२१-२२ मार्चचा विकांत होता आणि २५ मार्चला गुढी पाडव्याची सुट्टी. मध्ये दोन दिवसांची रजा काढून नवरा २१ मार्चला आई-वडिलांना भेटायला त्याच्या माहेरी गेला. गुढीपाडव्यादिवशी रात्रीपर्यंत घरी परतणार होता. गेली काही वर्षं आम्ही दोघं एकेकटेच ज्याला जसा वेळ आणि सुट्टी मिळेल तेव्हा अशी सासर/माहेरवारी करतो. एकमेकांच्या नादी लागलं की कुणाचंच जाणं होत नाही. त्यामुळे हे नेहमीचंच होतं. असो.
तर मी इकडे ’हुश्श! आता चार दिवस एकटं निवांत!’ असं म्हणत होते तोवर २३ मार्चला पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. आता चार दिवसांचं ’हुश्श’ किमान १४ एप्रिलपर्यंत कंटिन्यु होणार होतं. तरी तेव्हा त्याचं फारसं काही वाटलं नाही. एकतर मी नेहमी घरूनच काम करते, त्यामुळे तो सेट-अप सगळा घरी होताच. योगायोगाने आधीच्याच आठवड्यात एक-दीड महिन्याचं वाणसामानही भरलेलं होतं. त्यामुळे त्यासाठी त्वरेने काही धावपळ करण्याची आवश्यकता नव्हती. शिवाय ताबडतोब पॅनिक बटण प्रेस करण्याचा एकूणच माझा स्वभाव नाही. २५ मार्चपर्यंत anyway एकटं असणार होतोच, २६ मार्चपासून बघू काय वाटतं, असं ठरवलं.
जनता कर्फ्यूच्या दिवशी सकाळी गॅलरीत कॉफी पीत उभी होते, आणि लक्षात आलं की कानावर खूप पक्ष्यांचा किलबिलाट येत होता. आमच्या घराच्या आसपास थोडीफार झाडी आहे. काही अंतरावर खाडी आहे. त्यामुळे पक्षी भरपूर आहेत. पण सोसायटीसमोरच्या रस्त्यावरून पहाटे ५ ते रात्री १-२ वाजेपर्यंत वाहनांची अखंड वर्दळ असते. त्याचा कधीकधी खूप त्रास होतो. त्यामुळे खिडकीत येणार्या चिमण्या-कबुतरांशिवाय इतर पक्ष्यांचं अस्तित्व जाणवतच नाही. त्यादिवशी रस्त्यावर एकही वाहन नसल्याने तो किलबिलाट ऐकायला आणि दिवसभर एकूणच ती शांतता ऑसम वाटली.
त्याच आठवड्यात एका नव्या इंटरेस्टिंग प्रोजेक्टवर काम सुरू झालं होतं. त्यामुळे डोक्याला ते व्यवधान होतं. शिवाय किंडल होतंच. मला आठवतंय, लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात एक दिवस ८/८:३० ला रात्रीचं जेवण उरकून किंडलवर पुस्तक घेऊन बसले आणि त्यात इतकी हरवून गेले, की त्यानंतर घड्याळ पाहावंसं वाटलं तेव्हा रात्रीचे १२:३० वाजून गेले होते. अशी शांतता आणि विनाव्यत्यय पुस्तकवाचन फार फार वर्षांनी एकत्र मिळालं होतं. डिटॉक्स, रिज्युवेनाइट वगैरे वगैरे सगळं त्या चार तासांत साध्य झाल्यासारखं वाटलं. हे केवळ लॉकडाऊनमुळे शक्य झालं. मग जसजशी पुस्तकं वाचत गेले तसंतसं मायबोली, फेसबुक, ब्लॉगवर ’लॉकडाऊन पुस्तक’ म्हणून लिहायला सुरुवात केली.
सकाळी गजर लावून उठावं लागणे, हा माझा दैनंदिन कट्टर शत्रू क्र.१. एकटी असल्यामुळे त्या शत्रूपासून काही काळ मुक्तता मिळाली होती. मला स्वयंपाककामाचाही अतोनात कंटाळा आहे. ते कमीतकमी कसं करता येईल याकडे माझा डोळा असतो. लॉकडाऊनमुळे ती संधीदेखील मी साधली. कंटाळा असला तरी इतकी वर्षं इमानेइतबारे केलेल्या स्वयंपाककामाचा इथे उपयोगही झाला. लॉकडाऊनमुळे बाहेरचं काही खायला मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावरही not a big deal अशी मनोमन प्रतिक्रिया झाली.
दरम्यान घरी पेपर येणे बंद झालं होतं. टीव्ही न्यूज चॅनल्स बघणे मी कधीचंच सोडून दिलंय. मग इंटरनेटवर कटाक्षाने रोज एक तरी पेपर पाहायचा असं स्वतःला बजावलं. त्यातून कोरोनाकाळातले dos आणि donts मनाशी नोंदवून ठेवले. घरातल्या handwash वरच्या लेबल्सचे फोटो केमिस्ट्रीत बुडवून काढलेल्या नवर्याला पाठवले आणि कोरोनाकाळात ते चालतील ना (त्याचे active ingredient, alcohol content इ.) हे विचारून घेतलं. मुलगा microbiologist आहे. त्याच्याशी सविस्तर बोलून या virus संबंधीच्या माझ्या शंका, रोज घरात कोणती खबरदारी घ्यायची वगैरे समजून घेतलं. (यामागचा छुपा फायदा, म्हणजे आजतागायत सॅनिटायझर विकत घेतलेलं नाही.) तरीही कोरोनासारखी लक्षणं दिसायला लागली तर काय काय करायचं, याचा मनोमन विचार करून ठेवला.
या सगळ्यात रोज संध्याकाळचा चालण्याचा व्यायाम मात्र थांबला होता. ती जरा मनाला रुखरुख लागली होती. पण एक दिवस एका फेसबुक मैत्रिणीच्या पोस्टमुळे Walk At Home या यूट्यूब चॅनलबद्दल समजलं. थोडाथोडा करत तो व्यायाम नियमित सुरू झाल्यावर ती रुखरुख गेली.
१४ एप्रिलपर्यंत हे काही संपण्यातलं नाही, हे आत कुठेतरी वाटत होतंच. तसंच झालं. लॉकडाऊन-२ सुरू झाला. सोसायटीच्या गेटपाशी रोज सकाळी अर्धा-पाऊण तास एक भाजीची गाडी आणि एक अंडी-ब्रेड विक्रेता यायचा. आठवड्यातून एकदा खाली उतरून त्या वस्तू घ्यायच्या, पुढच्या ७-८ दिवसांचा जेवणाचा मनोमन प्लॅन करायचा, त्यानंतर समजा ती गाडी आली नाहीच तर पुढे ३-४ दिवस काय हे ठरवून ठेवायचं, एकच पळीवाढं तोंडीलावणं जरा जास्त करायचं, एकदा भाताबरोबर, एकदा पोळीबरोबर, एकदा भाकरीबरोबर अशी ३ जेवणं त्यात होतील हे बघायचं, भांडी-केर-फरशी पुसणे-डस्टिंग इत्यादी साफसफाई मूड आणि वेळ असेल तेव्हा करायचं, हा दिनक्रम आपोआप बसला.
लॉकडाऊन-२ दरम्यान एकदा लक्षात आलं की घरातले पैसे संपत आले होते. इतरवेळी बहुतेक ठिकाणी कार्ड पेमेंटनं भागतं. पण आता भाजीवाल्याला द्यायला वगैरे कॅशच लागणार होती. शिवाय १-२ नेहमीची औषधंही आणायची होती. मग एक दिवस दुपारी बाहेर पडले. रस्त्यांवर टोटल शुकशुकाट होता. एकूणच लॉकडाऊनदरम्यान बर्याचजणांकडून ऐकलं की रिकामे रस्ते खायला उठले, नको वाटले, वगैरे... पण खरं सांगते, मला त्यादिवशी रस्त्यात चालताना खूप छान वाटत होतं. मी रिकाम्या रस्त्याचे फोटोही काढले. दुर्मिळ दृश्य म्हणून, डॉक्युमेंटेशन म्हणून मी ते जपून ठेवलेत.
एटीएमपाशी सिक्युरिटी गार्ड होता, पण आत एसीत बसला होता. त्याला बाहेरून खुणेने एटीएम चालू आहे ना विचारलं. त्यावर त्याने ’हो, चालू आहे, आत या’ अशी खूण केली. मग ’येडा आहेस का? सोशल डिस्टंसिंगचं काय? आधी तू बाहेर ये...’ असा चेहरा करून त्याच्याकडे पाहिल्यावर तो पाय ओढत बाहेर आला. एटीएम पिन वगैरे एंटर करताना जवळचा रुमाल बोटावर गुंडाळून घेतला. बाकी काही donts आपल्या हातून राहून गेले नाहीत ना, हे सारखं आठवून बघत होते.
बाहेर फुटपाथवर नेहमीची एक भाजीवाली दिसली. भाजीचा धंदा बंद असताना ती इथे कशी याचं जरा नवल वाटलं. तरी ’काय मावशी, काय म्हणता?’ म्हणून तिची विचारपूस केली. त्यावर ती ’मजेत हाय, तू बोल...’ म्हणाली. संपूर्ण जगात लॉकडाऊनची शांतता अनुभवणार्या आम्ही दोघीच आहोत की काय असंच वाटलं मला तेव्हा.
तासाभरानं घरी परत आले तेव्हा उगीच काहीतरी achieve केल्यासारखं वाटलं. पण सार्वजनिक ठिकाणी माणसं अजूनही नियम पाळत नव्हती हे दिसत होतं. त्यानं चरफडायलाही झालं. दुपारी बाहेर पडताना खबरदारीचा उपाय म्हणून नवर्याला मेसेज करून सांगितलं होतं. पुढच्या ८-१० दिवसांत काही कोरोना लक्षणं दिसायला नकोत म्हणजे मिळवली असा मनोमन विनोदही केला. त्यानंतर आणखी एकदा जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये गेले. आपल्या हव्या असलेल्या वस्तू पटापट घ्यायच्या आणि जास्तीत जास्त १०-१५ मिनिटांत तिथून बाहेर पडायचं ही माझी प्रायॉरिटी होती. पण तिथे इतर कुणाला अशी घाई असल्याचं दिसत नव्हतं. निवांत गटागटानं माणसं फिरत होती. ते पाहून मी जरा सर्दच झाले.
घरातली उपकरणं, (मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, मिक्सर, फ्रिज) इत्यादी समजा बिघडली तर काय, याचाही मी विचार करून ठेवला होता. इतर वेळेला अशी किरकोळ दुरुस्ती नवराच करतो, बाहेरून माणूस बोलावून ही कामं करून घ्यायची कधी मला सवयच नाहीये. पण या उपकरणांविना कामं अडून राहत नाहीत, मनाची तयारी नसल्यानेच जास्त गोंधळ होतात, हा जुना अनुभवही होता. फोन किंवा कंप्युटर बिघडला असता तर मात्र प्रश्न उद्भवला असता. पण मग नाइलाज म्हणून शांत राहायचं असं ठरवलं होतं.
वातावरणातली शांतता enjoy करणे चालू होतंच. घरची अगदी जवळची मंडळी, ऑफिसची एक कलीग आणि काही मित्रमंडळी यांना मी घरी एकटी आहे याची कल्पना होती. ज्या मैत्रिणींना ठाऊक होतं त्यांना एकटेपणातले फायदे यावरून खिजवून, चिडवून, जळवूनही झालं. मात्र सरसकट ओळखीतल्या सगळ्यांना मी घरी एकटी आहे हे सांगणे मी टाळलं.
यादरम्यान अनेकदा माझ्या स्वभावाला अनुसरून ’चिंता करितो विश्वाची’ मोड ऑन झालाच. आपण निवांत आहोत, पण ज्यांना याची झळ बसली आहे त्यांचं काय, हा विचार कधीकधी सतावायचा. पण या घडीला लॉकडाऊनमुळे आपल्या हातात काहीच नाही हेदेखील दिसत होतंच. त्यामुळे त्याचा खूप त्रास करून घेतला नाही.
एकूण दोन महिने मी असे अंतर्बाह्य शांततेत एकटीनं घालवले. आणि frankly, हा कमाल अनुभव मी कधीही विसरणार नाही!
खिजवून चिडवून जळवून >>> अगागा
खिजवून चिडवून जळवून >>> अगागा! फार कमी पावरचे फुस्काट शब्द वापरलेत तै तुम्ही
याकाळात १४ या आकड्याचं महत्व वाढवण्याचे मोठे कार्य केलेत तुम्ही त्याबद्दल त्या आकड्यानेही तुमचे आभार मानले असतील
बाकी मस्त लिहीले आहेस. पण फार कमी लिहीले आहेस. बरच काही आहे अजून सांगण्यासारखे तुझ्याकडे
छान आढावा घेतला आहेस! पण अजून
छान आढावा घेतला आहेस! पण अजून डिटेलवार चाललं असतं!
छान अनुभव.
छान अनुभव.
खूप पॉझिटिव्हली लिहिलांय.
पण अजून मोठा पाहिजे होता
वाह! मस्त वेगळाच अनुभव!! मला
वाह! मस्त वेगळाच अनुभव!! मला वाचतानाही एकदम निवांत फील आला
अनुभव कथन आवडले.
अनुभव कथन आवडले.
कवे ते १४-पुराण सुरू केलं
कवे ते १४-पुराण सुरू केलं असतं तर खूप वाढलं असतं
मी २ महिने घरी एकटी होते हे माहिती असलेल्या काही मित्रमंडळींनी त्रोटक मजकुरावर खाजगीत नाराजी दर्शवल्याने लॉकडाऊन-२ दरम्यानची थोडी भर घातली आहे.
छान अनुभव
छान अनुभव
खूप छान वाचलं वाचून. अजून
खूप छान वाचलं वाचून. अजून लिहायला हवं होतं.
छान आले लेख लले पण त्रोटक
छान आले लेख लले पण त्रोटक वाटला.
छान लेख!
छान लेख!
लले!!!!!!!!!!!
लले!!!!!!!!!!!
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
आणखी बरंच काही लिहिता आलं असतं हे खरं आहे. पण ते पाल्हाळ वाटेल की काय असं म्हणून लिहिलं नाही. शिवाय काल स्पर्धेचा शेवटचा दिवस होता ही ट्यूब जरा उशीरा पेटली.
मंजू, त्या उद्गारचिन्हांमागे काय काय लपलंय?
छान लिहिलंय
छान लिहिलंय
चांगले लिहिलेय. बरेच लिखाण
चांगले लिहिलेय. बरेच लिखाण कोरिलेट झाले.
>> निवांत गटागटानं माणसं फिरत होती.
हे दृश्य अनेक ठिकाणी दिसतेय. व्यथित व्हायला होते. कोरोनाबाबत जसे संवेदनशील लोक आहेत तसेच त्याबाबत बेफिकीर वृत्ती पण खूप आढळते.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
>>>>एकूण दोन महिने मी असे
>>>>एकूण दोन महिने मी असे अंतर्बाह्य शांततेत एकटीनं घालवले. आणि frankly, हा कमाल अनुभव मी कधीही विसरणार नाही!>>>> सुंदर लिहीले आहे.
अरे वा मस्त , वेगळाच अनुभव.
अरे वा मस्त , वेगळाच अनुभव.
छान अनुभव कथन.
छान अनुभव कथन.
वेगळाच अनुभव. छान लिहिलंय
वेगळाच अनुभव. छान लिहिलंय
छान लिहिलेयस
छान लिहिलेयस