खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरोखर समानतेची जाणीव म्हणून की स्वत:ला कंटाळा म्हणून???
बर्याच घरात असं असतंही. मुलींना, बायकांना इतका मान आणि अधिकार असतातच.
काही ठिकाणी बायका फक्त सगळी तयारी करुन देण्यापुरत्या पुढे. नंतर पडद्यामागेच.

लग्नानंतर जोडीने पूजा करण्याचे प्रसंग मोजकेच आहेत , त्यामुळे असा अनुभव नाही .
पण मी लग्ना अगोदर ७-८ वर्षे , दरवर्षी मी श्रावणात सत्यनारायणाची पूजा करायचे .
अगोदर काही वर्षे आई-बाबा पूजेला असायचे पण नंतर त्यांच्या मनात आलं की आपल्या मुलीन्च्या हातून पूजा करून घ्यावी.
माझ्या लग्नानंतर २-३ वर्शे माझी बहिण बसायची पूजेला .
आमचे गुरुजी म्हणायचे , सत्यनारायण म्हणजे विष्णू , लक्ष्मीच्या हातून त्याची पूजा म्हणजे चांगलच की .

पण गुरुजी कशाला आले तुमच्याकडे त्यांच्या घरी सण नसतो का..? तुम्हाला जसा दसरा असतो तसा त्यांना नव्हता का..?? आपल्या घरचा सण सोडुन दुसर्‍यांच्या घरी कोण कशाला जाईल..??? फार तर सोनं द्यायला येतात लोक संध्याकाळी.

बा द वे.. नवीन घरात रहायला गेल्याबद्दल अनेक शुभेच्छा..!!! तुमचे घर असेच आनंदात राहो.. फळो.. फुलो.. माबोवर अगणीत धागे निघोत..! Biggrin

मी काय म्हणते दादया, करू देत तिला पूजा. तू ममगिरीच कर पण फक्त प्रत्येक पूजेला भरमसाठ पदार्थ असतात जेवायला. ते तू बनवत जा म्हणजे अस्मिता मस्त पैकी नटून सजून साडी नेसून पूजेला बसत जाईल. कसं?

च्च! स्त्रीया व्यवस्थित प्राणप्रतिस्थापना करुन घरी गणपती वगैरे बसवतात की. त्यात काही नविन नाही. स्त्रीया पौरोहित्य करतात तसेच हे देखील.
देवाची पूजा हा श्रद्धेचा भाग झाला. ते एक काम वाटणार असेल, उगाच आपल्याला ते करण्यासाठी पुढे ढकलले जाते असे मनात येणार असेल तर न केलेले चांगले.

देवाची पूजा हा श्रद्धेचा भाग झाला. ते एक काम वाटणार असेल, उगाच आपल्याला ते करण्यासाठी पुढे ढकलले जाते असे मनात येणार असेल तर न केलेले चांगले.
>>>>>>

हा युक्तीवाद मी दरवेळी करतो
तरीही घरच्यांच्या भक्तीवादापुढे हरतो

पण फक्त प्रत्येक पूजेला भरमसाठ पदार्थ असतात जेवायला. ते तू बनवत जा
>>>>
मला म्यागी येते, देवाला चालत असेल तर करतो Happy
बाकी मला काम करायचा आळस नाही, दोन्ही मुले जन्मल्यापासून आजवर त्यांचे सूसू शीशी डिपार्टमेंट माझ्याकडेच आहे. तसेच खेळवण्यात आणि भरवण्यातही मोठा माझा वाटाच असतो. जेवणातही जे जे बनवता येते ते ते बनवतो, चहा मीच घेतो सगळ्यासाठी नेहमी, जेवण गरम करून ताटंही मीच बनवतो. सांगायचा मुद्दा ईतकाच की मी पुरुष असल्याचा फायदा उचलत घरकामापासून दूर पळतोय हा मुद्दा ईथे गैरलागू आहे ईतकेच Happy

पण गुरुजी कशाला आले तुमच्याकडे त्यांच्या घरी सण नसतो का..?
>>>>>

संध्याकाळी आले पाचला.
बाकी ज्यांचा व्यवसाय देवधर्मावर आधारीत आहेत ते सणाच्या दिवशी सुट्टी घेत आपले दुकान का बंद ठेवतील.
(व्यवसाय दुकान शब्द वापरून श्रद्धाळूंच्या भावना दुखावायच्या नाहीत, मुद्दा क्लीअर करायला हे शब्द वापरणे गरजेचे होते)

वरील काही प्रतिसादात महिलांनी पूजा करायची काही उदाहरणे आली आहेत. छान आहे. पण जोडीने बसलेले असताना महिलेने पुढाकार घेतला जातो का? अशी उदाहरणे दिसतात का..

खरोखर समानतेची जाणीव म्हणून की स्वत:ला कंटाळा म्हणून???
>>>

दोन्ही म्हणू शकता. मला कंटाळा तसा असतोच. पण मुळातच मला हा देवधर्मात पूजेत पुरुषांना मिळणारा उगाचचा मान नकोच आहे.
लग्न विसरलो आता बरीच वर्षे झाली. पण तेव्हाही मला वाटते मलाच जास्त त्रास दिलेला. बायकोला ममगिरीच करावी लागली होती.

वा, वा, काय तो ड्रामा!!! पण दसर्‍याच्या निमित्ताने का होईना स्वतःची आरती ओवाळून झाली हे बरं झालं. फुलं पण वाहिली का स्वतःलाच?

हर्पेन, सिरियसली, हा धागा का काढला आहे? या प्रश्नाचे उत्तर ऐकायची तयारी आहे का? काहीतरी गोलमाल फेकाफेक ऐकायला मिळेल.

नास्तिक माणसाने पूजा करावीच कशाला…
>>>>
कुटुंबियांच्या भावना जपायला
वो प्रसाद समजके खिलाते है अपुन मिठाई समज के खा जाता है… उगाच अँग्री यंग म्यान मोडमध्ये जाण्यात काय हशील आहे?

हा धागा सिरियसली काढला आहे का?
>>>>>

तुम्हाला यातील प्रश्न / मुद्दा सिरीअस वाटतो का?
देवधर्म पूजाअर्चा यामध्ये स्त्री पुरुष हा भेद तुम्हाला दिसतो का?
आणि दिसत असल्यास तो चालतो का?
तुमचे तुम्हीच ठरवा

दसर्‍याच्या निमित्ताने का होईना स्वतःची आरती ओवाळून झाली हे बरं झालं.
>>>>
हा हा
सायो आपले विचार फार जुळतात. ग्रेट मॅन अ‍ॅण्ड वूमन थिंक अलाईक म्हणतात तसे काहीसे
मी सुद्धा हा विनोद धाग्यात टाकणार होतो. पण धाग्याचा सिरीअसनेस घालवायचा नव्हता.

ऋन्मेऽऽष ,आता कसे आहात ? काय झाले ? लवकर बरे व्हा
>>>>>>
आतड्याचा आजार आहे जुना.. अध्येमध्ये एखाद दोन दिवस वा आठवडा डोके वर काढतो. पण आता बरा आहे. विकेंड तेवढा आजारात गेला. पण सोमवारपासून कामही चालू आहे ऑफिसचे जोरात. घरूनच… काळजीबद्दल धन्यवाद Happy

हा धागा सिरियसली काढला आहे का? या प्रश्नाला तुम्हाला काय उत्तर हवे होते? हो - ईतकेच . माझ्या प्रतिप्रश्नातच ते ऊतर दडले नाहीये का? Happy

सिरियसली, हा धागा का काढला आहे ?
असं हवं ना Wink
>> lol.
Runmesh - प्रश्न बरोबर आहे.
एकेकाळी बायका म्हणायला आल्यावर लघु रुद्रा तून उठलेले पुरुष गुरुजी पाहिले आहेत.
तोच ब्रह्मवृंद सर्वांना सामावून घेताना दिसतो.
आमच्या वाई च्या अभ्यंकर गुरुजींनी अनेक स्त्रियांना आणि सर्व जातीच्या माणसांना शिकवले.
ज्याची इच्छा असेल त्या प्रत्येकाला मी शिकवेन असे ते म्हणायचे.
देव सगळीकडे (जात, लिंग भेद न मानता) जातो , तर वेद का जाऊ शकत नाहीत, असेही म्हणायचे.
हे त्यांनी खूप पूर्वीपासून केले.

सुरुवातीला त्यांच्यावर टीका झाली.
ह्याचे परिणाम काय याची बाकीच्यांना भीती असावी. ( दैवी aspect).
वयाच्या 103 व्या वर्षापर्यंत कार्यरत राहून , शेवटपर्यंत व्यवस्थित राहून - आपली वेळ सांगून त्यांनी देह ठेवला.

1990 च्या दशकामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी - आमचे शिकून झाल्यावर पूजा करायला, लघुरुद्र म्हणायला जायचं.

आमच्या घरी मी अनेक वर्ष गणपती बसवलेला आहे, इतरही पूजा केले आहेत.
आई लघुरुद्र , महारुद्र, गणपती अथर्वशीर्ष लक्षावर्तन ला यजमान म्हणून बसली आहे.
माझे सध्याचे गुरुजी मी पूजा करणार असे न तर पुराण आणि नवरा बसणार असेल तर शास्त्र पुराण फलप्राप्ती असा संकल्प सोडतात.
ह्यात स्त्री पुरुष समानता नाही पण गुरुजी प्रामाणिक आणि कामात chokh आहेत त्यामुळे मी इथे वाद घालत बसत नाही.
तेदेखील , मी लेंगा टी-शर्ट - मंगळसूत्र नाही वगैरे अवतारात पूजा करते तिथे त्यांच्या समजुती बाजूला ठेवतात.

देवधर्म पूजाअर्चा यामध्ये स्त्री पुरुष हा भेद तुम्हाला दिसतो का?
आणि दिसत असल्यास तो चालतो का?>>
तुम्ही घरातील पूजाअर्चा याबद्दल लिहिले आहे तेव्हा त्या संदर्भात - तुमच्या घरातील स्त्रीला पूजा करायची इच्छा असून प्रतिबंध केला जातोय का? तसे असेल तर भेदाभेद. तुम्हाला दोघांना पूजा करायची इच्छा असेल तर आलटून पालटून करु शकता. तुम्हा दोघांनाही इच्छा नसेल , ते एक काम वाटत असेल तर प्रश्नच मिटला. एकमेकांना पुढे ढकलायची गरज नाही, पूजा करु नका.

>>>>सिरियसली, हा धागा का काढला आहे ?>>>> हाच धागा जर स्वतःचे उल्लेख टाळुन, जनरिक चर्चा टेंप्लेटमध्ये फिट करुन, काढला असता तर हा प्रश्न आला असता का? प्लस जर ऋन्मेष यांनी काढला नसता त्तर हा प्रश्न आला असात का? Lol

दसऱ्याला गुरूजी घरी येतात हे नव्यानेच कळले. आम्ही फक्त सिमोल्लंघन करून घरी आल्यावर औक्षण होते. ,That's it. या वर्षी घरीच केलं पण.
आणि बरं नव्हतं तर घरी कोणाला बोलवायची रिस्क का घ्यायची पण ?

यालाच क्लिकबेट म्हणतात
माबोकर या विषयावर तुडुंब प्रतिसाद देणार, पर्यायाने टीआरपी मिळणार
अजून काय पाहिजे त्याला

Pages