"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"
बकेट लिस्ट म्हटल्यानंतर बहुतेक लोकांच्या मनातल्या इच्छा या कळत्या वयामधल्या असतात.
कुठेतरी बकेट लिस्ट हा शब्द ऐकलेला असतो, बर्यापैकी वाढलेल्या वाचनात आलेला असतो…
कुठेतरी, कोणाच्यातरी बकेट लिस्टबद्दल माहिती आलेली असते, तर कधी चित्रपट आलेले, पाहिलेले असतात.
पण नकळत्या वयामधल्या, लहान वयामधल्या तीव्र इच्छा यांना बकेट लिस्ट म्हटल्याचं मी तरी कुठे ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं नाहीये.
पण अशा ना कळत्या वयातल्या वेगळ्या Uncommon तीव्र इच्छा...
ज्यांची निदान त्या काळात प्रचंड आस असेल, त्या काळातल्या प्रत्येक दिवसामधला बराचसा वेळ या इच्छेभोवतीच फिरत असेल.. तर त्याला बकेट लिस्ट म्हणता येणार नाही का ?
तर अशा, अगदी लहान वयातली एक आणि नंतर थोडसंच मोठं झाल्यानंतरची एक, अशा माझ्या दोन इच्छा.. खरंतर बकेटलिस्ट मधल्या म्हणू शकतो अशा, मला आठवतायत. त्यातली पहिली मी आज इथे देतोय.
माझ्या पहिल्या बकेट लिस्ट मधल्या माझ्या पहिल्या इच्छेचा जन्म 'हाथी मेरे साथी' हा चित्रपट बघून आल्यावर झाला आणि तो म्हणजे स्पेशली माझ्यासाठी असलेला एक हत्ती घरी पाळणे.
त्या काळात या इच्छेचं माझ्या मनावर प्रचंड गारुड होतं. दिवसेंदिवस मी माझ्या आईवडिलांकडे हत्ती आणा, हत्ती आणा म्हणून धोशा लावला होता.
त्यावेळेला आम्ही तळ अधिक एक मजली असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहायचो. पहिल्या मजल्यावरती एकच घर होतं, ते म्हणजे आमचं.
घराला पुढे जवळजवळ पाच-साडेपाच फूट रुंदीची आणि लांबलचक बाल्कनी होती. थोडीशी जुन्या दादर माटुंग्यामधल्या जुन्या इमारतींच्या पॅसेजची किंवा स्वतंत्र व्हरांड्याची आठवण करून देणारी
हत्ती पाळण्याबाबत त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रॅक्टीकल प्रश्नाला माझं तेवढंच सो काॅल्ड प्रॅक्टिकल उत्तर तयार असायचं, आणि मुळात त्यात कुठलाही बनेलपणाही नसायचा.
खरं तर एखादी कल्पक व्यक्ती, एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्याचा मनापासून प्रयत्न करते तसं ते काहीसं असायचं.
तर बाबांनी विचारलं अरे त्या तुझ्या हत्तीला ठेवायचं कुठे ? राहणार कुठे तो ?
तर मी म्हणायचो की खालीच राहील की तो इमारतीच्या आवारात.. आणि आपल्याला वाटलं तर त्याला बोलवायचं.. त्याची सोंड येईलच आपल्या बाल्कनीमध्ये..
म्हणजे त्याला फळं, केळी सगळं भरवता येईल.
अरे पण त्याला खायला किती लागेल ? ते सगळं कसं आणणार आपण ?
छे छे.. आपण कशाला काही आणायचं ?
त्याचा तोच आजूबाजूच्या झाडांची पानं, गवत असं काहीतरी खाऊन राहिल. जंगलात कुठे कोणी त्याला खायला देतं..?
एवढा मोठा असतो तो तर इथे तिथे, आजूबाजूला जाऊनही खाऊन येईल. आपण आपलं त्याला थोडीशी केळी, सफरचंद, ऊस असं काहीतरी खाऊ म्हणून देत जाऊ..
अरे पण एवढं खाऊन तो रोज हा एवढा मोठा शी करून ठेवेल त्याचं काय करायचं ? कोण साफ करणार ते ?
हॅ… आपण कशाला साफ करायचं ?
आपल्या खालच्या घरातल्या अम्मा कुठे कुठे गोठ्यामध्ये जाऊन शेण मागून आणतात आणि त्यांचं अंगण सारवतात. आपल्या हत्तीने शी केला तर त्यांची आयतीच सोय होईल. त्या आपल्यावर खुश होतील आणि हत्तीवरही. थोडसं खायलाही देतील त्याला.. जसं मला नेहमी देतात तसं
अरे पण त्याला दिवसभर सांभाळणार कोण ? तू तर दिवसभर शाळेत जातोस..
म्हणजे काय, तो गॅलरीत येऊन सोंड वरती करेल..
मी सोंडेवरून त्याच्या पाठीवरती जाईन.. तो मला शाळेत सोडेल, माझं दप्तरही सोंडेत धरेल. माझी शाळा सुटेपर्यंत तिकडेच राहिल शाळेच्या ग्राउंडवर.. शाळा सुटल्यावर परत मला घरी घेऊन येईल.. मला न्यायचा आणायचा आईचा त्रास पण वाचेल आणि कधीकधी ते आजोबा मला आणि चार-पाच मुलांना शाळेत सोडतात त्यांना पैसे द्यायला नकोत.. सगळं काम फुकटात..
शिवाय मला शाळेत, रस्त्यात कोणी त्रासही देणार नाहीत.
संध्याकाळी तो मला तलावपाळीवर फिरवूनही आणेल.
आईलाही नारळ फोडून देईल.. किती अडतं तीचं त्यावाचून तुम्ही फॅक्टरीत जाता तेव्हां.
रात्री तो आपल्या घराची कुत्र्यापेक्षा पण भारी राखण करेल, आपलं रक्षण करेल ते वेगळंच.
कुठल्या चोराची छाती होणार नाही आपल्या घरी यायची..
मग आणायचा ना हत्ती…?
त्या निरागस बालवयात हत्ती पाळणं म्हणजे काय, त्याचा खर्च, जंगलखात्याच्या अशा बाबतीत परवानग्या, कायदेकानून हे काहीच माहिती नव्हतं.
त्यामुळे जवळजवळ सहा आठ महिने हा नाद मला पुरला.
बरं बाबांच्या फॅक्टरी पासून येऊरचं जंगल जवळच होतं. त्यामुळे रोज संध्याकाळी वाटायचं की बाबा कामावरून येताना फटफटीच्या मागे हत्तीला दोरखंड बांधून त्याला घेऊन येतील.
या गोष्टीची त्या काळात मी किती वाट पाहिली असेल त्याची गणतीच नाही..
कधी बाबांना उशीर झाला तर माझी आशा जास्तच प्रज्वलित व्हायची की ते बहुतेक माझ्यासाठी हत्ती आणत असणार म्हणून..
फक्त एक गोष्ट मात्र होती, की माझ्या आई-बाबांनी हत्ती आणून देऊ, बघू नंतर कधीतरी, अशी कुठलीही खोटी आशा मला लावली नव्हती.
तसं जर असतं तर या इच्छे मधून मधून बाहेर पडायला मला प्रचंड त्रास झाला असता.
विचित्र असल्यामुळे ही माझी प्रचंड आस लागलेली इच्छा खरं तर कधीच पूर्ण होणार नव्हती, त्यामुळे म्हटलं तर त्या इच्छेला काही अर्थ नव्हता.
अर्थात मुदुमलाईच्या किंवा तत्सम जंगलात जाणं, तिथे हत्तींसमवेत रहाणं, त्यांच्यावर काम करणं असे म्हटलं तर पर्याय होते. पण माझ्या लहानपणीच्या काळात किंवा किमान मोठं होत असताना ते पर्याय माझ्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड होतं.
पुढे मायबोलीवर जेव्हा अर्निकाचे हत्तींवरचे लेख वाचले तेव्हा त्या लेखांशी पार मनाच्या काहीतरी तारा जुळल्या सारखं वाटलं.
एक मात्र झालं... या इच्छेमुळे माझा प्राणी प्रेमाचा पाया, वाइल्ड लाईफची आवड अशा अनेक गोष्टी रुजल्या असाव्यात, ज्याचा एक छंद म्हणून मला खूप फायदा झाला.
त्यामुळे अशी एखादी बकेट लिस्ट मधली इच्छा जरी पूर्णांशाने पुरी झाली नाही तरी त्या इच्छेमधली तळमळ तुम्हांला नक्कीच काहीतरी त्याच्या आजूबाजूचं किंवा त्याच्या वरचंही काहीतरी देऊन जाते असं मला वाटतं.
ती इच्छा पूर्ण नाही झाली तरी आपला कल असतो, आपली आंतरिक आवड असते, त्या वाटेवरती कुठेतरी लोटण्याचं, ढकलण्याचं काम या तीव्र इच्छा आपसूकच करत असतात आणि जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाला, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे ते विशेष कंगोरे, घटक प्रदान करत असतात. आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणी मध्ये पूर्ण झालेल्या इच्छांच्या बरोबरीने या अपूर्ण इच्छांचा ही मोठा सहभाग, मोठा वाटा असतो असं मला वाटतं.
या हत्ती पाळायच्या इच्छेने कदाचित मला लागलेली वाइल्डलाइफची आवड, त्यांना टिपण्यासाठी, पुन्हा पुन्हा बघण्यासाठी लागलेला फोटोग्राफीचा छंद, त्यासाठी विविध ठिकाणी हिंडणं फिरणं या गोष्टींनी मला आयुष्यात अपरंपार आनंद दिलेला आहे, सुकून दिलेला आहे..
आणि म्हणूनच बकेट लिस्ट मधल्या अजूनही अपूर्ण राहिलेल्या त्या इच्छेचंही यात फार फार योगदान आहे.
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
तुम्ही ठाण्यात राहायचात / राहता का?
खूप छान, अर्निकाच्या लेखाची
खूप छान, अर्निकाच्या लेखाची लिंक द्याल का?
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
किती गोड प्रश्नोत्तरे !
हर्पेन प्रतिसादांचा ओनामा
हर्पेन प्रतिसादांचा ओनामा केल्याबद्दल विशेष आभार..
हो. मी ठाण्यात रहायचो आणि अजूनही रहातो.
अजिंक्यराव, धन्यवाद..
https://www.maayboli.com/node/56604
ही Arnika आयडीच्या लेखाची लिंक.. एकूण चार भाग आहेत.
वर्णिता, धन्स..
फार म्हणजे फार सुंदर.
फार म्हणजे फार सुंदर.
ही तुमची वेगळीच बकेट लिस्ट , पूर्णत्वाला गेली नाही तरी तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी ...
बकेट लिस्टची हिच खरी
बकेट लिस्टची हिच खरी व्याख्या आहे... तुमची बकेट लिस्ट पुर्ती होवो असा आशिर्वाद दिला तरी तो कितपत खरा होइल माहिती नाही पण जितके शक्य आहे तितके घडावे ही सदिच्छा मात्र नक्किच आहे.
निरू! मी पण मनोमन आशिर्वाद
निरू! मी पण मनोमन आशिर्वाद दिला कि तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. माझी पण अशी एक लहानपणापासून ची इच्छा आहे, मला सिंहाला आणि वाघाला घट्ट मिठी मारायची आहे. एक इंग्लिश पिक्चर पाहिला होता त्यात ती हिरॉइन सिंहांशी किती सहजपणे संवाद साधत असते ( एका शिपवर असतात सिंह, पिंजरे उघडे राहतात असं काही तरी) मी माझी इच्छा वाघ नाही तर वाघाची मावशीच सही म्हणून माऊचे लाड करुन पुरवते
मस्तच लिहिलय निरू जी.
मस्तच लिहिलय निरू जी.
एकदम लाॅजिकल उत्तरे आहेत तुमची..
स्वगत - बरे झाले अथर्वने हे त्याच्या लहानपणी वाचले नाही. .. नाहीतर आमच्याकडे पण हीच बिकट परिस्थिती झाली असती.
अरेच्चा.. छोट्या वयातल्या
अरेच्चा.. छोट्या वयातल्या बकेट लिस्ट मुळे बरेच आशिर्वाद मिळाले की.
एकदम बाल स्काऊटची खरी कमाईच झाली.
मनीमोहोर, साधना, धनूडी आणि धनवन्ती.. प्रतिसादाबद्दल आभार..
वाघ पाळावा व त्याच्या
वाघ पाळावा व त्याच्या गळ्याखाली खाजवत बसावे ही माझ्या लेकीची बकेट लिस्ट आहे. सुरवात म्हणून मांजरे पाळलेली आहेत.
ओये साधना , मी तिची मावशी
ओये साधना , मी तिची मावशी शोभतेय ( माझं मीच ठरवून टाकलं)
मस्त
मस्त
धनुडी
धनुडी
किती छान लिहीलंत निरु!
किती छान लिहीलंत निरु! निरागस वयातली बकेट लिस्ट ती अपूर्ण राहिली असं न म्हणता येणारी आणि बरंच काही देणारी!
निरु , छानच लिहिलेत .
निरु , छानच लिहिलेत . लहानपणी चा काळ खरंच छान असतो नाही !! प्रत्येक प्रश्नाला किती निरागस उत्तरे दिलीत !!
हत्ती पाळायचा.... फटफटीला
हत्ती पाळायचा.... फटफटीला बांधून आणायचा... नि पहिली प्रतिक्रिया - तुम्ही ठाण्यात राहता का?! काय बाई म्हणावं ह्या मायबोलीकरांना....
लेख सुंदर आहे!!
सी
सी
निरु सुरवातीचा लेख वाचताना
निरु सुरवातीचा लेख वाचताना खूप हसायला येतंय. ठाण्यातील सर्कस जास्तच पाहिल्या असे वाटतय. लहानपणीच हत्तीचा लळा लागला. कधीच घरोबा न केलेल्या हत्तीचे आभार त्यामुळे तुमच्या कॅमेऱ्यात अनेक जंगल सफर कैद झाल्या आणि आमच्या भरपूर ईच्छा पूर्ण होत आहेत.
बालपणीची निरागस इ्च्छा ते
बालपणीची निरागस इ्च्छा ते प्रौढ वयात जाणीवपूर्वक जोपासलेली आवड या प्रवासाचं वर्णन आवडलं .
किती निरागस.
किती निरागस.
माझा लेकाची पण इच्छा होती हत्ती पाळायची. पण हत्ती आठव्या मजल्यावर लिफ्टने कसा येणार म्हणून बेत बारगळला
खुपच क्यूट लिहिलंय..संवाद तर
खुपच क्यूट लिहिलंय..संवाद तर भारीच..आवडलाच लेख.
>>>>>>त्यामुळे अशी एखादी बकेट
लेख धमाल!!
>>>>>>त्यामुळे अशी एखादी बकेट लिस्ट मधली इच्छा जरी पूर्णांशाने पुरी झाली नाही तरी त्या इच्छेमधली तळमळ तुम्हांला नक्कीच काहीतरी त्याच्या आजूबाजूचं किंवा त्याच्या वरचंही काहीतरी देऊन जाते असं मला वाटतं.
होय, होय आणि होयच!!!
छान लिहिले आहे. मी तर शेवटी
छान लिहिले आहे. मी तर शेवटी तुम्ही हत्ती पाळलाच आहे असे समजूनच वाचत होतो
पर ये भी सही है... वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वगैरे...
मस्तच... माझ्या लेकीलाही
मस्तच... माझ्या लेकीलाही टेरेसवर घोडा पाळायचा होता, ते आठवलं.
मी तर शेवटी तुम्ही हत्ती पाळलाच आहे असे समजूनच वाचत होतो। +१११
वाह मस्त मस्त
वाह मस्त मस्त
तुमच्या प्राणीच नाही तर निसर्गप्रेमाची रुजवात ही !
काय जबरदस्त अन प्रामाणिक
काय जबरदस्त अन प्रामाणिक भावनांचा लेख .
मस्त .
रिलेट झालं
अशी एक रशियन बालकथा आहे . त्या छोट्या मुलाला बरं वाटत नसतं . त्याला हत्ती हवा असतो , पाळायला . मग शेवटी त्याच्या घरी मला वाटत , एक दोन दिवसांसाठी खरंच हत्ती आणतात . मीही खूप लहान होतो . भारी वाटायचं . ते वाचताना . पण वाटायचे की ती तर कथा आहे .
पण तुमच्या भावना तर खऱ्या आहेत . ग्रेट !
Kiti सुरेख लिहिलंय!
Kiti सुरेख लिहिलंय!
त्या इच्छेमधली तळमळ तुम्हांला नक्की.... हा पॅरा तर खासच.
वाचताना लहान निरागस मुलगा
वाचताना लहान निरागस मुलगा डोळ्यासमोर आला.
मी तर शेवटी तुम्ही हत्ती पाळलाच आहे असे समजूनच वाचत होतो। +१११
किती छान लिहिलंय !!! शाळेत
किती छान लिहिलंय !!! शाळेत 'सोनाली' नावाचा एक धडा होता, त्यात लेखिकेने सिंहीण पाळलेली असते. त्याचप्रमाणे तुम्ही हत्ती पाळला असावा असे समजूनच वाचत होतो.
छानच . आवडला लेख!
छानच . आवडला लेख!
Pages