अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शिणलो मी
कोणत्याही दिवसापासून सुरू करा आणि वर्तुळामध्ये घिरट्या घालत रहा... तितकेच फिट्ट बसेल. डायरी नाव देताच 'अनुदिनी अनुतापे तापलो रामराया' आठवले. मगं संसारतापासाठी अनुदिनी अगदीच जुळते की म्हणून अनुदिनी केले.
१. किराणा घराणा / घरी आणा.
कुठलाही दिवसं
काय हे शेंगदाणे का नाही सांगितले ...मी आणले नसते का, बघं आता डब्यात वाटीभर राहिलेत फक्त !
मी तुला पालक तरी कुठे आणायला सांगितलं होता तो आणलासं नं मनाने आता दोन पिशव्यांचा काय पालक फेस्टिव्हल करू.....! का नाही आणले शेंगदाणे , नाही तरी तूच येताजाता भरतोस, तुला लक्षात यायला होते मगं.
**********
कुठलाही इतर दिवस
(स्थळः मी बाथरूम स्वच्छ करतं आहे. यादी whatsapp केली आहे. )
आई S S , बाबाचा मेसेज आहे की गूळ , हिंग , हिरव्या मिरच्या नाही मिळताहेत अलिबाबा या दुकानात...
आता अलिबाबात का गेला असेल हा मी हिमालयात जा म्हणून सांगूनही का करतो असं...
आईss , बाबा विचारतोयं काय करू , आई s s...
मुलं तर स्वगतही बोलू देत नाहीत.
काही करं ...जा म्हणावं ...
मी टाइप करू ?
हो करं,
हाय बाबा , This is Dada , आई says , काही करं जा...
इंग्रजीतून करू शकतोस ....
केलं मराठीतून.....
अडली हरिणी.. दोन सेकंदाने लगेचच.
हिमालयात जां जमलं तर लिही...
ओके आई.......
*******
लहानपणापासून स्वप्न होतं , हिमालयात जायचं , ते दर महिन्याला "असं" पूर्ण होतं !! देव फार चुकीच्या वेळेला तथास्तु म्हणतो आणि आपली गंमत पहातो ...नाही !
बरं एवढ्या याद्या करून , दुकानं दुकानं हिंडून स्वयंपाक काय करावा हा प्रश्न ही रोजचाच.
सामानही आणूने आणि स्वयंपाकही करूने.....
आणि हा विचारही आणू नये कारण दुसऱ्या दिवशी त्याचा फोलपणा लक्षात येतो. आणि आपल्याला पुन्हा कळते की वाटतं तितकी काही गृहकृत्यदक्ष नाही मी.... मौनं सर्वाथ साधनं.
***********
२. स्वयंपाक आणि शिळे अन्न व्यवस्थापन
माझी मैत्रीण याला 'जीवन आणि मरणाचा' प्रश्न या चालीत 'जेवण आणि वरणाचा' प्रश्न म्हणते. अगदीच खोटं नाही काही. नाही तर विविधतेसाठी पाककृतीवर लोकांनी उड्या मारल्या नसत्या. कित्येक मेनूंच्या याद्यांमध्ये जीव गुंतला नसता. चव आणि पोषणमूल्ये यांचा सि- सॉ रोज खेळावा लागला नसता. मुलांनी नाश्त्यासाठी आइसक्रीम आणि चिप्स खाल्यातर आईला ' देवा मला माफ कर ' वाटलं नसतं. अगदी 'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' या स्वामी योगानंदांच्या आत्मचरित्रात सुद्धा त्यांच्या गुरूंनी (युक्तेश्वर गिरी) त्यांच्याशी , "आधी नीट भात टाकता आला पाहिजे , साधा भात धड शिजवता येत नाही तिथे निघाले परमसत्याचा शोध घ्यायला" या आशयाचे संभाषण केले आहे.
**********
कधी उरला तर तो एक उपप्रश्न होऊन बसतो ते वेगळचं. माझी आत्या फ्रिझमधल्या उरलेल्या शिळ्या पदार्थांच्या वाट्यावर वाट्याला घटस्थापना म्हणते. ही घटस्थापना जवळजवळ रोजं रात्री होते. नवरात्राची वाट पहायची गरज नाही. कधीतरी ही दहिहंडी कोसळते सुद्धा , मगं आधीच खाऊन किंवा टाकून दिलं असतं तर पीडा गेली असती असंही वाटतं. पण त्याने आपल्या 'गृहकृत्यदक्ष-गृहकृत्यदक्ष' खेळात आपण नवरा / सासू / आई / स्वतः यांच्या नजरेत आउट झालो असतो तर भोगा आता , घ्या फडकं !
आमची विकतच्या समोशांची चटणी प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेजला सांडली आहे. आधी पिशवीत , मगं गाडीत , मगं जेवणाच्या टेबलवर मगं फ्रिजमध्ये. एकदा एक मैत्रीण तर नवऱ्याबद्दल म्हणाली ' अरे मनिष को तो panic attack ही आता है चटनी को लेके, हमारी गाडीकी सीट खराब हो गयी है जबसे.....' जन्माची मैत्री झाली आमची अर्थातच. #मैत्रीओव्हरचटणी#
************
मला आजतागायत जस्ट इनफ किंवा मोजून काही करता आलं नाही. प्रेम, भक्ती आणि स्वयंपाक सारखचयं माझ्यासाठी, थोडासा तरी जास्तच होतो. काही काही जणं असतात ज्यांना खूप उरले की खूsप आनंद होतो , उद्या भरपूर शिळे मिळणार या आनंदाने त्यांचे डोळे चमकतात. हा आनंद मला विकृत वाटतो. पण साबा आणि मुलांचा बाबा यांच्या अशा आनंदाकडे नियमितपणे बघून नजर मेलीये. चमचाभर भात सुद्धा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी फोडणी देतात आणि कौतुकाची अपेक्षा करतात. मी मात्र रात्रीच टाकून दिलं असतं तर मसाला व फोडणी वाचली असती असे बघून नजरेने पाणउतारा करते. ते मनावर घेत नाहीत कारण ते #गृहकृत्यदक्ष# आहेत. पण मीही काही कमी नाही हं जेव्हा दूधीची सालं मला आठवणीनं वेगळी ठेवायला लाऊन साबा त्याची चटणी करतात मी त्याला पेस्टिसाइडची चटणी म्हणते आणि न खाण्याचा अभिनय करते. यावेळी त्या #GKD - GKD# खेळत नाहीत कारण जेवणं झाली की त्यांना पडायचं पडलेलं असतं.
**********
एकदा आम्ही आमच्या इथल्या नातलगांना भेटायला L.A. ला गेलो होतो. काकूंनी मस्त स्वयंपाक केला . जेवायला बसलो. नव्या गोड सूनबाई येतच होत्या. मी फ्रिझजवळच्या संशयास्पद हालचाली बघून काकूंना म्हणाले. " काय चाललयं काकू तिचं ? " " अगं ती कुठलतरी डाएट करते ते आणतं आहे ," " काय असतं त्यात " " बघं की ...बघं की आता काय आणते ती डब्यात, " इति काकू. " या डब्या पोस्टानी येतात म्हणे , आपण सांगितलेल्या वेळेला खायच्या.. वजन कमी होतं म्हणे . "
हे ऐकून वजनाच्या आशेने नवऱ्याचे आणि स्वयंपाक करावा लागत नाही या आकाशवाणीने माझे असे एकदाच दोघांचे डोळे चमकले. आमचे डोळे एकत्रितपणे तीनच वेळा चमकले आहेत. दोन मुलांच्या जन्माच्या वेळी + अँलेक्सिया जाऊबाईच्या डब्या बघून. आम्ही भाकरी , पातळ भाजी, टमाट्याची चटणी, भात , आमरस खाऊनही गप्प होतो. फ्रेश न्यु जाऊबाई तीन मसाल्याच्या पाळ्याएवढ्या डब्या मधली खळ खाऊन ' I think I am full , I guess my tummy is getting smaller , वगैरे " मी अवाक !
मुलांना हन्ग्री हन्ग्री हिप्पो खेळायला पाठवून मी व्यवस्थित सगळी माहिती घेतली आणि आजतागायत कधीही वापरली नाही. शिळ्या अन्नांच्या डब्यांना मात्र आम्ही 'शिकीटो' ( शिळे + कीटो ) डायट नाव देऊन आम्ही आता त्याचे स्थान उंचावले आहे. कधी दुसरे दिवशी क्लिअरंसवर ठेवून कधी तिसरे दिवशी late bird prizes म्हणून घरच्यांना गूंतवून ठेवून संपवतो. काही वर्षांपूर्वी रिडर्स डायजेस्टमध्ये एका stand-up comedian ने एकाच ओळीचा विनोद लिहीला होता. आमच्या आईने आम्हाला नेहमीच शिळेच खायला दिले कधी ताजे बनवलेच नाही.
***********
एवढ्या स्वयंपाकाच्या आयड्या वापरून सुद्धा खालील गोष्टी होतातच.
कोणताही दिवस
जेवायला बसताना ,भाजीचा रंग ओळखून पण नावं ठेवणे अलाउड नसल्याने झालेली शाब्दिक कसरत...
दादा : Could you please liberate me on eating पोळी भाजी वरण भात and just let me eat वरणभात !!
(याने दाबून नाश्ता केलेला असल्याने आणि त्यामुळे याला वरवर करायची गरज नसल्याने....)
आईः लिबरेट व्हायला आणि करायलाच आलेयं मी , केलं लिबरेट काय खायचं ते खा...
कोणताही इतर दिवस थँगॉड एकेच दिवशी होत नाही हे....
ताईः आई , मला पोळी भाजीच पुरे , वरणभात नको मला.
(एकुणच जेवणाचा आनंद असल्याने )
आईः नाही चिमा , थोडासा वरणभात खां, लांब केस हवेत ना तुला , लांs s ब केसाची प्रिन्सेस रपन्झल पण टावरमध्ये वरणभात खायची रोज , तिच्या आईला पोळ्याच्या कंटाळा होता , पण त्याचा असाही फायदा, केस बघं किती लांब झाले. ती इतकी हुशार आहे ह्या सगळ्या थापा आहेत माहिती तरी तेवढाच टिपी म्हणून ऐकते. मलाही वरणभात पोटात गेल्याशी मतलब असल्याने मी काही कळतयं असं दाखवत नाही.
गेला एकदाचा लिंबाएवढा वरणभात पोटात....
ह्याच्या हिशोबाने खरंतर आपल्या शंभर कँलरीज जळतात आणि मूल पन्नास कँलरीज एवढे खाते.
***********
३. मुलांचा अभ्यास
आताशा मी घेत नाही अभ्यास .. पण जुन्या आठवणींचे ओरखडे समजा..
एकदा बालवाडीत मी त्याचा तासभर अभ्यास घेऊनही मुलगा twenty five ला fifteen म्हणाला, मी मनातल्या मनात भिंतीवर डोके आपटले. त्याचे भवितव्य "या" वर अवलंबून आहे म्हणून तर काळजीने पाणी पाणी झाले. तो एक वर्ष पुढे आहे शाळेत तरीही अति उंचीमुळे मला काही दया आली नाही.
दुसऱ्या दिवशी आईकडे हे रामायण सांगताना तिने मलाच रावण बनवले. आमची आई ही डेली डोस ऑफ पाणउतारा देणाऱ्यांपैकी आहे. तिने मला आणि भावाला 'ग' ची बाधा होऊ नये म्हणून एवढी काळजी घेतली की आमच्या
आत्मविश्वासाची सुद्धा मारामार झाली. आधी डेली, मगं विकली नंतर मंथली आणि आता हा डोस ऑन कॉल मिळतो. तर तिने एका वाक्यात माझी चूक पटवली. "तू , त्याचा बाबा , त्याचा मामा सगळे साधारण असताना त्याच्याकडून ९५% ची अपेक्षा करणे बरोबर नाही. " कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त पाणउतारा करता येतो तिला , मैत्रिणी म्हणायच्या तुझी आई अनुराधा पौडवाल सारखी दिसते. मी मनात म्हणायचे जी तुम्हाला अनुराधा पौडवाल वाटते ती तिच्या मुलांसाठी ललिता पवार आहे खरंतर.... (माझी मुलगी माझ्या आईची मुलगी असली असती तर दोघींनाही चांगलीच अद्दल घडली असती ..असो , मला माझ्या आज्जीची आठवण येतेय).
*********
याचा परिणाम म्हणून मी कधीही मुलांना मार्कांवरून रागावले नाही. हळूहळू मला हे लहानपणी गिफ्टेड वगैरेचे लेबल लावणे पण चूक आहे हे वाटायला लागलं, सहाव्या वर्षी मूल अतिबुद्धीमान किंवा साधारण(?) आहे या किंवा अशा कुठल्याही निष्कर्षाप्रत येणे अत्यंत चूक वाटते. आता तर खूप मार्कस् = खूप हुशार=यशस्वी भवितव्य किंवा कमी मार्कस् = ढ =आयुष्य बरबाद याच्यावर माझाच विश्वास राहिला नाही , ज्याच्यावर माझाच विश्वास नाही ती गोष्ट मला इतरांना पटवून देता येत नाही.
बेसिकली दोन्ही टोकाला जाण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून आपल्या बाळाच्या आयुष्यात अनंत शक्यता असू शकतात ह्याचेच समाधान आहे. कलेच्या क्षेत्रात जा, शास्त्रज्ञ हो, संगीतकार हो , प्रोग्रॅमर हो, पोलर बेअर वर रिसर्च करं, काय करायचं ते करं पण मेहनत करं आणि मनं लावून करं हेच सांगितले जाते. याचा परिणाम की काय मला आता आठवण सुद्धा करून द्यावी लागत नाही , आपापले करतात सगळं.... आम्ही तर आहोतच पण प्रत्येक गोष्टीत मदत करून जबाबदारीची जाणीव / स्वयंप्रेरणाच हरवून गेली असे व्हायला नको म्हणून.
एकेकाळी एका मैत्रीणीला होमवर्क काय (सातवी) आला आहे हेही माहिती असायचे , मला म्हणायची तुला कसं माहिती नाही, मला गिल्टी वाटायचं की मला प्रत्येक गोष्ट का माहिती नाही. आता गरज वाटत नाही आणि गिल्टी पण वाटत नाही. अर्धा जीव कामात आणि अर्धा स्वतःला दोष देण्यात जातो कुण्याही आई किंवा बाबाचा हे लक्षात आले आहे, म्हणून दोष देणे बरेच कमी केले आहे.
*********
४. तांत्रिक घडामोडी
लेकीला बोलता यायला लागल्यावर पहिल्या शंभर शब्दात लिबूत म्हणजे रिबूट आणि बँत्तीओ म्हणजे बँटरी लो हे शब्द होते , म्हणजे आमच्या आयुष्यातल्या "ह्या" घडामोडींची मूळं कुठं आहेत बघा. घरातल्या करमणुकीचे एकमेव साधन असलेला यप्प नावाच्या भारतीय टिवीने फार रिबूट करायला लावले. मुलीला तान्ही असताना कळलं की हे "आई , काही तरी डब्बा बडवते , वायर खूपसते , मगं सगळे एकमेकांना आलं का/गेलं का विचारतात , आणि आई आणि आजी पुन्हा आनंदी होतात , शो लिबूत इज वेली इम्पॉलतन्त!!" नंतर यप्पला कायमस्वरूपी गप्प केले आम्ही अर्थात.
**********
मराठी उत्तम येण्याचा परिणाम म्हणून मागे मुलगी म्हणाली 'हेडबँडचा शाप आहे मला , सगळे तुटतात, हरवतात' , खरंय मलाही बँटरी/सेलचा शाप आहे , नेहमीच अगदी नेहमी मला डबल AA पाहिजे असतात तेव्हां ट्रिपल AAA घरात असतात आणि काही वेळा उलट... बाकी डि , सि , चपटी विषयीतर बोलायलाच नको. आता हूशार झालो आहोत कूर्मगतीने का होईना.. फोटो whatsapp करतो.
आमच्या whatsapp चा उपयोग किराणा , अमेझॉनच्या पावत्या , परतीचे बारकोड, सेल चे फोटो , इतर पावत्या , पत्ते , फोननं , अपोइंटमेंटच्या वेळा, मुलांचे पिकअप ड्रॉपऑफ वेळ आणि लोकेशन , प्रिंटरच्या कार्टरिजचे फोटो, वायफाय, नेटफ्लिक्स आणि इतर पासवर्ड, फ्लाईट डिटेल्स, बागकामाच्या सूचना , माती/खत/रोपटे , वेदर अँलर्टस्, निघालो/पोचलो , कुपन, बल्ब वोल्टेज नं, लेटेस्ट तोडफोडीमुळे संबंधित DIY विडिओ , गोष्टीच्या एक्झेक्ट मेजरमेंट , महत्त्वाच्या लिंक्स , खर्चाचे एस्टिमेट्स , नवीन खर्चाचे हेड्सप..... हे आणि हेच असते.
********
रिमोट हरवणे/सापडणे तर नेहमीच चालू असते ... जाते सोफ्यातच पण उठावं कोणं!! मी दोन रिमोट एकमेकांना टेपने चिकटवून ठेवलेत आणि तिसरे कुठेतरी फिरत असतेच. एकदा तर रिमोट बेपत्ता झाल्याने तीन दिवस बेबीटिव्ही पाहिला किंवा बंद ठेवला , ज्याला दुसरे काही पहायचेयं त्याने शोधा म्हणून इनाम ठेवला , शेवटी बातम्यांसाठी न रहावून नवऱ्याने शोधले सोफे व कुशन पिंजून .... काढून . दोन डॉलर इनामाचे मिळाले त्याला !! कधी कधी बाबा रामदेव यांच्या सोबत कसरतीसाठी वेळ घालवताना बरंच काही सापडलयं. Thanks Baba in case you are reading this...
*******
एकदा शेजारच्या उत्खननात माझ्या इंटरनेटचा जीवं गेला, अगदी केबलवरच कुऱ्हाड घातली मेल्यांनी, तो परत यायला तीन दिवस मला मजूरांचे स्पँनिश बहाणे ऐकावे लागले. मलाही फुटले होते का डोळे म्हणावे वाटले.... असो. स्पँनिश शिकणे बकेट लिस्टीत / इच्छा विहीरीत टाकले मात्र !! (एक कानात गोष्ट सांगते: टेक्सासचा पत्ता जरी अमेरिकेचा असला तरी ते आहे मेक्सिकोत.... संपली गोष्ट )
वायफाय किती त्रासदायक होऊ शकते हे (online school /External learning) इ- लर्निंग मुळे जाणवले . मुलीला शाळेने दिलेल्या क्रोमबुकची आमच्या वायफायशी सारखी कट्टी होते. मुलीचे म्हणणे आहे की "त्या"ला शाळेत रहायची सवय म्हणून ते इथे अधूनमधून "मैं कsहाँ हूँ " म्हणते. त्यामुळे वायफाय डिटेक्ट होतं नसले की आम्ही "त्याला मैं कहाँ हूँ होतयं" असं म्हणतो आणि 5G का 2G गं असं व्यर्थं पुटपुटतो.
एकुणच मुलालाही सारखं लेसन ऐकू न येणे , झुम मिटींग मध्ये आतबाहेर होणे याने तो वैतागल्यावर मी त्याला भोजपुरी स्टाइलने ते इ लर्निंग चे इ वापरून ," तनिक इलर्निंगवा तो करले बबुआ म्हणाले" तर समजूनही कुणीच अगदी कुणीच हसलं नाही. फार फार एकटं वाटलं हो..
Either I need better jokes or life... or both!!!
********
ह्या सगळ्यातून वेळ मिळाल्यावर आम्ही नेटफ्लिक्स नेटफ्लिक्स खेळतो म्हणजे काही एक बघण्यापेक्षा अजून काय बघू शकतो हे बघत रहाणे. मुलांना परवा म्हणाले " चला काही तरी सिनिस्टर/हॉरर बघूया मस्त " तर लेक , " माहिती तुझं सिनिस्टर , स्कुबी डू नाहीतर घोस्टबस्टर्स लावशील आता...." अगदी हेच् शब्द, उगीच नाही ते अद्दल वगैरे म्हणाले मी वर. बघा आता. त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून केलेल्या प्रयत्नाने आपलीच प्रतिमा खालावते. (धमाल मधल्या डाकू बाबुभाईची आठवण येते, त्यांचा तो संवाद " जबसे तुम ल़ोग मिले हो यार , मेरा तो आतंकही नही रहा" तसं काहीसं )
नेटफ्लिक्स पुरेसे न वाटल्याने माझा भाची सोबत " तुम हमे अमेझॉन प्राइम दो , मै तुम्हे नेटफ्लिक्स दुंगा " हा गुप्त करार सुद्धा झाला होता. फक्त आणि फक्त 'पंचायत' साठी हं ! मेम्बरशीप असेपर्यंत सिरीजचा फडशा पाडला अर्थातच.
***********
याच घडामोडीत
१. रिमोटच तुटून जाणे.
२. बँटरीवरचे झाकण तुटून जाणे.
३. बँटरी बदलताना बावळटासारखं काढलेलीच अर्धमेली बँटरी पुन्हा आत टाकून नवीन सेलच फेकून देऊन कधी नव्हे ते मूर्ख टापटीप करायला जाणे. परिणामी कचऱ्यात तोंड घालावे लागणे.
४. आणून लगेचच न टाकल्याने हरवून जाणे.
५. घरातल्या बाळाने सेलला च्युइंगम समजणे (वेळीच पकडले) . ह्याच बाळाने फोन जमिनीवर तबल्यासारखे बडवणे थांबवावे म्हणून रिमोटला शहीद करणे.
६. एकूण ह्या बाळालाच रिमोट , फोन, बटन, सेल, दाबणे आणि कशातही बोट घालणे बाबत कमालीची उत्सुकता असल्याने कधी या बाळाला कधी या वस्तुंना जपावे लागणे.
७. रिमोटवरून पाय घसरून पडता पडता वाचणे. मगं कोणी खाली टाकले हे शोधत बसणे.
८. कुठले चँनल बघायचे यात आगाऊ समजूतदारपणा दाखवून रिमोट दुसऱ्या व्यक्तीकडे फेकने आणि ते तिसरीकडेच पडणे.
९. रिमोटमध्ये चुकीचे सेल टाकून केबलमध्ये बिघाड झाला आहे असे समजून केबलवाल्याकडे तक्रार करणे. यात + / - हेही आले.(व्हायचयं अजून)
१०. तेच क्युरिअस बाळ दुसरं कोणं.. मोठं होऊन छोटा घरगुती Hacker बनणे आणि इंटरनेटवाल्यांनी सौम्य दमाचे प्रेमपत्र पाठवणे.
अशा अनेक उपघडामोडीही येतात. पण लक्षात ठेवा सगळ्या चुका आम्ही एकदाच केल्यात. आम्ही दरवेळी नव्या चुका करतो. त्यामुळे टिप्स देण्यास उशीर झालायं.
************
५. मुस्तफा दर्झी आणि मी...
आठवा कोण आहे तो मुस्तफा दर्झी... आठवा ..आठवा... नाही आठवलं तर आधी पाच बदाम खाऊन या. झाले खाऊन .... अलिबाबा आणि चाळीस चोर आठवते का , त्यात अलिबाबाचा भाऊ कासिम.. तोच तो लोभी , बायकोच्या 'दिनार आणा , दिनार आणा' या किरकिरीमुळे शहीद झाला. मूर्खच होता म्हणा साधं 'खुलजा सिमसिम' एवढा पासवर्ड लक्षात राहीला नाही. अशी वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला बदाम खायला लावले . उणेपुरे सात अक्षरं गाढवाला लक्षात राहिले नाहीत म्हणूनच डाकूंनी (डाकूच ते .. बगदादमध्ये त्यांचा एवढा दरारा असताना त्यांना चोर म्हणणे अन्याय आहे) त्याचे सात तुकडे केले असतील. तर हे तुकडे म्हणजे नैसर्गिक मौतीचे नाहीत हे बगदादच्या भोचक शेजाऱ्यांना कळू नये म्हणून मर्जिनाने डोळ्यांवर पट्टी बांधून ... तिच्या नाही , मुस्तफाच्या.... त्याला मूर्ख कासिमचे ताजे प्रेत शिवायला लावले... तो इतका निष्णात/आगाऊ होता की शेजाऱ्यांना कळले नाही आणि डाकूंना मात्र कळलेच.
तर माझ्या माहेरी आम्ही जे कोणी घरात त्यातल्या त्यात निष्णात असतं , त्याला प्रपंचातला मुस्तफा दर्झी म्हणतो. कामं doesn't have to be tailoring हं , काहीही असू शकतं , वरच्या तांत्रिक घडामोडी पूर्ण मोडण्यापासून वाचवणे , छोट्या मोठ्या दुरूस्त्या , गाडीच्या कटकटी , सीट खालचे यम्पीथ्री अल्लाद काढणे , HDMI चे तोंड वाकडे न होऊ देणे , पाईप/तारा/वायरी/मेजरींग टेप व्यवस्थित गुंडाळने , योग्य उंची/रूंदीवरच फ्रेमसाठी खिळा ठोकणे , फ्रेम्स /घड्याळ/आरसे शक्यतोवर तिरपे न लावणे ,( ज्यांनी लावले त्यांना नाही कळले तर ते मुस्तफा दर्झी नाहीत तुम्ही आहात ) फर्निचर ची असेम्ब्ली चटचट करणे .. म्हणजे मँन्युअल मध्ये एक तास लागेल असे लिहिले असेल तर फार तर दीड तास लागणे , जास्त लागला तर you are not #youknowwho#.... (अमेरिकेत हेही यावंच लागतं) , खरंतर आता सगळीकडेच सुतार काम , लोहारकाम, बागकाम , जुजबी बांधकाम , भंगीकाम (स्वच्छतागृहाचे बद्धकोष्ठ) , शिवणकाम , शिकवणी घेणे , स्वयंपाक, ड्रायव्हिंग, वायपर व गाडीच्या छोट्या दुरूस्त्या, फ्रिझ -एसी -आर ओ ई . फिल्टर बदलणे , स्वच्छता , फिटनेस ट्रेनिंग, मुलांच्या प्रोजेक्टमध्ये मदत, केस कापणे ... ई. ई. ई . जोपर्यंत जिवंत आहोत या ई. मध्ये भरच पडणारे... हे सगळे यावेच लागते.
*******
केस कापण्यावरून आठवले ...आठवलं काय रविवारीच तरं झालं होतं , पण लिहावं लागतं तसं ..झालं तर.. मुलाच्या भयानक दाट केसाची ऑनलाइन शाळेची सुद्धा तक्रार आली कारण विषय एअरफोर्सचा आहे. एकदा कापले तर तो म्हणाला की मेजर म्हणाले "तुम बाल बाल बच गये but you need a haircut" कारण ग्रुमिंगचे मार्क कापले असते. असं अजून एकदा झाले... मगं मला आला राग..... चॉप चॉप चॉप..
मगं मुलाने विचारले , आई यावेळेला मेजर नाही म्हणणार ना "You need a haircut , commander! "
मी म्हणाले , "नाही बाळा , You need HAIR , commander !" , म्हणतील ....
{इथे आम्ही गोरीला-डान्स ब्रेक घेतला}
******
लहानपणी वाचले होते अमेरिका ईंग्लडमध्ये रोबोट कामं करतात. कुठेत ते रोबोट हं , कुठेत ???? इथे माझा फँटम झालाय कामं करून पण रोबोट कधी आलेच नाहीत. एक सफाईचा रूंबा गरगरतो/धडपडतो/काळ्या कारपेटवर रूसतो/अडकतो/नको तिथेच कडमडतो/ पडद्यांचे टोकं खातो /चार्जर वायर ओढून पाडतो / होsम होsम करत E.T. सारखा फिरतो...... त्याला रोबोट म्हणणे म्हणजे अदृश्य रोबोटचा सुद्धा अपमान आहे. #वाटपहातेरोबोटची#
असं तर ही अनुदिनी अनंतापर्यंत जाऊ शकते.. पण पूर्णविरामाशिवाय कुठलीच गोष्ट अर्थपूर्ण होऊ नाही शकत ना...
कुठल्यातरी 'चिकन सूप फॉर द सोल ' टाईप पुस्तकात वाचलं होतं , आयुष्याचा प्रवास आपण एका ट्रेनमध्ये उभे राहून डोक्यावर जड गाठोडी घेऊन करत आहोत. आपल्याला लक्षात येत नाही की ती ओझी खाली ठेवली तरी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचणारच आहेत , कधी कधी तरी हे ध्यानात यावं ना म्हणून हे वाक्य महत्त्वाचे आहे. तर कायं When Life gives you lemons आंबट तोंड करण्याऐवजी लिंबू सरबत करावं नाही का , आणि थंडीने पाय आखडला तर भाच्याला भेटून/फोन करून भांsजे-शकुणी, भांsजे-शकुणी खेळून घ्यावं.
मी संपेल पण.. पण.... पुरून उरतील इतकी पुस्तकं असताना, ऐकायचं राहून जाईल इतकं संगीत असताना, पहायचे राहील इतकी मनोहर दृश्यं/प्रदेश असताना , गप्पा मारायच्या रहातीलच इतकी जीवाभावाची नाती, मैत्र व विषय असताना, बघायची रहातील इतकी नाटकं/ सिनेमे/शोज् असताना मला तक्रार करायला जागाच नाही, नाही का !!!
मगं बोला तर मंडळी....
|| संसार संगे बहु शिणलो.. उरलो मी , चिंता करी रे रघुराज स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना , तुजवीण रामा मज कंठवेना ||
****************************
प्रपंचासारख्या कंटाळवाण्या व निरस विषयावरचा एवढा मोठा लेख सहन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार .
© अस्मिता
हो ना , अंजली , आवरायला एक
हो ना , अंजली , आवरायला एक वेगळा रूम्बा हवायं मला...
छानच. तुमची शैली मी अनू च्या
छानच. तुमची शैली मी अनू च्या शैलीशी मिळ ती जुळती आहे. आणि ही काँप्लिमेंट आहे बरं.
असा गडबडीचा संसार असेल तर नक्कीच विरक्त व्हावे असे वाट्त असेल. किती त्या लूज एंड्स ... एक आ. अमे. बाजार मास्तर व एक इल्लीगल एलिअन मेहिकन घर आवरून द्यायला ठेवा लगेच.
अस्मिता
अस्मिता
मस्त मस्त , खुसखुशीत लिहिलंय
मस्त मस्त , खुसखुशीत लिहिलंय , पंचेस भारी .
भारी लिहिलंय अस्मिता...
भारी लिहिलंय अस्मिता... डिप्रेशनमधून बाहेर काढलंत...
<<<<< बेसिकली दोन्ही टोकाला जाण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून आपल्या बाळाच्या आयुष्यात अनंत शक्यता असू शकतात ह्याचेच समाधान आहे. कलेच्या क्षेत्रात जा, शास्त्रज्ञ हो, संगीतकार हो , प्रोग्रॅमर हो, पोलर बेअर वर रिसर्च करं, काय करायचं ते करं पण मेहनत करं आणि मनं लावून करं हेच सांगितले जाते. याचा परिणाम की काय मला आता आठवण सुद्धा करून द्यावी लागत नाही , आपापले करतात सगळं.... आम्ही तर आहोतच पण प्रत्येक गोष्टीत मदत करून जबाबदारीची जाणीव / स्वयंप्रेरणाच हरवून गेली असे व्हायला नको म्हणून.>>>>>>> हे वाचून अगदी अगदी झालं. व्हॉट्सऍप वर ओळखीच्या बऱ्याच बालकांचे, ऑनलाइन शाळाकृपेने, विविध गुणदर्शन व्हिडिओ बघून ,, मी लेकीला अगदीच वाऱ्यावर सोडलीय का , अशी भीती वाटते. पण तुमच्यामुळे धीर आलाय आता.
मगं तर मीही वाऱ्यावरच सोडलयं
मगं तर मीही वाऱ्यावरच सोडलयं , चिल् आई चिल् पोरं
धन्यवाद माउमैया. मला तरी फायदाच झालायं.
वाह.. संसाराचा रामगाडा/
वाह.. संसाराचा रामगाडा/ रामरांगडा/ रामरणगाडा/ रामरडगाडा(यातील नक्की कोणता शब्द आठवेना, लहानपणी ऐकलं आहे, आई बरोबरच्या बायकांबरोबर बोलत असताना! कोणाला माहित असेल तर सांगा) चांगलाच हाकताय कि!! अगदी खुसखुशीत लिहलंय..
<<व्हॉट्सऍप वर ओळखीच्या बऱ्याच बालकांचे, ऑनलाइन शाळाकृपेने, विविध गुणदर्शन व्हिडिओ बघून ,, मी लेकीला अगदीच वाऱ्यावर सोडलीय का , अशी भीती वाटते. पण तुमच्यामुळे धीर आलाय आता.>> मैं भी हू चिल मॉम कि पार्टी मे..
<<फ्रिझमधल्या उरलेल्या शिळ्या
<<फ्रिझमधल्या उरलेल्या शिळ्या पदार्थांच्या वाट्यावर वाट्याला घटस्थापना म्हणते>> भारीये शब्द कोटि...
<< २. स्वयंपाक आणि शिळे अन्न व्यवस्थापन>> हा पॅरा अगदी अगदी पटला...
हिमालयात जाणारे तुमचे यजमान आणि निगडित प्रसंग आमच्याकडे बालाजीला न पटवाकडे जाऊन होतो फक्त मुलगी लहान असल्याने मला काम करता करता फोन उचलून बोलावं लागतं.
आपण अगदी काजूबदामाच्या दुधात, गहू नाचणीच्या करून आणलेल्या शेवया कराव्यात, गोडासाठी भिजवलेले खजूर कुस्कुरून गाळून घालावे, ताजी केलेली वेलची पूड टाकून खीर करावी.. आणि बाळांनी बघूनच yucky(thanks to peppa pig) म्हणावे. एवेजी अर्धी हवं भरलेली चिप्स ची पाकीट, किंवा health भी टेस्ट भी वाले नूडल्स(looks delicious) म्हणत गट्टम करत न.. तेव्हा संताप, पच्छाताप, क्लेश, मनस्ताप, गिल्ट असे सगळे भावनावेग भरून येतात...
सगळे भावनावेग भरून येतात...
सगळे भावनावेग भरून येतात... अगदी अगदी. सात्विक पौष्टिक करून खाऊ घालता घालता आपले सत्व निघते
धन्यवाद shitalkrishna .
Welcome to Chill Moms Club !
<<<जमले तर माझे अध्यात्मिक
<<<जमले तर माझे अध्यात्मिक लेख ही वाचा हो दादा >>> अस्मिता ताई, मला दादा म्हणत असशील तर एक रिक्वेस्ट आहे. माझ्या मेहुण्याला प्लीज हिमालयात पाठवू नकोस. तिथे आता शांतता नाही. राफेल आणि जग्वार घिरट्या घालत आहेत आणि युद्धजन्य परिस्थिती आहे. बर्फाच्या ठिकाणीच पाठवायचा विचार असेल तर आल्प्स ्चा विचार करावा. सोबत स्कीचे साहित्य ही द्यावे. बाकी काय? भारी आहेस तू बाबा! ( बाई मुद्दामच लिहीत नाही!!!) भेटूच भाऊबीजेला!
धन्यवाद बिथोवन .
Okay.
अस्मिताताई.. मस्तच लिहिलंय.
अस्मिताताई.. मस्तच लिहिलंय.
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
धन्यवाद म्हाळसा , रैना ,
धन्यवाद म्हाळसा , रैना , अवलताई, वंदना, मानवदादा, सीमंतिनी, साधना, सामो, अनु , प्रणवंत, पाथफाईंडर, विनिता. झक्कास, स्वस्ति, अतुलपाटील, ऑर्किड , नादिशा , मृणाली, ऋन्मेष, चर्चा, अनया, वावे, आसा, किल्ली, धनुडी, कुमारसर, एस, पूर्वी, रूपाली, सनव , अभ्या , पियू , जाई, हीरा, मंजुताई, अमृताक्षर, अंजली_१२, अमा , वर्णिता, माउमैया, शीतलकृष्णा,
श्रवु.
सर्वांचे मनःपूर्वक आभार. नुसत्या वाचनमात्र असलेल्या वाचकांचे सुद्धा आभार.
अमा आणि पियू , अनुच्या शैलीतले वाटले असेल तर खरच compliment बद्दल आभार.
अतुल , design patterns
अतुल , design patterns संकल्पना आवडली .
किल्ली , कर्माचे भोग
अमा , साफसफाईला ठेवणारे मेड , करोना संपला की.
अनु , आता चकवूया सगळ्यांना , माबो जुळ्या बनून .
अभ्या , डिस्नेला पँन ऐवजी प्रेशर कुकर द्यायला सांगते रंपझलकडे दुष्टांना हाणायला. धन्यवाद
सर्वांचे, पुन्हा एकदा आभार, मित्रमंडळी
Kay धमाल lihillay.एकदम मस्त.
Kay धमाल lihillay.एकदम मस्त.
आमच्याकडे पाय घट्ट जमिनीवर आणि डोळे आकाशाचा वेध घेताहेत अश्या उच्च विचारसरणीची मोठी माणसे असल्याने धडकणे, धडपडणे, आपटणे, ....
अगदी अगदी झाले. फक्त मी म्हणायचे वाटेत हत्ती जरी बसलेला असला तरी त्याच्यावर पाय देईल हा माणूस?
देवकी
देवकी
मला वाटले की माझ्याच घरी आहेत.
धन्यवाद.
मस्त लिहीलंय.. हलकंफुलकं...
मस्त लिहीलंय.. हलकंफुलकं...
लहानपणापासून स्वप्न होतं , हिमालयात जायचं >>>> __/\__
कुठनं येत असावीत अशी स्वप्ने !!
पुलेशु
धन्यवाद आनंद,
धन्यवाद आनंद,
खरंच !!अजूनही आहे हं , पूर्ण होईपर्यंत बघणार. आभार.
तोपर्यंत हिमालय किराणा .
योसे मिटी नायतर ग्रँड कॅनयन
योसे मिटी नायतर ग्रँड कॅनयन ला जाउन या अम्हेरिकेत काय आध्यात्मिक अनुभव येत नाहीत का.
खरंच !!अजूनही आहे हं , पूर्ण
खरंच !!अजूनही आहे हं , पूर्ण होईपर्यंत बघणार>>>
ताई शुभेच्छा ! तुमच्या पाऊलखुणा आम्हाला उपयोगी पडतील, वाट दाखवतील.
अमा Calgary canada मध्ये आलेत
अमा ,
You are right... पण बघू द्या नं स्वप्न
काही काही स्वप्नांना काही कारणं नसते तीव्र इच्छा सोडून....
तोपर्यंत हिमालय किराणा >>>>
तोपर्यंत हिमालय किराणा >>>>
हा दैवी संकेत असेल हिमालयाचा विसर पडू नये म्हणून
आनंद
आनंद
अस्मिता, तुझी स्वतःची छान
अस्मिता, तुझी स्वतःची छान शैली आहे.
(माझी शैली वगैरे वाचून मनात लाडू फुटलेच, पण माझी शैली ही स्वतःची नसून आवडलेल्या 3-4 लेखकांच्या शैली कॉपी करणे आहे कधी कॉपी चांगली जमते कधी नाही.)
अनु , गोड गोड प्रतिसाद !!
अनु , गोड गोड प्रतिसाद !!
हाहाहा मस्त खुसखुशीत लिखाण!
हाहाहा मस्त खुसखुशीत लिखाण! नवीन शब्द (शिकीटो) आणि हॅशटॅग्सने मजा आणली आहे अजून भरपूर लिही..
धन्यवाद जिज्ञासा !
धन्यवाद जिज्ञासा !
एकदम खुसखुशीत! धमाल आली
एकदम खुसखुशीत! धमाल आली वाचताना!
अस्मिता मिस केला होता धागा ,
अस्मिता मिस केला होता धागा , जस्ट फिदी फिदी करत वाचला आणि मला आधी खरंच नावा वरून अध्यात्मिक वाटला होता
भारीच लिहिलंय, कम्ममाल
Pages