सह्याद्रीत अनेक वर्षे भटकल्यावर आणि १०० च्या वर किल्ले फिरल्यावर हिमालयाचे वेध लागले होते. पण योग काही लवकर येईना. नाही म्हणायला तीन वर्षांपू्वी आमच्या सायकल ग्रुपसोबतच (ओबी, शिरीष इ. इ.) व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंडचा ट्रेक केला. गेली दोन वर्षे तर काय कोरोनानेच खाल्ली. पण गेल्या वर्षी माझा मामेभाऊ अमेय (यालाही तुम्ही ओळखता, कोकण, कोल्हापूर, जंगल भटकंती दरम्यानचा माझा साथी - या सगळ्याच्या लिंका खाली जोडणार आहे ) याने उचल खाल्ली. कुठेतरी जाऊच या म्हणायला लागला. मलाही दोन वर्षे घरात बसून कोंब आलेले. म्हणलं, जावानू तो जावानू, मग घनघोर चर्चा आणि ती पुणे ते गोवा सायकल प्रवासापासून ते ह्षिकेशला जाऊन व्हाईट वॉटर राफ्टिंग, बंजी जंपीग पर्यंत कुठेही सरकत होती.
शेवटी एखादा मस्त हिमालयन ट्रेक करावा या निष्कर्षावर आलो. पण त्यांनतरही काही ठरेना. हर की दुन टाईप्स एखादा सोप्पा ट्रेक करावा का एकदम एव्हरेस्ट बेस कँपसारख्या धनुष्याला हात घालावा हे ठरेना. नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या सुमारास जायचे ठरत होते आणि त्यावेळी फारसे हिमायलन ट्रेक्स नसतील असे वाटत होते पण जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा कळलं की नोव्हेंबर डिसेंबर मध्येही भरपूर हिमायलन ट्रेक्स असतात.
हा नको तो, तो नको हा, इथे जायला सोयीचे नाहीये, हा फारच सोप्पा आहे, हा फारच अवघड वाटतोय असे करत करत अक्षरश डोकी क्रॅक झाली. शेवटी अन्नपूर्णा बेस कँप किंवा गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप या दोनवर येऊन स्थिरावलो. तरीही मनाची खात्री नव्हती आणि मग एक दिवस बसून दे दणादण फोनाफोनी केली.
गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे, एकट्याच्या जीवावर एव्हरेस्ट मोहीम आखून ती यशस्वी करणारा भगवान चावले, सगरमाथाच्या एव्हरेस्ट मोहीमेदरम्यान कँपवर सपोर्ट स्टाफ असेलला माझा मित्र कुशल देशमुख, नाशिकचा अव्वल ट्रेकर राहुल सोनावणे आणि आपला मायबोलीकर हर्पेन. सगळ्यांना माझे दोनच प्रश्न होते, की किती अवघड आहे आणि मला जमेल का. यातले सगळेच जण मला व्यक्तिगतरित्या ओळखत होते. गेल्या तीन चार वर्षात मी एकही ट्रेक केला नव्हता, व्हॅली ऑफ फ्लॉवर तसा फार काही आव्हानात्मक वगैरे वाटला नव्हता. आणि सायकलवरून कन्याकुमारी ते पॉंडीचेरी व्हाया रामेश्वरम केले होते, पण त्यालाही कैक काळ लोटला होता. लॉकडाऊन नंतर अतिप्रचंड शैथिल्य आलेले होते.
सगळ्यांचे हेच म्हणणे पडले अवघड आहे पण अशक्य नाही, व्यवस्थित तयार केलीस तर करु शकशील. राहुल आणि कुशल खुप वर्षांपूर्वी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी अगदी तपशीलवार माहीती दिली. पण नोव्हेंबर मध्ये थंडीने वाट लागेल असेही सांगितले. झिरपे मामा आणि भगवानने सिंहगड चढाई उतराईचा सराव कर म्हणजे रिदम मध्ये येशील असा मोलाचा सल्ला दिला. आता इतक्या दिग्गज मंडळींचे ऐकल्यावर माघार घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे देवाचे नाव घेतले आणि ट्रेक द हिमालयाज संस्थेकडे बुकिंग करून टाकले. ६ नोव्हेंबर रोजी युकसुम पासून ट्रेकची सुरुवात होणार होती.
आता थोडक्यात ट्रेक विषयी -
कांचनजंगा (स्थानिक भाषेत खांगचेंगझुंगा म्हणजे पाच पवित्र, खजिन्याची शिखरे असलेला हिमपर्वत) हा जगातला तिसरा सर्वात उंच पर्वत (८,५८६ मी, २८,१६९ फुट). कांचनजंगाचा भाग ६०३२ चौ किमी एवढा प्रचंड आहे आणि हा भाग भारत, नेपाळ, भूतान, चीन या देशात पसरलेला आहे. कांचनजंगा अभयारण्य म्हणून हा सर्व भाग सुरक्षित आहे. कांचनजंगा बेस कँपला जाण्याचे दोन ट्रेक आहेत. एक नेपाळहून आणि दुसरा सिक्कीमहून. नेपाळमार्गे सोप्पा असला तर खर्चिक आहे. सिक्कीमकडून बेस कँपपर्यंत जायला तब्बल ११ दिवस लागतात आणि एकूण ९० किमी चे प्रचंड चढ उतार पार करावे लागतात. ट्रेक म्हणायला कांचनगंगा बेस कँप म्हणत असले तरी प्रत्यक्षात बेसकँप पर्यंत जात नाही. गोएचला पास इथवरच जाता येते.
युकसुम या सिक्कीम मधल्या गावापासून सुरु होणारा हा ट्रेक ५६७० फुटांवरून पुढे झोंगरी (१३,६०० फुट) आणि गोएचला पास (१५,१०० फुट) वर जाऊन पुन्हा आलेल्या मार्गाने युकसुमला येऊन संपतो. कुमाऊ, गढवाल सारखा इथल्या हिमालयाला पर्यटकांच्या गर्दीचे ग्रहण लागलेले नाही त्यामुळे इथला निसर्ग जास्त लोभसवाणा आहे.पण त्याचबरोबर सोयींचीही वानवा आहे. युकसुमनंतरचा पूर्ण प्रवास हा दऱ्याखोऱ्यातून होतो आणि मुक्काम तंबूतच करावा लागतो. त्यामुळे चार्जिंगला सोकावलेल्या जनतेची प्रचंड कुचंबणा होते. तसेच सामान वाहून नेण्यासाठी खेचर मिळू शकते पण अमरनाथ, कैलास मानस किंवा हेमकुंडसारखे त्यावर बसून जायला नाही. त्यामुळे पूर्ण ट्रेक हा पायीच करावा लागतो.
गोएचला ट्रेकचे अजून दुसरे महत्व म्हणजे हा ट्रेक करताना कांचनजंगाचे सुंदर दर्शन तर होतेच तसेच माऊंट पंडीम आणि इतर उंच अश्या पर्वतांचे दर्शन हा पास करताना होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा ट्रेकिंग साठी तिथला सर्वात चांगला काळ.
टीटीएच च्या साईटवर या ट्रेकची विभागणी मॉडरेट ते डिफिकल्ट मध्ये करण्यात आली आहे आणि त्यासाठी फिटनेस आवश्यकता लागणार असल्याचेही दिसले. तातडीने काय फिटनेस लागेल ते पाहिलं आणि पोटात गोळाच आला. त्यात पहिलीच टेस्ट म्हणजे ४० मिनिटाच्या आत पाच किमी पळणे ही होती. बोंबला. मी तसा अधून मधून रन करतो आणि एकदा हाफ मॅरेथॉन पण पळालो होतो दोन वर्षांपूर्वी पण त्याला आता कैक युगे लोटली आहेत असे वाटत होते आणि मी अतिशय संथ गतीने पळतो, म्हणजे बघणाऱ्यांना कळणारच नाही की मी पळतोय, चालतोय का रांगतोय.
म्हणलं चला आपण कुठे आहोत ते चेक करूया म्हणून लगेच पाच किमी पळायलो गेलो तर जेमतेम ३ च किमी पळू शकलो. तेही निम्मावेळ चालत. झालं कल्याण, मी लगेच अमेयला फोन लावला म्हणलं मला नाही जमणार हा ट्रेक. तो शॉकमध्ये, म्हणे काय झालं, म्हणलं मी जेमतेम ३ किमी पळू शकलोय. तो म्हणे दादा अरे अजून एक महिना आहे आपल्याला जायला तोवर हळूहळू कर तयारी. पण मला माझी काही खात्रीच वाटेना.
एक दोन दिवस तसेच जाऊ दिले, थोडाफार व्यायाम, सूर्यनमस्कार घातले आणि परत एकदा रन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ४ किमी वर थांबलो. परत एक दिवस ब्रेक घेऊन पुन्हा एकदा पळालो आणि एकदाचे ५ किमी पूर्ण झाले आणि वेळ लागला ४९ मिनिटे. हायला, आता ही जास्तीची ९ मिनिटे कशी कमी करायची. पुन्हा एकदा अमेयला फोन, परत त्याने पेप टॉक देऊन मनाला उभारी आणली.
म्हणलं हे रनिंग काय आपल्या कपातला चहा नाही. आपण ट्रेकर आहोत तर ट्रेक करून स्टॅमिना वाढवू म्हणून सिंहगडला जायचे ठरवले. आणि त्याच दरम्यान झाली सपाटून सर्दी, घशात कफ साचला की बोलणे अशक्य व्हायला लागले. पण आता ठरवलं आहे तर माघार नको म्हणून शनी-रवि हे गर्दीचे वार टाळून सोमवारी सिंहगडला गेलो. सुरुवात तर व्यवस्थित झाली पण जिथे चढ खरा सुरु होतो तिथे फाफललो. विचार होता ५० मिनिटात होईल आपला. प्रत्यक्षात ४५ व्या मिनिटाला मी निम्मा गडही नव्हतो चढलो. ऑड दिवस असल्याने कुणीही नव्हते एकदम शांतता आणि त्याचवेळी मला जाम कफ साचून आला. इतका की श्वास घेता येईना, छातीवर प्रचंड दडपण आले. मला फुल्ल टेन्शन म्हणलं मला इथे हार्ट अटॅक आला आणि मी मेलो तर घरच्यांना कधी कळणार. मग ते टायमिंग गेले (फुल्या फुल्या) म्हणत बसलो, पाणी प्यायलो आणि श्वास नॉर्मलला येईपर्यंत वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकत बसलो. नॉर्मलला आल्यावर परत एकदा चालू लागलो आणि कसेतरी मरत मरत वरपर्यंत पोचलो. वेळ लागला दिड तास. अगदीच भिकार कामगिरी. तिथे रेंज नव्हती नैतर तिथूनच परत अमेयला फोन गेला असता.
नंतर नंतर मी त्याला इतका पिडला की मी काही हा ट्रेक पूर्ण करणार नाही, निम्म्या वाटेत झोंगरी येथे थांबेन तुम्ही परत येताना तुमच्यासोबत परत येईन इथवर सांगून झाले. अर्थात बोलत असलो तरी प्रयत्न सोडले नव्हते. नेमाने रनिंग, पायाचे व्यायाम, टेकडी चढणे आणि दर आठवड्याला कितीही कंटाळा आला तरी सिंहगड. दरम्यान झिरपे मामांना भेटायला गेलो.
आता या व्यक्तीबद्दल थोडं सांगितले पाहिजे. उमेश झिरपे यांनी माऊंट एव्हरेस्टसह जगातील आठ अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. अशा या आठ अष्टहजारी मोहिमांचे नेतृत्व करून त्या मोहीमा यशस्वी करणारे गिर्यारोहक उमेश झिरपे हे भारतातील एकमेव मोहीम नेते आहेत. त्यांच्या बद्दल खूप काही लिहीता येईल पण एक गोष्ट मनाला भिडली ती म्हणजे त्यांच्या एव्हरेस्टच्या मोहीमेदरम्यान खराब वातावरणामुळे कँप ३ वर जास्त काळ राहावे लागणार ही गोष्ट स्पष्ट झाली आणि विचित्र परिस्थिती ओढवली. तुकडीतील सर्वांना जास्तीचे दिवस पुरेल इतके ऑक्सिजन सिलेंडर सोबत नव्हते आणि खाली बेस कँपवर येऊन परत घेऊन जाणेही शक्य नव्हते. अशा वेळी झिरपे मामांनी आपल्या वाटचे सिलेंडर आपल्या युवा सहकाऱ्यांकडे दिले आणि एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न शक्य असताना अतिशय मोठ्या मनाने ते बेस कँपला परतले. इतक्या वर्षांची मेहनत, आर्थिक, शारिरिक अडथळे पार करून इथवर आल्यावर इतक्या दिलदारपणे हक्क सोडून द्यायला खरेच खूप मोठे काळीज लागते.
तर त्यांनी सगळी माहीती वगैरे घेतली आणि थंडीची काय तयारी केली आहेस विचारलं. खरं सांगायचे तर मी काहीच तयारी केली नव्हती. कारण तसा काही अंदाजच नव्हता किती असेल थंडी याचा. मी आपले स्वेटर आणि एक जाकिट वगैरे नेऊ असले काहीतरी थातूरमातूर उत्तर दिले. मग त्यांच्या लक्षात आले की माझी शून्य तयारी आहे. म्हणाले तिथे मायनस मध्ये असणारे तापमान आणि पुरेशी तयारी न करता गेलास तर आजारी पडशील, ट्रेक सोडून परत यावं लागेल. हायला मी बिचकलोच हे ऐकून. मग त्यांनी त्यांच्याकडचा थर्मलचा एक सेट, ग्लोव्ज आणि एक डाऊन फेदर जॅकेट दिले. शिवाय त्यांच्या नेहमीच्या वापरातली ट्रेकिंग सॅक (खरे तर तिच घ्यायला म्हणून मी गेलो होतो कारण माझ्याकडे इतकी मोठी सॅकच नव्हती. आपल्या सह्याद्रीत इतक्या मोठ्या सॅक कधी लागतच नाही आणि नव्या सॅक पाच सहा हजार वगैरे ला होत्या) आणि ट्रेकिंग पोल दिले. मला ते घेताना अक्षरश लाजल्यासारखेच झाले. मी काय असा मोठा पराक्रम वगैरे करायला चाललो नव्हतो पण मी चाललोय याचा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाल्याचे जाणवत होते.
त्यांनी विचारले सिंहगड करतोय ना, म्हणलं हो हो, तर म्हणे किती वेळात, म्हणलं तेवढं विचारू नका. म्हणे करत रहा सवय झाली की होईल. आणि मी तो सल्ला मानल्याचा खरेच खूप फायदा झाला. पुढच्या तीन आठवड्यात नेमाने सिंहगड वारी करत राहीलो. ट्रेकिंग पोल हाही एक नवा प्रकार माझ्या मदतीला आला होता. खरे तर नुसती काठी, पण तिच्या व्यवस्थित वापराने गुढग्यांवर येणारा ताण बराच कमी होतो. हे अधीच का नाही वापरले असे झाले मला. आणि त्याने वेगात चढताही यायला लागले. पहिल्या वेळेपेक्षा बऱ्याच कमी वेळात चढून व्हायला लागला सिंहगड.
नंतर एकदा खच्चून भरलेली सॅक घेऊन पण सिंहगड केला. त्यावेळी एक काकू-ताई भेटल्या. त्यांनी माझे शूज, सॅक आणि पोल बघून ओळखलंच. म्हणे कुठल्या मोहीमेची तयारी. मग सगळे सांगितले तर म्हणाल्या पहिल्यांदाच हिमालयन ट्रेक करणार असला तर अजिबात न लाजता खेचर करा सामानासाठी. इतके वजन घेऊन एक दोन दिवस उत्साहात चालतो नंतर पार जीव जातो. एकदा तुम्हाला तुमच्या फिटनेस चा अंदाज आला की मग पुढचे ट्रेक तुम्ही ठरवू शकाल किती वजन घेऊन चालायचे. आणि हाही सल्ला मानला आणि त्याचाही अफाट फायदा झाला. त्या मायबोलीवर असल्या तर मला मनापासून त्यांना धन्यवाद म्हणयाचे आहे. कारण त्या गडबडीत मी त्यांचे नाव विचारायचे विसरलो.
दरम्यान रन पण करत होतोच. रनिंगच्या मित्रांनाही पिडून झाले की ४० मिनिटांच्या आत ५ किमी करायचे आहेत काय करू. ते म्हणाले ती काय जादूची छडी नाही, सराव आणि व्यायामाने आपोआप वाढेल पेस, घाई करू नको. म्हणलं आठवड्यावर ट्रेक आलाय आता नाही तर कधी करू घाई. पण ४९ वरून जवळजवळ ४२ मिनिटांवर आणली होती वेळ. म्हणलं ठिके अगदी काठावर नापास. नेऊ रेटून कसे तरी. आणि ट्रेक होईपर्यंत मला एकदाही ४० मिनिटांच्या आत जमले नाही.
त्यामुळे शेवटपर्यंत मला हा ट्रेक काही जमणार नाही. उगाच उत्साहाच्या भरात पैसे भरले आणि आता ते वाया जाणार आणि अर्धवट ट्रेक करून येण्याची नामुष्की ओढवणार असेच वाटत होते. पण आता आलीया भोगासी म्हणत सामान प्रचंड सॅकमध्ये भरले आणि मुंबईला जायला निघालो. आम्ही मुंबईवरून दुरान्तोने कोलकता, तिथे एक दिवस मुक्काम करून दुसरे दिवशी ट्रेननेच रात्रभराचा प्रवास करून पहाटे न्यू जयपायगुरी स्टेशन गाठणार होतो. तिथे आम्हाला टीटीएच्या जीप येणार होत्या. हा प्रवास ट्रेक इतकाच भन्नाट झाला आणि त्यात काय गोंधळ गमतीजमती झाल्या ते पुढच्या भागात लिहीतो.
हेडरमध्ये दिलेला फोटो माझा नसून आंतरजालावरून घेतला आहे. माझा इतका सुंदर फोटो कुणी काढलाच नाही
त्याच्या खालचा फोटो मात्र मी काढला आहे
क्या बात है ! भन्नाट वर्णन !
क्या बात है ! भन्नाट वर्णन !
सिंदबादला सफरीवर गेलं की संकटांचा सामना करावा लागे. मग तो मनाशी म्हणे की आता पुन्हा नाही. पण काही दिवस आराम केला की त्याला दर्या पुन्हा खुणावू लागे. अगदी तसा प्रकार आहे. पण खूप प्रेरणादायी आहे. घरी बसूच शकत नाही वाचल्यावर !!
अभिमानास्पद आहे.
कांचनजंगा दुरून पाहिलेय फक्त.
मस्त!! नकाशा करता धन्यवाद.
मस्त!! नकाशा करता धन्यवाद. अजून फोटो द्यायला हवे होते मात्र
धन्यवाद शांत माणूस
धन्यवाद शांत माणूस
खरंय अगदी हेच होत, खूप दिवसात मोहीम नही झाली की काहितरी मिसिंग आहे आयुष्यात असं वाटायला लागतं
ती तयारी, गडबड, उत्साह फार म्हणजे फार फुल ऑफ लाईफ आहे
सीमंतिनी - टाकतो हळूहळू, ट्रेक चे वर्णन सुरू होईल तसे तसे, मला आजच गुगल फोटो वरून कसा अपलोड करायचं त्याच गणित उलगडला आहे
दार्जिलिंग वरून खूप अस्पष्ट
दार्जिलिंग वरून खूप अस्पष्ट दिसतं. आम्हाला मसुरीला फसवले होते ते बघा कांचनजुंगा म्हणून
खूपच छान. कसा काय स्टॅमिना
खूपच छान. कसा काय स्टॅमिना असतो काय माहीत. अर्थात वर्षानुवर्ष सराव करुन कमावलेला असतो तरीही .... मस्त छंद आहे तुमचा. हेवा वाटतो.
मस्त सुरुवात! सामो + २
मस्त सुरुवात!
सामो + २
मस्त सुरुवात.
मस्त सुरुवात.
तुमच्या सफरी आम्हाला ही फिरवून आणतात नेहमी.
(तुमचे सायकलसफर लेखमाला माबोवर वाचनमात्र असताना वाचलेल्या आहेत आणि आवडलेल्या ही)
पुढील लेखणास शुभेच्छा!
मस्तच रे आशु!! सुंदर सुरूवात
मस्तच रे आशु!! सुंदर सुरूवात केलीयस. पर्वताची ओढ अनिवार्य आहे. लिहीत रहा, फोटोज टाकत रहा.
छान लिहिलेय !
छान लिहिलेय !
ते ४० मिनिटात पाच किलोमीटर वाचून मी नुकतेच मॉर्निंग वॉल्क सुरू केलेय त्यात किती पावले किती मिनिटात चालतो त्यावरून किती अंतर कापतो हे लगेच पाऊल मोजून चेक केले
एखादी छोटी मोठी ट्रेक करून यायला हवी असे पुन्हा एकदा वाटले.
याआधी काही वर्षांपूर्वी बहुधा तुमचाच वा कोणाचातरी मायबोलीवरचाच ट्रेकिंग अनुभव वाचून वाटले होते
मला ट्रेकिंग वगैरे कधीच नाही जमणार, त्याला लागणारा फिटनेस माझ्याकडे नाही असे मला एकेकाळी उगाचच वाटायचे. पण शालेय मित्रांसोबतच्या पिकनिकनंतर माझे स्वत:च्या फिटनेसबद्दलचे मत बदलले आहे
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
कसा काय स्टॅमिना असतो काय माहीत. अर्थात वर्षानुवर्ष सराव करुन कमावलेला असतो>>>>
नाय हो, माझा स्टॅमिना अक्षरशः ढ कटगीरी मधला आहे
इथेच माबोवर हरपेन, केदार यांच्या लेखमाला वाचल्या की जाणवतं आपण अगदी शिशु गटात आहोत
मला ट्रेकिंग वगैरे कधीच नाही जमणार, त्याला लागणारा फिटनेस माझ्याकडे नाही असे मला एकेकाळी उगाचच वाटायचे. >>>
खरं सांगू का, मला हे अजूनही वाटतं माझा नाहीये फिटनेस जितका असायला हवा. मी जे काही केलं त्यात फिजिकल फिटनेस कमी आणि मेंटल फिटनेस चा वाटा मोठा होता, एकदा आपल्याला हे करायचंच आहे हे जेव्हा आपल्या डोक्यात आणि हृदयात आपण फिट करतो तेव्हा मग काही गोष्टी होऊन जातात.
वा वा जबरीच !! मस्त होणार
वा वा जबरीच !! मस्त होणार सिरीज.
मस्त लिहिलंयस. पुढे वाचायची
मस्त लिहिलंयस. पुढे वाचायची अतिउत्सुकता लागलीये.
मस्त. पुभाप्र.
मस्त. पुभाप्र.
>>>>>>>त्यात फिजिकल फिटनेस
>>>>>>>त्यात फिजिकल फिटनेस कमी आणि मेंटल फिटनेस चा वाटा मोठा होता,
होय असे असते हे ऐकून आहे.
मस्त सुरुवात! पुढील भागांची
मस्त सुरुवात! पुढील भागांची खूपच उत्सुकता आहे!
त्यात फिजिकल फिटनेस कमी आणि
त्यात फिजिकल फिटनेस कमी आणि मेंटल फिटनेस चा वाटा मोठा होता >>>> द ग्रेट एक्स्प्लोरर्स नावाचे पुस्तक आहे. त्यात अशा लोकांचा एक वेगळा जीन असतो जो स्वस्थ बस्सू देत नाही असे म्हटलेय. पूर्वी हे लोक अंटार्क्टिकाच्या मोहिमा आखत. जिथून परत यायची सोय नव्हती. अॅम्युण्डसेन आणि स्कॉटची मोहीम तर थरारकच आहे. नंतर सुविधा झाल्यावर त्यांना अंटार्क्टिका मोहीमा नीरस वाटू लागल्या. मग त्यांना हिमालय खुणावू लागला. असाच एखादा आत्मा आशुचँपच्या रूपाने पुन्हा जन्माला आला असणार.
भारीच. पुढचे भाग लवकर लवकर
भारीच. पुढचे भाग लवकर लवकर टाका. आणी फोटो जास्त हवेत.
येस्स, फोटो हवेतच. पण तयारी
येस्स, फोटो हवेतच. पण तयारी वाचुन दमछाक झाली. ज्या वयात ( म्हणजे पंचविशीत ) माझी ईच्छा होती हिमालयात जायची, तिथे आता चाळिशी आली तरी योग येईना.
छान लिहीलेय, पुढील भागाची लय उत्सुकता आहे.
ही लेखमाला पण तुमच्या
ही लेखमाला पण तुमच्या सायकलिंग सफर लेखमालांसारखी जबरदस्त होणार ह्यात शंका नाही. तुमची ओघवती वर्णन शैली अतिशय सुखदायक आहे.
गेल्या एप्रिल मध्ये मी आणि सौं. नी उत्तराखंड मधील केदारकण्ठ चा ट्रेक केला. गोएचला च्या तुलनेत केदारकण्ठ एकदमच बाळबोध असूनसुद्धा ऑरगनायझर्स ने आम्हाला ४० मि मध्ये ५ किमी पळणे ही फिटनेस ची पात्रता चाचणी दिली होती !! जमवले कसेतरी पण पुढे टेकडी चढ-उतार (hill-repeats) ह्या व्यायामाने तारले.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत ....
छान सुरुवात! पुढील भागांच्या
छान सुरुवात! पुढील भागांच्या प्रतिक्षेत
अरे वा!!!!! मस्तच! जोरदार!
अरे वा!!!!! मस्तच! जोरदार!
जबरदस्त सुरवात आशुचॅंप.
जबरदस्त सुरवात आशुचॅंप.
मला तुमचं लिखाण खुप आवडतं. (मी हे तुम्हांला आधी सांगितलय का आठवत नाही, तुमचे सायकलींचे लेख वाचून माझा लेक पण सायकलींच्या प्रेमात पडला. तो आता गेली 4-5 वर्ष सायकलीने ऑफिस ला जातो. )
पुढच्या भागाची वाट बघतेय.
छान प्रस्तावना. पुढील अनुभव
छान प्रस्तावना. पुढील अनुभव वाचायला मज्जा येणार.
मस्त सुरुवात झाली आहे..फोटो
मस्त सुरुवात झाली आहे..फोटो पण मस्त....अजुन भरपुर फोटो टाका पुढच्या लेखांपासुन...
हिमलयात ट्रेक वगैरे या जन्मात तर काही मला जमेल असे वाटत नाही....फोटो पाहुनच समाधान
इतक्या वर्षांची मेहनत, आर्थिक, शारिरिक अडथळे पार करून इथवर आल्यावर इतक्या दिलदारपणे हक्क सोडून द्यायला खरेच खूप मोठे काळीज लागते >> उमेश झिरपें चं "एव्हरेस्ट" पुस्तकं वाचलं आहे...खरच ग्रेट माणुस.....त्यांनी जी काही मेहेनत घेतली आहे या मोहिमे साठी त्याला तोड नाही..... काही दिवसांपुर्वी सकाळ मधे पण त्यांची लेखमाला येत होती ती आवर्जुन वाचत होते.
आशु, मस्त सुरुवात!
आशु, मस्त सुरुवात!
असाच एखादा आत्मा आशुचँपच्या
असाच एखादा आत्मा आशुचँपच्या रूपाने पुन्हा जन्माला आला असणार>>> सरांनंतर आता माझा नंबर का?
कुठं ही लोकं कुठं आम्ही पामर
तिथे आता चाळिशी आली तरी योग येईना.>>>>
सेम, माझीही चाळीशी उलतल्यावर माझा योग आला, तुमचाही येईल
गोएचला च्या तुलनेत केदारकण्ठ एकदमच बाळबोध असूनसुद्धा ऑरगनायझर्स ने आम्हाला ४० मि मध्ये ५ किमी पळणे ही फिटनेस ची पात्रता चाचणी दिली होती !! जमवले कसेतरी >>>>
अगदीच बाळबोध नाहीये, त्यालाही शेवटच्या टप्प्यात खडी चढण आहे असे वाचलं होतं, माझा एक मित्र आता डिसेंम्बर मध्ये करून आला. तुमचा कसा होता अनुभव?
तुम्हाला जमले 40 मिनिटात .... भारीच, हॅट्स ऑफ
मला ट्रेक वरून आल्यावर खूप दिवस नेमाने प्रयत्न केल्यावर अखेरीस ते बॅरियर तोडण्यात यश आले, आता 38 मिनिटे ही माझी सर्वोत्तम वेळ आहे
तुमचे सायकलींचे लेख वाचून
तुमचे सायकलींचे लेख वाचून माझा लेक पण सायकलींच्या प्रेमात पडला. तो आता गेली 4-5 वर्ष सायकलीने ऑफिस ला जातो>>>
अहो कसलं मस्त, फार भारी वाटतंय हे वाचून
मनापासून धन्यवाद
उमेश झिरपें चं "एव्हरेस्ट" पुस्तकं वाचलं आहे...खरच ग्रेट माणुस.....>>>
आणि अगदी ज्याला down to earth म्हणतात तसे तुम्ही त्यांना ट्रेकिंग भटकंती संदर्भात कुठलीही मदत मागा, एका पायावर मदत करतील ते.
सर्वच प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद
>> त्यालाही शेवटच्या टप्प्यात
>> त्यालाही शेवटच्या टप्प्यात खडी चढण आहे असे वाचलं होतं
खरं आहे. शेवटचा कॅम्प ते शिखरमाथा खडी चढण आहे. जोडीला बर्फ, थंडी आणि जोरदार वारं. आम्ही पहाटे ४ लाच चढाई सुरु केली. माथ्यावर पोहोचल्यावर सूर्योदय बघितल्यानंतर सर्व श्रम निमाले !
>> तुमचा कसा होता अनुभव?
एकूण सुंदर अनुभव. माझाही तो हिमालयातला पहिलाच ट्रेक. मज्जा आली.
आता अजून भरकटण्या आधी थांबतो.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत..
पुढील भागांच्या प्रतिक्षेत..
मस्त वर्णन! आवडले.
मस्त वर्णन! आवडले.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
Pages