चिमणी घड्याळ - Cuckoo clock

Submitted by अजित केतकर on 28 April, 2022 - 10:07

बहिणीच्या नव्या जागेत गेलो तेव्हा भिंतीवर एक छान 'कक्कु क्लॉक' दिसले पण ते बंद होते. अधिक विचारणा केल्यावर ते बिघडल्याचे बहीण म्हणाली. ते चालत नाही आणि त्यामुळे त्यातली चिमणी ओरडत नाही तरीपण छान दिसतेय म्हणून ठेवलंय शो-पीस सारखे.

घड्याळ होतेच ते छान, नजर खेचून घेणारे. तिने जर्मनीतून 'ब्लॅक फॉरेस्ट' भागातून खास आणले होते. हे ठिकाण अशा घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. पण इथे दुरूस्त करायला द्यायला ती घाबरत होती. एकदा एका दुकानात दिले पण त्याने आणखीनच बिघडवून परत दिले. त्यामुळे ते आता शो-पीस म्हणून ठेवायचे असे बहिणीने ठरवून टाकले होते.

मी नेहमीची टोल्यांची / किल्लीची बरीच घड्याळे दुरुस्त केलेली होती पण हा प्रकार नवीन होता. मी प्रयत्न करून पाहू का विचारल्यावर बहिणीने लगेच पॅक करून ते माझ्याकडे सोपवले.

नवीन प्रकारचे घड्याळ असल्याने मला खूपच उत्सुकता होती. केव्हा एकदा उघडून पाहतोय असे झाले. लगेचच शनिवारी बैठक जमवली आणि कारागिरी चालू केली.

आत अतिशय सुबक पण नेमकी अशी रचना होती. चिमण्या डोलावण्यासाठी अगदी सोपी पण नाजूक अशी यंत्रणा होती. काही भाग सुटे केल्यावर त्याच्या साखळीला लटकवलेल्या वजनाने किल्ली कशी मिळते ते समजत गेले. दोन अडीच तास पाहणी केल्यावर एकूण प्रकार लक्षात आला. काय बिघडलंय तेही कळले. घड्याळाचे भाग अतिशय नाजूक असल्याने सावकाश सुटे केले. खुणेने मांडणी करून ठेवले. बिघडलेल्या भागांची नीट जोडणी केली आणि तेल पाणी केले. चिमण्यांची रचना आणि त्यांचे दरवाजे हे फारच कलात्मक पद्धतीने तरीही तांत्रिक दृष्ट्या एकदम फिट्ट असे होते. जोडणी करताना ठराविक कोनातून विशिष्ठ पद्धतीनेच फिरवून ती शक्य होत होती. कुठे जोर लावला असता तर मोडतोड झाली असती. इतक्या छोट्या जागेत केलेली रचना म्हणजे जर्मन लोकांची करामतच होती. या घड्याळांना अजून पंचवीस वर्षे तरी काही होणार नाही याची खात्री होत होती.

सावकाशीने सगळी जोडणी पूर्ण केली. चिमण्यांची छोटी फुफ्फुसे (हवेचे पंप!!) बसवली. वजने साखळीला टांगली. टिक टिक सुरात केले आणि घड्याळ उत्तम चालू झाले. चिमणी पण एकदम ठसक्यात दरवाजा उघडून बाहेर यायची. वाजले किती ते चिवचिव करून सांगायची आणि जणू काही "अजून खूप कामं पडली आहेत घरात, तुम्हाला काय बघत बसायला?" असे म्हणत घरात परत शिरताना तोऱ्यात दार लावून घ्यायची. नुसते पहायलाही खूप मजा येत होती, चिमणी पाहताना आपोआप हळूच हसू येत होते. फारच मोठे समाधान वाटले. माझ्या आजोबांनी साधी घड्याळे दुरुस्त करायला शिकवली होती. त्या अनुभवातूनच हे काम जमले. दोन तीन रात्री चिवचिवटाने सुखद झोपमोड करवून घेत होतो. बहिणीला सांगितल्यावर ती एकदम खुश होऊन आली आणि चिमणी घड्याळ घेऊन गेली. चिवचिवाट थांबल्याने थोडा अस्वस्थ झालो पण यातून एक नवीन प्रकारच्या घड्याळाची दुरुस्ती जमल्याचा आनंद मिळाला.

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा वा, मस्तच. माझे वडील देखील असेच आहेत. आमच्या कडे कुठलीही बंद पडलेली वस्तू माझ्या वडिलांकडे दुरूस्तीला यायची. ह्यात खेळण्यापासून ते घरच्या टिव्ही ,फ्रिज ,गाडीचे छोटेमोठे रिपेअर सगळं आलं. आणि नानांकडे वस्तू आली म्हणजे ती दुरूस्त होणारच. आता वयापरत्वे हे थांबलं. त्यांना अतिशय आवडायचं असं दुरुस्त्या करणं.

मस्त! नक्की काय बिघडले होते पण?

गेल्या काही वर्षांत अनेकांकडे बघितली हे घड्याळे आणि बहुधा सर्वांनीच ती ब्लॅक फॉरेस्ट मधून आणली होती.

मस्त !
लहनपणी फार कौतुक होते अश्या घड्याळांचे..

मस्त लेख. आमच्याकडेही होते एक नवर्‍याने ब्लॅक फॉरेस्ट मधून आणलेलं. बरीच वर्षे टिकले. वेळेची अ‍ॅक्युरसी कमी होत जायची फक्त. एकंदर फार सुंदर आणि सुबक रचना होती आतील यंत्रणेची. नंतर एका मूव्हिंग मधे डेमेज झाले ते.

सर्वांना धन्यवाद..
Vijaykulkarni, धनि, व्हिडिओ टाकायला हवा होता !>>कसा टाकायचा ? मला जमला नाही

नक्की काय बिघडले होते पण?>> फारएण्ड, विशेष काही झाले नव्हते. साखळी गुंतली होती आणि दुसऱ्या चक्रात एक लिव्हर अडकले होते.

एका मूव्हिंग मधे डेमेज झाले ते.>>maitreyee, बिघडलेले घड्याळ अजून ठेवलेले असेल तर सांगा, प्रयत्न करू. या घड्याळांना सहसा काही होत नाही :).

वा! छानच!

खुणेने मांडून ठेवलेल्या पार्ट्सचा फोटो आहे का?

मस्त लिहिलंय.
धनुडी , तुझ्या बाबांचं वाचून ही छान वाटलं

माझ्या बहिणीकडेही असे घड्याळ आहे. माझ्या भाच्यानं जर्मनीहून आणलेलं. तेही आता बंद पडलं आहे.
जर्मन भाषेत या घड्याळाला Kuckucksuhr (कुकुक्सउअर) म्हणतात.

माझ्या नणन्देकडे आहे हे घड्याळ. तिच्या नवर्यानेही जर्मनीहुन आणलेय. आम्हाला खास बोलावले होते पाहायला आणि मला खुपच आवडले. ककु बाहेर येते ते छान वाटते पाहायला. बाकीची चित्रे पण अधुन मधुन हलतात बहुतेक. हल्ली गेले होते तेव्हा घड्याळ बिघडल्याचे कळले. त्यानी तरीही भिन्तिवरुन काढले नाहेय. शो पिस म्हणुन छान दिसते.

Pages