वृंदावनी सारंग
आता वीकेंडचे दोन दिवस मस्त मैफिलींचे होते. आपले गायक वादक युरोपात आले की असे जवळ जवळ असणाऱ्या गावांत मैफिली 'उरकतात' दोन दिवसांत. आज एका गावात 'मॉर्निंग मंत्रा' किंवा तत्सम नावाची सकाळच्या रागांची बैठक आणि उद्या दुपारी एका गावात 'Sun-kissed ragas' वगैरे दुपारच्या रागांची बैठक. कधी कधी Sun-kissed ऐवजी सूर्यचुलीत बसून करपून निघाल्याचा फील येतो पण इथे बैठकींना जाण्याचे प्रसंगच इतके कमी येतात की ती रिस्क असूनही मी त्या बैठकींना जातोच. तर शनिवारी दुपारी कॉन्स्टान्झला आणि रविवारी सकाळी झुरीकला अशा मैफिली होत्या, कुठच्या तरी बंगाली गायकाच्या! आता बंगाली म्हणजे सरगमच्या माऱ्याने कान शेकटुन निघण्याची मानसिक तयारी मी आधीच ठेवली होती तशी. झुरीक-कॉन्स्टान्झ हा पावणेदोन तासांचा प्रवास आहे, झुरीक हाबे (HB) या झुरीकच्या मेन स्टेशनवरून आधी St. Gallen (सँग्गालेन असा काहीसा विचित्र उच्चार होतो त्याचा इथे स्विस जर्मनमध्ये फास्ट बोलताना, मला फास्ट मिडीयम स्लो मंदगतीने वगैरे कशीच जर्मन येत नसल्याने त्यातल्या त्यात कानाला थडकणारा उच्चार मी ग्राह्य धरतो), आणि मग तिथून कॉन्स्टान्झ! शनिवारी सकाळची वीकएंडला फिरायला झुरीक सोडून आल्प्समध्ये जाणारी गर्दी उठल्यानंतर दुपारी हाबे निवांत पडलं होतं. सँग्गालेनला जाणारी आगगाडी शेवटच्या प्लॅटफॉर्मवर मोकळी पडली होती आणि मोठीशी खिडकीकडेची जागा पकडून मीही तिच्यात पसरलो. गाडी निघाली!
ऑगस्टचा शेवटचा वीकएंड, कालच पडलेल्या पावसाने सगळं धुवून निघालेलं, हवेत ओलावा आणि सुटसुटीत मोकळं ऊन दोन्हीही एकाच वेळी! ऐकायचं काय हा प्रश्न होताच, चांगलं तासाभराचं काहीतरी हवं होतं. दुपारी सारंग राग ऐकतात या भरभक्कम माहितीच्या आधारावर मी युट्युबवर राग सारंग शोधलं आणि पहिलीच लिंक आली ती भीमण्णांच्या राग वृंदावनी सारंगची. ते सुरू केलं आणि उन्हात भिजणं म्हणजे काय हे मला समजलं. उन्हामुळे भिजणं म्हणजे घाम्याघुम होऊन त्रस्त होणं पण उन्हात भिजणं म्हणजे ओलं ऊन अंगावर झेलणं! "तुम रब तुम साहेब" या बंदीशीत "तु" वरचा शुद्ध निषाद ते सगळं बरोबर घेऊनच आला. पंडितजींचा तो प्रचंड आवाज, त्यात घुमणारा तो खर्जातला शुद्ध निषाद, पहिल्याच स्वराला समाधी लागावी ती अशी! वरकरणी साधा वाटणारा हा राग जिकडे तिकडे सहज ऐकायला मिळतो, पण तो असा तब्येतीत गाणं म्हणजे वेगळीच गोष्ट. त्यामागे जाणीवपूर्वक केलेली स्वरांची मांडणी असते आणि म्हणून त्यातून सिद्ध होणारं वातावरण असतं. सारंगाच्या या वातावरणाला घुमणारे कोमल आणि शुद्ध निषाद हवेतच, आसमंत व्यापून कंपित होणारे ते दोन्ही निषाद असल्याशिवाय मोकळं ऊन आणि हवेतला ओलावा हे दोन्ही परस्परविरोधी भाव उभे करणे शक्य नाही. एखादा राग सिध्द होत असताना आजूबाजूचं वातावरण निसर्गतःच त्याला पूरक असेल तर त्या सिद्धतेची परमावधी होते, आणि आज तसंच काहीसं झालेलं आहे. आजूबाजूचा हिरव्या रंगाचा विविध छटा ल्यालेला अंगावर ओली उन्हे खेळवणारा निसर्ग आज तसा होता. क्या बात! कशाकशाचा आनंद साजरा करावा? दोन्ही निषादांचा, रिषभावरच्या ठेहरवाचा, ओल्या उन्हाचा की भीमण्णांच्या व्यापक आवाजाचा? सगळ्याचाच आनंद आपोआप साजरा होतो. त्यानंतर मी त्या मैफिलीला गेलोच नाही, गेल्यासारखं कॉन्स्टान्झ फिरलो आणि परत आलो, कारण त्या सारंगानंतर दुसरे कुठलेही सूर मला नकोच होते.
अजून एक असाच सारंग ऐकला निळाईच्या देशात- ऑस्ट्रेलियात! मे महिना होता, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडीपावसाची सुरुवात होते. पावसाची भुरभुर आधीच चालू झाली होती आणि करड्या तपकिरी रंगांत आता हिरवाई जरा लाजुनच डोकं वर काढत होती. मी आणि माझे काही मित्र मिळून आम्ही नैऋत्य ऑस्ट्रेलियात 'मार्गारेट रिव्हर' या परिसरात फिरायला गेलो होतो. एक सुंदर टुमदार बंगला आम्ही भाड्याने घेतला होता ज्याच्या समोरची झाडांची एक रांग ओलांडली की पलीकडे निळाशार समुद्रच. दुपारी जेवून सगळे पडले होते आणि मी जरासा फेरफटका मारावा म्हणून समुद्रावर गेलो. गेल्या काही दिवसातल्या पावसाने समुद्रासकट सगळं धुवून निघालं होतं. कानात वृंदावनी सारंग होता, पंडित वेंकटेश कुमारांचा, तृप्तीचा आनंद देणारा! न्हालेला निसर्ग त्या त्या रंगाची प्रखर छटा मिरवत होता, झाडं हिरव्याहून हिरवी, समुद्र निळ्याहूनही निळा आणि काठची वाळू पांढऱ्याहूनही किंचित पांढरीच! का? कारण पंडितजींचा सारंगाचा रिषभ हा रिषभाहूनही जास्त रिषभ झालेला, सिद्ध होऊन दत्त म्हणून पुढ्यात ठाकणारा. बाकीच्या सगळ्या स्वरांना आधार देणारा महाप्रचंड अस्तित्व असणारा पण म्हणून रुक्ष नाही तर मऊ मायाळूसा, ओल्या उन्हासारखा! त्या सारंगाचा प्रत्येक स्वर जणू रिषभात विलीन व्हायलाच जन्माला आलेला. कधी मध्यमाची लाट, तर कधी पंचमाची, कधी षड्जाची, तर कधी दोन्ही निषादांची जुळी लाट रिषभाच्या किनाऱ्यावर येऊन वाळूत मिसळून जात होती. सारंगाने ती जागा, त्या वेळी बुक करून ठेवली होती आपल्या वातावरण निर्मितीच्या रियाझासाठी. काळाच्या अक्षावर सारंगाचा तो आविष्कार कायमस्वरूपी गोंदला गेला. 'पीर ना जाने मितवा बलमा' या द्रुतात तर स्वतः सारंगाची समाधी लागली. एखादाच कलाकार एखाद्याच वेळी असा काही गातो जेव्हा राग स्वतःच स्वतःत तल्लीन होतो. पंडितजींची तपस्या थोर!
तिसरा सारंग ऐकला मार्कोच्या घरात जेव्हा मार्को आणि कॉर्नलिया काही कारणाने युरोपला गेले होती आणि मी हाऊस सिटिंग करत होतो. पुन्हा शनिवारच, सप्टेंबरचा शेवटचा आठवडा. पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला होता आणि उन्हाचे दिवस वाढायला लागले होते, तशातली ती एक दुपार. डोळे बंद करून ऊन घेत पडलो होतो. कानात सुरू होतं 'रंगपूर विहारा' हे मुथ्थुस्वामी दिक्षितर यांनी रंगनाथ महाविष्णूवर रचलेलं याच रागातलं एक भजन. आणि याला आवाज कुणाचा, तर ज्यांच्या आवाजाने दगड सुद्धा हरिभक्तीत लीन व्हावा अशा एम एस सुब्बुलक्ष्मी यांचा! किशोरीताईंनी त्यांना आठवा सूर का म्हंटल ते लक्षात यावं जणू. यात सारंग कुठचा आणि तो रंगनाथ महाविष्णू कुठचा हे लक्षात येऊ नये इतकी एकरूपता. ऑस्ट्रेलियात असूनही डोळ्यासमोर दक्षिणेतली समुद्रकाठच्या गावातली मंदिरं आली. कौलारू लांब सभामंडप असलेलं झाडीत लपलेल्या गावातलं नारायणाचं एखादं मंदिर, सकाळची पूजा नि दुपारचा प्रसाद आवरून निवांत झालेला आवार, आजूबाजूच्या केळीच्या झाडांवरून उड्या मारणारा एखादा बुलबुल, प्रसादाच्या भाताची शितं टिपणाऱ्या चिमण्या, या सगळ्यावरून नजर फिरवणारे आळसावलेले उंच माड, आणि वीज असूनही मोठ्या खड्या समयांच्या मायाळू प्रकाशात उजळून निघालेला फुलांनी सजलेला किंचित हसरा नारायण! अशा वेळी गावातली एखादी कृष्णवेडी राधा मंडपात येऊन गाऊ लागली तर ती हेच गाईल, तिथे दुसरं काही सुचण्याची, गाण्याची शक्यता नाहीच मुळी! ती भक्ती माणूस म्हणून कुणी केलेली की एम् एस अम्मांच्या माध्यमातून स्वतः राग सारंगाने केलेली? कोण जाणे! यात नुसतं कलाकार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून सुद्धा अम्मांची सच्चाई आणि त्यांचा मोठेपणा दिसून येतो. वातावरण निर्मितीसाठी रागाला पाचारण करणे हे अवघड आहेच मुळात, पण आपल्या माध्यमातून राग इतका जिवंत करणे की तो रागच भक्त होऊन आळवू लागेल हे होण्यासाठी स्वतःला पूर्णपणे त्या रागात विलीन करण्याची अम्मांची ताकद किती मोठी असली पाहिले! चार हातात मध्यम, पंचम, षड्ज आणि रिषभ घेऊन उभा असलेला तो चक्रपाणि आणि त्याच्या पायी वाहिलेली निषादांची दोन कमळे असं दर्शन अम्मा घडवून आणतात. कधी काळी, कुठल्या जन्मी मन लावून केलेली दोन क्षणांची भक्ती कधीतरी फलित होऊन अशा रुपात भगवंत दिसतो आणि तसल्याच कुठल्याशा क्षणांची पुण्याई म्हणून अम्मांनी भगवंत दाखवला. असं दर्शन संपूच नये, त्या सभामंडपातल्या हवेचा एखादा अणू होऊन तरंगत राहावं अनंतापर्यंत!
पंडित भीमसेन जोशी:
https://m.youtube.com/watch?v=es_31tp1HII
पंडित वेंकटेश कुमार:
https://m.youtube.com/watch?v=e7tbbUl0M-0
एम एस सुब्बुलक्ष्मी:
https://m.youtube.com/watch?v=n6AWO2CklyI
- कुलदीप
छान
छान
वाह कुलु ! बरेच दिवसांनी
वाह कुलु !
बरेच दिवसांनी
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर.
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर.
मस्त. मध्यंतर बरंच लांबलं
मस्त. मध्यंतर बरंच लांबलं होतं आपलं. पण ह्या लेखाने आमचे मधले सगळे रिकामे दिवस भरून निघाले.
फारच छान!!
फारच छान!!
... झाडं हिरव्याहून हिरवी,
... झाडं हिरव्याहून हिरवी, समुद्र निळ्याहूनही निळा आणि काठची वाळू पांढऱ्याहूनही पांढरी ...रिषभ हा रिषभाहूनही जास्त रिषभ झालेला...
... चार हातात मध्यम, पंचम, षड्ज आणि रिषभ घेऊन उभा असलेला तो चक्रपाणि आणि त्याच्या पायी वाहिलेली निषादांची दोन कमळे असं दर्शन ....
श्रीमंत शब्दप्रभू आहात Kulu . अनुभव आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवण्यात कुठंही कमी न होणारी उत्कटता.
जियो !
असं दर्शन संपूच नये, त्या
असं दर्शन संपूच नये, त्या सभामंडपातल्या हवेचा एखादा अणू होऊन तरंगत राहावं अनंतापर्यंत!>>>> वाह !
तुमचे लेख शांतीची अनुभूति देतात.
खुपच सुंदर लेखन. अशा तुमच्या
खुपच सुंदर लेखन. अशा तुमच्या लेखनामुळे काही तरी शास्त्रीय संगित कानावर पडते नाहीतर आम्ही आपले साधी गाणी ऐकण्यात मग्न.
शेवटचा परिच्छेद तर अतिशय उत्तम झालेला आहे. अगदी त्या मंदीरात उभे राहून ऐकतो आहे असे वाटले. (कानात तिसरा व्हिडीओ चालू आहे हे वेगळे सांगायला नकोच )
खूप सुंदर लिहिलं आहे!
खूप सुंदर लिहिलं आहे!
फार सुंदर लिहिलं आहे!
फार सुंदर लिहिलं आहे!
मला शास्त्रीय संगीतातलं कळत नाही, पण तुमचा लेख वाचून बोरकरांची एक कविता आठवली, 'पाऊस श्रावणी हासला बाई.. ' सुनीताबाईंनी फार सुंदर म्हटली आहे. त्यात एक ओळ आहे, 'दुपार असून सर्वांगी भोगिली माघाची चांदणी रात' ..या ओळीची आठवण झाली तुमचा लेख वाचून.
क्या बात है! सुंदर शब्दानुभव
क्या बात है! सुंदर शब्दानुभव आहे हे ललित वाचणे. आता दिलेल्या लिंकवरून सारंग ऐकताना पुन्हा वाचेन.
बऱ्याच दिवसांनी तुझा लेख पाहून छान वाटले!
तो साऊथ इंडियन राग आपल्या
तो साऊथ इंडियन राग आपल्या वृ सारंग सारखा वाटला नाही
तो आपल्या मेघ मल्हार सारखा जास्त वाटतो .
वेंकटेशकुमारचा मात्र मस्तच आहे,
पुणे गोवा बेंगलोर ह्या त्रिकोणात मोठेमोठेमोठे सगळे गायक जन्मले म्हणे, मा. दीनानाथ मंगेशकर , पलुस्कर , भीमसेन , व्यंकटेश इ इ इ इ त्यांचा गळा साऊथ नॉर्थ असे दोन्ही ऐकून तयार झाला म्हणे , नॉर्थ साऊथ बाऊंडरीवर जन्मले म्हणून, असे आमचे गुरूजी बोलले होते
काय सुरेल लिहितोस रे
काय सुरेल लिहितोस रे
जियो
सगळं सगळं डोळ्यासमोर येत गेलं। ती ओली उन्हं, ओल्या समुद्रा वरची शुभ्र रेती अन कौलारू लांब सभामंडपात भान हरखून गाणारी राधा...
संगीतातलं काहीही कळत नसूनही गुंगून गेले।
थांकु ___/\___
किती सुंदर लिहिलंयस अरे, कमाल
किती सुंदर लिहिलंयस अरे, कमाल!
अम्मांचा ऐकला नव्हता तो ऐकतो.
तुला एक गच्चम् मिठी हे लिहिल्याबद्दल!!
एकच गोष्ट दोन बाजूंनी योग्य
माफ करा. गल्ली चुकली.
BLACKCAT, हर्पेन, रानभुली,
BLACKCAT, हर्पेन, चैतन्य, अवल, जिज्ञासा, वावे, हरचंद पालव, धनि, अस्मिता, अनिंद्य, सनव, हीरा, अनया तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार खूप भारी वाटलं तुमचे प्रतिसाद वाचून. विशेषतः त्यानिमित्ताने तुम्ही सुद्धा वृंदावनी सारंग ऐकताय हे वाचून तर लेख लिहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
@BLACKCAT तसा मेघ मल्हारचा भास थोडा होतोच कारण भजन असल्याने थोडे improvisation होतात, आणि दोन्ही राग सेम स्केलचे आहेत. पण अम्मा असल्याने भजन आणि राग दोन्हीना सारखाच न्याय दिला आहे. रिषभ खडा आहे सारंगाचा, मेघाचा नाही.
https://www.parrikar.org/music/sarang/jha_sarangspeak.mp3 इथे स्वरलगाव सुंदर समजावून सांगितला आहे.
रागांची मला अगदीच जुजबी
रागांची मला अगदीच जुजबी माहिती आहे आणि अॅक्चुअल शास्त्रीय गायन ऐकण्यापेक्षा मला वादन, जसं चौरसियांचं बासरीवादन, ऐकायला जास्त आवडतं. पण तू दिलेल्या या लिंक्स ऐकायचा मोह आवरला नाही आणि ऐकताना पूर्ण गुंगून गेले. फारच सुंदर. खरोखरच तू लिहीलेला नजारा डोळ्यासमोर उभा राहतो.
फारच सुरेख आणि सुरेल लेख आहे.
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
मला वृंदावनी हा शब्दच एकदम
मला वृंदावनी हा शब्दच एकदम म्युझिकल वाटतो. तो ऐकून उत्तरेतील वृंदावन हे आठवायच्या ऐवजी वाद्यवृंद वगैरे आठवतो.
सुरेख लिहिलंय, नेहमीप्रमाणेच.
सुरेख लिहिलंय, नेहमीप्रमाणेच... असं आस्वादात्मक लिहिणं फार अवघड असतं.
गाणं नुसतं ऐकतो आम्ही कानांनी
गाणं नुसतं ऐकतो आम्ही कानांनी, तू पंचेंद्रियांचे कान करतोस..
कसलं सुरेख लिहितोस कुलु. मला
कसलं सुरेख लिहितोस कुलु. मला तसं संगीतातले काहीच समजत नाही पण तुझी शैली छान आहे.
लिंक बघते रे सवडीने.
खूप दिवसांनी तुझा लेख बघून फार आनंद झाला.
rmd, मेधावि, ललिता-प्रीति,
rmd, मेधावि, ललिता-प्रीति, अंजू, भारतीताई धन्यवाद
हरचंद पालव, वृंदावनी हा शब्द म्युजिकल आहे खरा
कसलं सुरेख लिहितोस कुलु. मला
कसलं सुरेख लिहितोस कुलु. मला तसं संगीतातले काहीच समजत नाही पण तुझी शैली छान आहे.
लिंक बघते रे सवडीने.
खूप दिवसांनी तुझा लेख बघून फार आनंद झाला.>>>>> +1
अरे किती सुंदर लिहिलं आहेस...
अरे किती सुंदर लिहिलं आहेस... सभामंडपातल्या हवेचा अणू होऊन तरंगत रहावं.... पाणी आलं डोळ्यांत... असं वाटतंय खरं... अशीच अजून अनंत दर्शने तुला घडोत अन तू आम्हाला घडवत रहा....
मी पंडितजींचा सारंग असा संध्याकाळी ऐकला होता... पण वातावरणनिर्मितीची ताकद अनुभवली... आजोळची आजीच्या कुशीतली दुपार आठवली आणि ती अवघा आसमंत भरून उरली...
गाण्यातील ओ की ठो कळत नाही
गाण्यातील ओ की ठो कळत नाही परंतु किती सुंदर लिहीले आहे.
>>>>>>>>>चार हातात मध्यम, पंचम, षड्ज आणि रिषभ घेऊन उभा असलेला तो चक्रपाणि आणि त्याच्या पायी वाहिलेली निषादांची दोन कमळे असं दर्शन अम्मा घडवून आणतात. कधी काळी, कुठल्या जन्मी मन लावून केलेली दोन क्षणांची भक्ती कधीतरी फलित होऊन अशा रुपात भगवंत दिसतो आणि तसल्याच कुठल्याशा क्षणांची पुण्याई म्हणून अम्मांनी भगवंत दाखवला. असं दर्शन संपूच नये, त्या सभामंडपातल्या हवेचा एखादा अणू होऊन तरंगत राहावं अनंतापर्यंत!
आहाहा किती सुंदर वर्णन केले आहेत.