![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/01/31/GoechaLa-Savit-Kulshreshtha-2-KING-IN-THE-NORTHMt.-KANCHANDZONGA.jpg)
सह्याद्रीत अनेक वर्षे भटकल्यावर आणि १०० च्या वर किल्ले फिरल्यावर हिमालयाचे वेध लागले होते. पण योग काही लवकर येईना. नाही म्हणायला तीन वर्षांपू्वी आमच्या सायकल ग्रुपसोबतच (ओबी, शिरीष इ. इ.) व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंडचा ट्रेक केला. गेली दोन वर्षे तर काय कोरोनानेच खाल्ली. पण गेल्या वर्षी माझा मामेभाऊ अमेय (यालाही तुम्ही ओळखता, कोकण, कोल्हापूर, जंगल भटकंती दरम्यानचा माझा साथी - या सगळ्याच्या लिंका खाली जोडणार आहे ) याने उचल खाल्ली. कुठेतरी जाऊच या म्हणायला लागला. मलाही दोन वर्षे घरात बसून कोंब आलेले. म्हणलं, जावानू तो जावानू, मग घनघोर चर्चा आणि ती पुणे ते गोवा सायकल प्रवासापासून ते ह्षिकेशला जाऊन व्हाईट वॉटर राफ्टिंग, बंजी जंपीग पर्यंत कुठेही सरकत होती.
शेवटी एखादा मस्त हिमालयन ट्रेक करावा या निष्कर्षावर आलो. पण त्यांनतरही काही ठरेना. हर की दुन टाईप्स एखादा सोप्पा ट्रेक करावा का एकदम एव्हरेस्ट बेस कँपसारख्या धनुष्याला हात घालावा हे ठरेना. नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या सुमारास जायचे ठरत होते आणि त्यावेळी फारसे हिमायलन ट्रेक्स नसतील असे वाटत होते पण जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा कळलं की नोव्हेंबर डिसेंबर मध्येही भरपूर हिमायलन ट्रेक्स असतात.
हा नको तो, तो नको हा, इथे जायला सोयीचे नाहीये, हा फारच सोप्पा आहे, हा फारच अवघड वाटतोय असे करत करत अक्षरश डोकी क्रॅक झाली. शेवटी अन्नपूर्णा बेस कँप किंवा गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप या दोनवर येऊन स्थिरावलो. तरीही मनाची खात्री नव्हती आणि मग एक दिवस बसून दे दणादण फोनाफोनी केली.
गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे, एकट्याच्या जीवावर एव्हरेस्ट मोहीम आखून ती यशस्वी करणारा भगवान चावले, सगरमाथाच्या एव्हरेस्ट मोहीमेदरम्यान कँपवर सपोर्ट स्टाफ असेलला माझा मित्र कुशल देशमुख, नाशिकचा अव्वल ट्रेकर राहुल सोनावणे आणि आपला मायबोलीकर हर्पेन. सगळ्यांना माझे दोनच प्रश्न होते, की किती अवघड आहे आणि मला जमेल का. यातले सगळेच जण मला व्यक्तिगतरित्या ओळखत होते. गेल्या तीन चार वर्षात मी एकही ट्रेक केला नव्हता, व्हॅली ऑफ फ्लॉवर तसा फार काही आव्हानात्मक वगैरे वाटला नव्हता. आणि सायकलवरून कन्याकुमारी ते पॉंडीचेरी व्हाया रामेश्वरम केले होते, पण त्यालाही कैक काळ लोटला होता. लॉकडाऊन नंतर अतिप्रचंड शैथिल्य आलेले होते.
सगळ्यांचे हेच म्हणणे पडले अवघड आहे पण अशक्य नाही, व्यवस्थित तयार केलीस तर करु शकशील. राहुल आणि कुशल खुप वर्षांपूर्वी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी अगदी तपशीलवार माहीती दिली. पण नोव्हेंबर मध्ये थंडीने वाट लागेल असेही सांगितले. झिरपे मामा आणि भगवानने सिंहगड चढाई उतराईचा सराव कर म्हणजे रिदम मध्ये येशील असा मोलाचा सल्ला दिला. आता इतक्या दिग्गज मंडळींचे ऐकल्यावर माघार घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे देवाचे नाव घेतले आणि ट्रेक द हिमालयाज संस्थेकडे बुकिंग करून टाकले. ६ नोव्हेंबर रोजी युकसुम पासून ट्रेकची सुरुवात होणार होती.
आता थोडक्यात ट्रेक विषयी -
कांचनजंगा (स्थानिक भाषेत खांगचेंगझुंगा म्हणजे पाच पवित्र, खजिन्याची शिखरे असलेला हिमपर्वत) हा जगातला तिसरा सर्वात उंच पर्वत (८,५८६ मी, २८,१६९ फुट). कांचनजंगाचा भाग ६०३२ चौ किमी एवढा प्रचंड आहे आणि हा भाग भारत, नेपाळ, भूतान, चीन या देशात पसरलेला आहे. कांचनजंगा अभयारण्य म्हणून हा सर्व भाग सुरक्षित आहे. कांचनजंगा बेस कँपला जाण्याचे दोन ट्रेक आहेत. एक नेपाळहून आणि दुसरा सिक्कीमहून. नेपाळमार्गे सोप्पा असला तर खर्चिक आहे. सिक्कीमकडून बेस कँपपर्यंत जायला तब्बल ११ दिवस लागतात आणि एकूण ९० किमी चे प्रचंड चढ उतार पार करावे लागतात. ट्रेक म्हणायला कांचनगंगा बेस कँप म्हणत असले तरी प्रत्यक्षात बेसकँप पर्यंत जात नाही. गोएचला पास इथवरच जाता येते.
युकसुम या सिक्कीम मधल्या गावापासून सुरु होणारा हा ट्रेक ५६७० फुटांवरून पुढे झोंगरी (१३,६०० फुट) आणि गोएचला पास (१५,१०० फुट) वर जाऊन पुन्हा आलेल्या मार्गाने युकसुमला येऊन संपतो. कुमाऊ, गढवाल सारखा इथल्या हिमालयाला पर्यटकांच्या गर्दीचे ग्रहण लागलेले नाही त्यामुळे इथला निसर्ग जास्त लोभसवाणा आहे.पण त्याचबरोबर सोयींचीही वानवा आहे. युकसुमनंतरचा पूर्ण प्रवास हा दऱ्याखोऱ्यातून होतो आणि मुक्काम तंबूतच करावा लागतो. त्यामुळे चार्जिंगला सोकावलेल्या जनतेची प्रचंड कुचंबणा होते. तसेच सामान वाहून नेण्यासाठी खेचर मिळू शकते पण अमरनाथ, कैलास मानस किंवा हेमकुंडसारखे त्यावर बसून जायला नाही. त्यामुळे पूर्ण ट्रेक हा पायीच करावा लागतो.
गोएचला ट्रेकचे अजून दुसरे महत्व म्हणजे हा ट्रेक करताना कांचनजंगाचे सुंदर दर्शन तर होतेच तसेच माऊंट पंडीम आणि इतर उंच अश्या पर्वतांचे दर्शन हा पास करताना होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा ट्रेकिंग साठी तिथला सर्वात चांगला काळ.
टीटीएच च्या साईटवर या ट्रेकची विभागणी मॉडरेट ते डिफिकल्ट मध्ये करण्यात आली आहे आणि त्यासाठी फिटनेस आवश्यकता लागणार असल्याचेही दिसले. तातडीने काय फिटनेस लागेल ते पाहिलं आणि पोटात गोळाच आला. त्यात पहिलीच टेस्ट म्हणजे ४० मिनिटाच्या आत पाच किमी पळणे ही होती. बोंबला. मी तसा अधून मधून रन करतो आणि एकदा हाफ मॅरेथॉन पण पळालो होतो दोन वर्षांपूर्वी पण त्याला आता कैक युगे लोटली आहेत असे वाटत होते आणि मी अतिशय संथ गतीने पळतो, म्हणजे बघणाऱ्यांना कळणारच नाही की मी पळतोय, चालतोय का रांगतोय.
म्हणलं चला आपण कुठे आहोत ते चेक करूया म्हणून लगेच पाच किमी पळायलो गेलो तर जेमतेम ३ च किमी पळू शकलो. तेही निम्मावेळ चालत. झालं कल्याण, मी लगेच अमेयला फोन लावला म्हणलं मला नाही जमणार हा ट्रेक. तो शॉकमध्ये, म्हणे काय झालं, म्हणलं मी जेमतेम ३ किमी पळू शकलोय. तो म्हणे दादा अरे अजून एक महिना आहे आपल्याला जायला तोवर हळूहळू कर तयारी. पण मला माझी काही खात्रीच वाटेना.
एक दोन दिवस तसेच जाऊ दिले, थोडाफार व्यायाम, सूर्यनमस्कार घातले आणि परत एकदा रन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ४ किमी वर थांबलो. परत एक दिवस ब्रेक घेऊन पुन्हा एकदा पळालो आणि एकदाचे ५ किमी पूर्ण झाले आणि वेळ लागला ४९ मिनिटे. हायला, आता ही जास्तीची ९ मिनिटे कशी कमी करायची. पुन्हा एकदा अमेयला फोन, परत त्याने पेप टॉक देऊन मनाला उभारी आणली.
म्हणलं हे रनिंग काय आपल्या कपातला चहा नाही. आपण ट्रेकर आहोत तर ट्रेक करून स्टॅमिना वाढवू म्हणून सिंहगडला जायचे ठरवले. आणि त्याच दरम्यान झाली सपाटून सर्दी, घशात कफ साचला की बोलणे अशक्य व्हायला लागले. पण आता ठरवलं आहे तर माघार नको म्हणून शनी-रवि हे गर्दीचे वार टाळून सोमवारी सिंहगडला गेलो. सुरुवात तर व्यवस्थित झाली पण जिथे चढ खरा सुरु होतो तिथे फाफललो. विचार होता ५० मिनिटात होईल आपला. प्रत्यक्षात ४५ व्या मिनिटाला मी निम्मा गडही नव्हतो चढलो. ऑड दिवस असल्याने कुणीही नव्हते एकदम शांतता आणि त्याचवेळी मला जाम कफ साचून आला. इतका की श्वास घेता येईना, छातीवर प्रचंड दडपण आले. मला फुल्ल टेन्शन म्हणलं मला इथे हार्ट अटॅक आला आणि मी मेलो तर घरच्यांना कधी कळणार. मग ते टायमिंग गेले (फुल्या फुल्या) म्हणत बसलो, पाणी प्यायलो आणि श्वास नॉर्मलला येईपर्यंत वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकत बसलो. नॉर्मलला आल्यावर परत एकदा चालू लागलो आणि कसेतरी मरत मरत वरपर्यंत पोचलो. वेळ लागला दिड तास. अगदीच भिकार कामगिरी. तिथे रेंज नव्हती नैतर तिथूनच परत अमेयला फोन गेला असता.
नंतर नंतर मी त्याला इतका पिडला की मी काही हा ट्रेक पूर्ण करणार नाही, निम्म्या वाटेत झोंगरी येथे थांबेन तुम्ही परत येताना तुमच्यासोबत परत येईन इथवर सांगून झाले. अर्थात बोलत असलो तरी प्रयत्न सोडले नव्हते. नेमाने रनिंग, पायाचे व्यायाम, टेकडी चढणे आणि दर आठवड्याला कितीही कंटाळा आला तरी सिंहगड. दरम्यान झिरपे मामांना भेटायला गेलो.
आता या व्यक्तीबद्दल थोडं सांगितले पाहिजे. उमेश झिरपे यांनी माऊंट एव्हरेस्टसह जगातील आठ अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. अशा या आठ अष्टहजारी मोहिमांचे नेतृत्व करून त्या मोहीमा यशस्वी करणारे गिर्यारोहक उमेश झिरपे हे भारतातील एकमेव मोहीम नेते आहेत. त्यांच्या बद्दल खूप काही लिहीता येईल पण एक गोष्ट मनाला भिडली ती म्हणजे त्यांच्या एव्हरेस्टच्या मोहीमेदरम्यान खराब वातावरणामुळे कँप ३ वर जास्त काळ राहावे लागणार ही गोष्ट स्पष्ट झाली आणि विचित्र परिस्थिती ओढवली. तुकडीतील सर्वांना जास्तीचे दिवस पुरेल इतके ऑक्सिजन सिलेंडर सोबत नव्हते आणि खाली बेस कँपवर येऊन परत घेऊन जाणेही शक्य नव्हते. अशा वेळी झिरपे मामांनी आपल्या वाटचे सिलेंडर आपल्या युवा सहकाऱ्यांकडे दिले आणि एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न शक्य असताना अतिशय मोठ्या मनाने ते बेस कँपला परतले. इतक्या वर्षांची मेहनत, आर्थिक, शारिरिक अडथळे पार करून इथवर आल्यावर इतक्या दिलदारपणे हक्क सोडून द्यायला खरेच खूप मोठे काळीज लागते.
तर त्यांनी सगळी माहीती वगैरे घेतली आणि थंडीची काय तयारी केली आहेस विचारलं. खरं सांगायचे तर मी काहीच तयारी केली नव्हती. कारण तसा काही अंदाजच नव्हता किती असेल थंडी याचा. मी आपले स्वेटर आणि एक जाकिट वगैरे नेऊ असले काहीतरी थातूरमातूर उत्तर दिले. मग त्यांच्या लक्षात आले की माझी शून्य तयारी आहे. म्हणाले तिथे मायनस मध्ये असणारे तापमान आणि पुरेशी तयारी न करता गेलास तर आजारी पडशील, ट्रेक सोडून परत यावं लागेल. हायला मी बिचकलोच हे ऐकून. मग त्यांनी त्यांच्याकडचा थर्मलचा एक सेट, ग्लोव्ज आणि एक डाऊन फेदर जॅकेट दिले. शिवाय त्यांच्या नेहमीच्या वापरातली ट्रेकिंग सॅक (खरे तर तिच घ्यायला म्हणून मी गेलो होतो कारण माझ्याकडे इतकी मोठी सॅकच नव्हती. आपल्या सह्याद्रीत इतक्या मोठ्या सॅक कधी लागतच नाही आणि नव्या सॅक पाच सहा हजार वगैरे ला होत्या) आणि ट्रेकिंग पोल दिले. मला ते घेताना अक्षरश लाजल्यासारखेच झाले. मी काय असा मोठा पराक्रम वगैरे करायला चाललो नव्हतो पण मी चाललोय याचा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाल्याचे जाणवत होते.
त्यांनी विचारले सिंहगड करतोय ना, म्हणलं हो हो, तर म्हणे किती वेळात, म्हणलं तेवढं विचारू नका. म्हणे करत रहा सवय झाली की होईल. आणि मी तो सल्ला मानल्याचा खरेच खूप फायदा झाला. पुढच्या तीन आठवड्यात नेमाने सिंहगड वारी करत राहीलो. ट्रेकिंग पोल हाही एक नवा प्रकार माझ्या मदतीला आला होता. खरे तर नुसती काठी, पण तिच्या व्यवस्थित वापराने गुढग्यांवर येणारा ताण बराच कमी होतो. हे अधीच का नाही वापरले असे झाले मला. आणि त्याने वेगात चढताही यायला लागले. पहिल्या वेळेपेक्षा बऱ्याच कमी वेळात चढून व्हायला लागला सिंहगड.
नंतर एकदा खच्चून भरलेली सॅक घेऊन पण सिंहगड केला. त्यावेळी एक काकू-ताई भेटल्या. त्यांनी माझे शूज, सॅक आणि पोल बघून ओळखलंच. म्हणे कुठल्या मोहीमेची तयारी. मग सगळे सांगितले तर म्हणाल्या पहिल्यांदाच हिमालयन ट्रेक करणार असला तर अजिबात न लाजता खेचर करा सामानासाठी. इतके वजन घेऊन एक दोन दिवस उत्साहात चालतो नंतर पार जीव जातो. एकदा तुम्हाला तुमच्या फिटनेस चा अंदाज आला की मग पुढचे ट्रेक तुम्ही ठरवू शकाल किती वजन घेऊन चालायचे. आणि हाही सल्ला मानला आणि त्याचाही अफाट फायदा झाला. त्या मायबोलीवर असल्या तर मला मनापासून त्यांना धन्यवाद म्हणयाचे आहे. कारण त्या गडबडीत मी त्यांचे नाव विचारायचे विसरलो.
दरम्यान रन पण करत होतोच. रनिंगच्या मित्रांनाही पिडून झाले की ४० मिनिटांच्या आत ५ किमी करायचे आहेत काय करू. ते म्हणाले ती काय जादूची छडी नाही, सराव आणि व्यायामाने आपोआप वाढेल पेस, घाई करू नको. म्हणलं आठवड्यावर ट्रेक आलाय आता नाही तर कधी करू घाई. पण ४९ वरून जवळजवळ ४२ मिनिटांवर आणली होती वेळ. म्हणलं ठिके अगदी काठावर नापास. नेऊ रेटून कसे तरी. आणि ट्रेक होईपर्यंत मला एकदाही ४० मिनिटांच्या आत जमले नाही.
त्यामुळे शेवटपर्यंत मला हा ट्रेक काही जमणार नाही. उगाच उत्साहाच्या भरात पैसे भरले आणि आता ते वाया जाणार आणि अर्धवट ट्रेक करून येण्याची नामुष्की ओढवणार असेच वाटत होते. पण आता आलीया भोगासी म्हणत सामान प्रचंड सॅकमध्ये भरले आणि मुंबईला जायला निघालो. आम्ही मुंबईवरून दुरान्तोने कोलकता, तिथे एक दिवस मुक्काम करून दुसरे दिवशी ट्रेननेच रात्रभराचा प्रवास करून पहाटे न्यू जयपायगुरी स्टेशन गाठणार होतो. तिथे आम्हाला टीटीएच्या जीप येणार होत्या. हा प्रवास ट्रेक इतकाच भन्नाट झाला आणि त्यात काय गोंधळ गमतीजमती झाल्या ते पुढच्या भागात लिहीतो.
हेडरमध्ये दिलेला फोटो माझा नसून आंतरजालावरून घेतला आहे. माझा इतका सुंदर फोटो कुणी काढलाच नाही
त्याच्या खालचा फोटो मात्र मी काढला आहे
वा आशुचॅंप, जबरदस्त अनुभव
वा आशुचॅंप, जबरदस्त अनुभव असेल.. गेल्यावर्षीपासून माझ्याही मनात आहे एव्हरेस्ट बेसकॅंप करायचं.. ह्या एप्रिलचा विचार केलेला.. तयारीही सुरू आहे पण जी मैत्रिण बरोबर येणार होती तीने टांग दिलीए.. आता पुढच्या एप्रिलपर्यंत कोणी भेटतंय का ह्याची वाट बघायची.. कोणीच नसेल तर नवऱयालाच तयार करेन.. पण तो लास्ट ॲाप्शन
कोणीच नसेल तर नवऱयालाच तयार
कोणीच नसेल तर नवऱयालाच तयार करेन.. पण तो लास्ट ॲाप्शन>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा हा हा, जबराट
मलाही करायचा आहे पण खर्चिक असल्याने मनाला आवर घातलाय
पीन पार्वती, फ्रेंडशीप पीक असेही काय काय डोक्यात आहे
करून या मस्त आणि इथे लेखमालिका सुरू करा
हा धागा गेल्यावर्षी वाचलेला..
हा धागा गेल्यावर्षी वाचलेला.. त्यांचाच प्लॅन ढापलेला.. छान माहिती दिली होती
https://www.maayboli.com/node/42302
जबरदस्त तुमचं लिखाण खूप आवडतं
जबरदस्त
तुमचं लिखाण खूप आवडतं
हा माझा मित्रच आहे, पण त्याने
हा माझा मित्रच आहे, पण त्याने करून आता कैक वर्षे उलटली आहेत, खूप काही बदलले आहे आता
बघू तुम्ही तुमचा प्लॅन कळवा, जर देवाच्या मनात आले आणि सगळे कौटुंबिक आणि आर्थिक पत्ते पिसून झाले तर मी होईन जॉईन
आयुष्यात एकदा तरी करायचा आहे हा ट्रेक
धन्यवाद आईची लेक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी नाव आहे हे
अरे भारीच! आम्ही आपले गंगटोक
अरे भारीच! आम्ही आपले गंगटोक हून दूरून कांचनजंगा पाहिलेले. इतका ट्रेक करून जाण्यासाठी बरीच तयारी करावी लागेल. बहुतेक पहिली ५ किमीची चाचणी तरी पार करतोय सध्या पण बाकी आनंद आहे
तुम्हाला सलाम!! पुलेशु
मस्तच लिहीले आहे. तुमचा
मस्तच लिहीले आहे. तुमचा प्रामणिकपणा खुपच आवडला. तुमच्या लिहीण्याच्या शैलीमुळे अगदी तोंडातुन सगळ ऐकतो आहोत व डोळ्यासमोर सगळ घडत आहे असच वाटत. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
(अमेरिकेतच माझ्या विशीपासुन आयुष्य गेल्यामुळे हिमालयात ट्रेक करायचे भाग्य कधी माझ्या नशीबी आले नाही पण अमेरिकेतल्या लेजेंडरी हाइक्स/ ट्रेकपैकी ग्रँड कॅनिअनची ब्राइट एंजल ट्रेक व झायन नॅशनल पार्क मधली एंजल्स लँडींग ट्रेक करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. त्यातली भयानक एंजल्स लँडींग ट्रेक आत्ताच ६ महिन्यांपुर्वी केली. त्याबद्दल लिहायचा विचार आहे. बघुयात. )
लिखाण फारच छान. हेवा वाटतो
लिखाण फारच छान. हेवा वाटतो हे असलं काही वाचलं की. गिर्यारोहण कधीच केलं नाही. नाही म्हणायला चालणं मात्र नियमित होत होतं. आणि वैष्णोदेवी( जाऊन येऊन २८ किलोमीटर ) भुतान मधलं टायगर्स नेस्ट वगैरे फुटकळ चढउतार भटकंतीमध्ये केली तेव्हढीच. मग यूथ हॉस्टेलच्या चंद्रखनी सारख्या सफरींना मुलांना पाठवून थोडेसे समाधान मिळवले.
पुढचे भाग लिहा लवकर.
झायन नॅशनल पार्क मधली एंजल्स
झायन नॅशनल पार्क मधली एंजल्स लँडींग ट्रेक >> मुकुंद हे मी पण केलंय सात वर्षांपूर्वी.. आता तसे ट्रेक्स करण्याचं धाडस राहीलं नाही .. पण बेसकॅंप ट्रेक करू शकेन असं वाटतंय
बघू तुम्ही तुमचा प्लॅन कळवा, जर देवाच्या मनात आले आणि सगळे कौटुंबिक आणि आर्थिक पत्ते पिसून झाले तर मी होईन जॉईन >> हो नक्की.. तुमचाही काही प्लॅन होत असेल तर कळवा.
खूप छान लिहिले आहे. फोटो अजून
खूप छान लिहिले आहे. फोटो अजून हवे होते. पुभाप्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त सुरुवात!
मस्त सुरुवात!
इथे हे अवांतर होइल, सॉरी
इथे हे अवांतर होइल, सॉरी आशुचँप.. पण म्हाळसा एंजल्स लँडींग करुन आली अस म्हणाली म्हणुन (म्हाळसा, शेवटचा ” चेन सेक्शन“ पण केला का? डोक्याला गो प्रो लावुन मी वरपर्यंत गेलो तर खर पण तो सेक्शन सुरु करुन थोडेच वर गेलो आणी मग मात्र “ झक मारली” आणी हा सेक्शन सुरु केला अस झाल. पण तो सेक्शन एवढा नॅरो व तोबा गर्दीचा होता व परत मागे फिरणे कठिण होत. जीव मुठीत घेउन वरपर्यंत गेलो आणी जाउन जिवंत परत आलो हे मी माझे भाग्य समजतो. त्या जिवघेण्या ट्रेकबद्दल लिहीलेच पाहीजे आता)
सरांनंतर आता माझा नंबर का?
सरांनंतर आता माझा नंबर का? Happy![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठं ही लोकं कुठं आम्ही पामर >> एक पुणेकर दुसर्या पुणेकराच्या वाटेला जात नाही.
ग्रेट एक्प्लोरर्स, अंटार्किटिक एक्स्पिडिशन्स, रीडर्स डायजेस्टची अॅडव्हेन्चर्स सिरीज वाचताना जो अनुभव येतो तसेच वाटते तुमच्या मालिका वाचताना. मी स्वतः औलीला २० किलो ओझे घेऊन १४००० फूट चढलो आहे. तिथे इन्स्टीट्यूटच आहे. तिथे मला बचेंद्री पाल भेटल्या. माझ्यापेक्षा वयाने कितीतरी जास्त असून माझ्यापेक्षा कितीतरी भराभर वर चालत होत्या. नीळकंठ एक्स्पेडिशन ऐन वेळी रद्द झाल्याने स्वर्गाच्या शिड्यांचा ट्रेक केला होता.
अंटार्क्टिकाला रशियन टीमसोबत गेलो होतो. रशियन स्टेशनपासून मैत्री पाच किमी आहे. तिथे चालत जाऊन आलेलो. पण या मोहिमेदरम्यान भारत सरकार आणि रशियन टीमसोबत झालेल्या करारानुसार मला कुठेही अनुभव लिहीण्यास, फोटो प्रसिद्ध करण्यास मनाई आहे. खरे तर त्यात माझे कौशल्य शून्य होते. जहाजावरून जायचे. समुद्रातून थेट हेलिकॉप्टर आणि येताना स्नो स्कूटर. कस असा लागलाच नाही.
आशुचँप >> मस्त. सरांना सोडुन
आशुचँप >> मस्त. सरांना सोडुन इकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुकुंद अवांतर नक्कीच नाही. तुमच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत
धन्यवाद सर्वांना, आज पुढचा
धन्यवाद सर्वांना, आज पुढचा भाग टाकतो
त्या जिवघेण्या ट्रेकबद्दल लिहीलेच पाहीजे आता>>>
अगदी लिहा, याबद्दल अजिबातच काही माहिती नाही
नाही म्हणायला भाऊ ऍरिझोना मध्ये आहे त्याने ग्रँड कनियन चे काही ट्रेक केलेत पण याबद्दल कधिऐकेल नाही
शांत माणूस - अहो कुठं होता इतके दिवस, हे अद्भुत आहे, तुम्हाला एकदा आता सवड काढून भेटलंच पाहिजे, मी संपर्कातून फोन नंबर कळवतो, अंटार्क्टिका मोहीम म्हणजे अगदीच बाप
नमस्कार स्वीकारावा
अंटार्क्टिका मोहीम म्हणजे
अंटार्क्टिका मोहीम म्हणजे अगदीच बाप >> नाही हो दादा, दुसर्यांनी आखलेली मोहीम, सगळ्या सुख सुविधा प्रवासाच्या. आपण तिथे काम करायला जाणार. यात काही विशेष नाही. अॅम्युण्डसेनची मोहीम वाचा. डोळ्यात पाणी येतं.
शीतल महाजनची मोहीम बाप होती.
अमुंडसेन ची वाचली आहे मोहीम
अमुंडसेन ची वाचली आहे मोहीम
आणि एडमंड हिलरी ची पण
शीतल महाजन ची मुलाखत पण मी घेतली होती तेव्हा मी लोकसत्ता साठी, पण खरे सांगायचे तर त्यात फार विलक्षण वगैरे नाही वाटलं, म्हणजे वेगळी वाट आणि खर्च सोडला तर तसे काही ग्रेट नाही वाटलं
अर्थात हे माझं वैयक्तिक मत
शीतल महाजन ची मुलाखत पण मी
शीतल महाजन ची मुलाखत पण मी घेतली होती तेव्हा मी लोकसत्ता साठी, >>> ग्रेट !!
म्हाळसा, शेवटचा ” चेन सेक्शन“
म्हाळसा, शेवटचा ” चेन सेक्शन“ पण केला का? डोक्याला गो प्रो लावुन मी वरपर्यंत गेलो तर खर पण तो सेक्शन सुरु करुन थोडेच वर गेलो आणी मग मात्र “ झक मारली” आणी हा सेक्शन सुरु केला अस झाल. पण तो सेक्शन एवढा नॅरो व तोबा गर्दीचा होता व परत मागे फिरणे कठिण होत. जीव मुठीत घेउन वरपर्यंत गेलो आणी जाउन जिवंत परत आलो हे मी माझे भाग्य समजतो. त्या जिवघेण्या ट्रेकबद्दल लिहीलेच पाहीजे आता) >>>>>
माझ्या भावाने आणि वहिनीने ह्या ट्रेक नंतर पॅाकेटकंपास नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं.. हाल्फ डोमची ट्रेकही त्याने पूर्ण केली. पण मी मुलं झाल्यापासून असे ट्रेक्स करत नाही.
मी ती संपूर्ण ट्रेक केली आहे.. सकाळी सातलाच सुरूवात केलेली त्यामुळे फार गर्दी नव्हती.. आधी चेन सेक्शन बघून पोटात गोळा आलेला.. तो कसा तरी पूर्ण केला.. पण चेन सेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा दगड येतो.. तो सगळ्यात डेंजरस होता.. ह्या ट्रेकला जाण्यापूर्वीपर्यंत मी कधीच ट्रेकला जाण्याआधी त्या जागेचे व्हिडीओ बघत नव्हते.. पण ह्या ट्रेक नंतर आता कुठेही जाण्यापूर्वी व्हिडीओ बघूनच जाते
हा लेख आणि लोकांच्या
हा लेख आणि लोकांच्या प्रतिक्रिया वाचून माझ्या एकमेव Himalayan expedition च्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक वर्षांपूर्वी मणीमहेश लेक चा ट्रेक केला होता (१३,००० फूट). मला वाटतं सगळं मिळून दोन आठवड्याचा कालावधी होता, त्यातला ट्रेक ९ दिवसाचा होता. आशु आणि इतर मंडळी जी ह्या मोहिमा वारंवार करतात त्यांना हॅट्स-ऑफ!!
मस्त लेख. सध्या इथे फार थंडी
मस्त लेख. सध्या इथे फार थंडी आहे म्हणून ट्रेक नाही करता येणार, पण हे वाचून बरे वाटले.
भगवान चावले माझे NCC मध्ये सिनियर होते
जर Endurance वाचले असेल तर, यावर्षी नवीन मोहीम काढली आहे ते हरवलेले जहाज शोधायला.
https://endurance22.org/
पुलेशु
हे असं काही करणार्यांबद्दल
हे असं काही करणार्यांबद्दल नितांत आदर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिखाण नेहेमीप्रमाणे.... तुमची सायकलची लेखमाला पण वाचली आणि आवडली होती.
पहिला फोटो प्रचंड आवडला...
पहिला फोटो प्रचंड आवडला...
लेख नेहमी प्रमाणे मस्तच
पहिल्या फोटोने माहौल तयार
पहिल्या फोटोने माहौल तयार झाला आणि लेख वाचताना तुमच्या बरोबर सर्व अनुभवत आहे असे वाटले! आता पुढचा भाग वाचते. कुटुंबात काही हिमालयवेडे आहेत त्यांना हा लेख पाठवते!
तुमच्या सारख्या साहसी आणि भटकंतीप्रिय लोकांबद्दल भरपूर आदर आहे! असे लेख वाचून तो वाढता राहतो!
मस्त सुरुवात..
मस्त सुरुवात..
पहिला फोटो भन्नाटच आहे.
छान लिहीलं आहे.
छान लिहीलं आहे.
हा असा दुर्गभ्रमण गृप माहितीच नव्हता. भटकंती शोधायला गेले आणि इकडे बरच काही सापडलं.
गोएचला माझ्याही ट्रेकिंग विशलिस्ट मध्ये आहे.
जरूर करा, खुपच सुंदर ट्रेक
जरूर करा, खुपच सुंदर ट्रेक आहे हा
Pages