सांजभयीच्या छाया - ३

Submitted by रानभुली on 1 May, 2021 - 08:19

(मागील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी ही विनंती).

जुने सिनेमे पाहताना गावं, शहरं दिसतात जुन्या काळातली. जुनी पिढी ताबडतोब ठिकाणं सांगते.
काही जुन्या हिंदी मराठी सिनेमात पुणे शहर दिसतं. ३६ घंटे , संगम आणि एक मराठी चित्रपट आहे.
जुनं रेल्वे स्थानक, कँप, कोरेगाव पार्क इत्यादी.

रस्ते छोटे पण दोन्ही बाजूला डेरेदार वृक्ष. वडाच्या पारंब्या, चिंचा, पिंपळ इत्यादी झाडांमधून रस्ता दिसतही नाही.
रस्त्यावर एखादी गाडी दिसते.

तसं दुर्गापूर आहे. पश्चिम बंगालमधलं सर्वात देखणं शहर.
मामा वगैरेंची ही खानदानी हवेली दुर्गापूरच्या सीमेवर आहे. हे शहरच त्यांच्या जमिनीत वसलेलं आहे. वरून पाहीलं तर भरपूर मोकळ्या जागा. मधून जाणारा एक प्रशस्त रस्ता. त्या रस्त्याला काही मॉल्स आलेत.
रात्री सगळा परीसर अंधार गुडूप असतो. रस्त्याचेही दिवे घालवले जातात.
कुणाचं काही अडत नाही त्यावाचून.

चंद्राची कोर टक्क उगवली होती. अमावस्येला असतं तसं पिठूर चांदणं होतं.
गच्चीवर मी आणि अनामिका मामी दोरीच्या बाजल्यावर पडून गप्पा मारत होतो. चांदण्यांचा प्रकाश किती छान वाटत होता.

अनामिका मामी आशीच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. झरना काकूच्या नावाने बोटं मोडत होती. तिच्यामुळेच आशीची अशी अवस्था झाली आहे असं तिचं म्हणणं होतं..

ती सांगत होती..

द्वारकाप्रसाद मुखर्जी म्हणजे बाबांना अमेरिकन संस्कृती कधीच पटली नाही. इथे आपली मुलं लहानाची मोठी होऊ द्यायची नाहीत हे त्यांच्या मनाने घेतले होते. इथे त्यांचा व्यवसाय होता. पण खूप विचारांती त्यांनी इथला व्यवसाय भारतात हलवण्याचा निर्णय घेतला. इथल्या व्यवसायासाठी व्यवस्थापक नेमला तरी पुरेसे होणार होते. सगळी व्यवस्था लावून ते भारतात परतले.

विश्वजीत आणि अनामिका यांचे शिक्षणही भारतात झाले. अनामिकेच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. याच गोष्टीसाठी ते अमेरिकेतून भारतात परतले होते. ज्या मुलाशी तिचे प्रेम प्रकरण होते त्याच्या घराण्याच्या उपकारांखाली मुखर्जी कुटुंबीय दबलेले होते. पण मुखोपाध्याय यांचे घराणे उच्चकुलीन होते. ठाकूर देखील उच्चवर्णिय असले तरीही मुखर्जींच्या तुलनेत ते कनिष्ठच होते. मुखर्जी या गोष्टी कटाक्षाने पाळत आले होते. अनामिकेने त्यांच्या मानसन्मानाला असा धक्का लावला होता कि त्यांना सांगताही येत नव्हतं आणि सहनही होत नव्हतं.

मात्र ते लग्न होऊन गेलं. त्यानंतर मुलाच्या बाबतीत वेडंवाकडं होऊ नये यासाठी बाबा दक्ष राहीले. तोलामोलाच्या कुळातली मुलगी पाहून त्याचा विवाह लावून दिला. झरना एका सनातन कुटुंबातून होती. लग्न झाल्यावर मुलींची कर्तव्ये काय याबाबतीत तिचे विचार अगदीच बाळबोध होते. मात्र आधुनिक विचार कानीकपाळी पडत राहतात, त्यांना थोपवणे देखील शक्य नसते. कुठे तरी त्यातल्या विवेकाची लागण होतच असते.

विश्वजीत साठी बाबांनी खूप कमावून ठेवले होते. त्याने बसून खाल्ले तरी सात पिढ्यांना पुरेल इतके मागच्या दोन तीन पिढ्यांनी कमावले होते. दुर्गापूरचे शहरात रूपांतर होत असताना ठाकूरांकडून इनाम मिळालेल्या जमिनीतून त्यांना भरपूर पैसा मिळाला होता. हा पैसा त्यांनी योग्य त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी वापरला. इलेक्ट्रॊनिक उद्योग आणि कापड हे त्या काळी जपानमधे स्वस्त मिळत असे. आज चीनच्या मालाची जी ओळख आहे तीच एके काळी जपानची होती. स्वस्त पण हमी नाही. मात्र स्वस्ताई मुळे जपानी मालाने जगभरात धुमाकूळ घातलेला होता. या व्यवसायाने मुखर्जी कुटूंब भरभराटीला आले होते. अमेरिकेत सुद्धा त्यांनी बस्तान बसवले होते. हळू हळू अमेरिकन वस्तू भारतात निर्यात करण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरत गेला.

विश्वजीत यांनी ठाकूरांचे ऐकून दुर्गापूरच्या मॉल्समधे गुंतवणूक केली होती. त्याचे चांगले उत्पन्न आता मिळू लागले होते. दुर्गापूरच्या आसपासच्या लोकांना या दोन तीन मॉल्सचे प्रचंड आकर्षण होते.

व्यवसाय असा भरभराटीला येत असताना विश्वजीत यांचे कलासक्त मन आता धंदा, पैसा पाणी याला विटत चालले होते. लहान असताना अर्धवट सुटलेला रियाज करावा असे वाटू लागले होते. हळू हळू ते शास्त्रीय संगीताच्या खासगी बैठकांना हजेरी लावू लागले होते. त्यातूनच नाटक मंडळींशी परिचय होऊ लागला. मुखर्जी असल्य़ाने त्यांना तालमीला बोलावणे येऊ लागले. नाटक मंडळी त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा ठेवत. त्यासाठी धूर्त लोक सुंदर नायिकांशी त्यांचा परिचय करून देत असत.

त्यांना दारूचे व्यसन लागले.
रात्री अपरात्री ते पिऊन घरी येऊ लागले.
त्यांची मुलगी आशी दीड दोन महीन्यांची होती. असेच एकदा रात्री दारू पिऊन आले तेव्हां झरना आंटीशी त्यांचे भांडण झाले. भांडण म्हणजे आंटी बोलत होती. विश्वजीत अंकल ऐकत होते.

त्या रात्री कडाक्याचे भांडण झाले.
झरना आंटी विश्वजीत अंकलना टाकून बोलल्या. आणि मग त्या रोजच बोलू लागल्या.
आशी हळू हळू मोठी होत होती.

झरना आंटी च्या रोजच्या बोलण्यामुळे विश्वजीत अंकलनी बाहेरून दारू पिऊन येणे बंद केले होते. पण व्यसन सुटले नव्हते. त्यामुळे ते घरातच प्यायला बसायचे. ते प्यायला बसले की झरना आंटीच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू रहात असे. कदाचित चढलेली नशा उतरवयाचा त्यांचा विचार असावा.

आशी भिंतीचा आधार घेऊन चालू लागली होती.
ती झरना आंटीकडे दिवसभर हट्ट करायची. तिच्या हातात खेळणे, दूधाची बाटली देऊन तिला शांत करून आंटी तिचा पिच्छा सोडवायला बघायच्या. रात्री तिने वेळेत खाऊ खाऊन झोपावे हा त्यांचा दंडक असे.

आशी खाण्यासाठी टाळाटाळ करत असे. मग आंटी तिला कधी कधी चापटपोळी भरवायच्या.
ती रडायला लागली कि तिकडून अंकल कळवळून विचारत.
" का मारलंस गं तिला ?"
त्यांचा आवाज ऐकून मग छोटी आशी धावत तिच्या वडलांकडे जायची.
अनामिका मामीचं ऐकून ती आपल्या वडलांना दादा म्हणायची.
दादा हे इथे अगदी नित्याचे संबोधन आहे. मागच्या पिढीत जर कुणी बाबा असेल तर पुढच्या पिढीतला पुरूष बाप झाला कि त्याला दादा म्हटले जाते. मोठ्या भावालाही दादा आणि आदरार्थी संबोधन देखील दादाच.

आशी दादाला बिलगली की झरना आंटीचा संताप संताप होत असे.
त्यांच्या कुशीतून तिला ओढून नेताना त्या विश्वजीत अंकलना बोलत असत.
(थोडी मोठी झाल्यावर आशी जेव्हां जेव्हां तिच्या अनामिका आत्याला भेटायची तेव्हां हे सगळं सांगायची).

आशीची झोपायची वेळ ठरवून दिलेली होती. त्यापुढे तिने जागे रहायचं नाही हा दंडक होता.
आशी झोपली हे पाहून अंकल प्यायला सुरूवात करत.

बेडरूम आतल्या बाजूला होते.
मधे मोठा पॅसेज होता. एक नोकरांची झोपायची खोली होती. तिचे आता स्टोअर रूम झाले होते.
त्याच्या समोरच जी खोली होती ती मोठी होती. ती कुणी आले गेले तर म्हणून राखीव ठेवली होती. पॅसेज एका प्रशस्त दिवाणखान्यात येऊन संपत होता. त्याला भला मोठे सागवानी दरवाजा होता. मुख्य दरवाजाच्या बरोबर समोर मागच्या बाजूला उघडणारा छोटा दरवाजा होता. तो अंगणात उघडत होता. तिथे विहीर, स्नानगृहे, शौचालये आणि कपडे धुण्याचा हौद होता. त्याच्या पलिकडे मोठी परसबाग होती. त्यात फळझाडं आणि भाज्या होत असत.

आताशा माळीकाम करायला माणसं मिळत नसल्याने विश्वजीत अंकल कधी तरी आणि इतर वेळी झरना आंटी भाज्यांकडे लक्ष देत असत. विहीरीतले पाणी वर्षभर पुरत असे. पलिकडे एक तळे होते ज्यात मासे असायचे. घरचेच मासे जेवणात असायचे. भारतात बंगाल हा एकमेव असा प्रांत आहे जिथे मासे हा मांसाहार मानला जात नसेल. ब्राह्मणांपासून ते अगदी हातावर पोट असलेला कष्टकरी असेल, दिवसाच्या एका तरी जेवणात मासा नाही असे होत नाही. एखादा तुकडा का असेना जेवणात असल्याशिवाय त्यांना जेवण झाल्यासारखे वाटत नाही.

दिवाणखान्याच्या पलिकडे सरळ रेषेत पुन्हा पॅसेज सुरू होत होता.
इथे द्वारकाप्रसाद मुखर्जींची खोली आहे तशीच ठेवली होती. तीत त्यांची भली मोठी तैलरंगातली तसवीर होती.
अनामिकाची खोली तशीच जपलेली होती.

आणि पलिकडचे म्हणजे आशीच्या बरोबर समोर येणारे बेडरूम विश्वजीत अंकल वापरत होते. आशी आणि झरना आंटी एकत्र झोपत होत्या.
आशी झोपल्याची खात्री झाली कि झरना आंटी दबक्या पायाने विश्वजीत अंकलकडे जायच्या.
त्यांची पिण्याची तयारी सुरू झालेली असायची. एक दोन घोट घेतले गेलेले असायचे.
मग नेहमीचा तंटा सुरू होई.

अंकल इग्नोर करायचा प्रयत्न करत. पण त्यामुळेही आंटी भडकायच्या.
मग एखादा शब्द उच्चारला की अजून भडकायच्या.
तासन तास हे चालू असे.

कधी तरी अकराचे टोल पडत.
हळूच दरवाजा लोटला जाई.
छोटी आशी दरवाजात उभी असे.
"मा झोप येत नाही. चल ना माझ्य़ासोबत "
यावर आंटी तिला रागवत असत.
" तुला मनाई केली होती ना ? का उठलीस मग मधेच ?"
" मा, एकटीला झोप येत नाही "
" कशी येत नाही झोप ?"
असं विचारत आंटी तिला दंडाला धरून ओढत आणत असे.

मग तिला एक जोकरचीबाहुली दाखवून " बघ झोपली नाहीस तर हा येईल. तो तुला धरेल "
अशी भीती घालून त्या तिला झोपायला भाग पाडत.

आशी छोटीशी बाळ असताना ती झोपण्यासाठी तिच्या पाळण्याला गोल फिरणा-या छोट्या बाहुल्या बांधलेल्या होत्या.
त्यांच्याकडे बघत आशी नादावत असे.
त्या फेर धरून नाचणा-या बाहुल्या कुठे तरी तिच्या मन:पटलावर कोरल्या गेल्या असाव्यात.
थोडी मोठी झाल्यावर हा बाहुला..

आंटी तिला झोपवून गेली की थोड्या वेळाने ती घाबरून उठत असे.

तिने खोलीत फिरणा-या बाहुल्या पाहिल्या होत्या. त्या हसायच्या. वाकुल्या दाखवायच्या. नाचायच्या. मग एकमेकींचे हात हातात घेऊन छताकडे जाऊन गोल फेर धरायच्या.
आशी घामाघूम होऊन किंकाळी फोडायची.

तिच्या चिमुकल्या आवाजातली ती किंकाळी त्या टोकाच्या बेडरूममधे पोहोचण्याच्या आधीच विरून जायची.

अनामिका मामी चा आवाज हळवा झाला होता.
भाचीच्या आठवणीने तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.
मलाही ऐकताना भीती वाटू लागली होती.
काळजीही वाटत होती आणि उत्सुकताही.

मी मामीच्या जवळ बसले आणि तिच्या डोक्यावर थोपटत राहीले.
तिनेही मग माझ्या कुशीत डोकं खुपसून हुंदके द्यायला सुरूवात केली. बहुतेक तिला कुठेच मन मोकळे करता आलेले नव्हते.

********************************************************************

जाण्याची तयारी करत होतो.
थोडी शॉपिंग मस्ट होती.
दुर्गापूरचं जुनं आणि मोठं मार्केट म्हणजे बिनाचिटी मार्केट. आपल्या पुण्यातल्या मंडई सारखं. फक्त इथे मोठ मोठे मॉल्स आले आहेत. इथे मंदीरं देखील आहेत. इथलं भिरंगी कालीमाता मंदीर प्रसिद्ध आहे. इथली देवी नवसाला पावते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. बाहेरून सुद्धा भाविक इथे येतच असतात.

दुर्गा मॉल हा या देवीच्या नावावरूनच सुरू झालेला आहे. आजूबाजूला प्रस्थापित ब्रॅण्डस असले तरी दुर्गा मॉलला लोक पसंती देतात. हा ठाकूर आणि मुखर्जींच्या मालकीचा आहे. खरेदी बहाणा असतो.
पण ब-याच नव्या वस्तू समजतात. नव्या फॅशन्स समजतात.
आणि महत्वाचं म्हणजे मातेला नवस बोलता येणार होता.
ते मुख्य काम होतं.

आत्याचा जीव तिच्या भाचीसाठी तुटत होता.
विश्वजीत अंकल त्यांच्या वडलांइतके धार्मिक नव्हते. थोडे फार होते. पण इलाज, वैद्यकीय उपचार यासाठी देव देव, मांत्रिक तांत्रिक, बंगाली जादू याच्या ते पूर्ण विरोधात असायचे.
अनामिका मामीच्या मनात हे सगळं करायचं होतं. पण जर भाऊच विरोधात असेल तर ती तरी काय करणार ?

रात्र खूप झली होती.
माझेही डोळे पेंगत होते. मामीला ही विश्रांतीची गरज होती.
उद्या बोलता येईल असा विचार करून मी मामीला झोपवून गच्चीवरच तिच्या बाजूला झोपी गेले.
थंड हवेने केव्हां झोप आली समजलंच नाही.
क्रमशः

पुढील भागासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78761

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय
भाग १ आणि २ पुन्हा वाचले . आता छान ग्रिप आली आहे.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
प्रभूदेसाई सर आणि सर्वच वाचक - सुरूवात थोडी संथ असणे गरजेचे आहे. आपल्या संयमासाठी आभार.

गार्गी - गजबज असलेल्या शहरांपासून दूर अशा आदिवासी पाड्यावर, शहरापासून दूर असलेल्या फार्महाऊस मधे, हिमालयात रात्रीच्या वेळी आकाशात नेहमीपेक्षा जास्त चांदणं दिसतं. तसेच पांढुरसे पुंजके दिसतात. त्यांचा प्रकाश दिसतो. हा प्रकाश चंद्राचा प्रकाश मंद असेल तर स्पष्ट दिसतो. अमावास्येला जास्त स्वच्छ दिसतो. आजूबाजूला दिवे नसतील तरच हा प्रकाश दिसतो. तो क्षितिजाकडून क्षितिजाकडे एका रेषेत आणि थोडासा पसरलेला फक्त अमावस्येला दिसतो. ही आपली आकाशगंगा आहे. पिठूर चांदणं ख-या अर्थाने हेच आहे.
पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात प्रकाशमान झालेले गोल आपल्याला नेहमीच्या ठिकाणाहून दिसतात. आपलं ते पिठूर चांदणं !
माझे प्रतिपादन कदाचित चुकीचे असेल तर करेक्ट करावे.

वाचकांचे मनापासून आभार. पुढचा भाग टाकलेला आहे.
या वेळची कथा फारशी कुणाला रूचलेली दिसत नाही. तो दोष माझाच आहे.
कदाचित माझा गैरसमज होत असेल.
मात्र जे वाचक पहिल्यापासून फॉलो करत आहेत त्यांच्यासाठी चिकाटीने पूर्ण करणार आहे.
संयमाबद्दल मनापासून आभार.

या वेळची कथा फारशी कुणाला रूचलेली दिसत नाही. >>>> राभु आवडली नाही असं नाही , पण फार रैंगाळतेय. गेल्या भागात काही घडलं नाही असं वाटतयं. विस्कळीत वाटतेयं .
शिमल्याला पोचल्यावर वेग पकडेल बहुतेक.

पिठूर चांदणं ख-या अर्थाने हेच आहे. >>> माझ्या माहितीप्रमाणे चांदणं हा शब्द चंद्राच्या चांदण्यासाठीच वापरतात.
कथा छान चालू आहे. वाचतेय.

वाचायला घेतली आहे (मी कथा पूर्ण झाली की मग वाचायला सुरू करते म्हणजे लेखकांनी अर्धवट सोडली आणि आपण निराश झालो ते टाळता येतं :)). पण गोंधळ होत आहे वाचताना. इतिहास सांगताना मुखर्जी आणि ठाकूर सोबत मुखोपाध्याय कोण आले ते कळलं नाही. पुढे मागे पुढे मागे होतेय निवेदन त्यामुळे विस्कळीत वाटतंय जरा.

मुखोपाध्याय म्हणजेच मुखर्जी. मुखर्जी हे ब्रिटीशांनी केलेलं नामकरण आहे.
निवेदनाची हा फॉरमॅट असतो. यात सलग निवेदन नसतं. सवय नसल्यास विस्कळीत वाटेल ते.