झुंड... नाही टीम!

Submitted by अमितव on 4 March, 2022 - 23:53
By Twitter, Fair use, https://en.wikipedia.org/w/index.php?curid=60841204

****** झुंड चित्रपट बघणार असाल तर तो बघुन झाल्यावर हा लेख वाचा. अर्थात चित्रपटात स्पॉयलर देण्यासारखं काही नाही पण कोर्‍या पाटीने बघायला कधीही जास्त मजा येते. ******

प्रा. विजय बोराडे (अमिताभ) निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले नागपूरच्या बहुतांशी पांढरपेशी उच्चवर्गीय विद्यार्थ्यांच्या कॉलेज मधील प्राध्यापक. ह्या कॉलेजच्या जवळच एक झोपडपट्टी आहे. तिथली युवा पिढी ड्रग्स, व्यसने, मारामार्‍या, भुरट्या चोर्‍या यात आकंठ बुडालेली आहे. या कॉलेज आणि झोपडपट्टीत आहे एक साधी भिंत. खरतर साधी नाही. तर जातीपाती, वर्ग, आर्थिक परिस्थिती यांना उभी विभागणारी भिंत. या भिती पलीकडे कॉलेजमध्ये यायला झोपडपट्टीतील मुलांना प्रवेश वर्ज; आणि अलीकडील कोणी पलिकडे जाऊ इच्छित नाही, अपवाद फक्त बोराडे सरांचा.

एकदा बोराडे सरांना हीच तरुणाई एक डबड्याबरोबर फुटबॉल खेळताना दिसते, आणि त्यांना या मुलांना परिस्थितीतून, व्यसनातून, चोर्‍यामार्‍यातून बाहेर काढण्यासाठी खेळाचा मार्ग दाखवावासा वाटतो. झुंड चित्रपट ह्याच तरुणाईची खेळाच्या माध्यमातून बाहेर पडायची कथा सांगतो. बोराडे सर यात कितपत यशस्वी होतात? ही मुलं त्यांचं कितपत ऐकतात? आपला पीळ सोडून नळीत शेपुट घालतात का? त्यांचा भूतकाळ ते करायची त्यांना मुभा देतो का? त्या भूतकाळाला मागे टाकून येणं खरोखर कितपत शक्य होतं? याची उत्तर चित्रपट पाहुन मिळतीलच.

उच्चवर्गातील, ती ही मुख्यत्त्वे शिक्षक, मुख्याध्यापक अशा प्रौढ व्यक्तींतील आणि या मुलांतील दरी अनेक प्रसंगांत दिसत रहाते. ती समोरासमोर व्यक्त होतेच असं नाही. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागणुकीतून, सर्वसामान्य रुजलेल्या स्टिरिओटाईप्स मधुन ती दिसत रहाते. बर्‍यापैकी असेच आपण ही कधी ना कधी व्यक्त झालेलोच असतो, त्यात काही चूक आहे हे न सांगता थोडा विचार केला की खजिल होऊन आपलं मन कुरतडत राहिल.... असा खास मंजुळे टच! पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी, वर्गणी, जल्लोश... अशा निरिक्षणात्मक पातळीवर, कधी चक्क डॉक्युमेंटरी प्रकारे पात्रपरिचय करत तर कधी काल्पनिक आणि तरीही वास्तव वाटेल असे प्रसंग घेत चित्रपट पुढे जात रहातो.

नागराज मंजुळेचा चित्रपट आहे, त्यामुळे फँड्री/ सैराटशी तुलना होणे अटळ आहे. तर ज्या प्रमाणे फॅन्ड्री/ सैराट मध्ये नागडं सत्य कसलाही मुलाहिजा न ठेवता धाडकन समोर येते तसं दलित लोकांचे वास्तव इथे धगधगीतपणे पुढे येतच नाही, कदाचित मराठी प्रेक्षकाच्या प्रगल्भतेच्या तुलनेत हिंदीत कितपत धोका पत्करावा असा हेतू असेल. बॉलिवुड मध्ये अशा भूमिका प्रस्थापित कलाकारांकडून ब्राउनफेस/ ब्लॅकफेस करुन करण्याची रुढ परंपरा तर मोडली, पण कथेत रोमँटिसिझम कायम ठेवूनच कथा प्रवास करते.

झोपडपट्टी टीमचा कर्णधार डॉन उर्फ अंकुश मेश्राम ह्या कथेचा नायक. तो साकारला आहे अंकुश गेडाम याने. काय काम केलंय याने! त्याच्या कडून इतकं सहज सुंदर काम करुन घेण्यात मंजुळ्यांचा हात कोण धरणार! चित्रपटात याची पार्श्वकथा उत्तम प्रकारे उभी केली आहेत. त्याच्या पात्राला असलेले कंगोर व्यवस्थित उभे केले आहेत. पण दुर्दैवाने अंकुश सोडून कुठल्याच खेळाडूची बॅक स्टोरी चित्रपटात येत नाही. त्यांचा मनाचा ठाव लागत नाही. एक रझियाची कथा थोडी फार आहे, पण तिच्याही मनाची आंदोलने आणखी हवी होती. तब्बल तीन तासाचा चित्रपट आहे, म्हणून हे जास्तच जाणवतं. इतर पात्र कोण आहेत हे डॉक्युमेंटरी स्टाईल थोडंफार समजतं, पण मंजुळे स्टाईल दृकश्राव्य असतं तर मजा आली असती वाटत रहातं.

अजय- अतुलच्या सैराट मधल्या जादू नंतर इथलं संगीत अगदीच तोकडं वाटलं. 'लफडा झाला' तर झिंगाटची कॉपी वाटते. सुरुवातीचं 'झुंड' छान आहे, पण सैराटचा साऊंड ट्रॅक आठवला की... असो... Happy
असंच सुरुवातीला बोराडे सर त्या फुटक्या डब्या बरोबर फुटबॉल खेळताना बघतात तेव्हा अचानक पाऊस चालू होतो. तो प्रसंग जादुई आहे, पण त्यात व्हिएफएक्स पाऊस आणि त्यात अमिताभच्या चष्म्याच्या काचेवर एक पावसाचा टिपुसही पडत नाही, कपडे, केस भिजणे तर दूरची गोष्ट असल्या चुका का राहिल्यात कोण जाणे. (का माझं काही चुकतंय?)

हिंदीत असे रांगड्या प्रवाहा बाहेरच्या नागड्या व्यक्तिरेखांना घेऊन, त्यांच्यावर मेहेनत करुन, त्यांच्याकडून काम काढून घेऊन चित्रपट फारसे नसतात. त्यामुळे एकुणात चित्रपट आवडला. पण नागराज मंजुळेचा म्हटल्यावर कदाचित फारच जास्त अपेक्षा ठेवून गेलो असेन, त्यामुळे थोडी निराशा झालीच.
अंकुशला ती गोरी मुलगी आवडते ते ठीकच. पण इतर टीम मधल्या मुलींबरोबर कुणी कनेक्ट होईल, संवाद साधेल. एक टीम म्हणून सगळे खेळाडू एकत्र येतील. तर असं काहीच दिसत नाही. सगळ्यांचा पासपोर्ट काढायला जे श्रम लागतात ते दाखवायला जो वेळ दिला आहे, त्यातला थोडा वेळ एक टीम म्हणून उभं रहायला दिला असता तर?

बाकी पूर्ण चित्रपट अनेकदा टिपिकल वळणावर येतो पण टिपिकल न होता काही सकारात्मक संदेश, दृष्टी देऊन जातो. नक्की कुठे ते आणखी लोकांनी बघितला की प्रतिसादांत बोलूच.

तर लोकहो पटपट बघा, म्हणजे वचावचा बोलता येईल. शेवटी मंजुळेचा आहे, त्यामुळे अनेक लहान लहान पात्र, लकबी इ. वर बोलण्यासारखं बरंच आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख, प्रतिसाद दोन्ही मस्त आहेत.
‘ए म सी’ थेटरमधे लागलाय. नक्की पहाणार. मंजुळेंना हिंदीमधेही सुपरहीट करुया. सैराट मी पाहिला नाही कारण शेवटाबद्दल इथली चर्चा वाचुन हिंमत झाली नव्हती. पण हा पहाणार.
अरे हो, ह्रित्तिक रोशनने पण सुपर ३० मधे फार सुंदर काम केले होते. (बच्चनसाबच्या ऐवजी चर्चा वाचून आठवले)

स्वाती- अमिताभ ऐवजी मी टू वाला नाना पाटेकर असता तर मी तरी पाहिला नसता ...

अमिताभ ऐवजी आमिर जास्त सूट झाला असता किंवा बोलो जुबा केसरी पण...

अमित, मी अजून तू लिहिलेलं आणि इतर लोकांच्या पोस्टी वाचलेल्या नाहीयेत. मला माझ्या डोक्यातले विचार आधी मांडायचे होते. ते मांडून झाले की वाचतो.
एखादा पिकचर बघितला आणि तो जर खुप पावरफुल असेल तर संपल्यानंतर बराच वेळ तुम्ही त्यातल्या वातावरणात, त्यातल्या पात्रांबरोबर जगता. म्हणजे आपलं आयुष्य नॉर्मल सुरु असतं पण बॅकग्राऊंडला तुम्ही अजूनही तिथेच असता. कधी कधी त्यातली दृश्य रिपीट होत राहतात किंवा थेट आपण एखादं पात्र बनून समोरच्या दुसर्‍या पात्राचे प्रेम, रोष जे काही असेल ते ओढावून घेतो.
झुंड संपल्यावर त्या वातवरणात रेंगाळायला झालं पण "जगायला" नाही झालं. सिनेमा पावरफूल असला की त्याचे सम ऑफ पार्ट्स ह्याचे जे एक जग तयार होते त्या जगाची पावर तुम्हाला त्या जगात आत धरून ठेवते. बराच काळ. नंतर मग आपण त्यातल्या पार्ट्सना पण एक एक करुन रिपीट जगतो. इतकी पावर मला तरी झुंडची नाही जाणवली.
सिनेमा तसा ऑवरॉल एन्टरटेनिंग होता. सिनेमॅटोग्राफी (सुधाकर रेड्डी यक्कान्ती) फारच भारी होती. टायटल साँग खुपच आवडलं. बच्चनला बर्‍यापैकी ड्रेसडाऊन केलं मंजुळेंनी आणि लार्जर दॅन लाईफ न वाटलं मध्यमवर्गीय अशी इमेज नीट कॅरी केलीये बच्चननी. काम पण आवडलं. लहान मुलांचे बँटर म्हणजे नॉर्मल त्यांची लाईफ सुरु असताना जे काही ते एकमेकांशी बोलत असतात त्याचं चित्रण पण छान झालय. म्हणजे नॅचरल वाटतं बोलणं आणि वागणं. सुधाकर रेड्डींची सिनेमॅटोग्राफी आणि मंजुळेंच्या डायरेक्शनमुळे गरिब वस्तीचं आणि त्यात राहणार्‍या लोकांचे एकदम अंगावर येणारं असं अस्तित्व दिसून येतं. लीड रोल मध्ये असलेली मुलं, चियरर दारुडा, आपले परशा आणि आर्ची Happy , आर्चीचे झुंडमधले वडिल, चाळीतल्या मशेरी लावून बसणार्‍या बाई (सैराटमधली परशाची आई) आणि अजून कित्येक बारिक बारिक कामं असलेली पात्र ह्यांची कामं भारी झालीयेत. ही खास मंजुळे पावर आहे, म्हणजे अ‍ॅक्टर नसलेल्या लोकांकडून चांगली कामं करुन घ्यायची!
ह्या सगळ्या झाल्या जमेच्या बाजू आता जरा ओवरॉल प्रॉडक्ट माझ्याकरतातरी पावरफूल का नाही झालं ह्या बद्दल लिहितो.
सरवात आधी आणि महत्वाचं म्हणजे खुप जास्त कॅरॅक्टर्स आहेत आणि खुप काही होतं ह्या सिनेमामध्ये. बर्याच वेळा कथानक पुढे सरकताना त्यात डिसकंटिन्युईटी वाटते.
सुरवातीलाच एकदम भारी शॉट आहे खरं आणि तो शॉट संपतानाच अमिताभ समोर येतो. तो तिथे काय करत होता, कशा करता आला होता ह्याचं काहीच बॅकग्राऊंड नाही. ही बाब साधी वाटेल पण मला वाटतं सिनेमा मध्ये कंटिन्युइटी हा फार महत्वाचा मुद्दा असतो.
पिकचरच्या सुरवातीलाच रझिया ह्या पात्राबद्दल शॉट/सीन आहे आणि ती नंतर टोटली गायब होऊन डायरेक उत्तरार्धात तिची रिएंट्री होते.

पुढे मग अमिताभ त्या मुलांना डब्यानी फुटबॉल खेळताना पाहतो आणि त्यावरुन पुढे त्यांना पैशाचे अमिष दाखवून रोज चांगल्या फुटबॉल नी खेळायला लावतो. आता ती पोरं तशी गेम ला नवखी असल्यामुळे बराच वेळ अमिताभ त्यांना कसा ट्रेन करतो ह्यावर फूटेज आहे. त्या फूटेज मध्ये गेमच्या साध्या रूल्स पासून ते हेंडिंगचे (डोक्यानी बॉल मारायचे) आणि स्पीड ट्रेनिंग वगैरे दाखवलं जे एकदम बरोबर वाटतं. पण पुढे जाऊन ही टीम त्या शेजारच्या सेंट जॉनच्या टीमला हरवते हे पटत नाही. गद्दी गोदामची पोरं सिरियस मॅच आहे म्हणून लग्नाला जायच्या थाटात आवरुन येतात हा पार्ट विनोदी होता पण त्या मॅचच्या सेकंड हाफ मध्ये जेव्हा ते परत सगळा अवतार आवरुन अनवाणी खेळायला लागतात तेव्हाच्या त्यांच्या स्कील लेवल जस्टिफाय करायला आधीच्या प्रॅक्टिस मध्ये तसा काहीच बॅकग्राऊंड नव्हता.

ह्या मॅच नंतर मग ती पोरं डायरेक्ट अमिताभच्या घरात दाखवलेली आहेत आणि इम्रान त्याच्या आयुष्याबद्दल सांगायला सुरवात करतो. पुढे बाकी पोरंही तेच करतात पुढे लायनीनी पण ह्याचा काय बॅकग्राऊंड? म्हणजे प्रेक्षकानी समजून घ्यायचं की पोरांना अमिताभनी बोलवून घेतलं?
प्रॅक्टिस मध्ये खरं मुलांचे एकमेकांशी संवाद खुप धमाल झालेत पण मला त्यातल्या एक सुद्धा संवाद आठवत नाहीये. ह्याचं कारण परत खुप काही सुरु होतं. लक्ष देऊन परत पिकचर बघितला तर कदाचित खुप विनोदी संवाद सापडतील पण हे असं ऑडियन्स ना तुम्ही जबाबदारीनी एकायचं "काम" नाही देऊ शकत. It's your job to keep the scenes manageable so that the audience is able to keep track and enjoy within the level of attention they have. सैराटमध्ये तुम्हाला आठवेल ओपनिंग सीनच्या मॅच मध्ये एकसे एक संवाद होती पण त्यात गर्दी नव्हती. हे मान्य की हा फूटबॉल आहे पण तरी हे नीट मॅनेज करता आलं असतं.

सेंटजॉनशी मॅच जिंकल्यावर पुढे अमिताभ पोरांच्या सल्ल्यावरुन भारतातल्या सगळ्या झोपडपट्टींच्या टीम्स ची टुर्नामेंट भरवण्याचे ठरवतो पण ते करताना परत त्याची तयारी ही सगळी वॉश ओवर वाटली मला. वॉश ओवर म्हणजे काय चाललय, नेमकं ते काय करत आहेत आणि ते करताना कोण कुठली बाजू संभाळतय ह्याचा काही पत्ता लागत नाही. फक्त सीन सरकत राहतो डोळ्यासमोरून.

क्रमश..... (आता जरा बॅटमॅन बघायला जायचय. रात्री लिहितो परत Happy )

अमिताभला बहुधा कमर्शिअल मुद्द्याचा विचार करूनच घेतला असेल. हिंदीत ऊतरताना चित्रपटात एक तरी नावाजलेले नाव हवे असे वाटले असावे. फूटबॉल गॅंगमध्ये तो स्कोप नव्हता तर कोचचेच पात्र शिल्लक राहणार. तिथे आमीर अजय घेणे कदाचित योग्य ठरलेही असते तरी त्यांचा रेट अमिताभपेक्षा जास्त असावा. बजेटमध्ये येणारे मोठे नाव अमिताभच असावे.

बाकी काम करायची ईच्छा वगैरे हे टिपिकल जुमले आहेत. चित्रपटाआधीच्या आणि नंतरच्या मुलाखतीत सर्रास ऐकू येतात. ते खरे असतीलच असे नाही Happy

@ च्रप्स,
यातला कोणता जुबा केसरी? एकाकडे कोचच्या भुमिकेत ईंडियन वूमन्स हॉकी टीमला वर्ल्डचॅम्पियन बनवून द्यायचा अनुभव आहे Happy

IMG_20220307_014025.jpg

बुवा - मस्त लिहीले आहे. बरेचसे पटण्यासारखे. मात्र एक आहे - सैराटमधलेही असंख्य न्युआन्सेस पुन्हा पुन्हा बघताना जाणवले. पहिल्याच फटक्यात नाही.

क्रेक्ट आहे फा. पण मला वाटतं पहिल्यांदा बघताना त्या पिकचरनी जसं आत ओढलं माणूस परत परत जात रहातोच. Happy
अरे माझी एडिट करायची मुदत संपली वाटतं. वरचा प्रतिसाद एडिट करता येत नाहीये. इथे लिहितो उर्वरित भाग.

हा सिनेमा रियल लाईफ इवेंट्स वर अधारित आहे हे माहित होतं पण विजय बारसेंची नेमकी कहाणी माहित नव्हती आणि अजूनही नाहीये. आता वाचेन त्याबद्दल पण त्यांच्या मुलाबाबतीचा तपशिल पण असाच "टाकलेला" वाटला. तो एका सीन मध्ये येऊन जरा सिरियस डायलॉग मारुन नंतर न्यु यॉर्कला जाताना दाखवलाय. तो तिथे जाऊन त्याला इकडे वडिलांच्या कामगिरी बद्दल कळून शिक्षण सोडून परत येतो ह्याला सुद्धा भावनिक असा बॅकग्राऊंड काहीच नाही आणि कथेला रोचक बनवणारं आणि इफेक्टिवली पुढे सरकवणारं असं काहीच नाही. बरेच सीन आणि इवेंट हे असेच फक्त "आहेत" येवढच.
मग नंतर स्लम सॉकरच्या दरम्यान परत तो जीव द्यायला निघालेला तरुण, पुढे मग मोनिका (आर्ची Happy ), रझिया, ती अजून एक रिक्षा चालवणारी मुलगी ह्यांच्यावर रोख. मोनिका आणि तिच्या वडिलांची तिचा पासपोर्ट करायला लागणारी पायपीट काळजाला हात घालते अणि त्यात त्यांची प्रादेशिक भाषा वापरुन निर्माण झालेले विनोद पण छान जमले आहेत. पण परत एकदा स्लम सॉकर मधून पुढे तिच्या घरी जायला पार बैलगाडीत बसून ते तिथे पोहोचून मोनिकाचा चेहरा दिसे पर्यंत आपल्याला काहीच कळत नाही की काय चाललय स्क्रीन वर नेमकं.

शेवटी अंकुश/डॉन ला सोडून सगळी टीम मंडळी बस मध्ये बसते अणि बस निघते, आपल्याला वाटतं झालं, निघाले हे लोकं जॉर्जिया ला जायला म्हणजे पुढचा स्टॉप अर्थातच एअरपोर्ट. तर त्यापुढे अचानक काहीतरी समारंभ दाखवलाय ज्यात बोराडेंना आणि मुलांना स्टेजवर बोलवून पारितोषिक दिलं जातं, मग त्यापुढे ते एअरपोर्टला जातात!
शेवटचा सीन छान जमलाय आणि सिंबॉलिक रुपानी अंकुश ते ब्लेड फेकून मेटल डिटेट्कटर पार करतो तेव्हा बेसिकली त्यांनी दारिद्र्य, व्यसन रेषाच पार केली हे "डायरेक्शन" मस्त होतं. हे असं "डायरेक्शन" अगदी आपल्याला जाणवावं असं खुप ठिकाणी केलय मंजुळेंनी पण त्यामुळेच त्याची माझ्याकरता तरी मजा अशी गेली. हे असले जे सुचक असे मोमेंट्स असतात सिनेमा मध्ये ज्यात खुप काही किंवा अगदी मोजकच पण नेमकं असं ताकदीनी सीन मध्ये उभं केलेलं असतं ते जितकं सटल (subtle) असतं तेवढच जास्त पावरफुल वाटतं. पिकचर मध्ये ठीक ठीकाणी त्याची थोडी ठळक अशी पेरणी केल्यामुळे ते एकदम एखाद्या टॅलेंट शो किंवा फिगर स्केटिंग टुर्नामेंट मध्ये खेळाडू मुद्दाम अवघड असलेले पैत्रे पेश करतात जज लोकांना इम्प्रेस करण्याकरता त्यातली गत झाली.
अंकुश, रितिक आणि इतर (नेमकं कोणाचं नाव काय ते पण लक्षात नाही राहत म्हणजे असा बेसिकमध्ये लोचा होतो बघा ह्या सिनेमाचा) सगळ्याच पोरांनी त्यांची कामं खुप छान केलीये पण दुर्दैवाने एक सुद्धा पात्र आपल्या जवळ म्हणून राहत नाही. ओवरॉल सिनेमा एन्टरटेनिंग असला तरी मेमोरेबल नसून टोटली फरगेटेबल झाला आहे.

बुवा, दोन्ही पोस्ट आवडल्या. सविस्तर छान लिहिलंयस.
मलाही विस्कळित वाटला अनेकदा. कदाचित एडीटिंग मध्ये असा झाला असेल. पण सैराट जसा गोळीबंद होता, एका सीन मधुन दुसर्‍या सीन मध्ये सहज जात होता आणि काहीच नसलं तरी चाललं असं वाटत न्हवतं, तसं इथे झालं नाही.

त्या भिंतीवर उभ्या केस रंगवलेला कबाडीवाल्याचे पहिल्या मॅच मधले संवाद ऐकून मला सगुणा आत्या आठवली, आणि तिचेच संवाद आणि ठसका आठवू लागला. इथे हा काहीतरी विनोदी संवाद म्हणतो पण ते असे आतुन येत नाहीत. मलातरी ते खरे वाटलेच नाहीत. तो टीमचा सच्चा सपोर्टर आहे पण तेव्हा तो तसा वाटलाच नाही. कबाडी वाला मालक (मंजुळे) असं सिटीच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये इथे मैदान आहे म्हटल्यावर टोटल गायब होतो? असा कोण गायब होतो??

आर्चीला (रि़कूचे पात्र, नाव लक्षात नाही) पासपोर्टला त्रास पडतो. पण खरंच जे दाखवलं आहे तितकी तोशिष हाच त्रास पडतो का? शाळेत हजेरीपटावर नाव नसुनही शाळा मास्तर सपोर्ट करतात, पोलिस पाटील ओळखत नसुनही दाखला देतात, जिल्हाधिकारी सुद्धा काम करुन देतात. खर्‍या आयुष्यात व्यवस्थित कागदपत्रे असलेल्या शहरी व्यक्तीला सतरा हेलपाटे घालावे लागतात पासपोर्टसाटी. इथे तिला पासपोर्ट इतके सव्यापसव्य करुन शेवटी मिळाच नाहीच असं मंजुळे दाखवेल वाटलेलं. तो मिळालेला दाखवला आहे, थोडक्यात भिंती अलिकडचे लोक चांगलं वागलेत. याचं कारण क्षणभर 'या मार्जिनलाईज्ड लोकांना मदत करा' असा भाबडा संदेश तर द्यायचा नाही ना! असं वाटून गेलं.

एक आवडलं म्हणजे, भिंती अलिकडले लोक भेदभाव करायला बघतात, बायसेस दाखवतात पण ते थेट डिस्क्रिमिनेशन समोरासमोर करताना दाखवलेले नाहीत. साधारण आयुष्यात अशीच ब्लॅक शेडची पण फसाड ग्रे असलेली माणसं असतात. झोपडपट्टीतला आहे म्हणून समोर आला की घा.पा. बोलणार नाहीत, पण मनात जोखुनच वागतील. रामदास फुटाणे, सौमित्र यांनी ते छान दाखवलं आहे.

तो सलिम इतका बत्तीशी दाखवुन हसताना एअरपोर्टवर कशाला परत परत दाखवला आहे? बाकी फुटबॉल खेळताना दाखवला असेल तरी माझ्या लक्षात तो शेवटचा शॉटच राहिला.
बसमध्ये बसून सगळी टीम गेल्यावर ते सगळे परत समारंभात दिसल्यावर मलाही काही झेपलं न्हवतं. अरे हे तर एअरपोर्टवर जाणार ना? मग वाटलं त्या अंकुशला पासपोर्ट मिळून आणि एक शेवटची मारामारी करायला आणि त्या गोर्‍या मुलीला लवस्टोरी रेसिप्रोकेट करुन पोलिसला बोलवायला, मग नागपुर- मुंबई लिफ्ट द्यायला (नशिब एक गाणं नाही म्हटलं नगर औरंगाबाद आलं की) आणि एक शेवटची मिठी मारयला वेळ पाहिजे तर मग सगळ्या टीमने कुठेतरी टाईमपास करायला नको का? तो टाईमपास कुठला? तर मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला!!! :रागः हे टोटल नागराज स्टाईल नाही. अशी बरीच ठिगळं जोडलेली नंतर विचार केला की जाणवली.
सैराटमध्ये याच्या बरोब्बर उलटं झालेलं. घरी आल्यावर एकएक प्रसंग आठवुन अरे काय भारी होतं याच्यात वेळ गेलेला.

नागराज कडे सांगायला पुष्कळ आहे बरोबर आहे, पण ते तीन तासात मावत नसेल तर काय करायला पाहिजे हे त्याला व्यवस्थित माहित आहे. सांगायला पुष्कळ आहे म्हणून ही अगदीच लंगडी सबब नाही वाटत का?
अगेन, चित्रपट प्रत्येकाने बघावा असाच आहे हे वेगळं सांगायला नकोच. मला ही परत बघायची संधी मिळाली की नक्कीच परत बघेन.

एक नंबर अमित. मनातलं (जे राहून गेलं लिहायचं ते) लिहिलस. Happy हे मुद्दे पण जाणवले अगदी. सल्ल्या स्लम सॉकर मध्ये आहे बहुतेक. लंगड्याचे पण तेच. दाखवलाय पण काम काहीच नाही.
त्यात तो मध्येच योगेश म्हणून कोण आहे तो मरतो! तो टीममधला होता की इतर कोणी? मला काहीही कळालं नाही. परत तेच, एक घटना ह्या शिवाय कथानकाला त्याचा भावनिक असा काही संबंध नाही. Totally, byob प्रकार केला आहे मंजुळेंनी. “Bring your own brain” to the movie to interpret what I am trying to tell you. अहो हो! पण मला डोकच लावायचं असतं तर मी घरात वर्डल नसतो का खेळत बसलो? मी पिकचर ला आलो ते तुमच्या, सुधाकर रेड्डी अन अजय-अतुलच्या बोटीत बसून रंजक आणि रम्य अशा एका सफरी करता. मला ही असली कामं देऊन माझ्या ह्र्दयाला सफरिंग दिलं की बघाओ तुम्ही!
आता कुठल्या ओटिटि वर आला की परत बघेन नक्की. बघू काही वेगळं हाती लागतं का?

बुवा Happy पहिल्या दोन्ही पोस्ट्स आवडल्या. अमितची कळायला पिक्चर बघावा लागेल.

बाय द वे, मंजुळेची ही 'बच्चन' या विषयावरची पूर्ण मुलाखत. सगळीच्या सगळी बघण्यासारखी आहे.
https://www.youtube.com/watch?v=Xvx38wFdZ4w

अमिताभला घ्यायचे हे त्याने स्पेसिफिकली ठरवले नाही. त्याच्याकडे आलेले प्रपोजल अमिताभसकटच होते. इतरही बर्‍याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्याच्या लहानपणी असलेला बच्चन माहौल त्याने मस्त सांगितला आहे.

मला एक मूलभूत भाबडी शंका आहे.

मधमाश्याच्या मोहोळाला दगड लागेल की काय असं वाटल्यामुळे मांडत नव्हते पण शंकानिरसनही हवंच आहे.

झो. पट्टी आणि चकचकीत काॅलेज ह्यातली तफावत ही गरीब श्रीमंत अशीच तफावत आहे. त्यात सवर्ण आणि बहुजन हा मुद्दा का येतो. अनेक सवर्णही गरीबीमुळे झो. प. रहात असतात. तसंच अनेक बहुजन चकचकीत घरांत रहातात की...

फक्त बाबासाहेबांचा फोटो दाखवला आणि जयंती साजरी केलेली दाखवली म्हणून असा निष्कर्ष का काढावा?

झुंड बद्दल दोन टोकाची मत दिसत आहेत सोशल मिडीया वर...
वरती बर्‍याच लोकांनी लिहिलेय तशा बर्‍याच ढोबळ चुका आहेत चित्रपटात..पण या सगळ्या चुकांसकट सुद्धा हा चित्रपट अनेक बाबतीच भारीच जमलाय...

अजिबात काहीही लॉजिक नसलेले फालतु चित्रपट पण शंभर कोटी क्लब मधे जातातच की.. ...
फक्त सैराट चा बेंचमार्क सेट असल्यामुळे या चित्रपटात नागराज कडुन अपेक्षा वाढल्यात इतकंच....
पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या विषयाला बर्यापैकी न्याय दिलाय म्हणुन या प्रयत्नासाठी नागराज ला दाद द्यायलाच हवी....

रझियाची गोष्ट दाखवली आहे की! गायब कुठे होते ती? सुरुवातीला तलाक म्हणून आई बापाकडे परत जाते. नंतर ती त्या कॉलेज मधे ग्राउंड वर लॉन मोविंग करताना , मैदान राखण्याचे काम करताना दिसते की, तिची छोटी मुलगी पण तिथे गवत / तण उपटत असते.
मोनिकाचेही नीट तर दाखवले आहे. जॉर्जियाला जाण्यासाठी सगळ्या प्लेयर्स मधून ते सिलेक्शन करतात तेव्हा मोनिका चे एक नाव येते. एक जण सांगतो की ती त्या तिथल्या पाड्यावर राहते. मग विचारत विचारत अमिताभ तिथे जातो असं दाखवलं आहे.
खूप पात्रे असल्याने न्याय देता आलेला नाही हे बरोबर आहे पण या वर लिहिलेल्या कॅरेक्टर्स ची गोष्ट बरोबर आलेली आहे.

क्रेक्ट रझिया सुरवातीला दाखवली आणि मला आठवलं आत्ता की ती लहान मुलगी तिथे गवत काढताना दाखवली आहे. माझं म्हणणं येवढच आहे की शेवटी पार स्लम सॉकर येऊ पर्यंत आणि नंतर जॉर्जियाचे सिलेक्शन होई पर्यंत रझियाचा रेलेवन्स/वावर असा नाही ना आजिबात? म्हणजे तू जे सांगितलं पिकचर संपल्यावर की शेवटी त्यांना ह्या पोरांचा स्ट्रगल दाखवायचा होता, ते एकदम बरोबर आहे. पण शेवटी ऑडियन्स म्हणून तुम्ही अख्खं प्रॉडक्ट बघत असता. माझ्या करता हा सगळा पिकचर म्हणजे एखादा माणूस एखादी मोठी गोष्ट, एकसुरी अशा आवाजात सांगतोय असा इफेक्ट आला. जे काही कॅरॅक्टर तुम्ही पडद्यावर आणता त्यांचे आर्क्स (arcs), मग ते कितीही लहान का असेना हे त्या कथेला रेलेवंट ठेवून सुरवातीपासून शेवट पर्यंत न्यावे लागतात. म्हणूनच कित्येक सिनेमांमध्ये लहान रोल्स असलेली लोकं सुद्धा खुप मेमरेबल होतात. इथे लहान कामं वाली तर सोडाच मेन असलेली लोकं सुद्धा आपण सहज विसरु शकतो.
दुसर्‍या भागात डॉनची हाफ मर्डरची केस होते. त्यात काही सिरियस वाटलं असेल तर फक्त अजय- अतुलचं म्युजिक. तो वण वण करताना दाखवला आहे आणि जेव्हा तो न रहावून मैदानावर येतो तेव्हाची अमिताभची रियॅक्शन बघा. तो सरवात महत्वाचा असा प्लेयर आहे, वातावरणात तो नाहीये ह्याची पोकळी जाणवत नाही आजिबात आणि बच्चन सुद्धा इतका इमोशनलेस डायलॉग मध्ये त्याला तू इथे येऊ नकोस सध्या तरी असं सांगतो. त्या सगळ्या प्रसंगाला एक डेंजररस अशी धार होती जेव्हा तो घडला तेव्हा कारण टोटल वाताहत होऊ शकते ह्यावरुन पण तसा काहीच इफेक्ट नाही कोणावर. तो बर्‍याच स्ट्रगलर मधला एक आहे असं म्हणावं तर तसं नाहीये डॉन लीडच आहे जवळ जवळ.
सो तुम्ही माझी शाळा घेऊ शकता डिटेल्स मिस केले म्हणून. Lol
काही हरकत नाही पण माझा प्रॉबलेम ह्या सगळ्या घोळामुळे झालाय. Happy

बुवा, तुमचे काही आक्षेप योग्य आहेत - पण या बॅक स्टोरीज आल्या आहेत, तसंच मॅच जिंकल्यावर अमिताभ मुलांना घरी चहाला बोलावेल हे काही ‘कसं आणि कधी आमंत्रण दिलं ते दाखवा’ म्हणण्याइतकं फार फेच्ड नाहीये ना.
अमिताभचं कॅरेक्टर शेवटच्या कोर्टातल्या स्पीचपर्यंत कुठेच फार नाटकी इमोशन्स दाखवत नाही, स्वतःचं घर गहाण ठेवताना, किंवा मुलगा एकदम वैतागून निघून जातो तेव्हाही. तो अंकुश दिसल्यावर आऊट ऑफ कॅरेक्टर का वागेल? जामीन त्यानेच भरला होता ना!
जिथे इतका सतत जगण्याचाच संघर्ष आहे, तिथे कोणी कोणाला किती मिस करत असेल?!

आमंत्रण दाखवा असं नव्हतो म्हणत पण ह्या साध्या गोष्टी असल्या तरी कंटिन्युइटी किलर आहेत माझ्या मते.
रहिला प्रश्न अमिताभचा तर तो दाखवतो की थोडे तरी इमोशन्स. त्याला नाही का म्हणत आधी की पैर पकड लेता उसके? त्याही पुढे जाऊन जेव्हा तुम्ही डेंजरस घटना दाखवतात तर ती कथेच्या फिजिकल आणि भावनिक फ्लो मध्ये बसलेली पाहिजे. सगळेच कसे असे नॉन इवेंट खात्यातले इवेंट झाले आहेत.
वस्त्रहरण नाटकाच्या प्रयोगानंतर एकदा पु लंनी त्या नाटकाचे प्रचंड कौतूक करत एक भाषण दिलं होतं. त्यात त्यांनी मला वाटतं कोणाचं तरी वाक्य कोट केलं होतं. ते साधारण असं होतं की जर पहिल्या अंकात सेटच्या बॅकग्राऊंड मध्ये बंदूक दाखवली असेल तर पुढे दुसर्‍या अंकात ती वाजली पाहिजे. थोडक्यात गोष्टींचा रेलेवन्स असतो एका सीन मधून दुसर्‍या सीन मध्ये जाताना. आणि आपलं मन ते ट्रॅक करत असतं. म्हणूनच हा सिनेमा संपल्यावर माझ्यावर तरी जनरल एखादा सिनेमा बघावा ज्यात ठेवून घेण्यासारखं काही नाही असा इफेक्ट आला. एनिवे... पुष्कळ बोललो. आता नवीन काही नाही उरलं. Happy परत बघणार आहे नक्की, माझ्याकडून काही महत्वाचे डिटेल्स मिस झाले असतील ते नीट बघायला.

‘कसं आणि कधी आमंत्रण दिलं ते दाखवा’ >> असं नाही. पण मॅचचा शॉट संपल्यावर एका दहा सेकंदाच्या शॉट मध्ये टीम अमिताभच्या घराची बेल वाजवते आणि अमिताभ सगळ्यांना आत घेऊन चहा सर्व करतो इतकं ट्रांझिशनला पुरेसं होतं.
ज्याप्रकारे अचानक ती डॉक्युमेंटरी स्टाईल बोलणी चालू होतात त्याच्या मध्ये नक्की असा एक शॉट असावा आणि एडिटिंग मध्ये तो कट झाला असेल. #माबोपिच्चरडिकोडिंग Proud

बुवा, इट्स ओके. तुमच्यापर्यंत हा पिक्चर सैराट इतका पोचला नाही ह्याचं नागराज मंजुळेला थोडं वाईट वाटेल पण ही विल गेट ओव्हर इट. Wink
त्रुटी आहेत बर्‍याच पण त्याला काय दाखवायचं होतं ते पोचलं का लोकांपर्यंत हे महत्वाचं.

हो पण तुम्ही काय सांगताय नेमकं मला सायोबेन? म्हणजे पापड वगैरे मोडलाय का कुठे? Lol
तुमच्या मते पोहचलय की नाही त्याचं म्हणणं? तुमच्या पर्यंत तरी? Happy

तुमच्या पोस्टी वाचून सांगतेय. पापड मोडायचा काय संबंध?
मी सैराटशी तुलना न केल्यामुळे मला त्याला जे दाखवायचं होतं ते दिसलं. बर्याच जणांनी सांगितलेल्या चुका लक्षात येऊनही आवडला.

कधी कधी हापिशियल बाफं असला अन त्यावर भरभरुन लिहिलं (आवडलं म्हणून किंवा आवड्लं नाही म्हणून) की काही पब्लिक ला त्रास होतो. की येवढं काय त्यात वगैरे असं काहीसं. मला वाटलं तुम्हाला तसं काही होतय की काय म्हणून विचारुन घेतलं. Proud
आणि हो, मी सैराटशी तुलना नाही केली बघताना. मला मंजुळे काय दाखवतो ह्यात रस होता फक्त. नॉर्मल आपलं आवडीचा डायरेक्टर असला की आवर्जून पाहायला जातो तसं गेलो.

मलाही एन्टेरटेनिंग वाटला, पार्ट्स मध्ये. नॉट अ‍ॅज अ होल.

हो मॅच जिंकली म्हणून अमिताभ च्या घरी छोटी पार्टि झाली. ठीके की. ते मलाही इतके अ‍ॅब्रप्ट वगैरे नाही वाटले.
अजून ते मॅच जिंकण्याबद्दल - म्हणजे माझा टेक सांगते- तुम्हाला पटायलाच हवा असे नाही.
ती मुलं कॉलेज विरुद्ध मॅच जिंकतात यात फार अविश्वसनीय मला वाटले नाही. कुठल्या तरी क्ष कॉलेज मधली गोरीगोमटी, खेळाच्या तासाला सेलफोन बघत बसणारी पोरं असतात ती. ती काही कोणी प्रोफेशनल टीम नसते की त्यांना हरवल्याचं आश्चर्य वाटावं Happy उलट अमिताभ झोपडपट्टीतल्या मुलांना नीट ट्रेन करताना, त्यांच्याकडून खेळून घेताना दिसतो.

Pages