गेल्या तीन भागांमध्ये आपण हळूहळू ग्लोबल इकॉलॉजी ते लोकल इकॉलॉजी असा प्रवास करत आहोत. पहिल्या दोन भागांत आपण एकूण पृथ्वीच्या इकॉलॉजीविषयी थोडक्यात बोललो. तिसऱ्या भागात आपण भारताचे भौगोलिक स्थान आणि इकोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काही गुणवैशिष्ट्यांविषयी गप्पा मारल्या. आता या भागात आपण केतकीशी आपल्या महाराष्ट्राच्या इकॉलॉजीविषयी गप्पा मारणार आहोत.
जिज्ञासा: आता या भागासाठी मी एक मोठा प्रश्न विचारते आणि मग गप्पांच्यामध्ये मला अजून काही प्रश्न पडले तर विचारेन. तर महाराष्ट्राचं इकॉलॉजीच्या दृष्टीने कसं विभाजन होतं? यात हवामान, पर्जन्यमान, आढळणारी भौगोलिक वैशिष्ट्ये जसे डोंगर, नद्या, दगड/मातीचे गुणधर्म, आढळणारी झाडे, प्राणी, पक्षी या विषयी जरा विस्ताराने सांगशील का?
केतकी: आता सगळ्यात सोप्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघायचं असेल तर साधारणतः पश्चिमेकडून पूर्वेकडे असा महाराष्ट्राचा नकाशा बघायचा किंवा डोळ्यासमोर आणायचा. म्हणजे सगळ्यात पश्चिमेला अरबी समुद्र मग त्याला लागून कोकणाचा पट्टा आहे. या कोकणपट्टीला समांतर सह्याद्रीची रांग आहे. ही खूप उंच पर्वत रांग आहे. आणि हा समुद्र सपाटीपासून उंचीत बदल एकदम झटकन होतो. बोरघाट किंवा मग ताम्हिणी घाटात तुम्हाला हा तीव्र चढ जाणवतो. ही रांग ओलांडली की आपण पूर्वेकडे हळूहळू खाली येतो आणि मग काही भागात तर आपण जवळपास समुद्रसपाटीला येऊन पोचतो. आता ही समुद्र सपाटीपासून उंची किती अशी विभागणी झाली. जर आपण खूप खोलात जाऊन पाहिलं तर मग महाराष्ट्रात बरेच वेगवेगळे agroclimatic zones आहेत. पण आपण जसे भारताचे पाऊस मानानुसार जंगलांचे प्रकार बघितले तशी आपण महाराष्ट्राची विभागणी केली तर मग ते लक्षात ठेवायला पण सोपं जातं.
जिज्ञासा: चालेल. मग आपण आता तसे एक एक भाग पाहू.
केतकी: सुरुवात कोकणापासून करूया. ही एक उत्तर-दक्षिण पसरलेली चिंचोळी पट्टी आहे - अरबी समुद्रापासून ते सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत. तर या कोकणात २५०० ते ३००० मिमी एवढा पाऊस पडतो. आता इथेही काही वेगवेगळे हॅबिटॅटस आहेत आणि इकॉलॉजीदेखील किनारा ते सह्याद्रीचा पायथा अशी बदलत जाते. अगदी किनाऱ्यावरची इकोसिस्टिम वेगळी आहे. जिथे महाराष्ट्रातल्या सगळ्या पश्चिमवाहिनी नद्या येऊन समुद्राला मिळतात तिथे खाड्या तयार झाल्या आहेत. ही एक अत्यंत स्पेशल परिसंस्था आहे. या खाड्यांच्या ठिकाणी खारफुटीची जंगलं आणि इतर ठिकाणी वाळूचे किंवा खडकाळ असे किनारे अशा या समुद्राला अगदी लागून दोन परिसंस्था दिसतात. आपण त्याच्याविषयी नंतरच्या भागात सविस्तर बोलूच. पण याचं थोडक्यात महत्त्व काय तर ही जी किनाऱ्यावरची जैवविविधता आहे ती आपल्याला जमिनीवर दिसत नाही ती unique to coast आहे. समुद्रकिनारी आपल्याला vertebrates म्हणजे मुख्यतः माशांमधल्या विविधतेबरोबरच जे invertebrates आहेत त्यांच्यातही भरपूर विविधता दिसते. हे प्राणी कोणते तर कालवं, mollusc, starfish, jellyfish, खेकडे, arthropods असे प्राणी. तर हे आपल्याला इथेच समुद्रकिनारी दिसतात. गोड्या पाण्यात दिसतच नाहीत असं नाही पण इथली विविधता जमिनीवरच्या गोड्या पाण्याच्या परिसंस्थेत दिसत नाही. त्यातही इथले काही प्राणी हे फक्त खडकाळ किनाऱ्यांवर दिसतात.
या किनाऱ्यांना लागून दिसतात त्या नारळ आणि सुपारीच्या बागा असलेल्या वाड्या. बरेचदा वाडीची माडांची बाग मग परसबाग, घर, आणि मग पुढे अंगण अशी रचना दिसते. समुद्राला लागून कोळी लोकांच्या वस्त्या असतात त्यांच्या रचना थोड्या वेगळ्या दिसतात.
जिज्ञासा: नारळ देशी आहे का?
केतकी: त्याविषयी थोडी मतभिन्नता आहे. नारळाला आपलाच म्हणू शकतो पण जंगलात नैसर्गिकरित्या नारळ दिसत नाही. त्याची कायम लागवड केली जाते. म्हणजे माणूस जिथे पोचला नाही अशा जंगलात नारळ दिसत नाही. तेव्हा नारळ फार पूर्वी कोकणात आला आणि इथे रुजला असं म्हणता येईल. मुख्य म्हणजे नारळ invasive नाही.
आता थोडं आपण कोकणच्या भूमीवर आत आलो तर लक्षात येईल की कोकणाचा जो सगळा भाग आहे तो उंच सखल आहे. आपल्याला प्रवास करताना हे लक्षात येतंच. या जमिनीच्या उंचसखलपणामुळे इथे वेगवेगळे हॅबिटॅट तयार झाले आहेत. इथे भरपूर पाऊस असल्याने इथलं मूळ जंगल हे सगळं आर्द्र पानगळी प्रकारचं आहे. शिवाय हवा दमट आणि गरम असते. या दोन्हीमुळे इथे झाडांची वाढ फार उत्तम होते. त्यामुळे जंगलवाढीचा जो वेग आहे तो कोकणात जास्त आहे. आमचा असा अनुभव आहे की कोकणात आणि देशावर असलेल्या दोन प्रकल्पांत एकाच वेळी रोपं लावली तर देशावरच्या झाडांना पाणी घातले नाही तर ती जगतच नाहीत आणि कोकणात पाणी नाही घातले तरी झाडे जगतात आणि पाणी घातले तर मग ती अधिक चांगली जोमाने वाढतात! इतकी कोकणात हवामानाची मोठी सबसिडी आहे!
जिज्ञासा: मध्यंतरी राजकारणी लोकांचे आवडते वाक्य होते की कोकणचा कॅलिफोर्निया करू! तर इकॉलॉजीच्या दृष्टीने या विधानाकडे कसं पाहता येईल?
केतकी: हा आता दृष्टिकोनच मला गमतीदार वाटतो. कोकण ‘कोकण’ म्हणूनच उत्तम आहे की! फक्त त्याची “ब्युटी” उलगडून दाखवा हवं तर. कॅलिफोर्निया त्याच्या जागी सुंदर आहे. तो इथे आणायचा प्रयत्न करण्यात आपण इथली इकॉलॉजी नष्ट करणार. तसा प्रयत्न करण्यात आपल्या नेत्यांनी सगळ्या रस्त्याच्या बाजूने ऑस्ट्रेलिअन अकेशिया लावले. पण त्याचा आता स्थानिक माणसाला त्रास होतोय. ते झाड पसरतंय काही ठिकाणी. आणि खरंच ‘कॅलिफोर्निया’ करायचाच झाला, म्हणजे आपण समजू की सुंदरता वाढवायची झाली, तर कोकणाची परिसंस्था समजून घेत त्याला साजेसा असा काही एक प्लॅन करावा लागेल. ते न करता केवळ परदेशी झाडं लावून हे साध्य होणार नाही.
जिज्ञासा: अजून एक आपण ऐकतो की कोकणात खूप पाऊस पडतो पण तो सगळा वाहून समुद्रात जातो. म्हणजे पावसाळ्यात अतिवृष्टी आणि उन्हाळ्यात दुष्काळ यात कितपत तथ्य आहे?
केतकी: हे तितकंसं योग्य विधान नाहीये. म्हणजे जिथे जिथे मान्सून आहे तिथे पावसाळ्यात पाऊस आणि बाकीचे महिने कोरडे असायचेच. पण कोकणात “पाणीटंचाई” निर्माण होत असेल तर ती पाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे होत असणार. कारण जरी कोकणातले नद्या, ओढे बारमाही नसले तरी तिथे भरपूर ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत जे बारमाही आहेत. कोकणात विशेषतः दक्षिण कोकणात जांभा खडक आहे जो सच्छिद्र असतो आणि स्पंज सारखा पाणी शोषून घेऊ शकतो. त्यामुळे कोकणात भूजलाची स्थिती बरीच उत्तम आहे. म्हणजे महाराष्ट्रात इतर काही ठिकाणी जितका पाण्याचा प्रश्न आहे तितका कोकणात नाहीये. किंवा असलाच तर तो उपसा वाढवल्यामुळे आहे. अर्थात जमिनीच्या बदलत्या वापरामुळे अनेक बदल घडत आहेत पण तो स्वतंत्र विषय आहे. इकॉलॉजीच्या दृष्टीने कोकण हा अत्यंत समृद्ध प्रदेश आहे.
आता इथल्या आर्द्र पानगळी जंगलात सर्वात डॉमिनंट झाडे म्हणजे ऐन आणि किंजळ. इथे मला कवी माधव यांची हिरवे तळकोकण नावाची कविता आठवते. त्यात त्यांनी म्हटलं आहे की “ऐन आणि किंजळ करिती मांत्रिक मंत्र बळा दुर्बळ”! कोकणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक निसर्गप्रेमी रसिकाने वाचावी अशी ती कविता आहे. त्यात त्यांनी इतक्या विविध झाडांचा, फुलझाडांचा उल्लेख केला आहे कोकणातल्या!
ही सगळी वनसंपदा, जोडीला आंबा-काजूच्या बागा, मध्ये मध्ये असलेली भातखाचरं आणि जवळजवळ वर्षभर वाहणारे ओढे/झरे हे कोकणातलं कॉमन दृश्य आहे. हे चित्र आपल्याला अगदी सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत दिसतं.
आता आपण सह्याद्रीच्या पश्चिम चढाकडे येऊ जिथे नैऋत्य मौसमी पावसाची पहिली बरसात होते. इथे अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे ढग अडतात आणि मग जसे आपण माथ्याकडे जाऊ तसे मग पावसाचे प्रमाण ३ हजार ते अगदी ६/७ हजार मिमीपर्यंत वाढत जाते. त्यामुळे हा जो घाटमाथ्यावरचा अगदी एक अतिपावसाचा बारीक पट्टा आहे तिथे मग आपल्याला निम्न सदाहरित जंगलं (semi-evergreen forests) दिसतात. भीमाशंकर, महाबळेश्वर, राधानगरी, कोयना, गगनबावडा अशी सगळी ठिकाणं या चिंचोळ्या पट्टीवर आहेत. आणि ही जंगलं अत्यंत unique आहेत - पश्चिम घाटाला जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणायचं मुख्य कारण ही जंगलं आहेत. या जंगलात आपल्याला अनेक specialist species आढळतात त्यातल्या अनेक endemic (प्रदेशनिष्ठ) आहेत. इथे आपल्याला बऱ्याच साऱ्या देवराया दिसतात - जिथे रानजायफ़ळ, फणसाडा, तमालपत्र, मोठे, महाकाय वेल (lianas) यासारख्या वनस्पती आणि शेकरू, रानकुत्र्यासारखे दुर्मिळ प्राणी दिसतात. जर क्षेत्रफळाचा विचार केला तर हा अगदीच छोटा पट्टा आहे. पण त्याचे महत्व फार मोठे आहे. शिवाय संपूर्ण भारतीय उपखंडासाठी महत्वाच्या अशा काही नद्यांच्या उगमाचा हा प्रदेश आहे.
आता यापुढे आपण जसे पूर्वेकडे जाऊ तसे आपण घाटमाथ्यावरून हळूहळू खाली येतो आणि तसा मग पाऊसही हळूहळू कमी होत जातो. कोकणातून वरती येताना जसा तीव्र चढ आहे तसा सह्याद्रीचा पूर्वेकडचा उतार तीव्र नाही. आता या पूर्वेकडच्या भागात परत आर्द्र पानगळी जंगल दिसू लागते. इथे ऐन, हिरडा, बेहडा, आंबा, जांभूळ अशी झाडं दिसतात.
जिज्ञासा: हा भाग म्हणजे कोणते जिल्हे साधारणतः?
केतकी: जिल्हे सांगायचे तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे पश्चिम भाग आणि सांगलीची चांदोलीची सोंड इथे ही जंगलं दिसतात. याच जिल्ह्यांत सहयाद्रीच्या रांगा संपतात. आता हे आपण पटकन लक्षात यायला जिल्ह्यांची नावं देतो आहोत पण शक्यतोवर इकॉलॉजिकल सीमा या स्वतंत्रपणे बघाव्यात. या आर्द्र पानगळी जंगलात साधारणतः १००० ते ३००० मिमी एवढा पाऊस असतो.
आता जसे आपण अजून पूर्वेकडे जातो आणि पाऊसमान कमी होऊ लागते तसा मग जंगलाचा प्रकार बदलतो. १००० ते २००० मिमी पावसाच्या प्रदेशात देखील मग शुष्क पानगळी, मिश्र पानगळी जंगल दिसायला लागते. अर्थात या काही पक्क्या रेषा नाहीत. यात भरपूर ओव्हरलॅप दिसून येतो. या शुष्क पानगळी जंगलात ऐन, पळस, पांगारा, मोई, सालई, धावडा ही झाडं प्रामुख्याने दिसतात.
जशा सह्याद्रीच्या रांगा संपतात तसा मग पठारी प्रदेश सुरू होतो. आपला मध्य महाराष्ट्राचा मोठा भाग हा या बसाल्ट दगडाच्या पठारावर आहे. आधीच्या उल्लेख केलेल्या जिल्ह्यांचा पूर्व भाग ते मग थेट विदर्भाच्या पश्चिम सीमेपर्यंत सर्व जिल्हे हे या पठारावर आहेत. बोली भाषेत सांगायचं तर खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ हा सगळा अख्खा प्रदेश इकॉलॉजीच्या दृष्टीने साधारण एकसारखा आहे. आता या संपूर्ण भागात जिथे जिथे संरक्षित वन विभाग आणि किंवा डोंगररांगा आहेत तिथे तिथे आपल्याला शुष्क पानगळी जंगल दिसतं. या डोंगररांगांत थोडा जास्त पाऊस पडतो. उदा. गौताळा, यावल ही अभयारण्य. पण ह्यातला जो सपाटीचा भाग आहे तिथे पाऊस सह्याद्रीच्या तुलनेत अगदीच कमी आहे. साधारण ५०० मिमी वार्षिक पाऊसमान. यात काही पर्जन्यछायेचे प्रदेश पण येतात जिथे अजूनच कमी अगदी १०० ते २५० मिमी इतका पाऊस पडतो. हे पर्जन्यछायेचे प्रदेश हे सह्याद्रीच्या रांगेला अगदी लागूनचे प्रदेश आहेत. जसे - पारगाव खंडाळा भाग. आता या सर्व भागात scrub कॅटेगरी मधलं जंगल, गवताळ प्रदेश तयार झालेत.
जिज्ञासा: पण मग इथे मूळ कोणतं जंगल होतं?
केतकी: इथे मूळ सवाना प्रकारचं जंगल असलं पाहिजे - म्हणजे असे गवताळ प्रदेश ज्यात कुसळी, पवन्या, मारवेल, डोंगरी अशा गवताच्या जोडीने woody shrubs/trees या विखुरलेल्या दिसतात. म्हणजे आपल्याकडची बोरी, बाभळी आणि हिवर या प्रकारची झाडे. Acacia फॅमिली मधली झाडे, तरवड, दुरंगी यांसारखी shrubs, किंवा नेपती पण दिसते या भागात. तर ही shrubbery, थोडी वाढ खुंटलेली झाडी, आणि मुख्य गवतांच्या जाती अशा प्रकारचं सवाना जंगल किंवा झाडी आपल्या ह्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या भूभागावर होतं पण माणसाच्या हस्तक्षेपामुळे नाहीस झालं आहे.
जिज्ञासा: म्हणजे महाराष्ट्राची प्रमुख इकॉलॉजी कोणती तर सवाना आणि शुष्क पानगळी जंगल आहे तर!
केतकी: होय, असं म्हणता येईल आपल्याला. पण यात एक प्रश्न असा आहे की मूळ इकॉलॉजी सवाना की शुष्क पानगळी जंगल? पण आपण ते गवताळ प्रदेशांविषयी बोलताना पुन्हा बोलू. अर्थात सवाना ही शुष्क पानगळी जंगलाच्या आधीची अवस्था आहे हे ही खरंच आहे. जर महाराष्ट्रात या सवाना प्रदेशाला संरक्षण दिलं तर त्याची climax किंवा mature stage शुष्क पानगळी जंगल असेल असंही एक मत आहे. पण सध्यातरी बहुतेक ठिकाणी मूळ सवाना परिसंस्था देखील शिल्लक न राहता केवळ डिग्रेडेड गवताळ प्रदेश उरले आहेत.
जिज्ञासा: मगाशी तू डोंगर रांगांचा उल्लेख केलास. महाराष्ट्र आणि डोंगर म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यापुढे सह्याद्री उभा राहतो. तर बाकीच्या डोंगर रांगा कोणत्या?
केतकी: आपल्याकडे सातपुड्याची रांग आहे - आणि त्याच्या सगळ्या डोंगर रांगांमध्ये शुष्क पानगळी जंगल होतंच पण ते ब्रिटिशांनी कापून तिथे सागाची लागवड केलेली दिसते. अर्थात ही जरा वेगळी गोष्ट झाली. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की जर नीट संरक्षण मिळालं तर या महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर बऱ्याच ठिकाणी शुष्क पानगळी जंगल दिसू शकतं. पण सध्या इथे प्रचंड डिग्रेडेड अवस्थेतली इकॉलॉजी पहायला मिळते.
आता पुढच्या भागाकडे जाऊ. आपण पूर्व विदर्भात आलो की इथे पुन्हा आपल्याला आर्द्र सदाहरित जंगलं पहायला मिळतात. कारण इथले पाऊसमान हे जवळजवळ ३००० मिमी पर्यंत जाते. यातल्या काही भागात शुष्क सदाहरित (dry evergreen) असा जंगलाचा एक स्पेशल प्रकारही दिसतो. पण बहुतांश पूर्व विदर्भात सगळीकडे शुष्क आणि आर्द्र पानगळी असं मिश्र जंगल दिसतं. हा सर्व जंगलांनी समृद्ध असा भाग आहे. इथली विशेष गोष्ट म्हणजे इथले आदिवासी अजूनही निसर्गाला खूप हानी न पोचवणारी जीवनशैली आचरतात. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी आदिवासी राहतात पण आता त्यातल्या बहुतेकांचे जीवनमान आधुनिक होत चालले आहे. मात्र पूर्व विदर्भातल्या जंगलातले आदिवासी अजूनही दुर्गम जंगलात राहतात. फारसे आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने तिथला जमिनीचा वापर (land use) देखील फारसा बदललेला नाहीये. त्यामुळे जंगलं अजूनही उत्तम आणि जैवविविधतेने संपन्न अवस्थेत आहेत. इथले आदिवासी जुन्या पद्धतीने शेती करतात; त्यांची धान्ये देखील खूप unique आहेत - वरई, नाचणीच्या रानजाती, लुच्ची, कोचई, रिनूवा अशी वेगळ्या नावाची वाणं इथे पेरतात. भाताची वेगळीच पारंपरिक वाणं इथे दिसतात.
या जंगलातले काही भाग आहेत जिथे मोह, तेंदूपत्ता अशी non timber forest produce (NTFP) देणारी झाडे आहेत. ते भाग डिग्रेडेड आहेत. पण हे भाग बरेचसे परिघावरचे आहेत. आतली जंगलं अजूनतरी सुरक्षित आहेत. आता इथेही जंगलात साग भरपूर दिसतो. पण तो ब्रिटिशांच्या कृपेने आणि दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर त्यात फार काही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी केलेली सागाची लागवड दिसते. वन खात्याने असलेली जंगलं फक्त राखली मात्र तिथे पूर्वीची जैवविविधता आणण्याचे काही विशेष प्रयत्न न झाल्याने ती सागाची झाडं अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
यातून काय शिकायचं तर कोणत्याच एका झाडाची मोठ्या प्रमाणावर लागवड करू नये. कारण एकदा अशी चूक झाली की मग ती बदलणं अवघड असतं.
जिज्ञासा: आता पूर्व विदर्भातल्या पावसाचं प्रमाण हे साधारण कोकणातल्या पावसाच्या प्रमाणाइतकं आहे. मग इथे पण तीच झाडं दिसतात की इथली जैवविविधता वेगळी आहे?
केतकी: काही जाती सोडता साधारणतः तीच झाडं दिसतात दोन्हीकडे. खरंतर अख्ख्या महाराष्ट्रभर झाडांच्या जातींमध्ये भरपूर ओव्हरलॅप दिसतो. काही सगळ्या राज्यभर दिसतात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची अगदी unique जंगलं सोडली तर बाकी सगळीकडे बऱ्यापैकी सारखी झाडं दिसतात.
मग बदलतं काय, जी इकॉलॉजीमध्ये लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे या झाडांचं “composition”. म्हणजे कोकणात ऐन आणि किंजळ डॉमिनंट आहेत पण ऐन महाराष्ट्रात सगळीकडे दिसतो. आता पूर्व विदर्भात किंजळ तेवढा दिसत नाही तिथे काही भागांमध्ये गराडी, भिरा, अंजन अशी वेगळी झाडं डॉमिनंट आहेत. त्यामुळे composition matters a lot. प्रत्येक ठिकाणी झाडं तीच असली तरी टक्केवारी बदलते. यात मग प्रत्येक भागातल्या प्रत्येक खोऱ्यातली टक्केवारी पण वेगळी असू शकते - म्हणजे खानदेशातच चार वेगवेगळी ठिकाणं घेतली तर तिथली टक्केवारी सारखी नसते.
जिज्ञासा: म्हणजे आपल्याला जर कुठे झाडं लावायची असतील - सामाजिक वनीकरण, किंवा वृक्षारोपण करताना तर ही झाडांची स्थानिक टक्केवारी देखील लक्षात घेतली पाहिजे .
केतकी: Absolutely, नक्कीच. म्हणजे मी आत्ता ज्या गराडीच्या झाडाचा उल्लेख केला ते पश्चिम महाराष्ट्रात अजिबात दिसत नाही. त्यामुळे जरी पाऊस सारखा असला आणि गराडी देशी झाड असलं तरी पश्चिम महाराष्ट्रात गराडीची लागवड करू नये. असंच दुसरं विदर्भ स्पेशल झाड म्हणजे भिरा. पण अशी झाडं कमी आहेत. त्यामुळेच तो uniqueness जपला पाहिजे. म्हणजे झाडं लावताना तिथल्या भागात खास दिसणारी देशी झाडं आवर्जून लावावी.
जिज्ञासा: आतापर्यंत आपण तीन प्रकारची जंगलं पाहिली - आर्द्र आणि शुष्क पानगळी, आणि निम्न सदाहरित. तर यात कोणत्या प्रकारचे प्राणी पक्षी दिसतात?
केतकी: तर आर्द्र आणि शुष्क पानगळी प्रदेशात साधारण सारखेच प्राणी, पक्षी दिसतात. अर्थात प्राणी पक्षी झाडांसारखे स्थिर नसल्याने या साऱ्या प्रदेशात संचार करू शकतात. काही स्पेशल प्राणी, पक्षी आहेत - म्हणजे फक्त जंगलात दिसणारे रानडुक्कर, भेकर, रानमांजर असे आणि काही उघड्या माळरानात दिसणारे असे चंडोल, राखी वटवट्या खाटीक वगैरे. एकाच प्रकारच्या पक्ष्याच्या जाती प्रदेशप्रमाणे बदलताना पण दिसतात उदाहरणार्थ हॉर्नबिल (धनेश) हा सगळीकडे दिसतो पण ग्रेट पाईड हॉर्नबिल फक्त सह्याद्रीत दिसतो, मलबार हॉर्नबिल विदर्भातही दिसतो.
जिज्ञासा: महाराष्ट्रातल्या जमीन, दगड, आणि माती विषयी काय सांगशील?
केतकी: आपण मगाशी कोकणातल्या जांभा दगडाबद्दल बोललो पण तो दक्षिण कोकणात आहे. बाकी महाराष्ट्रात सगळीकडे बेसाल्ट आहे. त्यात मग थोडे उपप्रकार/ग्रेड्स आहेत - कुजलेला बेसाल्ट, मांजऱ्या वगैरे. आपला काही भाग हा डेक्कन ट्रॅपचा भाग आहे - ६.६ कोटी वर्षांपूर्वी लाव्हा थंड होऊन हा सगळा भाग तयार झालाय.
मातीविषयी सांगायचं तर मध्य महाराष्ट्रात आणि काही अंशी विदर्भात काळी माती आहे जिच्यात humus चं प्रमाण जास्त आहे. या खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भात त्याचमुळे शेती खूप उत्तम होऊ शकते. एक तर पठारी प्रदेश आहे आणि काळी माती आहे. त्यामुळे या भागात पूर्वीपासून ज्वारी, बाजरी, कडधान्य पिकवली जातात.
सह्याद्रीत आणि कोकणात सगळीकडे लाल माती आहे - लोहाचं प्रमाण जास्त असलेली. विदर्भात ही काही ठिकाणी लाल माती दिसते. कारण तिथेही जास्त पाऊस आहे आणि त्यामुळे दगडाची झीज जास्त वेगाने होते.
जिज्ञासा: आपण नद्यांबद्दल एका भागात बोलणारच आहोत पण तरीही थोडक्यात महाराष्ट्रातल्या नद्यांविषयी सांगशील का?
केतकी: नक्की. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगेमुळे पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी असे नद्यांचे दोन मुख्य प्रकार दिसतात. दोन्हींचा उगम हा घाटमाथ्यावर होतो. यातल्या पश्चिम वाहिनी नद्या, ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्यांची लांबी तुलनेने कमी आहे. यात मुख्य म्हणजे कुंडलिका, सावित्री, वासिष्ठी, काळ नदी.
ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत - म्हणजे कृष्णा, गोदावरी, भीमा, इंद्रायणी, या फार मोठा प्रवास करून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तर हेच विशेष आहे. या घाटमाथ्यावरच्या चिंचोळ्या पट्टीवर पावणाऱ्या नद्या जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड सचेतन करत बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यामुळे ही घाटमाथ्यावरील जंगले आत्यंतिक महत्वाची ठरतात. उदाहरणार्थ, कृष्णेचं खोरं हे संपूर्ण भारतासाठी महत्वाचं आहे. कृष्णेच्या पाण्याच्या वाटपावरून होणारे वाद आपण पेपरात वाचत असतोच. आता या नद्यांच्या परिसंस्थेविषयी आपण जेव्हा बोलू तेव्हा मग अजून विस्ताराने गप्पा होतील.
जिज्ञासा: इकॉलॉजीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणत्याही दोन/तीन वैशिष्टय़पूर्ण जागा सांगशील का?
केतकी: महाराष्ट्रात अनेक स्पेशल अशा जागा आहेत तरी या प्रश्नाचं उत्तर देणं मला अवघड वाटतंय. पण ते एका वेगळ्याच कारणासाठी. आपण भारतीय पर्यटक म्हणून निसर्गाविषयी फार जागरूक नाहीयोत. तेव्हा या महाराष्ट्रातल्या अनवट जागा इथे मांडल्या तर तिथे पर्यटकांचा ओघ वाढेल आणि तिथल्या परिसंस्थेला धक्का बसेल अशी मला भीती वाटते.
जिज्ञासा: तुझी भीती अनाठायी नक्कीच नाही. पण मग काही अशा जागा सांगू शकशील का ज्या माहितीच्या आहेत पण तरीही इकॉलॉजीच्या दृष्टीने त्यांच्याकडे इतकं लक्ष दिलं जात नाही किंवा जिथे अजून उत्तम जंगलं आहेत?
केतकी: नक्कीच तशा जागा सांगता येतील. आपल्याकडच्या अनेक नद्यांच्या पात्रात रांजणखळगे दिसतात - निघोजचे तर प्रसिद्धच आहेत. या ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे तयार होणारे खळगे आणि तिथली इकॉलॉजी बघण्यासारखी आहे. तसेच खळगे येळवली गावात पण आहेत. जिथे ग्रामस्थांनी इको टुरिझम देखील सुरु केले आहे.
सह्याद्रीत असलेल्या अनेक ठिकाणच्या देवराया ह्या इकॉलॉजीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या जागा म्हणता येतील. तिथल्या जंगलाला शेकडो वर्षे संरक्षण असल्याने त्या भागातली मूळची जंगलं, झाडं कोणती होती हे आपल्याला देवराई मधली विविधता पाहून कळतं. त्याशिवाय आपल्याकडची अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं ही देखील संरक्षित असल्याने चांगल्या स्थितीत आहेत.
एक अत्यंत unique जागा म्हणजे लोणार सरोवर - जे उल्कापातामुळे तयार झालेले आहे आणि त्यामुळे एक वेगळीच इकोसिस्टिम तिथे दिसून येते.
आपल्या इथे काही ठिकाणी अतिविशाल वृक्ष आहेत. उदाहरणार्थ, विदर्भात आलापल्लीला एक विशाल सागाचं झाड आहे आणि त्याच्या आजूबाजूचं जंगल पण बघण्यासारखं आहे.
जिज्ञासा: अजून काही जागा सुचताहेत का तुला?
केतकी: खरं सांगू का, महाराष्ट्राची इकॉलॉजी एन्जॉय करायची असेल ना तर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असलात तरी करू शकता. आपल्याकडच्या प्रत्येक जागेचं हवामान आणि तिथली झाडी इतकी सुंदर आहे त्याचीच आपल्याला अनेकदा ओळख नसते. आपण आपल्या परिसराची इकॉलॉजी समजून घेतली की मग या साऱ्याचा आपल्या राहणीमानावर, खाण्यापिण्याच्या सवयींवर होणारा परिणाम हा आपल्याला जाणवायला लागतो. विदर्भातली धाब्याची घरं तर कोकणातली कौलारू घरं या साऱ्या मागची नैसर्गिक कारणं लक्षात आली की मग मजा येते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण निसर्गाशी जुळवून घेतले आहे - कोळी, कातकरी, माडिया गोंड, धनगर यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर खूप विविधता दिसते जी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या landscape मुळे, जैवविविधतेमुळे आहे. अगदी प्रत्येक इकॉलॉजिकल रिजन मधले ग्रामीण भागातले जीवनही अत्यंत वैविध्यपूर्ण आणि संपन्न आहे.
इकॉलॉजी का शिकायची तर Ecology justifies a lot of our practices, food habits, and cultural heritage. दुर्दैवाची गोष्ट अशी की या पारंपरिक गोष्टींना आपण दुय्यम समजतो किंवा त्याविषयी न्यूनगंड बाळगतो. म्हणजे स्वतःचं घर स्वतः बांधू शकणारा, नैसर्गिक स्रोतांनी अधिक संपन्न असा आदिवासी स्वतःला सिमेंटच्या घरात राहू शकत नाही म्हणून स्वतःला दुय्यम समजतो. खरंतर स्वतःचं घर उपलब्ध नैसर्गिक स्रोतांतून बांधण्याची कला ही मौल्यवान आहे. सिमेंटच्या घरात राहणारे आपण resource-wise आणि skillset wise poor आहोत. जरी आर्थिकदृष्ट्या तो आदिवासी गरीब असला तरी ही resources ची, skills ची श्रीमंती कुठेतरी मोजली गेली पाहिजे. तिचेही योग्य मूल्यमापन झाले पाहिजे. या आदिवासी मुलांना भले ५० पक्षी माहिती असतील - त्यांचे आवाज, घरटी, अंडी कशी, पिल्लं कशी पण या पारंपरिक ज्ञानाचा शाळेत कधीच उल्लेखही होत नाही. या साऱ्या विविधतेचा नाश करूनच आणि या निसर्गस्नेही जीवनशैलीचा त्याग करूनच भौतिक विकास होतो, आपल्याला आर्थिक समृद्धी मिळते असं सध्याचं समीकरण दिसते. एक जागरूक माणूस म्हणून ते आपण कसे बदलू शकू याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
आज महाराष्ट्रात कुठेही जा.. रस्त्याच्या कडेला गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ, आणि अशोक अशी विदेशी झाडंच दिसतात. आपल्यापैकी किती जणांना किमान २० देशी वृक्ष माहिती आहेत? ही इकॉलॉजीची किमान आपल्या परिसराची तरी माहिती आपल्याला असली पाहिजे. आपल्याला समृद्ध वारसा लाभलेला आहे. पण सपाटीकरणाच्या रेट्यात हा वारसा आपण गमावतो आहोत. हा आपण जपला पाहिजे, याचे संवर्धन व्हायला पाहिजे. जर आपल्या या गप्पांमधून ही जाणीव थोडी तरी वाचकांपर्यंत पोहोचली तरी मला खूप आनंद होईल.
जिज्ञासा: मला वाटतं आपल्या गप्पांमधून सर्वच वाचकांना आपल्या परिसराकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी नक्की मिळेल! या भागाच्या शेवटी ऑयकॉसने तयार केलेली महाराष्ट्रातील विभागवार देशी वृक्षांची यादी आपण देऊया म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या झाडांबद्दल जास्ती माहिती मिळवता येईल. मला इथे तुमची वारसा नावाची शॉर्टफिल्म पण आठवते आहे जिच्यात तुम्ही या आपल्या समृद्ध पारंपरिक ज्ञानाची एक झलक दाखवली आहे. ज्यांना रस असेल त्यांनी या खालच्या लिंकवर जाऊन ती जरूर बघा.
तर आता पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील बायोडायव्हर्सिटी किंवा इकॉलॉजी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था कोणत्या?
केतकी: Bombay Natural History Society (BNHS), मुंबई ही डॉ. सालिम अलींनी सहस्थापित केलेली या क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था आहे. या संस्थेतर्फे अनेक विषयातले प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. कार्यशाळा, प्रदर्शने आयोजित केली जातात. WWF महाराष्ट्र शाखा आहे. IISER Pune या संस्थेत उत्तम संशोधनाचं काम चालतं . याशिवाय महाराष्ट्रभर अनेक संस्था स्थानिक पातळीवर निसर्गसंवर्धनाचं उत्तम काम करत आहेत. आत्ता माझ्या ओळखीतल्या मित्र मैत्रिणींनी सुरु केलेल्या काही संस्थांची नावं मला पटकन सुचत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या वाचकांनी त्यांच्या परिसरातल्या संस्थांची माहिती प्रतिसादातून नक्की सांगावी. बायोम, जीविधा, नेचर वॉक, कल्पवृक्ष, AERF, साताऱ्याची डॉ. संदीप श्रोत्री सातारा यांची संस्था, चिपळूणची ऑलिव्ह रिडले या कासवांच्या संरक्षणाचे काम करणारी सह्याद्री मित्र मंडळ ही संस्था ही नावे मला आत्ता सुचत आहेत.
जिज्ञासा: नक्कीच, आपण प्रतिसादात आलेली महाराष्ट्रात निसर्ग संरक्षण/संवर्धन यात काम करणाऱ्या संस्थांची नावं आपल्या यादीत समाविष्ट करत जाऊ. आणि जर मोठी यादी झाली तर वेगळा धागा देखील काढता येईल. या शिवाय प्रकाश गोळे सरांनी सुरु केलेली आता ४१ व्या वर्षात पदार्पण करणारी पुण्याची इकॉलॉजिकल सोसायटी आणि मानसी आणि तुझी ऑयकॉस याही दोन महत्त्वाच्या संस्था या यादीत नक्कीच आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न - या विषयावरची कोणती पुस्तकं, आर्टिकल्स, फिल्म, डॉक्युमेंटरीज सुचवशील?
केतकी: आपल्याकडे भरपूर पुस्तकं आहेत पण ती एका विशिष्ट विषयावरची आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या इकॉलॉजीची माहिती देणारं असं एकच पुस्तक मला तरी आठवत नाहीये. पण प्रा. श्री. द. महाजन सरांची देशी वृक्ष आणि इतर पुस्तकं, किरण पुरंदरे यांची पक्षांची माहिती देणारी पुस्तकं, डॉ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांची पुस्तकं ही उत्तम reference books आहेत. याशिवाय सह्याद्रीतील फुलपाखरं, किडे, पक्षी, किंवा वनस्पती यांची माहिती देणारी भरपूर पुस्तकं आहेत.
जिज्ञासा: आपण आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. तुम्हाला माहिती असलेल्या निसर्ग संरक्षण/संवर्धन यात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संस्थांची नावं आणि थोडक्यात माहिती प्रतिसादात जरूर लिहा. पुस्तके, लेख, फिल्म, किंवा डॉक्युमेंटरीज यांच्या यादीत ही जरूर भर घाला.
ह्या गप्पांच्या पुढच्या काही भागांमध्ये आपण एका एका परिसंस्थेची अधिक विस्ताराने ओळख करून घेणार आहोत. या मालिकेचा पुढचा भाग पुढच्या सोमवारी प्रकाशित होईल.
महाराष्ट्रातील झाडीचे प्रकार दाखवणारा नकाशा (साभार: केतकी घाटे, ऑयकॉस पुणे)
देशी झाडांच्या यादीसाठी लिंक: https://oikos.in/html/publications.html
वारसा लघुपट लिंक: https://youtu.be/AZp27a9eArc
वारसा ई-पुस्तक लिंक: https://issuu.com/team.oikos.01/docs/varasa
आधीचे भाग
भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १
भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २
कवी माधव (माधव केशव काटदरे)
कवी माधव (माधव केशव काटदरे) याची हिरवे तळकोकण ही कविता (माझ्या माहितीप्रमाणे ही कविता बरीच जुनी [१९२१] आहे त्यामुळे प्रताधिकार भंग होऊ नये. तरीही तसे होत असल्यास हा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल.)
सहय़ाद्रीच्या तळी शोभिते हिरवे तळकोंकण,
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन !
झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे,
शिलोच्चयांतुनी झुरूझुरू जेथे गंगाजळ पाझरे;
खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखो-यांतुनि माणिकमोती फुलुनि झांकले खडे;
नील नभी घन नील बघुनी करि सुमनी स्वागत कुडा,
गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा!
कडेपठारी खेळ मरूतासह खेळे हिरवळ,
उधळीत सोने हसे नाचरे बालिश सोनावळ!
शारदसमयी कमलवनाच्या तरल्या शय्येवरी
मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी!
कविकाव्यांतुनी तशी जींतुनी स्र्वते माध्वी झरी,
आमोदा उधळीत फुले ती बकुळींची मंजरी;
हिरव्या पिवळय़ा मृदुल दलांच्या रम्य गालीच्यावरी
स्वप्नी गुंगति गोकर्णीची फुले निळी पांढरी!
वृक्षांच्या राईत रंगती शंकुत मधु गायनी
तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकीवनी!
फुलपाखरांवरूनी विहरती पुष्पवनांतिल परी,
प्रसन्नता पसरीत वाजवून जादुची पांवरी!
शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी;
रोपे त्यांची बनुनी पसरली नाचत चोहींकडे!
अजुनि पहाया! मंडित त्यांनी कोकणचे हे सडे;
इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली,
दंतकथांसह विस्मृती ज्याची होऊनिया राहिली
‘झिम्मा खेळे कोंकणचा तो नृपाळ’ म्हणती मुली
‘गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याची डाहळी!’
पिकले आंबे गळुनी भूतळी रस जोंवरि वाहतो
वनदेवींसह झिम्मा खेळत तोवरि नृप राहतो.
कुठे आढळे फळभाराने लवलेली आंवळी,
कुठे गाळिती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी,
कुठे हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर,
कुठे वडाच्या पारंबीवर झोंके घे वानरं!
कुठे बेहड्यावरि राघूस्तव विरही मैना झुरे,
प्राणविसांवा परत न आला म्हणूनी चित्त बावरे!
मधमाशांची लोंबती पोळी कुठे सात्त्विणावरी
रंग खेळती कुठे प्रमोदे पांगारे शेवरी!
पोटी साखरगोटे परि धरि कंटक बाहेरूनी
झुले कुठे तो फणस पुरातन रहिवासी कोंकणी.
कोठे चिंचेवर शठआंबा करि शीतल सांउली,
म्हणूनी कोपूनी नदी किनारी रातंबी राहिली!
निर्झरतीरी रानजाईच्या फुलल्या कुंजातुनी
उठे मोहमयी संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी!
कुठे थाट घनदाट कळकिचा त्यांत संचरे कुणी
पुंगी बजावित फंदी मुशाफर दर्यापुर सोडूनी!
कुठे सुरंगी मुकुलकुलांच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमळ सेवित फिरती अपसरा वनी!
कोरांटीची नादवटीची नेवाळीची फुले
फुलुनि कुठे फुलबाग तयांनी अवघे श्रंगारिले!
नीललोचना कोंकणगौरी घालुनि चैत्रांगणी
हिंदोळय़ावर बसविती जेव्हा अंबा शुभदायिनी,
हळदीकुंकू तदा वटिता नसे प्रसादा उणे,
पिकली म्हणूनी रानोरानी करवंदे तोरणे.
औदुंबरतरू अवधुताचा छायादे शीतल,
शिवयोग्याचा बेल वाढवी भावभक्तीचे बळ;
बघुनि पांढरी भुतपाळ वेताळ काढितो पळ
आइनकिंजळ करिती मांत्रीकमंत्रबळ दुर्बळ!
गडागडावर निवास जेथे मायभवानी करी.
राहे उधळीत फुले तिथे खुरचांफा चरणांवरी!
पानफुलाच्या वाहुनि माळा अंजनिच्या नंदना,
तिजवर वरूनी वैधव्याच्या रूइ चुकवी यातना!
चिंवचिंव शब्दा करित निंवावर खार भराभर पळे
भेंडि उंडिणीवरी बैसुनी करकरती कावळे;
लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालासमं
रंगुनि काजु, भरले त्यांनी गिरी डोंगर दुर्गम!
तिथे मंडलाकार मनोहर नर्तन आरंभुनी,
रूसल्या सखिची घुमत पारवा करितो समजावणी!
विविध सुवासी हिरवा चांफा चकीत करी मानस,
मंदमंद मधु गंध पसरिते भुइचांफा राजस,
हंसे उपवनी अधरेन्मीलित सुवर्णसंपक कळी,
पाडुनी तुळशीवरी चिमुकली हलती निज सांउली!
पराग पिवळे, धवल पाकळय़ा, परिमळ अंबर भरी
घालित रूंजी भ्रमति भृंग त्या नागचंपकावरी!
सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळय़ा,
लाजत लाजत हळुच उघडितां निज नाजुक पाकळय़ा
त्या उच्छ्वास पिउनि बिजेचा चांद हर्षनिर्भरी
होउनिया बेभान नाचतो निळावंतिच्या घरी!
धुंद सिंधुला मारवेलिची मर्यादा घालून
उभी सैकती कोंकणदेवी राखित तल कोंकण;
निकट माजली निवडुंगांची बेटे कंटकमय,
आश्रय ज्यांचा करूनी नांदती कोचिंदे निर्भय,
मागे त्यांच्या डुले नारळी पोफळिचे आगर
पुढे विराजे निळावंतिचे निळेच जलमंदिर
सुंदर लेख, अनमोल माहिती..
सुंदर लेख, अनमोल माहिती..
सुंदर लेख, अनमोल माहिती..+१
सुंदर लेख, अनमोल माहिती..+१
अनमोल माहिती, सुंदर कविता
अनमोल माहिती, सुंदर कविता
धन्यवाद
अनमोल माहिती, सुंदर कविता>>>>
अनमोल माहिती, सुंदर कविता>>>>> + 1
छान माहिती आणि सुंदर लेख!
छान माहिती आणि सुंदर लेख!
शहरांत सुद्धा लोकांच्या व जेथे सोसायट्या आहेत तेथे त्यांच्या मदतीने या झाडांचे कॅटलॉगिंग करायला हवे. आमच्या सोसायटीत अशी कोणी माहिती जतन केली आहे का विचारतो पूर्वी जेथे राहात होतो तेथे एकमजली बैठी घरे व मधे मुबलक जागा असे असल्याने खूप वेगवेगळी झाडे असत. त्यांची नावेही बहुतांश तेव्हा माहीत होती. ती तेव्हा नेहमीच्या गप्पांत असत लोकांच्या. आता तशी ती ऐकू येत नाहीत नेहमीच्या बोलण्यात.
धन्यवाद निरू, एस, हर्पेन,
धन्यवाद निरू, एस, हर्पेन, मंजूताई, फारएण्ड!
फा, खरं आहे. या बाबतीत आपण पिढी दर पिढी बावळट होत चाललो आहोत असं मला वाटतं! माझी आजी जे तिच्या भवतालच्या निसर्गाचे ज्ञान कोणत्याही शाळा कॉलेजात न जाता बाळगून होती त्याच्या १% ज्ञानही मला नाही. पण आपण हे जाणीवपूर्वक बदलू शकतो. अशा दोन उपक्रमांबद्दल लिहिते लवकरच!
वारसा हे पुस्तक नुकतेच या
वारसा हे पुस्तक नुकतेच या पर्यावरण दिनी सर्वांसाठी ई-पुस्तक या स्वरूपात उपलब्ध झाले आहे. त्याची लिंक मूळ लेखात आता घातली आहे. सर्वांनी त्यातील किमान पहिला भाग तरी जरूर चाळावा असे सुचवेन.
लेखमालिका करायला हवी याची.
लेखमालिका करायला हवी याची.
मस्त !!
मस्त! खूप छान माहिती. ह्या लेख मालिका सकाळ आणि बाकीच्या पेपर मधे प्रकाशित केल्या तर हि माहिती सामान्य लोकांपर्यंत जाईल
खुप महत्वाचि माहिति...
खुप महत्वाचि माहिति... लेखमाला आवडलेलि आहे..
पिढी दर पिढी बावळट होत चाललो
पिढी दर पिढी बावळट होत चाललो आहोत असं मला वाटतं! माझी आजी जे तिच्या भवतालच्या निसर्गाचे ज्ञान कोणत्याही शाळा कॉलेजात न जाता बाळगून होती त्याच्या १% ज्ञानही मला नाही. >> आजीला गरज होती, म्हणून ते ज्ञान होते. आपल्याला गरज नाही म्हणून ते ज्ञान नाही. आपल्याला ज्याची गरज आहेत त्याचे ज्ञान आपण मिळवतो, ते आजीला नक्कीच नसेल. पण अगेन आजीला त्याची गरज पडली तर ती ते शिकुन आत्मसात करेल आणि वापरेल.
जर मिळालेलं ज्ञान जतन करुन ठेवलं असेल, तर आपल्याला/ सामान्य माणसाला त्या ज्ञानाची जेव्हा गरज पडेल तेव्हा ते चटकन वाचुन बर्यापैकी आत्मसात करता येईलच की. ते आत्मसात करायला ज्या बौद्धिक क्षमता लागतात त्यांना पिढ्यानपिढ्या खतपाणी घातल राहिलं की पुरेसं आहे.
लेखमालिकेतून भरपूर माहिती
लेखमालिकेतून भरपूर माहिती कळली.
---------
प्रश्न असा आहे की जपणे आणि संवर्धन कसं होणार. कठीण आहे.
भवतालच्या निसर्गाचे ज्ञान
भवतालच्या निसर्गाचे ज्ञान आजीला होते पण
आज आप्ल्याला नाही हे जर आपण आजीला मोबाइल ज्ञान नव्ह्ते पण आजचे एक वर्षाचे मुलही सहज मोबाइल वापरते या चालीत वाचत असु तर कठिण आहे..
आजच्या मुलिला तिच्या आजीसारखा पाटा वरवन्टा वापरता येत नसला तरी ती मुलगी आज आरामात जेवण बनू शकेल, तेवढि प्रगती झालेली आहे. भवतालच्या निसर्गाचे ज्ञान/महत्व माहित नसल्यामुळे त्या निसर्गाच्या होत असलेल्या र्हासाकडे आपले दुर्लक्श होत असेल तर तो र्हास नाहीसा करण्याचे तन्त्रज्ञान अजुन विकसीत झालेले नाही. परिणामी नुकसान आपल्या सगळ्यान्चेच आहे..
आपली घरे जिथे उभी आहेत तिथे
आपली घरे जिथे उभी आहेत तिथे पूर्वी वन होते. उजाड ओसाड माळही असेल. पण तोही कित्येक प्राण्यांना संभाळत असेल. पण तुम्ही मात्र वनं राखा. तोडून घरं, कारखाने उभारू नका एवढेच कळकळीने आम्ही सांगतो. फार विरोधाभास आहे यात.
अमितव, आजचे ज्ञान आणि स्थानिक
अमितव, आजचे ज्ञान आणि स्थानिक निसर्गाबद्दलचे पारंपरिक ज्ञान हे mutually exclusive नाही. आपण एकूण बावळट झालो असं म्हटलं नाहीये. या बाबतीत नक्कीच झालो. कारण आपल्याला त्या ज्ञानाचं महत्त्व (अजूनही) लक्षात आलेलं नाही. ज्यांना ती जाणीव आहे ते आपल्या परीने documentation करतच आहेत.
वारसा पुस्तक downloadable
वारसा पुस्तक downloadable नाहीये, offline कुठे मिळेल का?
हर्पेन, बरोबर आहे. download
हर्पेन, बरोबर आहे. download करता येत नाही वारसा. आणि माझ्या माहितीप्रमाणे वारसा अजून पुस्तक म्हणून प्रकाशित झालं नाहीये. जर झालं तर इथे नक्की सांगेन.
ओके धन्यवाद जि
ओके धन्यवाद जि
अमित - मी आपण राहतो त्याच्या
अमित - मी आपण राहतो त्याच्या आजूबाजूला असलेली झाडे व त्यांच्याबद्दलची माहिती याबद्दल म्हणत होतो. माझ्या लहानपणी आमच्या चाळीत घरांच्या पुढे व मागे अगदी कोयनेल व त्यावर फोफावणार्या एका पिवळ्या रंगाच्या वेलापासून ते निरगुडी, गुलबक्षी, लाल व पिवळा चाफा, तगर, प्राजक्त, पेरू, आवळा, जाई वगैरे झाडे/वेली ही लहान मुलांपासून सर्वांना माहीत होती. कधीकधी जनरल गप्पांमधे उल्लेख येत असत. तितका अवेअरनेस आता कितपत असतो माहीत नाही कारण कधी बोलण्यात सुद्धा येताना दिसत नाही लोकांच्या. या माहितीची गरज तेव्हाही कितपत होती माहीत नाही पण एकूणच आपल्या परिसराबद्दल सध्यापेक्षा जास्त माहिती लोकांना असे. आसपासची झाडेच नाही तर प्राणी, पक्षी, फुलपाखरे, किडे याबद्दलही.
मधे एकदा कॅलिफोर्नियात असताना बर्ड वॉचिंग हाइक केली होती. त्यानंतर बॅकयार्ड बर्ड्स बद्दल काहीतरी वाचले होते. मग सारखे लक्ष जाउ लागले घराजवळ दिसणार्या पक्ष्यांकडे आणि किमान ८-१० प्रकारचे पक्षी बॅकयार्डमधेच दिसतात हे जाणवले. या माहितीचा नक्की काय उपयोग आहे माहीत नाही. पण एकदा इण्टरेस्ट आल्यावर एखादा स्विच डोक्यात ऑन झाल्यासारखे सगळे माहीत होउ लागले
फा, +१
फा, +१
एक उदाहरण द्यावंसं वाटतं. शेवग्याची झाडं पूर्वी शहरात देखील सगळीकडे दिसायची. शेवग्याच्या शेंगांची आमटी, पाल्याची भाजी (ही कोणत्या महिन्यात करावी/करू नये याचे काहीतरी संकेत आहेत, मी विसरले आहे आत्ता) ही अनेकांच्या नेहमीच्या आहारात होती. आता शहरांत तर शेवगा दिसतच नाही. अस्सल देशी झाड आहे. फुलतो तेव्हा छान दिसतं झाड. गेल्या दहा-वीस वर्षांत जितक्या नवीन सोसायट्या तयार झाल्या त्यात सुशोभीकरणासाठी जी झाडं लावली त्यात शेवगा अपवादानेच लावला गेला असेल.
शेवग्याच्या १०० ग्रॅम न शिजवलेल्या पानांत १८५ मिग्रॅ कॅल्शिअम (१०० ग्रॅम म्हशीच्या दुधात असतं तेवढं), ५२ मिग्रॅ व्हिटॅमिन सी (आपल्या रोजच्या गरजेच्या तब्बल ६२% टक्के), ४ मिग्रॅ लोह (३१% RDA) इतके पोषण असते. या शिवाय बाकीची minerals, vitamins, fiber, protein, carbs आहेतच. कार्बन फूटप्रिंट दुधाच्या तुलनेत फारच कमी. पण आज शहरातल्या किती घरांत शेवग्याच्या पाल्याची भाजी नियमित केली जाते? जेव्हा लाखभर रुपये मेम्बरशिप फी भरून जिम मधली nutritionist सुपर फूड या गोंडस नावाखाली moringa powder गळ्यात मारते तेव्हा मग ती आपण गुपचूप घेतो! किंवा ब्रोकोली किती भारी हे आपल्याला तोंडपाठ असतं पण हे आपल्या मागच्या परसात असलेलं ब्रोकोलीच्या तोडीचं किंबहुना सरस असलेलं बहुगुणी झाड अंगणातून कधी नाहीसं झालं याचा आपल्याला पत्ताच नसतो.
ही जी आपली स्थानिक निसर्गाबद्दलची उदासीनता आहे ना ती बावळटपणा या कॅटेगरीत येते असं मावैम.
मध्यंतरी अनेक संस्था अशी
मध्यंतरी अनेक संस्था अशी रोपटी लोकांना देत लावायला. त्यात स्थानिक झाडेच निवडलेली होती की नाही माहीत नाही पण असे करायला हवे. प्रत्येक सोसायटीत, चाळींमधे अनेक हौशी लोक असतात. त्यांना हाताशी धरून एखाद्या संस्थेने हा उद्योग करायचे ठरवले तर त्यात सहभागी सुद्धा व्हायला आवडेल.
माझ्या एका मित्राच्या नवीन झालेल्या सोसायटीत त्याच्या इमारतीच्या बाजूला एक नुसतीच भिंत होती सोसायटीने बांधलेली. पार्किंग व ही भिंत याच्या मधे नुसतीच मोकळी जागा - गाड्यांना वळवायला लागते त्यापेक्षाही जास्त जागा तेथे होती. त्याने एक दिवस तेथे स्वतः काही फुलझाडांची रोपे लावली. ती वाढत आहेत असे दिसल्यावर मग तो नेहमी त्याकडे लक्ष देउ लागला. २-३ वर्षांत तेथे एकदम रंगीत सीन दिसू लागला. या मित्राला आधी कधीही झाडे, फुले वगैरे बोलताना ऐकले नव्हते. पण स्वतः लावलेली रोपे आली की आपोआप इंटरेस्ट येतो. असे लोक अनेक ठिकाणी आहेत. या लोकांना थोडी वरची शेवग्याच्या माहितीसारखी माहिती दिली तर ते लोक हौसेने बरेच काम करतील.