
मी लहानपणा पासून जेवायला वाढलं ते मुकाट्यानं खाणारा. पण गोड कमी खाणारा.
सगळ्या भाज्या आवडो न आवडो खायचो. भेंंडी, बटाटे, वांगी, फुलकोबी, कारली, कार्टुलं, फणस, चवळी, वाटाणे, वाल, गवार, लाल भोपळा, सर्व पालेभाज्या या आवडत्या भाज्या.
तोंडली, ढब्बू मिर्ची, दोडके, कद्दु (दूधी), पडवळ, वगैरे चालून जाणार्या भाज्या.
तर पानकोबी ही नावडती भाजी.
पण घरी सगळ्यांना आवडणारी/चालणारी भाजी त्यामुळे नेहमी केली जायची. आणि सगळ्या भाज्या खाव्यात असे आई बाबा सांगत, स्वतःही खात ते मलाही पटे. पण कितीही प्रयत्न केला तरी पानकोबीची भाजी खाणे माझ्या प्रंचंड जीवावर यायचे. मग ती डाळ घालुन केलेली असो, पीठ लावून की बटाटे घालून की कच्ची. पानकोबी आणि माझं सूत कधीच जमलं नाही. पण केली, पानात वाढली की मुकाट्याने खायचो. कधी ती भाजी खाण्याच्या बदल्यात सोबत गूळ तूप मिळण्याचे आई सोबत डील व्हायचे. त्यामुळे पान कोबीची भाजी वरुन मस्त लिंबु पिळुनही आवडत नाही हे बघून "गाढवाला गुळाची चव काय?" असे घरी कोणी म्हणण्याची सोय नव्हती, म्हटले की मी लगेच गूळ तूप मागायचो.
लहानपणापासून मला आपलं आपण वाढुन घेउन जेवायला आवडतं. पण काहीजणांना वाढायची हौस असते. आई, काकू, मावशी, आत्या आपल्या, मित्रांच्या, शेजारांच्या यांना वाढायला आवडतं किंवा प्रथा म्हणुन तरी कोणी आलं गेलं तर वाढतात. आपण वाढलेल्या पानातील न आवडणारे पदार्थ आधी संपवून मग आवडीच्या पदार्थांवर ताव मारावा असा विचार करतो. पण वाढणार्यांना वाटतं याने / हिने हा पदार्थ आधी संपवला म्हणजे आवडलेला दिसतोय. आपण मात्र संपवला ब्वा तो एकदाचा असे म्हणत आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला सुरवात करतो तेवढ्यात वाढणारे आपण बेसावध असताना भसकन मोठ्या पळीभर तो संपवलेला नावडता पदार्थ आपल्या पानात वाढतात.
या प्रकाराने मला खूप छळले आहे. नावडती पानकोबी आधी संपवून आवडत्या भरली वांगी / पालक पनीर वगैरेंवर ताव मारायला सुरवात देखील करत नाही तोच भसकन परत पानकोबी पानात. काय विरस होतो म्हणुन सांगू! त्यामुळे मोठेपणी आपल्या वाट्याला कधी वाढण्याचे काम आले तर लोक जो पदार्थ आधी संपवतात तो आपण होउन वाढण्याचा आगाउपणा अजिबात करायचा नाही हे माझ्या मनात बालपणापासूनच रुजले. पुढे तर मी वाढणे या प्रथेच्या विरोधात गेलो, अजूनही आहे. तसेच पानकोबी न आवडणार्या मुलीशीच लग्न करायचे हे सुद्धा मी लहानपणीच ठरवले होते.
इंजिनिअरींगला होस्टेलला राहीलो तिथे ही पानकोबीने माझा पिच्छा सोडला नाही, मेस मध्ये पानकोबी असायचीच.
पण नंतर मुंबईला नोकरी लागली आणि मुंबईला मेस नावाचे प्रकार कमी, हॉटेल मध्ये जाउन ऑर्डर करुन खायचे. हॉटेलच्या मेन्यु मध्ये गोबी म्हणजे फुलकोबी असायची पानकोबी नसायचीच कुठे! मला खूप आनंद झाला. पुढे पुणे मग हैद्राबादला फिरतीची नोकरी महिन्यातून पंधरा वीस दिवस टूर त्यामुळे मेस कधी लावली नाही. पानकोबी हॉटेलमध्ये कधी नावालाही दिसली नाही की मी घरी स्वयंपाक केला तर मी पानकोबी कधी आणणेही शक्यच नव्हते. अशा रितीने अनेक वर्षे मजेत गेली आणि मला पानकोबीचा पूर्णपणे विसर पडला.
इतका की लग्नासाठी मुलींना भेटायला लागलो तेव्हा बाकी गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन घेताना मला कधी पानकोबीची आठवणही आली नाही. आणि साखरपुड्याच्या दुसर्याच दिवशी सकाळी भावी बायकोच्या घरी गेलो तर नाश्त्याला पानकोबीचे पराठे! कितीतरी वर्षांनी पानकोबी माझ्या जिभेवर आली होती. माझ्या सासुरवाडीचे सगळे पानकोबी बर्यापैकी आवडणारे निघाले. पण मी आता पानकोबी न खाणार्या मुलीशीच लग्न करण्याचा बालहट्ट सोडला आणि भाजी आणण्याचे काम आपणच करायचे, पानकोबी आणायचीच नाही असा तत्क्षणी निर्धार करुन पानकोबी मुकाट्याने घशाखाली उतरवली. लग्नानंतर एकमेकांच्या आवडी-नावडी दीड दोन वर्षे काटेकोरपणे जपल्या गेल्या आणि पुढे हळुहळु पानकोबीने आमच्या सुखी संसारात प्रवेश मिळवलाच, तो आजतागायत आहेच. मागची दोन आठवडे मी पानकोबी आणणे टाळले, आज भाजी आणायची आहे आणि पानकोबी नक्की आणाण्याचे बायकोने फर्मान सोडले आहे.
असो, तर मला खात्री आहे की माझ्या सारखे पानकोबी न आवडणारे भरपूर नसले तरी निदान काही लोक असतीलच, अशा लोकांचा हा क्लब. आपल्या पानकोबीच्या कथा / व्यथा / टाळण्याच्या युक्त्या येथे मांडाव्यात.
तळटीपः
१. I hate getting up early वगैरेंमध्ये जसा hate चा अर्थ आहे तसाच इथे घ्यावा. लेखक कुणाचाही द्वेष करत नाही, द्वेष करण्याला प्रोत्साहन देत नाही, पृथ्वीवरील सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावी या विचाराचा आहे.
२. पानकोबी लव्हर्सचे सुद्धा इथे स्वागत असेल, त्यांना या धाग्याचे निमित्ताने लिहावेसे वाटले तर नि:संकोच लिहावे.
लेख ताजातवाना आहे. रिफ्रेशिंग
लेख ताजातवाना आहे. रिफ्रेशिंग म्हणायचं होतं.
ताजा ताजा व छोटा पानकोबीचा गड्डा मिळाला तर (ओरगेनिक) आणून भिजवलेली हरभरा डाळ व भरपूर तिखट घालून भाजी करायची व पहिल्या वाफेची असतानाच लिंबू पिळून गरमागरम खरपूस पोळ्यांसोबत खायची तर राग कमी येईल , कदाचित आवडायला लागेल. सध्या कोबी (दोन्ही) व शिमला मिर्ची वारंवार खाल्ली गेली आहे , म्हणून मलाही कंटाळा आलायं. पचडीची पाककृती मीही दिली होती इथे.
त.टी.

मोठा गड्डा तेवढ्याच पैशात मिळतोयं म्हणून आणू नये मला राग येतो
कोबीच्या भाजीत डाळी ऐवजी
कोबीच्या भाजीत डाळी ऐवजी किंवा त्यासोबत 1 सिमला मिरची घातली तर फ्लेवर छान येतो.
ओणम ला साद्या मध्ये करतात तशी
ओणम ला साद्या मध्ये करतात तशी म्हणजे भरपूर ओलं खोबरं, सुक्या मिर्ची घालून केलेली भाजी(थोरन ) पाहून ती करून बघायची फार इच्छा आहे.
कोबी ताजा हवा. जुनं असेल तर प्रचंड वास येतो.
कोबी फार आवडतो असेही नाही आणि आवडत नाही असेही नाही.
मी करते बऱ्याचदा.
लेख मस्त आहे.
लेख मस्त आहे.
कांदा-लसूण न चालणार्या लोकांसाठी पोह्यांत कांद्याऐवजी कोबी घातलेली बघितली आहे.पण कोबी पण तेवढीच उग्र असते.
मी पण कोबी फ्लॉवर म्हणणार्या गटातली आहे.
पचडी आवडते लिंबू आणि कूट असेल
पचडी आवडते लिंबू आणि कूट असेल तर. कोल्हापुरी तिखट , हरभरा डाळ आणि कूट असलेली कोबी भाजी खाल्ली जाते. कोबी भजी आवडते.
लेख आवडला. फार आवडत नाही पण
लेख आवडला. फार आवडत नाही पण आठवड्यातून एकदा असतोच मग कधी डाळ घालून, कधी थालीपिठ लावून चालवला जातो. मनचुरी मात्र फाSर आवडते.
मोठा गड्डा तेवढ्याच पैशात मिळतोयं म्हणून आणू नये मला राग येतो Lol>> मला पण
खरं मनचुरी करायची असेल तर मीच मोठा बघून घेते .(डोक्यावर हात मारणारी बाहुली)
मला कोबीची भाजी (बारीक चिरून,
मला कोबीची भाजी (बारीक चिरून, बटाटा किंवा चणाडाळ घालून केलेली किंवा लांब पातळ चिरून कच्चट परतून केलेली, कशीही), पचडी, कोबी लांब किसून मिश्र पिठांचं केलेलं थालीपीठ वगैरे वगैरे सगळं आवडतं. (वर कलाकंद, रबडी वाचून मात्र
झालं )
कोबी, फ्लॉवर सोनखतावर वाढवतात
कोबी, फ्लॉवर सोनखतावर वाढवतात म्हणे!
कोबी अतिपरिचयात अवज्ञा झालेली
लेख आवडला.
कोबी अतिपरिचयात अवज्ञा झालेली भाजी आहे. कोबी जगभरात खाल्ली जाते. कोरियनांची किमची, चीन्यांचा कॅबेज पॅनकेक, ते नव-व्हिगनांचा कॅबेज स्टेक अशा अनेक रूपात कोबी जगात दर्शन देतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाति.... कोबी ही पहिल्या महायुद्धात जर्मनांची आवडती(?) भाजी होती. क्राऊट उर्फ कोबी हे जर्मन सैनिकांना पडलेले शेलके (colloquial?) नाव होते. महायुद्धात अन्नाचा तुटवडा होताना कोबी ३-६ महिन्यात उत्पादन करता येते व तो लोणचे (सावरक्राऊट) रूपात साठवताही येतो. घरी कोबी २-३ आठवडे फ्रिजमध्ये टिकू शकतो. इतर पोस्टीत लिहीलेल्या झकास भाज्यां बरोबरच कोबीचे कोफ्ते ही झकास होतात.
इति कोबीपुराण समाप्त!
मस्त लेख व चर्चा.
मस्त लेख व चर्चा.

'कच्छी भाभी कोबी कच्ची' >> हे भयंकर होतं
मलापण कोबीमहाशय कसेही आवडतात मात्र परतलेली भाजी ताजीच्च बनवल्याबनवल्याच्च खायला हवी तरच मस्त लागते. शिळी, थंड झाल्यावर गरम करुन खायला गेले तर त्याची चव पुर्ण निघून गेलेली असते. पाणचट व कमी मीठ पडलेली तर ताजी पण चांगली लागत नाही.
कोबीची भाजी ही फक्त माझ्या
कोबीची भाजी ही फक्त माझ्या आईच्या पद्धतीची, हिंग-मोहरी-हिरवी मिरचीची फोडणी त्यावर एकसारखा बारीक चिरलेला कोबी अजिबात पाणी न घालता ४-५ मिनीटे नुसत्या वाफेवर कोमेजेल इतपतच जेमतेम शिजवलेला. वरुन मीठ आणि बेताची हळद घालून थोडेसे परतायचे की बस्स!,
>>>मी अगदी अशीच करते कोबीची भाजी..
मस्त लागते चवीला..
लेख मस्तच लिहिलाय..
छान लेख !
छान लेख !
कोबीला पानकोबी म्हणतात हे मला आज समजले.
म्हणजे ते लहानपणी पाणघोडा म्हणजे पाण्यात राहणारा घोडा वाटायचे तसे पानकोबी देखील एखादी समुद्री वनस्पती वाटली
जोक्स द अपार्ट,
@ कोबी
चिकन स्टार्टर सोबत कांदा आणि कच्चा कोबी हिरव्या चटणीसंग खायला आवडते.
चायनीज नूडल्समध्ये बरा वाटतो.
पण राईसमध्ये अत्याचार वाटतो.
शाकाहारी चायनीजमध्ये तर कोबीची कचकच नकोशी वाटते. म्हणून मी वेज चायनीज खातच नाही.
कोबीची भाजी तशी आवडते. फक्त कच्ची करावी. शिजली की गिळवत नाही.
पण कोबीच्या वड्या ! यम यम.. त्या मात्र फार आवडतात. मस्त तळाव्यात खमंग लागतात. चपातीत गुंडाळून सॉस चटणी टाकून रोल कराव्यात. किंवा ब्रेडमध्ये कांदा टमाटर काकडी सोबत भरून सॅंडवीच करावे. लादीपावात वडापावसारखे भरूनही चहाचा एकेक घोट घेत खायला मजा येते.
मागच्या आठवड्यात कोबीची बरीच भाजी शिल्लक राहिली. दुपारी तीच खाल्ली होती. रात्री सुद्धा तीच गिळवेना...
मग मस्त अंड्याची फोडणी दिली तिला. सोबत डाळीचा तडका. आणि मग जे काय तयार झाले ते ईतके भारी लागले की स्लर्प स्लर्प करत खाल्ले
कौतुकाने फोटो देखील काढले.
पेश है कोबी भुर्जी ..
.
.
अरे वा... मस्तच दिसतंय.
अरे वा... मस्तच दिसतंय. पोळ्या पण फार छान आहेत.
धन्यवाद सुनिधी, आणि हो,
धन्यवाद सुनिधी, आणि हो, आमच्याकडे बायकोच्या पोळ्या फार छान असतात. आईपेक्षाही चांगल्या
लेख चांगला लिहिलाय.
लेख चांगला लिहिलाय.
कोबी माझ्याही नावडत्या कॅटेगरीतला होता.
पण कोबी वापरून केलेले हे दोन प्रकार आवडतात.
१ कोबीचा झुणका
२ कोबीचे डोसे
ब्लॉगर माझी एक्स- कलीग आहे तिच्या कोबीच्या पाककृतीच चार पाने भरून आहेत. मी बाकी कोणत्याही करून पाहिलेल्या नाहीत. वरच्या दोन करतो.
कोबीच्या वड्या पण आवडतात. त्यात तांदुळ पिठी आणि लवं गेची पूड असते आणि बेक करायच्या असतात एवढं आठवतंय
कालनिर्णयमध्ये कोबीचा कलाकंद . रबडी असले प्रकार पाहून कोण हे करत असेल असा प्रश्न पडत असे. हीरा यांच्या प्रतिसादावरून कळलं की आहेत असेही लोक.
आम्ही कोबीचे कचुम्बर बनवतो..
आम्ही कोबीचे कचुम्बर बनवतो.. मला आवडते...
कोबीची कुरकुरीत भजी खाल्ली
कोबीची कुरकुरीत भजी खाल्ली नाही वाटत कधी. कोबी बारीक चिरुन त्यात बारीक चिरलेली हि. मिर्ची किंवा लाल तिखट, कोथिंबीर, मीठ इतकेच बास. पाणी + मीठ घालुन फेटलेल्या बेसन पीठात हे सर्व मिक्स करा आणी तळा. डिश मध्ये घेऊन चरा. परत मागु नका संपले तर.
मला कोबी आवडतेच असं नाही पण
मला कोबी आवडतेच असं नाही पण नाही आवडत असं ही नाही.
आई खिसून मुळ्याची करतात तशी भाजी करते ती आवडते
भजी, भानोले आवडतात
डाळ घालून आवडते.
कोबी राईस नाही आवडत.
Stuffed पराठा नाही आवडत.
मी कोबी किसून त्यात मसाले मीठ टाकून कणिक मळून लाटते ते पराठे आवडतात.
उद्या कोबीची भाजी करणार आहे.
स्प्रिंगरोल,भारतीय चिंग किंवा
स्प्रिंगरोल,भारतीय चिंग किंवा बिना चिंग चायनीज मध्ये कोबी नूडल्स मध्ये, फ्राईड राईस मध्ये कोबी छान लागते.
कोबीची भारतीय पद्धतीची मिरची आणि नुसती फोडणी वर परतून केलेली भाजी आधी आवडायची नाही.पण आता आवडते.
कोबीचा कलाकंद वाईट नाही लागत.
कोबीचा कलाकंद वाईट नाही लागत. मात्र कोबी कोवळा आणि गच्च भरलेला पाहिजे. वरची एक दोन पाने टाकून देऊन टोकाकडचा भाग सुई इतका बारीक दीड एक इंच लांबीचा असा सुंदर चिरून (बाकीच्या कोबीचे जे हवे ते करावे)तुपावर परतून घ्यावा आणि त्यात दूध ओतून प्रकरण शिजत आणि आटवत ठेवावे. पुरेसे आटले की हव्या त्या प्रमाणात साखर घालून ढवळावे आणि वेलची केशर काजू बदाम काप इत्यादी चवीच्या लाडाचे सामान घालावे. पुन्हा थोडा वेळ मंद उकळावे. तोपर्यंत कोबीच्या सुयांभोवती माव्याचे/ रबडीचे लच्छे तयार होऊ लागलेले असतात. मग कलाकंद हवा की रबडी ,की नुसती खीर, ह्यानुसार अधिक आटवावे अथवा आटवू नये.
बरा लागतो/लागते.
कोबी, फ्लॉवर, नवलकोल अशा उग्र
प्र का टा.
कोबी, फ्लॉवर, नवलकोल अशा उग्र
कोबी, फ्लॉवर, नवलकोल अशा उग्र वासाच्या भाज्यांना फोडणीत मोहरी मिरची हिंगाबरोबर थोडी कढीलिंबाची पाने टाकली तर उग्र वास अगदी येत नाही. सुसह्य वास येतो. भाजी अंगच्या पाण्यावरच शिजवली गेली पाहिजे. परतून परतून किंचित कच्ची ठेवून उतरावी. वरून थोडी कोथिंबीर बारीक चिरून. बस्स.
कोबी अगदी आवडत्या कॅटेगरीत
कोबी अगदी आवडत्या कॅटेगरीत नसला तरी नावडता नाहीये.
फक्त मला डब्यात कोबीची भाजी नको वाटते. आता आमच्या ऑफिसमध्ये मावे असल्याने अन्न गरम करून खाता येतं म्हणून खाउ शकते को ची भा.
पण कोबीची भाजी गरम गरम ताजी, म्हणजे केली आणि लगेच खाल्ली तर अफलातून लागते असा मला शोध लागला.
बाकी कोबीची पचडी किंवा पराठे असेही आवडतात.
ते कोबीचा कलाकंद मात्र इमॅजिन करवत नाहीये. ( मी नाही खाणार कधी. )
माझ्या लेकाला कोबीची भाजी म्हंटलं कि तो डिक्लेअर करतो "आई आज माझा उपास आहे "
मानव, लेख झकास आहे हे सांगायला विसरलेच. आणि कोबीचा फोटो पण एकदम किलर आलाय.
लेख मस्त.
लेख मस्त.
कोबी प्रचंड आवडणारं कुणी असेल अशी शंकाच आहे.
मला कोबी चालते. आवडती नावडती काहीच नाही.
पण आता इथे कोबी कोबी कोबी वाचुन डोक्याची कोबी झाली.:-)
धनुडी , लेकाला फ्रॅंकी करून
धनुडी , लेकाला फ्रॅंकी करून देत जा मग भाजी ची. माझी बहिण भाजी पोळी खायला नाक मुरडते पण तेच फ्रॅंकी बनवली की 2 खाते
कोबीची चणाडाळ, मोहरी, हिंग,
कोबीची चणाडाळ, मोहरी, हिंग, हळद, मिरच्या आणि कढिपत्ता फोडणीत घातलेली,गूळ, मीठ आणि कोथिंबीर असे माफक जिन्नस घालून वाफेवर शिजवलेली कोबीची भाजी खूप आवडते. कोबीची पचडी, कोबीच्या वड्या वगैरे आवडतात. तसंच कांदे पोहे करताना पाव वाटी बारीक चिरलेला कोबी किंवा उपम्यातही थोडा कोबी घातलाच जातो म्हणजे कोबी आवडतोच असं म्हणायला हरकत नाही.
सायो, हो, उपम्या पोह्यातही
सायो, हो, उपम्या पोह्यातही घालता म्हणजे नक्कीच तुमचा आवडता पदार्थ आहे.
मी भाजी, पराठे चालवून घेतो कोबीचे, पण पोह्यात उपम्यात घातला तर मात्र नाही चालणार.
नाहीतर उकडून चरचरीत तिखटाची
नाहीतर उकडून चरचरीत तिखटाची फोडणी दिलेली काकडी चपातीसोबत खावी लागली असती .
<<
कुण्या गुज्जूशी पाला पडलेला दिसत नाहिये अजून.
उकडून गुजराती फोडणी (नावाला तिखट, अन गोडाची चव) दिलेली काकडीची भाजी, तीही चहाच्या चमच्याने ताटात वाढलेली, असं जेवायचा एकदा योग आला होता.
कांद्याऐवजी पानकोबी हा
कांद्याऐवजी पानकोबी हा हॉटेलवाल्यांचा नेहेमीचा शिरस्ता आहे.
खेकडा भजी जास्त क्रिस्पी व्हावीत अन रहावीत असं वाटत असेल तर कांद्यासोबत बारीक चिरून कोबी घालावी.
चायनीज बनवायला पानकोबी लागतेच, तसेच कोबीच्या पानांशिवाय सिझलर बनवणे अशक्य आहे.
कोबीची पाने wrap वापरून मोमोज देखिल करतात.
मानव, इथल्या सर्वणा भवनमध्ये
मानव, इथल्या सर्वणा भवनमध्ये खिचडी असं नाव असलेला उपमा मिळतो. त्यात बर्याच भाज्या असतात. तेव्हापासून उपम्यात कोबी घालणं चालू केलं आहे. आणि पोहे मस्त मऊ होतात कोबी घातला कांदा बटाट्याच्या जोडीला असं मला वाटतं.
Pages