भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
द्या तुम्ही माझे कोडे
द्या तुम्ही माझे कोडे तपासायचे बाकी आहे
एक अतिशय सोपे कोडे. पहिलाच
एक अतिशय सोपे कोडे. पहिलाच प्रयत्न
एका प्रसिद्ध गाण्यातली 11 अक्षरी ओळ आहे. शब्द संख्या मुद्दाम देत नाहीये नाहीतर फारच सोपे होईल.
क्लु - अंक म्हणजे अक्षराचा क्रम
4-1 मी सांगतोय ना. की कागदावर लिहून हवे?
9-2-5 युद्ध
7-9 कधीच कापू नका
11-4-3-8 किती कहर माजवलाय
मी मज हरपून ...
मी मज हरपून बसले ग
हमी, समर, नस, गहजब
बरोब्बर.
बरोब्बर.
छान कोडे आणि छान सोडवले डॉ.
छान कोडे आणि छान सोडवले डॉ. कुमार.
छान पहिला प्रयत्न पुणेकर !
छान पहिला प्रयत्न पुणेकर !
धन्यवाद
धन्यवाद
खाली दिलेल्या परिच्छेदामध्ये
खाली दिलेल्या परिच्छेदामध्ये कंसातील शब्द पुसून त्याजागी अंक घातले आहेत. अंक म्हणजे संबंधित शब्दाची अक्षरसंख्या. हे सर्व शब्द सुसंगत होतील अशा प्रकारे लिहा.
उत्तरे ३ तासांनी लिहा. मूळ परिच्छेद उद्या लिहीन.
............................................................
संगीतावर आधारित एक हिंदी (४) नुकताच पाहिला. त्याचे दिग्दर्शक (४) आहेत. त्यातील कलाकारही अगदी (५) आहेत. चित्रपटाच्या (४) भूमिकांत दोघी बहिणी आहेत. त्यांचे वडील उत्तम (३) होते. ते दोघींनाही (८) गायन शिकवतात. मोठेपणी दोघीही (५) व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती. पण लहानपणातच मोठीला धाकटीबद्दल (३) वाटू लागते. पुढे त्यांच्या (२-४) मृत्यू होतो. आता मोठी बहीण धाकटीची (३) म्हणून भूमिका (४), पण हुशारीने तिला (६) दूर ठेवू पाहते. एकदा मोठी तिला म्हणते, “मी आपल्या वडिलांचा गायनाचा (३) चालवेन, तर तू लग्न करून त्यांचा (२) चालू ठेव”.
आता मात्र धाकटी (३) उठते. एव्हाना तिला ही (४) असह्य झालेली असते. ती मोठीला ठणकावते, “हे बघ, आपले (२) आणि (५) संबंध या गोष्टी आता पूर्ण (३) राहतील”.
पुढे दोघी चित्रपटातून (२) लागतात. तरी देखील मोठीची (४) चालूच असते. एकदा धाकटी मोठीला म्हणते, “ (५) इतके मोठे आहे की त्यात आपण दोघीही (४) जाऊ”. त्यावर मोठी म्हणते, “ते (२) मोठे आहे हे खरे, पण (३) ठेव, कुठेही (३) स्थान एकच असते! ”
हा चित्रपट पाहताना आपल्याला वास्तवातील दोन (४) बहिणींशी त्याचे (३) जाणवते. मात्र चित्रपटाच्या (५) कथा पूर्णपणे वेगळ्या (३) जाते. प्रेक्षकाला वास्तवाशी (३) जाणवावे, पण बाकी कथा (४) वेगळी लिहावी हे या चित्रपट लेखकाचे (४) म्हणावे लागेल. गायन हा चित्रपटाचा (२) असल्याने त्यात बरीच (५) गाणी (४) आहेत.
********************************************
कोडे आले आणि सुटले पण....
कोडे आले आणि सुटले पण.... मस्त कोडे punekarp. आपल्या मराठी भाषा दिवस उपक्रमामध्येही घेता येईल. गाणी कविता अभंग ओळखा.
कुकडं म्हणजे कोंबडं ....कारवी
कुकडं म्हणजे कोंबडं ....कारवी.
अच्छा, हे नव्हतं माहिती...
अच्छा, हे नव्हतं माहिती... नेटवर कुकडं सुगडं गौरीच्या पूजासाहित्यात सापडले (कोल्हापूर प्रांत). त्यात नावाजलेले काही नसणार मग तुम्हालाच विचारले.
संगीतावर आधारित एक हिंदी
संगीतावर आधारित एक हिंदी चित्रपट (४) नुकताच पाहिला. त्याचे दिग्दर्शक अनुभवी / जाणकार (४) आहेत. त्यातील कलाकारही अगदी नावाजलेले / प्रथितयश (५) आहेत. चित्रपटाच्या मध्यवर्ती (४) भूमिकांत दोघी बहिणी आहेत. त्यांचे वडील उत्तम गायक (३) होते. ते दोघींनाही लहानपणापासून / रागरागिणीसंपन्न / गुरूपरंपरागत (८) गायन शिकवतात. मोठेपणी दोघीही गाननिपुण (५) व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती. पण लहानपणातच मोठीला धाकटीबद्दल असूया (३) वाटू लागते. पुढे त्यांच्या आई-वडिलांचा (२-४) मृत्यू होतो. आता मोठी बहीण धाकटीची पालक (३) म्हणून भूमिका निभावते (४), पण हुशारीने तिला गायना/संगीतापासून (६) दूर ठेवू पाहते. एकदा मोठी तिला म्हणते, “मी आपल्या वडिलांचा गायनाचा वारसा (३) चालवेन, तर तू लग्न करून त्यांचा वंश (२) चालू ठेव”.
आता मात्र धाकटी चिडून (३) उठते. एव्हाना तिला ही घुसमट / गळचेपी (४) असह्य झालेली असते. ती मोठीला ठणकावते, “हे बघ, आपले नाते (२) आणि व्यावसायिक (५) संबंध या गोष्टी आता पूर्ण निराळ्या/वेगळ्या (३) राहतील”.
पुढे दोघी चित्रपटातून गाऊ (२) लागतात. तरी देखील मोठीची दादागिरी / मनमानी (४) चालूच असते. एकदा धाकटी मोठीला म्हणते, “ गायनक्षेत्र (५) इतके मोठे आहे की त्यात आपण दोघीही सामावून (४) जाऊ”. त्यावर मोठी म्हणते, “ते क्षेत्र (२) मोठे आहे हे खरे, पण लक्षात (३) ठेव, कुठेही पहिले / सर्वोच्च (३) स्थान एकच असते! ”
हा चित्रपट पाहताना आपल्याला वास्तवातील दोन ओळखीच्या/माहितीच्या/सहोदर (४) बहिणींशी त्याचे साधर्म्य (३) जाणवते. मात्र चित्रपटाच्या अनुषंगाने / शेवटाकडे (५) कथा पूर्णपणे वेगळ्या वाटेने (३) जाते. प्रेक्षकाला वास्तवाशी साधर्म्य (३) जाणवावे, पण बाकी कथा पूर्णपणे (४) वेगळी लिहावी हे या चित्रपट लेखकाचे योगदान / तारतम्य (४) म्हणावे लागेल. गायन हा चित्रपटाचा आत्मा/गाभा (२) असल्याने त्यात बरीच आशयगर्भ / कर्णमधुर / कथेनुरूप (५) गाणी घेतलेली / पेरलेली (४) आहेत.
कारवी
कारवी
छानच !
अजून वाट पाहतो २ तास.
संगीतावर आधारित एक हिंदी
संगीतावर आधारित एक हिंदी चित्रपट (४) नुकताच पाहिला. त्याचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध (४) आहेत. त्यातील कलाकारही अगदी प्रथितयश (५) आहेत. चित्रपटाच्या महत्त्वाच्या (४) भूमिकांत दोघी बहिणी आहेत. त्यांचे वडील उत्तम गायक (३) होते. ते दोघींनाही बालपणापासूनच (८) गायन शिकवतात. मोठेपणी दोघीही संगीततज्ञ (५) व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती. पण लहानपणातच मोठीला धाकटीबद्दल असूया (३) वाटू लागते. पुढे त्यांच्या (२-४) माता-पित्यांचा मृत्यू होतो. आता मोठी बहीण धाकटीची पालक (३) म्हणून भूमिका निभावते (४), पण हुशारीने तिला संगीतापासून (६) दूर ठेवू पाहते. एकदा मोठी तिला म्हणते, “मी आपल्या वडिलांचा गायनाचा वारसा (३) चालवेन, तर तू लग्न करून त्यांचा वंश (२) चालू ठेव”.
आता मात्र धाकटी पेटून (३) उठते. एव्हाना तिला ही कुचंबणा (४) असह्य झालेली असते. ती मोठीला ठणकावते, “हे बघ, आपले नाते (२) आणि (५) गायनातील संबंध या गोष्टी आता पूर्ण (३) वेगळ्या राहतील”.
पुढे दोघी चित्रपटातून (२) गाऊ लागतात. तरी देखील मोठीची (४) अरेरावी चालूच असते. एकदा धाकटी मोठीला म्हणते, “ (५)संगीतक्षेत्र इतके मोठे आहे की त्यात आपण दोघीही (४) सामावून जाऊ”. त्यावर मोठी म्हणते, “ते (२) क्षेत्र मोठे आहे हे खरे, पण लक्षात (३) ठेव, कुठेही (३) प्रथम/अत्युच्च स्थान एकच असते! ”
हा चित्रपट पाहताना आपल्याला वास्तवातील दोन (४)खऱ्याखुऱ्या बहिणींशी त्याचे (३) अंतर जाणवते. मात्र चित्रपटाच्या (५)भाकितापेक्षा कथा पूर्णपणे वेगळ्या (३) दिशेने जाते. प्रेक्षकाला वास्तवाशी संबंध (३) जाणवावे, पण बाकी कथा (४) सत्यापेक्षा वेगळी लिहावी हे या चित्रपट लेखकाचे (४) धाडसच म्हणावे लागेल. गायन हा चित्रपटाचा (२) भाग असल्याने त्यात बरीच संगीतबद्ध (५) गाणी (४) श्रवणीय आहेत.
आता पाहिला उतारा.
आता पाहिला उतारा.
उत्तर द्यायला दुपार होईल. थाम्बलेच पाहिजे असे नाही, मी न मूळ उतारा न वाचता उत्तर लिहीन.
अस्मिता, छान.
अस्मिता, छान.
मानव, जरूर !
हा घ्या मूळ स्वरचित :
........................
संगीतावर आधारित एक हिंदी (चित्रपट) नुकताच पाहिला. त्याचे दिग्दर्शक (ख्यातनाम) आहेत. त्यातील कलाकारही अगदी (नावाजलेले) आहेत. चित्रपटाच्या (मध्यवर्ती) भूमिकांत दोघी बहिणी आहेत. त्यांचे वडील उत्तम (गायक) होते. ते दोघींनाही (लहानपणापासून) गायन शिकवतात. मोठेपणी दोघीही (गानकोकिळा) व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती. पण लहानपणातच मोठीला धाकटीबद्दल (असूया) वाटू लागते. पुढे त्यांच्या (आई-वडिलांचा) मृत्यू होतो. आता मोठी बहीण धाकटीची (पालक) म्हणून भूमिका (निभावते), पण हुशारीने तिला (गायनापासून) दूर ठेवू पाहते. एकदा मोठी तिला म्हणते, “मी आपल्या वडिलांचा गायनाचा (वारसा) चालवेन, तर तू लग्न करून त्यांचा (वंश) चालू ठेव”.
आता मात्र धाकटी (पेटून) उठते. एव्हाना तिला ही (घुसमट) असह्य झालेली असते. ती मोठीला ठणकावते, “हे बघ, आपले (नाते) आणि (व्यावसायिक) संबंध या गोष्टी आता पूर्ण (वेगळ्या) राहतील”.
पुढे दोघी चित्रपटातून (गाऊ) लागतात. तरी देखील मोठीची (दादागिरी) चालूच असते. एकदा धाकटी मोठीला म्हणते, “संगीतविश्व इतके मोठे आहे की त्यात आपण दोघीही (सामावून) जाऊ”. त्यावर मोठी म्हणते, “ते (विश्व) मोठे आहे हे खरे, पण (लक्षात) ठेव, कुठेही (सर्वोच्च) स्थान एकच असते !”
हा चित्रपट पाहताना आपल्याला त्याचे वास्तवातील दोन (सुप्रसिद्ध) बहिणींशी (साधर्म्य) जाणवते. मात्र चित्रपटाच्या (उत्तरार्धात) कथा पूर्णपणे वेगळ्या (दिशेने) जाते. प्रेक्षकाला वास्तवाशी (साधर्म्य) जाणवावे, पण बाकी कथा (बऱ्यापैकी) वेगळी लिहावी हे या चित्रपट लेखकाचे (कौशल्यच) म्हणावे लागेल. गायन हा चित्रपटाचा (आत्मा) असल्याने त्यात बरीच (लांबलचक) गाणी (समाविष्ट) आहेत.
........................................................
मजा आली. उत्तरांतील खालील
मजा आली. उत्तरांतील खालील शब्द वेगळे आणि तरीही सुसंगत होते.
गुरूपरंपरागत, गळचेपी, मनमानी, सहोदर, कर्णमधुर, कुचंबणा , अरेरावी, श्रवणीय
…
चित्रपट ओळखता येईल का ?
साज?
साज?
साज बरोबर.
साज बरोबर.
दिग्द. : सई परांजपे
संगीतावर आधारित एक हिंदी
संगीतावर आधारित एक हिंदी चित्रपट(४) नुकताच पाहिला. त्याचे दिग्दर्शक नामवंत(४) आहेत. त्यातील कलाकारही अगदी सुपरिचीत(५) आहेत. चित्रपटाच्या नायिकांच्या(४) भूमिकांत दोघी बहिणी आहेत. त्यांचे वडील उत्तम गायक(३) होते. ते दोघींनाही लहानपणापासून(८) गायन शिकवतात. मोठेपणी दोघीही गानकोकिळा(५) व्हाव्यात ही त्यांची इच्छा होती. पण लहानपणातच मोठीला धाकटीबद्दल चुरस(३) वाटू लागते. पुढे त्यांच्या आई-वडिलांचा(२-४) मृत्यू होतो. आता मोठी बहीण धाकटीची कैवारी(३) म्हणून भूमिका निभावते(४), पण हुशारीने तिला गायनापासून(६) दूर ठेवू पाहते. एकदा मोठी तिला म्हणते, “मी आपल्या वडिलांचा गायनाचा वारसा(३) चालवेन, तर तू लग्न करून त्यांचा वंश(२) चालू ठेव”.
आता मात्र धाकटी चीडुन(३) उठते. एव्हाना तिला ही घुसमट(४) असह्य झालेली असते. ती मोठीला ठणकावते, “हे बघ, आपले क्षेत्र(२) आणि नात्यामधील(५) संबंध या गोष्टी आता पूर्ण वेगळ्या(३) राहतील”.
पुढे दोघी चित्रपटातून गाऊ(२) लागतात. तरी देखील मोठीची ताईगीरी(४) चालूच असते. एकदा धाकटी मोठीला म्हणते, “ गायनक्षेत्र(५) इतके मोठे आहे की त्यात आपण दोघीही सामावून(४) जाऊ”. त्यावर मोठी म्हणते, “ते तसे(२) मोठे आहे हे खरे, पण लक्षात(३) ठेव, कुठेही प्रथम(३) स्थान एकच असते! ”
हा चित्रपट पाहताना आपल्याला वास्तवातील दोन परिचीत(४) बहिणींशी त्याचे साधर्म्य(३) जाणवते. मात्र चित्रपटाच्या उत्तरार्धात(५) कथा पूर्णपणे वेगळ्या मार्गाने(३) जाते. प्रेक्षकाला वास्तवाशी साधर्म्य(३) जाणवावे, पण बाकी कथा पूर्णपणे(४) वेगळी लिहावी हे या चित्रपट लेखकाचे कौशल्यच(४) म्हणावे लागेल. गायन हा चित्रपटाचा गाभा(२) असल्याने त्यात बरीच सुश्रवणीय(५) गाणी घेतलेली(४) आहेत.
वा, छानच !
वा, छानच !
पुढचे बहुतेक कारवी देतील.
पुढचे बहुतेक कारवी देतील.
प्रतीक्षेत...
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी.
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
१ आपलानाही तो वृक्ष पण हाल त्रास मात्र आहेत --- परवड२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी)
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी गोरीगुलाबी मुलगी
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
९ टोकेरी शस्त्र पकडून पकडून ठणका लागेल हाताला
१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?
१ आपला नाही तो >>पर वृक्ष >
१ आपला नाही तो >>पर वृक्ष >> वड पण हाल त्रास मात्र आहेत >> परवड
परवड बरोबर
परवड बरोबर
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग >>
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग >> भुईमूग
गिळून बसलेला >>>( मूग ) भाल-चंद्र (ई..)
भुईमूग नाही
भुईमूग नाही. ई टोपी आणेल ना सोबत, भालचंद्र कसा आणेल?
६ नजर भिरभिरू देऊ नका मग
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात (कटक) लपलेला चोरही दिसतो >>> एकटक
८ मुगदळ /डाळ ?
८ मुगदळ /डाळ ?
एकटक नाही;
एकटक नाही; यात कटक पाचोळा झाला, चोर कुठेय?
नजर भिरभिरू देऊ नका; सतत स्थिर ठेवा चोरावर... तो कुठेही अगदी पाचोळ्यात गेला तरी
८ मुगदळ /डाळ ? नाही
मूग नाही गिळायचेत शब्दशः; आणि भाल-चंद्रही हवाय आपल्याला
पण हो गिळू शकता एक पर्याय म्हणून. पण बाकी पर्यायही खुले आहेत गिळायला.
** तासाभराने येते
Pages