****** झुंड चित्रपट बघणार असाल तर तो बघुन झाल्यावर हा लेख वाचा. अर्थात चित्रपटात स्पॉयलर देण्यासारखं काही नाही पण कोर्या पाटीने बघायला कधीही जास्त मजा येते. ******
प्रा. विजय बोराडे (अमिताभ) निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले नागपूरच्या बहुतांशी पांढरपेशी उच्चवर्गीय विद्यार्थ्यांच्या कॉलेज मधील प्राध्यापक. ह्या कॉलेजच्या जवळच एक झोपडपट्टी आहे. तिथली युवा पिढी ड्रग्स, व्यसने, मारामार्या, भुरट्या चोर्या यात आकंठ बुडालेली आहे. या कॉलेज आणि झोपडपट्टीत आहे एक साधी भिंत. खरतर साधी नाही. तर जातीपाती, वर्ग, आर्थिक परिस्थिती यांना उभी विभागणारी भिंत. या भिती पलीकडे कॉलेजमध्ये यायला झोपडपट्टीतील मुलांना प्रवेश वर्ज; आणि अलीकडील कोणी पलिकडे जाऊ इच्छित नाही, अपवाद फक्त बोराडे सरांचा.
एकदा बोराडे सरांना हीच तरुणाई एक डबड्याबरोबर फुटबॉल खेळताना दिसते, आणि त्यांना या मुलांना परिस्थितीतून, व्यसनातून, चोर्यामार्यातून बाहेर काढण्यासाठी खेळाचा मार्ग दाखवावासा वाटतो. झुंड चित्रपट ह्याच तरुणाईची खेळाच्या माध्यमातून बाहेर पडायची कथा सांगतो. बोराडे सर यात कितपत यशस्वी होतात? ही मुलं त्यांचं कितपत ऐकतात? आपला पीळ सोडून नळीत शेपुट घालतात का? त्यांचा भूतकाळ ते करायची त्यांना मुभा देतो का? त्या भूतकाळाला मागे टाकून येणं खरोखर कितपत शक्य होतं? याची उत्तर चित्रपट पाहुन मिळतीलच.
उच्चवर्गातील, ती ही मुख्यत्त्वे शिक्षक, मुख्याध्यापक अशा प्रौढ व्यक्तींतील आणि या मुलांतील दरी अनेक प्रसंगांत दिसत रहाते. ती समोरासमोर व्यक्त होतेच असं नाही. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागणुकीतून, सर्वसामान्य रुजलेल्या स्टिरिओटाईप्स मधुन ती दिसत रहाते. बर्यापैकी असेच आपण ही कधी ना कधी व्यक्त झालेलोच असतो, त्यात काही चूक आहे हे न सांगता थोडा विचार केला की खजिल होऊन आपलं मन कुरतडत राहिल.... असा खास मंजुळे टच! पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी, वर्गणी, जल्लोश... अशा निरिक्षणात्मक पातळीवर, कधी चक्क डॉक्युमेंटरी प्रकारे पात्रपरिचय करत तर कधी काल्पनिक आणि तरीही वास्तव वाटेल असे प्रसंग घेत चित्रपट पुढे जात रहातो.
नागराज मंजुळेचा चित्रपट आहे, त्यामुळे फँड्री/ सैराटशी तुलना होणे अटळ आहे. तर ज्या प्रमाणे फॅन्ड्री/ सैराट मध्ये नागडं सत्य कसलाही मुलाहिजा न ठेवता धाडकन समोर येते तसं दलित लोकांचे वास्तव इथे धगधगीतपणे पुढे येतच नाही, कदाचित मराठी प्रेक्षकाच्या प्रगल्भतेच्या तुलनेत हिंदीत कितपत धोका पत्करावा असा हेतू असेल. बॉलिवुड मध्ये अशा भूमिका प्रस्थापित कलाकारांकडून ब्राउनफेस/ ब्लॅकफेस करुन करण्याची रुढ परंपरा तर मोडली, पण कथेत रोमँटिसिझम कायम ठेवूनच कथा प्रवास करते.
झोपडपट्टी टीमचा कर्णधार डॉन उर्फ अंकुश मेश्राम ह्या कथेचा नायक. तो साकारला आहे अंकुश गेडाम याने. काय काम केलंय याने! त्याच्या कडून इतकं सहज सुंदर काम करुन घेण्यात मंजुळ्यांचा हात कोण धरणार! चित्रपटात याची पार्श्वकथा उत्तम प्रकारे उभी केली आहेत. त्याच्या पात्राला असलेले कंगोर व्यवस्थित उभे केले आहेत. पण दुर्दैवाने अंकुश सोडून कुठल्याच खेळाडूची बॅक स्टोरी चित्रपटात येत नाही. त्यांचा मनाचा ठाव लागत नाही. एक रझियाची कथा थोडी फार आहे, पण तिच्याही मनाची आंदोलने आणखी हवी होती. तब्बल तीन तासाचा चित्रपट आहे, म्हणून हे जास्तच जाणवतं. इतर पात्र कोण आहेत हे डॉक्युमेंटरी स्टाईल थोडंफार समजतं, पण मंजुळे स्टाईल दृकश्राव्य असतं तर मजा आली असती वाटत रहातं.
अजय- अतुलच्या सैराट मधल्या जादू नंतर इथलं संगीत अगदीच तोकडं वाटलं. 'लफडा झाला' तर झिंगाटची कॉपी वाटते. सुरुवातीचं 'झुंड' छान आहे, पण सैराटचा साऊंड ट्रॅक आठवला की... असो...
असंच सुरुवातीला बोराडे सर त्या फुटक्या डब्या बरोबर फुटबॉल खेळताना बघतात तेव्हा अचानक पाऊस चालू होतो. तो प्रसंग जादुई आहे, पण त्यात व्हिएफएक्स पाऊस आणि त्यात अमिताभच्या चष्म्याच्या काचेवर एक पावसाचा टिपुसही पडत नाही, कपडे, केस भिजणे तर दूरची गोष्ट असल्या चुका का राहिल्यात कोण जाणे. (का माझं काही चुकतंय?)
हिंदीत असे रांगड्या प्रवाहा बाहेरच्या नागड्या व्यक्तिरेखांना घेऊन, त्यांच्यावर मेहेनत करुन, त्यांच्याकडून काम काढून घेऊन चित्रपट फारसे नसतात. त्यामुळे एकुणात चित्रपट आवडला. पण नागराज मंजुळेचा म्हटल्यावर कदाचित फारच जास्त अपेक्षा ठेवून गेलो असेन, त्यामुळे थोडी निराशा झालीच.
अंकुशला ती गोरी मुलगी आवडते ते ठीकच. पण इतर टीम मधल्या मुलींबरोबर कुणी कनेक्ट होईल, संवाद साधेल. एक टीम म्हणून सगळे खेळाडू एकत्र येतील. तर असं काहीच दिसत नाही. सगळ्यांचा पासपोर्ट काढायला जे श्रम लागतात ते दाखवायला जो वेळ दिला आहे, त्यातला थोडा वेळ एक टीम म्हणून उभं रहायला दिला असता तर?
बाकी पूर्ण चित्रपट अनेकदा टिपिकल वळणावर येतो पण टिपिकल न होता काही सकारात्मक संदेश, दृष्टी देऊन जातो. नक्की कुठे ते आणखी लोकांनी बघितला की प्रतिसादांत बोलूच.
तर लोकहो पटपट बघा, म्हणजे वचावचा बोलता येईल. शेवटी मंजुळेचा आहे, त्यामुळे अनेक लहान लहान पात्र, लकबी इ. वर बोलण्यासारखं बरंच आहे.
काही काही मनाला भिडलेले
काही काही मनाला भिडलेले प्रसंग -
अंकुश वाघमारेला मारायचं ठरवून कटर विकत घेतो आणि पोलीस स्टेशनबाहेर जाऊन बसतो. त्याचे मित्र त्याला समजावत असतात तेव्हा आपल्यालापण मनापासून वाटतं की त्याने खून करू नये, परत त्या गर्तेत पडू नये. आपणही मनात म्हणतो की अरे, नको करू खून. मुळशी पॅटर्नमधला तो रेस्टॉरंटचा प्रसंगपण असाच होता.
नंतर सिक्युरिटी चेकला कटरमुळे त्याला अडवतात, तो कटर फेकून देतो, तो प्रसंग तर भारीच आहे, पण मग तो ऑफिसर त्याला परत जायला सांगतो तेव्हा बहुतेक त्याला वाटतं की आपल्याला आता परत पाठवतायत..कटर सापडला म्हणून. पण मग जेव्हा त्याला कळतं की तसं नाही, फक्त मागे जाऊन परत यायचंय, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर परत आनंद दिसतो. तेव्हाही वाईट वाटलं, की त्यांना असे नकार, बंद झालेली दारं बघण्याची सवयच झालेली असते.
रिंकू राजगुरूला पासपोर्ट मिळवण्यासाठी करावी लागलेली धडपड.
भारत मतलब? हा प्रश्न.
शेवटी विमान उडतं तेव्हा Crossing this wall is strictly prohibited. Trespassers will be prosecuted ही ओळ फारच मनात घुसते.
खटकलेल्या गोष्टी- अमिताभ बच्चन नुकताच निवृत्त झालेला, म्हणजे साठीचा वाटत नाही. त्याचा मुलगा अमेरिकेत जाऊन परत का येतो ते कळत नाही. मुलांचे पासपोर्ट झाले पण व्हिसाबद्दल काहीच दाखवलं नाही, विशेषतः अंकुशला तर ऐनवेळेस पासपोर्ट मिळतो. अशा काही गोष्टी.
अभिनय सगळ्यांनी मस्तच केले आहेत. अभिनय करतायत असं वाटतच नाही.
वावे+१
वावे+१
व्हिसा ऑन अरायवल असेल ही सूट देऊ टाकू! वर पाचपाटील म्हणताहेत तसं इतक्या भिडणाऱ्या चित्रपटासाठी दोन पाच चुका माफ. निर्मात्याच्या गणितात बसायला केल्या असं गृहीत धरू. त्याने तसाही गाभ्याला धक्का लागत नाहीच आहे.
त्या आत्महत्या करायला
हो, दोनपाच चुका माफच
त्या आत्महत्या करायला गेलेल्या मुलाचंही बघून असं वाटलं की आत्महत्या करावीशी वाटणाऱ्याने जरा विचार करावा की आपण आत्ता जगलो तर किती काय काय चांगलं होऊ शकतं. भाबडा संदेश असेल, पण हरकत नाही. कुणीही आत्महत्या केल्याची बातमी वाचली की खूप वाईट वाटतं.
अजून एक.. किशोर कदमला 'फँड्री'तल्यासारख्या अजून एखाद्या जबरदस्त भूमिकेत बघायला आवडेल. इथे त्याला त्याच्या क्षमतेच्या मानाने फारसं काही काम नाही. ('न्यूड' मध्ये चक्क त्याला वायाच घालवल्यासारखं काम होतं त्यापेक्षा चांगलं आहे अर्थात)
पॅरेंटल गाईडन्स सांगा...
पॅरेंटल गाईडन्स सांगा... न्यूडिटी सेक्स रक्तपात वगैरे आहे का?
च्रप्स, नाही. फारसा रक्तपात
च्रप्स, नाही. फारसा रक्तपात वगैरे नाही. आम्ही मुलांना घेऊनच गेलो होतो.
न्यूडिटी, सेक्स अजिबात नाही
न्यूडिटी, सेक्स अजिबात नाही.व्हायलन्स आहे थोडाफार पण ग्राफिक रक्तपात दृष्ये मला तरी आठवत नाहीत. यंग एज ची मुले नशा/स्मोक करताना दिसतात मात्र.
अमिताभ खटकण्यावर -
अमिताभ खटकण्यावर -
"सूर्यवंशम मधला "तरूण" अमिताभ चालणार्यांना यातला अमिताभ खटकतो हे आश्चर्यच आहे!"
असे काहीतरी प्रक्षोभक विचारावे मधेच. मग प्रत्यक्षात तो अमिताभ सर्वांनाच खटकला. बहुधा अमिताभला स्वतःलाही. आणि त्यातील म्हातार्या अमिताभपेक्षाही तो म्हातारा दिसला. तरी हरकत नाही. आपण भारी पिंक टाकणे महत्त्वाचे. प्रत्यक्षात लोकांचे मत तसे असो वा नसो. ते तसे आहेच असा आभास निर्माण झाला म्हणजे झाले हा पॅटर्न इतरत्रही दिसेल.
धन्यवाद... आज्जी ला घेऊन
धन्यवाद... आज्जी ला घेऊन जायचा प्लॅन आहे म्हणून पॅरेंटल गायडन्स विचारला...
च्रप्स
च्रप्स
यावरून लहानपणची एक गंमत आठवली!
एकदा लहानपणी मी आणि माझी बहीण टीव्हीवर कुठला तरी पिक्चर बघत होतो. आईबाबा आणि आजी झोपले होते. मधेच आजी उठली बाथरूमला जाऊन यायला. नेमका तेवढ्यात थोड्या वेळाने कदाचित एक 'आक्षेपार्ह' सीन सुरू होणार आहे याचा आम्हाला अंदाज आला. आता अचानक टीव्ही बंद केला तरी आजी विचारणारच, की का बंद केला आणि नेमका तो सीन तिने बघितला, तरी म्हणणार असले कसले सिनेमे बघता वगैरे ती जाऊन आली आणि बसली की आमच्या बरोबर दोन मिनिटं बघायला.. मग आम्ही तिला तू नको बघू, तुला नाही आवडणार वगैरे इतकं आग्रहाने सांगून सांगून झोपायला पाठवलं, की शेवटी दुसऱ्या दिवशी तिने बाबांना हे सांगितलंच.
वा च्रप्स, आज्जी अमेरीकेत आली
वा च्रप्स, आज्जी अमेरीकेत आली आहे हे वाचूनच मज्जा आली.. इथे यायची पहिलीच वेळ असेल तर त्यांचा अनुभव लिहा
बराच उशीर करून हा होईना पण
बराच उशीर करून हा होईना पण पाहिला (झी५). पिक्चर चांगला आहे, सर्वांची कामे मस्त आहेत. पण एकूण चित्रपट माहितीपटाच्या लेव्हलच्या वर उचलला जातच नाही. त्यामुळे खूप सपक वाटतो. दिग्दर्शन, कॅमेरावर्क वगैरे चांगले आहे पण काहीतरी कमतरता जाणवते.
पटकथा व संवाद मात्र अगदीच साधेसुधे व अनेकदा बाळबोध आहेत. "असा सीन आपण पूर्वी पाहिलेला आहे, पण इथे मंजुळेच्या दिग्दर्शनाची कमाल दिसेल" असे सतत वाटत राहते पण प्रत्यक्षात तसे काही होत नाही. अमिताभचा कोर्टातील मोनोलॉगही काही फार खास लिहीलेला नाही. अमिताभ हा "बच्चन" वाटत नाही त्या लॉजिकने त्याचे काम चांगले आहे. पण त्याला आव्हानात्मक फारसे काही नाही इथे.
इतर पात्र कोण आहेत हे डॉक्युमेंटरी स्टाईल थोडंफार समजतं, पण मंजुळे स्टाईल दृकश्राव्य असतं तर मजा आली असती वाटत रहातं. >>> हे मूळ लेखातील वाक्य चपखल आहे. मला तर इव्हन त्या डॉन चे पात्र इतके अपील झाले नाही.
हिंदीत असे रांगड्या प्रवाहा बाहेरच्या नागड्या व्यक्तिरेखांना घेऊन, त्यांच्यावर मेहेनत करुन, त्यांच्याकडून काम काढून घेऊन चित्रपट फारसे नसतात. त्यामुळे एकुणात चित्रपट आवडला. पण नागराज मंजुळेचा म्हटल्यावर कदाचित फारच जास्त अपेक्षा ठेवून गेलो असेन, त्यामुळे थोडी निराशा झालीच. >>> यालाही +१
बाकी प्रतिके वगैरे ठीक. सैराट मधे पडद्यावरचा सीन आधी नुसताही भन्नाट वाटतो. मग लक्षात येते की यातही काही दडलेले आहे. इथे तसे नाही. इतर मराठी पिक्चरप्रमाणे "हे घ्या प्रतीक" म्हणून ते समोर येते. शेवटी विमान उडताना ते कुंपण पार करून जाते हे लोकांना कळू दे. तेथे ती एक कृत्रिम पाटी कशाला? अश्या कोण पाट्या रेसिडेन्शियल एरियाच्या कुंपणांवर लिहीतात? आणि ते ही इंग्रजीत. विशेषतः तेथेच बाजूला गेट असताना?
तेथे आर्ची, परश्या व इतर मित्रमंडळी २०-२५ मिनीटांत आपल्या पूर्ण ओळखीची होतात. इथे जवळजवळ सगळे फेसलेसच राहतात. कदाचित तोच हेतू असेल. पण त्यामुळे आपण कोणाच्याच कथेत फारसे गुंतत नाही.
एकदा बघायला चांगला आहे. पुन्हा बघायला पेशन्स राहील का माहीत नाही.
मुलांचे पासपोर्ट झाले पण
मुलांचे पासपोर्ट झाले पण व्हिसाबद्दल काहीच दाखवलं नाही, >> २०१४ नंतर सर्व देशांचा व्हिसा औन अरायवल आहे , आधी काढावा लागत नाहि
Pages