..........सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आंबेगाव शे-पाचशे लोकोत्तर पुरुषांचे गाव आहे. तिथल्या लाल मातीत माणसांची एक निराळीच घडण लपलेली आहे. या जडणघडणीमध्ये अनेक पिढ्या होऊन गेल्या पण या मनुष्य वर्गांमध्ये जी उदात्तता दिसून येते ती अन्यत्र कोठेही नाही. हिरवीगर्द झाडी, विशाल सागरतीर, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आपल्या छोट्याशा वहिवाटीवर हक्क गाजवणारी मराठमोळी मनाची माणसं की त्या मानवी मनाच्या मानगुटीवर बसलेली भूतं! काय कोणास ठाऊक?
......'शंकर' पन्नाशीच्या आतमधलं व्यक्तिमत्त्व! अंगाने पिळदार शरीरयष्टी, मध्यम उंची, घारे मिचमिचे डोळे, घोगरा आवाज, कमरेला पंचा, अंगात सदरा आणि पायात करकरत्या कोकणी वहाणा! वडाच्या पारावर (गावकुसाच्या बाहेर असलेला वड!) तिथे आपल्या अवतीभवती जण-माणसांचा घोळका घेऊन नेहमी बसलेला असायचा. काय तर मटक्याचे नंबर लावत! 'मटका' हा एक असा जुगार आहे ज्यामध्ये व्यक्तीला काही नंबर अंदाजे लावायचे असतात. नशीबाने साथ दिली तर एक रुपयाचे नऊ रुपये, दहा रुपयाचे ९० आणि शंभर रुपयाची ९०० असा मुद्देमाल जिंकलेल्या स्वरूपात रोख रकमेत मिळतो. 'धोंडीबा', 'जगदीश', 'विठोबा', 'तुकोबा' अशी बरीच गावरान मंडळी आपल्या अकलेचे कांदे येथे आजमावायचे. 'शंकर' तासनतास वर्तमानपत्र चाळी. त्याची नजर नेहमी 'मुंबई', 'कल्याण', 'धनलक्ष्मी', 'कुबेर' या पानांवर रुतलेली असायची.
.......खरंतर ही सर्व मंडळी आपल्या नशिबाच्या जोरावर जगायची. प्रत्येकाच्या खांद्यावर काही ना काही जबाबदारी वाहिलेली पण 'मन उधान वाऱ्याचे' ते वाऱ्याचे सोबतीने कधी या तीरावर गिरकी घेई तर कधी त्या तीरावर! शंकरला 'शंकर अण्णा' म्हणायचे गावातील लोक! घरी दोन एकर शेती, माडाची वीस-पंचवीस झाडे, आंब्याची दहा आणि चिंचेची ५-६, घर म्हणून वडिलोपार्जित मिळालेली एक पडवी आणि खोली! 'पार्वती' ही गृहलक्ष्मी आणि दोन मुली असा त्यांचा संसार होता. काम तो फक्त चारच महिने करायचा पेरणी मध्ये! नशिबाने पावसाची साथ मिळाली तर पीक-पाणी नाहीतर कोरडा दुष्काळ!
......पण त्याला आस होती कधी ना कधी माझा मटक्याचा नंबर येणार आणि मी लखपती होणार! ही इच्छा त्याच्या वंशपरंपरागत तैलबुद्धीने त्याच्या टाळूवर कित्येक वर्षापासून थापलेली होती. शंकर प्रमाणेच खूप हौशी मंडळी या प्रकारचा विचार करणारी होती. मटक्याची एक खास गंमत अशी होती की महिन्यातून एखाद्या वेळीं कुणाला न कोणाला मटका लागेच! आता विचार केला तर यामध्ये एक ते नऊ आकड्यांमध्ये ओपन असतो आणि त्यानंतरचे दोन नंबर लावायचे असतात. समजा मंडळींनी २-३-५, ३-४-७, ८-१-० लावले तर जिंकायची संधी जास्त! तुम्ही जेवढे अधिक नंबर लावाल तितकी शक्यता अधिक आणि या आकड्यांमध्ये रोज नंबर लावणाऱ्यांची सुरुवातीची ओपन तरी लागायची! पण ह्यांना हे नाही कळायचे ते 'मटका' रोज खेळतात म्हणजे रोज ३०-४० रुपये जरी खेळले तर महिन्याचे १०००-१२०० रुपये सहज जात आणि एखाद्या वेळेस नंबर आला तरी शे-पाचशेच मिळायचे त्यात फक्त तोटाच होता.
...... "'शंकर आण्णा' काहीतरी जिंकायचा जालीम उपाय सांगा बुवा! बरेच दिस झालीत, काय मोठा हात गवसला नाय!" धोंडीबा म्हणाला.
मग शंकराने आपल्या टाळूवर हात फिरवीत, वर्तमानपत्र चाळीत म्हणाला,
"मागील नंबरांचा विचार केला तर माझ्या असं लक्षात येतं की ह्यावेळेस सपनात दुष्टांत देणार विस्वेस्वराया तुला!
"दुष्टांत काय सांगता आण्णा! कधी देणार?"
"आज रातच्याला! आज पूनवेची रात हाय!"
तू उद्या मला सांग काय सपन पडलं ते! सकाळी उठल्यावर पारावर ये कोणाशी काहीही न बोलता काय समजलीव!"
व्हय आण्णा! असं म्हणत धोंडीबा निघून गेला.
'शंकर अण्णा' अशाप्रकारे मटक्याच्या नंबर चे मार्गदर्शन करायचे भक्तगणांना!
..... दुसऱ्या दिवशी 'धोंडिबा' आला. अण्णाना नमस्कार केला. अण्णा दुष्टांत मिळाला.
सात फण्याच्या नागाचे दर्शन झाले काल सपनात! '
'सात फण्याचा नाग!' नशीब फळफळले रे धोंडीबा तुझं! खुद्द भगवंतांनं कौल दिला आहे तुला! सात फण्याचा नाग म्हणजे नंबर सात!
आणखी काय दिसलं तुला सपनात!
"त्रिशूल दिसला!"
"आणखी काय? आठव-आठव! नीट आठव!"
"अण्णा आकाशात इंद्रधनुष्य दिसलं!" "म्हणजे इंद्रधनुषाचे रंग सात! तर झालं पक्कं! तुझा नंबर आहे ७-३-७! जितका जमेल तितका जास्त पैका लाव या नंबर वर! तुला लक्ष्मी चा लाभ मिळेल!"
असं प्रत्येकाला काही ना काही उपाय सांगायचे शंकर अण्णा! वासरू गाईचे दुध पिताना दिसलं की थानाचे चार आणि वासराचा एक! ब्रह्मदेव दिसला की ओपन तीन! रावण आला स्वप्नात तर दहा तोंडाचे दहा आणि रावणाचा एक! कुठून ना कुठून कनेक्शन जुळवून आणायचा अण्णा! नंबर फेल गेला तर "सपन नीट नाही सांगितलं पाहुण्यांनू!मला काय दोष देता!" आता सपन सांगणाराही विचारात पडायचा! "काहीतरी चुकलं असेल माझ!" आता मला सांगा असा कोणत्या व्यक्ती आहे ज्याला सपन १०० टक्के आठवतं आणि नंबर आला तर शंकर अण्णा ची लय वाहवाई! तर अशा प्रकारचे गणित होते या मंडळींचे मटक्याचे!
.....शंकर ची बायको 'पार्वती' ही फार कष्टाळू बाई होती. आपल्या नवऱ्याच्या मटक्याच्या जुगारपायी ती पुरती हैराण झाली होती. तिने पुष्कळदा शंकरला मटक्यापासून वळविण्याचा प्रयत्न केला तरी पण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच! ती नेहमी म्हणायची,
"अहो दोन मुली आहेत आपल्याला! त्यांच्या शिक्षणाचा लग्नाचं बघावं लागेल की नाही आपणास! काहीतरी पैका नको का आपल्याजवळ!"
"पैका अरे बक्कळ पैका कमवील मी! तू कशाला चिंता करतेस? विश्वेश्वराचा वरदहस्त आहे माझ्यावर! तो कधी ना कधी कौल देणार मला!"
असे म्हणत 'शंकर' आपल्या बायकोचे म्हणणे उडवून टाकी.ही नागमोडी गाडी काही सरळ रस्त्यावर यायची नाही म्हणून पार्वतीने दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायला सुरुवात केली. आलेल्या मिळकतीतून 'भीशी' सुरू केली. महिला बचत गटात नाव नोंदवले आणि मुलींकरीता 'सुकन्या समृद्धी योजने' मध्ये नाव दाखल करून घेतले. 'पार्वती' सारखी परिस्थिती गावातील खूप परिवारांची होती. दामू अण्णाचा मुलगा हुशार होता त्याला शिक्षणासाठी पैका हवा होता. तुकोबाला लग्नाची मुलगी होती आणि बायकोला कॅन्सर! जगदीशचे तर शेत सावकाराकडे गहाण पडले होते.विठोबाच्या कोर्टात जमिनीच्या अनेक भानगडी!
अशी सर्वांची हलाखीची परिस्थिती! पण सर्वांना आशा होती की मटक्याचा नंबर आपल्याला कधी ना कधी लागणार आणि आपले नशीब फळफळणार! या मटक्याच्या जुगारापायी आयुष्यातील कित्येक वर्षं त्यांनी वाया घालवली होती. ज्या वेळेचा सदुपयोग करायचा तो 'वेळ' आणि 'पैसा' त्यांनी मटक्यात स्वाहा केला होता. तसं बघितलं तर ही दैनावस्था दर बारा कोसावर असणाऱ्या गावात होती. डोक्यात यदा-न-कदा नंबरांचेच खेळ! त्या वडाच्या पारावर वीडीचे आणि गांजाचे झुरके घेत ही मंडळी नेहमी स्वप्नरंजनात रंगलेली असत! आज नंबर येणार उद्या नंबर येणार! नंबर यायचा पण तो हजारो रुपये बरबाद करून यायचा! हे त्यांना कळतच नव्हते.
आता कित्येक वर्ष झाली तरी 'शंकर अण्णा' अजूनही त्या पारावर मंडळींचे स्वप्नांचे दृष्टांत ऐकतो आणि त्या दृष्टांताचा अर्थ लावतो. त्याच्या तत्त्वज्ञानावर मंडळी दिलखुलासपणे दाद देतात आणि पैसाही लावतात. जीवनातल्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली काय माहीत. आयुष्याला कधी गंभीरपणे घेतलेच नाही आणि हो म्हणूनच आयुष्याने त्यांना गंभीरता कधी दिलीच नाही.
.....माणसाच्या आयुष्यात दारिद्र्य असतं! या दारिद्र्यातून मुक्ती मिळवण्याचे अनेक मार्ग असतात. पोपडे वर आलेल्या भिंती सारवण्याचं आणि गळकी कौलं शिवण्याचं कसब आपल्या अंगात उपजतच असतं पण अंगी असलेल्या या कौशल्याचा पुरेपूर वापर आपण करीत नाही. केवळ नशिबाच्या जोरावर आपल्या आयुष्याचा खेळ रंगवतो. घामाच्या धारांना तेव्हाच मोत्यांच्या हारांची सर येते जेव्हा तो अंगातून गाळल्या जातो. निधड्या छातीची आणि बळकट बाहूची साथ असली तर असाध्य कामही साध्य होतं! या मटक्याच्या चक्रव्यूहात 'शंकर अण्णा' आणि मंडळी अडकली. त्यांना चक्रव्यूह भेदता आले नाही पण चक्रव्यूह भेदता येत नसेल तर त्या चक्रव्यूहात पडायचेच कशाला? पिण्यासाठी तर वीष पण पाण्याप्रमाणे पिऊ शकतो पण याचा अर्थ हा नाही की ते प्यायलाच हवं! उगाच विषाची परीक्षा कशाला.........!
"जिंदगी में एक फैसला किया था गलत राहे शौक में,
मंजिल तमाम उम्र उम्र मुझे ढूंढती रही!
ना पता चला ना खबर हुई की;
जिंदगी की शाम किस गली में ढल गई!!"
सांगता....!
छान लिहिली आहे कथा ..!
छान लिहिली आहे कथा ..!
गावोगावच्या जत्रेत पूर्वी मटक्याचा धंदा जोरात चालत असे.. तिथे लोकांची खूप गर्दी जमलेली असे.
चांगली लिहिली आहे कथा.
चांगली लिहिली आहे कथा.
छान आहे कथा..
छान आहे कथा..
आभारी आहे आपल्या
आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल रूपाली!
आणि हो तुम्ही प्रत्येक लिखाणाला दाद देता!
त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद!
मृणाली आपल्या प्रतिसादासाठी
मृणाली आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
'लावण्या' आभारी आहे आपल्या
'लावण्या' आभारी आहे आपल्या प्रतिसादासाठी!
छान लिहिले आजे, अजुन लिहित
छान लिहिले आजे, अजुन लिहित रहा
धन्यवाद बन्याजी!
धन्यवाद बन्याजी!
आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादासाठी आभारी आहे!
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
वाक्यरचना जबरदस्त केली आहे.
'जीवनातल्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली काय माहीत.
हे वाक्य मनात घर करून गेलं.
धन्यवाद वैभव! आपल्या अमूल्य
धन्यवाद वैभव! आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल!
छान लिहलंय... जवळ जवळ सत्य
छान लिहलंय... जवळ जवळ सत्य परिस्थिती आहे काही ठिकाणी.
धन्यवाद आपल्या अमूल्य
धन्यवाद आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल प्रविण!