गोष्ट हजाराच्या नोटेची

Submitted by 'सिद्धि' on 11 January, 2022 - 10:29

‘काही दिवसांपूर्वी गावी कोकणात जाणं झालं, आधी माझ्या सासरच्या गावी, मग मामाच्या गावी जाण्याचा योग आला.
माझं २ महिन्याचं बाळ हातात घेऊन उंबरा ओलांडून मी आणि माझा नवरा आम्ही घरात प्रवेश केला. दारात आजी तिष्टत उभी होती, अगदी रखुमाईसारखी. भाकर-तुकडा अंगावरून काढून तिने माझ्या डोळ्याला पाणी लावले. तोंडावरील कापड बाजूला करून लहानग्या पणतीच्या डोळ्याला पाणी लावताना तिचे डोळे भरून आले होते. पहिल्यांदाच आपल्या परतुंडाच तोंड बघत होती ती. त्यात तिच्या लाडक्या नातीची मुलगी. म्हणजे तिच्या काळजाचा तुकडा. अलगत आपला सुरकुतलेला हात माझ्या पिल्लुच्या डोळ्यांवरून फिरवत तिने गोडं पापा घेतला. तेवढ्यात माझ्या माऊने आपले इवलेसे किलकिले डोळे उघडले. एकटक आजी नंतर माझ्याकडे बघत बसली. आजोबापण नातीच्या मुलीला बघण्यासाठी धडपडत पुढे आले होते. काय करू आणि काय नाही असं झालं होता त्या दोघांना.’

वाटणाचं वरण आणि गावठी भात, मोडाच्या वालाचं बिरडं, अळूवडी, हळदीचं पानं घालून केलेली तांदळाची खीर, पापड-कुरडया असा जंगी बेत होता. नको नको म्हणत असताना आजीने स्वतःच्या हाताने सगळं बनवलं होतं. जेवणाची पानं मी लावायला घेतली. सोबत पाण्याचा तांब्या सुध्या भरून ठेवला. जवळपास आज सात वर्षानंतर मी आजोळी गेले होते. आजीच्या हाताला रुची वेगळीचं. ‘जिवंत आहे तोपर्यंत स्वयंपाक मीच करणार’, असं ती ठणकावून सांगते. अजूनही थोडंफार मीठ किंवा तिखट असं काहीही कमी जास्त झाल्याचं कोणाच्या नजरेत नाही. जेवणाची अगदी स्वयंसिद्धा म्हणा ना.

नात , नात जावयाचा आणि परतुंडाचा चांगलाच पाहुणचार रंगला होता. जेवण-खावन आटोपून निवांत बसलो, गप्पाटप्पा रंगात आल्या होत्या. कितीतरी गप्पा आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दुपारची संध्याकाळ केव्हा झाली कुणाला समजलेच नाही. जुने गमती जमतीचे किस्से रंगले. खाण्याची असो अथवा इतर गोष्ट पहिल्यापासून आजी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना वाटून देते, कुणी त्यावेळी उपस्थित नसेल तर त्याच्या वाट्याचे राखून ठेवते . कोणी दुपारी जेवायला नसेल तर त्याच्यासाठी थोडी खीर किंवा पुरणपोळी असा नवीन केलेला पदार्थ राखून ठेवणे ही तिची सवय अजूनही गेली नाही. दरवर्षी दिवाळीला आजोबा आम्हा नातवंडांसाठी फटाके आणायचे. काही कारणास्तव एका दिवाळीला मी आजोळी जाऊ शकले नाही. नंतर येईन म्हणाले आणि ख्रिसमसच्या सुट्टीत गेले. दिवाळी होऊन बरेच दिवस लोटले होते, पण माझ्या वाट्याचे फटाके आजीने तसेच ठेवून दिले होते. हिवाळ्यामध्ये थोडे थंड पडलेले ते, पण तिने माझ्या हातात दिले तेव्हा काय सांगू कोण आनंद झाला होता मला ते.

आम्ही साखरपावरून म्हणजे माझ्या सासरच्या गावावरून चिपळूणला माझ्या आजोळी आलो होतो. कारने प्रवासास दोन अडीच तास लागतात म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो. बाळाला अंघोळ घालणाऱ्या काकू संध्याकाळी यायच्या त्यामुळे मी माझ्या बाळाला अंघोळ न घालताच घेऊन आली आहे, हे आजीला समजले तेव्हा तिने कोमट तेलाने मसाज करून माझ्या बाळाला मस्त अंघोळ घातली. डोक्यावर तेलाचे माकू घातले होते. हे पाहून माझ्या लहानपाणीची प्रत्येक आठवण माझ्या डोळ्यासमोर तरंगत होती. काळ सरकला, वेळ पळत होती, वय वाढले, पण आजी अजूनही मानने तशी आणि तशीच. आधी मुलांसाठी, नंतर नातवंडांसाठी, आता परतुंडांसाठी तेच प्रेम.

आता परतीच्या प्रवासाला निघायचं होत. पण मन मात्र अजून तिथेच आडून बसलं होत.

‘माझं अख्ख बालपण इथे हरवलं, फुटलेल्या नारळाच्या करवंट्या घेऊन इथेच लाल मातीत लगोर उभी राहायची,
इथेच आमचा लपाछपीचा डाव रंगायचा नारळी केळीच्या बनात.
बाप्पा असो किंवा दिवाळीची सुट्टी, अगदी आमची होळी सुद्धा इथेच आणि आजीच्या मांडीवर बसून रोजचेच अभ्यंग स्नान देखील इथेच उघड्या परसात.
का झालो मोठे? का बळ आले पंखात? परतीची आस असूनही विकतच्या बेड्या बसवल्या पायात.’

संध्याकाळी आजी-आजोबांच्या पाय पडून आम्ही निघालो. आजी बाळाला घेऊन दारातच उभी होती. " पुन्हा केव्हा येशील ग? " एवढंच बोलून तिने आपला हुंदका आवरला. " हे माझ्याकडून माझ्या कष्टाचे, किती वर्षापासून जपून ठेवलेले पैसे. माझ्या पणतीला भेट." बाळाच्या हातात हजाराची एक नोट ठेवून तिने दारातूनच निरोप घेतला.
" अगं आजी कशाला पैसे, ठेव ते आधी." म्हणत ते पैसे मी तिला परत करण्यासाठी प्रयन्त करत होते, पण बाळाने आपल्या मुठीत ती नोट अगदी घट्ट पकडली होती. मी एकदा आजीकडे आणि एकदा माझ्या नवऱ्याकडे आश्चर्याने पहिले. त्याने मानेनेच नकार दिला आणि मी गोंधळले. हा नाही का म्हणतोय? ते कळेना. त्याने गपचूप त्याच्या खिशातील काही पैसे काढून माझ्याकडे दिले, आजीला देण्यासाठी. आजी घेत नव्हती पण मी ते तिच्या हातात टेकवत तिथून निघाले.

गाडी स्टार्ट केल्याकेल्या मी लगेच त्याला प्रश्न केला. " नाही का म्हणालास? ते पैसे परत करून तिला सांगायला पाहिजे ना?"
"त्याने बाळाच्या हातातून पैसे काढून माझ्याकडे दिले. " हे बघ ही जुनी हजाराची नोट आहे, दोन वर्षे झाली करन्सी बदलून, म्हणजे आपलं लग्न झालं तेव्हापासून आजीने ही नोट तिच्या होणाऱ्या परतुंडाच्या नावाने बाजूला काढून ठेवली असणार, तू आजीला हि परत दिली असतीस तर तिला किती वाईट वाटलं असत." त्याच म्हणणं बरोबर होत, तरीही मी त्याला माझं मत ऐकवलं.
" मला तेव्हाच समजल होतं की ही जुनी नोट आता चलनात नाही, पण म्हणून मी ही आजीला परत करत नव्हते, तर तिला सांगणार होते, कि काही नोटा आता बंद झाल्यात, बाहेर कुठे गेल्यावर असे पैसे चालणार नाहीत, तेव्हा तिची अडचण व्हायला नको म्हणून."

त्याने हातातील मोबाइलवर नुकताच डायल केलेला मामाचा कॉल मला दाखवला. " तुझे मामा बाहेर गेले आहेत, तू आजीशी बोलत होतीस तेव्हाच त्यांच्याशी बोलणं झालं माझं. नोटांबद्दल त्यांना विचारलं तेव्हा समजलं. ‘आत्ता आजी एकटी कुठे बाहेर जात नाही, आणि पैश्याचे सगळे व्यवहार आता मामा बघतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि विशेष बाब म्हणजे नोटांमधील फरक आता आजीच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना सांगूनही काही फायदा झाला असता असे मला वाटत नाही.’’
तो पुढे बोलू लागला.
‘’ आपल्याकडे परतुंडाच तोंड पाहिल्यावर त्याला काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे, त्यासाठीच आजीने ही नोट अगदी राखून ठेवली असणार. म्हणून ही नोट त्यांना परत देणं मला बर वाटलं नाही. त्यांना वाईट वाटण्यापेक्षा, ही नोट एखादी वस्तू आहे असं समजून कायमची तुझ्याजवळ ठेव. "

त्यावेळी काय बरोबर काय चूक मला समजले नाही. आजीचं तिच्या नातीशी असणार प्रेम आणि नातीच्या मुलीशी असणार प्रेम या पुढे ती हजाराची नोट अगदीच नगण्य होती. समोरच्याच्या भावनांचा आदर करणे केव्हाही योग्यच, भावना आणि प्रेम याला पैश्यामध्ये मोजणे शक्य नाही. त्यामुळे जे झाले ते योग्यच, असं मानून मी ती नोट माझ्याकडे जपून ठेवली आहे.

*****

कथा पूर्वप्रकाशित आहे. तसेच काही प्रादेशिक शब्दांचा वापर केला गेला आहे.
कथासंग्रह फुलले रे(ebook)

******
सिद्धी चव्हाण
https://siddhic.blogspot.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<ती हजाराची नोट अगदीच नगण्य होती.>>>
नगण्य नाही ग, पृथ्वीमोलाची नोट आहे ती..

आजी खूप आवडली... माझ्या आजीची आठवण करून दिलीस या लिखाणातून.

धनवन्ती - आजीच्या प्रेमापुढे त्या नोटीला पैसे म्हणून काय किंमत.. या अर्थाने मी तिला नगण्य म्हणाले. पण खरं आहे, पृथ्वीमोलाची नोट आहे ती...

धनवन्ती , सीमंतिनी - प्रतिसादासाठी धन्यवाद

सामो , अमुपरी , ऋन्मेऽऽष , जिज्ञासा, लावण्या धन्यवाद!

खूप सुरेख आणी हळवा अनूभव. आजी आठवली नी डोळे पाणावले. तुझ्या अहों चा समजूतदारपणा खूप छान वाटला.

छान गोष्ट आहे. ती नोट जपून ठेवा, पणजीची आठवण आहे ती.

मला माझ्या आजीची आठवण झाली. मला नोकरी लागल्यावरसुद्धा प्रत्येक वेळी भेटली की मला १० रुपयाची नोट देत असे. राहू दे, काय माहीत पुढच्या वेळी असेन की नाही, असे म्हणायची वर. मला कागदावर (म्हणजे चेकने) पैसे मिळतात याचे फार आश्चर्य वाटत असे तिला. अरे, खरेखुरे पैसे मिळतात ना, असे दरवेळी विचारत असे. तिची एखादी १० ची नोट ठेवायला हवी होती.

मानव पृथ्वीकर , रश्मी. , उपाशी बोका , चैत्राली उदेग - प्रतिसादासाठी धन्यवाद.

उपाशी बोका - 'काय माहीत पुढच्या वेळी असेन की नाही.'अस वाक्य माझी आजी सुद्धा म्हणते, तेव्हा खरंच फार वाईट वाटत. एखाद्याच्या नसण्याचं दुःखच वेगळं. आणि असूनही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू न शकणं तर फारच वाईट.

मस्त लिहिलंय!
यावरून एक गंमत आठवली.
आम्ही पुण्याला जातो तेव्हा इकडे परत येताना आजीआजोबांना नमस्कार केला की सासूबाई मुलांच्या हातात पैसे ठेवतात. ही आता मुलांनाही सवयीची बाब झाली आहे. यावेळेस दिवाळीच्या दिवशी ओवाळणी वगैरे झाल्यावर मुलांना आजीला वाकून नमस्कार करायला सांगितला. तर नमस्कार करून झाल्यावर धाकटा मुलगा आजीला म्हणे, "आता पैसे" Rofl आम्हाला आधी कळलंच नाही की पैशांचं काय आत्ता? दोन मिनिटांनी ट्यूब पेटली आणि सगळे हसत सुटलो.

आशु, आबा, वावे थँक्स.

वावे, Lol
माहेरी माझ्या गावाकडे सुद्धा अजूनही कोणीही नवीन पाहुणे वगैरे आले, तर जाताना घरातील लहान मुलांच्या हातात पैसे देता. खाऊसाठी.

का झालो मोठे? का बळ आले पंखात? परतीची आस असूनही विकतच्या बेड्या बसवल्या पायात.’+ १११११
आजीचं तिच्या नातीशी असणार प्रेम आणि नातीच्या मुलीशी असणार प्रेम या पुढे ती हजाराची नोट अगदीच नगण्य होती. समोरच्याच्या भावनांचा आदर करणे केव्हाही योग्यच, भावना आणि प्रेम याला पैश्यामध्ये मोजणे शक्य नाही. + ११११११ to n .Ata maji ajji above 90 yrs hoti pan 2 divasapurvi geli pan aatun je tutay te sangta yet nahi. Hakkachi niswarth maya te ajol harpalyachi bhavana yete manat. Mala hi lagna nantar 20 varshe mul navte tar tine khup navas bolale hote, kadachit tila janvale asel mhanun magchya 2 mahinyapurvi majya aaijaval paise deun (je tila etarani dilele hote) mhanali mala ata chalne hot nahi tar vaishu alyvar tichya balala gheun malavarchya devala jaun ye (Renuka Temple) devichi oti bhar .Maji vacha dhuvun tak. Sorry khup prayatna kele pan neet marathi type karta ale nahi . Badly missing her.

खूपच सुंदर ग सिद्धी. मला माझ्या आजीची आठवण झाली. ती सुद्द्धा असेच भरपूर खायला प्यायला करायची आजोळी गेले कि. पैसे साठवून ठेवायची आणि आम्हाला द्यायची आजोळहुन परत येताना. मामा देतो ग पण आज्जी कडून पण असू दे म्हणायची. मी नोकरी करायला लागल्यानंतर पण ती द्यायची पैसे आणि मला म्हणायची मी दिलेले पैसे पर्स मध्ये ठेव म्हणजे तुझ्या कडे पैसा येत राहील. आज खूप कमावते आहे पण आज्जी ने दिलेल्या पैशाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही.

वैशाली, शर्मीला, नीलूला, फुलराणी - धन्यवाद.

फुलराणी - खरं आहे, आजी आणि तिचं प्रेम याची तुलना कुणाशी करता येत नाही.