कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ’हा चंद्र’ नावाची. त्यात ते म्हणतात,
"त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते"
’हा चंद्र’ म्हणजे आपल्याला नेहमी आकाशात दिसतो, तो. लहानपणी गाडीतून जाताना आपल्यासोबत पळणारा, पण गाडी थांबली तर पुढे पळून न जाता आपल्यासाठी थांबून राहणारा. मोठेपणी ’चंद्र आहे साक्षीला’, ’ एकसो सोला चॉंद की रातें’ वगैरे ओळींची आठवण करून देणारा.
’तो चंद्र’ म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वीभोवती सत्तावीस दिवसांत एक, अशा प्रदक्षिणा घालत राहणारा, सूर्याच्या सोबतीने समुद्रात भरती-ओहोटी घडवणारा, कधी सूर्यालाच ग्रहण लावणारा.
कुसुमाग्रज म्हणतात, हे दोन वेगवेगळे चंद्र आहेत. त्यांचा एकमेकांशी काय संबंध?
"त्या चंद्रावर अंतरिक्षयानात बसूनी माकड,मानव, कुत्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हाही नभाचा मानकरी, पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही"
पुण्याला कॉलेजला असताना मी आकाशनिरीक्षणासाठी बर्याच वेळा एका ग्रुपबरोबर पुण्याबाहेर जायचे. तारे, तारकापुंज आणि ग्रह चांगले स्पष्ट दिसावेत म्हणून शक्यतो हे आकाशदर्शनाचे कार्यक्रम अमावास्येच्या आसपासच्या दोनतीन दिवसात सोयीस्कर रात्र पाहून आखले जातात. (चंद्रप्रकाश जास्त असला तर अंधुक तारे नीट दिसत नाहीत) तेव्हा रात्र जागवून परत पुण्याला येताना कधीकधी समोर उगवणारी चंद्राची लांबलचक पातळ कोर दिसायची. त्या काळात एकदा संध्याकाळी चंद्र-शुक्र युती दिसणार होती, म्हणजेच चंद्र आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या खूप जवळ दिसणार होते. संध्याकाळ झाली आणि पश्चिमेला चंद्र-शुक्र युतीचं सुंदर दृश्य दिसू लागलं. नुसत्या डोळ्यांनी पाहताना आकाशात जणू पणती लावली आहे असं वाटत होतं. चंद्रकोरीची पणती आणि शुक्राचा तेजस्वी ठिपका बरोबर ज्योतीच्या जागी. टेलिस्कोपमधून पाहिल्यावर तर तेच दृश्य अजून सुंदर दिसत होतं. चंद्राची मोठी कोर आणि शेजारी तिची जणू छोटी प्रतिकृती असावी तशी शुक्राची कोर! आता इतकी वर्षं झाली, तरी ते दृश्य अजूनही मनात ताजं आहे.
(प्रकाशचित्र ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या सागर गोखले यांच्याकडून साभार)
कधी शरद पौर्णिमेचा प्रफुल्लित, तरीही शांत चंद्र, कधी गुलजारांच्या ’पतझड’ कवितेतल्यासारखा ’कमजोर सा पीला चांद’, ’या’ चंद्राची अशी निरनिराळी रूपं आपल्या मनात आपण साठवून ठेवलेली असतात.
’त्या’ चंद्राची कहाणीही सुरस आहे. पृथ्वीचा हा एकमेव नैसर्गिक उपग्रह. आकाराने पृथ्वीच्या जवळपास एक चतुर्थांश. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. सूर्यापासून त्याचं (आपल्याला भासणारं) कोनीय अंतर रोज बदलत जातं, त्यामुळे आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या ’कला’ दिसतात.
अमावास्येला आपल्याला चंद्र दिसत नाही, कारण त्या दिवशी चंद्र सूर्याबरोबरच उगवतो आणि मावळतो. म्हणजेच, चंद्र आणि सूर्याचं पूर्व-पश्चिम कोनीय अंतर आपल्यासाठी शून्य असतं.
खाली दिलेला फोटो म्हणजे स्टेलारियम या आकाशनिरीक्षणासाठीच्या अॅपमधला अमावास्येच्या दिवशीचा स्क्रीनशॉट आहे. त्यात आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाशात शेजारी शेजारी दिसतायत.
हळूहळू हे अंतर वाढायला लागतं. चंद्र रोज थोडा थोडा उशिरा उगवू लागतो. (रोज ५२ मिनिटे) .रोज चंद्र आणि सूर्यातलं (आपल्याला दिसणारं ) पूर्व-पश्चिम कोनीय अंतर वाढत वाढत जातं, चंद्राची कोर मोठी-मोठी दिसू लागते, अधिकाधिक पूर्वेकडे सरकू लागते. या मार्गावर अश्विनी, भरणी, कृत्तिका इत्यादी २७ नक्षत्रं आहेत. यापैकी रोज एका नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर चंद्र आपल्याला दिसतो. असं होत होत पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण चंद्र पूर्वेला उगवतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचं नाव ठरतं. उदा. चंद्र चित्रा नक्षत्रात असेल तर चैत्र, विशाखा नक्षत्रात असेल तर वैशाख, इत्यादी. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका काळ लागतो, तितकाच काळ त्याला स्वतःभोवती एक फेरी मारायला लागतो. त्यामुळे, चंद्राची ’मागची’ बाजू आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. चंद्रावरचा ’दिवस’ हा आपल्या २७ दिवसांइतका मोठा असतो.
अमावास्येला आणि पौर्णिमेलाच ग्रहणं होऊ शकतात, कारण या दोनच तिथींना पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येऊ शकतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडू शकते (पौर्णिमेला, चंद्रग्रहण) किंवा चंद्राची सावली पृथ्वीवर पडू शकते (अमावास्येला, सूर्यग्रहण). योगायोगाने, चंद्र आकाराने सूर्यापेक्षा जितक्या पटीने लहान आहे, जवळपास तितक्याच पटीने तो आपल्याला सूर्यापेक्षा जवळ असल्यामुळे आकाशातला त्याचा आकार आपल्याला जवळजवळ सूर्याइतकाच दिसतो. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस तो सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकतो. जेव्हा ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होतं.
२१ जून २०२० रोजी भारतातून दिसलेलं खंडग्रास सूर्यग्रहण.
प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला ग्रहणं घडत नाहीत कारण प्रत्येक अमावास्येला (पृथ्वीवरून पाहताना) चंद्र-सूर्यातलं पूर्व-पश्चिम अंतर जरी शून्य असलं, तरी उत्तर-दक्षिण अंतर शून्य असेल असं नाही. (चंद्र-सूर्य आकाशात शेजारी-शेजारी असतील) त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेलाही (चंद्रावरून पाहताना) पृथ्वी-सूर्यातलं पूर्व-पश्चिम अंतर जरी शून्य असलं, तरी उत्तर-दक्षिण अंतर शून्य असेल असं नाही. (चंद्राच्या आकाशात पृथ्वी आणि सूर्य शेजारी-शेजारी).
३१ जानेवारी २०१८ रोजी भारतातून दिसलेलं चंद्रग्रहण. ( चंद्रोदय होताना ग्रहण लागलेलंच होतं. हा फोटो ग्रहण सुटत असतानाचा आहे.)
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा बरोब्बर वर्तुळाकृती नसून लंबवर्तुळाकृती आहे. त्यामुळे चंद्र आपल्यापासून कधी थोडा जवळ असतो, तर कधी थोडा लांब. खग्रास सूर्यग्रहण होण्यासारखी पृथ्वी-चंद्र-सूर्य या त्रयीची स्थिती असेल आणि चंद्र पृथ्वीपासून लांब असेल, तर तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं.
२६ डिसेम्बर २०१९ दक्षिण भारतातून दिसलेलं कंकणाकृती सूर्यग्रहण (प्रकाशचित्र ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या सागर गोखले यांच्याकडून साभार)
याउलट, चंद्र जर त्यातल्या त्यात जवळ असेल आणि तेव्हा पौर्णिमा असेल, तर तेव्हा आपल्याला ’सुपरमून’ दिसतो, म्हणजेच नेहमीपेक्षा चंद्रबिंब मोठं दिसतं.
उगवणारा सुपरमून
चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेर्यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात. हे डाग म्हणजे चंद्रावरच्या खोलगट भागातला थंड झालेला लाव्हारस आहे. पृथ्वीवर जसा अग्निजन्य खडक असतो, तसाच हा चंद्रावरचा अग्निजन्य खडक. चंद्रनिर्मितीच्या सध्या सर्वाधिक मान्यता असलेल्या सिद्धांतानुसार, अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठा ( आकाराने साधारणपणे मंगळाएवढा) गोळा येऊन आदळला. त्या आघातामुळे जे द्रव्य बाहेर फेकलं गेलं, त्यापासून चंद्र तयार झाला आणि तो पृथ्वीभोवती फिरायला लागला. या आघातातून जी उष्णता निर्माण झाली होती, त्यामुळे चंद्र तेव्हा वितळलेल्या स्थितीत होता. हळूहळू तो थंड होत गेला. पृथ्वीप्रमाणेच, बाहेरचा भाग आधी थंड आणि त्यामुळे घनरूप झाला. आतला द्रवरूप लाव्हा ज्वालामुखींच्या उद्रेकातून बाहेर येत राहिला आणि पृष्ठभागावर पसरला. लाव्हाचे हे थंड झालेले समुद्र म्हणजेच आपल्याला चंद्रावर दिसणारे डाग. या डागांचा आकार कुणाला सशासारखा वाटला आणि चंद्राला ’शशांक’ हे नाव मिळालं, तर कुणाला हरणासारखा वाटला आणि चंद्र ’मृगांक’ झाला.
ही पसरट विवरं पृथ्वीवरून पाहताना ती समुद्रासारखी दिसल्यामुळे लॅटिन भाषेत त्यांना ’Mare’, म्हणजे समुद्र, असं संबोधलं गेलं.
पृथ्वीवर जशा उल्का येऊन आदळतात, तशा चंद्रावरही आदळतात. पण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामुळे पडणारी उल्का जळते आणि तिचा आकार कमी होतो किंवा अगदी लहान असेल तर ती जळून नष्ट होते. खूपच मोठी उल्का (अशनी) असेल, तर लोणारसारखं किंवा ॲरिझोनासारखं विवर तयार होतं. अशी मोठी उल्का (asteroid) पडल्यामुळेच डायनॉसॉर्स नष्ट झाले असं सांगितलं जातं. पण पृथ्वीवर वातावरण आहे, पाणी आहे, त्यामुळे जमिनीची धूप होते, भूपृष्ठामधे सतत बदल होत राहतात. पृथ्वीच्या पृष्ठभागातल्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे आणि इतर भूशास्त्रीय घटनांमुळे लहानसहान विवरं झाकली जातात, भरली जातात. चंद्रावर असं घडत नाही. त्यामुळे चंद्रावर उल्का आणि अशनी पडल्यामुळे जी काही लहानमोठी विवरं तयार होतात, ती तशीच राहतात. याच कारणामुळे चंद्रावर आपल्याला भरपूर विवरं दिसतात. या विवरांना नावं देण्यात आली आहेत. समुद्राप्रमाणे दिसणार्या पसरट विवरांना समुद्राची, तर इतर विवरांना विविध शास्त्रज्ञांची.
चंद्राचे फोटो काढल्यावर ही विवरं ओळखून त्यांना नावं देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ Mare Serenitatis या पसरट विवराच्या आत असलेल्या एका विवराला साराभाई विवर असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात, ते विवर बरंच लहान असल्यामुळे या फोटोतून दिसणं शक्य नाही. सर जगदीशचंद्र बोस, प्रा. शिशिरकुमार मित्रा या अजून दोन भारतीय शास्त्रज्ञांची नावं ज्या विवरांना देण्यात आली आहेत, ती विवरं मात्र चंद्राच्या ’मागच्या’ बाजूला आहेत.
ही अजून काही विवरं.
हा चंद्र म्हणजे डोळ्यांना सहज दिसणार्या सौंदर्यातला आनंद.
तो चंद्र म्हणजे कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी, थोडं खोलात शिरून मिळवलेल्या ज्ञानातला आनंद.
हे दोन्ही चंद्र आनंददायी आहेत. अंधार्या रात्री चांदण्यांनी चमचमणारं आकाश आपल्या डोळ्यांना आनंद देतंच. पण जर आपली नक्षत्रांशी, ग्रहतार्यांशी ओळख झाली, तर तेच आकाश पाहताना आपला आनंद द्विगुणित होतो असा माझा अनुभव आहे. इंद्रधनुष्य डोळ्यांना सुंदरच दिसतं, पण ते सात रंग का दिसतात, ते थोडा प्रयत्न करून समजून घेतलं, तर ते पाहण्यातली मजा वाढते, कारण अशा वेळी कुसुमाग्रजांचे हे दोन चंद्र एकरूप झालेले असतात.
मराठी राजभाषा दिन आणि विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
उत्तम लेख , फोटोही सुंदर ...
उत्तम लेख , फोटोही सुंदर ... बरीच माहिती रोचक आहे. पराकांचन शब्द आवडला. खगोलशास्त्र माझ्याही आवडीचा विषय ! इथे अशातच खंडग्रास ग्रहण नुसत्या डोळ्यांनी दिसले. काही महिन्यांपूर्वी ब्लड मूनही पाहिला. सूर्यास्तानंतर काही तास लाल होता नंतर कमी होत गेला. फोटो चांगला आला नाही. ब्लड मून म्हणजे एकप्रकारचे खग्रास चंद्रग्रहण.
अतुल यांचा प्रतिसाद ही आवडला. महाविनाशकारी ऊर्जेमुळे >>> जी उल्कापाताने झालेल्या ज्वालामुखींंमुळे तयार झाली होती , असंच पाहिलयं टिव्हीवर.
मी हे वापरते , नक्षत्र शोधायला वरचा निळा गोल फिरवला की चटकन कळतं. कुठे पहायचयं.
भरत., राहुल, अस्मिता, धन्यवाद
भरत., राहुल, अस्मिता, धन्यवाद!
राहुल, हो, पेड व्हर्जन आहे माझ्याकडे. मी फोनवर स्क्रीनशॉट घेतला आहे तारीख-वेळ adjust करून.
अस्मिता, येस, असं एक होतं लहानपणी माझ्याकडे. नक्षत्रं आणि इतर ताऱ्यांसाठी एवढंच पुरेसं असतं खरं तर.
डॉ. जयंत नारळीकरांच्या 'आकाशाशी जडले नाते' पुस्तकात शेवटच्या पानांवर त्यांनीही असे नकाशे दिले आहेत.
उत्तम माहीतीपुर्ण लेख..
उत्तम माहीतीपुर्ण लेख.. धन्यवाद !
खूप छान लेख आहे.
खूप छान लेख आहे. प्रकाशचित्रेही सुंदर आहेत. आवडला.
खूप आवडला. मुलांना वाचून
खूप आवडला. मुलांना वाचून दाखवला. त्यांना खूप रोचक वाटला.
आसा.,सोनाली, सियोना, धन्यवाद!
आसा.,सोनाली, सियोना, धन्यवाद!
@वावे , अतिशय माहितीपूर्ण लेख
@वावे , अतिशय माहितीपूर्ण लेख . मला एक छोटा प्रश्न आहे -
चंद्राच्या कला ह्या दक्षिण गोलार्धातून जशा दिसतात त्याच्या उलट्या उत्तर गोलार्धातून दिसतात का? मी जेव्हा चंद्र कला भारतात असताना पाहायचो त्याच्या उलट त्या स्वीडन मधून दिसतात ( किंवा मला तरी तसे वाटते). हे बरोबर आहे का? आणि जर असेल तर ह्याच्यामागे काय शास्त्रीय कारण आहे ?
प्रदीप
उलट्या म्हणजे कोणत्या अर्थाने
उलट्या म्हणजे कोणत्या अर्थाने? पण भारत व स्वीडन दोन्ही उत्तर गोलार्धातच आहे. चंद्राचा थोडा वेगळा भाग वेगवेगळ्या ठिकाणांहून दिसत असेल पण एक उदाहरण म्हणून चंद्रकोर धरली तर तिचा प्रकाशित भाग हा सूर्याच्या बाजूला असतो - त्यामुळे तो सगळीकडून तसाच दिसत असावा.
अपडेटः याबद्दल शोधल्यावर या लिन्क वर काही इण्टरेस्टिंग माहिती मिळाली. दक्षिण व उत्तर गोलार्धात चंद्रकला उलट्या दिशेने दिसते हे पूर्व-पश्चिम अर्थाने बरोबर आहे. म्हणजे अमावस्येनंतरच्या प्रतिपदेला संध्याकाळी चंद्रकोर आपल्याला दिसते ती साधारण दक्षिणेकडे असल्याने उजवी बाजू प्रकाशित असलेली दिसते. दक्षिण गोलार्धातून बघताना साधारण उत्तरेकडे बघत असल्याने डावी बाजू प्रकाशित दिसेल. या रविवार-सोमवारच्या आसपास (कारण तेव्हा कोर दिसेल) संध्याकाळी बाहेर जाउन चेक केले पाहिजे
अजून एक इण्टरेस्टिंग माहिती. या साइटवर चंद्रोदय व अस्त याच्या वेळा पाहता चंद्रकोर वाढत असते तेव्हा (शुक्लपक्षात) अष्टमीच्या दिवशी चंद्र जवळजवळ १७ तास आकाशात असतो असे दिसते. हेच चंद्रकोर कमी होताना (कृष्णपक्षात) अष्टमीला जेमतेम ७-८ तास असतो.
सुंदर लेख वावे.
सुंदर लेख वावे.
शास्त्रीय माहिती एकदम रोचक शैलीत असल्याने वाचताना मजा आली. दोन चंद्र एकरुप करण्याची कल्पना तर अफलातून!
धन्यवाद!
फोटो व माहिती छान
फोटो व माहिती छान
जर आपली नक्षत्रांशी, ग्रहतार्
जर आपली नक्षत्रांशी, ग्रहतार्यांशी ओळख झाली, तर तेच आकाश पाहताना आपला आनंद द्विगुणित होतो असा माझा अनुभव आहे.>> +१
अशा वेळी कुसुमाग्रजांचे हे दोन चंद्र एकरूप झालेले असतात. >> क्या बात है !
बाकी सर्वांग सुंदर लेख आवडलाच.
राधिका, अमितव, मत, प्रदीपडी,
राधिका, अमितव, मत, प्रदीपडी, धन्यवाद!
प्रदीपडी, हो, आपण कुठल्या अक्षवृत्तावर आहोत त्यानुसार आपल्याला चंद्रकोर वेगवेगळ्या प्रमाणात 'कललेली' दिसते. त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तर गोलार्धात ती विरुद्ध दिशेने कललेली दिसते.
इथे
सविस्तर माहिती दिली आहे.
आपण जरी एकाच ठिकाणी असलो, तरी ऋतूनुसारही आपल्याला चंद्रकोर वेगवेगळ्या प्रमाणात कललेली दिसेल.
फारएण्ड,
<<(शुक्लपक्षात) अष्टमीच्या दिवशी चंद्र जवळजवळ १७ तास आकाशात असतो असे दिसते. हेच चंद्रकोर कमी होताना (कृष्णपक्षात) अष्टमीला जेमतेम ७-८ तास असतो.>>
इथेही अक्षवृत्तानुसार फरक पडेल. ग्रीनिचऐवजी एकदा स्टॉकहोम आणि एकदा बंगलोर टाकून बघितलं. बंगलोरला फार तर तेरा-सव्वातेरा तास चंद्र आकाशात आहे, पण स्टॉकहोमला एकोणीस तास.
वावे लेख अगदी चंद्राच्या फोटो
वावे लेख अगदी चंद्राच्या फोटो एवढाच सुरेख लिहिला आहे. दुसरा फोटो तर अगदी बघत बसावस वाटत.
योगायोग असा की, मी देखील पुण्याला असतानाच पाहील होत, चंद्र आणी शुक्र जवळजवळ दिसताना...खरच अगदी पणतीची प्रतीमा दिसली होती.
पाषाणला होतो आम्ही तेव्हा. आजुबाजुला फार झाडी असल्याने त्यातुन रात्रीचे ते द्रुष्य पाहणे म्हणजे निव्वळ पर्वणीच. बाबाना असे फोटो काढण्याची फार आवड होती. तेव्हाचा बाबानी काढलेला एक फोटो सुद्धा होता. पण आता शोधावा लागेल.
त्यान्नतर मात्र कधी पाहील्याचे आठवत नाही.
चंद्र आणि शुक्र ग्रह हे दोघे एकत्र आले, म्हणजे आता जगबुडी होणार वगैरे वगैरे अफवा सुद्धा पसरल्या होत्या.
आॅस्ट्रेलियात मेलबोर्नहून
आॅस्ट्रेलियात मेलबोर्नहून उलटा चंद्र पाहिला होता. पौर्णिमा होती व ससा काहीतरी वेगळा वाटला तेव्हा हे कळले.
तिथे सध्या ध्रुव तारा ही दिसत नाही. अजून काही हजार वर्षांनी परांचन गति मुळे दिसेल.
सिद्धि, मस्तच.
सिद्धि, मस्तच.
मत, बरोबर.
परांचन गतीमुळे पृथ्वीचा आस सुमारे २५००० वर्षांत एक वर्तुळ पूर्ण करतो. त्यामुळे अजून साडेबारा हजार वर्षांनी पृथ्वीचा आस त्या वर्तुळावर सध्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने रोखलेला असेल. (किंवा असंही म्हणता येईल की साडेबारा हजार वर्षांपूर्वी तो तसा होता ) त्यामुळे ध्रुवतारा किंवा Polaris हा विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे जवळपास सत्तेचाळीस (साडेतेवीस गुणिले दोन) अंश अक्षांशापर्यंत दिसत असेल. अर्थात जितकं दक्षिणेकडे जाऊ तितका तो क्षितिजाजवळ दिसेल.
सुंदर लिहीलाय लेख वावे!
सुंदर लिहीलाय लेख वावे! सोप्या भाषेत, सुटसुटीत आणी खूप माहितीपूर्ण आहे.
लेख खुपच अभ्यासपूर्ण लिहीला
लेख खुपच अभ्यासपूर्ण लिहीला आहे. आवडला लेख
वाह सोप्या भाषेतील सुंदर लेख.
वाह सोप्या भाषेतील सुंदर लेख. लहान मुलांना तसेच मोठ्यांना आवडेल असा. खूप छान.
वावे , लेख माबोच्या पहिल्या
वावे , लेख माबोच्या पहिल्या पानावर दिसतोयं, अभिनंदन.
अस्मिता, हो उगाचच मनातल्या
अस्मिता, हो उगाचच मनातल्या मनात गुदगुल्या
फेरफटका, कविन, सामो, धन्यवाद!
आज संध्याकाळी आपल्याला पिधान
आज संध्याकाळी आपल्याला पिधान पहायला मिळेल (आकाश स्वच्छ असेल तर, अर्थात)
संध्याकाळी साडेपाचनंतर मंगळ चंद्राच्या मागे जाईल. अर्थात तेव्हा सूर्यप्रकाश असल्यामुळे ते आपल्याला पाहता येणार नाही. पण साडेसातच्या सुमारास मंगळ चंद्राच्या मागून बाहेर यायला लागेल, ते मात्र आपल्याला नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल.
आयुकाच्या यूट्यूब चॅनलवरही ही खगोलीय घटना बघता येईल. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी नक्की पहा.
आयुकाची लिंक
https://youtube.com/IUCAASciPOP/live
काल संध्याकाळी चन्द्राच्या
काल संध्याकाळी चन्द्राच्या कोरिजवळ मंगळ ग्रह पहिला होता पण आज पिधान आहे हे बरे सांगितले. आज संध्याकाळी नक्की पाहिन.
वावे खूप आवडला लेख, उत्तम
वावे खूप आवडला लेख, उत्तम शास्त्रीय माहिती आणि किती सुंदर कवितांचे शब्द!
ज्येष्ठागौरी, धन्यवाद!खूप
ज्येष्ठागौरी, धन्यवाद!खूप आनंद झाला तुमचा प्रतिसाद पाहून. तुमचं चंद्रावरचं प्रेम माहिती असल्यामुळे
सियोना, दिसलं का पिधान? की ढग होते?
आज इथेही ढगाळ वातावरण होतं त्यामुळे पिधान नीट नाही दिसणार असं वाटत होतं, पण अगदी पाच मिनिटांसाठी ढग बाजूला गेले आणि चंद्रकोर आणि मंगळाचा ठिपका दिसला
वावे सुंदर फोटो
वावे सुंदर फोटो
मीही पहिला ,अगदी 7-20 पासून डोळे लावून बसलेलो, कुवतीनुसार(डोळ्यांच्या)8 ला दिसली मंगळाची टिकली
वावे, सुंदर फोटो
वावे, सुंदर फोटो
वावे, सुंदर फोटो!
वावे, सुंदर फोटो!
हो मी पाहिले चंद्र आणि मंगळ
हो मी पाहिले चंद्र आणि मंगळ पिधान. 7.30ते 8.25पर्यंत पाहिले. ढग नव्हते आज. माझ्या दोन्ही मुलांनी सुद्धा नुसत्या डोळ्यांनी पाहिले. धन्यवाद वावे . तुम्ही काढलेला फोटो सुंदर आला आहे.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
तेजो, ऋतुराज, जिज्ञासा,
तेजो, ऋतुराज, जिज्ञासा, सियोना, फारएण्ड, धन्यवाद
पिधान ही काही तशी अगदी दुर्मिळ घटना नव्हे. पण जेव्हा आपण आकाशाकडे अशी एखादी घटना बघण्यासाठी डोळे लावून बसलेलो असतो आणि नेमके ढग असतात, तेव्हा मनातल्या मनात आपण चरफडत असतो आणि समजा अगदी थोड्या वेळासाठी जरी ढगांचा पडदा सरकला, तरी अवर्णनीय उत्साह येतो भले त्यातला मुख्य क्षण आपण बघू शकलो नसलो तरी अशा वेळी फारसं दुःख वाटत नाही. २०१९ च्या डिसेंबरमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला आम्ही कोईमतूरला गेलो होतो. तेव्हाही असेच भरपूर ढग होते. पण मधे अगदी थोडा वेळ ग्रहण दिसलं तेव्हा असाच उत्साह तिथे जमलेल्या गर्दीत संचारला होता. (आता ती गर्दी आठवली की पहिल्यांदा करोना, सोशल डिस्टन्सिंग वगैरे आठवतं )
Pages