गझल - तोवर माझे शब्द संपले होते

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 10 April, 2022 - 11:49

तोवर माझे शब्द संपले होते
- महेश मोरे (स्वच्छंदी)

ज्या रस्त्याने दुःख चालले होते
घर माझे मी तिथे बांधले होते

मी काट्याला बोट लावले नाही
या बोटाला फूल टोचले होते

तुला मजेने म्हणून गेलो "वेडी"
वेड मला तर तुझे लागले होते

या हृदयाने फितुरी केली कारण
या डोळ्यांनी तुला पाहिले होते

गुलाब चुंबुन फसली आहे रे ती
त्याहुन माझे ओठ चांगले होते

सुखे राहिली म्हणून शाबुत माझी
सुखाभोवती दुःख पेरले होते

हसता हसता पुसून गेली डोळे
हसून मीही दुःख सोसले होते

फार उशीरा तिची मिळाली वा व्वा
तोवर माझे शब्द संपले होते

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक, बहुतेक शेर सुरेख

======

त्याहुन माझे ओठ चांगले होते वगैरे टाळणे बरे

कृपया गैरसमज अथवा राग नसावा

मनापासून धन्यवाद बेफिकीर सर,
गैरसमज वा राग वगैरे नाहीच.
म्हणजे अजिबातच.
पण कारण जाणून घ्यायला नक्की आवडेल.