विडिओ आधी बघितला तरी चालेल
Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI
-----------------------------------------------------
राणीबाग आणि भायखळ्याच्या गल्ल्यांमध्ये खेळण्यात माझे बालपण कसे गेले हे आपण मागील पाणघोड्याच्या भागात पाहिले.
https://www.maayboli.com/node/81192
त्यामुळे राणीबागेशी माझी एक वेगळीच नाळ जुळली आहे. जेव्हा लोकं म्हणायची छ्या राणीबागेत आता काही राहिले नाही तेव्हा फार राग यायचा. जसे काही वाघ सिंह हत्ती घोडे, या नावे ठेवणार्यांच्या दारात झुलतात, जे चार प्राणी बघायला मिळताहेत ते बघावे आणि खुश राहावे तर नावे कसली ठेवत आहात.
पण त्याच वेळी वाईटही वाटायचे. कारण यात तथ्यही होतेच. हरीण, सांबर, नीलगाय, काळवीट, मगरी, माकडं जरी खोर्याने असली, गजराज लांबून दर्शन देत असले, झालंच तर पाणघोडाही अध्येमध्ये पाण्याबाहेर येत असला, कधी मोर पिसारा फुलवत असला, कधी नाग फणा उभारत असला, पक्ष्यांचीही रेलचेल असली तरी ज्या प्राण्यांना खास बघायला आपण प्राणीसंग्रहालयात जातो, ज्यांच्या रुबाबदार शरीयष्टीचे आबालवृद्धांना आकर्षण असते, त्या जंगलच्या राजा म्हणवले जाणार्या वाघसिंहांची कमी होतीच. लहानपणी केव्हातरी भायखळ्याला मामाकडे सुट्टीत राहायला जायचो तेव्हा रात्रीच्या शांततेत वाघाच्या डरकाळीचा आवाज यायचा हिच काय ती त्याची शेवटची आठवण होती.
नाही म्हणायला मध्यंतरी पेंग्विन नामक पक्ष्यांचे आकर्षण आले होते. पण त्यावरूनही लोकांचे चिडवणेच फार झाले. व्यक्तीशः मलाही कधी मुद्दाम जाऊन ते पक्षी बघावे असे वाटले नाहीत. आजवर मी ते पाहिले नाहीत.
मी स्वतःही कैक वेळा लेकीसोबत राणीबागेत गेलो. पण मलाही तिथले ईतर प्राणी बघण्यात फारसा रस नव्हता, ना लेकीला होता. आम्ही आपले दर विकेंडला छान खेळून यायचो. कारण विविध प्रजातीच्या झाडांची रेलचेल असलेले एक उद्यान म्हणून ते तेव्हाही छानच होते. पण मुद्दाम प्राणी बघायला म्हणून आमच्या राणीबागेत या असे कोणाला सांगायचो नाही.
आणि मग एके दिवशी कानावर खबर आली की राणीबागेत वाघांची एक जोडी आली. रॉयल बंगाल टायगर. आणि ईतरही बरेच नवनवीन प्राणी आले. त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि आकर्षक पिंजरे तयार केले गेले. एकूणच राणीबागेचे सुशोभिकरण झाले. राणीबागेत जाणार्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली... आणि रविवार, दिनांक २२ मे २०२२, या दिवशी तब्बल २६ हजार १७३ लोकांनी राणीबागेला भेट देत एक विक्रम रचला.
पण दुर्दैवाने आता आम्ही मुंबईहून शिफ्ट झालो होतो. तिथले घर अजूनही आहे, पण वरचेवर जाणे बंद झाले होते. त्यामुळे आता आपल्याला आपल्याच राणीबागेत जायला मुहुर्त शोधायची गरज होती. नाही म्हणायला लेकीने तिच्या आई आणि मावश्यांसोबत मला टांग देत एक धावती भेट दिली होती. राजालाही ओझरते बघून आलेली. पण ते समाधान होण्यास पुरेसे नव्हते. आणि वर्कलोडमुळे माझाही प्लान नेहमी बनता बनता फिस्कटत होता.
अखेरीस या विकेंडला तो मुहुर्त लागला. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपल्या होत्या. त्यामुळे मे महिन्याची विक्रमी गर्दी आता झेलावी लागणार नव्हती. तसेच पावसापाण्याचे दिवस असल्याने लोकं लांबचा प्रवास करून मुद्दाम राणीबागेत यायची शक्यता कमी होती. याऊलट आम्ही मात्र पावसाळी कबूतरं असल्याने आम्हाला पावसातच जास्त फिरायला आवडते. तरी शनिवारचा सुट्टीचा दिवस, आपल्यासारखेच अजून पावसात बागडणारे जीव संध्याकाळच्या वेळी गर्दी करतील हि शक्यता होतीच. त्यामुळे आम्ही सकाळीच जायचे ठरवले. मुलांनाही ट्रेनने जायची हौस होती. त्यामुळे जितके पहाटे जाऊ तितके ट्रेनच्या गर्दीच्या दृष्टीनेही चांगलेच होते.
गूगल जिंदाबाद. राणीबागेचा टाईम चार साईटवर चेक करून कन्फर्म केला. सकाळी ९.३० वाजता प्रवेशद्वार आमच्यासाठी खुलणार होते. लगोलग एम-ईंडिकेटर अॅपवर वाशीहून ट्रेनचा टाईम बघितला. वाशी ते डॉकयार्ड आणि तिथून १० मिनिटे टॅक्सीचे असा हिशोब करत बरोबर सव्वानऊ वाजता आम्ही पोहोचणार होतो. कोण म्हणते मुंबई लोकल पावसात ऊशीरा धावते, वा मुंबईत वेळेवर टॅक्सी मिळत नाही. बरोब्बर सव्वानऊ वाजता मी माझ्या दोन पोरांसह राणीबागेच्या प्रवेशद्वाराशी हजर होतो.
साडेनऊ वाजता जेव्हा मेन गेट खुलले तेव्हा आमच्या सोबत कॉलेजच्या सहासात मुलामुलींचा ग्रूप, एक दहापंधरा साडी नेसलेल्या बायकांचे भगिनीमंडळ आणि एक चौकोनी कुटुंब ईतकेच जण होते. ते सारे आमच्यासोबतच आत आले आणि विखुरले गेले. पण तिकीटघर कुठे आहे हे फक्त मलाच ठाऊक असल्याने मीच एकटा योग्य दिशेने गेलो. आज किती हजारांचा आकडा गाठणार होता कल्पना नाही, पण त्यात पहिले तिकीट काढून पहिले आत प्रवेश करायचा मान आम्हीच पटकावला. कसलं प्राऊड फिलींग झाले. पोरांनाही कौतुकाने सांगितले, बघा तुमचा बाप तुम्हाला सर्वात पहिले राणीबागेत घेऊन आला. पण त्यांना त्याचे काही पडले नव्हते.... असो
पण आत जाताच ... आहाहा, गर्द झाडी, मोकळे रस्ते, वातावरणात गारवा, आणि आमच्या स्वागताला नुकताच सुरू झालेला रिमझिम पाऊस. योग्य मुहुर्त साधला आहे याची मनोमन खात्री पटली.
थोडं पावसात भिजून घेतले. त्या तयारीनेच गेलो होतो म्हणा. म्हणजे छत्री रेनकोट काही न नेता. दहा मिनिटात राणीबागेसह आम्हाला भिजवून तो पसार झाला आणि पुन्हा ढगांमागून सुर्यकिरण डोकावू लागले. बागेतला पहिला फोटो मी तिथे काढला...
१) आहाहा वाटावे असे उघडझाप करणारे पावसाळी वातावरण
गेटवरच्या मामांकडे आतली खबर काढली होती. वाघ कधी बघायला मिळेल विचारले तर दहा साडेदहा पर्यत ऊठून पब्लिकचे मनोरंजन करायला बाहेर येतो म्हणाले. त्यामुळे थेट तिथे न जाता काचेच्या तावदानांतले कासव आणि सर्प बघत पाणपक्ष्यांकडे मोर्चा वळवला.
२) पाणपक्ष्यांकडे मोर्चा
तसे हे पक्षी आधीही होतेच. पण पिंजर्यातले ते पक्षी कितीही छान वाटले तरी सतत बघून बोअरच व्हायचे. आता मात्र तिथे कायापालटच केला आहे. त्या पिंजर्यालाच ईतके मोठे केलेय की त्या आत एक छोटेसे जंगल वसवले आहे. आता त्या पिंजर्यात आपल्यालाही प्रवेश मिळतो. त्यात असलेल्या लकडी पुलावरून ईथून तिथे छान रमत गमत पक्षी बघत जाता येते. आम्ही अगदी सकाळची वेळ पकडल्याने आणखी भारी वाटत होते. पावसानेही आवरते घेतल्याने छान उजाडले होते. गर्दी तर दूरची गोष्ट, त्या पिंजर्यात आम्ही आणि पक्ष्यांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे पक्षीही मनसोक्त बागडत होते. तिथला सिक्युरीटी गार्ड गाईडचे काम करत आम्हाला झाडाझुडपात लपलेले एकेक पक्षी आणि त्यांची घरटी दाखवत होता. त्यामुळे एखाद्या विशेष अतिथी सारखे पक्ष्यांच्या घरात जाऊन पाहुणचार घेतल्यासारखे वाटत होते.
३-४-५-६) पाणपक्ष्यांच्या राज्यात
.
.
.
आमच्या अंदाजापेक्षा बरेच जास्त वेळ आम्ही तिथे रमलो. त्यामुळे मग ईथेतिथे जास्त वेळ न दवडता थेट राजाच्या दरबारात हजेरी लावायचे ठरवले. वाटेत गजराजांचे दर्शन तेवढे घेतले. तसेच गोरील्लाच्या मांडीवर बसून फोटोही काढला. तो नकली असल्याने काही बोलला नाही.
एव्हाना दहा वाजले होते, तरी लोकांची वर्दळ काही वाढली नव्हती. प्रभात फेरी जिंदाबाद.
७) चिटपाखराची मागसूस नसलेले शांत शांत रस्ते
८) तोफेच्या तोंडी द्यायलाही एखादी शिकार गवसत नव्हती
अरे हो, जाता जाता वाटेत, Sloth Bear अस्वलाला त्याच्या घरच्या जंगलात दुरूनच आणि पाठमोरे पाहिले. त्याच्या पलटायची मग फारशी वाट न बघता, तो एका वेळच्या जेवणाला ४ हजार ते १० हजार वाळव्या (termites) खातो ही माहिती वाचून तिथून निघालो.. ते थेट वाघाच्या जंगलाकडे!
९) Sloth Bear अस्वलाचे घर
१०) पाठमोरा अस्वल स्पॉटेड
आता सकाळचे साडेदहा वाजले होते. सर्व राणीबागेतली तुरळक गर्दी एकीकडे आणि वाघाच्या ईलाक्यातील गर्दी एकीकडे. त्याला 'जंगलाचा राजा' का म्हणतात हे त्याच्या दर्शनाला जमलेली गर्दी बघूनच समजले. आणि हो, तो तश्याच थाटात फेर्या घालत होता. रुबाबात चालत होता. जिथे जिथे तो जात होता, सर्व कॅमेरे त्या दिशेने वळत होते. आम्ही तर त्याच्या जोडीनेच पळत होतो. एक क्षण नजर हलू नये ईतके देखणे जनावर. मग लक्षात आले की या आठवणी कैद करायला हव्यात, आणि कॅमेर्याची आठवण झाली.
ईतक्यात त्याला पोहायची हुक्की आली. कदाचित त्याच्या आंघोळीची वेळ झाली असावी. आणि बघता बघता तो पाण्यात ऊतरला. चक्क पोहू लागला. काचेजवळ येऊन पोहता पोहताच लोकांना हाय हेल्लो करू लागला. फोटो काढायचे थांबवून मी विडिओ मोड ऑन केला आणि सभ्यतेचे सारे निकष धाब्यावर बसवून त्याची आंघोळ शूट करू लागलो. एखाद मिनिटाची घटना पण राणीबागेत यायचे सार्थक झाल्यासारखे वाटले. पोरांनाही काहीतरी स्पेशल दाखवले याचे समाधान मिळाले.
(वाघाच्या आंघोळीचा आणि एकूणच विडिओ लेखाच्या सुरुवातीच्या वा शेवटच्या लिंकमध्ये बघू शकता. जाताना तो आम्हाला शेपटी ऊंचावून बाय करूनही गेला )
११-१२) राजा आपल्या रुबाबदार चालीत आंघोळीसाठी जाताना...
.
१३) वाघासोबत आमच्या घरच्या वाघीणीचा फोटो टिपायचा एक प्रयत्न. जो हाणून कसा पाडता येईल याची काळजी उपस्थितांची गर्दी घेत होती.
एकदा वाघ बघून मन तृप्त झाल्यावर मग एक बिबट्या तेवढा पाहूया म्हटले आणि ईतर प्राण्यांची भेट मग पुढच्या वेळीसाठी राखूया म्हटले. तसेही आता येणेजाणे होतच राहील.
१४) हे कोल्हेबुवांचे घर - पण दर्शन देण्याच्या मूडमध्ये नव्हते. आम्हीही मग त्यांना जास्त भाव न देता पुढे निघालो.
१५) हा बिबट्याचा ईलाका - ईथून तरसही दिसतो. पण दोघांनाही बघायला गर्दी वाघाच्या तुलनेत कमीच. बिचारे तरसतच राहतात.
तरी बिबट्याचे दर्शन वाघाच्याच विडिओत घेता येईल.
१६) साडे नऊला सुरू झालेली भेट साडे अकरापर्यंत आवरली. तरी या एका प्राईम लोकेशनला तसा शुकशुकाटच होता
पण तुम्ही जर वेळ काढून एकदाच येणार असाल आणि सर्व प्राण्यांशी एकाच भेटीत ओळख करायची असेल तर खालचा नकाशा जरूर नजरेखालून घाला
१७) बागेचा नकाशा
अवांतर - एक विनोद त्या दिवसापासून आमच्या घरात फार फेमस झालाय. त्याचे झाले काय, माझ्या लेकीने त्याच्या धाकट्या भावाला सांगितले आपण उद्या 'राणीच्या बागेत' जाणार आहोत. तेव्हापासून तो कुठे फिरायला गेला होता असे विचारताच म्हणतो, राणीच्या मागे गेलो होतो
अरे हो, विडिओची लिंक पुन्हा एकदा देतो,
Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI
धन्यवाद,
ऋन्मेष
परी खूपच सुंदर, परीच शोभते.
परी खूपच सुंदर, परीच शोभते. छान लेख फोटो पण मस्त.
सुंदर लेखन.
सुंदर लेखन. मनोरंजक.
सगळेच फोटो छान.
सगळेच फोटो छान.
चांगली लेख मालिका.
(( माझ्या दोन पोरांसह xx माझ्या दोन मुलांसह))
M indicator app जाहिराती विडिओंनी भरले आहे. Mumbai Local Time Table - android app बरे आहे.
खूपच सुंदर सगळे फोटो आणि
खूपच सुंदर सगळे फोटो आणि व्हिडिओ, फार छान लिहिले आहे
लेख आवडला. फोटो मस्त. मी कधी
लेख आवडला. फोटो मस्त. मी कधी राणीबागेत गेलो नाही. पुढच्या वेळी मुंबईला आलो तर जायला हवे असं आता वाटायला लागलं आहे फोटो बघून.
अवांतर - राणीच्या बागेला जुने मुंबैकर राणीचा बाग म्हणत असत का? स्वप्नात पाहिली राणीची बाग - हे गाणं जेवढं ऐकून आहे, तेवढंच पुलं जेव्हा 'राणीचा बाग' म्हणतात तेव्हा कानाला खटकतं. पण सावरकरही बागेचा पुल्लिंगीच उल्लेख करतात (पहा - फुलबाग मला हाय पारखा झाला .. सागरा प्राण तळमळला). त्यामुळे कदाचित पूर्वी पुल्लिंगी असलेला बाग नंतर स्त्रींलिंगी झाली असावी.
खूप छान लेख. ट्रॅव्हल ब्लॉग
खूप छान लेख. ट्रॅव्हल ब्लॉग सारखे लिहिले आहे. गुगल रिव्यू मध्ये टाका ही माहिती..
सर्व फोटो सुंदर. स्पेशली पहिला पावसाळी वातावरणाचा तर मस्तच.
विडिओही छान आहे. दोघेही मुले आता मोठी दिसायला लागली. दिवस किती झपाट्याने जातात..
मस्त लिहिलंय ऋन्मेष. फोटोही
मस्त लिहिलंय ऋन्मेष. फोटोही छान!
गुगल रिव्यू मध्ये टाका
गुगल रिव्यू मध्ये टाका
म्हणजे कुठे? आणि असे रिव्यू बरेच जण टाकत असले तर कुणाचा रिव्यू दाखवतात?
फोटोत पुष्कळ मृत झाडे त्याच
फोटोत पुष्कळ मृत झाडे त्याच ठिकाणी शोभेसाठी वापरलेली दिसली. नूतनीकरण आणि सुशोभितीकरणात काँक्रिट आणि डांबर खडी, पेवर bloks ह्यांच्या अतिवापरामुळे काही सुंदर वृक्ष मेले असावेत आणि आहे त्याच जागी त्यांना आकार देऊन उभे ठेवले असावे असे वाटले. .
राणीची/चां बाग ही एक botanical garden आहे/ होती. इथे अतिशय दुर्मीळ आणि पुराणे वृक्ष होते. जिथे पूर्वी झाडे होती तिथे आता चकाचक रस्ते, मार्गिका, मोकळी जागा दिसत आहे.
लेख आणि फोटो जरी सुंदर असले तरी हळहळ वाटली.
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
srd,
लेखमाला वगैरे नाहीये. कदाचित वाघ पोहताना दिसला नसता तर हा लेख लिहिलाही गेला नसता.
किंबहुना एकूणच छान अनुभव वाटला म्हणून शेअर करून राणीबागेबद्दल लोकांना सांगावेसे वाटले
M indicator app जाहिराती
M indicator app जाहिराती विडिओंनी भरले आहे. Mumbai Local Time Table - android app बरे आहे.
>>>>
अच्छा चेक करतो. तसे फारसे वापरणे होत नाही. रेल्वेसाठीच वापरतो. पण जे वापरलेय त्यात तसा काही जाहीरातींचा वाईट अनुभव आला नाहीये.
गूगल रिव्यू बद्दल मलाही माहीत
गूगल रिव्यू बद्दल मलाही माहीत नाही. ट्रॅव्हल ब्लॉगसारखे लिहीणे म्हणजे कसे हे सुद्धा माहीत नाही
पण यावरून आठवले, की वाशी वा नवी मुंबईच्या दोनचार जागांबद्दल फोटो आणि माहिती असा लेख / धागा काढायचा होता. मनावर घ्यायला हवे
इथे अतिशय दुर्मीळ आणि पुराणे
इथे अतिशय दुर्मीळ आणि पुराणे वृक्ष होते. जिथे पूर्वी झाडे होती तिथे आता चकाचक रस्ते, मार्गिका, मोकळी जागा दिसत आहे.
>>>>
हो, मलाही जरा गोंधळ्यासारखे आणि वेगळे वाटले. मुलांसोबत असल्याने फारसा विचार करायला वेळ नव्हता. तसेच पुर्ण फिरणेही झाले नाही. पण पुढच्यावेळी आधीच्या जागा आठवून तिथे आधी काय होते आणि आता काय झालेय हे जरा चेक करायला हवे.
राणीच्या बागेला जुने मुंबैकर
राणीच्या बागेला जुने मुंबैकर राणीचा बाग म्हणत असत का?
>>>>
कल्पना नाही. मी तरी राणीबाग वा राणीची बाग हेच ऐकले आहे.
लेखात तर नाही ना कुठे चुकून टायपो होत राणीचा बाग झालेय?
नाही नाही, तुम्ही बरोबर
नाही नाही, तुम्ही बरोबर राणीचीच लिहिलं आहे. मला पुलंच्या लिखाणात राणीचा बाग वाचलेलं आठवलं म्हणून विचारलं. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4... इथेही राणीचा बाग लिहिलं आहे.
केळीचे सुकले बाग....
केळीचे सुकले बाग....
हीरा, हो ना. जुन्या लिखाणात
हीरा, हो ना. जुन्या लिखाणात बाग पुल्लिंगी दिसतो आहे. (केळीचे सुकले गाण्यात पुल्लिंगी अनेकवचन आहे की नपुंलिंगी एकवचन, काय की!)
पुल्लिंगी अनेक वचन.
पुल्लिंगी अनेक वचन.
शेजारच्या गुजरातीत, हिंदीत उर्दूत पुंलिंगी. शेजारच्या कोंकणीत नपुंसक लिंगी.
ओके हपा, काहीतरी असेल मग त्या
ओके हपा, काहीतरी असेल मग त्या राणीचा बाग मागे कारण.
हे वरच्या विकी लिंकवरून,
<<<<< इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे, >>>
साधारण सर्वसामान्य लोकांना वनस्पती उद्यानापेक्षा प्राणीसंग्रहालयातच रस असल्याने हे उद्यान त्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता कदाचित हे वरचे दोन तृतीयांशचे प्रमाण बदलले असेल. येत्या काळात आणखी न बदलल्यास उत्तम.
परी खूपच सुंदर, परीच शोभते.
परी खूपच सुंदर, परीच शोभते. छान लेख फोटो पण मस्त.
नवीन Submitted by रागीमुद्दे on 21 June, 2022 - 17:45
हो खरंच सुंदर , परीच्या जन्मापासून तिच्याबद्दल वाचले आहे। बघता बघता एवढी मोठी झाली।
एका बालगीतातही "बाग"
एका बालगीतातही "बाग" पुल्लिंगी आहे... "छान, छान, छान, आमचा बाग किती छान!..."
खूपच सुंदर लिहिले आहे.
खूपच सुंदर लिहिले आहे.
सुशोभितीकरणात काँक्रिट आणि
सुशोभितीकरणात काँक्रिट आणि डांबर खडी, पेवर bloks ह्यांच्या अतिवापरामुळे काही सुंदर वृक्ष मेले असावेत आणि आहे त्याच जागी त्यांना आकार देऊन उभे ठेवले असावे असे वाटले. .......शक्यता नाकारण्यात येत नाही. बिंदुमाधव ठाकरे उद्यानाची पण हीच परवड झाली आहे.2007-२०१० पर्यंत आधीची गच्च भरलेली बाग, पाणी तोडून उजाड केली आहे.पूर्वी बागेत शिरल्यावर बाहेरचे दिसत नसे.आत तर सुरेख झाडे ,वृक्ष उभे होते.आता बऱ्याच ठिकाणी ओंडके दिसतात.
Avantarababat क्षमस्व.
बाग शब्द पर्शियन.
बाग शब्द पर्शियन.
हो.
प्रकाटा
>>Tiger taking bath at pool -
>>Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo<<
मस्त क्लिप. वाघ शिकवल्या सारखा शिस्तीत प्रेक्षकांसमोर कवायत करतान बघुन मजा वाटली; पोहतानाचं दृष्य तर अगदि दुर्मिळ...
छान लिहिलेय.फोटो आणी मुलेही
छान लिहिलेय.फोटो आणी मुलेही छानच आहेत.
पांढरा वाघ आहे का तिथे?
वॅाव, व्हिडिओ आणि फोटोज मस्तच
वॅाव, व्हिडिओ आणि फोटोज मस्तच.. मी एप्रिलमधे गेले होते तेव्हा बिबट्या बघितलेला आठवतंय.. हा वाघ काही दिसला नाही.. बहुतेक तीथे गुजरात थिमचं काही तरी बांधकाम चालू होतं आणि तीथेच ह्याला आणलं असावं.. बाकी ते ॲक्वा बर्ड्स मस्तच आहे.. छान वाहता झरा, झऱयाच्या माथ्यावर बसलेले पक्षी, आजूबाजूची हिरवळ.. एकूण ती जागा छानच आहे.. पुढच्या वेळेस येईन तेव्हा पुन्हा एक चक्कर टाकेनच.
ह्यावेळेस आम्ही राणीची बाग फिरून पुढे म्हातारीचा बूट, हॅंगिंग गार्डन, गिरगाव चौपाटी आणि शेवटी गेट वे ला गेलो होतो.. एकाच दिवसात जीवाची मुंबई केली होती.. मुंबईत किती तरी जागा अशा आहेत जिकडे कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही..पुढच्या वेळेस नेहरू तारांगणलाही जायचंय
धन्यवाद अजनबी, शर्मिला, राज,
धन्यवाद अजनबी, शर्मिला, राज, सोना पाटील
पांढरा वाघ आहे का तिथे? >>> नाहीये
@ म्हाळसा,
मुंबईत किती तरी जागा अशा आहेत जिकडे कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही..
>>>>>
हो खरेय, राणीबागही अश्यातलीच एक आहे..
मरीन ड्राईव्हचा नंबर यात सर्वात वरचा
मस्त क्लिप. वाघ शिकवल्या
मस्त क्लिप. वाघ शिकवल्या सारखा शिस्तीत प्रेक्षकांसमोर कवायत करतान बघुन मजा वाटली; पोहतानाचं दृष्य तर अगदि दुर्मिळ...
>>>>>>>
अगदीच. तो फेर्याही जसे मारत होता काचेसमोर ते ही शिस्तीतच होते.
बहुधा शिकवले जात असावे त्यांना हे. मागे कुठेतरी वाचल्यासारखे आठवतेय असे.. त्याशिवाय फूटफॉल वाढणार नाही.
Pages