जगातला तत्वनिष्ठ, बुद्धिवादी पण मानवतावादी चांगुलपणा - लहानपणी यालाच कृष्ण मानलं अन आता नास्तिक असले तरी शेवटी तो सखा असण्याशी मतलब ना; मग त्या नावाला हरकत कसली ?
माझी बालपणीची ही पहिली आठवण असेल. मला आठवतं की आई मला हाक मारून उठवत असे. एकीकडे ती करत असलेल्या पुजेचा दरवळ, घंटेचा नाद, निरांजनाचा मंद पिवळसर उजेड, आणि साखरझोपेतून डोळे किलकिली करणारी मी. मग पोटावर पालथे पडून आईची पुजा बघत बसायची. आई काहीबाही बोलत असायची... "बघ ताई उठून आवरून शाळेत गेली पण ! हा तुझा बाळकृष्ण बघ आंघोळ पांघोळ करून कसा तयार झालाय..... " ....आणि काय काय..... मी मात्र तिच्या हातातल्या लखलखणा-या तुला पहायची. ती तुला ताम्हणात घ्यायची, तुला आंघोळ घालायची, पुसायची, गंध लावायची,... आणि अजून काय काय. अन तू माझ्याकडे पाहून खट्याळ हसायचास.... अन मग सुरू व्हायचा माझा दिवस ! तेव्हापासूनच, तू माझा; ही जाणीव लख्ख कोरली गेलीय बघ !
मग आठवतं एकदा कधीतरी मी आईकडे हट्ट धरला, मलाही करायचीय पुजा. मग तिने तुला माझ्याकडे दिलं अन म्हणाली, "घे हा तुझ्याच वेळी आलेला, मग तुझाच तो. कर त्याची पुजा!" मग तुझे लाड करण्यात बाळपणीचा काही काळ लोटला.
नंतरची आठवण आहे ती एका वेगळ्या स्वरुपातली. माझा सगळ्यात मोठा दादा, चुलतभाऊ आलेला. माझा अगदी लाडका दादा अन मी पण त्याची खूप लाडकी. मी असेन ५-६ वर्षाची. जवळजवळ अकरा वर्षांचे अंतर आमच्यात. गुजराथहून कोल्हापूरचा, रात्रभरचा प्रवास करून आलेला तो. जेवणं झाली अन दुपारी तो गाढ झोपला. माझी मधली बहीण थोडी खट्याळ. तिने आंब्याच्या पेटीतली एक काडी घेतली अन त्याच्या कानाजवळ नेली. त्याने झोपेतच कुस बदलली. मला हा खेळ वाटला, आवडला. मग मी पण काडी घेतली अन त्याच्या कानाजवळ नेली. आमचा हा खेळ त्याची झोप उडवायला पुरेसा ठरला. अगदी शांत असणारा दादा खवळला अन आम्हा दोघींना पकडायला धावला. मोठी बहीण सुळ्ळकन पळून गेली. मला पळायचे कशाला हेच मुळी समजले नाही. अन दादाच्या तावडीत सापडले. मग त्याने दिला एक धपाटा ठेऊन. झालं.... मी धो धो रडायला लागले. अन मग झोपेतून जागा होत दादाला काय घडले हे कळाले. चटकन त्याने मला जवळ घेतले म्हणाला , " सोन्या असे का केलेस ग? मी दमलो होतो ना, झोपलो होतो ना मग? " " पन ताईने केले तसेच मी पन केले. तु मलाच का माल्ले?" माझी ती बालीश तक्रार त्याला हसायला पुरेशी होती. मला कडेवर घेत म्हणाला " पण मी तुझा लाडका दादा न. मग असा त्रास देतात दादाला? " मी त्याच्या गळ्यात हात गुंफले अन "नाही" असा कबुली जवाब देऊन मोकळी झाले. मग कित्तीतरी वेळ दादा काहीतरी समजावत होता अन मी हुं हुं म्हणत त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्यातल्या तुला पहात राहिले.... काहीही न समजताच खूप काही आत उतरत गेले....
अन मग एक आठवण आहे ती इचलकरंजीची. मी असेन साधारण आठ एक वर्षांची. बाबांची नुकतीच बदली झालेली. बँक खाली अन आम्ही रहायला वर. शेजार असा काही नव्हताच. त्यामुळे ४ वाजले की मी खाली बाबांकडे जायची. अन बाबां पेक्षा बँकेतल्या सगळ्यांशी गप्पा मारायची. अन बाबा रागावले की पलिकडच्या मैदानात खेळायला जायची. त्यामुळे बँकेतले सगळे माझे दोस्त होते.
एकदा बँकेतले सगळे कोणाच्यातरी शेतावर जायचे होते. बाबांच्या स्कुटरवर बसून मीपण निघाले. तिथे शेतावर खूप मजा आली. खूप खाली वाहणारी कृष्णामाई, तिच्या काठावरची कोवळी वांगी कच्चीपण इतकी गोड लागली; अजूनही त्यांची चव जिभेवर आहे माझ्या. परत येताना मात्र मी झोपेला आले. दुपारचे उन पण खूप झालेले. वाटेत आमच्या गडलिंग काकांचे घर होते. बाबांनी त्याला सांगितले की "जा हिला तुझ्या घरी सोडवून ये, संध्याकाळी घरी घेऊन ये. " झालं आमचं बोचकं, गडलिंग काकांच्या घरी पोचलं. मी तर तिथे लगेच झोपून गेले.
जागी झाले तर आधी कळेच ना, आई कुठे गेली. डोळे चोळत बघितलं तर गडलिंग काका दिसले. ते म्हणाले, " ताई ही बघा माझी भैन, अन ही माझी आये . " मला खुदकन हसूच आलं, एव्हढ्या मोठ्या काकांची एव्हढुशी आई बघून. पण त्या आजी मला खूप आवडल्या. ते घर केव्हढ वेगळच होतं. जमीन गार गार होती, हिरवी,पिवळी. डोक्यावर गवत होतं, मस्त गारेगार वाटलं मला. पण खूप भूक लागलेली. मग मी काकांना म्हटलं, " काका भूक लागलीय, खाऊ द्याना." तर त्या आजीबाई " अग्गोबय्या, आता कसं करायचं ? " असं म्हणाल्या. मला वाटलं आता या खाऊ देणारच नाहीत. तेव्हढ्यात काका म्हणाले, "दे ग माये, साहेब अन बाईसाहेब काय्बी मानत न्हाईत. .... " आणि काय काय .... मला नाही समजले. मग मात्र आजीबाई पटकन उठल्या अन मला आवडायची ती भाकरी अन वांग्याची भाजी चकचकीत ताटलीत घेऊन आल्या. सोबत माझ्या आवडीचा गूळ्पण होता. मला म्हणाली " खा गो बायो, खा, वाईच्च कोरड्यास तिखट लागेल, तर गुळाबरोबर खा हा का" अन माझ्या डोक्यावरून हात हिरवला, अन तिच्या कपाळावर दोन्ही बाजुला ठेऊन खट्टक असा आवाज काढला. हे काहीतरी नवीनच होतं. मला खुदकन हसू आलं. अन मी गुळाचा खडा मटकावला. भाकरी अन भाजीपण खाली. थोडी तिखट लागत होती पण मस्त, मजा आली. पाणी प्यायला वर बघितलं तर त्या आजीबाईंच्या डबडबलेल्या डोळ्यातून तूच तर पहात होतास माझ्याकडे. अन मग मला ती आजी एकदमच ओळखीची वाटली होती.
मग आठवते ती शाळेतली एक दुपार. गॅदरिंगच्या नाटकाची तयारी चालू होती. राजा, राणी आणि त्यांना धडा शिकवणारे प्रधानजी आणि विदुषक अशी काहीशी गोष्ट होती. दर वर्षी प्रमाणे मी पण होतेच नाटकात. या वर्षी मला विदुषकाचे काम मिळाले होते. त्यात मला दोन तीनदा मोठ्यांदा हसायचे होते. पहिल्या २-३ वेळा मी हसले मोठ्यांदा. पण मग मला कंटाळा आला. बाईंना मी म्हटले, " आता एकदम गॅदरिंगलाच हसेन, मला येतं हसता" बाईंनी मला समजावलं की, " असं नाही तुला सगळ्यांबरोबर प्रॅक्टिस करावी लागेल. जसे संवाद तसेच हसणं". पण मी तयार नव्हते, मी संवाद सगळे म्हणायचे, बाकीच्या सर्व अॅक्शन्स करायचे पण हसणे आले की म्हणयचे " आता मी हसले हा हा हा" पण हसायचे नाही. दोन चार दिवस गेले. बाईंनी मला खूप समजावले. पण मी हट्टून बसले. शेवटी बाईंनी माझा रोल बदलला. पण मला हा बदल नको होता. मी विदुषक करेन नाहीतर करणारच नाही नाटक अशी अडून बसले.
त्या दिवशी घुश्श्यातच घरी आले. आईला लक्षात आले, काही तरी बिनसलेय. तिने मला विचारल्यावर रागात चुकून शब्द बाहेर आले, " नाटकातून मला काढून टाकलं. " " का पण ? " " मला नाटकात हसता येत नाही म्हणून " आईला हे फारच धक्कादायक होतं. माझ्या अभिनयावर तिचा फार विश्वास होता. तिने मला हसायला सांगितलं, मग मी खुन्नस म्हणु तिला खदाखदा हसून दाखवलं. आता तर तिची पक्की खात्री झाली. बाईंचीच काहीतरी चूक झालीय. झालं. माझ्या आईला अन्याय , तोही आपल्या मुलींवर झालेला अजिबात खपायचा नाही. कर्मधर्म संयोगाने माझ्या मोठ्या बहिणीलाही नाटकात महत्वाचा रोल मिळालेला. आणि त्यांचा वर्ग तीन अंकी नाटक बसवत होता. अन त्याची तयारी जवळजवळ एक महिना आधीपासून चालू होती. आईने फतवा काढला, "आरतीला नाटकात काम करता येत नसेल तर तिच्या मोठ्या बहिणीलाही येत नाही. ती पण नाटकात काम करणार नाही." तिला बिचारीला माझा हा सगळा आगाऊपणा माहितीच नव्हता, अन आई रागवेल म्हणून नंतर मीपण तिला काही बोलले नाही.
झालं, दुस-या दिवशी मोठ्या बहिणीने हा निरोप बाईंना कळवला. आता बाईंना कळेना, हा तिढा सोडवायचा कसा? शेवटी त्यांनी आईला शाळेत बोलावले. आई लगेच बाईना भेटली. सगळा गैरसमज दूर झाला. आई आधी थक्क झाली अन मग खूपच रागावली. आपल्या मुलीवर अन्याय होत नाहीये तर आपली मुलगी अन्याय करतेय हे समजल्याने ती भयंकर दुखावली अन रागावलीही. पण बाईंनी तिला गळ घातली "तुम्ही काहीही बोलू नका, मी आरतीला समजावते. "
मला एव्हढच समजल होतं की आई शाळेत आली अन गेली. आमच्या तालमी एक मोठ्या हॉलमध्ये होत. तिथे बाईंनी मला एकटीलाच बोलावलं. आता मात्र मी थोडी घाबरले. आई आली, मला न भेटता गेली, आता बाईंनी एकटीलाच बोलवलय.... हॉलमध्ये आता गेले तर फक्त बाईच होत्या, त्यांना " आत येऊ का" विचारलं. अन आत जाऊन खाली मान घालून उभी राहिले. दोन मिनिटं तशीच शांततेत गेली. मी हळूच मान वर करून बघितलं,..... माझ्या लक्षात आलं चुकलच आपलं,.... बाईंच्या डोळ्यातून तर तूच निरखत होतास.
" नक्की काय झालं आरती , मला सांग बरं ..." " बाई मी चुकले, माझच चुकलं. बाई, मी रोज हसायला पाहिजे होतं, मी चुकले बाई,.... आता रोज नक्की हसेन, मोठ्या मोठ्यांदा ...." रडत रडत मी कबुली दिली; ती बाईंना आणि तुलाही.
बाईंनी चटकन जवळ घेतलं, प्रेमानं थोपटत म्हटलं " बरं असू दे, आता हसणार म्हणतेस न, मग हास बघू, रडतेस का? इकडे बघ, चल झालं गेलं गंगेला मिळालं. तुला तुझी चूक समजली ना. बसं. आता घरी जाऊन आईला नमस्कार कर, पुन्हा असं करणार नाही म्हण. मग सगळं त्या कृष्णार्पण ! " बाईंनी बरोब्बर तुलाच अर्पण केलं सगळं. मी पटकन वाकून तुम्हा दोघांना नमस्कार केला. बाईंनी माझे डोळे पुसले, एक टपली मारली अन म्हणाल्या " चल पळ वर्गात, हे फक्त आपल्या तिघांतच हा " " मला हसायला मिळेल न मग " मी बावरतच विचारलं. " असा विदुषक शोधून दुसरा मिळेला का आम्हाला ? हो ग बाई, तूच आमचा विदुषक " बाई हसत म्हणाल्या. मला पुन्हा तुझा भास झाला त्यांच्यात. मग मी नाचत उड्या मारत वर्गात आले. घरी आल्यावर अर्थाच आईला आधी नमस्कार केला, आणि पुन्हा अशी चू़क करणार नाही असं सांगितलं. पण तरीही एक लक्षात आलं, शिक्षा म्हणून आई रात्री जेवलीच नव्हती. झोपताना पुन्हा तिच्या गळ्यात पडून कबुली दिली, बाईशी काय बोलले ते सांगितलं. तशी जवळ ओढून म्हणाली, "खरं वागवं ग बायो, खरं वागावं.... शब्दानीही कधी खोटं वागू नये." अन मग दुपारी सगळं मिळालेलं असूनही ती गंगा आलीच आईच्या डोळ्यात. अन मग माझ्याही. अन लक्षात आलं, आडून आडून तूही पाहतो आहेसच, अन डोळेही पुसतो आहेसच.
असाच भीडत अन भिनत गेलास तू. माझ्या अवतीभवती, माझ्या सोबती अन माझ्या सवे. कधी माझ्यातला चांगुलपणा जागवत, कधी माझ्यातला वाईटपणा निपटून काढत, कधी जगातला चांगुलपणा दाखवत , कधी जगाच्या वाईटपणातून वाचवत.
आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत विचारपूर्वक नास्तिक बनले. आणि तरीही तू सापडत राहिलासच कशा कशात. एक मार्गदर्शक, एक हितचिंतक, एक दिशादर्शक आणि एक सखा म्हणूनही.
भर पावसात, रात्री, सारी कडचे दिवे गेले असताना, रस्ता फूट- दिड फूट पाण्यात असताना,दारू पिऊनही मला " ताई घाबरू नका, पाणी भरलेल्या रस्त्यातून गाडी सावकाश नेली की बंद नाही पडत " असे दर दुस-या मिनिटाला समजावणा-या आणि मला सुखरूप घरापर्यंत सोडवाना-या रिक्षावाल्या मध्ये, तू दिसलास.
बहात्तराव्या वर्षीही शिकण्याची उमेद घेऊन पदवी मिळवणा-या विद्यार्थ्यांतही तू दिसलास.
२ महिन्याचे पोर नव-याकडे सोपवून, मध्यात बाळाला पाजण्याची परवानगी घेणा-या परीक्षार्थी विद्यार्थिनीतही दिसलास तू.
गरोदर पणात दोन महिने झोपून राहिलेल्या बायकोचे सारे प्रेमाने करणा-या नव-यात तूच तर दिसलास.
मुलगा जेमतेम नऊ महिन्याचा असताना मृत्युच्या भोज्याला शिवून परतताना, माझ्यातल्या जगण्याच्या उर्मीतही तू दिसलास.
लेकाच्या प्रत्येक हास्यात, बोळक्यात अन त्याच्या प्रत्येक गळाभेटीतून तूच तर भेटत राहिलास.
कधी एखाद्या म्हातारबाबाच्या आशिर्वाद तूच होतास.
तर कधी मैत्रिणीने दिलेल्या हाकेल ओ देताना माझ्या आवाजात तूच तर बोललास.
मिळालेल्या प्रत्येक ज्ञानातून तूच भिनलास अन प्रत्येक कलेतून तूच तर पाझरलास.
आज पर्यंत तुझ्या सोबतीचा प्रवास इथे मांडतेय तेही तुझ्याच सोबतीने ना .....
सख्या, सख्या रे....
खुपच सुंदर लिखाण ....
खुपच सुंदर लिखाण .... मनापासून आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल, भापो. वेलकम बॅक.
अवल, भापो. वेलकम बॅक.
अवल खुपच सुंदर झालाय लेख
अवल खुपच सुंदर झालाय लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप आवडलं ..... तो माझा पण
खुप आवडलं ..... तो माझा पण आवडता... सख्या..
खूप खूप खूप सुंदर - अगदी
खूप खूप खूप सुंदर - अगदी सख्याच्या डोक्यावरल्या मोरपिसाइतके सुंदर!
सो स्वीट!
सो स्वीट!
मला दिसलाय सख्या... भेटलाय
मला दिसलाय सख्या... भेटलाय तुझ्या रूपात.
.
मी दिलेल्या हाकेला तात्काळ तु प्रतिसाद दिलास तेव्हा...
दहा मिनिटात माझ्या जवळ आलीस तु तेव्हा...
"पल्ले, मी आलिय गं" म्हणून कपाळावर हात फिरवलास तेव्हा...
प्रत्यक्ष सख्या दिसल्याच्या आनंदात रडावंसं वाटलं होतं...
एवढ्या सो कॉल्ड मैतरांच्या गराड्यात किती पटकन उत्तर दिलंस...
.
आहे 'सख्या' तुझ्यात...
धन्यवाद सर्वांना मृनिश,
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मृनिश, साधना, माधव
अग पल्ले.... हे काय लिहून बसलीस....हे तुझे प्रेम बोलतेय, बाकी काही नाही ग ...
खूप सुंदर. काळजाला भिडणारं
खूप सुंदर. काळजाला भिडणारं
अवल कित्ती सुंदर लिहीलंस.
अवल कित्ती सुंदर लिहीलंस. खुपच आवडलं, सगळं जणू समोर दिसतंय मला.
अवल, आता मला तुझ्यातच तो 'सखा' दिसतोय जसा पल्लीला दिसला तसा. तुझ्या लेखाचा शेवट जसा जवळ आला तसा मला तो 'बाळकृष्ण' तुझ्यात दिसायला लागला होता.
सुंदर! वेलकम बॅक!
सुंदर! वेलकम बॅक!
सुंदर लिहीलं आहेस..
सुंदर लिहीलं आहेस..
अवल.... मी कोल्हापूरी
अवल....
मी कोल्हापूरी धाग्यावर लिहिले होते की अवल आणि अमेय यांचे दोन लेख वाचायचे आहेत रात्री....आणि आता रात्रीचे २.३० झाले आहेत....तुझा लेख वाचला अशा नीरव शांतीत आणि सांगतो तुला...तुझ्या शब्दांनी जादूची चादर टाकली माझ्या मनावर. खूप आत्मियतेने सख्याला तू दिलेली हाक, त्या बालपणीच्या आठवणी, विदुषक, ती आईची नाराजी, बाईंनी रोखून बघणे, मग चुकीची कबुली आणि मग मोकळे झालेले वातावरण, परत त्या भूमिकेचे हास्य...""खरं वागवं ग बायो, खरं वागावं.... शब्दानीही कधी खोटं वागू नये.".... ह्या एका छोट्याश्या दिसणार्या वाक्यात आईने सांगितलेले जीवनाचे सारे सार....ते स्वीकारणे....मग त्यावर सख्याने आडून पाहून डोळे पुसणे.... किती छ्टा आहेत ह्या प्रेमाच्या....किती भाव एकवटलेले आहेत ओळीओळीतून ! ह्या सार्याला कारण कुठले असेलच तर तो लेखिकेचा उपजत स्वभाव...जो हळवा आहे आणि वेळ पडली तर मागील पानावर कुठे काही चुकले असेल तर त्याची स्पष्ट कबुली देवून नव्याने नूतन सूर्यकिरणांना आपल्या अंगणात बागडू देण्याची उत्सुकता दाखविणे....
....म्हणूनच लेखानंतर अवल म्हणते, "झाला खरा " बालिशपणा" ! पण तुमचे प्रत्यक्ष सांगणे, फोन, इमेल्स अन व्हॉटस् अप वरचे संदेश.... तुम्हा सगळ्यांच्या प्रेमानेच ओढून आणले पुन्हा. ...." ~ ही कबुली जितकी अवल आनंदाची आहे किंबहुना त्याहीपेक्षा अत्यानंदाची वाटते ती तिच्या मैत्रिणींना आणि माझ्यासारख्या हितचिंतकाना...सगळ्यांच्या प्रेमाचा परिपाक म्हणजे हा लेख...त्या प्रेमाइतकाच उत्कट आणि अंत:करणपूर्वक लिहिलेल्या शब्दसामर्थ्याचा.
धन्यवाद सर्वांना.... अंजू,
धन्यवाद सर्वांना.... अंजू, अशोकमामा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हा सगळ्यांचे हे मैत्र प्रेमच तर सखा आहे माझा
फारच सुंदर आणि ओघवतं लिहिलं
फारच सुंदर आणि ओघवतं लिहिलं आहे. लेख संपूच नये असंही वाटून गेलं…. व्वा…!!
अप्रतिम लिहिले आहे..... आवडुन
अप्रतिम लिहिले आहे.....
आवडुन गेला "सखा"
मस्त !
मस्त !
खुप खुप छान लेख !!!
खुप खुप छान लेख !!!
आवडेश. सही उतरलय
आवडेश. सही उतरलय
बालिशपणानंतर इतक सुंदर
बालिशपणानंतर इतक सुंदर निर्माण होणार असेल तर कर मधुन मधुन बालिशपणा
>>>>असाच भीडत अन भिनत गेलास तू. माझ्या अवतीभवती, माझ्या सोबती अन माझ्या सवे. कधी माझ्यातला चांगुलपणा जागवत, कधी माझ्यातला वाईटपणा निपटून काढत, कधी जगातला चांगुलपणा दाखवत , कधी जगाच्या वाईटपणातून वाचवत.
आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत विचारपूर्वक नास्तिक बनले. आणि तरीही तू सापडत राहिलासच कशा कशात. एक मार्गदर्शक, एक हितचिंतक, एक दिशादर्शक आणि एक सखा म्हणूनही>>>>>.ही प्रक्रिया घडत असताना मीही
साक्षिदार आहे कधीकधी..तुझ्यात तो भीनल्यामुळेच कित्तिवेळा दर्शन झाल त्याच मला तुझ्यातच.आपल्याभोवती तथाकाथित भाविकांचा किती गराडा होता ग! पण त्या सगळ्यात स्वतःला नास्तिक म्हणव्णारी तु मला जास्त भाविक सच्ची वाटलिस.
चेतन, खरच मलाही अजून लिहायचं
चेतन, खरच मलाही अजून लिहायचं होतं... पण कुठेतरी थांबायला हवच न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोभना तू माझी सख्खी मैत्रिण आहेस ती याच सख्यामुळे
धन्यवाद सर्वांना
आस्तिक नास्तिक आपण आपल्या
आस्तिक नास्तिक आपण आपल्या सोयीने दिलेली नावे आहेत गं
बाकी कृष्ण सखा असताना आस्तिकत्व नास्तिकत्व दोन्हीही गळूनच गेलेलं असतं. गरजच उरत नाही काही एक असायची.
तुझा प्रवास आवडेशच
सुंदर , खूप छान !!
सुंदर , खूप छान !!
मुलगा जेमतेम नऊ महिन्याचा
मुलगा जेमतेम नऊ महिन्याचा असताना मृत्युच्या भोज्याला शिवून परतताना, माझ्यातल्या जगण्याच्या उर्मीतही तू दिसलास.++११ खुप रिलेट झाले.
खूप तरल लिहिलेय. एकदम हळुवार,
खूप तरल लिहिलेय. एकदम हळुवार, पण मनाला भिडणारे !!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages