‘पश्चिम’चा प्रवास (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 16 April, 2017 - 03:27

वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे आता माझ्याकडे सीट मागायला हक्काने कोणी येण्याची शक्यता निदान रात्रीपर्यंत तरी निवळली होती. दरम्यान वसईची खाडीही पार केली होती. १३.४५ ला वसई रोड क्रॉस करत असताना तिथे काही क्षण विसावलेली ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल सवारी उभी असलेली दिसली. त्याआधी १३.१८ आणि १३.२१ ला अनुक्रमे भूजहून आलेली २३ डब्यांची १९११६ सयाजीनगरी आणि तिच्यापाठोपाठ अजमेर आणि उदयपूरहून एकत्रितपणे आलेल्या आणि वांद्र्याकडे निघालेल्या एक्सप्रेस गाड्या क्रॉस झाल्या होत्या. आता दुपारचे २.०५ वाजले होते. वैतरणा नदीही ओलांडली होती. पण जरा जपूनच, कारण या अतिशय जुन्या पुलाची डागडुजी सुरू असल्याने त्यावर तात्पुरती वेगमर्यादा लावली होती. त्याची कल्पना सर्व लोको पायलट्सना आधी दिलेली असतेच, तरीही किती वेग ठेवावा हे दर्शवणारा पिवळा त्रिकोणी फलक माझ्या नजरेस पडला. तर त्यावर वेग मर्यादा लिहिली होती ४० कि.मी. हिवाळा सुरू होता, पण मुंबईच्या बाहेर आल्यावर आता हवा आल्हाददायक खरंच वाडू लागली होती. आकाशही थोडे ढगाळलेले होते. तेवढ्यात पलीकडील अप लाईनवरून अमृतसर/कालक्याहून जरा आपली डब्यांची रचना बदलून आलेली आमच्या ‘पश्चिम’ची जुळी बहीण १२९२६ ‘पश्चिम एक्सप्रेस’ क्रॉस झाली. तिच्यापाठोपाठ जेएनपीटीकडे निघालेली बीएलसी वाघिणींची (कंटेनर) मालगाडी वसई रोडच्या दिशेने निघून गेली. माझ्या बाजूने लोकलची ये-जा सुरू होती विरारपर्यंत.

प्रवाशांपैकी काहींची जेवणं गाडीत येण्याआधीच झाली होती, तर काहींची चालली होती. काही जण गप्पांमध्ये रंगलेले होते, तर काहींची वामकुक्षीची तयारी सुरू होती. ‘पश्चिम’च्या डब्यांची क्रमवारी (रेक कंपोझिशन) आधीच माहीत असल्यामुळे गाडीला ‘रसोई यान’ जोडलेले असले तरी आमच्या डब्यापर्यंत ती सेवा फारशी मिळेल का याची शंका वाटत होती. कारण ‘रसोई यान’ आणि माझ्या डब्याच्यामध्ये २ अनारक्षित आणि एक गार्डचा (एसएलआर) डबा होते. मी गाडीच्या कालक्याला जाणाऱ्या डब्यांमध्ये बसलो होतो. त्यामुळे आमचा भाग ‘रसोई यान’च्या बराच मागे होता आणि चालत्या गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणे शक्य नव्हते. म्हणूनच ती शंका येत होती. या गाडीत जेवण-खाणे चांगले मिळते असे मी ऐकले होते. पण या शंकेमुळे मी गाडीत बसायच्या आधी वांद्र्याच्या स्टेशनवरून थोडे खाणे बरोबर घेऊन ठेवले होते. पण गाडी सुटल्यावर लक्षात आले की, आमच्या कालक्याच्या डब्यांसाठी चहावाला आणि बिस्कीटवाला असे कायमस्वरुपी फेऱ्या मारत होते आणि गाडी थांबली की बाकीचे ‘पँट्रीवाले’ही येऊन जात होते. एक जण जेवणाची ऑर्डर घेऊन गेला होता, पण माझ्याकडे आधी घेतलेले असल्यामुळे त्याला मी ऑर्डर दिली नाही. विचार केला रात्री घेऊ.

१४.१३ ला बीसीसी वाघिण्यांची (सिमेंट वाहून नेणारी) मालगाडी वसई रोडकडे निघून जात असतानाच ‘पश्चिम’ डहाणू रोडला पोहचली. इथपर्यंत गाडीने वांद्र्यात वाया गेलेल्या ५८ मिनिटांपैकी जवळपास २२ मिनिटे रिकव्हर केली होती. तिथला छोटा थांबा घेऊन ‘पश्चिम’ पुढे निघाली. आज बुधवार होता. म्हणून मला आता प्रतीक्षा होती २२२१० नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल एसी दुरंतो एक्सप्रेसच्या क्रॉसिंगची. ती प्रतीक्षा १० च मिनिटांनी संपली आणि लाल रंगाच्या डब्ल्यूएपी-४ या कार्यअश्वाच्या मदतीने दौडणारी ती गाडी मुंबई सेंट्रलच्या दिशेने निघूनही गेली. त्यानंतर ५ मिनिटांमध्येच ‘पश्चिम’ने महाराष्ट्राची सीमा ओलांडत गुजरातमध्ये प्रवेश करत बोर्डी रोड क्रॉस केले.

पुढे ५ मिनिटांनी उंबरगाव रोडला ५९०४० वापी-विरार सवारी (पॅसेंजर) आणि पाठोपाठ १४.४२ ला भिलड स्टेशनमध्येच ‘पश्चिम’ आणि हिसारहून आलेली आणि वांद्र्याला निघालेली १९ डब्यांची २२९१६ एक्सप्रेस यांनी एकमेकींना ओलांडले होते. नेहमीप्रमाणे माझे लक्ष त्या गाडीबरोबरच स्टेशनवरच्या फलाटाकडे होतेच. तिथे आपल्या केबिनच्या बाहेर स्टेशन मास्टर आमच्यासाठी हिरवा बावटा हातात घेऊन उभा होता. जर तो तिथे नसता, तर आमची पश्चिम पुढच्या स्टार्टर सिग्नलच्या आधीच थांबवावी लागली असती. तो सिग्नल म्हणजे ‘पश्चिम’ला पुढे जाण्याची स्टेशन मास्टरने दिलेली परवानगीच होती. असे करत १४.५१ ला ‘पश्चिम’ वापीत दाखल झाली. तिथे मिनिटाभराचा थांबा घेऊन गाडी पुढच्या प्रवासासाठी निघाली. आता मला कोणीही माझ्या सीटवरून उठवायला येत नाही आहे याची पूर्ण खात्री झाल्यामुळे मीही निवांतपणे माझे ‘रेल्वे निरीक्षणा’चे कार्य सुरू ठेऊ शकत होतो.

वापीतून निघाल्यावर १४.५७ आणि १४.५८ अशा प्रत्येकी १८ डब्यांच्या पोरबंदर-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र एक्सप्रेस आणि १९४२० अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेस अक्षरशः एक मिनिटांच्या अंतराने पाठोपाठ वापीच्या दिशेने निघून गेल्या होत्या. वर म्हटलेल्या Automatic Block System चा हाच महत्त्वाचा उपयोग.

पार्डी क्रॉस करत असेपर्यंत ‘पश्चिम’ने बऱ्यापैकी वेग घेतला होता. पण १५.०५ वाजता अतुल स्टेशनजवळ गाडीचा वेग बराच मंदावला. मी विचारात पडलो की, कोणत्या गाडीने आमचा मार्ग रोखून धरला असेल. पण बाहेर पाहिले तर सिग्नल हिरवे दिसत होते. पण शंकेचे लगेच निरसन झाले, जेव्हा बाहेर वेग मर्यादेचा (२० कि.मी.) पिवळा त्रिकोणी बोर्ड दिसला. ‘पश्चिम’चा मंदावलेला वेग पुन्हा वाढत होता. दहा मिनिटांतच साधारण २२ मिनिटे उशीरा धावत असलेल्या २४ डब्यांच्या १२४७२ जम्मुतावी-वांद्रे (ट) स्वराज एक्सप्रेसचे क्रॉसिंग झाले होते. मी घेतलेले ‘स्वराज’चे ते पहिलेच दर्शन होते.
(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही भाग फक्कड जमलेले आहेत.
एवढी माहिती पण अजिबात कंटाळवाणे वाटले नाहीत.
तुमची रेल्वे बद्दलचे सगळे लेख खूप रंजक असतात.
भारतीय रेल्वे प्रवास आवडत नाही पण Ruskin Bond आणि तुम्ही रेल्वे बद्द्ल खूप कुतूहल निर्माण केले आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

मस्त!
तुमची डीटेल्स लिहिण्याची शैली खरंच फार रंजक आहे. जेन्युअन इंटरेस्ट आणि वाचणार्‍याच्या अंगावर अजिबात न येणारा माहितीचा बडेजाव असं एकदम फॅक्चुअल लिहिता तुम्ही. लिहित रहा. पुलेशु Happy