"आम्ही चाललोय कलावंतीण दुर्गला. येतोस का?" भावाचा पुण्याहून फोन. पुढच्याच वाक्यात त्याचे "आम्ही" हे एकवचनी आदरार्थी असल्याचे समजले. आधी दोनवेळा जाऊन आलो असल्याने तशी फारशी उत्सुकता नव्हती. फक्त या निमित्ताने lockdown चे ग्रहण सुटणार होते. त्यामुळे लगेच होकार दिला आणि बाकी कोणी नाही आले तरी आम्ही दोघांनी जायचे ठरवले. पण लवकरच दोघांची मित्रमंडळी तयार होत आम्ही बारा जण झालो. पुण्याहून ७ जण शुक्रवारी संध्याकाळी माचीवर पोहोचले आणि आम्हाला location पाठवले. ठाण्याहून शनिवारी पहाटे ४ वाजता दोन बाईकांवर स्वार होऊन आम्ही चौघे कलावंतीण पहायला निघालो!! दहिसरहून एक मित्र पाठोपाठ येतच होता. पनवेलच्या थोडं पुढे शेडुंगजवळ त्याची भेट झाली आणि आम्ही हायवे सोडला. थोड्याच वेळात शेतोडीतला स्वच्छ हवेचा सुगंध आला. बऱ्याच दिवसांनी हा अनुभव मिळत होता. पौर्णिमेचा चंद्र अस्ताला झुकलेला असल्याने मधेच थोडासा अंधार मोडत होता. आमची मागून येणारी शेवटची गाडी म्हणजे दूरवर अंधारात एखादा काजवा तरंगत यावा अशी भासत होती. GPS च्या आधारावर वाट शोधत आम्ही ५:३० च्या सुमारास डोंगरपायथ्याशी पोहोचलो. पुणेरी गाड्यांच्या बाजूला एकेक करीत आमचे तीनही काजवे निजले आणि आम्हाला अंधाराची जाणीव झाली. अंधाराला डोळे थोडे सरावल्यावर आजूबाजूला काही टपऱ्या अंधुक दिसू लागल्या पण वाट विचारायला कोणीही दिसत नव्हते. 'आन्हिके' उरकली. मोबाईलच्या प्रकाशात वाट शोधण्याचा प्रयत्न फसला. आज शनिवार असल्याने इथे खूप जण येतात आणि पायऱ्यांवर ट्राफिक जॅम होतो असे कळले होते. तसेच वर एकही झाड नसल्याने उशीर झाला की ऊन खूप लागते हा अनुभव होता. त्यामुळे गर्दी आणि ऊन टाळण्यासाठी आमची निघायची घाई चालली होती. गुगलताईंनीही अबोला धरला. शेवटी GPS च्या निळ्या पट्ट्याशी आपली दिशा जुळवून घेत घेत अंधारातच आम्ही झाडीतल्या वाटेला लागलो. वाट साधीच असल्याचा अंदाज असल्याने अंधारात चालताना तशी भीती वाटत नव्हती.
अर्धा पाऊण तास मोबाईलच्या उजेडात चाचपडत चालल्यावर हळूहळू प्रबळगडाची अंधूक आकृती दिसू लागली. झुंजूमंजू झाले, फटफटायला लागले असे विस्मरणात जाऊ पाहणारे शब्द आठवले. अमच्याबरोबरच्या इंग्रजाळलेल्या मुलांच्या कानावर ते नव्यानेच पडले. आता वाट दिसू लागली आणि आमचा वेग वाढला. एवढ्यात आमच्या ठवठिकाणाचा अंदाज घेण्यासाठी भावाचा फोन आला. आम्ही जवळपास आहोत याचा अंदाज आला होताच. त्यामुळे शिट्ट्यांची देवाण घेवाण करत सातच्या सुमारास आमचे पंचक माचीवर पोहीचले. १०-१२ वर्षांपूर्वीच्या माझ्या आठवणीतले सगळे बदलले होते. झापांची जागा पक्क्या घरांनी घेतली होती. लागून दोनच घरं होती पण चित्रात असावी तशी टापटीप. वाट सोडत डावीकडे चार पायऱ्या चढून गेल्यावर मोठे अंगण. चांगले खो खो च्या मैदानाइतके, शेणाने छान सारवलेले. पुढे दोन पायऱ्या चढून मोठा व्हरांडा. इथे तीसेक जण बसतील असा चकचकीत लाद्या बसवलेला जेवणकट्टा. डावीकडे त्यांचे रहाते घर. इथून बाहेर पाहिले तर अंगण, त्यामागे डोंगरउतारावर झाडी, नागमोडी पायवाटा-रस्ते आणि दूर धुक्यात जेमतेम दिसू पाहणारे नव्या मुंबईचे काँक्रीटचे जंगल. अंगणात कोंबड्यांची पिलांबरोबर दाणे टिपण्याची लगबग. मधेच कावेबाज, सावध नजरेने फिरणाऱ्या मनिमाऊ आणि पायरीशी ऐटबाज मोत्या. एका बाजूला माऊलीचे शेणाने सारवणे चालू असल्याने वाऱ्याच्या झुळुके बरोबर येणारा गोठ्यासारखा गंध..मुंबई पुण्याहून आलेले आम्ही भिकारी ही संपत्ती मनसोक्त लुटत होतो.
कालची मंडळी मागच्या बाजूने आली आणि आम्ही पाचाचे बारा झालो. घराच्या मागच्या बाजूला ७-८ पायऱ्या चढून पुनः छान सपाट केलेला आणि तुरळक झुडुपे असलेला भाग. इथेच कालच्या मंडळींसाठी चार तंबू लावलेले. तंबूंसमोरची जळकी लाकडे आणि राख कालच्या पौर्णिमेच्या रात्रीच्या कॅम्प फायर चा पुरावा देत आमची राख करत होती. काही अंतरावर ३-४ स्वच्छतागृह असल्याने पर्यटकांना खूपच सोयीस्कर अशी व्यवस्था दिसत होती. एक उत्तम व्हायोलीन वादक सोबत मिळाल्याने कालच्या मंडळींची मैफील पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात खूप वेळ रंगल्याचे भावाने सांगितले.
एकमेकांची ओळ्खपरेड झाली. कांदे पोहे खाऊन आम्ही चालायला सुरुवात केली. मस्त गप्पा मारत तासाभरात खिंडीत पोहोचलो. उजवी वाट प्रबळगडा कडे नेणारी तर डावी कातळावरची वाट घडवलेल्या अद् भूत पायऱ्यांकडे घेऊन जाणारी. सुरुवातीलाच उतरत्या खडकावर थोडी अरुंद वाट असल्याने आमच्यातल्या तीन जणी मागे थांबल्या आणि बाकीचे पुढे गेलो. लगेचच आम्ही त्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. १२५-१५० पायऱ्या कमालीच्या कुशलतेने कातळात कोरून काढलेल्या. नेटवर भासवल्या इतक्या कठीण नक्कीच नाहीत तरी बिनधास्तपणे इकडे तिकडे पहात चढाव्या इतक्या सोप्याही नाहीत.
गुडघ्याएव्हढ्या उंचीच्या त्या पायऱ्या अतिशय सावधपणे आम्ही चढून गेलो. मागची प्रबळगडाची भिंत आमच्यावर सावली धरून असल्याने आम्हाला उन्हाचा त्रास अजिबात झाला नाही. माथ्यावरच्या शिळांच्या बुरुजावर जायला आता दोर बांधला आहे.
गावकरी माणशी ₹३०/- घेऊन वरती व्यवस्थित चढवतात आणि उतरवतात. तो शिळाबुरुज चढून आम्ही सगळे झेंड्याजवळ पोहोचलो. आता तिथे महाराजांचा छान पुतळाही बसवला आहे. फक्त आमचाच ग्रुप वर असल्याने घोषणा, जयजयकार, फोटो हे सगळे कार्यक्रम निवांत पार पडले. गंमत म्हणजे प्रबळगडाची भिंतदेखील आमच्या मागोमाग घोषणा देत होती!! त्यामुळे मावळ्यांना जास्तच जोर आला होता. दूरवरचे कर्नाळा, चंदेरी, श्रीमलंग असे दिसले. दुसरे ग्रुप यायला लागल्यावर आम्ही उतरलो. खिंडीपाशी आल्यावर बाजूलाच असलेली खडकात खोदून काढलेली गुहा दिसली. साधारण ३ फूट उंची आणि तेवढीच रुंदी अशी रांगतच जाता येईल इतपत आकाराची. आधी आम्ही दोघे आत गेलो. ८-१० फूट सरळ, मग ४-५ फूट डावीकडे, मग पुनः ४-५ फूट उजवीकडे आणि इथे डावीकडे साधारण ६x८ फुटी खोली. या सगळ्याची उंची जेमतेम बसता येईल इतकीच. पण आत १००% अंधार आणि कमालीची शांतता. असा अंधार दौलताबाद किल्ल्यातल्या फसव्या वाटेत गाईडने मशाल विझवल्यावर अनुभवला होता. ही जागा बहुदा कोणीतरी ध्यान / तपस्या करण्यासाठीच केलेली असावी असे वाटते. काटकोनात ल्या तीन वळणांमुळे आत अशी शांतता मिळते. आळीपाळीने सगळे ती गुहा जमेल तशी पाहून आले. गुहेच्या कर्त्या आणि करवित्याला नमस्कार करून आम्ही उतरायला लागलो. तास दोन तासात माचीवर आलो. जेवायला तसा अवकाश असल्याने पुनः दोन दोन प्लेटा पोहे चेपले आणि चहा घेऊन कालावंतीणीचा आणि माचीचा निरोप घेतला.
थोडेसे कष्ट घेण्याची तयारी असेल तर मुंबईजवळ एक दिवसीय / एक मुक्कामी भटकंतीसाठी हे जरा हटके आणि खूप छान ठिकाण आहे. आपापल्या कुवतीनुसार थरारही अनुभवायला आहे. इच्छुकांनी आवर्जून लाभ घ्यावा.
लेख आणि फोटो आवडले.
लेख आणि फोटो आवडले.
अगोदरचा सांधणदरीचाही आवडला होता.
लिहिते राहा.
मोबाईल, गुगल, जीपीएस
मोबाईल, गुगल, जीपीएस अस्तित्वात नसताना वाटा आणि भरकटलेले सवंगडी शोधायला फार मज्जा यायची. वर्णन आणि छायाचित्रे मस्तच. वाटाड्या गावकऱ्यांची नवीन व्यवसाय माहिती उत्तम. असेच भटकत आणि लिहीत रहावे. पुढील दुर्गभ्रमणासाठी हार्दिक शुभेच्छा.
मस्त ! मस्त ! असे धाडस मझ्यात
मस्त ! मस्त ! असे धाडस मझ्यात नाही. म्हणजे हातपाय रोवुन अस्वलासारखे चढु शकेन, पण दोर बांधुन? छे ! छे !
मुंबई पुण्याहून आलेले आम्ही भिकारी ही संपत्ती मनसोक्त लुटत होतो.>>>>... आपण शहरी आता खरच भिकारी आणी कर्मदरीद्री आहोत या बाबतीत.
पायऱ्या चढ्या आहेत. मी फार
पायऱ्या चढ्या आहेत. मी फार पूर्वी तिकडे म्हणजे या कलावंतिण बुरुजाकडे न जाता माचीवरूनच उजवीकडे ( गडाची दक्षिण) टोकाला जाण्याचे ठरवले. म्हटलं हे आपल्याला जमेल. सपाट वाटेने जात राहायचं. थोडे पुढे गेल्यावर समजलं अरुंद पायवाट, दोन्हीबाजूने टोचणारं उंच गवत. वाटेसाठी कापलेलंही बोचत होतं जाडजूड आणि टणक. उंच गवतातून जाताना दिसतही नव्हतं कुठे चाललो आहे. सावधपणे विचार केला - आत हरवलो तर? मग परत आलो. गावकरी बोलले वाटाड्या घेऊन जा पुढच्या वेळेस.
असा आहे हतबल करणारा प्रबळ. माथेरानच्या सनसेट (पोर्क्युपाईन) पॉइंटवरून सूर्य डुबताना पाहतो तोच हा डोंगर, तेवढ्याच उंचीचा प्रबळ.
या अगोदर एकदा गेलो होतो प्रबळला. पण तेव्हा थेट दक्षिण टोकाकडच्या वाटेनेच वर जाऊन खाली आलो होतो. तिकडे माचीवरचे गाव लागत नाही. तोफ आहे.
पावसाळ्यात मात्र प्रबळच्या पायथ्याचे ओढे दणादण आवाजात जोरात वाहतात ते पाहण्यासारखं आहे.
लेख आणि फोटो मस्तच.
लेख आणि फोटो मस्तच.
तुमचा यावरचा युट्यूब विडीओ पाहिलाय..कठीण ट्रेक आहे.
मीही फोटोच्या मोहात पडून हा
मीही फोटोच्या मोहात पडून हा ट्रेक केला... उतरताना अशी तंतरली होती की आजही आठवलं तर अगावर रोमांच येतो. मीही हा अनुभव लिहिणार होतो परंतु राहुन गेलं.
कलावंतीण ला मी हि जाऊन आलेय.
कलावंतीण ला मी हि जाऊन आलेय. रात्री चढताना मजा वाटली पण सूर्य वरती आला आणि खाली बघितल्यावर मी डिक्लेअर केलं कि मी खाली उतरणारच नाही. आता आठवून सगळे हसतात तेव्हा मला हि हसायला येत. पण तेव्हा मी माझ्या निर्णयावर ठाम होते. नणंद ट्रेक घेऊन गेली होती तिच्यावर जाम चिडले कि अग सांगायचे तरी कि कठीण ट्रेक आहे ते. शेवटी बसून च पूर्ण गड उतरले. असले धाडस पुन्हा करायचे नाही असे ठरवले.
हा हा हा .... शेवटून दुसरे
हा हा हा .... शेवटून दुसरे वाक्य वाचून हसायलाच आले. उतरण खूपच अवघड आहे.
शेवटी बसून च पूर्ण गड उतरले>>
शेवटी बसून च पूर्ण गड उतरले>> मला तर हाताला धरून उतरवलं गेलं.. माझे पाय पायरीवर ठरत नव्हते.. नुसता थरथरायटीस झाला होता. आमच्या ट्रुप मधल्यांनी माझ्या पुढे हात टेकले होते.. दुसर्याच कोणा एका भल्या माणासाच्या हाती हात सोपवून मी कलावंतीण उतरलो.
सेम अनुभव गोरखगडाला आला मला.
सेम अनुभव गोरखगडाला आला मला. सगळे डोंगर आपल्याभोवती गरगरताना दिसत होते. मग डोळे मिटून हाताने चाचपडत खाली आलो. आणि त्यात खाली आश्रमात निघताना 'कोरा चहा' मिळाला होता. त्यांनी "चहा घेऊनच जा" म्हटल्यावर हो म्हणालो. पण कोरा चहा मला जमत नाही.
एकूण काय तर कानाला खडा 'उभ्या चढ्या पायऱ्यांचे गड ' चढायचे नाहीत. पाली ( देवस्थानच्या मागच्या) सरसगडावर जायचे होते जुलैच्या पावसात.
"वाट कुठे?"
"दोन आहेत. देवळामागची उभ्या उ़ंच पायऱ्यांची आहे तिकडून जाऊ नका. उत्तरेकडे खोपोली रस्त्याला एमएसइबी केंद्राकडूनची बरी आहे. छोट्या पायऱ्या. "
पण तिकडेही 'भय इथले संपत नाही" असा निसरडा प्रकार. गवताला धरावे खडकावरच्या तर तेही उपटून हातात येत होते.
नंतर काही तरुण लोकांनी "आम्ही हरिहरला गेलो"म्हटल्यावर उत्साहाने फोटो पाहिले आणि ट्रेक रहित केला.
म्हणजे अशा ठिकाणी 'वारंवार' जाता येईल नसून 'शेवटचे' ठरेल.
नंतर काही तरुण लोकांनी "आम्ही
नंतर काही तरुण लोकांनी "आम्ही हरिहरला गेलो"म्हटल्यावर उत्साहाने फोटो पाहिले आणि ट्रेक रहित केला. >> सेम माझाही किस्सा आहे परंतु ती एक ऊर्मी आहे ती स्वस्थ बसू देत नाही. मन अजुनही उचल खाते की हरिहर करावा... भैरवगड करावा.. ए.एम.के. करावा.. तिथंही असाच अनुभव येणार हे माहित असुनही मन ताब्यात रहात नाही अन प्रत्येक गड उतरताना "हा शेवटचाच" असा निश्चय केला जातो
एक तर मी एकला जातो आणि
एक तर मी एकला जातो आणि राहाण्याची सोय असली वरती तर सोपे जाते. अवघड जागी एका दिवसांत जाऊन येणे जमत नाही. रात्री गडाच्या पायथ्याशी जाऊन मुक्काम पटत नाही.
धन्यवाद srd, किशोर मुंढे,
धन्यवाद srd, किशोर मुंढे, रश्मी._/\_
<<तुमचा यावरचा युट्यूब विडीओ पाहिलाय.>> mrunali. samad मी यु ट्यूबवर नाही टाकला व्हिडीओ. पण बऱ्याचशा व्हिडिओत हे खूप कठीण, most risky वगैरे सांगून घाबरवले आहे. प्रत्यक्ष तसे नाही. कुठेही पाय घसरेल असे अजिबात वाटत नाही. 'सामी' ला रात्री पायऱ्या चढताना मजा वाटत होती (भीती अजिबात वाटली नाही) याचा अर्थ 'पाय घसरेल' असे कुठेही वाटले नाही. दिवसा खोली दिसल्यावर 'पाय घसरला तर काय होईल?' या विचाराने भीती बसली जी फक्त मानसिक आहे. इथे पायऱ्यांवर पक्की ग्रीप आहे. सावध असलात की कसे पडाल? अगदीच वाटले तर जसे चढतो तसे उतरायचे (facing the rock). हरिहरच्या पायऱ्यांना तर इथल्या पेक्षा चांगली पकड मिळते कारण हातांनी पकडण्यासाठीही दगडांना गोलवा दिलेला आहे (जो कलावंतीणच्या पायऱ्यांना नाही). अगदी आपला हात जिथे जातो अगदी तिथेच अतिशय सोयीस्करपणे पकडता येईल असा आकार घडवला आहे. अगदी बिनधास्त भेटी देऊन या आणि त्या घडवणाऱ्यांच्या कलेचा, कष्टांचा, ज्ञानाचा थोडासा अनुभव घेऊन या. "आम्ही खूप धोक्याचा ट्रेक केला (अर्थात आम्ही खूप शूर आहोत)" हे भासवण्याचा साधारणपणे प्रयत्न असतो त्यातून असे घाबरवणारे व्हिडीओ टाकले जातात त्याकडे दुर्लक्ष करा.
पायऱ्यांवरून जेव्हा
म्हणजे तुम्ही म्हणता तसे घाबरण्यासारखे नाही तर जायला हवे.
पायऱ्यांवरून जेव्हा पावसाळ्यात पाणी वाहाते तेव्हा निसरड्या ( 'चिकाट' हा गावकऱ्यांचा शब्द) होतात. तेव्हा धोकादायक असतात.
मी तर अशा वेळी जातच नाही. जून
मी तर अशा वेळी जातच नाही. जून ते सप्टेंबर नो ट्रेक्स..!
थोडे जुने ट्रेक्रसही लिहा.
थोडे जुने ट्रेक्रसही लिहा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=QBZgVa92ftU>>>>>>> इथे ४:३५ पासुन पुढे बघा. बर्याच जणांचे डोंगर किंवा टेकड्या उतरतांना असे होते.
:खरंय.. खरंय...
:खरंय.. खरंय...
वैनी, तुम्ही कधी ट्रेकिंग्ला गेला की नाही..?? तुम्ही नाशिक मधे रहात होता ना... त्यामुळे तुम्हाला भरपूर ट्रेकिंग स्पॉट्स होते.
दुपारी लिहीते.
दुपारी लिहीते.
लिहा लिहा.. वेळ काढून लिहा..
लिहा लिहा.. वेळ काढून लिहा..
मला नासिक मध्ये एवढा वेळ
मला नासिक मध्ये एवढा वेळ मिळाला नाही ट्रेकिंग करता. लहानपण नासिक / नगर आणी जळगाव मध्ये गेल्याने जवळची ठिकाणेच पहाता आली.
पण आमच्या शाळा - कॉलेजची सहल नेहेमी वणीची देवी सप्तशृंगी ( साडेतीन पीठांपैकी एक ) इथे जायची. आधी मी पाचवीत असतांना गेले होते, मग कॉलेजला असतांना. पाचवीत असतांना बस मात्र पायथ्याशी उभी रहायची हे आठवते. कारण तो पर्यंत वर नीट रस्ता नव्हता. आम्ही चक्क तीन डोंगर चढुन गेलो. पाय दुखले नाही नी कसला त्रास झाला नाही. पण दर्शन घेऊन उतरतांना सगळे मुले - मुली तारक मेहेताच्या बापुजी सारखे ( वरच्या लिंक मधल्या व्हिडीओप्रमाणे ) पळत सुटले. माझ्या एका मैत्रिणीला उतरत असतांना वेगच आवरेना. आता ही तोंडावर आपटते की काय असे वाटले. पण आमच्या पिटीच्या सरांनी तिचा हात धरुन तिला एका साईडच्या कपारीच्या खाचेत ढकलले. घाबरुन तिचे डोळेच तिरळे झाले होते.
नंत्तर एकदा ९ वीत असतांना सापुतार्याला गेलो होतो. तिथला सूर्यास्त बघायलाच लोक एका टेकडीवर जातात. तो इतका जवळुन कधीच पहायला मिळत नाही पण तिथे आहे. सापुतारा २ दिवसाची छान ट्रिप होऊ शकते.
औरंगाबाद जवळचा दौलताबाद / देवगिरी किल्ला पण शाळेच्या ट्रिप मध्येच बघीतला. औरंगाबादला बिबीका मकबरा, खुल्दाबाद आणी वेरूळची लेणी. दौलताबाद किल्ल्यातला तो खंदक पाहुन हादरायला झाले. पूर्वी शत्रु येऊ नये म्हणून खंदकात मगरी पण सोडायचे.
काल मुलीला गडांची माहिती विचारली तर म्हणते की साधे सिंहगडावर नेले नाही, मग पुस्तकी वाचनाचा काय फायदा? खरे आहे. आपल्या मुलांना हा पुस्तकी इतिहास शिकवण्या ऐवजी प्रत्यक्ष सिंहगड, तोरणा, राजगड आश्या अनेक गडांवर नेले पाहीजे. तरच मुलांना त्या काळातल्या मेहेनतीचे महत्व पटेल.
अजीत दादा, तुमच्या अश्याच जुन्या अनुभवां विषयी इथे लिहीत रहा. वाचायला नक्कीच आवडेल.
डिजे, तुमचे अनूभव पण लिहा.
डिजे, तुमचे अनूभव पण लिहा.
Srd , तुमचे अनूभव वाचलेत. छान आहेत.
वैनी, भारी किस्से सांगितले
वैनी, भारी किस्से सांगितले आहेत
घाबरुन तिचे डोळेच तिरळे झाले होते>>
खरं आहे, मुलांना ट्रेकिंगला न्यायला हवं. त्यांच्या वयानुसार छोटे अन सोपे ट्रेक्स करायला हवेत. मीही लवकरच लिहिन कलावंतीण अनुभवाबद्दल.. जाम टरकली होती. केव्हातरी हे लिहिलेच पाहिजे. लवकरच लिहिन.
रश्मी भारी किस्से आहेत. मी पण
रश्मी भारी किस्से आहेत. मी पण शाळेची सहल जाणार असली की सगळ्यात पहिले वर्गात जायचो एरवी कंटाळा करायचो.
मुलांना ट्रेकिंगला न्यायला
मुलांना ट्रेकिंगला न्यायला हवं.- DJ
Srd , तुमचे अनूभव वाचलेत रश्मी
शाळेची सहल जाणार असली की सगळ्यात पहिले वर्गात जायचो एरवी कंटाळा करायचो. - बोकलत
आपण इकडे किस्से लिहिले तर धागा हाइज्याकची तक्रार होईल का?
किश्शांचा वेगळा धागा हवा. ( फसलेल्या पिकनिक चांगल्या लक्षात राहतात
मी माझ्या मुलीला ट्रेकला ( डोंगर चढणे ) नेलं नाही. पण छोट्या सहलींला ( फक्त आमचे आमी) नेलं. सापुतारा,वापी,बोर्डी, नेरळ, भीमाशंकर, दापोली, महाबळेश्वर, खानवेल,अलिबाग,भंडारदरा,गुहागर,पालघर,केळवे, रायगड ( रोपवेमुळे) ,खंडाळा,लोणावळा, ( आणि दुसऱ्या राज्यांतल्या)
आपण इकडे किस्से लिहिले तर
आपण इकडे किस्से लिहिले तर धागा हाइज्याकची तक्रार होईल का?
किश्शांचा वेगळा धागा हवा. ( फसलेल्या पिकनिक चांगल्या लक्षात राहतात>>>>> जरुर जरुर +११११
डिजेव, बोकलत धन्यवाद !
खंदक पाहुन हादरायला झाले.
खंदक पाहुन हादरायला झाले. फोटो आहेच तसा.
Same.. असंच कलावंतीण दुर्गाचा
Same.. असंच कलावंतीण दुर्गाचा फोटो पहिला. पायऱ्या वगैरे पाहून वाटलं भारी आहे, केलाच पाहिजे. आणि मग आम्ही फक्त ६ च जण गेलो होतो. १३ वर्षांपूर्वी . नो गूगल मॅप्स era. आम्ही एकमेंकाना मदत करायला लोक हि कमी होतो, एका पॉईंट ला भीती वाटली एकटं मधल्या दगडी patch वरून जायला. तो अगदी माझा डर के आगे जीत हे moment होता. नंतर उतरताना उलट मग खूप च भारी फीलिंग आली आणि उत्साह ही when you face and conquer your fears type. Definitely माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय आणि आनंददायी ट्रेक होता हा.