अनवट आशा

Submitted by दिनेश. on 19 June, 2013 - 10:56

अनवट हा शब्द सहसा अप्रचलित रागांसाठी वापरतात. गुणक्री, रायश कानडा असे काही राग आपण नियमित
ऐकत नाही, आणि त्या रागांतील रचना कानावर पडल्या तर काही खास ऐकतोय असे वाटते.

पं. मालिनी राजूरकरांचे "चाल पहचानी", जयमाला शिलेदारांचे " कोपला का ", रामदास कामतांचे "संगीतरस सुरस" अशा काही रचना ऐकल्या, कि असेच हरखून जायला होते.

पण आपली आशा ( आशा भोसले, आपलीच ती ) पण काही कमी नाही. पण होतं काय, अशा अवघड रचना ती
इतक्या सहजतेने गाते कि आपल्याला वाटतं, फारच सोप्प आहे कि हे, पण ज्यावेळी आपण गुणगुणायला जातो
त्यावेळी मात्र, त्यातले अनवटपण जाणवते. तर अशा काही रचना, मला आठवतात त्या. आणि अर्थातच
तूम्हाला ज्या आठवतील, त्या तूम्ही लिहायच्याच आहेत.

१) सुकतातची जगी या

दिनानाथ मंगेशकरांचे हे नाट्यगीत, आशांनी गायलेय. दिनानाथ त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात कसे गात
असावेत, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण आशाने मात्र ती चमकदार गायकी, अशी काही
सादर केलीय, कि ज्याचे नाव ते. खरं तर तिला थेट तालिम फारशी मिळालीच नसावी. तिच्या अंगात आहेत
ते अलौकिक कलागूण. शिवाय तिचे स्पष्ट शब्दोच्चार. गाण्यातला प्रत्येक शब्द लिहून घ्यावा, असे खणखणीत.

२) बाई गं माझ्या पायाला बांधलाय भवरा

आनंदघन म्हणजेच लताच्या संगीतात, आशाने गायलेली हि लावणी. ( चित्रपट बहुतेक मराठा तितुका मेळवावा )
गुलजार गुलछडी
नटुनी मी खडी खडी
नाचते मी घडीघडी
करते नखरा नखरा
बाई गं माझ्या पायाला
बांधलाय भवरा

असे काहीसे शब्द आहेत. या लावणीत भिर्रर्रर्रर्र........................... अशी एक लांबलचक भिरभिरणारी तान
तिने घेतलीय. ती तानच काय तेवढा दमसासही आपल्याला अवघड आहे. पडद्यावर नर्गिस बानू आहे,
पण तिलाही ही तान अवघड गेलीय. आणि याच गाण्याबाबत नव्हे तर इथे लिहितोय त्या सर्वच
गाण्यांच्या बाबतीत खरे आहे, कि या गाण्यांचा वाटेला नंतर कुणी गेलेलं मी ऐकलेले नाही.

३) देव नाही जेवलेला

धर्मकन्या हा हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत असलेला एक चित्रपट. "सखी गं मुरली मोहन मोही मना,"
हे गाणे त्यातले ( पडद्यावर जयश्री टी. ) हे गाणे जरा नेहमीच्या ऐकण्यातले म्हणून परिचित. पण
त्यातली ग या अक्षरावर घेतलेली तान, भल्या भल्या गायिकांना जमणारी नाही. याच चित्रपटात
"पैठणी बिलगून म्हणते मला, जानकी वनवास गं संपला" अशी पण रचना आहे. तीदेखील आशानेच
गायलीय. ( पदद्यावर अनुपमा ) तीसुद्धा सुंदर आहेच. पण सरताज अशी रचना आहे ती, "देव नाही झोपलेला"
सगळ्यांच्या भुकेची जबाबदारी घेतलेला तो देव, आपल्याला उपाशी ठेवून झोपलेला नाही, तर रात्रीच्या अंधारात
तो आपली झोपडी शोधतोय, अशा भावार्थाचे हे गाणे, ऐकल्यावर अक्षरश: भान हरपते. इतके आर्त गाणे
असूनही त्याचे कुठेही रडगाणे झालेले नाही ( तूलना गैर आहे, पण लताने "अम्मा रोटी दे, बाबा रोटी दे" या
गाण्याचे रडगाणे केलेले आहे. ) उलट देवावरची अढळ निष्ठाच त्यात दिसते.

४) कवडसा चांदाचा पडला

जिद्द या नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. श्रीराम लागू, जयश्री गडकर, उषा चव्हाण, संजय जोग
असे कलाकार होते. पण वरची लावणी, उषा चव्हाणवर नव्हे तर सहनायिका, संजीवनी बीडकरवर चित्रीत झाली
होती.

बाहेर चांदणे, खिडकी होती बंद
बिलगून सख्याला मिठीत होते धुंद
निलाजरा तो खट्याळ वारा आला
खिडकी उघडून, पडदा सारून गेला
कवडसा चांदाचा पडला,
अन साजण माझा खुदकन गाली हसला

अशा शब्दांनी सुरु होणारी हि लावणी, आशाने फारच सुंदर गायलीय. यातले बाई गं, बाई गं हे शब्द
तर खासच. अगदी चांदण्याचा शिडकावा झाला असे वाटते, हि लावणी ऐकून.

५) बेबसी हदसे जो गुजर जाये

ओ.पी. नय्यरच्या संगीतात आशाने हे गाणे कल्पना या चित्रपटासाठी गायलेय. ( पडद्यावर रागिणी )
हि रचना ओपीनी, बेगम अख्तरच्या एका ठुमरीवर बेतलीय असे म्हणतात, तरीही आशाची कामगिरी
बेजोड आहेच. मेरे नग्मोंसे उनका दिल ना दुखे, या ओळीवर तर तिने अप्रतिम काम केलेय.

चित्रपटात मरणासन्न नायिका हे गाणे म्हणतेय असा प्रसंग आहे, तरी हे गाणे करुण वगैरे झालेले नाही.

६) अकेली हूँ मै पिया आओ

संबंध या ओपीनीच संगीत दिलेल्या चित्रपटातली हि रचना. पडद्यावर नाजनीन. हाही एक मुजराच
आहे. पण अनेक रागरागिण्यांशी खेळत आशाने या रचनेला उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. उस्ताद अमीर
खाँ साहेबांनी पण या रचनेची तारीफ केली होती.

७) सूनी सूनी साँस कि सितार पर

शंकर जयकिशनने नेहमीच लताला झुकते माप दिले पण लाल पत्थर चित्रपटात मात्र लताचे गाणे नव्हते.
आशा आणि मन्ना डे यांनी गायलेली, रे मन सूर मे गा, ही रचना पण यातलीच. पण त्यात मन्ना डे असल्याने
आशाचे कर्तृत्व जाणवत नाही. ते जाणवते ते या गाण्यात.
मनमोहना बडे झूठे या गाण्यातील लताच्या आलापांचे ( आणि नूतनच्या अभिनयाचे ) नेहमीच कौतूक
होते, पण त्यात तोडीच्या ताना आशाने या गाण्यात घेतल्यात ( दुर्दैवाने राखीला पडद्यावर त्या साकार
करता आलेल्या नाहीत. )

८) कतरा कतरा मिलती है

इजाजत मधल्या, मेरा कुछ सामान या रचनेचे यथायोग्य कौतूक होतेच. पण त्याच चित्रपटातली हि
रचनाही त्याच दर्ज्याची है. प्यासी हू मै प्यासी रहने दो, मधली आर्तता काय वर्णावी. ( पडद्यावर रेखा, संगीत आर्डी )

९) काली कमली वाले कि

आर्डीनेच आशाकडून, नमकीन या चित्रपटासाठी हि रचना गाऊन घेतलीय. पडद्यावर शबाना आझमी आहे, पण ती मूक असल्याने गाने तिच्या तोंडी नाही. फिर से ऐयो, बदरा बिदेसी पासून जे गूढ वातावरण तयार होते,
ते पुढे पुढे जवळजवळ भारूनच टाकते. ( मला आठवतय त्या प्रमाणे शबाना या गाण्यानंतर स्वतःला संपवते.)

१०) जी चाहता है चूम लू

बरसात कि रात हे नाव घेतले कि, ना तो कारवाँ कि तलाश है, हि कव्वालीच आठवते. ती अप्रतिम आहे हे खरे आणि त्यात आशाचा पण आवाज आहे, हेही खरेय. पण निदान उत्तरार्धात तरी ती मन्ना डे आणि रफीनी
खाऊन टाकलीय. त्याच चित्रपटात, जी चाहता हे चूम लू, अपनी नजर को मै.. अशी पण एक कव्वाली आहे,
आणि त्यात आशा आणि सुधा मल्होत्रांने खुपच रंगत आणलीत. त्यातल्या एका आलापात तर दोघी
इतक्या सुरेल शिरल्यात, कि दोन वेगवेगळे आवाज ओळखता येत नाहीत.

११) माँग मे भरलो रंग सखी री

मुझे जीने दो मधे, जयदेव ने लताला, रात भी है कुछ भिगी भिगी, अशी सुंदर रचना दिलीय, पण आशाला
मात्र दोन गाणी दिली आहेत. एक आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले, नदीनाले ना जाओ श्याम.. ( चित्रपटातली
यातली चाल वेगळी आहे. शिवाय संग सवतीया ना लाओ, असे जास्तीचे कडवेही आहे. ) पण दुसरे, जरा कमी
ऐकण्यातले, आँखमे भरलो रंग सखी री, ऑंचल भरलो तारे. ( पडद्यावर वहीदा रेहमान )

या गाण्यातल्या मिलन रुत आ गयी वर आशाने सुंदर कारीगिरी केलीय शिवाय एकंदरच या गाण्याची चाल,
खास करून तिच्या ओळी फारच कठीण आहेत.

यातली बहुतेक गाणी नेटवर आहेतच, पण मी मुद्दाम लिंक्स देत नाही, कारण अशी रत्ने स्वतः शोधून
काढण्यातच मजा आहे, आणि काय सांगावे तूम्हाला आणखीही अशा रचना सापडतीलच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सियोना, अशक्य सुंदर लिंक आहे. माहिती नव्हतं. तिसरे वर्शन जास्त आवडले.
नीना गुप्तावर चित्रित झालेले पण चित्रा सिंग ने गायलेले हे गाणे सुद्धा छान आहे.

मला शास्त्रीय संगीतातले अनेक वर्षे काहीही समजत नव्हते. माझी ओळख बॉलीवूडमुळेच झाली. कानसेन व्हायच्या सुद्धा खूप पाठीमागे होतो. शंकराभरणम मुळे काही राग कानावर पडले. पण ते समजायला इंटरनेट ( ते ही ३ जी) आल्यावरच सुरूवात झाली. नंतर नंतर ज्याला आपण साधी गाणी समजत होतो ती ही रागात कशी बांधली जातात हे समजायला लागले.
समजा तोडी राग नुसताच ऐकला तर पूर्वी कसे ऐकायचे ते ही समजत नव्हते. आशा भोसलेंचं तोडी रागातलं भीनी भीनी भोर आयी . ऐकलं, गुणगुणलं आणि मग राग ऐकला आळवला कि थोडंफार समजतं. मग या रागातली इतर गाणी ऐकली कि राग ओळखीचा होऊ लागतो. तरीही अमूक गाणं याच रागात आहे हे ठामपणे अजून सांगता येत नाही. कोणते राग अनवट हे मात्र नक्कीच सांगता येत नाही. आपल्यासाठी सगळेच अनवट Lol
अलिकडे फक्त राग ऐकायला पण जमू लागलेय.

अशा तोडक्या मोडक्या माहितीवर काही काही आवडलेली गाणी

राग खमाज - पिया बावरी
हे गाणं कानाला खूप गोड लागतं. हा राग गाण्याशिवाय अद्याप ऐकलेला नाही.

राग पिलु - झूमका गिरा रे हाय -
हे खूपच नटखट असं गाणं आहे. कौशिकी चक्रवर्तींची बंदीश ऐकल्यावर झुमका गिरा रे हे पिलु रागातलेच आहे का असा प्रश्न पडतो. कारण या रागात शेकड्याने गझला आहेत, ठुमर्‍या आहेत, भजने तर हजारो असावीत. झुमका गिरा रे चे स्वर तेच आहेत. पण प्रकृती किती भिन्न आहे. आशाताईंनी त्यात कमालच केलीय.

फारसं समजत नसल्याने इथेच थांबतो.
तरीही पुरिया धनश्री आणि खमाज मधली दोन गाणी द्याविशी वाटतात. नंतर देईन. हे राग तर नेहमीचे आहेत. इथे अनवट असल्याने देऊ कि नको असे झालेय.

आपको प्यार छुपाने कि बुरी आदत है - हे एक देस रागातले आहे.
हा मला काही विशेष वाटला नाही राग. कदाचित दुस-या एखाद्या संगीतकाराने चांगले गाणे बांधले असेल तर ते ऐकण्यात नाही आलेले. आशाताईंनी आवाज खूप छान लावलाय या गाण्यात. पण चालच सपाट वाटलीय.

तोडी - झुठे नैना बोले
पहाडी - इशारों इशारों मे दिल लेनेवाले

मानव , तुम्ही गुलजारच्या मिर्जा गालिब मालिकेसाठी जगजीतसिंगने केलेलं दिल - ए- नादां ऐकलं नाहीए का? त्यातही दोन चाली आहेत.

सियोनांनी दिलेली लिंक नावीन्यपूर्ण आहे. हा प्रकार माहीत नव्हता. ही सहा भागांची दूरदर्शन मालिका होती असं दिसतं. संगीत रवी.

नव्हतं ऐकलं भरत. आता शोधून ऐकलं, जगजीतसिंग
सुरवात करतो एका चालीत आणि पुढे चित्रा सिंग वेगळ्या चालीत म्हणते, तेच का?

हो.

हे फारच अवांतर आहे. अबीदा परवीननेही गायली आहे हे गझल.
तलत सुरैया विचारताहेत, दिला तुझं डोकं दुखतंय का? चेपून देऊ का?
जगजीत चित्रा विचारताहेत, तुला ताप आलाय का? गोळी देऊ का?
अबीदा त्याला गदागदा हलवून विचारतेय, तुला झालंय तरी काय?

सियोना तुमची लिंक भारी आहे Happy सगळी गाणी ऐकताना आशा किती व्हरायटी गाऊ शकते हे पुन्हा जाणवसं Happy
बादवे निवेदक म्हणून दिप्ती नवल हेही सुखावहच! थांकु
दिले नादान म्हटलं की आमच्या पिढीला मात्र तलतच आठवतो Wink त्याच्या आवाजातला दर्द, तलम आर्जव, नजाकत... आह!

दिले नादान म्हटलं की आमच्या पिढीला मात्र तलतच आठवतो >> +१
मी त्या पिढीचा नाही. पण तलतच्या गाण्याची चाल हे गाणे जास्त छान पोहोचवते असं वाटतं. स्वतःच्याच हृदयाशी केलेला लाडीक संवाद आहे तो.

अनवट वगैरे नसेल कदाचित पण मला रातभर गरदिश में साकी आज पैमाना रहे है खूप आवडतं. मुखडा वेगवेगळ्या तऱ्हेने गायला आहे आशाजींनी. हेलन म्हणजे मूर्तिमंत चैतन्य.आणि आशाताईंचा त्या वेळचा आवाजही तसाच.

त्या वेळचाच नव्हे तर नंतर माधुरीसाठी "इडली डू इडली डू" म्हणाल्या तेव्हा त्या ६० वर्षाच्या तर माधुरी पंचविशीची पण गाणे हेलनने करावं असं मस्त गायल्या आहेत.

पण माधुरीने त्यांचे ऐकलेच नाही. इडली ऐवजी, कांदा पोहे, साखी, उकडीचे मोदक करत रेसिपीज पोस्ट केल्या युट्युबवर.
.....
सजा चांद के, सलोना सा सजन मस्त आहेत.

वरती म्हटल्याप्रमाणे - सलोना सा सजन अप्रतिम आहेच. भावी नववधूच्या भावना काय तरल व्यक्त झाल्यात.
पण जनता, ' जयशंकर प्रसाद' रचित, 'तुमुल कोलाहल' कसे विसरलात? Happy

https://www.youtube.com/watch?v=ipsbfYhv0AI

पिया बावरी
नट बिहाग रागात आहे, ह्यात दुसरे बॉलिवूड गाणे मलाही सापडले नाही, साऊथवाला राग केदारम ह्या रागाशी मिळताजुळता आहे, रेहमानचे सून री सखी मोरी प्यारी सखी त्यात आहे,

पिया बावरी व सून री चे अंतरे सलग म्हणून बघा.

नॉर्थवाला केदार आणि हा साउथी केदारम हे दोन्ही भिन्न आहेत,

नट बिहागात एक प्रसिद्ध बंदिश आहे, झन झन झन पायल मोरी बाजे , पिया बावरीचा मुखडा आलमोस्ट त्याच स्वरात आहे

https://youtu.be/0lcAgPPjQq4

पिया बावरी
नट बिहाग रागात आहे >> मला वाटतच होते काहीतरी चूक झाली असावी म्हणून. धन्यवाद अचूक माहितीबद्दल.

सलोना सा सजन मिराज ए गजल मध्ये आहे म्हणून त्याचा उल्लेख केला.

मन तुमुल कोलाहलचं संगीत जयदेव यांचं आहे.

जयदेव - आशाच्या या अल्बममध्ये ४ गझला आणि ४ हिंदी गीते आहेत.
यातल्या फक्त दोन गझला रेडियोवर ऐक ल्या होत्या. या अल्बममधली प्रत्येक रचना अनवट म्हणावी अशीच आहे.
आशाने माय फेवरिट अल्बममध्ये एक की दोन रचना घेतल्यात.
यातली एक गजल लतानेही गायली आहे. संगीत हृदयनाथ.

गाण्यांची यादी

ज्या रागात ढीगभर गाणी असतात त्याला अनवट म्हणत नाहीत.
शिवरंजनी या रागात सर्वात जास्त आणि श्रवणीय गाणी आहेत. पण अनवट रागांमुळे त्यातली गाणी घेतली नाहीत.

मन तुमुल कोलाहल

https://youtu.be/ipsbfYhv0AI

मला पहिल्याच क्षणी भीमपलास रागात वाटले.

नेटवर एक ठिकाणी मालकंस दिले आहे , पण ते मला पटले नाही , पण त्याचेही बरोबरच आहे, सा बदलला की मालकंस होऊ शकेल.

मला मात्र ह्या गाण्यातील साऱ्या हरकती ऐकताना जय शारदे वागीश्वरी आठवत राहिले, म्हणून मी तर भीमपलासच म्हणणार, मधेमधे मधु मागशी माझ्या सख्या परी आठवेल

Pages