पानकोबी हेटर्स क्लब

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 December, 2020 - 05:45

मी लहानपणा पासून जेवायला वाढलं ते मुकाट्यानं खाणारा. पण गोड कमी खाणारा.
सगळ्या भाज्या आवडो न आवडो खायचो. भेंंडी, बटाटे, वांगी, फुलकोबी, कारली, कार्टुलं, फणस, चवळी, वाटाणे, वाल, गवार, लाल भोपळा, सर्व पालेभाज्या या आवडत्या भाज्या.
तोंडली, ढब्बू मिर्ची, दोडके, कद्दु (दूधी), पडवळ, वगैरे चालून जाणार्‍या भाज्या.
तर पानकोबी ही नावडती भाजी.
पण घरी सगळ्यांना आवडणारी/चालणारी भाजी त्यामुळे नेहमी केली जायची. आणि सगळ्या भाज्या खाव्यात असे आई बाबा सांगत, स्वतःही खात ते मलाही पटे. पण कितीही प्रयत्न केला तरी पानकोबीची भाजी खाणे माझ्या प्रंचंड जीवावर यायचे. मग ती डाळ घालुन केलेली असो, पीठ लावून की बटाटे घालून की कच्ची. पानकोबी आणि माझं सूत कधीच जमलं नाही. पण केली, पानात वाढली की मुकाट्याने खायचो. कधी ती भाजी खाण्याच्या बदल्यात सोबत गूळ तूप मिळण्याचे आई सोबत डील व्हायचे. त्यामुळे पान कोबीची भाजी वरुन मस्त लिंबु पिळुनही आवडत नाही हे बघून "गाढवाला गुळाची चव काय?" असे घरी कोणी म्हणण्याची सोय नव्हती, म्हटले की मी लगेच गूळ तूप मागायचो.

लहानपणापासून मला आपलं आपण वाढुन घेउन जेवायला आवडतं. पण काहीजणांना वाढायची हौस असते. आई, काकू, मावशी, आत्या आपल्या, मित्रांच्या, शेजारांच्या यांना वाढायला आवडतं किंवा प्रथा म्हणुन तरी कोणी आलं गेलं तर वाढतात. आपण वाढलेल्या पानातील न आवडणारे पदार्थ आधी संपवून मग आवडीच्या पदार्थांवर ताव मारावा असा विचार करतो. पण वाढणार्‍यांना वाटतं याने / हिने हा पदार्थ आधी संपवला म्हणजे आवडलेला दिसतोय. आपण मात्र संपवला ब्वा तो एकदाचा असे म्हणत आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला सुरवात करतो तेवढ्यात वाढणारे आपण बेसावध असताना भसकन मोठ्या पळीभर तो संपवलेला नावडता पदार्थ आपल्या पानात वाढतात.
या प्रकाराने मला खूप छळले आहे. नावडती पानकोबी आधी संपवून आवडत्या भरली वांगी / पालक पनीर वगैरेंवर ताव मारायला सुरवात देखील करत नाही तोच भसकन परत पानकोबी पानात. काय विरस होतो म्हणुन सांगू! त्यामुळे मोठेपणी आपल्या वाट्याला कधी वाढण्याचे काम आले तर लोक जो पदार्थ आधी संपवतात तो आपण होउन वाढण्याचा आगाउपणा अजिबात करायचा नाही हे माझ्या मनात बालपणापासूनच रुजले. पुढे तर मी वाढणे या प्रथेच्या विरोधात गेलो, अजूनही आहे. तसेच पानकोबी न आवडणार्‍या मुलीशीच लग्न करायचे हे सुद्धा मी लहानपणीच ठरवले होते.

इंजिनिअरींगला होस्टेलला राहीलो तिथे ही पानकोबीने माझा पिच्छा सोडला नाही, मेस मध्ये पानकोबी असायचीच.

पण नंतर मुंबईला नोकरी लागली आणि मुंबईला मेस नावाचे प्रकार कमी, हॉटेल मध्ये जाउन ऑर्डर करुन खायचे. हॉटेलच्या मेन्यु मध्ये गोबी म्हणजे फुलकोबी असायची पानकोबी नसायचीच कुठे! मला खूप आनंद झाला. पुढे पुणे मग हैद्राबादला फिरतीची नोकरी महिन्यातून पंधरा वीस दिवस टूर त्यामुळे मेस कधी लावली नाही. पानकोबी हॉटेलमध्ये कधी नावालाही दिसली नाही की मी घरी स्वयंपाक केला तर मी पानकोबी कधी आणणेही शक्यच नव्हते. अशा रितीने अनेक वर्षे मजेत गेली आणि मला पानकोबीचा पूर्णपणे विसर पडला.

इतका की लग्नासाठी मुलींना भेटायला लागलो तेव्हा बाकी गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन घेताना मला कधी पानकोबीची आठवणही आली नाही. आणि साखरपुड्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी भावी बायकोच्या घरी गेलो तर नाश्त्याला पानकोबीचे पराठे! कितीतरी वर्षांनी पानकोबी माझ्या जिभेवर आली होती. माझ्या सासुरवाडीचे सगळे पानकोबी बर्‍यापैकी आवडणारे निघाले. पण मी आता पानकोबी न खाणार्‍या मुलीशीच लग्न करण्याचा बालहट्ट सोडला आणि भाजी आणण्याचे काम आपणच करायचे, पानकोबी आणायचीच नाही असा तत्क्षणी निर्धार करुन पानकोबी मुकाट्याने घशाखाली उतरवली. लग्नानंतर एकमेकांच्या आवडी-नावडी दीड दोन वर्षे काटेकोरपणे जपल्या गेल्या आणि पुढे हळुहळु पानकोबीने आमच्या सुखी संसारात प्रवेश मिळवलाच, तो आजतागायत आहेच. मागची दोन आठवडे मी पानकोबी आणणे टाळले, आज भाजी आणायची आहे आणि पानकोबी नक्की आणाण्याचे बायकोने फर्मान सोडले आहे.

असो, तर मला खात्री आहे की माझ्या सारखे पानकोबी न आवडणारे भरपूर नसले तरी निदान काही लोक असतीलच, अशा लोकांचा हा क्लब. आपल्या पानकोबीच्या कथा / व्यथा / टाळण्याच्या युक्त्या येथे मांडाव्यात.

तळटीपः
१. I hate getting up early वगैरेंमध्ये जसा hate चा अर्थ आहे तसाच इथे घ्यावा. लेखक कुणाचाही द्वेष करत नाही, द्वेष करण्याला प्रोत्साहन देत नाही, पृथ्वीवरील सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावी या विचाराचा आहे.
२. पानकोबी लव्हर्सचे सुद्धा इथे स्वागत असेल, त्यांना या धाग्याचे निमित्ताने लिहावेसे वाटले तर नि:संकोच लिहावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोबीची भाजी खूपच आवडते. पण ती सुद्धा हिंग, हळद, मोहरी, हि. मिरच्या आणि चणाडाळ, कढिपत्ता फोडणीत घालून आणि मग गूळ आणि कोथिंबीर. बाकी काही मसाला आवडत नाही.>> हो. सायोसारखीच कोबीची भाजी आवडते.. स्वाती_आंबोळे, अगदी अगदी. न आवडण्यासारखं मला तरी काही वाटत नाही (शिजवताना येणारा उग्र वास जाणवतही नाही प्रेमापोटी - अर्थात् कोबीवरील).खरंच ही गरीब भाजी आहे. चिरायला, करायला, खायला सोपी. व्यंजनही कोणतंही चालून जातं. मला तर रोजसुद्पधा खायला आवडेल.
पण काहींना आवडत नाही म्हणून ते साहजिकच निंदाव्यंजक उल्लेख करतात. उदाहरणार्थ माझ्या सासूबाई ही भाजी केली की 'कोबडा' केलाय, असं म्हणत असत. वारंवार हे ऐकून शेवटी संयम न राहून, एकदा मी त्यांना असं न म्हणण्याची नम्रपणे विनंती केली होती.
Uhoh Uhoh
बाकी, 'नफरत' प्यारमें बदलून जाईल असा हा धागा बनलाय आता. Lol

कोबडा Lol
गवारला बावची म्हणायचे नावडीने हे माहीत आहे

कोबी च सॅलड खुप आवडतं , किसून केलेल्या पाचडी पेक्षा.
कोबी पात्तळ उभा चिरून घ्यायचा, कांदे, काकडी, बिया काढून टोमॅटो , फुगी मिरची जे असेल ते ही सगळ उभं उभं पातळ चिरून घ्यायचं. थोडे पनीर चे क्युब्ज घालायचे. तेल, मध, लिंबू रस, मिरी पावडर मीठ असं ड्रेसिंग करून त्यावर ओतयच, हलक्या हाताने मिक्स करून लगेच खायचं. वेळ गेला तर मीठामुळे सॅलड मऊ पडतं आणि मजा नाही येत. करून बघा नक्की.

yes ममोनी लिहिलंय तसंच... फक्त व फक्त कोबी लांबडा, पातळ चिरून फक्त लाल तिखट मीठ व भरपूर लिंबू पिळून मिक्स करायचं शॉल्लेट लागतं एकदम..

होय अमितव , फेटा चीज, ऑलिव्ह ऑईल आणि असल्यास थोडे इटालियन हर्ब्ज घातले एकदम परदेशी चवीचं सॅलड तयार होतं. पण ते नसेल तर आपलं साध तेल आणि पनीर हे पण छानच लागत.
भरत तुमच्या ही रेसिपीज इंटरेस्टिंग वाटतायत.
अंजली च ही सॅलड मस्त लागत असेल लाल तिखट आणि लिंबू पिळलेल.

>>>>> फक्त व फक्त कोबी लांबडा, पातळ चिरून फक्त लाल तिखट मीठ व भरपूर लिंबू पिळून मिक्स करायचं शॉल्लेट लागतं एकदम..

जस्ट केले. मस्त!!

मलाही आधी कोबी फार कंटाळवाणा वाटायचा. मिपा वर रेवती यांची एक टीप वाचली की कोबी पातळ उभा चिरायचा. तसा चिरायला लागल्यापासून फार छान होते भाजी. मला बटाटा घालून बेस्ट वाटते. नाहीतर मग मटार. डाळ घालून, हरभरा डाळ प्लस कोबी असे दोन उग्र पदार्थ एकत्र आल्याने आवडत नाही. तीच डाळ दुधी किव्वा दोडक्याच्या भाजीत आवडते.

फक्त व फक्त कोबी लांबडा, पातळ चिरून फक्त लाल तिखट मीठ व भरपूर लिंबू पिळून मिक्स करायचं शॉल्लेट लागतं एकदम..
>>>>>

+786
सोबत तिखट हिरवी चटणी
आणि तोंडी लावायला एखादी चिकन तंदुरी घ्यायची.. आणखी भारी लागते.

जपानमध्ये तोन्कात्सु बरोबर खायला चायनीज कोबीचं सॅलड देतात. मस्त लागतं एकदम. पातळ किसलेला कोबी आणि त्यात तिळाचं ड्रेसिंग किंवा कोलस्लॉ टाईप रँच ड्रेसिंग वगैरे

कोबीच्या भाजी चा वास उग्र वाटतं असेल तर ह्या दोन गोष्टी
१. जिरं+कडीपत्त्याची फोडणी करायची
२. थोड आलं किसून टाकायचं

वाफेवर शिजवयच

फ्लॉवर/ फुल गोबी ची पण तशीच करायची..

वरती कोथिंबीर खोबरं घातलं आणि लिंबू पिळल तर भाजी अजून चविष्ट लागते ( माझ्या मते)

Pages