५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी.
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग...
एखादे राजेशाही घर असते, ऐपतीप्रमाणे ते सजवलेले असते, चिरुट किंवा सिगार ओढणारे [हिं.चि. नियम क्र.१ श्रीमंत माणसे सिगारेट ओढत नाहीत, फक्त चिरुट/सिगार.] पिताजी/डॅडी/चाचाजी असतात, प्रसंगानुरुप सजलेली नायिका असते, तिच्या मैत्रिणी असतात, एक रुबाबदार (विलायतसे लौटा हुआ डॉक्टर/इंजिनीअर/कारखानदार/गेला बाजार पिताजी/डॅडी/चाचाजी के बचपनके दोस्त का बेटा) तरुण असतो, आणि पुढे घडणार्या प्रसंगांना साक्षीदार व्हावेत म्हणुन की काय ५-५० पाहुणे आलेले असतात. अशावेळी उंची पोशाख केलेला एक आगंतुक येतो, नायिकेची आता चुळबुळ सुरु होते. तिची एखादी जिवश्चकंठश्च मैत्रिण तिचा अलगद येउन खांदा दाबते. चाणाक्ष वाचकांनी आतापर्यंत ओळखले असेलच की हा नायक आहे. [हिं. चि. नियम २ तुम्ही नायक असाल तर तुम्ही डॉक्टर/कारकुन/ड्रायव्हर/बेरोजगार काहीही असा, तुम्ही मैफिलीत येताना सुटबुटातच येता.] त्याची जणु वाट बघत असल्याप्रमाणे पिताजी/डॅडी/चाचाजी त्याची आधीच्या तरुणाशी ओळख करुन देतात आणि बॉम्ब टाकतात की मैने अपनी प्यारी बेटी/भांजी की शादी/ सगाई इसके साथ तय की है. आलेला नायक जर दिलीपकुमार कॅटेगरीमधला असेल तर तो डोळ्यावर अचानक प्रकाशझोत पडलेल्या हरणासारखा जागच्याजागी स्तब्ध होतो. आणि तो जर प्रदीपकुमार, मनोजकुमार कॅटेगरीतील असेल तर आपण सुटकेचा निश्वास टाकतो की बरं झालं बाई, नायिकेने अशोक कुमार, प्राण किंवा किंवा असाच कुणीतरी सेन्सिबल माणुस गाठला.
इथपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं. तेवढ्यात जमलेल्या ५-५० जणांपैकी कुणालातरी आत्तापर्यंत आपल्याला स्क्रीनटाइम आणि डॉयलॉग न मिळाल्याचे वैषम्य येते. तो डिक्लेअर करतो की इस खुशीके मौकेपर गाना हो जाना चाहिये. [हिं. चि. नियम ३ तुम्ही स्त्री/पुरुष/इतर काहीही असा, तुमचा पोटापाण्याचा उद्योगधंदा काहीही असो, तुम्ही शीघ्रकवी+गायक असणे गरजेचे आहे.]
ऑन दॅट क्यु, नायक स्टॅच्यु पोझिशनमधुन बाहेर येतो अन काय आश्चर्य, गायला सुरुवात करतो. (नायिकेचे लग्न ठरत असण्याच्या/त्याच्या बेकारीच्या काळात त्याने घरी बहुधा सराव केला असावा. या काळात नायिकेच्या पि/डॅ/चा ना पटवण्याचा प्रयत्न केला असता तर ये नौबत न आती. असो.)
बरं गाणे वगैरे एक वेळ ठीक आहे, पण तुझे नायिकेवर प्रेम आहे ना, मग तिला सर्वांसमोर शालजोडीतले कशाला? कोपर्यात घेउन विचार ना की अचानक का बुवा बेत बदलला? हवे तर पुढे काय करायचे याची हींट दे. पण छे! अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत असतो, तसा त्याला आता नायिकेचा पाणउतारा दिसत असतो.
वानगीदाखल ही गाणी पहा....
भिगी रात मधे मीनाकुमारी आणि उमद्या अशोक कुमारच्या भावी लग्नाची पार्टी आहे. तिथे येउन टपकलाय प्रदीप कुमार आणि म्हणतोय काय तर, "दिल जो न कह सका वही राज-ए-दिल कहने की रात आयी"
का? ज्योतिष्याने मुहुर्त काढुन दिला होता का आजचा? बरं, एखादं कडवं म्हणुन झाल्यावर थांबावं, जरा आजुबाजुच्या परीस्थितीचा अंदाज घ्यावा, कुठलं? इकडे अशोक कुमारची भुवई चढलेय, मीनाकुमारीला रडु कोसळतयं आणि हा आपला गातोय "मुबारक तुम्हे किसी की लरजती सी बाहों में रहने की रात आयी". अरे असं नसतं, छान रांगा-बिंगा लावुन, स्टेजवर जाउन, फोटो-बिटो काढुन मुबारकबात दयायची असते.
नाहीतर हा मनोजकुमार आदमीमध्ये. दिलीपकुमार सुटाबुटात पियानो आळवत वहिदा रेहमानला सांगतोय
"कैसी हसीं आज बहारों की रात है, एक चांद आसमा पे है, एक मेरे साथ है"
तिला जरा अटेन्शन एन्जॉय करु दे ना. तु कशाला मध्ये तोंड घालतोयस? तुझा मित्र किती आनंदी आहे, बघवत नाहीये का? त्यालाच सांगतोय "मेरी खुशी भी आप के दामन मे आ गयी". तरी बरं दिलीप कुमार आपल्याच धुंदीत आहे आणि त्याचं मनोजकुमारकडे लक्ष नाहीये.
आणि आदमीमध्ये वहिदाला पुरेसा त्रास नाही दिला वाटतं, पत्थर के सनम मध्ये परत तेच?
"तुझे हमने मोहोब्बत का खुदा जाना, बडी भूल हुई" झाली ना चुक, मग सुधार आता. एवढी छान मुमताज घुटमळतेय आजुबाजुला. मैफिलीत छद्मी हसणारा प्राण आणि ललिता पवार आहेत. जीव नकोसा करतील ना ते वहिदाचा. वरतुन मानभावीपणा आहेच. "शीशा नही सागर नही, मंदीर सा एक दिल ढाया है"
गेल्यावेळी दिलीपकुमारच्या मैफिलीत रंगाचा बेरंग झाला होता, त्यावरुन तो काही शिकेल? नाव नका काढु. राम और श्याम मधे तोही तेच करतोय. "कल तेरी बज्म से दीवाना चला जायेगा". अरे मग वाट कशाची बघतोयस? काय तर म्हणे "तुने लेकिन ना मेरा राज-ए-मोहोब्बत समझा, तेरी आंखोने मेरे प्यार को नफरत समझा" अरे बाबा नक्की ठरव काय ते तिने तुला सोडलय का तिला काही समजत नाही म्हणुन तु जातोयस.
प्रेमीजनांमधे थोडेफार गैरसमज असंतील तर एक वेळ क्षम्य. पण जब जब फुल खिले मधल्या या शशी कपुरचं काय करावं? स्वतःच्या घरातल्या पार्टीत हा गातोय की
"तेरी बाहों में देखु सनम गैरो की बाहें, मै लाउंगा कहा से भला ऐसी निगाहे"
अरे बायको ना ती तुझी. थोडातरी विश्वास ठेव. निदान घरातले पाहुणे-बिहुणे गेल्यावर तरी बोल काय बोलायचे ते.
आणि ५० वर्षांनंतर याच सिच्युएशनवर राजा हिंदुस्तानीमधे आमिर खान पण तेच करतोय? अरे निदान आधीचा पिक्चर तरी बघायचा रे.
शशी कपुरला बहुतेक नायिकेला टोमणे मारण्यात मजा येत असावी कारण आ गले लग जा मधेही तेच. म्हणे
"अपना है क्या, चाहे जिए मरे कुछ हो, तुझ को तो जिना रास आ गया"
शर्मिला कावरीबावरी होउन फिरतेय आणि शत्रुघ्न सिगरेटीवर सिगरेटी फुंकतोय, नशिब ओरडला नाही 'खामोश' म्हणुन.
त्याचाच भाउ शम्मि. तो ही काही मागे नाही या बाबतीत. 'ब्रह्मचारी'मधे नायिका खुश आहे, त्याला गाणे ऐकवायला सांगतेय तर म्हणे "मत हो मेरी जां उदास"
उरला ज्येष्ठ बंधु राज, त्याने तरी कशाला आवर घालावा आपल्या भावनांना? 'अनाडी'मधे नुसतीच आपली पार्टी आहे, कुठली सगाई नाही, कुणी प्रतिस्पर्धी नाही, नुतनने त्याला सोडलेही नाही. तरी पण हा म्हणतो की "मेरे दुखते दिल से पुछो, क्या क्या ख्वाब सुनहरें देखे" आनुवांशिक रोग आहे का या कपुर घराण्याला?
एखादीला चारचौघात शालजोडीतले मारण्याचा मोह तरी किती असावा? देव आनंद ज्याने मधुबाला, वहिदा, नुतन यासारख्या सुंदर नायिकांशी प्रणयाराधन केलेय, त्याने गॅम्बलरमधे "दिल आज शायर है" गाउन जाहिदाला जाहिर त्रास द्यावा?
या रोगाची पुढची अवस्था आहे, स्टेजवरुन प्रेयसीचा (बचपनच्या हं) जीव नकोसा करणे जसे की
"क्या हुआ तेरा वादा" अरे लहानपणी तू जे तुणतुणे वाजवत होतास, त्यावरुन तिने तुला आत्ता ओळखावे का? ते सुद्धा ऋषी कपुरसारखा प्रॉस्पेक्ट समोर असताना?
नायिकाही मागे नाहीत बरं का!
वहिदाला इतक्या जणांनी सुनवलेय की तिने बहुतेक सुड म्हणुन 'रंगिला रे' केले असावे. देव आनंदवर काही परीणाम आहे का त्याचा? त्याच्या चेहर्यावर तर आश्चर्याचे भाव आहेत. जाहिदा वैतागलीय पण तिला विचारतो कोण?
तेच बहुतेक मीनाकुमारीचे झालेय. तिने तरी किती ऐकुन घ्यावे "रंग और नुर की बारात" वगैरे. मग तिही राजकुमारच्या लग्नाच्या पार्टीत म्हणणारच ना "किसी के इतने पास हो के सब से दुर हो गये"
राजकुमार मात्र खजिल झालाय. साहजिकच आहे, मीनाकुमारीला सोडुन नादिराशी लग्न केल्यावर दुसरे काय होणार?
माला सिन्हाचे मात्र नशिबच फुटके. तिने एखादा अशोक कुमार किंवा रहेमान बघुन लग्न करावं, तर सभ्य म्हणुन ओळखले जाणारे सुनिल दत्त किंवा गुरु दत्त तिच्या सासरी जाउन गाणी म्हणणार "चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" आणि "जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला"
अजनबी बनायचे आहेच तर मग मुळात ओळख का दाखवायची? आणि गुरु दत्त म्हणणार की "उफ्फ न करेंगे लब सी लेंगे आसु पी लेंगे". बोले तैसा चाले वगैरे माहीत नाही का रे तुला?
मग तिने बिचारीने अशाच एखाद्या वेळी धर्मेन्द्रला सुनावले
"गैरो पे करम अपनो पे सितम, ऐ जान-ए-वफा ये जुल्म ना कर" तर काय चुकले?
आता नायक-नायिकेचं दोषारोप प्रकरण सुरु असताना, इतर लोक ठोंब्यासारखे उभे असतात आणि गाणं संपल्यावर टाळ्या वाजवतात. मान्य आहे की रफी/लताच्या मखमली आवाजाने एक वेगळीच गुंगी येते. किंवा त्या काळी भारतातली असहिष्णुता वाढली नसावी कदाचित. नाहीतर अशा प्रसंगात जनरली आप्त(मित्र)गण हिंसक प्रव्रुत्तीचे दर्शन घडवायला उत्सुक असतात.
अलिकडे मात्र अशी गाणी कमी झाली आहेत हे खरं. नायिकाही खमक्या झाल्या आहेत. केलाच कुणी लग्नसमारंभात "अच्छा चलता हुं, दुआओं में याद रखना" म्हणण्याचा प्रयत्न तर सरळ हात धरुन बाहेर काढतात.
"कालाय तस्मै नमः", दुसरे काय?
वि. सु. : हा लेख माझ्या पर्सनल ब्लॉगवर पूर्वी प्रकाशित झालेला आहे.
@अतूल हे "तू औरोंकी क्यो हो
@अतूल हे "तू औरोंकी क्यो हो गयी" हे गाणे मला एकेकाळी आवडायचे. एकाने कॉलेजमध्ये दिव्य आवाजात ऐकवल्यानंतर मला आवडेनासे झाले. अवांतर : त्या गाण्यातील हिरो म्हणजे देब मुखर्जी हा जॉय मुखर्जीचा भाऊ. ह्या देब मुखर्जीला "जो जिता वही सिकंदर" मध्ये राजपुत कॉलेजच्या कोचच्या रोलमध्ये शेवटचे पाहिले होते. (सध्याच्या काळातील दिग्दर्शक अयान मुखर्जी हा ह्याच देब मुखर्जीचा मुलगा).
अतुल, अगदीच! या गाण्याची
अतुल, अगदीच! या गाण्याची आम्हीही खूप चेष्टा करायचो. आमच्याकडे 'किशोर इन ब्लू मूड' नावाची कॅसेट होती त्यात हे गाणं होतं.
तू औरों की क्यूं हो गयी >>>
तू औरों की क्यूं हो गयी >>>
कुठेतरी वाचलं की त्या नायकाने म्हणे एल्विसच्या डान्सचं अनुकरण केलं आहे. हे जर एल्विसला कळलं असतं तर त्याने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असता १०० कोटीचा.
मला तर वाटतयं संध्याची शिकवणी लावली होती. (जिज्ञासूंनी पहा जलबिन मछली किंवा छबिदार छबी)
लेख अतिशय आवडला. फारच भारी
लेख अतिशय आवडला. फारच भारी आहे एकदम.
मला हे नेहमि प्रश्न पडायचा कि नायक नायिका आपसातले गार्हाणे असे चव्हाट्यावर का मांडत असतील?
त्यातून पार्टित असली गाणि सहन करणारे इतर लोक ही दिव्यच म्हणावे लागतील.
चाँदी की दिवार ना तोडी प्यार भरा दिल तोड दिया.. पण त्याच कॅटेगरीत बसेल काय?
अगदि जुन्या एका सिनेमात पण दिल ने फिर याद किया बर्क सी लेहेरायी है गाण्यात धर्मेंद्र, रेहेमान आणि नूतन एका नावेतून चाललेत आणि आपसात शाब्दिक जुगलबन्दी खेळतायत.
अगदी शेवटी मुकेश हुकुमाचा एक्का वगैरे टाकतो... "हम वो परवाने है जो शम्मा का दम भरते है.... ते ही शमा आणि तिचा आशिक नम्बर २ समोर बसलेला असताना त्यातून नाव. दिला असता ढकलून तर कळलं असतं
या धाग्यावर आलेली बरीचशी गाणी
या धाग्यावर आलेली बरीचशी गाणी हि नायक/नायीकेने मागचे-पुढचे सगळे पूल जाळुन टाकल्यावर उद्वेगाने गायलेली आहेत. हे एक कदाचित त्यात फिट बसणार नाहि, पण यातहि लटका असला तरी राग आहे, तक्रार आहे. पियानो नाहि, माहोल हि वेगळा आहे पण मूळ भावना तीच आहे. शेवटचा मंदगतीतला ठेका तर अगदि कातील...
खिलोना मधलं - सनम तु बेवफा के नाम से...
रोटी कपडा और मकान मधील एकट्या
रोटी कपडा और मकान मधील एकट्या मुकेशचे 'मै ना भुलुंगा 'याच पद्धतीने. या उलट ddlj मधे शाहरूख काजोल ला तिच्या होणार्या नवर्यसमोर सांगतो 'लेने तुझे गोरी आयेंगे सजना'शेवटी तीच म्हणते 'कुछ और अब ना केहना'
रंग बरसे .. नाही टाकलं का
रंग बरसे .. नाही टाकलं का कोणी या लिस्ट मध्ये? का ते नाही चालणार ?
लेख आणि प्रतिसाद दोन्ही
लेख आणि प्रतिसाद दोन्ही खुसखुशीत
शिरीष कणेकरांनी
शिरीष कणेकरांनी म्हटल्याप्रमाणे, आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये - आप जैसा, तूच असं काही नाही.
हेहेहे
हेहेहे
'कोणी पण चालेल रे गणू तुझ्या सारखा.तू मिळालास तर ठिके.नॉट बॅड.'
हे आधी पण झालंय चघळून.
तो नाही का, 'चांद सी मेहबुबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था'
इथे मेरी नंतर कॉम दिला तर नायिकेची प्रचंड हेटाई
आणि कब नंतर दिला तर एकदम मस्त तारीफ के फूल.
तो शहाणा कुठे कॉमा देऊन म्हणालाय हे आधी भांडण झालंय का यावर अवलंबून.
जिसके लिये सबकुछ छोडा उसीने
जिसके लिये सबकुछ छोडा उसीने मेरे दिलको तोडा - नूतन , विनोद मेहरा, रेखा , राजेंद्र कुमार .
तो नाही का, 'चांद सी मेहबुबा
तो नाही का, 'चांद सी मेहबुबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था'
इथे मेरी नंतर कॉम दिला तर नायिकेची प्रचंड हेटाई
आणि कब नंतर दिला तर एकदम मस्त तारीफ के फूल. Happy
तो शहाणा कुठे कॉमा देऊन म्हणालाय हे आधी भांडण झालंय का यावर अवलंबून.>> +११
हे गाणं अनेकदा ऐकलं आहे पण नक्की मुकेशला यातून काय भाव दाखवायचे आहेत ते अजूनही उमगलेलं नाही संथ, एकसुरी म्हटल्यासारखं वाटतं. बरेच वेळा मेरी नंतरच पॉज आहे असं वाटतं!
मस्त लेख...
मस्त लेख...
पूर्वीच्या काळची पार्टी
पूर्वीच्या काळची पार्टी सॉन्ग्स बर्याचदा फक्त टोमणे मारण्यासाठीच असायची.
तू प्यार है किसी और का (अगं बाई, मेरा च)...
जीता था जिसके लिये, जिसके लिये मरता था( परत तेच... अगं बाई, तेरे लिये च)
ग्रँड पियानो मस्ट होता हं पण. त्यावर बसून टोमणे जोरात लागायचे बहुतेक.
पूर्वीच्याच काळी असली गाणी
पूर्वीच्याच काळी असली गाणी असायची असं नाही. चन्ना मेरेया पण ह्याच कॅटेगरीतलं गाणं आहे. टोन थोडा ‘ तेरे सारे दुख मेरे, मेरे सारे सुख तेरे‘ आहे, पण हीरॉईनच्या आनंदाच्या प्रसंगी जाऊन तिला भूतकाळाची आठवण देणारं गाणं म्हणून दाखवायचा प्रकार तोच आहे.
तू प्यार है किसी और का (अगं
तू प्यार है किसी और का (अगं बाई, मेरा च)... >>>
पण हीरॉईनच्या आनंदाच्या प्रसंगी जाऊन तिला भूतकाळाची आठवण देणारं गाणं म्हणून दाखवायचा प्रकार तोच आहे. >>> टोटली
अशा प्रसंगांबद्दल रिक्षा. मैफिल बघा त्यात
क्या बात है फा!! ह्या
क्या बात है फा!! ह्या निमित्तानं तुझा तो लेख परत वाचला. मजा आली.
चांद सी मेहबुबा>>>>>यात
चांद सी मेहबुबा>>>>>यात त्याला काय म्हणायचे आहे ते मला कधीच कळत नाही. म्हणजे बाई तू चांद सी आहेस का नाहिये?
अजून एक आठवलं , तरसता हुआ
अजून एक आठवलं , तरसता हुआ तुम्हे छोड दे...... something......मेरा घर खुला है खुलाही रहेगा तुम्हारे लिये. हे चारचौघात आहे की नाही माहीत नाही पण शालजोडीतलं आहे
आणि हे शालजोडीतले न देता
आणि हे शालजोडीतले न देता डायरेक्ट कानाखाली
भर पार्टीत हिरोईन आणि फियांस असताना बोट दाखवून 'दिल चिरके देख तेराही नाम होगा' किंवा 'मेरे बाद अब किसको बरबाद करेगी' म्हणून बोटं दाखवत खुन्नस देऊन नाचणे.
मिलिंद गुणाजी च..
मिलिंद गुणाजी च..
ये तेरी आंखे झुकी झूकी ये तेरा चेहेरा खिला खिला बडी किस्मत वाला हे जो प्यार तेरा जीसे मिला..
यातले, ज्याला शालजोडीतले दिलेत त्या हीरो चे भाव बघण्यासारखे आहेत बाई आधी तिने मारलं म्हणून मी तिला मारलं types
फेफ थॅंक्स
फेफ थॅंक्स
तसेच ती व्हिलनच्या अड्ड्यात जाउन त्याच्यासमोरच नाचून आज आम्ही सगळा बदला घेणार , दुश्मन को मारेंगे टाइप गाणी म्हणणेही यातच येइल बहुधा.
मस्त मस्त!
मस्त मस्त!
भर आनंदी पार्टीत सगळ्यांना कळेल अशी दर्दभरी अगदीच सुचक गाणी कशी कोण गाउ शकतं असं वाटतं ही गाणी बघुन. आणि प्रेक्षक सोडुन बाकी पार्टीतील लोकांना काही घेणं देणं नसतं की हा बाबा इतक्या आनंदी प्रसंगात असं का गातोय? कुणाला उद्देशुन गातोय वैगेरे.
प्रतिसादात पण मस्त गाणी आलीत.
पण तेरी गलियोमे ना रखेंगे कदम हे ह्या जॉनरमधलं एकदम बेस्ट. अरे प्रसंग काय? तु बोलतोस काय? कुणाला बोलतोस? का बोलतोस? काय संबंध? बट हु केअर्स??
दुसरं रामअवतार मधलं तेरी बेवफाईका शिकवा करु तो ये मेरी मोहब्बतकी तौहिन होगी! अगागा! अरे बास की रे
क्या हुआ तेरा वादा...
क्या हुआ तेरा वादा...
हे पण त्याच कैटेगरीतले वाटतय.
रंग और नूर की बारात किसे पेश
रंग और नूर की बारात किसे पेश करु' याच पठडीतील. नायिकेच्या लग्नातील.
यात 'मेरे मेहबूब' मधील
यात 'मेरे मेहबूब' मधील 'जानेमन एक नजर देख ले' हे गाणं नक्कीच घालावं लागेल. अमिता म्हणजे सहनायिकेने राजेंद्रकुमार नामक नायकाला इतके टोमणे मारले आहेत की बस्स! आणि हे सगळं नायिका साधना-म्हणजे तिची मैत्रीण आणि नायकाच्या सगाईच्या प्रसंगात!
नमुन्यादाखल काही ओळी - नायकाला उद्देशून
'चाहे अपना ना बना, नीची नजरे तो उठा, गैर ही जानकर देख ले!"
'जुल्फ के साये तले प्यार का राग चले, चाहे गममे कोई जलता हो तो जले, तू खुशी की सेहर देख ले!'
'जान ले मेरी सदा, मैने हर जज्बा ए दिल तुझपे कुर्बान किया, मेरा दिल और जिगर देख ले!'
हे चालू असताना नायकाभोवती घिरट्या घालणं, रागीट कटाक्ष फेकणं सगळं चालू आहे
हे कमी म्हणून की काय, ती नायिकेकडे वळते.
'मेरी कसम मेरे डगमगाते है कदम, जी मे आता है यही चुरालू तेरा सनम!'
राजेंद्रकुमार कमालीचा uncomfortable दिसतो आहे (म्हणजे तो नेहमीच तसा दिसतो त्यामुळे त्याने नैसर्गिक अभिनय केला आहे!) पण साधनाच्या डोक्यात काडीचाही प्रकाश पडलेला नाही
म्हणजे तो नेहमीच तसा दिसतो
म्हणजे तो नेहमीच तसा दिसतो त्यामुळे त्याने नैसर्गिक अभिनय केला आहे! >>>
म्हणजे तो नेहमीच तसा दिसतो
म्हणजे तो नेहमीच तसा दिसतो त्यामुळे त्याने नैसर्गिक अभिनय केला आहे!)
>>>
“ये तेरी आंखे झुकी झुकी” मधे हिरो का खजील झालाय? मिलींद गुणाजी नक्की कुणाला उद्देशून गाणं म्हणतोय?
तसेच ती व्हिलनच्या अड्ड्यात जाउन त्याच्यासमोरच नाचून आज आम्ही सगळा बदला घेणार , दुश्मन को मारेंगे टाइप गाणी म्हणणेही यातच येइल बहुधा.
>>>
याची एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकते एवढं मटेरीअल मिळेल.
फारएण्ड तुम्ही मनावर घ्याच.
“ये तेरी आंखे झुकी झुकी” मधे
“ये तेरी आंखे झुकी झुकी” मधे हिरो का खजील झालाय?
ह्याच हिरोला मदत करा म्हणून आज पुजा भटने आवाहन केलंय.
छान लिहिले आहे धाग्यात .
छान लिहिले आहे धाग्यात . शालजोडीतली आठवत नाहीत पण कर्ज (जुना) मधलं हे गाणं https://youtu.be/fTgVxro9lbM?si=PgW7VHo7i3bWx3-N डायरेक्ट गेल्या जन्माचा हिसाब विचारणारं ,तेही धड्या सारख्या गाण्यात हिरो स्टेजवर स्टोरी नाट्यमयरीत्या पुन्हा दाखवून ,व्हिलनीला घाबरण्याचे प्रयोग करतो. ते त्या काळात जाम हिट झाले होते. त्या काळातली रिवेंज स्टोरी मलापण आवडली होती.स्पेशली गाणी.
गमतीची बाब म्हणजे लोकांना ते खरे वाटतात. आजच्या काळात असे चित्रपट चालतील तरी का.
Pages