्मा सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते ( पत्नी येऊ शकत नसल्यास कदाचित मुलांना, नातवंडांना बोलावत असतील) अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र वाहिलं जातं.>>
हे माहित नव्हते. वाचून खूप बरे वाटले.

दोन्ही भाग छान आहेत.

सुरेख लेख वावे! प्रचि मुळे अजून देखणा झालाय. एकामागोमाग एक वाचला. पहिल्यातले फोटो पण खुपच सुरेख आलेत.