कृपया मागच्या भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.
आश्रमाच्या गेटवर एण्ट्री करून सर्वजण आत शिरले. चौकशीच्या खिडकीत येण्याचे प्रयोजन सांगितल्यावर त्याने ओळखपत्रं मागितले. आत कुणाला तरी फोन लावून मग कसे आत जायचे, कुठे जायचे याचे व्यवस्थित मार्गदर्शन केले त्याच्या पाठीमागे आश्रमाचा नकाशा होता. त्यावर त्याने नीट समजावून आंगितले.
आश्रम म्हटल्यावर डोळ्यापुढे येणारे पारंपारीक चित्र असते.
त्याला धक्के देणारा हा आश्रम होता. धार्मिक स्थळाप्रमाणे दिसणाराही नाही आणि भोंदू बाबांच्या अल्ट्रा मॉडर्न आश्रमांप्रमाणेही नाही.
डोळ्यात भरत होती ती हिरवाई. इथे जी काही वनसंपदा होती तिला अजिबात हात लावलेला नव्हता. काही ठिकाणी बागा बनवलेल्या होत्या. तिथे रानटी गवत उखडून फेकून हिरवळीची लागवड केली होती. पाण्याचे झुळुझुळू प्रवाह खेळवताना त्यात वाळू, दगड गोटे यांचा वापर केल्याने स्फटीकासारखे स्वच्छ पाणी दिसत होते.
खेडेगावात असतात तशी मातीची घरं होती. पण थोड्या उंच छताची होती. लाकडी कॉलम आणि बीम्सचा वापर तेव्हढा खटकला होता. पण इथे ही थीम होती. प्रत्येक घरापुढे व्हरांडा, आत बेड, चूल आणि एक छोटं मातीचे टेबल व जिना होता. वरच्या माळ्यासारख्या मजल्यावर स्टडी बनवलेलं होतं. प्रत्येक घराला दगडी कुंपण होतं. एकंदर दिसायला टुमदार घरं होती.
आश्रमात राहणार्यांना साधक म्हणत असावेत. इथले प्रमुख कुणी स्वामीजी असतील असा तिचा अंदाज होता.
पण जेव्हां ती सांगितलेल्या खोलीजवळ पोहोचली तेव्हां बाहेरच्या पाटीवर स्वामीजी, बाबा, महाराज असा कुठलाच उल्लेख दिसला नाही. डोअर बेल होती. ती वाजवल्यावर एक गोरीपान , प्रसन्न व्यक्तीमत्वाची हसतमुख व्यक्ती आली.
" ये झिलमिल. मी डॉक्टर दीपंकर डे "
हा आणखी एक धक्का. आचार्य, स्वामी काही नाही. फक्त डॉक्टर दीपंकर डे.
पुन्हा ते म्हणाले
" कसा झाला प्रवास ? दमला असाल ना सगळे ? "
यांना काय संबोधन वापरावे याचा विचार करत ती म्हणाली
" छान झाला प्रवास गुरूजी. आभार आपले "
" अरे गुरूजी काय ? डॉक्टर म्हणा, दीपंकर म्हणा अगदी घरातल्या वडीलधार्यांना बोलता तसे काका, मामा, चाचा काहीही म्हणा" ते हसत म्हणाले.
ती ओशाळली.
" नाही मला वाटलं आश्रम आहे म्हणजे एकमेकांना गुरूजी, स्वामीजी असे काही म्हणत असतील "
त्यावर डॉक्टर जोरात हसले. " समजेलच. तू काही लगेच जात नाहीस आता इथून , नाही का ? थांबा मी चहापाणी मागवतो. मग बोलूयात आपण"
आश्रम म्हटल्यावर जे दडपण असतं ते सर्वांच्या मनावरून दूर झालं. हॉटेल मधे राहू म्हणणारे पण खूश दिसत होते.
"चहा येईपर्यंत आपण तिथे बसू "
डॉ. नी बोटाने जागा दाखवली तिथे छान पैकी लाकडी खुलं झोपडं होतं. आत बाकडीही होती आणि एक बसकं मेज होतं. हवा छान येत होती.
आश्रमात मोकळे सोडलेले मोर आणि लांडोर यामुळे परीसराचे सौंदर्य खुलले होते. पलिकडे गायींचा गोठा दिसत होता. कोंबड्या फिरत होत्या. निरनिराळे पक्षी झाडावर आणि गवतात दिसत होते.
तिचे लक्ष पशुपक्षांवर आहे हे बघून डॉक्टर म्हणाले , " आपण फिरायला जाऊ तेव्हां प्राण्यांचा दवाखानाही दाखवतो. भटकी कुत्री, मांजरं, जखमी आणि सोडून दिलेले प्राणी यांच्यावर उपचार केले जातात. त्यांना दोन वेळेचं खाणं दिलं जातं. इथेच राहतात सगळे. इथे मोर असल्याने मधे जाळी आहे म्हणून दिसणार नाही".
" डॉक्टर आश्रमात काय काम होतं ?"
" काय होत नाही हे विचार "
" माफ करा पण मला कल्पना नाही "
" इथे विज्ञान शिकवलं जातं. प्रयोग होतात. ज्यांना स्वेच्छेने काही करायचे आहे ते येतात. ज्यांना अध्यात्मात गती आहे ते इथे येतात. त्यांच्याकडचे ज्ञान देतात, इथे मिळणारे ज्ञान घेतात. असे सर्व शाखांचे लोक इथे येतात. वैद्यकशास्त्राचे लोक सुद्धा येतात. मग त्यातून आजूबाजूच्या लोकांना माफक दरात सेवा पुअरवली जाते. ना नफा ना तोटा तत्वावर. अशा काही सेवांमुळे आश्रम चालवायला मदत होते. देणग्याही मिळतातच. कोणताही विषय इथे वर्ज्य नाही. गुरूकुल पद्धतीने इथे या. इंटरेस्ट ग्रुप तयार करा. आश्रमाच्या व्यवस्थापनाची मदत घ्या. ज्ञान घेत रहा, वाटत रहा. अगदी सोपं आहे आश्रमाचे कामकाज "
" ओह ! हे असे कुठेच पाहण्यात नाही "
चहा पाणी झाल्यावर आश्रमाचा फेरफटका मारताना सूर्य मावळतीला चालला होता. त्याच्या किरणांमुळे आश्रमाच्या परिसरात गूढशी वातावरणनिर्मिती होत होती. आश्रमाच्या टोकाला डोगराची एक भिंत होती. तासून सरळ केल्याप्रमाणे कडाच होता तो.
त्यावर पाटी होती.
प्राचीन गूढ विद्याविषयक अभ्यासिका
झिलमिल त्या पाटीकडे बघत असताना डॉक्टर म्हणाले
" आज जेवून निवांत झोपा. उद्या इथे अवश्य ये. तुला जे हवंय ते कदाचित इथे मिळेल. तुमची सोय समोरच्या धर्मशाळेत केली आहे. तुला वेगळी खोली आहे. बाकीच्यांना सामाईक शेजगृहात गाद्यांवर झोपावे लागेल "
" सामाईक शेजगृह ?"
" डॉर्मीटरी गं ! खरं तर सभागृह आहे ते. जास्त पाहुणे आले की मग गाद्या घालतात इथे"
डॉक्टर हसत म्हणाले.
" डॉक्टर , मी त्यांच्याबरोबरच राहीन. नको मला वेगळी खोली "
" असू दे. लागेल नंतर. "
तिच्याही लगेच लक्षात आले. स्वतंत्र खोली नाकारून चूक नको करायला.
मग तिने सहमतीदर्शक मान हलवली.
जेवणं आटोपून बॅगा टाकून देऊन पाय पसरून ताणून देताना स्वर्गीय सुख यापेक्षा वेगळं काय असतं असंच सर्वांना वाटलं. गादीला पाठ लागल्याबरोबर सगळे झोपी गेले.
**************************
सकाळी पक्षांच्या आवाजाने जाग आली तेव्हां थंडी वाजत होती. गरमागरम चहा मिळाला तर असा विचारच मनात येत होता. इतक्यात दारावर थाप पडली. किटली आणि चहाचे ग्लास घेऊन एक बारा वर्षांचा मुलगा उभा होता.
घरच्यासारखा नसला तरी थंडीत कसलाही चहा म्हणजे अमृतच. पहिल्याच घोटात तरतरी आली.
थंडीमुळे अंघोळीची गोळी घ्यावी असे वाटत होते पण प्रवासाने आंबलेल्या अंगाला अंघोळीसारखी औषधी गोळी दुसरी नाही. तिने त्या मुलाला अंघोळीसाठी गरम पाणी मिळेल का असे विचारले.
त्यावर त्याने प्रत्येकजण त्या सोलर हीटर वर तापलेल्या पाण्याच्या बादल्या घेऊन येतात. पण जर का मला सांगितले तर एका बादलीचे दहा रूपये पडतील असे स्पष्टच सांगितले. चुणचुणीत होता कि.
चहाचे प्रत्येकी दहा रूपये द्यायचे होते. पण त्याची गरज पाहून सर्वांनी मिळून त्याला टीप दिली.
" बादली नकोस आणू. इतर काही काम असेल तर त्याचे पैसे तुला नक्की देऊ"
इथे सर्वांपेक्षा वेगळे वागायला नको आणि या गोष्टींची सवय व्हायला हवी हे तिला जाणवले होते.
दोन बादल्या ऊन ऊन पाण्याने मस्तं अंग शेकून निघाले . प्रवासाचा सगळा शीण नाहीसा झाला.
आता कामाकडे वळण्यासाठी पुरेसा उत्साह अंगात संचारला होता.
डॉक्टरांना ती भेटायला गेली तेव्हां तिच्यासाठी चिट्ठी कडीत अडकवलेली होती. ते आज बिझी असणार होते. तिला तिच्या कामासाठी जे हवे ते करण्याची मुभा असल्याचे त्यात सुचवले होते.
ती मग कार्यालयात गेली.
नुकतेच ते उघडले होते.
"दक्ष प्रजापती ? चांगलेच ल़क्षात आहेत कि"
" तुम्हाला माहिती आहेत ते कुठे आहेत ?"
" नाही. तसे नाही. एकच दिवस होते इथे. "
" मग नाव कसे लक्षात राहीले ?"
" कारण त्यांना शोधत इथे बरेच जण नंतर येत राहीले होते. आणि मलाही इथे नोकरीला लागून दोनच दिवस झालेले होते"
असं म्हणत काहीतरी आठवल्यासारखे त्या इसमाने कपाट उघडले. एक जाडजूड लिफाफा काढून तिच्या हाती दिला.
" तुझ्या बाबांनी हे तुझ्यासाठी ठेवलेय. माझा शोध घेत माझी मुलगी किंवा भाऊ आला तर त्यांना द्या असे म्हणाले तुझे बाबा "
तिने तो लिफाफा घेतला आणि त्या कारकूनाचे आभार मानले.
बाबांच्या आठवणीने डोळ्याच्या कडा ओलावल्या.
"बाबा" स्वतःशीच हा शब्द उच्चारताना गळ्यात आवंढा आला.
मोठीच विचित्र अवस्था झाली होती तिची.
कालच्या त्या खुल्या झोपड्यात जाऊन तिने अधीर होत लिफाफा उघडला.
तिच्यासाठी दोन चिठ्ठ्या होत्या.
एक चक्क मराठीत होती.
" बाळू ( बाबाचे प्रेमाचे संबोधन होते),
तुम्हाला सोडून यावे लागले. सर्वांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत असेल या कल्पनेने अस्वस्थ व्हायला होतं. शीतल कशी आहे ? तू ही स्वतःची काळजी घे. ज्या वेळी तुम्हा सर्वांना माझी खूप गरज होती तेव्हां मी सोबत नाही याबद्दल मी स्वतःला माफ करू शकत नाही. पण बेटा, नाईलाज होता माझा.
पोलिसांना पाहून जे नाही ते विचार मनात आले असतील. पण बाळ, तुला आता माझा शोध घेताना अनेक गोष्टी समजत जाणार आहेत. एव्हाना तुझ्याही पाठलागावर ते लोक असणार आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. याच कारणासाठी तुला सगळे सांगणे शक्य होणार नाही. एक गोष्ट आहे. तू जेव्हां केव्हां योग्य ठिकाणी पोहोचशील तेव्हां शोधक नजरेने आजूबाजूला बघत रहा. तुला सूचना मिळतील.
अर्थात जर तुला माझे संकेत समजले तर तू इथपर्यंत आली असशील आणि हे वाचत असशील तरच. इथे तू राहू शकतेस. माझे इथल्या व्यवस्थापनाशी चांगले संबंध आहेत. तुला काही शंका असतील त्या विचारू शकतेस. पण काही केल्या उद्देश समजू देऊ नकोस.
तू खूप हुषार आहेस. त्यामुळे ही चिठ्ठी तुझ्या हातात पडलेली असणार. बेटा पुढच्या सूचना तुला कोणत्याही एका पॅटर्न मधे देता येणार नाहीत. त्यामुळे तुला प्रत्येक ठिकाणी हुषारीने आणि चलाखीने काम घ्यावे लागणार आहे. मला खात्री आहे तू त्यात यशस्वी होशील. जर संकेत समजले नाहीत तर मात्र बरीचशी रहस्ये काळाच्या पोटात गडप होतील.
नील कसा आहे ? मोठा झाला असेल ना ? भांडत नका जाऊ जास्त.
ज्यावेळी तुला धोका वाढल्याचे जाणवेल त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत पुढे न जाता माघारी जा. माझी शपथ आहे तुला "
बाबाच्या अक्षराकडे बघत तिला पुढची अक्षरे दिसेनाशी झाली. जणू काही बाबा शेजारी बसून तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतोय असा भास झाला. ती निव्वळ पांढर्यावर काळी केलेली अक्षरे नव्हती. त्यात काय नव्हते ?
त्या कागदात तिचा बाबा होता. तिने तो कागद छातीशी धरला.
मग दुसरा लिफाफा उघडला.
यात चित्रलिपीही होती आणि खरोष्टीशी साम्य दाखवणारी एक लिपी होती.
ब्राह्मी / धम्म लिपी बहुतेक.
ही उजवीकडून डावीकडे कि डावीकडून उजवीकडे लिहीलेय हे तिला समजेना.
चित्रलिपीत एक नकाशा दडलेला होता.
एक बिंदू काळ्या शाईने ठळक केला होता.
तिथून काही अंतरावर दोन त्रिकोणांची जुळी खूण होती. यातला एक त्रिकोण छोटा होता.
त्यापुढे जवळच एक त्रिकोण आणि त्याखाली दोन फ्री स्टाईल आकार होते. त्यातला एक निळ्या रंगात होता. तर दुसरा हिरव्या रंगात.
हा त्रिकोण आधीच्या त्रिकोणांच्या वर (कागदाच्या वरच्या बाजूला होता).
जिथे दोन त्रिकोण होते त्यापासून डाव्या हाताला काही अंतरावर एक निळ्या रंगातला यू आकार होता. त्यात पुन्हा एक त्रिकोण होता.
उजव्या बाजूला एका कोपर्यात सूर्याचे चित्र होते.
आधीचे दोन त्रिकोण आणि त्या वर असलेल्या त्रिकोणाच्या मधे एक प्रश्नचिन्ह होते.
तर जो बिंदू काळ्या रंगात दर्शवलेला होता तिथून तुटक रेषा दर्शवलेल्या होत्या.
एक सरळ जात होती. दुसरी उजव्या हाताला कोन करून जात होती आणि तिथून काही अंतरावर आडव्या रेषेत येऊन या पहिल्या तुटक रेषेला मिळत होती.
जिथे काळ्या रंगात रंगवलेला बिंदू होता तिथे एक चित्र होते.
ते तिच्या ओळखीचे होते.
सिद्धाश्रम !
म्हणजे या बिंदूपासून तिला हा नकाशा वाचायचा होता.
बाबाने कसं सोपं करून दिलं ना ?
आणि तरीही कुणाच्या हातात पडल्यास सुरक्षित रहावं ही दक्षताही घेतलेली होती.
आता आव्हान होतं ते या प्राचीन लिपीत लिहीलेल्या मजकुराचे.
असे प्रसंग येतील हे गृहीत धरून ती ही होमवर्क करुन आली होती.
आता सगळे उठून तिला शोधायला लागायच्या आत हे लपवून ठेवणे गरजेचे होते. यातला एखादा कार्टून जरी नको तिथे पचकला तर उगीच अडचणींत वाढ व्हायची.
भराभर ते लिफाफे लपवून तिने सर्वांना गावात चक्कर मारण्यासाठी तयार व्हा म्हणून सांगितले.
हा एक चांगला विचार होता.
पायी चालत चालत गेटच्या बाहेर ते सगळे आले तेव्हां तिला काही तरी जाणवले.
गेल्या काही दिवसात त्यांनी हजार पेक्षा जास्त किमी अंतर कापले होते.
आणि या संपूर्ण प्रवासात त्यांना सातत्याने पिवळी स्विफ्ट कार दिसली होती.
तीच पुढे रस्त्यालगतच्या मोटेल बाहेर उभी होती.
तिच्या काळजात अनामिक धडधड सुरू झाली.
त्यांचा पाठलाग सुरू झाला होता.
कृपया पुढील भागाकडे जाण्यासाठी इथे टिचकी मारा.
ओहहह . . . फार फार जबरदस्त!!!
ओहहह . . . फार फार जबरदस्त!!!!! सलग चारही भाग वाचले आत्ता. खूपच उत्कंठावर्धक. आणि अनेक प्रकारे वेगळी मांडणीसुद्धा. खूप मस्त आहे. आणि क्रिएटिव्हिटी व कल्पकताही खूप विशेष.
तुम्ही पुढचा भाग आरामात लिहा, काही घाई नाही. जेव्हा लिहाल तेव्हा तो खूप छान वाटेल ह्याची खात्री आहे.
वाह वाह! हा भाग उत्कंठावर्धक
वाह वाह! हा भाग उत्कंठावर्धक एकदम.
उत्कंठावर्धक होत चालली आहे
उत्कंठावर्धक होत चालली आहे कथा.
पुढील भागासाठी शुभेच्छा.
एकदम मस्त
एकदम मस्त
वाचतोय ! छान चाललीये गोष्ट.
वाचतोय ! छान चाललीये गोष्ट.
मस्त झालायं हा भाग..!!
मस्त झालायं हा भाग..!!
सुन्दर झाले आहेत चार ही भाग !
सुन्दर झाले आहेत चार ही भाग !!
पु.भा.प्र.
छान सुरू आहे कथा!
छान सुरू आहे कथा!
अवांतर अपेक्षा- नकाशा (चित्र) काढल असत तर अजून स्पष्ट कळाल असतं
आबा +10000
आबा +10000
रोचक सुरू आहे कथा
रोचक सुरू आहे कथा
उत्कंठा दर भागागणिक वाढतेय,
उत्कंठा दर भागागणिक वाढतेय, सुंदर लिहिताय.
छान चालू आहे कथा
छान चालू आहे कथा
आज चारी भाग वाचलेत....
आज चारी भाग वाचलेत.... उत्कंठावर्धक !
चारही भाग सलग वाचले. खूपच
चारही भाग सलग वाचले. खूपच मस्त आहे कथा. एकदम उत्कंठावर्धक.
अवांतर अपेक्षा- नकाशा (चित्र) काढल असत तर अजून स्पष्ट कळाल असतं >>> +१२३
छान सुरू आहे कथा!
छान सुरू आहे कथा!
छान चाललीये गोष्ट..कथेने आता
छान चाललीये गोष्ट..कथेने आता स्पीड पकडल्यासारखे वाटत आहे.
पुढच्या भागांची उत्सुकता
पुढच्या भागांची उत्सुकता वाढतेय
छान सुरू आहे कथा.
छान सुरू आहे कथा.