गंध - एक छोटीशी गोष्ट

Submitted by _तृप्ती_ on 6 September, 2020 - 03:32

आज कामानिमित्त किती दिवसांनंतर या भागात आले. पुस्तकांचं जुनं दुकान दिसल्यावर आपोआप आत शिरले. तेही आता थोडं बदललं होतं. हवं ते पुस्तक स्वतः हात लावून घेता येणार होतं. मी "New Arrivals" च्या शेल्फसमोर जाऊन उभी राहिले. एक पुस्तक उघडलं. नकळत नाक पानांच्या अगदी जवळ नेऊन, त्याचा भरभरून वास घेतला, तू घ्यायचास तसाच. अचानक तूच जवळ आल्याचा भास झाला. मी इकडे तिकडे पाहिलं आणि पानं उलगडायला लागले.
तुझ्याशिवाय या दुकानात मी एकटी, बहुदा पहिल्यांदाच आले होते. तुझी ही विचित्र सवय. कित्येकदा पुस्तक धुंडाळायला आपण इथे यायचो. आणि तू पुस्तकाचा वास घ्यायचास. आधी आधी तर मला इतकं विचित्र वाटायचं. मी तुला म्हणायचे सुद्धा,
"श्वानकुळातला आहेस अगदी. पुस्तक काय वास आवडला तर विकत घेणारेस का? "
तू अगदी लहान मुलासारखा, नाक पुस्तकाला लावून, डोळे मिटून. क्षणभरच, पण इतका निरागस,निष्पाप दिसायचास तू. तुझे ते मिटलेले डोळे कितीदातरी डोळे भरून साठवले आहेत मी. तू म्हणायचास,
"मी पुस्तक विकत घ्यायला येतंच नाही. मी या वासासाठी येतो, पुस्तक घ्यायला तू येतेस."
मला इतका राग यायचा. तुला त्याचं काहीच नसायचं. इतकं लांब चालत यायचं, गर्दीच्या रस्त्यामधून. आणि त्या पुस्तकाचं पानही वाचायचं नाहीये तुला. मग येतोसच कशाला माझ्याबरोबर? मी येऊ शकते एकटी. मी तुझ्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचे. पुस्तक निवडण्यात मी गुरफटून जायचे. तू इकडे तिकडे करायचास. पण कधीच कशी मला निघण्याची घाई केली नाहीस. माझं झालं की १-२ पुस्तकं घेऊन आपण निघायचो. एकदोनदा मी तुला म्हटलं,
"मला पुस्तक घ्यायला वेळ लागतो, तुला उशीर होत असेल तर गेलास तरी चालेल."
"मी आहे म्हणून इतक्या वेळात तरी निघतेस. नाहीतर इथे हरवशील आणि तुला शोधायला मला परत याव लागेल. त्यापेक्षा थांबतो."
मग मीही तुला सांगणं सोडून दिलं. पुस्तक चाळता चाळता एकदा लक्ष गेलं माझं तुझ्याकडे. तू त्या दुकानातल्या कॉउंटरवर, हाताने ठेका देत, काहीतरी गुणगुणत होतास आणि नजर माझ्याकडेच होती. मी तुला "काय?" असं खुणेनेच विचारलं तर काय बावचळला होतास. मी तिथेच मोठ्याने हसले.
मग कितीतरी वेळा पुस्तकं घ्यायची नसली, तरीही आपण या गर्दीच्या रस्त्याला यायचो. कधी उगाच दुकानात डोकवायचो.
तू म्हणायचास, " बघ, पुस्तक नाही घेतलंस तरी मला वास घ्यायला मिळतो."
तुझ्या या अजब सवयीची, त्या मिटलेल्या डोळ्यांची आता मला सवय झाली होती. कवितेचं पुस्तक असेल तर तुझा हट्ट, मी कविता वाचायची आणि तू ऐकायची.
कितीदा तुला म्हटलं, "कविता ज्याची त्याने वाचायची. घेऊन जा पुस्तक."
"तू वाचतेस तेव्हाच कविता पोचते. एरवी मला समजत नाही."
"मस्का मारतोयस?"
"नाही. नव्या पुस्तकाचा वास घेतोय."
मग मला कितीही राग आला तरी निघून जायचा. समाधान होईपर्यंत आपण कविता वाचत, ऐकत राहायचो. तू मधेच त्या नव्या पुस्तकाचा वास घ्यायचास. त्या कोऱ्या पानांवरुन हात फिरवायचास. कुठेतरी माझ्या बोटांना, तुझ्या बोटांचा हलकेच स्पर्श व्हायचा. आणि मी पान उलटून पुढे वाचायचे. अश्या किती कविता एकत्र वाचल्या आहेत.
आज इतक्या वर्षानंतर तुझा वास आला ह्या दुकानात, ह्या नव्या पुस्तकाच्या पानात. तू गेलास आणि हा गंध माझ्यासाठी ठेवून गेलास. मी पुस्तक घेतलंच नाही. दुकान, पुस्तकं बाकी सगळं बदललं होतं. मी अजूनही तिथेच होते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या लेखावरून एक मराठी सिनेमा आठवला "गंध "या नावाचा. खूप सुंदर आहे.. गंध या विषयाशी related 3 छोट्या गोष्टी आहेत यामध्ये. यू ट्यूब वर तिन्ही पार्ट्स available आहेत separately.

छान

तुमच्या लेखावरून एक मराठी सिनेमा आठवला "गंध "या नावाचा. >>> बहुदा प्राईमवर आहे. यावर ईथे माबोवर एक स्वतंत्र धागा आहेच शिवाय इतरत्र बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली आहे. मलाही कथेचं नाव वाचून तो तीन कथानकाचा सिनेमा आठवला.

@निरू ,वावे, धनुडी, तेजो, रुपाली विशे-पाटील, mrunali-samad, मीरा, सामो, नादिशा, किल्ली, खूप छान वाटतं आहे की तुम्हाला सगळ्यांना कथा आवडली. वाचून अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार.
@नादिशा,मीरा, गंध सिनेमा पाहिला आहे. सचिन कुंडलकरचा. तिन्ही गोष्टी एकाच गंध या विषयवार असून पूर्णतः वेगळ्या, तरल आणि छान मांडल्या आहेत. नीना कुलकर्णी असलेली गोष्ट आवर्जून पाहण्यासारखी आहे. माबोचा धागा काही वाचला नाहीये मी.

नीना कुलकर्णी असलेली गोष्ट आवर्जून पाहण्यासारखी आहे. >>> तिन्ही कथांमधील माझी सगळ्यात आवडती आहे. 'बाजूला बसलेली बाई' - कथा, दिगदर्शन, अभिनय, संवाद, त्यातल्या कविता, पार्श्वसंगीत, कोकणची पार्श्वभूमी, सतत पडणारा पाऊस, ते घर सगळं काही अद्भुत वाटलं. तसं घर, ती प्रथा, कोकण /खेड्यातील जगणं या सगळ्या गोष्टीपासून कोसो दूर असल्यामुळे खूप कुतूहल वाटलं.

Online वाचतेय तरी आत्ता नव्याकोऱ्या पुस्तकाचा वास येत असल्याचा भास झाला! खूप छान!

मला जुन्या पुस्तकांचा वास आवडत असे. 'जाईची नवल कहाणी' हा अ‍ॅलिस इन वंडरलँडचा अनुवाद बाबांनी मला दिला होता. तो त्यांना त्यांच्या वडीलांनी म्हणाजे माझ्या आजोबांनी दिलेला. इतका वेगळाच जुना गंध होता त्या पुस्तकाला. जाईच्या त्या जादूभर्‍या गोष्टीची सांगड त्या गंधाशी जुळलेली आहे.
__________
कथा आवडली.

@आसावरी @अरिष्टनेमि @चिन्नू @कविन @जाई खूप खूप आभार.
@सामो, मलाही जुन्या पुस्तकांचा गंध आवडतो, थोडा मातकट असतो, म्हणून असेल कदाचित. गंध या विषयावर अजून खूप काही लिहिता येईल. जमलं तर पोस्ट करेन.

छान. संवेदनशील.

पुस्तकांचा गंध म्हटले कि खूप खूप प्राचीन काळात घेऊन जाणार जून महिन्यातला शाळेच्या नवीन वर्षातल्या वह्या पुस्तकांचाच गन्ध आठवतो...