तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

Submitted by चामुंडराय on 14 August, 2020 - 11:26

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.

अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.

ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.

दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)

चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर

कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता

कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.

मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?

मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?

मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?

एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...

पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहासोबत फरसाण खायला मजा येते.

@ऋन्मेष तुम्हाला चहा नंतर बडीशोप देणारे विदर्भाचे आसतील. तिकडे पद्धत आहे तशी. प्रत्येक घरात सौफ सुपारी चा सुंदर डब्बा असतो.

@ऋन्मेष तुम्हाला चहा नंतर बडीशोप देणारे विदर्भाचे आसतील. तिकडे पद्धत आहे तशी. प्रत्येक घरात सौफ सुपारी चा सुंदर डब्बा असतो.
>>>>>>>
ओके असू शकेल. मी विसरलो त्यांचे गाव. विचारून सांगतो ईथे.
बाकी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते यातच तर मजा असते. आता कोणाला आपल्यासारखे चहात शेव-फरसाण, वडे-पुरी-घावणे, खारी-बटर वगैरे खाणे वेगळे वाटू शकतेच.

बाकी पेप्सी-थम्प्सप-कोकमध्ये बडीशेपचे दाणे टाकून ते पिणे आणि पिता पिता तोंडाला येतील तसे चावणे यात मजा यायची.
सध्या कोल्ड्रींक सोडूनच कित्येक वर्षे झालीत.

चहात पोहे टाकून खाणे हा देखील एक सुदाम्याचे पोहे टाईप्स मध्यमवर्गीयांमध्ये आढळणारा भन्नाट प्रकार आहे.
शेव फरसाणसारखेच पोहे टाकावेत चहात. आणि चमचाभर एक्स्ट्रा साखर टाकावी. मिनिटभरातच भिजून नरम पडतात. मग रप्पारप खावेत.

बाकी चहा कॉफी चे पुराण नंतर सांगेन,
पण एवढ्यात प्यायलेले एक भन्नाट पेय सांगतो
मिळण्याची जागा -कॅफे पीटर चा औटलेत
ब्लॅक कॉफी आणि कोक एकत्र, त्यात भरपूर आईस क्युब्स.
कॉम्बिनेशन विचित्र वाटते, पण चव आवडली, इन्स्टंट डोस of कॅफिन,
Coke zero वापरलेत तर शून्य कॅलरी ड्रिंक Happy

दुसरे आवडलेले म्हणजे गिंगर ऍल कॉफी (नक्की नाव आठवत नाही) स्टारबक्स
चव ठसठशीतपणे वेगळी लागते, सुरवातीला मजा वाटली पण शेवटाकडे चव बदलल्या सारखी वाटली, कदाचित बर्फ विताळल्यामुळे असेल.

ब्राझील सोडल्यानंतर तिथल काय मिस करतोय म्हणाल तर तिथली ब्लॅक कॉफी. एकदम कडक. विषेश स्वाद. आणि प्यायची पद्धत - अगदी २० एमएलचा छोटा ग्लास. अगदी टकिलाच्या मापातला. त्याच्यात दूध, साखर मागितल तर स्कॉचमधे सोडा मागितल्यासारखे पाप. बर ही कॉफी हॉटेलच्या लाउंजमधे किंवा सुपरमार्केट मधे अगदी फुकट देणारीही मशीन्स असतात. बसल्याबसल्या एक टकाटक. अक्षरशः किक आणणारी कॉफी. मला त्यातली गंमत एन्जॉय करता यायला खूप वेळ गेला. Happy . त्याच्या पुढे भारतात आपण पितो ती कॉफी. सॉरी.
पण हे मात्र खरय. Anything can happen over a cup of coffee. Happy

इंजिनियर असल्याने चहा नाकारण हे पाप आहे अस मी समजतो. कधीही, कुठेही, कसाही कुणीही केलेला चहा मनापासून आवडतो.
अनेक ठिकाणी राहिल्यामुळे वेगवेगळे प्रकार मिळालेत. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी. पण एकदा नॉर्थ मधे कुठेतरी खारट चहा मिळाल्यावर जरा धक्काच बसला होता. साउथचा चहा मात्र त्यांच्या देवनागरी लिपीतल्या पाट्यांवरच्या अक्षरासारखा असतो. वाचता तर येते पण ही देवनागरीच नाही अस वाटत रहाते. Happy

दुध पण लहानपणापासूनचा आवडता प्रकार. इतका की मला दुधाच्या बाटलीच्या रबराची अ‍ॅलर्जी झाली होती.
तेंव्हा घरी गायी असल्याने दुधाची रेलचेल. फक्त दुधाचा चहा, फक्त दुधाची कॉफी, साय घातलेली चहा कॉफी सगळ अप्रतीम.

पूर्वी अभ्यास करताना चमच्याने हळू हळू साय घातलेली कॉफी पिण्याची सवय अजूनही आहे. अगदी कॉफी लिक्युअरच्या सीप सारखी. Happy

सोलापूर मध्ये मारामारी नावाचे पेय मिळते... चहा आणि कॉफी एकत्र उकळतात...
सोलापूर विझिट कराल तर नक्की try करा..
मस्त असते...

हे कारण नाही.
घरी आल्यावर गोड/अगोड काहीही खाल्ल्या पिल्यावर , सोप सुपारी देण्याची पद्धत आहे.

मलाही कॉफी आवडते.
बीन्स रगडून फ्रेश काळी कोरी कॉफी... दूध न घालून/घालून ...साखर न घालता/घालून/ ....एस्प्रेसो...., बंगलोरची पेल्यामधली फिल्टर कॉफी...

पण GERD मुळे कॉफी पिण्यावर बंधन आले.

मला चहा कमी साखर, कडक ,दुध 60% , पाणी 40% असा आवडतो. चहात बुडवून खारी,टोस्ट,बिस्किटे, शंकरपाळी खाऊ शकते.
पण चकली,फरसाण, वडे,पोहे कसे खायचे चहात टाकून. फारतर एका कपात चहा आणि एका प्लेट मधे वरील तिखट पदार्थ खाउ शकते.
माझी एक मैत्रीण चहात मुरमुरे टाकून खायची.

चकली मस्त लागते चहात बुडवून. खूप मऊ होईपर्यंत नाही भिजवायची. भूक लागलेली असेल आणि बुडवायला इतर काही नसेल तर पोहेही छान लागतात चहात घालून. कच्चे, पांढरे पोहे. जाड. चहाच्या कपात घालून ठेवायचे. चहा पिऊन होईपर्यंत चांगले भिजतात. चमच्याने खायचे.

पुण्यात असताना,सकाळी ऑफिसला निघायच्या घाईत, चहा-चपाती रोल करून नाष्टा असायचा जवळपास रोजच.
भाजी चपाती तयार असायची डब्यासाठी. मग सोपं पडायचं
आदल्या दिवशीची पुरणपोळी पण आवडते दुसर्या दिवशी चहा सोबत.

आदल्या दिवशीची पुरणपोळी पण आवडते दुसर्या दिवशी चहा सोबत.
>>>

आदल्या दिवशीची पुरणपोळी वा चपाती तव्यावर भाजून खाकरयासारखी कडक करायची. आणि मग चहाचा घोट घेत कुडुमकुडुम. रोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी माझा हाच नाश्ता असायचा. गेले ते दिवस.

ए तुला चहा आवडते की कॉफी हा प्रश्न मला ए तुला सॉफ्ट मेलोडीअस संगीत आवडते की ढिंच्यॅक मुजिक यासारखाच गंडलेला वाटतो.

जसे संगीताबाबत आपण प्रवास करतोय, प्रणय करतोय, घरकाम करतोय, एखाद्या नीरव शांत रात्री डोळे मिटून नुसतेच पडलोय वा पार्टीत उश्या मारत नाचतोय यानुसार कोणत्या प्रकारचे म्युजिक हवे हे ठरते तेच चहाकॉफीलाही लागू

सुट्टीच्या आळसावलेल्या सकाळी मस्त कांदेपोह्यांचा बेत आहे - चहाच हवा

विकेंडला लेट नाईट रात्र जागवत आपल्या जोडीदारासोबत गप्पांचा फड जमवतोय - कॉफीच हवी

पायपीट केलीय, दमलोय, पावसात भिजलोय, आणि मग गरमागरम वडापाव कांदाभजी हादडल्यात - वाफाळलेल्या कटींगला पर्याय नाही

गर्लफ्रेंडसोबत एखाद्या रोमांचिक संध्याकाळी डेटवर आलो आहोत - ईथे चहा की कॉफी हे सांगायची गरज आहे का Happy

सोलापूर मध्ये मारामारी नावाचे पेय मिळते... चहा आणि कॉफी एकत्र उकळतात...
सोलापूर विझिट कराल तर नक्की try करा..
मस्त असते...

नाव काय त्या पेयाचे? एक मारामारी किंवा दोन कटींग मारामारी द्या असं म्हणायचं का?
Lol

मी बरेच लहानपणी म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी त्रंब्यकेश्वरला नागबळी नारायण करायला गेलेलो तेव्हा तिथे एका टपरीवर हे मारामारी प्रकरण पाहिलेले.
पण बोर्डावरच पाहिलेले. नेमके काय करतात हे तेव्हा माहीत नव्हते. नाव वाचून आकर्षित झालेलो.

माझी एक शंका आहे.
दुध शाकाहारी कि मांसाहारी? आतापर्यंत या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नाही मिळाले. सो कुणाला माहिती असेल तर सांगावे.

दूध प्राणीजन्य आहे. व्हेगन लोक फक्त वनस्पतीजन्य पदार्थ घेतात त्यामुळे त्यांना प्राण्यांचे दूध चालत नाही, मधसुद्धा नाही.
दूध मांसाहारी की शाकाहारी हे तुम्ही करता त्या व्याख्येवर अवलंबून आहे. वनस्पती सोडून इतर जीवाची हत्याकरुन मिळणारे ते मांसाहारी अशी व्याख्या असेल तर दूध शाकाहारी. पण मग बहुतेक शाकाहारी हीच व्याख्या लावून अंडी मात्र शाकाहारात मोडत नाहीत.
तेव्हा दूध शाकाहारी, त्यात वाद नसावा. पण अंडे शाकाहारी का नाही हा वादाचा मुद्दा ठरतो.

अंडी उबवल्यावर त्यातून पिल्लु बाहेर येते मात्र दुधावर प्रक्रिया करून वासरु तयार होत नाही.... अंडी शाकाहारी की मांसाहारी हा वादच निरर्थक आहे... पिरियड

दूध मांसाहारी की शाकाहारी हे तुम्ही करता त्या व्याख्येवर अवलंबून आहे. ...

तेव्हा दूध शाकाहारी, त्यात वाद नसावा.

What is scientific logic behind it?
Is it perception that milk is veg?

अंडी उबवल्यावर त्यातून पिल्लु बाहेर येते मात्र दुधावर प्रक्रिया करून वासरु तयार होत नाही. >>
हे सगळ्याच अंड्यांना लागू होत नाही. कृपया unfertilized and fertilized egg बद्दल वाचावे. कोंबडी, कोंबड्याच्या संपर्कात न येताही अंडी घालते. त्यातून पिलु निघु शकत नाही. मग ही अंडी शाकाहारी म्हणायला हवी तुमच्या व्याख्येने.

What is scientific logic behind it? > > लिहिले आहे ना. कुण्या जीवाला मारुन ते बनवलेले नाही म्हणुन.

कुण्या जीवाला मारुन ते बनवलेले नाही म्हणुन.

हे perception झाले. दुध मिळतय तर प्राण्यांपासून ना.
Milk is a filtered blood.
From same animal flesh is considered as a non veg and milk is veg? how?

मानव पृथ्वीकर, शाकाहार म्हणजे टेक्निकली झाडपाला टाईप अन्न पण दुधाप्रमाणे इथे मी सोयीसाठी ती unfertilized अंडी शाकाहारी मानेल ( पण मी ती नाही खाणार).
माझ्यादृष्टीने जीवहिंसा होते तो मांसाहार आणी जीवहिंसा नाही होत तो शाकाहार. हिंसेमध्ये दुधावर वासराचा हक्क किंवा अंड्यावर कोंबडीचा हक्क हे विषय पण येतात तशे पण एखाद्या निष्पाप प्राण्याला मारून खाण्यापेक्षा दुध पिणे/ unfertilized अंडी खाणे परवडले.

Vegan वेगळे आणि Vegetarian (शाकाहारी) वेगळे. शाकाहारी मध, दूध घेतात.
Vegan फक्त वनस्पतीजन्य पदार्थ घेतात. आम्ही जवळपास दोन वर्षे व्हेगन आहार पाळला.
तेव्हा मी तांदूळ, शेंगदाणे, बदाम, काजु यांचे दूध व दही बनवायचो. विरजण म्हणुन हिरव्या मिरचीचे देठ वापरायचे, व्हेगन दही विरजणाला नसेल तर.
व्हिटमिन B12 साठी Nutritional yeast घ्यायचो. मजा यायची.
मग बायकोने अचानाक पुरे झाले व्हेगन आता म्हणुन जाहीर केले.

Pages