तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

Submitted by चामुंडराय on 14 August, 2020 - 11:26

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.

अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.

ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.

दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)

चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर

कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता

कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.

मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?

मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?

मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?

एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...

पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<इथे कोणीही 'माबो का लाल" नाही ज्याने धारोष्ण दूध प्यायले आहे> >> मी आहे की, लहानपणी गावी गेले की काका मागे जायचो गोठयात तेव्हा काका सरळ धार सोडी दुधाची डायरेक्ट आम्हा मुलांच्या तोंडात. मग तिथेच मस्त ग्लासभर कच्चे दूध प्यायचो आम्ही.

<<<इथे कोणीही 'माबो का लाल" नाही ज्याने धारोष्ण दूध प्यायले आहे> >> मी आहे की, लहानपणी गावी गेले की काका मागे जायचो गोठयात तेव्हा काका सरळ धार सोडी दुधाची डायरेक्ट आम्हा मुलांच्या तोंडात. मग तिथेच मस्त ग्लासभर कच्चे दूध प्यायचो आम्ही >> अय्या.. ह्याला धारोष्ण दूध म्हणतात होय.. VB मी देखिल मामा कडे जाऊन अगदी अस्सच डायरेक्ट धार तोंडात घेऊन दुध प्यायले आहे Happy

बकरी, मेंढीच्या दुधाचा चहा घेतला आहे. धारोष्ण दूध गाईचे प्यायलो आहे (डायरेक्ट धार वगैरे नाही, पेल्यातून प्यायलो आहे)

मी डिप्लोमाला असताना परीक्षेच्या दिव्सांत हॉस्टेलवर राहायचो तेव्हा सकाळी सकाळी उजाडायच्याही आधी दूध केंद्रावरच्या दूधाच्या पिशव्या पळवून तसेच पिशवीतून कच्च्या दूधाची धार प्यायचो Happy

माझ्या वाईट सवयी चोरीच्या धाग्यात याचा उल्लेख केला होता का चेक करायला हवे

दुध आवडतच नाही.
धारोष्ण,पिशवीचे, गवळ्याचे,गार,गरम,मिल्कशेक, गाईचे, म्हशीचे, बकरीचे कुठलेच पीत नाही.
Proud

लहानपणी आम्ही मुलं आसपास कुणी नाही पाहुन रानात चरणाऱ्या बकरीचे धारोष्ण दूध प्यायचो कधी.>> Lol
हा चहा दुधाचा धागा आहे की थापा मारायची स्पर्धा आहे.

मी पण सध्या कोरोना काळात कॉफी ऐवजी हळद दूध घेतोय
>>>

याने कोरोनापासून काही बचाव आहे का? माहितीसाठी विचारतोय

थाप नाहीय ती वीरु.
आम्ही बोरं, करवंद, चिंचा, शिंदोळ्या, आरोण्या, विलायती चिंचा, पेरु, जांभळं असे शेतात रानात जाउन तोडुन/वेचुन आणायचो. त्यावेळी हा ही उद्योग.
गाई, म्हशी शेपटी किंवा लाथा मारायचे म्हणुन त्यांच्या वाटी जायचो नाही जास्त.

कोरोना साठी काय उपयोग होईल माहिती नाही
पण सर्दी खोकला श्वसन यासाठी हळद दूध गुणकारी आहे
शिवाय अँटी बायोटिक गुण आहेत हळदीत
त्यामुळे झालाच तर फायदा होईल नुकसान काही नाही

मानव .. शिंदोळया.. आरोन्या कशा दिसतात ?

मी खूप वर्षांपासून घेतेय हळदीचे दूध..पावसाळ्यात आणि हिवाळ्यात.. सर्दी खोकला होत नाही आणि त्वचा पण तजेलदार राहते.

चिंचा, पेरु, जांभळं असे शेतात रानात जाउन तोडुन/वेचुन आणायचो. त्यावेळी हा ही उद्योग.>>
वाह मानवजी, खुपच छान! निसर्गाच्या सानिध्यात बालपण गेलय तुमचं.

शिंदोळ्या

आरोण्या या चॉकलेटी रंगाच्या, मीऱ्याच्या दुप्पट आकाराच्या असतात, त्यांच्या बिया बारीक असतात.

मी प्यायलेय धारोष्ण दुध ! सांगलीला मामा, मावशीकडे गेले की प्यायला मिळायचे. अजून ती सुरेख चव आठवतेय. सध्या राहत असलेल्या ठिकाणी पण धारोष्ण दुध मिळतेय. मुलाला प्यायला आवडतेय. Happy

धारोष्ण म्हणजे दूध देणाऱ्या प्राण्यांचे नुकतेच काढलेले व त्यामुळे उष्ण/कोमट असलेले दूध. दूध काढणे प्रकाराला धारा काढणे म्हणतात. असेच प्यायले तर धारोष्ण दूध प्यायल्याचा आनंद... गरम करून प्यायले तर ते आपले नेहमीचे दूध झाले.

मला अजूनतरी धारोष्ण दूध प्यायची संधी मिळालेली नाही.

इथे कोणीही 'माबो का लाल" नाही ज्याने धारोष्ण दूध प्यायले आहे?>>>>> प्यायलय कि, आम्ही पण आमच्या गावी म्हणजे देवरुखला जायचो तेव्हा डायरेक्ट धार तोंडात असं प्यायलोय. नंतर लग्न झाल्यावर सासरच्या गावी सातारा साईडला पण, गोंदवल्यालासुध्दा. इथे गोरेगावात एखाद्या गोठ्यात गेलं तरी मिळू शकेल.
आणि धारोष्ण दुध बेस्टम बेस्ट लागतं.

Pages