वस्त्र सुखदु:खाचे

Submitted by Asu on 13 July, 2020 - 01:27

वस्त्र सुखदु:खाचे

बिनकष्टाचा पैसा मिळता, कष्टाचे ना मोल कळे
घाम गाळुनी घास कमवा, धरतीवरती स्वर्ग मिळे
पैसा पैसा जमवून दिवसा, रात्री सुखाची भ्रांत पडे
गरीब बिचारा कष्टकरी तो, गोधडीवरही शांत पडे

सपक प्रेमाचे गोड बोलणे, भांडणाने होई खमंग
विरहा नंतर येता भरती, प्रेम होईल अति अभंग
कडू गोडाचे मिश्रण होता, मुखात विडा खूप रंगतो
आयुष्याचे तत्त्वज्ञान हे, ध्यानी घ्यावे तुम्हा सांगतो

आयुष्याच्या अफाट रस्ती, नाही कुठे झाडांची वस्ती
भटकून वणवण ह्या संसारी, विसरशील सारी मस्ती
सावलीची ना गंमत नेहमी, उन्हाचीही झळ सोसावी
ऊन्हानंतर सावली येते, शंका मनात कधीच नसावी

सुदैवी जे असतील असू दे, फुलेच ज्यांना सदा भेटले
वेदने विना सुख भोगले, आयुष्य ते मग काय जगले!
अनवाणी फिरून जीवनी, काटे सदाच आम्ही वेचले
दुर्दैवाचे दुःख साहुनी, खरे आयुष्य आम्हीच भोगले

सुखदुःखाचे धागे घेउनी, वस्त्र विधाता विणितो
भावनांचे रंग भरूनि, आयुष्य आपले सजवितो
बेचव दुनिया फक्त सुखाची, दुःखाने गोडी वाढे
दुःखानंतर येता सुख ते, जगण्याला मग रंग चढे

प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

आयुष्याच्या अफाट रस्ती, नाही कुठे झाडांची वस्ती
भटकून वणवण ह्या संसारी, विसरशील सारी मस्ती
वा छान
सुदैवी जे असतील असू दे, फुलेच ज्यांना सदा भेटले
वेदने विना सुख भोगले, आयुष्य ते मग काय जगले!
इथे असे केले तर ?
सुदैवी जे असतील असू दे, फुलेच ज्यांना सदा भेटली
वेदने विना सूूख भोगले, आयुष्य ती मग काय जगली!
अर्थात आपण मालिक आहात!