संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.
१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.
Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.
२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.
Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !
Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
3. भूगोलातील दिशा
सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी
आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.
४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.
बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.
मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.
या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.
५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.
सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :
a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार
असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.
“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !
प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !
ह्यावर माझ्या आठवणीत असे आहे
ह्यावर माझ्या आठवणीत असे आहे की हिंदुस्थान हे नाव पुढे आले होते, म्हणजे ते आधीही वापरात होतेच, ते फाळणीपूर्व आणि पूर्वी अखंड भारतासाठी वापरात होते. पण मग खूप काथ्याकूट होऊन भारत हे प्राचीन नाव स्वीकारण्यात आले.
इतिहासकार रायचौधरी यांच्या
इतिहासकार रायचौधरी यांच्या म्हणण्याप्रमाणे महाभारत, ब्राह्मण्ये, वैदीक साहीत्य आणि काही बौद्ध साहीत्यात ज्या भारत या आदिवासी जमातींचा उल्लेख येतो त्यांच्यावरून नाव पडले असावे. महाभारत युद्ध हे या जमातींमधे झाले असावे जे कवी आणि लोककथांमधून मोठ्या स्केलला रंगवले गेले.
https://www.vifindia.org/sites/default/files/national-security-vol-4-iss...
धन्यवाद. चांगली चर्चा.
धन्यवाद. चांगली चर्चा.
अभ्यासपूर्ण दुवा आहे.
बऱ्याच व्युत्पतीबाबत एकमत नसते.
वेगवेगळे संदर्भ वाचायला मजा येते.
एक्झॅक्टली.
एक्झॅक्टली.
गिनी म्हणजे काळे लोक हे माहित
गिनी म्हणजे काळे लोक हे माहित नव्हते. गिनी हा पश्चिम आफ्रिकेतला देश आहे. त्यावरून न्यू गिनी नाव दिले असावे.
अमेरिकेत इटालिअन लोकांना ते इतर युरोपिअनांच्यापेक्षा काळे असल्यामुळे (रेशिअल स्लर) गिनी म्हणतात.
गिनी हा पश्चिम आफ्रिकेतला देश
गिनी हा पश्चिम आफ्रिकेतला देश >>
असे ३ गिनी आहेत :
Guinea-Bissau (आफ्रिका)
Equatorial Guinea (आफ्रिका)
व
Papua New Guinea (Oceania)
लेख रोचक आहे. व्युत्पत्ती
लेख रोचक आहे. व्युत्पत्ती जाणून घेण्यात मजा येते, खूप नवनवीन गोष्टी कळतात. मला Leste म्हणजे पूर्व हे माहिती होते परंतु तिमोर म्हणजेही पूर्वच हे नवीन समजले. त्यामुळे देशाचे नाव पूर्व-पूर्व
देशांच्या नावांच्या अनुषंगाने आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ते म्हणजे demonyms - देशिकांची नावे. भारतदेशिकांना भारतीय म्हणतात. पाकिस्तानदेशिकांना पाकिस्तानी म्हणतात. इंग्रजीत इंडियाचे डेमनिम इंडियन (अनेकवचन इंडियन्स). अनेक देशांची इंग्रजीतील डेमनिम आपण अंदाज बांधू शकतो - काँगो देशाच्या लोकांना (दोन्ही काँगो देश) काँगोलिज (Congolese) म्हणतात हे माहीत असेल तर त्यावरून टोगोदेशीयांना टोगोलिज असेल असा अंदाज करू शकतो. पण वर लेखात ज्या Burkina Faso चा उल्लेख आहे त्याला मात्र हा न्याय लागू नाही. त्या देशाच्या लोकांना Burkina Fasolese म्हणत नाहीत. तिथे मात्र Burkinabé. लेखात Guinea बद्दल लिहिले आहे. आफ्रिकेतल्या Guinea शेजारचा देश Guinea-Bissau. तो जेव्हा निर्माण झाला तेव्हा शेजारी आधीच Guinea अस्तित्वात होता. म्हणून नवींन देशाच्या लोकांनी देशाच्या नावात देशाची राजधानी टाकली - Bissau ही Guinea-Bissau ची राजधानी. या देशाच्या लोकांना म्हणायचं Bissau-Guinean. लेसोथो आणि बोटस्वाना यांची गंमत वेगळीच. Demonym चा अंदाज करायचा झाला तर मी म्हणेन lesothoan/lesotholese आणि botswanian. पण यातले काहीच नाही. एका लेसोथोदेशी व्यक्तीला म्हणायचं Mosotho. अनेकजण असतील तर ते Basotho. तसेच एका बोटस्वानादेशी व्यक्तीसाठी Motswana आणि अनेकांसाठी Batswana. म्हणजे एकवचन आणि अनेकवचन वेगळे असतात पण तसा नेहमीचा फॉर्म इथे नाही. इथे suffix लागत नाहीत. सगळे बदल नावाच्या सुरवातीमध्ये! किंवा Vatican City घ्या. त्यांना काही demonym च नाहीये. निदान अधिकृत तरी नाही.
देश आणि demonym च्या या काही जोड्या पाहा -
Cyprus - cypriot
San Marino - Sammarinese,
Monaco - Monégasque किंवा Monacan, Liechtenstein - Liechtensteiner
Madagascar - Malagasy
Seychelles - seychellois(e)
Honduras - honduran
Philippines - Filipino (पु.) आणि Filipina (स्त्री.)
एकच demonym एकापेक्षा जास्त देशांसाठी असेही आहेत -
Democratic Republic of the Congo आणि Republic of the Congo - Congolese
Dominican Republic आणि Dominica - dominican
Guinea-Bissau वर लिहिताना डोक्यात ते देश आले ज्यांची नावे अणि त्यांच्या राजधान्यांची नावे सामायिक आहेत. तो तर अजून वेगळाच विषय पण तितकाच रोचक
demonyms सुंदरच !!
demonyms सुंदरच !!
आवडला प्र.
यावरून मराठीचे काही नियम लिहितो....
परदेशी स्थानिकांची नावे
परदेशी स्थानिकांची नावे जेव्हा आपण मराठीत लिहितो तेव्हा बऱ्याचदा आपण मराठीचे नियम न पाळता ती इंग्लिशच्या धर्तीवर लिहितो.
या संदर्भात मागे भाषा अभ्यासकांची छान चर्चा मी वाचली होती. त्यांनी सांगितल्यानुसार आपण करतो त्या चुका आणि बरोबर शब्द खालील प्रमाणे :
रशियन (चूक) >>> रशियाई (बरोबर)
अमेरिकन (चूक) >>> अमेरिकी (बरोबर)
.....
तसेच....
महाराष्ट्रीयन (चूक) .>>>> महाराष्ट्री /महाराष्ट्रीय (बरोबर)
( जसे की, भारत>> भारतीय त्याचप्रमाणे).
गिनी हा पश्चिम आफ्रिकेतला देश
गिनी हा पश्चिम आफ्रिकेतला देश >>
असे ३ गिनी आहेत :
Guinea-Bissau (आफ्रिका)
Equatorial Guinea (आफ्रिका)
व
Papua New Guinea (Oceania)
३ नाही ४. तुम्ही दिलेल्या ३ देशांशिवाय गिनी नावाचा अजून एक देश आहे गिनी बिसावच्या शेजारी.
https://en.wikipedia.org/wiki/Guinea
>>>>. ते म्हणजे demonyms -
>>>>. ते म्हणजे demonyms - देशिकांची नावे.>>>> खूप छान. आवडेश.
प्रतिसाद पण रोचक आहेत.
३ देशांशिवाय गिनी नावाचा अजून
३ देशांशिवाय गिनी नावाचा अजून एक देश >>>
छान. धन्यवाद !
..
ज्या देशांच्या नावांच्या अखेरीस land हा प्रत्यय येतो असे युनोचे सभासद असलेले एकूण १० देश आहेत.
त्यापैकी the Netherlands , New Zealand, Solomon Islands व Marshall Islands ही नावे दोन स्वतंत्र शब्दांनी युक्त आहेत.
शान्त माणूस
शान्त माणूस
>>टर्की या देशाने त्याचे नाव आजपासून टर्कीये केले आहे>>>
त्याचा उच्चार तुर्किये आहे
https://www.google.com/search?q=how+do+you+pronounce+turkiye&oq=How+do+y...
“Turkey” is vocalised as tuh-kee and “Türkiye” is pronounced tur-key-YAY.
कुमार जी.... उत्तम ले़ ख
कुमार जी.... उत्तम ले़ ख
आता बादरायण संबंध पहा...
Vatican City चे नाव वाटिका (बाग) वरून आले आहे. त्या शहरात सध्याही अनेक उद्याने आहेत ज्यावरून याची सत्यता पटते.
सौदी अरेबियाचे मूळ नाव स्वस्ति अर्वस्थान आहे. अर्व म्हणजे घोडा.
Spectacles हा शब्द स्पष्टकरस (स्पष्ट करून दाखवणारा) यावरून आला आहे.
कौरवपांडवयुद्धापर्यंत जगात सर्वत्र वैदिक क्षत्रियांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात संस्कृत हीच सर्व मानवांची भाषा होती. चार-पाच हजार वर्षांपूर्वी सिरिया, असिरिया, बाबिलोनिया, मेसोपोटेमिया ही प्राचीन राष्ट्रे होती. परंतु सुर व असुरांत वैर होते. वैदिक साम्राज्य मोडल्यानंतर सुरांचे राज्य सुरिय (Syria) व असुरांचे Assyria झाले." बाबिलोनीया म्हणजे बाहुबलनीय व मेसोपोटेमिया म्हणजे महिषीपट्टनीयम = राणिपूर. "वैदिक संस्कृती लोप पावत केवळ सिंधु प्रदेशातच टिकून राहिली म्हणून तिचे नाव हिंदू. वैदिक विश्वसाम्राज्याची भाषा संस्कृत असल्याने प्राचीन काळी देशांची, सागरांची वगैरे नावे संस्कृतच होती." त्या नावांचा नंतर अपभ्रंश झाला. "उदा. सिंधुस्थानचे हिंदुस्थान, त्याप्रमाणे अर्बस्थान, तुर्गस्थान, कझाकस्थान, बलुचिस्थान, अफगाणिस्थान इत्यादि. रशिया हे मूळचे ऋषिय होते. सैबेरिया - शिबिरिय, प्रशिया - प्रऋषिय, पार्थिया - पार्थीय, ग्रीस - गिरीईश, युरोप - ससुरूप, ऑस्ट्रेलिया - अस्त्रालय, अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय, जर्मनी अर्थात Deutschland - दैत्यस्थान, Dutch - दैत्य."
तर या पुराव्यांवरून विश्वात पूर्वी वैदिक संस्कृती होती!
इस्लामचे वैदिक मूळ
इस्लाम हा धर्मही मूळचा वैदिकच आहे! `इस्लामचे वैदिक मूळ'
मक्का नगर इस्लामपूर्व आंतरराष्ट्रीय वैदनक धर्माचे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र होते. मक्का = मखः (म्हणजे यज्ञ) आणि मदिना = मेदिनी (म्हणजे पृथ्वी). यावरून मक्कामदिना ही मखमेदिनी म्हणजे यज्ञभूमी होती. मक्का-मदिनेची उत्पत्ती लागली. पण काबाचे काय? तर "मक्केत शेषशायी विष्णूचे विशाल मंदिर होते. त्याच्या गर्भगृहास संक्षेपाने गाभा म्हणत. त्याचाच अपभ्रंश काबा असा झाला." काबा या स्थानी विविध देवदेवतांच्या 360 मूर्ती होत्या. इ. स. 930 ह्या वर्षी कारमेथियन लोकांनी काबा लुटून त्यातले शिवलिंग पळवून नेले,"
शिवाय अर्वा म्हणजे घोडा. यावरून अर्बस्थान - अर्वस्थान म्हणजे घोड्यांचा देश हे नाम तयार झाले. "यावरून वैदिक क्षत्रियांनी तेथे जातिवंत घोड्यांची उत्पत्ती शास्त्रीय पद्धतीने करविली होती."
इस्लामचा प्रेषित महंमद पैगंबर याचे मूळही वैदिकच होते. ते कसे, तर महंमद हा संस्कृत बहुब्रीही समास आहे. 'महान मदः यस्य इति महंमद'. महंमदाच्या कुलाचे नाव कुरेशी. कुर + ईशी. हे कौरव कुलातील लोक होते. अल्ला, अंबा, अक्का ही देवीची द्योतक समानार्थी नावे आहेत. महंमद पैगंबराची कुलदेवता अल्ला (ऊर्फ अंबा) होती.
ह्सू नका
धन्यवाद !
धन्यवाद !
हसत नाही;
उलट तुमच्या बादरायण व्युत्पत्ती संशोधनाला दाद देतो.
भारी
छान व माहितीपूर्ण लेख,
छान व माहितीपूर्ण लेख, प्रतिसादही खूपच रोचक आहेत.
त्रिनिदाद व टोबॅगो ही करीबिअन मधली देशं येऊन गेली का?!
त्रिनिदाद
हे कोलंबसने लॉर्ड ट्रिनिटी वरून दिले होते म्हणे, वर्तकांच्या 'वास्तव रामायणात' हे नाव त्रिशूळ-ट्रायडंट वरून आलेले असल्याचा उल्लेख आहे.
उत्तर मेक्सिकोतील 'Aztec' समूहाचा Aztec हा शब्द ही 'आस्तिक'( ऋषी) वरून आलेला आहे, हे त्यातच वाचलेलं होतं.
टोबॅगो
हे टोबॅको अर्थात तंबाखू वरून आले आहे असे विकि दाखवतंय.
व्युत्पत्तीचा किडा हा एकच असा किडा आहे की जो आनंद देतो. मलाही आवडते
धन्यवाद !त्रिनिदाद व टोबॅगो
धन्यवाद !
त्रिनिदाद व टोबॅगो ही करीबिअन मधली देशं येऊन गेली का >>>
होय, येऊन गेली तर !
त्याशिवाय...
Kiribati आणि Nauru सुद्धा !
Nauru चा शब्द्शः अर्थ “मी समुद्रकिनारी जातो” असा आहे !
...
हा एकच असा किडा आहे की जो आनंद देतो. >>> अ - ग- दी म्हणजे अगदीच !! +१११११११..
मस्त माहिती आणि प्रतिसादही.
मस्त माहिती आणि प्रतिसादही.
एकदा शब्दांचे अपभ्रंश इतर भाषांत "सापडू" लागले की ओळखायला मजा येते. कोस्टा रिका म्हणजे "रिच कोस्ट" हे इंग्रजीत. तसेच पोर्टो रिको म्हणजे रिच पोर्ट हे ही. व्यक्तींच्या नावात जसे पेद्रो - पीटर, कार्लोस - चार्ल्स, होजे - जोसेफ असे होत जाते तसेच देशांच्या व गावांच्या नावातही होत असावे.
कॅलिफोर्नियातील सॅन होजे (San Jose) व कुपर्टिनो या दोन्ही शहरांचा संबंध स्पॅनिश व इटालियन शब्दांच्या ओरिजिन वरून आला असावा - "Saint Joseph de Cupertino" या मूळ इटालियन नावातून आलेले आहे असे त्या शहरांच्या इतिहासात आहे. पण कॅलिफोर्नियात इटालियन लोकांचा काहीच संबंध नाही. तेथे आले ते स्पॅनिश लोक आत्ताच्या मेक्सिकोवर त्यांची सत्ता असताना. त्यात ते सेण्ट जोसेफ चे स्पॅनिश मधे सॅन होजे झाले असेल असे दिसते त्यामुळे उद्या भारतीयांनी त्याचे "सॅन जोस" हे नाव रूढ केले तर तो ही एक अपभ्रंशच असेल
आपल्या मुंबईतील सांताक्रूझ बद्दल एक मजेदार निरीक्षणः त्याचा "सांताक्रूझ" हा मराठी उच्चार डाउनमार्केट समजला जातो. त्याचा हाय सर्कल्स मधला उच्चार हा इंग्रजाळलेला "सॅण्टा क्रूझ" होतो. पण मूळ स्पॅनिश उच्चार हा मराठीलाच जवळचा आहे.
युरोपियन भाषांत पूर्व दिशेकरता "इस्ट" शब्दांची विविध रूपे रूढ असावीत. वरती "Leste" आहे ते ही "east -> este > le este > leste" असे काहीतरी झाले असावे. आता माझ्या अंदाजात स्पॅनिश/फ्रेंच्/ पोर्तुगीज मिश्रण झाले असेल पण साधारण असेच असावे तसेच ऑस्ट्रिया ची व्युत्पत्तीही "इस्ट" च्या जर्मन रूपातूनच आहे. जर्मन कल्चर मधे "राइख" (Reich) शब्द आपण वाचला आहे. पूर्वेचे राइख - Oosterreich->Austria असे काहीतरी ते दिसते. ऑस्ट्रियाच्या विकीपेजवरही आहे.
यावरून व वरच्या अफाट व्युत्पत्तीवाल्य पोस्ट्सवरून पुलंचे एक वाक्य आठवले. बहुधा अपूर्वाई मधले - "एका मित्राच्या म्हणण्यानुसार प्रशिया हे पुरूषीय व ऑस्ट्रिया हे स्त्रीय या शब्दांपासून आलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या आसपासच्या छोट्या देशांना बाल्कन राष्ट्रे म्हणतात" (त्यातही पश्चिमेच्या देशांच्या दौर्याच्या वर्णनाला अपूर्वाई हे नाव, हा ही खास पुलं टच)
छान !
छान !
*"बाल्कन राष्ट्रे म्हणतात"
>>>> हा म्हणजे अगदी मैदानाबाहेर मारलेला सुंदर षटकार आहे !!
पुलंचे वाक्य
पुलंचे वाक्य
(त्यातही पश्चिमेच्या
(त्यातही पश्चिमेच्या देशांच्या दौर्याच्या वर्णनाला अपूर्वाई हे नाव, हा ही खास पुलं टच >>> हा असा अर्थ असू शकतो... भारी !
>>>>पश्चिमेच्या देशांच्या
>>>>पश्चिमेच्या देशांच्या दौर्याच्या वर्णनाला अपूर्वाई >>>
अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पुलंची पुस्तकांची जोडी खूप गाजली.
>>>>पश्चिमेच्या देशांच्या
.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
एकाच नावाचे गाव किंवा शहर जगात अनेक देशांमध्ये आढळते. मुख्य म्हणजे अगदी भिन्न संस्कृती असलेल्या आणि जगाच्या दोन टोकांना असलेल्या देशांमध्येही तेच नाव आढळते.
अशी काही रंजक माहिती :
१. दिल्ली एकूण १५ आहेत
२. मद्रास ८ ( अमेरिका, द. आफ्रिका इ )
३. लखनऊ ७ ( भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ )
४. वेलिंग्टनचा तर कदाचित विक्रम असेल : एकूण 34 गावे (न्यूझीलँडची राजधानी, तामिळनाडूतले गाव, इ).
५. सिंगापूर (देश व महाराष्ट्रात रायगडजवळचे खेडे).
सिंगापूर (देश व महाराष्ट्रात
सिंगापूर (देश व महाराष्ट्रात रायगडजवळचे खेडे).
>>>>
सिंगापुर
तालुका पुरंदर
जिल्हा पुणे
येथे पण एक आहे
छान, धन्यवाद.
छान, धन्यवाद.
एकाच नावाची गावे/ठिकाणे जगात शोधण्यासाठी हे संस्थळ :
https://geotargit.com/called.php?qcity
उपयुक्त लेख डॉक्टर.
उपयुक्त लेख डॉक्टर.
खरं तर आता काही काळाने अशी फारच कमी क्षेत्रं उरतील ज्यामध्ये तुम्ही वैचारिक अवगाहन केलेलं नाही. वेगवेगळ्या तरीही रोचक विषयांवर लिहिता, म्हणून म्हटलं. व्यवसाय सांभाळून असा अभ्यास करून मांडणं कौतुकास्पद वाटतं.
प्राचीन, धन्यवाद.अवगाहन >>
प्राचीन, धन्यवाद.
अवगाहन >>
हा सुरेख शब्द वापरलात तो भलताच आवडला !
वयाच्या एका टप्प्यावर आपल्या पोटापाण्याच्या अभ्यास विषयात काही नावीन्य राहिलेले नसते.
तेव्हा आत्मिक आनंद मिळण्यासाठी अन्य क्षेत्रांचा आधार घ्यावासा वाटतो
अर्थात तुमच्यासारख्या सुजाण वाचकांचे प्रोत्साहन असल्यामुळेच हे शक्य होते.
नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण
नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख, कुमार सर !
प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. >> अगदीच सहमत.
आमची Peru ट्रिप आठवली. भौगोलिक, सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध अशा या देशाचा इतिहासही रोचक आहे.
मुलांनाही ( english translation ) वाचायला दिला... लेख आवडल्याची पोच देत आहे.
राधिका, धन्यवाद !
राधिका, धन्यवाद !
तुम्ही मुलांना लेखाचा इंग्लिश अनुवाद वाचायला दिलात याचा आनंद वाटतो.
हा विषय कुतूहलजनक आहे खरा.
Pages