इथून मागे कदाचित प्रत्येक दहा दहा वर्षांच्या टप्प्यावर उभे राहून बघितले तर शेतीतल्या अनेक कामांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले आढळेल. शेतीतल्या अनेक आधुनिक स्वयंचलीत अवजारांनी आधीच्या अवजारांची जागा घेतल्याने, नवनव्या लागवडीच्या पद्धती आल्याने, त्या त्या कामांचे स्वरूप ओघातच बदलून जाते. या नवीन कार्यपद्धतींत नवीन संज्ञा जन्म घेतात आणि त्या यथावकाश रूळतात. यात काही पारंपारीक संज्ञा मागे पडतात. शेतीतल्या अशा नव्या-जुन्या संज्ञांचे संकलन करण्यासाठी हा धागा.
माहिती विचारण्यासाठी / शेअर करण्यासाठी / पडताळून पाहण्यासाठी.
१) घात येणे / घातीला येणे : लागवडीतल्या एखाद्या कामाची सुरुवात करण्याची योग्य वेळ येणे.
उदा. भाताचे पिक घेण्यासाठी वावरात बरेच सोपस्कार करावे लागतात - नांगरणी, कुळवणी, पाटलणी, पेरणी, कोळपणी, बिलंगणी, भांगलण/खुरपणी, कापणी, झोडपणी, मळणी, वाढवणी, वाळवणी इ.
यात पेरणी करण्यापूर्वीच्या प्रत्येक प्रक्रियेसाठी ऊन (तापमान), पाऊस, वारा इ. हवामानाची स्थिती, जमिनीची स्थिती (ओलेपणा, सुकेपणा, टणकपणा, भुसभुशीतपणा इ.) असे योग्यप्रमाणात जुळून यायला हवे असते. त्यानंतरच्या प्रक्रियांसाठी पेरलेल्या पिकाच्या वाढीचा नेमका टप्पा आणि आणि त्या टप्प्यातल्या प्रक्रियेसाठी पूरक इतर स्थिती (हवामान, जमीन इ.) जुळून येणे आवश्यक असते. तर अशी नेमकी वेळ जुळून आली की घात आली किंवा घातीला आले म्हणतात. ही घात नेमकी ओळखणे आणि साधणे महत्त्वाचे असते. (हुशार शेतकरी ती कधी चुकू देत नाही. एकवेळ लगीन फुडं ढकलंल, पर घात चुकवून भागायचं नाय.)
उदा. कुळवणीची घात आली. भुईमूग भांगलणीसाठी घातीला आलाय. इ.
मला जमेल तसे मी इथे लिहीत/विचारीत जाईन. तुम्हीही भर घाला. तोपर्यंत हे लिहिता लिहिता आठवलेल्या पारंपारीक शेतीतल्या पण आता आधुनिक शेतीत लोप पाऊ पाहणार्या काही संज्ञा इथे नोंद करून ठेवतो.
-----------------------------------
नांगर, फाळ, कुळव, फास, जाणवळे, पाटे, तास, काकरी, ओटी.
-----------------------------------
| शिवाळ, सापती, जू, नांगरी, यटाक, कुरी, नळे, चाडे, फण, सर, पात, तिफण, मोगणा, कोळपा, बिलंगा, फेसाटे, आकडी, दातके, यांग/यंग, पेंढी, पाचुंदा, भारा, पाट, पोसवणे | खुरपे, विळा, तिरवडे, टिकाव, कुदळ, फावडे, पार, वाकास | पुट्टा, पैरा, पाहुणेर | मुसकी, झूल |
-----------------------------------
मस्त धागा गजाभाऊ, अजून
मस्त धागा गजाभाऊ, अजून माहिती लिहा सविस्तर. सर्व हत्यारे / औजारे यांची माहिती / फोटो हे पहायला आवडेल.
मस्त गजनानभाऊ. हत्यारे आणि
मस्त गजनानभाऊ. हत्यारे आणि औजारे यांचे फोटो टाका. ह्यातील बरीच औजारे आता बघायलाही मिळत नाहीत.
छान धागा... मीही हे शब्द
छान धागा... मीही हे शब्द नवीनच ऐकतेय.. कित्येकान्चे अर्थ माहीत नाहीत.
गेल्या जुनमध्ये आथवडाभर खुप पाउस झाला व नन्तर दोन दिवस थोडा कमी झाला व शेतीची थोडी कामे करता आली. तेव्हा लोक दोन दिवस घात पडली असे म्हणत होते. घात हा शब्द कथान्मधुन ऐकलेला पण प्रत्यक्श वापर तेव्हा पहिल्यान्दा पाहीला.
चांगला धागा. , औत, मोट वगैरे
चांगला धागा. , औत, मोट वगैरे इतिहासजमा होत आहे. याचे विडिओ ठेवायलि हवेत. माथेरानच्या जुमापट्टी भागात एक ओजार पाहिले. कुंपणासाठी ज्या करवंदीच्या जाळ्या उचलून आणतात त्यासाठी बनवलेले. काटे न लागता मोळी आणता येते. पुढच्या वेळेस फोटो काढेन.
छान धागा! या साऱ्या
छान धागा! या साऱ्या गोष्टींविषयी वाचायला नक्कीच आवडेल. घातवार हा शब्द ऐकलेला आहे पण त्याला उगीच एक नकारात्मक अर्थछटा जोडलेली होती मनात. लेखातली माहिती वाचून तसे काही नाही हे लक्षात आले.
रोचक धागा. वाचायला आवडेल.
रोचक धागा.
वाचायला आवडेल.
घात प्रमाणे मावळात याला वाफसा
घात प्रमाणे मावळात याला वाफसा म्हणतात
रोचक धागा.
रोचक धागा.
शेती आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित खालील शब्दांशी माझा शब्दखेळांमध्ये संपर्क येतो :
१. कापा, बरका आणि सकल्या या फणसाच्या जाती
२. माळवद व दारवंट हे घराशी संबंधित शब्द
३. वापी आणि बारव हे विहिरीचे प्रकार
४. कोळपे, स र वा
नांगराचे काही भाग:
नांगराचे काही भाग:
शिवळा
जोती
हळस
येठनं
कोडके
वेळं
कासरा
फाळ
रुमणे
मोटेचे काही भाग
चाक
कणा
नाडा
सोंदूर
कडे
सोंड
मोटकरी
धाव
थारोळे
मेट
छान धागा... अगदी माहितीपूर्ण.
छान धागा... अगदी माहितीपूर्ण..!!
मंडळी, प्रतिक्रियांबद्दल
मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
चिडकू, भारी.
शक्य असेल तर प्रत्येक संज्ञेबद्दल अधिक माहिती लिहिलीस तर छान होईल. सविस्तर शक्य नसेल तर संक्षिप्तही चालेल.
धागा आवडला.
धागा आवडला.
आता फोटो/ विडिओ हवेत.
आता फोटो/ विडिओ हवेत.
आज नांगर काय असतो ते बघू.
आज नांगर काय असतो ते बघू.
२) नांगर (एकवचन, पु.) : नांगर हे एक दणकट प्रकारात मोडणारे औत आहे. जमीन खोलवर खणून खालची माती उलथून वर काढण्यासाठी, तसेच मका, हरभरा इ. पिकांच्या पेरणीसाठी नांगर वापरला जातो. पुढील वर्णन हे लाकडी नांगराचे आहे. या नांगराचा जमिनीत घुसून तिला कापून भली चर पाडीत जाणारा भाग हा पोलादी असतो आणि त्याला नांगराचा फाळ म्हणतात. नांगराचा फाळ सोडून इतर भाग हा बाभूळ अथवा सागाचे मजबूत लाकूड तासून त्यापासून बनवलेला असतो. यात मुख्यतः १०-१२ फुटाची एक मोठी गोल (सिलिंड्रिकल) दांडी असते. दांडीच्या एका टोकाला बैलजोडी जुंपतात आणि दुसर्या टोकाला चित्रात दाखवल्याप्रमाणे दांडीच्या वर मूठ बसवलेला एक उभा भाग असतो त्याला लुमणे ( किंवा रुमणे) म्हणतात. मुठीचा उपयोग हा मुख्यतः नांगर पुढे सरकताना त्याचा तोल सावरण्यासाठी होतो. याच टोकाला पण दांडीच्या खाली (जमिनीकडच्या बाजूला) एक तिरका शंक्वाकृती लाकडी भाग बसवलेला असतो त्याला तळ /तळवा म्हणतात.
फाळाला धनुष्यबाणाप्रमाणे टोक असते. (हे टोक म्हणजे 'सीत' आणि यावरून सीतेला 'सीता' हे नाव पडले असे म्हणतात.) फाळाच्या पोलादी टोकाच्या मागे वर म्हटलेल्या तळाचा टोकदार भाग फिट बसेल अश्या धातूच्या पट्ट्या असतात. धातूच्या या कंकणाकृती भागाला इडी (किंवा काही ठिकाणी वसू) म्हणतात.
जमीन फार टणक असेल तर नांगराने तिला फाडण्यासाठी खूप ताकदीची आवश्यकता असते. अश्यावेळी एकापुढे एक अश्या दोन किंवा जास्त बैलजोड्या जुंपून नांगरट केली जाते. जरी हा नांगर बैलांनी ओढला जात असला तरी तो जमिनीत घुसून (तिला फाडीत) पुढे सरकत असताना त्याचा वेग आणि तोल सावरणे, जेणेकरून एका लागोलाग एका रेषेत, एकीस एक समांतर अश्या चरी पडतील, आणि त्याचवेळी बैलांना नेमके दिग्दर्शन देणे, पुढे सरकणारा नांगर मध्येच जमिनीतून उसळून वर येऊ नये याकरता नांगरावर मुठीच्या साहाय्याने योग्य दाब देत, वेगाचे मीटर सांभाळत नांगरामागे, जमिनीतून निघालेल्या ढेकळांतून चालत राहणे यालादेखील ताकद, प्रशिक्षण, सूसुत्रता आणि कौशल्याची आवश्यकता असते. नांगर हाकणारा माणूस हा या सगळ्या गोष्टी एकाच वेळी साधण्यात प्रवीण असतो. बैलजोडी अवखळ असेल तर नांगर हाकण्यासाठी एकास दोघे असतात. एकजण नांगर सांभाळण्यासाठी आणि एकजण बैल हाकण्यासाठी. नांगरणीसोबत पेरणीही चालू असेल तर नांगरामागून पडलेल्या चरीत बी पेरण्यासाठी पोटावर बियाण्याची ओटी बांधली तिसरी व्यक्ती असते.
हा झाला लाकडी नांगर. त्यानंतर आपल्या किर्लोस्कर बंधूंनी लोखंडी नांगर बनवला. त्याचे संपूर्ण अंग हे धातूचे असते.
तो कसा असतो हे इथे बघता येईल -
https://www.kirloskarpumps.com/wp-content/uploads/2021/02/An-early-iron-...
मग ट्रॅक्टराची नांगरणी आली.
मस्त माहिती गजानन!
मस्त माहिती गजानन!
३) कुळव: (एव. पु.)
अमोल, धन्यवाद!
३) तास : कोणत्याही औताने
३) तास : कोणत्याही औताने वावराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मारलेली मजल म्हणजे एक तास (इथे तास म्हणजे अंतर). उदा. नांगराचे चार तास हाणून झाल्यावर त्याने विसाव्यासाठी औत थोडे थांबवले.
जेंव्हा आपण एखाद्या वावरात औतायला शिरू तेंव्हा सर्वात प्रथम वावरच्या चारी बांधांना घासून औताचे एक चौकोनी तास मारतो. म्हणजे चित्रात दाखवलेली लाल रंगाची रेघ. इथे एका कोपर्यावर आरंभ होऊन वावराच्या कडेने एक वेढा मारून पुन्हा तिथे पोचतो. याला कडतास म्हणतात. कडतास पूर्ण झाल्यावर मग निळ्या रेषेप्रमाणे नागमोडी वळणे घेत आतली तासे मारली जातात.
४) कुळव: (एव. पु.)
नांगराप्रमाणेच कुळव हे औतदेखील जमिनीची मशागत करण्यासाठी वापरले जाते. वावरात आधी नांगरणी केलेली असेल तर त्यातून निघालेले मातीचे ढेकळ फोडण्यासाठी वावरात कुळव चालवतात. तसेच आधीच्या पिकाची कापणी झाल्यानंतर त्याच्या रोपांचे बुडखे - ज्यांना 'सड' म्हणतात - जमिनीत तसेच राहिलेले असतात. अश्यावेळी नव्या पिकासाठी जमीन तयार करताना आधीचे सड मुळापासून उखडण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी वावरात कुळव चालवतात. (उखडलेले सड नंतर वेचून बाजूला काढले जातात.)
कुळवाला चित्रात दाखवल्याप्रमाणे साधारण तीन फूट लांबीचा इष्टिकाचित्तीच्या आकाराचा प्रमाणबद्ध तासलेला एक मजबूत लाकडी ओंडका असतो. या लाकडी ओंडक्याच्या मध्यावर दोन लांब बांबू फिट बसवलेले असतात. या झाल्या कुळवाच्या दोन दांड्या.
ओंडक्याच्या जमिनीकडच्या पृष्ठावर दोन टोकांकडे दोन अश्या लहान लाकडी खुंट्या खालच्या बाजूने ठोकलेल्या असतात. या खुंट्यांना जानवळी (ए.व. जानवळे) म्हणतात. जानवळ्याच्या दुसर्या टोकाच्या कडेवर धातूचे कंकणाकृती कडे (इडी) बसवलेले असते. प्रत्येक जानवळ्याच्या टोकाच्या उघड्या लाकडी छेदात एकेक खोबण असते. या खोबणीत कुळवाची फास ठोकून बसवतात (ज्यामुळे दोन जानवळी जोडली जातात). कुळवाची फास म्हणजे दोन जानवळ्यांमधील अंतराच्या लांबीची चार-पाच सेमी रुंदीची आणि साधारण पाऊण सेमी जाडीची एक पोलादी कांब असते. फासेच्या दोन्ही टोकांना काटकोनात दोन टोकं असतात, जी जानवळ्यांच्या खोबणीत जाम बसतात. फासेला बाहेरच्या कडेला धार असते.
कुळवाच्या ज्या दोन लांब दांड्या असतात त्यांच्या मोकळ्या टोकांना बैलजोडी जुंपतात. बैलांचे कासरे हातात धरून कुळव चालवणारा माणूस ओंडक्याच्या मध्यभागी उभा राहून बैलांना हाकतो. माणसाच्या वजनाने अधिक ओंडक्याच्या वजनाने कुळवाच्या फासेचा भाग जानवळ्यासह जमिनीत घुसतो. कुळव जसजसा जमिनीतून पुढे सरकतो तसतशी फासेने ढिली झालेली माती ही कुळवाचा ओंडका आणि फास यांमधल्या मोकळ्या खिडकीतून मागे पडत राहते.
भुईमुगाची पिवळीधम्म चिटुकली फुले जरी डहाळीवर लागत असली, तरी त्याच्या शेंगा या जमिनीखाली मुळांना लागतात. भुईमुगाच्या रोपाला जाळी* असेही म्हणतात. याची मुळे जमिनीखाली वर्तुळाकार फैलावतात. अश्यावेळी दाणे भरलेल्या शेंगा काढण्यासाठी ती जाळी उपटून काढण्याखेरीज पर्याय नसतो. जाळी हाताने उपटली तर मातीत रुतलेल्या अर्ध्याअधिक शेंगा मुळांपासून तुटून जमिनीतच राहतात. हातात थोड्याफार शेंगासह नुसतीच जाळी येते. अश्यावेळी काढणीला आलेल्या भुईमुगाच्या वावरात कुळव चालवतात. कुळव हा या जाळ्यांच्या मुळांच्या खोलीच्याही खाली जाऊन अख्ख्या जाळीसह मातीचा वरचा थर जमिनीच्या खालच्या भागापासून सुटा करतो. यामुळे भुईमुगाच्या जाळ्या मुळांसह अलगत वर येतात आणि नंतर जाळीच्या मुळावरची माती झटकून हाताने मुळाच्या सगळ्या शेंगा तोडून घेता येतात. अश्या तर्हेने भुईमुगाच्या काढणीत कुळव अतिशय मोलाचं काम करतो. कुळवासाठी अधिक वजन आवश्यक असते अश्यावेळी एखादा मोठा दगडही ओंडक्यावर ठेवतात. किंवा लहान मुलांना दोन्ही हातांनी दोन दांड्यांना घट्ट धरून ओंडक्यावर उकिडवे बसवतात आणि कुळव चालवतात. (मुलांना हा प्रकार भयंकर आवडतो. कुळवावर बसण्यासाठी तू तू मै मै होते. मग एक-आड-एक 'तास' बसण्याचे ठरवून वगैरे दिले जाते. असो. )
कुळवत असताना क्वचित कधी फासेला खाली जमिनीत आडवा दगड लागला तर फास तुटतेही.
म्हणजे ब्लॉकर!
तो निस्तरल्याशिवाय पुढे कुळवणी चालू कशी ठेवणार? दुसरी फास आणून बसवणे आणि मोडलेली फास लोहाराकडे जोडणीसाठी टाकून येणे याशिवाय गत्यंतर नसते.
* मुळाला लागलेल्या शेंगा तोडून झाल्यावर या सगळ्या भुईमुगाच्या जाळ्या उन्हात चांगल्या वाळवून नंतर त्याच्या गंजी रचून ठेवतात, त्यांना भुईमुगाचे वेल म्हणतात. हा गुरांचा एक आवडता चारा. उन्हाळाभर आणि पुढे पावसळ्यात ताजा हिरवा चारा येईपर्यंत गुरांना हा चारा पुरवून पुरवून देता येतो.
किती मस्त माहिती आहे ही! अजून
किती मस्त माहिती आहे ही! अजून खूप वाचायला आवडेल!
जिज्ञासा, धन्यवाद!
जिज्ञासा, धन्यवाद!
५) मुंगळी / मोंगली :
५) मुंगळी / मोंगली :
वावरात नांगरणी किंवा कुळवणी केल्यानंतर मातीचे बरेच ढेकळ पृष्ठभागावर येतात. पेरणीच्या पुढच्या प्रक्रियांमध्ये हे ढेकळ अडथळा निर्माण करतात. म्हणून ते फोडून त्यांची बारीक माती करण्यासाठी मोंगली हे अवजार वापरतात. मोंगली म्हणजे साधारण पाऊणेक फूट लांबीचा, चारपाच इंच व्यासाचा एक छोटा लाकडी दंड (सिलिंडर) असतो. त्याला कळकाची एक चार-पाच फुटाची काठी (दांडी) बसवलेली असते.
लोहार ज्याप्रमाणे ऐरणीवरच्या लोहावर घणाचे घाव घालतो, त्यापद्धतीने ही मोंगली दोन्ही हातात वर उचलून ढेकळांवर आपटली म्हणजे ढेकळ फुटतात. लांब दांडी असल्याने एका जागी उभे राहून जास्त पृष्ठभाग उरकता येतो. मोंगली वजनाने हलकी असल्याने बायका-मुलांनाही सहज वापरता येते.
६) पाटे:
पेरणी करण्यापूर्वी नांगरणी, कुळवणी आणि मोंगलीच्या साहाय्याने ढेकळ फोडून जमिनीची माती भुसभुशीत केली जाते, हे आपण पाहिले. यानंतर जेंव्हा तिफण किंवा कुरीने बी पेरायचे असते तेंव्हा जमीन नुसती भुसभुशीत असून चालत नाही, तर या सगळ्या प्रक्रियांमध्ये वावरातील अस्ताव्यत झालेली माती एकसारखी करून वावराचा पृष्ठभाग सपाट करणे गरजेचे असते. (तिफण आणि कुरी म्हणजे काय, हे आपण पुढे पाहू.) कारण वावराचा पृष्ठभाग सपाट असेल, तर पेरणीदरम्यान कुरीच्या / तिफणीच्या फणांद्वारे मातीत पेरले जाणारे बी हे सगळीकडे समान खोलीवर पेरले जाते. तसेच सपाट पृष्ठभागामुळे कुरी, तिफण, मोगणा इ. साधने ही पेरणीदरम्यान न अडखळता, आचके न देता, वावरात सरसर पुढे सरकतात.
पेरणीदरम्यान मातीत बी सोडण्यासाठी कुरी किंवा तिफणीच्या फणाने जी चर पडते तिला काकरी म्हणतात. आणि पेरणी करून झाल्यांतर (म्हणजेच काकरीत बी सोडून झाल्यानंतर) या काकर्या बुजवून वावराचा पृष्ठभाग पुन्हा सपाट करणे गरजेचे असते. कारण जर काकर्या न बुजवता तश्याच ठेवल्या तर हुशार पाखरे काकरीतली बी वेचून उगवण्यापूर्वीच ते खाऊन टाकतात.
वरील दोन्ही गोष्टींसाठी - म्हणजे पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर वावराचा पृष्ठभाग सपाट करण्यासाठी - जे औत वापरले जाते ते म्हणजे पाटे होय.
यात साधारण पाच फूट लांबीचा एक लांबोडका लाकडी ओंडका असतो, ज्याला कुळवाप्रमाणे कळकाच्या दांड्या बसवलेल्या असतात. कुळव-पाटे हे भाऊ-भाऊच म्हणा ना! एकजण जमीन उकरून मशागतीत हातभार लावतो, तर त्या पाठोपाठ दुजा येऊन ही उकरलेली माती सपाट करून पेरणीआधी आणि पेरणीनंतर शेतकर्याला पुढील प्रक्रियांसाठी वाट मोकळी करून देतो. कुळवाप्रमाणेच पाटे हे बैलजोडीच्या साहाय्याने हाकले जाते. गरजेप्रमाणे पाट्यावर उभे राहून / उभे न राहता पाटलणी केली जाते. पाटे हाकणे हे औतातले तुलनेत सोपे काम म्हणता येईल. शेतकर्याची लहान पिढी ही इतर औतांना हात घालण्यापूर्वी पाटे हाकून आपला हात साफ करून घेते. पाटे चालवताना ते थोडे वाकडे-तिकडे चालले तरी काऽही बिघडत नाही. माती सगळीकडे सपाट झाली म्हणजे झाले. तासामागून तास हाणत वावराची पाटलणी पूर्ण होते.
मस्त माहिती मिळत आहे! मी
मस्त माहिती मिळत आहे! मी शाळेत असताना कार्यानुभव नावाचा विषय असे. त्यात एक वर्ष शेती/बागकाम होते आणि त्या सरांकडे सर्व औजारांची माहिती देणारे सचित्र पुस्तक होते त्याची आठवण झाली.
गजानना, मस्त माहिती देतोयस बघ
गजानना, मस्त माहिती देतोयस बघ
धन्यवाद, स्वाती, हर्पेन.
धन्यवाद, स्वाती, हर्पेन.
भांगलण :
जमिनीच्या मशागतीचे सर्व सोपस्कार यथासांग पार पाडल्यानंतर शेवटी पेरणी केली जाते. बियाण्याला एकदा का धरतीच्या उदरात मातीच्या मऊ कुशीत निद्रीस्त केले की मग शेतकर्याला थोडा विसाव्याचा नि:श्वास टाकण्याची फुरसत मिळते आणि त्याचवेळी शेतकर्याने पेरलेल्या त्या बीला योग्य त्या नेमक्या क्षणी रुजवून, अंकुराला या जगात आणण्याच्या कार्यासाठी निसर्ग आपल्या घड्याळाचे काटे जुळवण्यात, आर्द्रता आणि तपमानाची निरिक्षणे नोंदवण्यात मग्न होतो.
बिया रुजून रोपे जमिनीवर वितेकभर उंचीची झाली की भांगलण करावी लागते. भांगलण म्हणजेच खुरपणी. पेरलेल्या बियांबरोबरच न पेरलेल्या पण निसर्गतःच मातीत उपस्थित असलेल्या, मागच्या वर्षीच्या हंगामात मातीत झडलेल्या गवताच्या बियाही अंकुरतात आणि पिकाच्या रोपांबरोबर ते गवतही फोफावते. हे गवत म्हणजेच तण. ते मातीतल्या पोषणावर डल्ला मारून वाढीसाठी पिकाबरोबर स्पर्धा करू लागते. यात पिकाच्या रोपांची वाढ खुंटते. म्हणून मग खुरप्याच्या साहाय्याने ही गवताची रोपे मुळासकट उपटून काढतात. या कामाला भांगलणी अथवा खुरप्याच्या साहाय्याने केली जाते म्हणून खुरपणी म्हणतात.
भांगलण करणे हे चिकाटीची कसोटी बघणारे काम होय. पायावर उकिडवे बसून पिकाच्या रोपातल्या एकेका ओळीतले तसेच दोन ओळींमधल्या मोकळ्या जागेतले गवताचे अक्षरशः एकेक रोप ओळखून एका हाताच्या चिमटीत ते धरून दुसर्या हातातल्या खुरप्याच्या टोकाने त्याला मुळासकट मातीतून उपटायचे. हे करताना पिकाच्या रोपाला धक्का लागत नाही, हे पाहायचे. असे करत करत अख्खे वावर भांगलायचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक चिकाटीची परिक्षाच.
१) पात : एका वावरात समजा रोपांच्या शंभर उभ्या ओळी आहेत, आणि पाच माणसे भांगलायला आहेत. तर प्रत्येक व्यक्ती एकावेळी साधारण पाच पाच ओळी भांगलायला घेईल. तर ही पाच ओळींची पात झाली म्हणायची.
२) तिरवडे / तिरावडे : हे एक लाकडी साधन. एक फूट x पाऊण फूटाची एक लाकडी फळी आणि दुसरी त्यापेक्षा थोड्या लहान मापाची फळी. या दोन फळ्यांना बांबूच्या वितभर तुकड्याने जोडलेले असते. ही झाली पाण्याने भरलेल्या चिखलाच्या वावरात भांगलण्यासाठी बसायची छोटीशी खुर्ची अर्थात तिरावडे! सुताराकडून तिरावडी बनवून घेतात. चिखलयुक्त वावरात रोपांच्या दोन ओळींच्या मध्ये हे तिरावडे ठेवून त्यावर बसून भांगलतात.
३) खुरपे : लाकडी मूठ असणारे एक बारके अवजार म्हणजे खुरपे. याचे लोखंडी पाते विळीप्रमाणे अर्थगोल पण तिच्यापेक्षा लहान आकाराचे असते. पात्याचे एक टोक लाकडी मुठीत घट्ट बसवलेले असते. दुसरे टोक अणकुचीदार असते आणि हे टोक गवताला मुळापासून उपटण्याच्या कामी येते. खुरप्याच्या अर्थगोलाची आतली बाजू धारदार अन् त्याचबरोबर अतिशय लहान टोकांनीयुक्त अशी दातेरी असते. (करवताप्रमाणे, पण करवताचे दात खुरप्याच्या तुलनेत फारच मोठे असतात.). खुरपी लोहाराकडून घडवून घेतात. प्रत्येक वर्षी भांगलणीपूर्वी घरातली सगळी खुरपी लोहाराकडून धार लावून आणली जातात. दसर्याच्या शस्त्रपूजेत खुरप्यांचाही समावेश असतो.
४) मुठी उचलणे : मुठी उचलणे हे भांगलणीतले एक उपकाम. भांगलणार्या व्यक्ती जसजश्या तण काढत काढत पातीतून पुढे सरकतात तेंव्हा मागे काढलेल्या तणांच्या मुठीचे ढीग पडत जातात. पूर्ण वावर भांगलून झाल्यावर एक-दोन जण सगळ्या वावरातल्या उपटून काढलेल्या तणाच्या मुठी उचलून वावराबाहेर टाकतात. म्हणजेच मुठी उचलणे.
५) एकारणी: संपूर्ण शेतातल्या सगळ्या वावरात भांगलणीची एक फेरी पूर्ण झाली म्हनजे भांगलणीची एकारणी झाली.
६) द्वारणी : भांगलणीची एकारणी झाल्यानंतर म्हणजेच एकदा मुळासकट तणाला काढले तरी पुन्हा तण नव्याने उगवते आणि पुन्हा जोम धरू लागते. मग दुसर्याम्दा भांगलण करावी लागते. दुसर्यांदा केलेली भांगलण म्हणजेच द्वारणी. कधी कधी त्यारणी / तिहारणीही करावी लागते.
७) पैरा / पुट्टा : म्हणजे एकमेकांच्या शेतातली भांगलण करण्यासाठी एकत्र येऊन तयार झालेला गट. (उदा. तो अमुक यंदा त्या तमक्याच्या पैर्यात/पुट्ट्यात गेलाय.
गजानन,
गजानन,
छान धागा, मस्त माहिती.
खुरपे लहान असते आणि त्याला फार धार नसते, तसेच पण मोठे आणखी अर्धगोल बाक असणारे आणि धार असणारे हत्यार म्हाजे विळा. गवत किंवा कांदे पातीपासून कापायला, तत्सम जाड पीक कापायला वापरतात
बियाण्याची ओटी>>>>> आमच्या
बियाण्याची ओटी>>>>> आमच्या गावी जुनी आजोबांनी वापरलेली ओटी आहे. त्याला घुंगरू लावले आहेत. माळ्यावर पडली होती ती मी आणली आहे. जमलं तर फोटो टाकेन.
ऋतुराज, धन्यवाद.
ऋतुराज, धन्यवाद.
बरोबर, विळा हा खुरप्यापेक्षा जास्त मजबूत आणि धारदार असतो.
घुंगरू लावलेली ओटी. मस्त. फोटो टाका (च).
तुम्हीही जसे जमेल तसे इथे भर घालत राहा.