राजगडाच्या केवळ दर्शनाने पाणवणाऱ्या डोळ्यांच्या कडा.. त्याच्यावरील असंख्य आठवणी ..पैकी कोणती आठवण छान आणि कोणती सर्वात छान अशी नेहमीचीच तुलना. संजीवनीवरचा स्वर्गीय सूर्यास्त ! त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केलेल्या राजगडाच्या असंख्य वाऱ्या.
तोरण्याच्या बुधल्या शेजारी अस्ताला जाणारा सूर्य. त्या प्रचंडगडाच्या सावलीची ठळक झालेली सीमा... आणि मनामध्ये सुरू झालेला "तव तेजांतील एक किरण दे ।" असा जप ...
मढे घाटातली ती दोघातच काढलेली अंधारी रात्र. घाटाच्या अगदी कडेला टाकलेला तंबू. ताऱ्यांनी गच्च भरलेलं नेत्रदीपक आकाश, त्याला मधोमध छेदणारा आकाशगंगेचा धूसर पट्टा. खाली जंगलातून मधूनच ऐकू येणारा रान डुकरांच्या व्हीव्हळण्याचा आवा आणि तो ऐकून अंगावर आलेला काटा. तंबूच्या बाहेर मांडलेला टेलिस्कोप, त्यामधून दिसणारे अनेक तारकापुंज, गुरुवरील पट्टे आणि शनीची कडी....
उघड्यावर झोपून, कुडकुडत काढलेली कमळगडावरची गोठवणारी रात्र. मध्यरात्री चार पायऱ्या उतरून त्या कावेच्या खोल विहिरीत जाण्याचा मोह. अष्टमीच्या चंद्राच्या तेजस्वितेला न जुमानणाऱ्या ताऱ्यांनी खचाखच भरलेलं आकाश. चंद्र मावळेल तसं आपलं अस्तित्व स्पष्ट करणारा आकाशगंगेचा पट्टा. संपूर्ण आकाशात आपली सत्ता गाजवणारा तो वृश्चिक आणि त्याच्या शेपटाला लटकवलेले दोन तेजस्वी तारकापुंज…उघड्या जमिनीवर आडवं पडून रात्रभर बघितलेला हा अवकाशातील खेळ !
निवती, यशवंतगड, सिंधुदुर्ग बघण्यासाठी संपूर्ण रात्रभर दामटवलेली अपाचे... गाडीच्या उजेडात चमकणारे आणि भरभर मागे जाणारे रस्त्यावर आखलेले पांढरे पट्टे.
पहाटे घेतलेलं अंबाबाईचं अभूतपूर्व दर्शन. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि माझ्यावर रोखलेली तिची नजर… भोगवे किनाऱ्यावर आतमध्ये ओढून नेणाऱ्या समुद्रात सावधपणे केलेला धिंगाणा, आणि अखेर निवतीच्या किल्ल्यावर काढलेली नवचेतना देणारी सुखद रात्र !
NH-४ वर अपाचे सुसाट पळवताना ११४ वर थरथरणारा स्पीडोमीटरचा काटा ! दिवसभर गाडी चालवून, समोर ठाकलेलं वाहून गेलेल्या रस्त्याचं आव्हान ! मावळत्या सूर्यासोबत पारगडाच्या भेटीची मावळत जाणारी आशा आणि वाढत्या अंधारासोबत गडद होणारी भीती ! दुसऱ्या रस्त्याने जाऊन पारगड दृष्टिक्षेपात येताच अंगात संचारलेली नवी ऊर्जा, आणि अखेर अजिंक्य राहिलेली त्याच्या भेटीची जिद्द !
पारगडावर पोचल्यावर तिथल्या घनदाट जंगलात आणि खोल दऱ्यात मावणार नाही इतका अपार आनंद !
आणि ह्यासोबत दिवसभरात अपाचे वर बसून कापलेलं ४७० किलोमीटरचं अंतर !
हट्टास पेटून "पुणे-जिंजी-पुणे" केलेली अपाचे वारी ! राजागिरी वरती पोचल्यावर मिळालेलं अपार समाधान..आणि खाली उतरताना माकडांनी दिलेला त्रास !
सुधागड समजून त्याच्या शेजारच्याच डोंगरावर केलेली "यशस्वी "चढाई ! वर पोचल्यावर आलेली निराशा, पण समोरच्या सुधागडच्या बुलंद बुरुजाचे लांबून दर्शन होताच मनात संचारलेली नवी उमेद !
मंगळगडावर रान तुडवीत केलेली चढाई.. समोर काही उंचीवर, भेटीस मन:पूर्वक आमंत्रण देणारा त्याचा पश्चिमेकडील बुरूज, पण सहा फूट उंच गवतात हरवलेली पायवाट…अवघड ठिकाणी केलेले चढाईचे असफल प्रयत्न... वेळे अभावी परत फिरायची आलेली परिस्थिती, गळ्यात अडकलेला आवंढा आणि इतक्या जवळ येऊनही मंगळगड लांब राहिल्याने मनाला लागलेली हुरहूर !
काही दिवसातच मंगळ गडाची केलेली यशस्वी मोहीम, त्यावर तंबू ठोकून काढलेली रात्र, आणि सोबतीला ग्रहण लागलेला चंद्रमा !
इंद्राई वरती गॅस सिलेंडरमुळे झालेली फजिती, त्यानंतर अचानक दाटलेला काळोख, धुव्वाधार पाऊस आणि अंधारात चुकलेली वाट ! तंत्रज्ञानाचा वापर करीत, तुफानी पावसाचा मार झेलत शोधलेली वाट आणि टाकलेला निश्वास !
माघ वद्य नवमीच्या रात्री दर वर्षी सिंहगडाला दिली जाणारी भेट, तान्हाजींच्या स्मारकासमोर म्हटलेली सांघिक पद्य ! तान्हाजींच्या पराक्रमाच्या जागवलेल्या आठवणी आणि मनात आलेला भावनांचा महापूर !
यादी जशी १७५ - १८० च्या पुढे जाऊ लागली, तेव्हा जाणवू लागलं कि आज खूप लांबवर आलो आहे. आजपर्यंत दोनशेहून अधिक गड किल्ले 'अभ्यासपूर्ण' बघून झाले. संघाच्या शाखेतून निर्माण झालेली किल्ल्यांची गोडी आज गेली वीस बावीस वर्षे टिकून आहे.
कधी किल्ल्याचं अस्तित्व झाडाझुडूपात शोधून काढायला लागत आहे, तर काही भव्य किल्ले अनेक दिवस मुक्काम केला तरी पूर्ण बघून झालेले नाहीत..
किल्ला बघून झाल्यावर त्याची नोंद करत आलो आहे, जमेल तितके फोटो काढत आलो आहे.
महाराष्ट्र शिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेशातील किल्लेही बघत आलो आहे.
गड किल्ल्यांच्या रचनेबाबत आज थोडंफार कळत आहे. क्वचित वेगळं बांधकाम बघून कोड्यातही पडत आहे.
कधी पडलो कधी रडलो, कधी दमलो कधी भांडलो सुद्धा आहे ! मागे वळून बघताना असंख्य आठवणी सोबत जोडत आलो आहे.
अनेकांची साथ आणि सहकार्य घेत आलो आहे. सोबत नसेल कोणी तर एकटा भटकून आलो आहे.
सहकार्य, प्रोत्साहन आणि साथ दिलेल्या सर्व मित्रांचा
ट्रेकला गेल्यावर काळजी करणाऱ्या आईचा
माझी धडपड सांभाळून घेणाऱ्या रौद्र सह्याद्रीचा
जिच्याशिवाय हे अशक्य होतं त्या 'अपाचे' चा
आणि
जिच्यासोबत हे शक्य झालं, अश्या बायकोचा मी खूप ऋणी आहे ! (श्रुती @ १५८ किल्ले)
-भूषण
http://bhushankarmarkarworld.blogspot.com/
https://puneastro.in/
वाचूनच मस्त ताजंतवानं वाटलं!!
वाचूनच मस्त ताजंतवानं वाटलं!! तुमच्या दुर्गभ्रमणगाथेतली बाकीची प्रकरणं ब्लॉगवर आहेत ना? एकेक करून वाचते.
वाह!
वाह!
आढावा छान आहे. तपशीलवार वाचायलाही आवडेल.
आढावा छान आहे. तपशीलवार
आढावा छान आहे. तपशीलवार वाचायलाही आवडेल > +१
300 किल्ले. .. !!!!!
300 किल्ले. .. !!!!!
मस्तच.
10-15 वर्षे वयाच्या मुलांसाठी तुम्ही किल्यांचे ट्रेक आयोजित करता का?
काही मजेदार प्रकरण वाटतंय.
काही मजेदार प्रकरण वाटतंय. लिहा इकडे.
वाह जोरदार, पण हा टीजर झाला
वाह जोरदार, पण हा टीजर झाला
आता फुल मुव्ही येऊ दे
एकेक करत
वॉव! मस्त!
वॉव! मस्त! दोघांचे... नाही तिघांचे
कौतुक व अभिनंदन! शुभेच्छा!
छान आढावा.. शुभेच्छा!
छान आढावा.. शुभेच्छा!
मस्त. वाचूनच स्फुरण आले.
मस्त. वाचूनच स्फुरण आले. त्रिशतक लवकरच पूर्ण करावे.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. मला खरंच आश्चर्य वाटलं इतक्या प्रतिक्रिया बघून. खूप बरं वाटलं.
माझ्या भ्रमंतीचे काही लेखन माझ्या ब्लॉगवर आहे. मनोगत वरती काही लेखन केले आहे, ते सुद्धा सवडीने इथे प्रकाशित करेन.
स्फूर्तिदायक . आवडलं. अजून
स्फूर्तिदायक . आवडलं. अजून लिहा.
मनःपूर्वक धन्यवाद वर्णिता
मनःपूर्वक धन्यवाद वर्णिता
मला पण टेलिस्कोप घ्यायची आहे.
मला पण टेलिस्कोप घ्यायची आहे. मी यापूर्वी जत्रेतील दुर्बीण वापरून पक्षी डोंगर वैगरे पाहिले आहेत. थोडक्यात माझा दुर्बीण, टेलिस्कोप वापरण्याचा अनुभव शून्य आहे. आता मला शनीच्या कडा, गुरूचे पट्टे, गुरूवर 350 वर्षांपासून घोंघावणारे वादळ हे पहायचे असल्यास कुठली टेलिस्कोप घ्यावी. आणि ते नेब्युला वैगरे पण दिसले पाहिजेत. मला लांबचा चष्मा लागला आहे. त्यामुळे चष्म्यातून टेलिस्कोप पाहायला त्रास होतो का?
चष्म्यामुळे टेलिस्कोपमधून
चष्म्यामुळे टेलिस्कोपमधून बघायला काही अडचण येत नाही.
https://tejraj.com/st-114500ng.html
इथे चेक करा. साधारणपणे चार इंच किंवा त्याहून जास्त व्यासाचं अपर्चर असलेला टेलिस्कोप चांगला. त्यातून शनीची कडी, गुरूचे उपग्रह, तारकापुंज, शुक्राची कोर वगैरे सगळं छान दिसेल.
पण तो ऑपरेट करायला तुम्हाला शिकावं लागेल. खूप काही कठीण नसतं. थोडा वेळ द्यावा लागेल इतकंच. आणि चार इंची किंवा सहा इंची टेलिस्कोप त्यातल्या त्यात हाताळायला बरा. त्याहून मोठे असतात ते आणखी जड होत जातात.
व्वा ! जबरी ! वेळ होईल
व्वा ! जबरी ! वेळ होईल तेव्हा हे अनोखे प्रवास वर्णन मायबोलीवर पण टाका हळूहळू.
>>मनोगत वरती काही लेखन केले
>>मनोगत वरती काही लेखन केले आहे, ते सुद्धा सवडीने इथे प्रकाशित करेन.
वाचायला आवडेल. ट्रेकिंगचा अनुभव नसणार्या लोकांनी कुठल्या किल्ल्यापासून सुरुवात करावी वगैरे मार्गदर्शन केलंत तर बरं होईल. कधीकाळी हे किल्ले पहायची आशा अजून मनात जिवंत आहे. बाकी एव्हढे किल्ले नेटाने पाहिलेत ह्याबद्दल कौतुक वाटलं खरंच.
@रश्मी - धन्यवाद, लवकरच लेखन
@रश्मी - धन्यवाद, लवकरच लेखन पोस्ट कारेन.
@स्वप्ना-राज - धन्यवाद. सिंहगड खेरीज - तिकोना, कोरीगड, घनगड, लोहगड हे किल्ले सोप्या श्रेणीत येणारे आहेत. त्यांच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही.
@बोकलत - १५ हजारापर्यंत उत्तम
@बोकलत - १५ हजारापर्यंत उत्तम टेलिस्कोप येतो. पण कोणताही टेलिस्कोप घेण्याआधी माझे हे आर्टिकल नक्की वाचा.
https://puneastro.in/blog-and-news/article/buying-your-first-telescope
चष्मा असला तरी टेलिस्कोप मधून बघताना फरक पडत नाही. टेलिस्कोप मधून बघताना चष्मा काढून बघायचे, कारण टेलिस्कोप चा फोकस मागे-पुढे अड्जस्ट करता येतो.
@वावे, धन्यवाद
@वावे, धन्यवाद
@ध्येयवेडा, धन्यवाद लेख सवडीने वाचायला हवा.
>>धन्यवाद. सिंहगड खेरीज -
>>धन्यवाद. सिंहगड खेरीज - तिकोना, कोरीगड, घनगड, लोहगड हे किल्ले सोप्या श्रेणीत येणारे आहेत. त्यांच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही.
धन्यवाद. देव करो आणि २०२१ मध्ये ही संधी मिळो. मग मायबोलीवरच्या सगळ्या ट्रेकर्सना पिड पिड पिडेन म्हणते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वप्ना तुला केव्हापासून
स्वप्ना तुला केव्हापासून म्हणतोय
ये आमच्यासोबत ट्रेकला तर
आशुचँप, २०२१ मध्ये नक्की
आशुचँप, २०२१ मध्ये नक्की येणार बघ. २०२० ने डोळे उघडले पुरते. जो कुछ करनेका है करके लेनेका. उगा किल्ले पहायचे राहिले म्हणून आत्मा तळमळायला नको
तुला विपू करते.
ये हुई ना बात
ये हुई ना बात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या मोकळ्या भन्नाट वातावरणात मस्त चहाचे घुटके घेत तुझ्याकडून समक्ष पन्ने ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असेल
जबरी लेख ! इतके गड फिरणं
जबरी लेख ! इतके गड फिरणं म्हणजे खरच भारी !
ब्लॉग पण वाचतो.
ट्रेकर्स कडे आदराने बघते मी.
ट्रेकर्स कडे आदराने बघते मी. सॉलिड लोकं असता तुम्ही.
सावकाश वाचीन. आपल्या माबोवर चे पण एकाहून एक ट्रेकर्स आहेत.
नावाप्रमाणेच ध्येयवेडा आहात !
नावाप्रमाणेच ध्येयवेडा आहात !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोप्प नाही हे वेळातवेळ काढून ट्रेकिंग करणे .
आम्ही सुरुवात सिंहगड पासून केली आणि चारपाच वर्षात पुणे जिल्ह्यातील सगळे गड संपवून शेवट वासोट्यावर केला तर मोठा पराक्रम केल्याचे फील यायचे .
आणि त्याबद्दल स्वतःचे गुणगान करून समोरच्याला हैराण करून सोडायचं
त्या मानाने तुम्ही खरंच भीमपराक्रम केला आहे , पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!!!!
धन्यवाद यारोंकायर१- खरंतर
धन्यवाद यारोंकायर१- खरंतर आवडीमुळे एकेक गड बघत गेलो. त्यामुळे ते करताना खूप विशेष वाटलं नाही. पण मागे वळून बघताना असं वाटतं की बरंच लांब अंतर कापलं आहे.