डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे रावसाहेबांना कळेना. त्यांनी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला पण ग्लानी आल्यासारखी झाली आणि पुन्हा डोळे मिटले गेले. मग मिटल्या डोळ्यांनी त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण काही अंदाज लागेना. आपण स्वप्नात आहोत का? असा प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेला. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी कूस बदलली. तेव्हड्यात त्यांना शेजारी हालचाल जाणवली. कोण आहे? असं क्षीण आवाजात त्यांनी विचारलं. ‘मी गोविंदराव आहे रावसाहेब’ असं म्हणत त्यांचा मुलगा गोविंदराव पुढे सरसावला. काय झालंय रे गोविंदा? आणि मी कुठंय ? 'असे मै कहा हू?' टाईपचे दोनचार प्रश्न त्यांनी गोविंदरावांवर फेकले. ‘सगळं सांगतो रावसाहेब, पण प्लिज तुम्ही जास्त हालचाल करू नका’ असं म्हणत गोविंदराव पुढे सरसावला.
'रावसाहेब' हे राजकारणातलं मोठं नाव. त्यांचं सगळं आयुष्य राजकारणाचा डाव खेळण्यात गेलं. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकारणातल्या कारकिर्दीला सुरवात झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरवात होऊन खासदारकीपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात नियतीचे फासे त्यांच्या बाजूने पडत गेले. मग ही खादीतली कारकीर्द त्यांनी स्वतः पर्यंत मर्यादित न ठेवता, मुलाला आणि सुनेला देखील या क्षेत्रात आणलं. मुलगा आमदार झाला. सूनबाईंनी देखील जिल्ह्याच्या राजकारणापासून या खादीशाळेत आपली वर्णी लावली होती.
आपल्या मतदार संघात रावसाहेबांनी विकास केला का? असा प्रश्न आपल्याला पडेल. तर याचं उत्तर आहे ‘हो, विकास केला' पण हा मुत्सद्दी विकास होता. आपल्या राजकीय बोटीला वर्षानुवर्षे तारून नेण्यासाठी रावसाहेबांनी विकासाचं हे मॉडेल वापरलं. आपल्या मतदारसंघात त्यांनी साखर कारखाने काढले. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून भागभांडवल उभं केलं. आपण कारखान्यात आणि आपल्या तालुक्याच्या विकासात भागीदार झालो या अभिमानात ऊसउत्पादक शेतकरी उसासारख्या ताठ झाला. मग कारखान्यात कामगारापासून ते प्यून, सुपरवाईजर, इंजिनिअर, क्लार्क, ऑफिसर अश्या वेगवेगळ्या पदांसाठी लिलाव झाला. आपल्याच भावकीतील, नातेवाइकातील लोकांची वर्णी या पदांवर लागली.
याच धर्तीवर शिक्षणसंस्था, को-ऑपरेटिव्ह बँका, पतपेढ्या, वायनरी, डिस्टिलरी अश्या एक ना अनेक संस्था उभ्या राहिल्या. जिल्ह्यात जागोजागी या संस्थांच्या मोठाल्या इमारती शेतकऱ्याच्या मातीच्या घराला वाकुल्या दाखवत गगन चुंबायला निघाल्या. विकासाची ही सिमेंटची लक्षण जागोजागी दिसू लागली. चकाचक डांबरी रस्ते, वस्त्यांना खो देत, या संस्थांच्या पायरीपर्यंत लोळण घेत पोहोचले. रावसाहेबांना शिक्षण महर्षी, साखरसम्राट वगैरे बिरुदं लावलेले फ्लेक्स, या गुळगुळीत रस्त्याची शान वाढवू लागले.
या संस्थां मार्फत एक वेगळंच मॉडेल रावसाहेबांनी राबवलं. लोकांच्या पैश्यातून आणि शासनाच्या निधीतून उभ्या राहिलेल्या या संस्थांमध्ये काम करायला लोकांची गरज होती. हजारो पदं दरवर्षी भरली जायची. रावसाहेब आपल्या लांबच्या नात्यातच आहेत असं म्हणत दुरून नातं काढून लोक यायची. आपल्या माणसांसाठी हे काम कराच, अशी गळ प्रेमळ घातली जायची. मग रावसाहेब त्यांना 'अरे आपल्या लोकांसाठी नाही तर कोणासाठी करणार?' असं म्हणत लाल शाईने लिहलेली चिठ्ठी द्यायचे. ही चिठ्ठी घेऊन त्यांच्या मध्यवर्ती ऑफिसात गेलं की, त्यांचा पढवलेला माणूस 'तुमचं काम होईल, पण, एवढ्या-एवढ्या लाखाची देणगी संस्थेसाठी द्यावी लागेल' ही अट सांगायचा. ‘साहेब, खरं सांगायचं तर या यादीत भरपूर लोकं आहेत, पण तुम्ही रावसाहेबांच्या जवळचे असल्यामुळे तुम्हाला आम्ही प्राधान्य देतोय अशी प्रेमळ साखरपेरणीदेखील करायचा.
राजकारण असो वा समाजकारण, आपल्या रस्त्यात सगळ्यात पहिल्यांदा आडवे लावणारे भाऊबंद असतात हे चाणाक्ष रावसाहेब जाणून होते. म्हणून त्यांनी आपले पुतणे, जवळचे नातेवाई यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, साखर कारखाने, सूतगिरणी, शिक्षणसंस्था, पतपेढी, को-ऑपरेटिव्ह बँक अश्या वेगवेगळया जागी बसवले होते. जिल्ह्यात खालपासून ते वरपर्यंत ‘चप्पे चप्पे मे हमारे आदमी मौजूद है’ या हिंदी चित्रपटातील खलनायकाच्या डायलॉग प्रमाणे रावसाहेबांची माणसं चपखलरित्या बसवली होती.
पैशाचा ओघ या संस्थांच्या नद्यांतून रावसाहेबांच्या पॉलिटिकल सागरात सतत वाहत होता. पदं भरतांना येणारा पैसा, विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या डोनेशनमधून येणारा पैसा, कर्मचाऱ्यांना बँकेत पूर्ण पगार देऊन, त्यातील अर्धा कॅशने परत करायला लावत, बुमरँग सारखा परत येणारा पैसा. शासनाच्या अनुदानातून, प्रोजेक्ट मार्फत मिळणारा पैसा, या संस्थांमध्ये खरेदी होणाऱ्या मालावर, बांधकामावर मिळवलेल्या कमिशनचा पैसा, कारखान्याच्या टेंडर मार्फत येणारा पैसा, असा चोहोबाजूने येणारा प्रचंड पैशाचा ओघ निवडणुकीसाठी भांडवल उभं करायचा. बरं या निवडणुकीसाठी प्रामाणिक मनुष्यबळ उपलब्ध होतंच. निवडणूका आल्या की समस्त कर्मचारीवर्ग कामाला लागायचा. जिल्ह्यातील घराघरातील लोकं रावसाहेबांच्या कोणत्या ना कोणत्या संस्थेत कामाला होती, किंवा त्यांच्या पाहुण्यारावळ्यात कुणीतरी रावसाहेबांच्या (डोनेशन देऊन का असेना) उपकाराच्या ओझ्याखाली दबली होती. त्यामुळे आपल्या माणसालाच निवडणुकीत जिंकावण्याची प्रेमळ गळ घातली जायची. ऑफिसची कामं सोडून, काही महिने हे उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले अकुशल, कुशल आणि अतिकुशल मनुष्यबळ निवडणुकीच्या कामाला लागायचं. मतदाराच्या घराघरापर्यंत एवढी भक्कम पकड असल्यामुळे रावसाहेब किंवा त्यांचा उमेदवार कधी पडला नाही. विकासाच्या गंगेची ही ओल मात्र तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत पोहचलीच नाही.
या विकासाच्या मॉडेल मध्ये (रावसाहेबांचा) आर्थिक विकास झाला खरा, पण गुणवत्तेच्या निकषावर कर्मचारी न भरता, आर्थिक योग्यतेचा निकस लावला गेला आणि संस्थांची गुणवत्ता ढासळली. बरं प्रत्येकजण वशिल्याने आलेला असल्यामुळे, वरीष्ठांना संस्थेची शिस्त राबवतांना कठीण व्हायचं. आपल्या संस्थांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या ढासळल्याच्या तक्रारी रावसाहेबांकडे येत होत्या. एकदोनदा स्वतः प्राचार्य रावसाहेबांना भेटले. आपल्या संस्थांमधील विद्यार्थी, गुणवत्तेच्या पातळीवर इतर संस्थांच्या मानाने कमी पडतात हे त्यांनी सांगितलं. चांगल्या दर्जाचे, आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाचा अनुभव असलेले शिक्षक आणि प्रशासक घ्यावेत म्हणून रावसाहेबांना गळ घातली. त्याचबरोबर आपल्या डोनेशनच्या गणितात हे उमेदवार बसणार नाहीत याची कल्पनादेखील दिली. रावसाहेबांनी 'निवडणुकीनंतर पाहू' हे त्यांचं फेव्हरेट उत्तर देऊन प्राचार्यांची आणि शिक्षणाच्या गुणवत्तेची एकत्र बोळवण केली.
एवढ्या मोठ्या राजकीय वजनाच्या रावसाहेबांचा त्यांच्या शारीरिक वजनाने घात केला होता. शरीरातील चरबी हृदयघाताला कारणीभूत झाली होती. त्यांना हार्ट अटॅक आला होता. जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना तातडीने दाखल करण्यात आलं. ताबडतोब सर्जरी करावी लागेल असं म्हणत डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी सुरु केली. रावसाहेबांना आता जाग आली होती. मुलाने काय झालंय ते रावसाहेबांना सांगितलं. तेवढ्यात डॉक्टर आले. 'रावसाहेब, आजार जरा गंभीर आहे, लगेच ऑपरेशन करावे लागेल, पण आपण काळजी करू नका. आम्ही सगळं व्यवस्थित करू' असं म्हणाले. 'रावसाहेब, आपल्या कृपेनेच मी डॉक्टर झालो आहे. माझे वडील आपल्याकडे माझ्या ऍडमिशन साठी आले होते. तेव्हा आपण संधी दिली आणि मी डॉक्टर होऊ शकलो' उपकाराच्या भाराने वाकलेले डॉक्टर भारावून बोलत होते. रावसाहेबांना काही वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला. शेजारच्या गावातील साखर कारखान्याच्या सदस्याला, त्याच्या दहावीत गटांगळ्या खाणाऱ्या, नशेडी कार्ट्याला लाइनीवर आणण्यासाठी आणि लग्नासाठी योग्य वर बनवण्यासाठी मेडिकलला टाकायचं होतं. त्याचे काळे कारनामे पांढऱ्या कोटाखाली झाकायचे होते. रावसाहेबांनी त्यांच्यावर उपकार करत कोटीतला आकडा सांगितला होता, आणि त्या बापाने खुशीने तो देऊन रावसाहेबांना कोटी-कोटी धन्यवाद दिले होते. आता हा 'आत काळा आणि बाहेर पांढरा' डॉक्टर दादासाहेबांच्या हृदयाची चिरफाड करायला सज्ज होत होता. रामासमोर भक्तिभावाने छाती फाडणाऱ्या बजरंगबलीच्या आवेशात, उपकाराची परतफेड करायच्या भावनेने भारावलेला डॉक्टर रावसाहेबांची छाती फाडायला उत्सुक होता. रावसाहेबांना घाम फुटला. या डॉक्टरवर त्यांचा विश्वास बसेना. डॉक्टरांची बोळवण करत त्यांनी मुलाला एकांतात घेतलं आणि आपली चिंता बोलून दाखवली. आपल्या कॉलेजातुन शिकलेला डॉक्टर नकोच असं निक्षून सांगितलं. त्यापेक्षा मुंबईच्या दवाखान्यात जाऊया असं सुचवलं.
रावसाहेबांना मुंबईला नेण्यास डॉक्टरांचा विरोध होता. केस गंभीर होती. लगेच ऑपेरेशन करणे गरजेचे होते. पण त्यांनी आग्रह धरल्याने खासगी विमानाने मुंबईला नेण्याचा निर्णय झाला. तातडीने जवळच्या लहानग्या विमानतळावर त्यांना नेण्यात आलं. चार सिटांचं छोटेखानी विमान. पुढे पायलट आणि रावसाहेबांचा मुलगा बसला. मागच्या दोन सिटांवर, उशांचा आधार देऊन रावसाहेबांना काळजीपूर्वक बसवण्यात आलं. विमानाने हवेत भरारी घेतली. रावसाहेबांचा ताण कमी करण्यासाठी पायलट म्हणाला. 'चिंता करू नका रावसाहेब, आपली सेवा करायला मिळाली म्हणून मी आनंदी आहे. मी आपल्या नात्यातलाच आहे. खरं सांगायचं तर तुमच्यामुळेच मी आज पायलट बनलोय. आठवतं तुम्हाला? माझे वडील आपल्या पायलट ट्रेनिंग कॉलेज मध्ये माझ्या ऍडमिशनसाठी आपल्याकडे आले होते?.........' पायलटच्या या वाक्याने हजारो मीटर उंचीवर, विमानाच्या थंडगार एसी मध्ये रावसाहेबांना घाम फुटला.
मस्त,,,
मस्त,,,
मस्त शीर्षक आणि प्रसंग.
मस्त शीर्षक आणि प्रसंग.
छान कथा. पेरलं तेच उगवतं.
छान कथा. पेरलं तेच उगवतं.
या कथेचा गाभा बराचसा "आपल्यापुरतं सावरता येत?" या कथेसारखाच आहे
भारी
भारी
हा हा मस्त !
हा हा मस्त !
छान
छान
मस्त आहे कथा
मस्त आहे कथा
छान कथा.
छान कथा.