अगदी सहज मनात आलं म्हणून.....
आठवणींच्या रेषा
जाणीवेच्या पटलावर आठवणींच्या रेषा उमटतात. पण रेषा-रेषामध्येही फरक असतो. काही रेषा समुद्रकिनाऱ्यावरच्या रेशमी रेतीत मारलेल्या रेघोट्यांसरख्या असतात. एखादी लाट येते आणि त्या रेषा पुसट होतात. येणारी प्रत्येक लाट त्या रत्नाकराच्या खजिन्यातले शंखशिंपले घेऊन किनाऱ्यावर येते. पण त्या मारलेल्या रेघोट्या मात्र पार पुसून जातात.
काही रेषा मात्र घाटातून दिसणाऱ्या डोंगरावरच्या रेषांसारख्या असतात. डोंगरावरून वाहत येणारे पाणीच या रेषा तयार करतं. आणि त्यावरून जेवढं पाणी वाहून जाईल तेवढ्या या रेषा अजून ठळक होत जातात.
या उलट काही रेषा या भिंतींवर मारलेल्या रेघोट्यांसारख्या असतात. लहान मुलं ते क्रेयॉन्स घेऊन भिंती रंगवतात ना अगदी तशा ! त्या सहज पुसल्याही जात नाहीत आणि सरावाच्या झाल्यावर त्यांच्याकडे लक्षही जात नाही.
या सगळ्या आठवणींच मात्र काही घटना, ठिकाणं यांच्याशी घट्ट नातं असतं. पण या सगळ्यांच्या मुळाशी असतात ती माणसं ! हो, आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्ती ! आयुष्याच्या प्रवासात भेटणारी माणसं आणि त्यांच्याशी जुळणारे ऋणानुबंध हा माझ्यासाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय आहे. काही ऋणानुबंध हे जन्माच्या नात्यांनी जुळतात तर काही का आणि कसे जुळतात तेच कळत नाही. मला सतत असं वाटतं की जुळणारे ऋणानुबंध हे आपल्या पूर्वसंचिताचा भाग असतात मग ते जन्माच्या नात्याचे असो, मैत्रीच्या धाग्याचे असो, विवाह बंधनाचे असो किंवा अगदी आपल्या आकलना पलीकडचे असो.
अशी ही आपली जवळची माणसं, त्यातली काही रोज भेटणारी असतात, तर काही खूप दूर रहात असली तरी मनाच्या खूप जवळ असतात, काहींचा संपर्क काळाच्या ओघात कमी होतो तर काही काळाच्या पडद्याआड दिसेनाशी होतात. काहीही असलं तरी ही सगळी माणसं नेहमीच आपल्या स्मरणात असतात. या मंडळींशी संबंधित काही घटना, त्यांचे काही स्वभाव विशेष हे कालांतराने आठवणींचा भाग होतात. कधी कधी या आठवणींच्या वेड्यावाकड्या रेषा एकमेकांना जुळून एक सुंदर कॅलिडोस्कोप तयार होतो. काही ठळक, काही पुसट तर काही अर्थहीन पण तरी त्या कॅलिडोस्कोपमध्ये वेगळे रंग भरणाऱ्या ! त्या प्रत्येक रेषेचं त्या कॅलिडोस्कोपमध्ये महत्त्व असतच .............. !
-- समीर जिरांकलगीकर.
काय छान लिहिलंय. खूपच जबरदस्त
काय छान लिहिलंय. खूपच जबरदस्त आणि खूपच आवडलं.
सुंदर लिहिलय..आवडले.
सुंदर लिहिलय..आवडले.
मस्त
मस्त
छान लिहिलयं...
छान लिहिलयं...