काल माझ्या मैत्रिणीने ठाण्याला नौपड्यात कल्हई वाला कुठे बसतो ह्याची चौकशी केली आणि माझे मन नकळतच त्या दिवसात पोचले.
आमच्या लहानपणी घरोघरी पितळ्याची भांडी, ताटं वाट्या वैगेरे वापरात असत. रोज रोज पत्रावळी लावायला नकोत, चुकून तिची चोय घशात अडकू नये म्हणून काळजी घ्यायला नको. द्रव पदार्थ जमिनीवर वहात जाण्याची ही भीती नाही , घासलं की स्वच्छ असे अनेक फायदे लक्षात येऊन गावाला जेव्हा आम्ही पितळ्याची ताट वाट्या घेतल्या तेव्हा फार श्रीमंत झाल्याचं फीलिंग आलं होतं म्हणे. त्याकाळी स्टील एवढे सहज उपलब्ध ही नव्हते. स्टीलची फुलपात्र लग्ना मुंजीत आहेर म्हणून येत असत आणि त्याच तेव्हा अप्रूप ही वाटत असे. पितळ्याच्या भांडयांचा एक तोटा म्हणजे आंबट पदार्थ त्यात शिजवले तर कळकत असत आणि खाण्याच्या उपयोगी रहात नसत . भांड्याना कल्हई करून घेणे हाच एकमेव उपाय होता त्यावर .
भांड्याना कल sss य अशी जोरदार आरोळी ऐकली की आम्ही मुलं फारच उत्साहित होत असू. आमचा मुक्काम तिथेच असे. एकदा आला कल्हईवाला की त्याला दिवसभर काम पुरेल एवढं गिऱ्हाईक एकाच ठिकाणी मिळत असे कारण सगळ्यांकडेच पितळ्याची भांडीच असत वापरात. दुपारचं जेवण ही तिथेच होत असे त्यांचं. आमची आई देत असे जनरली त्याना जेवण. कमीत कमी दोन तरी माणसं लागतातच ह्या साठी .एक भट्टी फुलती ठेवायला, दुसरा मुख्य काम करायला. बहुदा नवरा बायको चीच जोडी असे , त्यांची मुलं ही असत बरोबर ... ती भांडी आणण्या पोचवण्याच्या लिंबू टिम्बु कामावर ...
पहिल्यांदा एक अगदी छोटासा खड्डा जमिनीत खणून त्यात भट्टी बसवली जाई. त्यावर कोळश्याची खर घालत असत. एका बादलीत पाणी, छोट्या डबीत नवसागरची पूड, एक फडकं, कल्हईची म्हणजे कथलाची कांब अशी पूर्व तयारी झाली की भट्टी पेटवून मुख्य कामाला सुरुवात होई. भट्टीवर पातेलं ठेवून ते चांगलं सणसणीत ( योकू च्या सणसणीत तापलेल्या लोखंडी कढई ची आठवण येणं अपरिहार्य आहे ) तापलं की थोडं स्वच्छ केलं जाई, काळे डाग घालवले जात आणि मग त्यावर नावसागराची पूड टाकली जाई . ती टाकता क्षणी भांडे धुराने भरून जाई. लगबगीने त्यावर अगदी थोडी कथलाची कांब फिरवून मग फडक्याने तिचं कोटिंग सगळ्या पातेल्यावर चढवत आणि शेवटी ते पातेलं पाण्यात बुचकळून गार केलं की झालं तयार पातेलं कल्हई लावून. लगेच दुसरं पातेलं हातात... आम्ही मुलं अक्खा दिवस तेच बघण्यात घालवत असू. दिवसाच्या शेवटी हिशोब ठिशोब होऊन दोन पैसे पदरात पडत असत त्यांच्या.
काळ पुढे सरकत होता. स्टील स्वस्त आणि मुबलक मिळू लागल्यावर कल्हई करण्याची गरज नसलेली तीच भांडी पुढे सोयीची वाटू लागली. नंतरच्या काळात मग नॉनस्टिक, कॉपर बॉटम, हार्ड अनोडाईज्ड , मायक्रोवेव्ह सेफ काचेची , अशी अनेक तऱ्हेची भांडी बाजारात आली . सण समारंभासाठी घरात अन्न शिजवणे मागे पडून बाहेरून अन्न मागवणे सर्रास रूढ झाले आणि घरोघरची पितळ्याची भांडी माळ्यावर तरी जाऊन बसली नाहीतर मोडीत तरी गेली.
आता कल्हई ला मागणीच नाही तर ते पिढीजात कल्हईचा व्यवसाय करणारे काय करत असतील ? कसा करत असतील आपला उदरनिर्वाह ? व्यवसायाची लाईन बदलली असेल का त्यानी ? हातात दुसरे स्किल नसताना नवीन व्यवसायात कसे रुजले असतील ते अश्या अनेक विचारांनी माझ्या मनात गर्दी केली.
माझा मुक्काम सध्या सातारला आहे आणि मी रहाते ती लेन अगदीच छोटी , वर्दळ नसलेली अशी आहे. पण काय योगायोग पहा .. कल्हईची भांडी आहेत का , असली तर काढा , पलीकडे भट्टी लावलीय म्हणून एक बाई मला गेटवर उभी राहून सांगत होती. माझ्या मनात कल्हई चा विचार येतो काय आणि दारात कल्हई वाली उभी ! मी फारच थिर्ल्ड झाले. क्षणाचा ही विलंब न लावता सध्या माझ्याकडे असलेल एकुलत एक पितळी तसराळ घेऊन मी तिथे गेले. तेवढ्यात व्हिडिओ ची कल्पना सुचल्याने धावत येऊन फोन घेतला. सगळी प्रोसेस व्हिडिओत कैद केली. बघता बघता माझं तसराळ चांदीचं असल्या सारखं चमकू लागलं. ती आणि मी दोघी ही खुश झालो.
ठरल्या पेक्षा दोन पैसे मी तिला जरी अधिक दिले तरी तिने मला दिलेला आनन्द त्या पेक्षा किती तरी पटीने मोठा आहे ह्यात शंका नाही.
व्हिडीओ खूप छान आहे पण अपलोड होत नाहीये तेव्हा फेसबुक ची लिंक देऊ का इथे ? चालेल का ते ?
ही लिंक फेसबुकची
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4023409081032164&id=10000089...
किती छान.. मनात ओढ असली की
किती छान.. मनात ओढ असली की असे प्रत्यय येत रहातात.
मस्त. द्या फेसबूकची लिंक.
मस्त. द्या फेसबूकची लिंक.
थॅंक्यु DJ , मानव .
थॅंक्यु DJ , मानव .
देते लिंक फेसबुकची नक्की बघा व्हिडीओ ...
कित्ती मस्त. कल्हईवाली
कित्ती मस्त. कल्हईवाली तुम्हाला दिसल्याचा मला अति आनंद झाला. लहानपणी आम्ही चाळीतल्या पोरासोरांनी कल्हईवाला आला की त्याच्याभोवती जमा होऊन बघायची मजा जाम लुटलीय. आई पातेल्यांना वगैरे कल्हई लाऊन घ्यायची. आमच्याकडे पितळी कुकरपण होता, त्याला लाऊन घेत नव्हती बहुतेक.
माझे बाबा आम्ही लहान असताना पितळी ताटातच जेवायचे. स्टील आवडायचं नाही त्यांना हे आठवलं एकदम. पाणी तांब्या, पितळेच्याच भांड्यात प्यायचे.
छान आहे लेख. जुन्या आठवणी
छान आहे लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
नंतर नंतर एकाच घरी पुरेशी भांडी मिळेनात तेव्हा एका ठिकाणी आसपासच्या घरातली भांडी गोळा करून सामूहिक कल्हई केली जात असे. पण त्यातून भांडी घेऊन कल्हईवाल्यांनी पळ काढण्याचे प्रकार घडू लागले. मग घरातल्या मुलांना राखणीला उभे केले जाई. हे मोठे कंटाळवाणे काम असे. एकदोनदा वर्णी लागली होती त्या कामासाठी. आईकडून भरपूर सुका खाऊ घेऊनच आम्ही पुढे पाऊल टाकत असू.
असे बरेच काही आठवले.
ह्याच विषयावर आ रा रा यांचाही एक धागा आहे मायबोलीवर. मला वाटते त्यांनी तो लेख अथवा माहिती मराठी(?) विकिपीडियावरही दिली आहे.
मस्तच! हो, मलाही आरारांच्या
मस्तच! हो, मलाही आरारांच्या धाग्याची आणि फोटोंची आठवण झाली.
मी हे कल्हई प्रकरण कधीच बघितलेलं नाही.
नेहमीप्रमाणे छानच .
नेहमीप्रमाणे छानच .
मला लहानपणी , माझ्या आत्याकडे रहायला जायाचे त्यावेळी तिथे कल्हईवाला यायचा त्याची आठवण आहे .
पूर्या गल्लितल्या बहूतेक घरातल्या पितळी भांड्याना तो कल्हई करायचा .
त्याची हातगाडी असायची . त्यावरच भट्टी आणि बाकी सगळ सामान .
गल्लीतल्याच कोणाच्या तरी घरून पाण्याची बादली मागवायचा .
मी दारात बसून तो सगळा कार्यक्रम टक लावून , मंत्रमुग्ध होउन बघत असे .
त्या आठवणी जाग्या झाल्या .
मी दारात बसून तो सगळा
मी दारात बसून तो सगळा कार्यक्रम टक लावून , मंत्रमुग्ध होउन बघत असे .>>>> हो ना,फक्त खिडकीमधून. अद्भूत वाटायचे सर्व काही.
कित्ती मस्त. कल्हईवाली
कित्ती मस्त. कल्हईवाली तुम्हाला दिसल्याचा मला अति आनंद झाला. >>> +१
ह्याच विषयावर आ रा रा यांचाही एक धागा आहे मायबोलीवर.
>>>>
हो पण ते तेव्हा इब्लिस होते
कल्हई
https://www.maayboli.com/node/45640
येस्स. हाच तो धागा.
येस्स. हाच तो धागा. धन्यवाद.
छान लिहिलय.. मी पण कधी पाहिले
छान लिहिलय.. मी पण कधी पाहिले नाही कल्हई करताना.
जस्ताऐवजी कथील असा बदल केला
जस्ताऐवजी कथील असा बदल केला हे चांगले झाले. तेच लिहिण्यासाठी लेख उघडला होता.
माझ्या आजोळी, आजीची
माझ्या आजोळी, आजीची भांड्यांची मांडणी पूर्णपणे तांब्या पितळेच्या भांड्यानी सजलेली होती। लहानपणी मे च्या सुट्टीत जेव्हा आजोळी जायचे तेव्हा तिची ती मांडणी पाहून मन हरकून जायचे। पहिल्यांदाच गेले होते तेव्हा वाटायचे आज्जीकडे एवढी सोन्याची भांडी आणि मग जेवायला एखाद्या स्टीलच्या ताटात वाढले गेले (मुंबईहून आलेल्या पाहुण्यांना स्टीलच्या ताटात वाढे आमची मामी ) तर मन खट्टू व्हायचे कि आपल्याया का नाही वाढले सोन्याच्या ताटात ?





ती एवढी तांब्या पितळेची भांडी मामीला घासायला कंटाळा यायचा म्हणून कि काय शेजाऱ्या पाजार्यांना एखादा पदार्थ घालून दिलेली भांडी परतून मागायची ती तसदीच घ्यायची नाही आजी ची खूपशी भांडी हळू हळू कमी होऊ लागली आणि आजी गेल्यावर तिच्या स्वयंपाक घरातील तांब्या पितळेच्या जागी स्टीलची भांडी विराजमान झाली
माझी मावशी वारली तेव्हा आम्ही सहकुटुंब गावी गेलो होतो तेव्हा आता मामी आणि तिच्या सुनेच्या स्वयंपाक घरात मातीचे माठ जाऊन फ्रिज आले , तांब्याचे अंघोळीचे। मोठे घंगाळे जाऊन स्टीलच्या , अल्युमिनियमच्या बादल्या आल्या, पाणी तापवायचा बंब जाऊन त्याजागी गिझर आला हांडे कळश्या तर आजी असतानाच गळायला लागल्या होत्या (खूपच जड भांडी होती आजीची त्यामुळे त्यातून विहिरीतून पाणी भरून आणायला मामीला जड जाऊ लागले आणि भांडी आपोआप गळायला लागली )
चमचा, वाटी, सांडशी, उलथणे, वेगवेगळी नक्षीकाम असलेले फुलपात्र , चहाची कप बशी , ताटल्या ,पराती, मोठे टोप आणि अजूनही विविध प्रकारची भांडी अक्षरशः गायब होऊन त्या जागी स्टीलच स्टील दिसू लागलय। सगळ्यात मोठा खजिना म्हणजे माझ्या आजीची पानाची पेटी मला खूप खूप आवडायची, आजीला खलबत्यात पान कुटून देण्यासाठी तिची ती पेटी मी हाताळायची, सुपारीचा अडकित्ता सगळंच कस मस्त। मामीला विचारायचं राहूनच गेलं ती पेटी कुठाय। जाऊदे तीच ह्यदय हि तिच्या भांड्यानसारखं स्टील झालय
छान लेख
छान लेख

कधी पाहिली नाही ही process, video पाहते
कल्हई वाल्या पेंडशाच्या बोळाची आठवण झाली
पेंडसे इथे राहतात
किल्ली, 'इथे' नाही, आत राहतात
किल्ली, 'इथे' नाही, आत राहतात. (पण कल्हई रस्त्यात बसून काढतात)
किल्ली, 'इथे' नाही, आत राहतात
चुकून दोनदा गेला प्रतिसाद.
हो अगदी बरोबर, वावे
हो अगदी बरोबर, वावे
छान लेख!
छान लेख!
मस्तच! हो, मलाही आरारांच्या धाग्याची आणि फोटोंची आठवण झाली.>>+१
मस्तच आठवणी.
मस्तच आठवणी.
मस्त लेख ममो! आणि सगळ्यांच्या
मस्त लेख ममो! आणि सगळ्यांच्या आठवणी पण छान! मी ही पाहीले आहे कल्हई करताना. लहानपणी सगळ्या गोष्टींचं किती अप्रुप असतं ना.
छान लेख, जुन्या आठवणी जाग्या
छान लेख, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पूर्ण galvanizing process मध्ये फडके वापरण्याचा हा नवा बदल दिसून आला. माझ्या आठवणीतले कल्हई वाले आधी सुक्या नारळाची साल किंवा काथ्या वापरीत. आणि शेवटचा हात फिरवताना फक्त कपडा वापरीत.
कित्ती मस्त. कल्हईवाली
कित्ती मस्त. कल्हईवाली तुम्हाला दिसल्याचा मला अति आनंद झाला. लहानपणी आम्ही चाळीतल्या पोरासोरांनी कल्हईवाला आला की त्याच्याभोवती जमा होऊन बघायची मजा जाम लुटलीय. आई पातेल्यांना वगैरे कल्हई लाऊन घ्यायची+११११
लेख वाचत असताना पुन्हा एकदा भांड्यांना कल्हई करताना पाहण्याचा खूपच इच्छा झालेली आणि ती तुमच्या लिंकमुळे पूर्ण झाली त्यामुळे धन्यवाद ममो.
नेहमीप्रमाणे मस्त लेख।
नेहमीप्रमाणे मस्त लेख।
मला सांगा की मी जर काही पीतळी भांडी आणली आणि kalhai नाही केली... पण त्यात रेग्युलर जेवण बनवले ( अम्बट नाही ) तर चालते का
छान.. लहानपणी बरेचदा बघितले
छान.. लहानपणी बरेचदा बघितले आहे, आईबरोबर जाऊन घरातल्या पितळीच्या भांड्याना करून आणली आहे. चिंचवडात अजूनही रविवारी पु ना गाडगीळच्या इथल्या अमित पार्कच्या कडेला एक जोडपे कायम बसलेले असते कल्हई साठी. बोहारिणीवर पण छान काहीतरी लिहा. बोहारिण, भुते , शनिवारी तिन्हीसांजेवर तेल मागायला येणारी बाई .. एकदम काय काय आठवलं ह्या लेखावरून
भट्टीवर पातेलं ठेवून ते
भट्टीवर पातेलं ठेवून ते चांगलं सणसणीत ( योकू च्या सणसणीत तापलेल्या लोखंडी कढई ची आठवण येणं अपरिहार्य आहे )
>>> योकू कोण?
योकू कोण?>>> एक माबोकर आहेत.
योकू कोण?>>> एक माबोकर आहेत. इथे त्यांचे छान पाककृतींचे बरेच धागे आहेत. त्यांच्याकडे जी लोखंडी कढई आहे ती सणसणीत तापवतात मग त्यात भाजी करतात.
व्हिडिओ पाहिला. तिने
व्हिडिओ पाहिला. तिने नावसागराची पूड टाकताच निघालेला धूर पाहून अगदी तो वास आल्या सारखं वाटलं आणि लहानपण अनुभवल्या सारखं वाटलं काही क्षण.
छान लेख आणि आठवणी पण. कल्हई
छान लेख आणि आठवणी पण. कल्हई करतात हे ऐकून वाचून माहीत होतं ,कधी करताना पाहिली नव्हती. व्हिडिओमुळे बघता आली.
हल्ली हरमन चहा जो पितळी किटलीत करतात तो बघून या लोकडाऊन मध्ये मुलाला करायची इच्छा झाली. माळ्यावर एक पितळी पातेलं होतं, ते काढलं पण ते घासुन सुद्धा त्यात चहा करायची इच्छा होईना पण आता कल्हई कुठे करून मिळणार म्हणून ते तसच राहील, मग त्याच्या ही डोक्यातून ते गेलं आणि पातेलं परत माळ्यावर गेलं.
धन्यवाद सर्वांना ...
धन्यवाद सर्वांना ...
सगळे प्रतिसाद ही माहितीत भर घालणारे आणि interesting ही.
वर्णिता, बिन कल्हई च्या स्वच्छ घासलेल्या पितळी पातेल्यात चहा नक्कीच करता येतो.नुसता चहा करायचा असेल तर कल्हई ची आवश्यकता नाही. टपरीवर पितळी पातेल्यात चहा करताना खूप वेळा पाहिलं ही आहे.
ओह, ओके ममो, करून पाहीन मग
ओह, ओके ममो, करून पाहीन मग चहा आता त्या पातेल्यात.
वरचा पितळी पानांचा डबा बघून मला ही माझ्या आजोबांचा पानांचा डबा आठवला. डब्यातल्या त्या छोट्या छोट्या बेचक्यातल्या वाट्या फार आवडायच्या.
Pages