कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ’हा चंद्र’ नावाची. त्यात ते म्हणतात,
"त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते"
’हा चंद्र’ म्हणजे आपल्याला नेहमी आकाशात दिसतो, तो. लहानपणी गाडीतून जाताना आपल्यासोबत पळणारा, पण गाडी थांबली तर पुढे पळून न जाता आपल्यासाठी थांबून राहणारा. मोठेपणी ’चंद्र आहे साक्षीला’, ’ एकसो सोला चॉंद की रातें’ वगैरे ओळींची आठवण करून देणारा.
’तो चंद्र’ म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वीभोवती सत्तावीस दिवसांत एक, अशा प्रदक्षिणा घालत राहणारा, सूर्याच्या सोबतीने समुद्रात भरती-ओहोटी घडवणारा, कधी सूर्यालाच ग्रहण लावणारा.
कुसुमाग्रज म्हणतात, हे दोन वेगवेगळे चंद्र आहेत. त्यांचा एकमेकांशी काय संबंध?
"त्या चंद्रावर अंतरिक्षयानात बसूनी माकड,मानव, कुत्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हाही नभाचा मानकरी, पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही"
पुण्याला कॉलेजला असताना मी आकाशनिरीक्षणासाठी बर्याच वेळा एका ग्रुपबरोबर पुण्याबाहेर जायचे. तारे, तारकापुंज आणि ग्रह चांगले स्पष्ट दिसावेत म्हणून शक्यतो हे आकाशदर्शनाचे कार्यक्रम अमावास्येच्या आसपासच्या दोनतीन दिवसात सोयीस्कर रात्र पाहून आखले जातात. (चंद्रप्रकाश जास्त असला तर अंधुक तारे नीट दिसत नाहीत) तेव्हा रात्र जागवून परत पुण्याला येताना कधीकधी समोर उगवणारी चंद्राची लांबलचक पातळ कोर दिसायची. त्या काळात एकदा संध्याकाळी चंद्र-शुक्र युती दिसणार होती, म्हणजेच चंद्र आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या खूप जवळ दिसणार होते. संध्याकाळ झाली आणि पश्चिमेला चंद्र-शुक्र युतीचं सुंदर दृश्य दिसू लागलं. नुसत्या डोळ्यांनी पाहताना आकाशात जणू पणती लावली आहे असं वाटत होतं. चंद्रकोरीची पणती आणि शुक्राचा तेजस्वी ठिपका बरोबर ज्योतीच्या जागी. टेलिस्कोपमधून पाहिल्यावर तर तेच दृश्य अजून सुंदर दिसत होतं. चंद्राची मोठी कोर आणि शेजारी तिची जणू छोटी प्रतिकृती असावी तशी शुक्राची कोर! आता इतकी वर्षं झाली, तरी ते दृश्य अजूनही मनात ताजं आहे.
(प्रकाशचित्र ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या सागर गोखले यांच्याकडून साभार)
कधी शरद पौर्णिमेचा प्रफुल्लित, तरीही शांत चंद्र, कधी गुलजारांच्या ’पतझड’ कवितेतल्यासारखा ’कमजोर सा पीला चांद’, ’या’ चंद्राची अशी निरनिराळी रूपं आपल्या मनात आपण साठवून ठेवलेली असतात.
’त्या’ चंद्राची कहाणीही सुरस आहे. पृथ्वीचा हा एकमेव नैसर्गिक उपग्रह. आकाराने पृथ्वीच्या जवळपास एक चतुर्थांश. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. सूर्यापासून त्याचं (आपल्याला भासणारं) कोनीय अंतर रोज बदलत जातं, त्यामुळे आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या ’कला’ दिसतात.
अमावास्येला आपल्याला चंद्र दिसत नाही, कारण त्या दिवशी चंद्र सूर्याबरोबरच उगवतो आणि मावळतो. म्हणजेच, चंद्र आणि सूर्याचं पूर्व-पश्चिम कोनीय अंतर आपल्यासाठी शून्य असतं.
खाली दिलेला फोटो म्हणजे स्टेलारियम या आकाशनिरीक्षणासाठीच्या अॅपमधला अमावास्येच्या दिवशीचा स्क्रीनशॉट आहे. त्यात आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाशात शेजारी शेजारी दिसतायत.
हळूहळू हे अंतर वाढायला लागतं. चंद्र रोज थोडा थोडा उशिरा उगवू लागतो. (रोज ५२ मिनिटे) .रोज चंद्र आणि सूर्यातलं (आपल्याला दिसणारं ) पूर्व-पश्चिम कोनीय अंतर वाढत वाढत जातं, चंद्राची कोर मोठी-मोठी दिसू लागते, अधिकाधिक पूर्वेकडे सरकू लागते. या मार्गावर अश्विनी, भरणी, कृत्तिका इत्यादी २७ नक्षत्रं आहेत. यापैकी रोज एका नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर चंद्र आपल्याला दिसतो. असं होत होत पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण चंद्र पूर्वेला उगवतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचं नाव ठरतं. उदा. चंद्र चित्रा नक्षत्रात असेल तर चैत्र, विशाखा नक्षत्रात असेल तर वैशाख, इत्यादी. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका काळ लागतो, तितकाच काळ त्याला स्वतःभोवती एक फेरी मारायला लागतो. त्यामुळे, चंद्राची ’मागची’ बाजू आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. चंद्रावरचा ’दिवस’ हा आपल्या २७ दिवसांइतका मोठा असतो.
अमावास्येला आणि पौर्णिमेलाच ग्रहणं होऊ शकतात, कारण या दोनच तिथींना पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येऊ शकतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडू शकते (पौर्णिमेला, चंद्रग्रहण) किंवा चंद्राची सावली पृथ्वीवर पडू शकते (अमावास्येला, सूर्यग्रहण). योगायोगाने, चंद्र आकाराने सूर्यापेक्षा जितक्या पटीने लहान आहे, जवळपास तितक्याच पटीने तो आपल्याला सूर्यापेक्षा जवळ असल्यामुळे आकाशातला त्याचा आकार आपल्याला जवळजवळ सूर्याइतकाच दिसतो. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस तो सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकतो. जेव्हा ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होतं.
२१ जून २०२० रोजी भारतातून दिसलेलं खंडग्रास सूर्यग्रहण.
प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला ग्रहणं घडत नाहीत कारण प्रत्येक अमावास्येला (पृथ्वीवरून पाहताना) चंद्र-सूर्यातलं पूर्व-पश्चिम अंतर जरी शून्य असलं, तरी उत्तर-दक्षिण अंतर शून्य असेल असं नाही. (चंद्र-सूर्य आकाशात शेजारी-शेजारी असतील) त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेलाही (चंद्रावरून पाहताना) पृथ्वी-सूर्यातलं पूर्व-पश्चिम अंतर जरी शून्य असलं, तरी उत्तर-दक्षिण अंतर शून्य असेल असं नाही. (चंद्राच्या आकाशात पृथ्वी आणि सूर्य शेजारी-शेजारी).
३१ जानेवारी २०१८ रोजी भारतातून दिसलेलं चंद्रग्रहण. ( चंद्रोदय होताना ग्रहण लागलेलंच होतं. हा फोटो ग्रहण सुटत असतानाचा आहे.)
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा बरोब्बर वर्तुळाकृती नसून लंबवर्तुळाकृती आहे. त्यामुळे चंद्र आपल्यापासून कधी थोडा जवळ असतो, तर कधी थोडा लांब. खग्रास सूर्यग्रहण होण्यासारखी पृथ्वी-चंद्र-सूर्य या त्रयीची स्थिती असेल आणि चंद्र पृथ्वीपासून लांब असेल, तर तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं.
२६ डिसेम्बर २०१९ दक्षिण भारतातून दिसलेलं कंकणाकृती सूर्यग्रहण (प्रकाशचित्र ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या सागर गोखले यांच्याकडून साभार)
याउलट, चंद्र जर त्यातल्या त्यात जवळ असेल आणि तेव्हा पौर्णिमा असेल, तर तेव्हा आपल्याला ’सुपरमून’ दिसतो, म्हणजेच नेहमीपेक्षा चंद्रबिंब मोठं दिसतं.
उगवणारा सुपरमून
चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेर्यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात. हे डाग म्हणजे चंद्रावरच्या खोलगट भागातला थंड झालेला लाव्हारस आहे. पृथ्वीवर जसा अग्निजन्य खडक असतो, तसाच हा चंद्रावरचा अग्निजन्य खडक. चंद्रनिर्मितीच्या सध्या सर्वाधिक मान्यता असलेल्या सिद्धांतानुसार, अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठा ( आकाराने साधारणपणे मंगळाएवढा) गोळा येऊन आदळला. त्या आघातामुळे जे द्रव्य बाहेर फेकलं गेलं, त्यापासून चंद्र तयार झाला आणि तो पृथ्वीभोवती फिरायला लागला. या आघातातून जी उष्णता निर्माण झाली होती, त्यामुळे चंद्र तेव्हा वितळलेल्या स्थितीत होता. हळूहळू तो थंड होत गेला. पृथ्वीप्रमाणेच, बाहेरचा भाग आधी थंड आणि त्यामुळे घनरूप झाला. आतला द्रवरूप लाव्हा ज्वालामुखींच्या उद्रेकातून बाहेर येत राहिला आणि पृष्ठभागावर पसरला. लाव्हाचे हे थंड झालेले समुद्र म्हणजेच आपल्याला चंद्रावर दिसणारे डाग. या डागांचा आकार कुणाला सशासारखा वाटला आणि चंद्राला ’शशांक’ हे नाव मिळालं, तर कुणाला हरणासारखा वाटला आणि चंद्र ’मृगांक’ झाला.
ही पसरट विवरं पृथ्वीवरून पाहताना ती समुद्रासारखी दिसल्यामुळे लॅटिन भाषेत त्यांना ’Mare’, म्हणजे समुद्र, असं संबोधलं गेलं.
पृथ्वीवर जशा उल्का येऊन आदळतात, तशा चंद्रावरही आदळतात. पण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामुळे पडणारी उल्का जळते आणि तिचा आकार कमी होतो किंवा अगदी लहान असेल तर ती जळून नष्ट होते. खूपच मोठी उल्का (अशनी) असेल, तर लोणारसारखं किंवा ॲरिझोनासारखं विवर तयार होतं. अशी मोठी उल्का (asteroid) पडल्यामुळेच डायनॉसॉर्स नष्ट झाले असं सांगितलं जातं. पण पृथ्वीवर वातावरण आहे, पाणी आहे, त्यामुळे जमिनीची धूप होते, भूपृष्ठामधे सतत बदल होत राहतात. पृथ्वीच्या पृष्ठभागातल्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे आणि इतर भूशास्त्रीय घटनांमुळे लहानसहान विवरं झाकली जातात, भरली जातात. चंद्रावर असं घडत नाही. त्यामुळे चंद्रावर उल्का आणि अशनी पडल्यामुळे जी काही लहानमोठी विवरं तयार होतात, ती तशीच राहतात. याच कारणामुळे चंद्रावर आपल्याला भरपूर विवरं दिसतात. या विवरांना नावं देण्यात आली आहेत. समुद्राप्रमाणे दिसणार्या पसरट विवरांना समुद्राची, तर इतर विवरांना विविध शास्त्रज्ञांची.
चंद्राचे फोटो काढल्यावर ही विवरं ओळखून त्यांना नावं देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ Mare Serenitatis या पसरट विवराच्या आत असलेल्या एका विवराला साराभाई विवर असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात, ते विवर बरंच लहान असल्यामुळे या फोटोतून दिसणं शक्य नाही. सर जगदीशचंद्र बोस, प्रा. शिशिरकुमार मित्रा या अजून दोन भारतीय शास्त्रज्ञांची नावं ज्या विवरांना देण्यात आली आहेत, ती विवरं मात्र चंद्राच्या ’मागच्या’ बाजूला आहेत.
ही अजून काही विवरं.
हा चंद्र म्हणजे डोळ्यांना सहज दिसणार्या सौंदर्यातला आनंद.
तो चंद्र म्हणजे कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी, थोडं खोलात शिरून मिळवलेल्या ज्ञानातला आनंद.
हे दोन्ही चंद्र आनंददायी आहेत. अंधार्या रात्री चांदण्यांनी चमचमणारं आकाश आपल्या डोळ्यांना आनंद देतंच. पण जर आपली नक्षत्रांशी, ग्रहतार्यांशी ओळख झाली, तर तेच आकाश पाहताना आपला आनंद द्विगुणित होतो असा माझा अनुभव आहे. इंद्रधनुष्य डोळ्यांना सुंदरच दिसतं, पण ते सात रंग का दिसतात, ते थोडा प्रयत्न करून समजून घेतलं, तर ते पाहण्यातली मजा वाढते, कारण अशा वेळी कुसुमाग्रजांचे हे दोन चंद्र एकरूप झालेले असतात.
मराठी राजभाषा दिन आणि विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
छान लिहिले आहे... इतकी वर्षे
छान लिहिले आहे... इतकी वर्षे झाली मला अजूनही चंद्राच्या कला का असतात समजलेले नाही...
खूपच अभ्यासपूर्ण निरीक्षणं
खूपच अभ्यासपूर्ण निरीक्षणं आहेत. पुण्याबाहेर जाऊन रात्र रात्र जागून अवकाश निरीक्षणाचं वेड खूप थोड्यांना असू शकेल. लेखासोबत दिलेले फोटो दुर्मिळ आहेत. चंद्राची कोर आणि खाली शुक्राची चांदणी हा फोटो दिल्याबद्दल आभार. गोल घुमट असलेली इमारत कुठली ते नाही समजलं. आवडलाच लेख.
सुरेख लेख! खूप आवडला!
सुरेख लेख! खूप आवडला!
मस्त लेख आणि फोटो !
मस्त लेख आणि फोटो !
आजवर शिकलेल्या भूगोलाच्या माहितीची उजळणी तर झालीच. पण ते चांगल्या सोप्या भाषेत समजले. एखाद्याला सांगायचे, समजवायचे असेल तर आता याच लेखाची लिंक देता येईल
छान लेख व फोटो. काल फोन वरून
छान लेख व फोटो. काल फोन वरून वाचला होता पण मराठी तून प्रतिक्रिया लिहायची होती. प्रथम दोन चंद्र म्हणजे आय क्यु ८४ ह्या मुराकामीच्या पुस्तकाची आठवण झाली. असे अजून लिहीत जा.
छान लेख..!
छान लेख..!
चंद्राबद्दलची माहिती आणि फोटो उत्तमच..!
च्रप्स, रानभुली, फारएण्ड,
च्रप्स, रानभुली, फारएण्ड, ऋन्मेष, अमा, रूपाली, मनापासून धन्यवाद!
च्रप्स, चंद्राची नेहमी अर्धी बाजू प्रकाशमान असते आणि अर्धी काळोखात. (जशी पृथ्वीचीही असते) ती प्रकाशमान बाजू आपल्याला किती दिसते, त्यावर चंद्राची कला ठरते. पौर्णिमा असेल तेव्हा सूर्य आपल्या एका दिशेला आणि चंद्र बरोबर विरुद्ध दिशेला असतो. त्यामुळे चंद्राची प्रकाशित बाजू पूर्णपणे आपल्या समोर येते.
दुसरी अशी कल्पना करून पहा. चंद्रावर आपल्या २७ दिवसांचा एक दिवस असतो. (पृथ्वीवर २४ तासांचा असतो तसा) चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसत असते. त्या भागावर सूर्य रोज थोडा थोडा 'उगवतो' असं समजा. पौर्णिमेला पूर्ण बाजूवर उगवतो. मग हळूहळू मावळायला लागतो. या सगळ्याला मिळून एक महिना, किंवा २७ दिवस लागतात.
रानभुली, ती इमारत म्हणजे ओडिशामधल्या धौली या ठिकाणी असलेला शांतिस्तूप आहे. माझ्याच आधीच्या एका प्रवासवर्णनातला फोटो इथे परत वापरलाय
अमा, हे पुस्तक माहिती नाही. पाहते
फार सुरेख रीतीने समजावले आहे.
फार सुरेख रीतीने समजावले आहे.
अच्छा. मला वाटले होते की
अच्छा. मला वाटले होते की खगोलशास्त्राशी संबंधित एखादी वास्तू असेल.
चंद्राच्या प्रकाशात पांढरा रंग आणि हा आकार खूप खुलून दिसतोय. समर्पक आहे लेखाशी. सुंदर आहे फोटो.
कुसुमाग्रजांची दोन चंद्र ही
कुसुमाग्रजांची दोन चंद्र ही कल्पना फारच आकर्षक आहे आणि त्या दुसऱ्या चंद्राचे सौन्दर्य तुम्ही यथोचित मांडले आहे. छान आहे लेख.
वाह! छान चित्रे आणि लेख.
वाह! छान चित्रे आणि लेख.
पृथ्वीला एकच चंद्र का? इतर ग्रहांसारखे अजून का नाहीत? आकारमानामुळे??
सांगायचे, समजवायचे असेल तर
सांगायचे, समजवायचे असेल तर आता याच लेखाची लिंक देता येईल>>खरंय.छान लेख आहे.
मलाही शीर्षक वाचून आधी वाटलं होतं की 'कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा' ह्या (मराठी व्याकरण पुस्तकातील) काव्यपंक्तीप्रमाणे काही ललित आहे की काय )
Mast lihalay!
Mast lihalay!
देवकीताई, punekarp, सीमंतिनी,
देवकीताई, punekarp, सीमंतिनी, प्राची, नानबा, धन्यवाद!
रानभुली, धन्यवाद
सीमंतिनी, पृथ्वीला एकच चंद्र का, हे नेमकं सांगता येणार नाही मला तरी. पण सूर्यमालेतील 'आतल्या' ग्रहांना उपग्रह असण्याचं प्रमाण कमीच आहे. बुध, शुक्र यांना एकही उपग्रह नाही. पृथ्वीला एकच, मंगळाला दोन आहेत खरे, पण ते बरेच लहान आहेत आणि बहुधा ते मंगळ आणि गुरूच्या मधल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातून मंगळाने खेचून घेतलेले असावेत असं म्हणतात. पलीकडच्या गुरू, शनी वगैरे ग्रहांना मात्र भरपूर उपग्रह आहेत.
खूपच छान आणी सोप्या पद्धतीने
खूपच छान आणी सोप्या पद्धतीने समजावलेस. मुलीला दाखवते हे. अगदी वाचनीय आहे.
सुंदर लेखन!
सुंदर लेखन!
खूपच छान लेख.
खूपच छान लेख. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा.
खूपच माहितीपूर्ण तितकाच रोचक
खूपच माहितीपूर्ण तितकाच रोचक लेख. सर्वच चित्रे विलोभनीय (पणतीचे तर सर्वाधिक)
वरील लेखातील हि माहिती माझ्यासाठी नवीन...
१. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचं नाव ठरतं.
२. चंद्र आकाराने सूर्यापेक्षा जितक्या पटीने लहान आहे, जवळपास तितक्याच पटीने तो आपल्याला सूर्यापेक्षा जवळ
३. चंद्र जर त्यातल्या त्यात जवळ असेल आणि तेव्हा पौर्णिमा असेल, तर तेव्हा आपल्याला ’सुपरमून’ दिसतो
माझ्यासाठी चंद्र नेहमीच कुतूहल चाळवणारा खगोल आहे. पौर्णिमेच्या रात्री रॉकेटमध्ये बसून उड्डाण केले आणि थेट थेट वर जात राहिलो तर तासाभरातच आपण तिथवर पोहोचू, इतक्या जवळ वाटणारा वाटणारा चंद्र प्रत्यक्षात साधारणपणे तब्बल तीन लाख किमी अंतरावर आहे. म्हणजे तिथे जायला प्रकाशालाच साधारणपणे एक सेकंद लागतो. म्हणूनच, इतक्या प्रचंड अंतरावर जायचे तर थेट वर वर न जाता पृथ्वीभोवती गोल गोल फिरत जावे लागते हि कल्पना खूपच रोमांचक वाटते. पहिल्यांदा चंद्रावर गेलेल्या तिघांपैकी एकाने (बहुतेक बझ्झ ऑल्ड्रीन) लिहिलेला अनुभव खूप म्हणजे खूपच रोचक आहे. (विशेषतः "उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळाने मी खाली पाहिले तेंव्हा नासा च्या चाहुबाजुच्या सर्वच रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच्या लांबलचक अशा रांगा लागल्या होत्या. ते सर्व लोक उड्डाण पाहण्यासाठी आले होते" हे वाचून व ती कल्पना करून आपण अक्षरशः शहारुन जातो). चांद्रस्वारीला पन्नास वर्षे झाली तेंव्हा 'सकाळ' मध्ये हा लेख अनुवादित स्वरुपात आल्याचे आठवते (पण आता त्या लेखाचा दुवा मिळत नाहीये)
>> स्टेलारियम या आकाशनिरीक्षणासाठीच्या अॅपमधला
स्क्रीनशॉट वरून हे अॅप बरेच रोचक वाटतेय. नक्की पाहतो. माझ्याकडे सध्या जे अॅप आहे ते ह्याच्या इतके छान नाही.
>> अशी मोठी उल्का (asteroid) पडल्यामुळेच डायनॉसॉर्स नष्ट झाले असं सांगितलं जातं.
याबाबत अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनानुसार: ज्या उल्केमुळे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या किनाऱ्यालगतच्या सागरात विवर बनले, तीच घटना यासाठी कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. या विवरला आज चिक्सलब विवर म्हणून ओळखले जाते (जवळ असलेल्या चिक्सलब गावाच्या नावावरून). केवळ पंधरा किमी व्यासाच्या या उल्केच्या आदळण्यामुळे वीस किमी खोल आणि दीडशे किमी लांबरुंद असा भलाथोरला खड्डा पडला. त्यातून निर्माण झालेल्या महाविनाशकारी ऊर्जेमुळे त्यापुढील काही दशके अखंड पृथ्वीवरचे वातावरण धुळीने आच्छादित राहिले. व सूर्यप्रकाश पृथ्वीवर न पोहोचल्याने तेंव्हा अस्तित्वात असलेल्या जीवसृष्टीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के जीवसृष्टी नष्ट झाली असावी अशी एक संशोधनाधारीत थियरी मांडली गेली आहे. दुर्दैवाने त्यात हे डायनॉसॉर्स व इतर प्राणी होते. केवळ पंधरा-वीस किमी व्यासाच्या या उल्केमुळे झालेला हा परिणाम! (माफ करा थोडे विषयांतर झाले. पण डायनॉसॉर्स नष्ट होण्याचा उल्लेख वाचून हि माहिती लिहावी वाटली)
असो!
अगदी कालच रात्री मी जिथे गेलो होतो तिथून निरभ्र आकाशात चंद्र ठळकपणे दिसत होता. माझ्या मनात आले,
वैज्ञानिक मन जागृत केले तर चंद्रावरचा प्रकाश हा तिथे थेट सूर्याचे ऊन पडले आहे असाच दिसू लागतो
कवी मनाने पाहिले तर मात्र हाच चंद्र आपल्याच अंतरंगातून रुपेरी प्रकाश बाहेर टाकत आहे असे वाटते
एक सुंदर व माहितीप्रचूर लेख दिल्याबद्दल धन्यवाद
कालच मोहक दिसणारा चन्द्र
कालच मोहक दिसणारा चन्द्र बघितला. लेख मस्त लिहिल आहे.
रश्मी, स्वाती, बोकलत, अतुल,
रश्मी, स्वाती, बोकलत, अतुल, निर्झरा, धन्यवाद
अतुल, विस्तृत प्रतिसाद आवडला. बझ ऑल्ड्रिनचा अनुभव खरंच रोमांचक. डायनॉसॉर्स आणि इतर अनेक जीव उल्का पडल्यामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या आच्छादनामुळे नष्ट झाले असावेत असंच मीही वाचलं आहे.
लोणार विवरही नक्की जाऊन पाहण्यासारखं आहे.
स्टेलारियम उपयुक्त आहे. मी नियोवाईज धूमकेतूचं नेमकं लोकेशन त्यातूनच शोधलं होतं.
अप्रतिम लेख!
अप्रतिम लेख!
अतुलजी प्रतिसाद आवडला.
अतुलजी प्रतिसाद आवडला.
फारच अभ्यासपूर्ण आणि रोचक लेख
फारच अभ्यासपूर्ण आणि रोचक लेख
माहिती आणि लिखाण आवडलं
मराठी भाषा दिवस आणि विज्ञान
मराठी भाषा दिवस आणि विज्ञान दिवसाची सांगड घातलेला वैज्ञोललीत लेख आवडला.
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख. चंद्रकोरीची पणती आणि सूर्य चंद्र असलेला फोटो तर भारीच.
सुरेख लेख! प्रकाशचित्रे देखील
सुरेख लेख! प्रकाशचित्रे देखील सुंदर आहेत.
मभादि आणि विज्ञान दिन यांची सांगड घालण्याची कल्पना आवडली!
चंद्राच्या जन्माच्या प्रक्रियेत पृथ्वीवर घडलेला एक अजून अभूतपूर्व आणि एकमेव (unique in the universe known to us) परीणाम म्हणजे पृथ्वीचा अक्ष हा सरळ न राहता २३.५ अंशांनी कलला. या कलाचा आपल्याला दिसणारा परीणाम म्हणजे पृथ्वीवरचे ऋतू! या ऋतूचक्राने पृथ्वीवर जन्माला आलेल्या सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही बजावत आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी या एका लेखाची लिंक - https://www.washingtonpost.com/weather/2019/06/20/summer-is-about-here-t...
छान लेख आणि फोटोही!
छान लेख आणि फोटोही!
निनाद आचार्य, किल्ली, हर्पेन,
निनाद आचार्य, किल्ली, हर्पेन, भाग्यश्री, जिज्ञासा, मृणाली, धन्यवाद!
जिज्ञासा, वॉशिंग्टन पोस्टचा लेख वाचला. छान आहे. ऋतू असल्यामुळे पृथ्वीवर विविधता आहे हे खरंच!
पृथ्वीला परिवलन (स्वतःभोवती फिरणे), परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे) या दोन गतींबरोबरच परांचन नावाची अजून एक गती असते. भोवरा फिरत असताना तो स्वतःभोवती फिरतो, त्याचबरोबर त्याचा आसही फिरतो (wobble होतो). तशा प्रकारची ही गती असते. याला Precession म्हणतात. २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा आस परांचन गतीची एक फेरी पूर्ण करतो. या गतीमुळे आपला ध्रुव बदलतो. सध्या पृथ्वीचा आस Polaris (ध्रुवतारा) या ताऱ्याकडे रोखलेला आहे. सुमारे १२,००० वर्षांपूर्वी अभिजित (Vega) या ताऱ्याकडे तो रोखलेला होता.
उत्तम लेख आणि फोटो. काही
उत्तम लेख आणि फोटो. काही गोष्टी नव्याने कळल्या.
@ वावे: स्टेलारीयम ह्या ॲपची
@ वावे: स्टेलारीयम ह्या ॲपची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! तुमचे वर्जन बेसिक की अपग्रेडेट आहे? लेखातील अमावश्येच्या आकाशातील सूर्य-चंद्राचा फोटो ॲपमधून कसा घेतला? कारण, मी ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात मोबाईल कॅमेराचा उपयोग कसा करावा काही समजलेच नाही.
Pages