"पती-पत्नीच्या नात्यातील पारदर्शकता!"

Submitted by चंद्रमा on 9 June, 2021 - 04:33

........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.
'भांडण' हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे 'आजी-आजोबा', 'आई-बाबा', 'काका-काकू' आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की 'नवरा-बायको' एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये 'तंटा' होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
......नवरा बायकोचे नाते कसे असावे? हे कित्येकांना कळलेलेच नाही. आजही कुठे-कुठे आपला पौरूषी रोब झाडणारे बिनचुके दिसतात पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच संपतो पण फार पूर्वी आणि अगदी आमच्या पिढीच्या तरुणपणातही बायको ही 'क्षणाची पत्नी' आणि 'अनंत काळाची मोलकरीण' हा समज दृढ होता. "नवरा-बायको ही संसार रथाची दोन चाके आहेत." ही कल्पना आता कालबाह्य होत चालली आहे तर मुळ मुद्दा बाजुलाच राहला तर 'भांडण' का होतात? तर त्यासाठी तुम्हाला एक सुंदर दाखला देतो.

.....दोन मित्र जॉगिंगला सकाळी भेटतात. रमेशची तक्रार असते की त्याचे त्याच्या बायको सोबत रोज भांडणं होतात. सुरेशला तो यावर काही सोल्युशन आहे का म्हणून विचारतो. 'रमेश' या विषयावर आपण घरी जाऊन बोलू. असे म्हणून सुरेश रमेशला आपल्या घरी घेऊन येतो. सकाळचा स्वच्छ सुंदर प्रकाश खिडकीतून पाझरत असतो तरी पण श्रीमान श्रीमतीला दिवसा लाईट लावायला सांगतात. पत्नी काही न बोलता दिवा लावते त्यानंतर पत्नी दोघांसाठी चहा घेऊन येते. रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो. चहा बाजूला ठेवून देतो पण सुरेश चहा दोन घोटात संपवतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. रमेशला आश्चर्य वाटते चहामध्ये साखर नसून मीठ असतानासुद्धा हा आपल्या बायकोला काहीही बोलला नाही. बाहेर पडताना 'रमेश' त्याला याचं कारण विचारतो तर 'सुरेश' बोलतो, "पहा मी सकाळी आल्यानंतर गरज नसताना सुद्धा लाईट लावायला सांगितले तर बायकोने काही न बोलता आत गपचूप दिवा लावला आणि मी पण चहात साखरेऐवजी मीठ असताना सुद्धा तिला काही बोललो नाही अर्थातच हे तिने काही जाणून केले नाही पण मला न बोलताच कळाले." यासारख्या लहान-सहान बाबींना आपण समजून घेतलं तर दोघांमध्ये वाद-विवाद होत नाही. या सुरेशच्या संभाषणाने रमेशला सुखी आणि आनंदी राहण्याचा मंत्र मिळाला. मनावरचे दडपण हलके झाल्यासारखे वाटले आणि तो हसत मुखाने घरी परतला.

......आयुष्यात आपण जसे इतरांना आदर देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणी आपल्यासाठी काही केलं तर लगेच 'धन्यवाद'! 'थँक यू!' म्हणतो तसं लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे आभार व्यक्त करा. तिला जवळ घ्या. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवा आणि मग बघा आनंदाचे मोती कसे तिच्या गालावर तरळतात.
.....शब्द हे तीष्ण अग्निबाणाप्रमाणे असतात जेव्हा भात्यातून या अग्निबाणांचा वर्षाव होतो तेव्हा मौनरूपी जलबिंदूचा वर्षाव करून त्याची दाहकता कमी करायला हवी.
"जेव्हा राग आला तेव्हा थोडं थांबलं आणि चुकलं तेव्हा थोडं नमलं"तर हा जीवन प्रवास कसा आनंदात निघून गेला हे कळणार सुद्धा नाही. "पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!"
आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.

(आपले या विषयावर काही मनोगत असतील तर कृपया मायबोलीकरांनी व्यक्त करावे ही नम्र विनंती!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्यात एकमे व मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.>> अनुमोदन चंद्रमे छान लिहिले आहेस. अरे मित्र मैत्रीनींनो या. व चर्चा करा. हा ललित लेख आहे कथा नव्हे.

साधारण सारांशा वाइफ इज ऑल्वेज राइट. असा आहे.

सध्या माबोवर प्रतिसाद देण्यासाठी बाफ शोधून काढावे लागतात. Wink

आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.>>+१११
ज्याला हे कळते त्याचा
संसाररुपी रथ कायम आनंदरुपी आकाशात विहरत असतो.

आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद 'अमा'!
खरतर 'लेख' या सदरात टाकायचा होता पण चुकून कथा या सदरात पडला! मग change करायचा विचार केला पण delete option सापडेना!
आपलि मिष्किल शैली भारी आहे!

'अतुल' छान! 'अमा' ची 'चंद्रमा' या आय डी विषयी गैरसमजूत दूर केल्याबद्दल!
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे!

चहात साखरे ऐवजी मीठ असताना काही न बोलणे, उलट हसतमुखाने संपवणे हा सीन बाजीगर मधून ईन्स्पाईरड आहे का Happy

जोक्स द अपार्ट, दोन्ही बाजूने समजूतदारपणा हवा.
आमच्याकडे चहा, जेवण, किंवा काहीही गंडले तर ते निमूटपणे न संपवता मी तरी लगेच फीडबॅक देतो. तो सुधारणेसाठीच असतो, तक्रारीसाठी नसतो. हे समजायला समजूतदारपणा हवा. तो मुळातच असला की मग प्रत्येक गोष्ट समजून घेतली जाते, अ‍ॅडजस्ट केले जाते. नसेल तर प्रत्येक गोष्टीत खुसपट काढून वाद घातला जातो.

तू किती करतेस माझ्यासा ठी हे एक गोल्डन वाक्य आहे. समोरचा विरघळतोच. त्यांचे प्रेम असतेच तुमच्यावर पण जगण्याच्या कटकटीत थोडा गंज चढलेला असतो. मेरेकु झगडा करने का है लेकिन वो बी तुम्हारे साथिच असे हे नाते आहे.

पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!>>> वाह .! हे आवडलं.

लेख छान आहे..!

रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो.
चहात मीठ असेल तर चहा कडवट लागतो हे माहित नव्हते.

चंद्रमा, आपण कथेतून जो संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात, तो खरंच खूप छान आहे, नवरा बायकोने एकमेकांना समजून घ्यावे, एकमेकांचे कौतुक करावे, तरच संसार सुखाचा होईल.

पण आपण जे उदाहरण दिले आहे, सकाळच्या स्वच्छ सुंदर प्रकाशाचा बायकोला आस्वाद घ्यायचा असतानाही नवर्‍याने कृत्रिम लाइट्स लाऊन सकाळच्या वातावरणाचा बट्ट्याबोळ केला, तरीही बायको शांत राहिली आणि तिने त्याचा राग चहावर काढला,याशिवाय बायकोने चहा कडवट केला असतानाही नवर्‍याने तो निमूटपणे प्यायला.

व्यवहारिक आयुष्यात असं वागणं खरंच शक्य आहे का? आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार झालेत, आपली ज्याप्रमाणे जडणघडण झालेय, त्याप्रमाणेच आपल्या आवडीनिवडी बनतात, आणि आपल्या आवडीनिवडींविरोधात जर काही गोष्टी झाल्या, तर त्यांच्यावर शांत राहणं हे सर्वसामान्यासाठी सहज शक्य नसते.

तरीही आपला लेख उत्तम आहे, आणि संसार सुखी करण्यासाठी फार छान मार्गदर्शन लाभले त्याबद्दल धन्यवाद!!

>>ज्याला हे कळते त्याचा संसाररुपी रथ कायम आनंदरुपी आकाशात विहरत असतो.

पती-पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाके. परस्पर संवाद हा या दोन चाकांमधला अ‍ॅक्सल. हा संवाद आणि परस्पर विश्वास जर बळकट असेल तर संसाररुपी रथ जीवनरुपी खडतर रस्त्यावर नात्यांचे प्रवासी घेउन आनंदाने मार्गक्रमण करेल

लेख छान समजूतीचाच आहे. असं व्हायला हवं.
मात्र हेही खरे की आमच्याकडे तो मित्र निघून गेल्यावर दोन्ही बाजूंकडून किमान ५० वाक्यांचे भांडण, ३ भूतकाळातल्या घटनांचे संदर्भ आणि किमान ३-४ ट्रॉली ड्रॉवर दाणकन बंद केल्याचे आवाज आले असते Happy

>>आमच्याकडे तो मित्र निघून गेल्यावर दोन्ही बाजूंकडून किमान ५० वाक्यांचे भांडण, ३ भूतकाळातल्या घटनांचे संदर्भ आणि किमान ३-४ ट्रॉली ड्रॉवर दाणकन बंद केल्याचे आवाज आले असते

आमच्याकडे भांडेरुपी डोक्यावर (की डोकेरुपी भांड्यावर?) पोचेरुपी खोक पाडुन देखिल अग्निरुपी रागाने वणवारुपी भांडण दिवसेनदिवस धुमसत राहीले असते

अनु +१
सकाळी उजेड असताना लाईट लावायला सांगितलं ? आणी तिने काहीही न बोलता लाईट लावला? धन्य ती माऊली.
मीठाचा चहा बिचार्य पाहुण्यालापण दिला.

मीठाचा चहा बिचार्य पाहुण्यालापण दिला. >>>> त्या शिवाय का त्याला दोघांतले प्रेम आणि समजुतदारपणा समजणार Happy

सकाळी उजेड असताना लाईट लावायला सांगितलं ? >> मी सुद्धा लावतो. वर्क फ्रॉम होमची गरज.

भूतकाळातल्या घटनांचे संदर्भ आणि किमान ३-४ ट्रॉली ड्रॉवर दाणकन बंद केल्याचे आवाज आले असते>> अशा वाक्यातुन संसाररुपी रथ वादरुपी खड्यांच्या वाटेवरुन सुसाट निघाल्याचे चित्र वाचकांच्या मनचक्षुरुपी पटलावर साकार होते. पण परस्पर संवादरुपी अ‍ॅक्सल आणि विश्वासरुपी लगाम जर बळकट असेल तर जीवनरुपी प्रवास आनंदात पार पडु शकतो.

प्रत्यक्षात साखरेऐवजी मीठ पडलं तर चहापत्तीशी मीठाचा संयोग होऊन ती चव कडू होते!
अनुभव घेऊन पहा योगीजी!
आणि हो विशेष आपण लेखाचे बारकाईने निरीक्षण केल्याबद्दल आभार!
कारण बहुतांशी वाचक त्रुंटीविषयी फार कमी बोलतात.
प्रत्यक्षात त्यांचा लेखकाला नाराज किंवा त्याचा हिरमोड करण्याचा प्रयत्न नसतो.पण लेखकाला जेव्हापर्यंत त्रुटींविषयी कळणार नाही तेव्हापर्यंत लेखन सुधारण्यास वाव नाही मिळणार!

Pages