थरथर आहे की नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
श्वासांमध्ये बघा पुरेशी थरथर आहे की नाही
मरणाऱ्याचा आत्मासुद्धा बेघर आहे की नाही ?
कोठे गेलो कुठून आलो तुलाच कळते पहिल्यांदा
सांग मला मग तुझी नजर माझ्यावर आहे की नाही
तसा इरादा चुंबायाचा कधीच माझा नव्हता पण
फक्त पाहिले ओठांमध्ये साखर आहे की नाही
काहीसुद्धा केले नव्हते ससा तरीही सापडला
बघावयाला आला होता...वाघर आहे की नाही
विकास म्हणजे काय नेमके असेल कळले तर सांगा
मधात घोळवलेले नक्की गाजर आहे की नाही
वाट वाकडी करून केवळ हेच बघाया आलो की
तुझ्या घरी माझाही थोडा वावर आहे की नाही
कितीक केले यत्न तरी ही व्यथा मनातुन जाईना
काय माहिती तिला छानसे सासर आहे की नाही ?
तिच्याबरोबर फिरताफिरता लाखाचे बारा झाले
शंका आहे.. शंभर म्हणजे शंभर आहे की नाही
इतरांइतका जगलो, सुकलो, मी सोडुन सगळे फुलले
बघ माझ्याही नशिबामध्ये मोहर आहे की नाही
तेच प्रश्न अन् तीच परीक्षा कशी द्यायची दोघांनी
तुझ्या नि माझ्या मध्ये काही अंतर आहे की नाही
कसा आहेस जातायेता हे सगळ्यांनी पुसले पण
कुणी न पुसले टोपलीमध्ये भाकर आहे की नाही
छान आहे.
छान आहे.
थॅंक्यू...
थॅंक्यू...
थॅंक्यू...
थॅंक्यू...
वाह... मस्तच...
वाह... मस्तच...
सुंदर
सुंदर
धन्यवाद आदरणीय...
धन्यवाद आदरणीय...