फार जुनी गोष्ट आहे. इसवी सन २००० च्या शेवटी आमचं गलबत अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर येऊन थडकलं. त्या काळी (फार जुन्या ऐतिहासिक काळाबद्दल असंच बोलतात ना?!) भारतात टर्रर्र टिन्टॅन टिणॅण टिणॅण खर्रर्र असा आवाज करणारे मोडेम वापरून इन्टरनेट उघडून ईमेल्स डाउनलोड करण्याइतकंच वापरलं जात होतं. कारण नेट चा स्पीड हा सुमारे ३ केबिपिएस वगैरे असा मिळायचा! त्यामुळे अमेरिकेत आल्यावर अगागागा एम बिपिएस मधे इन्टरनेट चा स्पीड असू शकतो? हे एक प्रचंड अप्रूप होते. ( तरी तेव्हा इथेही अजून प्रत्येकाच्या हातात सेलफोन आणि जिकडे तिकडे वाय फाय हे युग आलेलं नव्हतं!) त्यात अजून वर्क परमिट आलेलं नव्हतं , हातात वेळच वेळ. शिवाय नुकताच देश सोडल्यामुळे आपल्या भाषेच्या, मित्र मैत्रिणींच्या, सांस्कृतिक , सामाजिक, आयुष्याच्या आठवणींचे उमाळे येत असायचे. अशा योग्य वेळी मला मायबोली सापडली!
तेव्हा मायबोलीवर नुकतेच यूजर आयडी रजिस्टर करण्याची सोय आली होती. त्याआधी तत्पुरते कोणतेही नाव घेऊन मेसेज लिहिता यायचे!
माझा युजर आयडी क्र. ३१!
तेव्हाचा मायबोलीचा विषयवार वर्गीकरण असलेला फॉर्मॅट मला अजूनही आवडतो. ज्यात आपल्याला इंटरेस्ट आहे अशा विभागात कोणते नवे पोस्ट आले आहे ते फार सहज सापडायचं. सुरुवातीला प्रामुख्याने गुलमोहोर आणि वाहत्या २-३ पानांवरच्या गप्पा इथेच मी अॅक्टिव्ह होते.
गुलमोहोर मधे झुळूक नावाचा चारोळ्यांचा वाहता बाफ फार वाजता गाजता असायचा. सगळे नवलेखक तिकडे त्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे. म्या पन घेतले! ( ते सर्व वाहून गेले ते किती बरंय!) कथा कादंबर्या होत्या, कविता तर खूप यायच्या अन त्यांना प्रतिसाद पण भरपूर मिळायचे. तेव्हा प्रत्येक कवितेचा एक बाफ असा न निघता एकाच कविता बाफ वर एका पाठोपाठ एक कविता पोस्ट व्हायच्या. एक "काहीच्या काही कविता" असाही बाफ होता तळागाळातल्या, प्राची- गच्ची इयत्तेतल्या हौशी कवींसाठी!
तेव्हा अॅक्टिव्ह असलेले एकेक रथी महारथी आयडी म्हणजे हवाहवाई, Milya, Svsameer (आताचे अॅडमिन), Storvi, Milindaa, असामी, Psg ( पूनम) , सुप्रिया, Ajjuka(नीधप), किरण, अमृता वगैरे.
आता गंमत वाटेल, पण तेव्हा मायबोली सरासरी "लग्नाळू" वयात होती!( आता इथले सरासरी वय ४०+/- असावे असे नुकतेच कुणीतरी म्हटलेले पाहिले! मेक्स सेन्स!) त्यामुळे असेल बहुतेक पण बर्याच कथा कादंबर्या, कविता फुल्ल रोम्यान्टिकपणानं भरलेल्या असायच्या! यात rmd च्या कविता आठवतात मला. त्यावेळी योगी बेअर नावाच्या आयडीने एक "तोंड"ओळख नावाचा उपक्रम चालू केला होता ज्यात आपण आपला फोटो दिल्यास इतर सहभागी आय्ड्यांचे फोटो पहायची सोय होती. बर्याच लग्नाळू माबोकरांनी या सुविधेचा फायदा घेतला (म्हणे). नंतर मग "मायबोलीवर जमलेली लग्ने" आणि "एका लग्नाची गोष्ट" असे धागे निघाले आणि गाजले! (यात नवल काय!)
इथल्या गप्पांच्या पानावरचे काही "ऐतिहासिक" जोक्स, काही गमती जमती तिथून वाहिलेल्या असल्या तरी अ़जूनही लक्षात राहिल्या आहेत. तसंच काही खरोखरच्या ऐतिहासिक घटना, जसे सप्टें. ११ २००१ च्या सकाळी तिथे केलेले लॉगिन आणि त्यानंतर दिवसभर त्या दिवशीच्या घटनांचे तिथे उमटलेले पडसाद, तसंच २६/११ , नंतर एकमेकांची केलेली चौकशी हे सगळं आताही आठवतं.
नंतर युजर्स ची संख्या वाढल्यावर Views and Comments या सेक्शन ला खरा रंग चढायला लागला! म्हणजे वाद विवाद. काय एकेक वाद घातलेत म्हाराजा! देव म्हणजे काय ? देव आहे का? स्त्री पुरुष समानता, "हे कधी बदलणार?" , "आपल्या प्रथा" हे सुपरहिट वाद विषय होते. काही खूंखार वादविवादपटू आठवतात, संतू, लालभाई, श्रीनि, आशिष चासकर, मस्त-रे-कांबळी, झक्की आणि रॉबिन्हूड तर एवरग्रीन, स्टिल गोइंग स्ट्राँग!! काही मजेशीर आणि गाजलेले वाद आठवतात ते म्हणजे "लग्नात वधू वरांनी आल्या गेल्या प्रत्येकाला वाकून नमस्कार करावा का" , "सासूची हौस" , "तरूण आहे रात्र अजुनी या गाण्याचा अर्थ नक्की काय" "तर मराठी माणूस खड्ड्यातच गेलेला बरा"
तेव्हा भांडणं कन्ट्रोल करायला, वादात समेट करायला, बाफ विषयापासून भरकटत नाही हे पहायला इथल्याच ४-५ मॉडरेटर्स चं एक मंडळ असायचं. त्यांची आयडेन्टिटी गुप्त असणे अपेक्षित होते. मॉडरेटर -१ , २ , ३ असे आयडी दिले गेले होते. सगळ्या बाफांवर लक्ष ठेवायचे, आक्षेपार्ह पोस्ट एडिट करणे, कुणाला वार्निंग वगैरे द्यायची असल्यास (आयडी बदलून मॉडरेटर आयडीने) ती द्यायची वगैरे ही त्यांची कामं! तर लोक वार्निंग मिळाल्यावर त्या भाषेवरून , टाइम झोन वरून हा कोणता बरं मॉडरेटर असेल हे ओळखायचा खेळ खेळायचे! मीही त्या मंडळात काही काळ काम केलं. अजून मिलिंदा, असामी, कलंदर, योगी बेअर हे इतर मॉडरेटर्स आठवतायत.
तर अशा विविध वादांवर एके काळी हजारांनी पोस्टी पाडल्यावर आता जेव्हा पुन्हा कुणी नवा होतकरू आयडी "हे स्त्रीनेच का करायचं" अशा टाइप चा बाफ काढतो/ते तेव्हा गंमत वाट्ते. २०-२५ वर्षात मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचे वादांचे विषय थोड्या फार फरकाने तेच राहिले! फक्त खेळाडू बदलले
तसे बघायला गेलं तर हे पोकळ वाद ( कृतीशिवाय) म्हणता येतात पण एवढे नक्की की या वाद विवादांमधून कळत न कळत खूप काही शिकायला मिळालं. कित्येक आउट ऑफ द बॉक्स विचार समजले, काही वेळा एखादा विचार सुरुवातीला छे काहीही काय, असं वाटून नंतर त्यात तथ्य ही दिसलेले आहे. काही वेळा स्वतःचे मत जाणीवपूर्वक बदलले तर काही वेळा स्वतःच्या विचारांना समविचारी लोकांची साथ मिळालेली पाहून एक प्रकारचे वॅलिडेशन , नवा आत्मविश्वास मिळालेला आहे. बोलण्यापूर्वी विचार तपासायची आणि दुसरी बाजू विचारात घ्यायची कायमची सवय लागली.
एकूणच मायबोलीने काय दिलं असं विचारलं तर बोलण्यासारखं खूप काही आहे पण शब्दात मांडणे तेवढेच अवघड आहे.
समानशीलेषु व्यसनेषु सख्यम् या नियमाप्रमाणे इथे अनेक मित्र मैत्रिणी मिळाले. खूप धमाल केली, काही मैत्रं तर आयुष्यभराकरता रुजली.
संयोजन, संपादन, अशी लष्कराच्या भाकर्यांची हौसही खूप वेळा भागवून घेतली. सुरुवातीला कवितांशी झटापट करून झाली, लेख लिहिले, एखादीच कथा, रेसिपीज, प्रवास वर्णन असं काही बाही लेखन केलं. त्यातलं काही आता पाहिले तर " अरे नका! नका हे कुणी वाचू!!" असं वाटतं तर काही खरोखर बरं लिहिलं गेलं असावं, जे लोकांना आवडलंही.
केवळ ऑनलाइन ओळखीवर कोण कुठच्या साता राज्या पलिकडच्या, शेकडो मैल दूरवरच्या मित्र मैत्रिणींना भेटायला जाणं, पार त्यांच्या घरी जाणं, राहून झालं. कंपू बनले, फुटले, अनेक ऐतिहासिक भांडणं पाहिली तर काहीत प्रमुख भूमिकाही(!) केल्या. त्यातली झक्की आणि रॉबिनहुडाची मजेशीर रायवलरी आणि त्यांची (शिवाजी - अफजलखान भेटीशीच तुलना करता येईल अशी ) गाजलेली भरतभेट ही अजून लक्षात आहे! गंमत म्हणजे हल्ली बरेचदा असं होतं की कुठला तरी जुना आय्डी दिसल्यावर अंधुक आठवतं अरे हिच्याशी/ याच्याशी तर आपलं भांडण होतं ना? का ते मात्र आठवत नाही
अनेक आयडींना इथे डोक्यावर घेतले गेलेले पाहिले, तर फटक्यात खाली पडलेलेही पाहिले. काही वाजत गाजत रुसून निघून गेले. काही उडवले गेले, काही नुसतेच न बोलता इनॅक्टिव्ह झाले. "आमच्या वेळची मायबोली राहिली नाही" हे म्हणणार्या अनेक आयड्या आल्या आणि गेल्या.
आताही मायबोली तेवढीच आपलीशी आहे. आताही एकही दिवस मायबोली उघडल्याशिवाय जात नाही. फक्त आता पूर्वीसारखं तावातावाने वाद घालायला माझं रक्त सळसळत नाही की पूर्वीसारख्या जिथे तिथे शेकडो पोस्टी लिहिल्या जात नाहीत. तो माझ्या वयोमानाचा दोष असावा
माझ्या आठवणीतली मायबोली - Maitreyee
Submitted by maitreyee on 10 September, 2021 - 15:58
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ये ब्बात! मस्त आल्या आठवणी.
ये ब्बात! मस्त आल्या आठवणी.
काही मजेशीर आणि गाजलेले वाद आठवतात ते म्हणजे "लग्नात वधू वरांनी आल्या गेल्या प्रत्येकाला वाकून नमस्कार करावा का" , "सासूची हौस" , "तरूण आहे रात्र अजुनी या गाण्याचा अर्थ नक्की काय" "तर मराठी माणूस खड्ड्यातच गेलेला बरा" >> हे असे स्पेसिफिक उल्लेख आवडले. त्यांची वाटच बघत होतो.
>>> अनेक ऐतिहासिक भांडणं
>>> अनेक ऐतिहासिक भांडणं पाहिली तर काहीत प्रमुख भूमिकाही(!) केल्या
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>> अंधुक आठवतं अरे हिच्याशी/ याच्याशी तर आपलं भांडण होतं ना? का ते मात्र आठवत नाही
मस्त लिहिलंय.
तू जुन्या मायबोलीत मॉडरेटर होतीस ना काही काळ? तू आणि मिलिंदा होतात हे आठवतंय मला.
हे असे स्पेसिफिक उल्लेख आवडले
हे असे स्पेसिफिक उल्लेख आवडले. त्यांची वाटच बघत होतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
+७८६
मस्त लिहिले आहे
>आमचं गलबत अमेरिकेच्या पश्चिम
>आमचं गलबत अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर
अवो बाई तुमी नवीन आलात का मायबोलीवर? चुकीच्या किनार्याला चक्क नावानी पश्चिम किनारा म्हनू लागलाया ! बाग राज्य वाले काय म्हंतील?
फार मस्त लिहीले आहे. अगदी
फार मस्त लिहीले आहे. अगदी हृदयातून, आतून आलेला लेख. स्पेसिफिक उल्लेख. सरासरी 'लग्नाळू' वयाची माबो. वाह!!! मजा आली.
चुकीच्या किनार्याला चक्क
चुकीच्या किनार्याला चक्क नावानी पश्चिम किनारा म्हनू लागलाया >> डोक्यात एक्झाक्टली तोच विचार आला होता. बाकी लेख छान.
<< माझा युजर आयडी क्र. ३१! >>
युजर आयडीचं काही खरं नाही. माझा आयडी कधीतरी वेबसाईटमध्ये बदल करताना थेट १८ हजारात गेला आणि माझ्यानंतरचे आयडी ८ हजारात आले.
चुकीच्या किनार्याला चक्क
चुकीच्या किनार्याला चक्क नावानी पश्चिम किनारा >>>
खरंच की.
मी सोडून मिलिंदा, असामी, कलंदर, योगी बेअर हे इतर मॉडरेटर्स आठवतायत.
मॉडरेटर मंडळाबद्दल लिहिलं असं वाटलं मला. विसरलेच. एका वेळी ४-५ मॉडरेटर्स चं मंडळ असायचं. त्यांची आयडेन्टिटी गुप्त असणे अपेक्षित होते. मॉडरेटर -१ , २ , ३ असे आयडी दिले गेले होते. सगळ्या बाफांवर लक्ष ठेवायचे, आक्षेपार्ह पोस्ट एडिट करणे, कुणाला वार्निंग वगैरे द्यायची असल्यास (आयडी बदलून मॉडरेटर आयडीने) ती द्यायची वगैरे
मस्त लिहिलं आहेस मै. मजा आली
मस्त लिहिलं आहेस मै. मजा आली वाचायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>> अंधुक आठवतं अरे हिच्याशी/ याच्याशी तर आपलं भांडण होतं ना? का ते मात्र आठवत नाही >>
मस्त. हे सगळे बाफ आठवले.
मस्त. हे सगळे बाफ आठवले.
Ditto माझ्या अनुभवाशी जुळतय हे.
मस्त लिहीलेय..
मस्त लिहीलेय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपने याद दिलाया तो मुझे याद आया...
मला सुरवातीला हे v and c प्रकरण माहित नव्हते. कोणी वाद घालू लागले की त्याला तिकडे v c वर जा म्हणून तंबी मिळायची तेव्हा हे आहे तरी कुठे असे वाटायचे.
नव्या आयडीने प्रतिसाद दिला की मॅाडरेटर लगेच पुष्पगुच्छ देऊन त्या आयडीचे स्वागत करायचे हे खुप भारी वाटायचे. त्यांचे खुप बारीक लकश असायचे.
काही रंगीबेरंगीकर त्यांच्या पानांवर काही वादाळूंना ‘ ही माझी जागा आहे, खबरदार...’ अशा तंब्या द्यायचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या विषयावरचा सर्वात छान लेख.
या विषयावरचा सर्वात छान लेख. लवकर आटोपला असे वाटले.
छान लिहिले आहे. हो, लौकर
छान लिहिले आहे. हो, लौकर संपला असे वाटले.
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
मला अजून एक वादग्रस्त धागा आठवतोय तो म्हणजे पोळ्या कशा कराव्यात होता बहुतेक.
तुझ्या मै चित्रांचा उल्लेख नाही केलास? मला खुप आवडतात तुझी ती " मै चित्र "
मस्त लिहिलयं.
मस्त लिहिलयं.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मस्त
मस्त
मस्त लिहलं आहे, मी आलो तेव्हा
मस्त लिहलं आहे, मी आलो तेव्हा मंदार जोशी ऐन भरात होता, ते सगळं प्रकरण अगदी जवळून अनुभवला आहे
आणि माबोमुळे होणारी मैत्री तर अगदीच
माबोमुळे आमचा समविचारी ट्रेकर्स चा ग्रुप जो जमलाय त्याला तोडच नाही, एकवेळ नातेवाईकांना रोज हाय हॅलो केलं जाणार नाही पण ग्रुपवर रोजची हजेरी असतेच असतेच
अतिरंजक मायबोलीचा ईतिहास. छान
अतिरंजक मायबोलीचा ईतिहास. छान वर्णन.
बर्याच लग्नाळू माबोकरांनी या
बर्याच लग्नाळू माबोकरांनी या सुविधेचा फायदा घेतला (म्हणे). नंतर मग "मायबोलीवर जमलेली लग्ने" आणि "एका लग्नाची गोष्ट" असे धागे निघाले आणि गाजले!
>>> wow
मस्त.
मस्त.
मायबोलीवरचा हा काळ ओळखीचा नाहीये.(लग्न जमायचा)
अजूनही जमत असतील पण लोकं
अजूनही जमत असतील पण लोकं रिसेप्शनला बोलवत नसतील त्यामुळे गणना होत नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खूपच आवडल. आजीआजोबांच्या
खूपच आवडल. आजीआजोबांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकताना जस वाटत ना, तितक भारी वाटल.
मैत्रेयी, तुझ्या आठवणीतली
मैत्रेयी, तुझ्या आठवणीतली माबो वाचून झरकन जुन्या मायबोलीचा सुंदर कॅलिडोस्कोप डोळ्यापुढे येऊन गेला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"मायबोलीवर जमलेली लग्ने" आणि "एका लग्नाची गोष्ट" असे धागे निघाले >> हह नी कुजबुज मध्ये याबद्दल लिहील्याच आठवतय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्ह्युज आणि कॉमेंटसचे विषय, चर्चा खरच हहपुवा
मस्त लिहील आहेस! आणि हो तुझी मैचित्र छान असतात.
ए खूप छान लिहिलं आहेस गं....
ए खूप छान लिहिलं आहेस गं.... !!
सगळ्या आठवणी ताज्या झाल्या !!
छान आठवणी, मैत्रेयी.
छान आठवणी, मैत्रेयी.
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवळ ऑनलाइन ओळखीवर कोण
केवळ ऑनलाइन ओळखीवर कोण कुठच्या साता राज्या पलिकडच्या, शेकडो मैल दूरवरच्या मित्र मैत्रिणींना भेटायला जाणं, पार त्यांच्या घरी जाणं, राहून झालं. >>> टोटली!
मस्त लिहीले आहे. यातील काही वाद व पूर्वीचे उल्लेख मी गटगमधे ऐकलेले आहेत पण त्यावेळेस माबोवर नसल्याने माहीत नाहीत. निदान आयडी सगळे आठवतात.
तू लिहीलेले लेख कोणते हे पटकन न आठवल्याने "लेखन" चेक केले तर बरेच सापडले
२०१६ ची निवडणूक, वर्णद्वेष व हिंसा, दोन गटग बद्दलचे, असे १००+ प्रतिक्रिया वाले सापडले, आणि मग आठवले ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैचित्रे - वरती धनुडी यांनी उल्लेख केलेलाच आहे पण "माबोला काय दिले" यात हे नंबर १! आणि जितके लोक ती पाहिल्याबद्दल लिहीतात त्यापेक्षा अनेक लोकांनी ती पाहिलेली आहेत हे ही नक्की
बहुतांश टीपापावर असली, तरी मध्यंतरी तू बेकरीवरही टाकली होतीस एक दोन ते ही आठवते. राज कपूर ने आरके फिल्म्स व्यतिरिक्त दुसर्या एखाद्या दिग्दर्शकाकडे रोल करावा तसे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मैचित्रांच्या कौतुकाबद्दल
मैचित्रांच्या कौतुकाबद्दल धन्यवाद सगळ्यांना! हाही एक छंद इथेच लागला. काढायला खरंच मज्जा आली/येते अगदी. दोन वर्षापूर्वी गणेशोत्सवासाठी जाहिरातींची सीरीज केली होती मैचित्रांची. तसंच कितव्यातरी दिवाळीअंकात संपादकांची अर्कचित्रं ही काढली होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फा - तसे फार लेखन वगैरे नाही पण काही उपक्रमांत वगैरे लिहिले तर ते लेखनात दिसत नाही. काही जुन्या हितगुज वर पण असेल.
हा एक वर्ल्ड कप विशेषांकासाठी साठी लिहिलेला - https://www.maayboli.com/node/25290
एक हॅपनिंग दिवस - https://www.maayboli.com/node/65897
Pages