निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू यंदा आईबरोबर गप्पा मारताना जामचा विषय आला तेव्हा विचार करत होतो की जागूताई कुठं गेल्या बरें Wink

आज मला आनंदी आनंद गडे असे झालेय. लेक व मी दोघींनी आनंद साजरा करूनही तो अजून भरपूर उरलाय. तो आता सर्वत्र वाटतेय.

घरचा सगळा कचरा घरच्या कुंड्यांमध्येच जिरवायची सवय. त्यामुळे माझ्याकडे कायम पपई, सीताफळ, आंबा वगैरे मंडळी रुजून येतात. त्यात पपई व सीताफळ तर भरपूर, आज बिया टाकल्या की आठवड्यात रोप हजर.

माझ्याकडे आता फारसे ऊन नसल्याने मी ही रोपे अगदी लहान असतानाच काढून टाकते, तरी काही चुकार रोपे तशीच राहतात. ही सगळी जनता स्वतःहून उगवलेली असल्यामुळे कुंडीमालक वेगळे झाड असते आणि हे पोट भाडेकरू.

असेच कण्हेरीच्या कुंडीत एक सिताफळाचे रोप राहून गेले. कण्हेरीच्या पसाऱ्यात मला ते आधी दिसले नाही, फूटभर वाढल्यावर दिसायला लागले आणि इतके वाढलेले काढायला जीव झाला नाही. मग ते तसेच राहिले. किती वर्षे झाली देव जाणे. चार पाच वर्षे नक्की झाली असतील. मी त्याला कितीदा छाटलेही असेन. झाड साधारण तीन फूट उंच व चारपाच फांद्या असे रूप आहे. कण्हेरीसोबत राहतेय.

गेल्या वर्षी सीताफळाला फुले लागली होती पण ती सगळी बारकुंडी नर फुले होती. त्यांना सिताफळे लागणार नव्हती.

यंदा मार्च- एप्रिलपासून मांसल पाकळ्यांची मोठी फुले यायला लागली आणि माझ्या आशेचे अंकुर पालवले. पण हाय रे दैवा, फुले जळून जात होती. यंदा ऑक्टोबरपासून मी माझ्या कुंडीतल्या सगळ्या झाडांना अधून मधून जीवामृत पाजत होते, घनजीवामृतही देत होते. पावसाळ्याआधीची सफाई म्हणून मे मध्ये एकदा सगळ्या कुंड्या साफ केल्या, उरलेले घनजीवामृत दिले. बाकी झाडांसाठी करण्यासारखे काहीही हातात नव्हते.

तरी लॉकडाऊनमध्ये माझ्या शेवग्याने 10 शेंगा दिल्या, भाजीचे अळू दर दोन आठवड्याने चार पाच पाने देत होते, त्यात भोपळ्याची तीनचार पाने व अंबाडीची सात आठ पाने टाकली व मूठभर शेंगदाणे ढकलले की मस्त अळूचे फतफते तयार होत होते. दिनेशदांनी दिलेल्या अबईच्या बीनेही सुंदर वेलीचे रूप धारण करून दोन शेंगा दिल्या. मी आंबोलीला आले तेव्हा वेलीला दोन छोट्या शेंगा व भरपूर फुले होती. शोभेचे कृष्णकमळ दर दिवशी दोन तीन फुले देत होते. पॅशनफ्रुटचे मात्र अजून लहान असल्यामुळे नुसतेच वाढत होते. एडिनियम त्याला जमेल तितके फुलत होते, इकडून तिकडून आणलेल्या गुलबक्षीला फुले येत होती.

कोरोनाचा कहर वाढल्यावर आणि ऑफिसचे काम अनिश्चित काळापर्यंत घरूनच करावे लागणार हे लक्षात आल्यावर गावी यायचा निर्णय घेतला. इकडेही भरपूर कारणे वाट पाहात होती पण इतके दिवस ऑफिसमुळे जमत नव्हते तो अडथळा दूर झाला.

गावी गेल्यावर माझी बाई बाग बघणार होती पण ती मार्चपासून सुट्टीवर आणि कॉलनीत अजून बाया येत नव्हत्या. शेवटी शेजाऱ्यांना सांगितले, माझी बाई सकाळी लवकर येऊन पाणी देईल, कोणाला तिचा संसर्ग होणार नाही. त्यांनाही त्रास नव्हता, त्यामुळे बागेचा निरोप घेऊन आम्ही गावी आलो.

काल बाईला म्हटले बागेचे फोटो दे. तिने आज फोटो दिले आणि काय गम्मत... सिताफळाला पिटुकले सीताफळ लागलेले.... बघितल्यापासून माझा आनंद गगनात मावत नाहिये...

IMG-20200830-WA0027.jpg

देवकी, सगळ्या झाडांवेलींना 2 प्रकारची फुले येतात. पपई, जायफळासारखी काही झाडे आहेत जिथे नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. पण बाकी इतर झाडांवर नर व मादी फुले एकाच झाडावर येतात. तुम्ही कारली, भोपळा, दुधी, दोडका वगैरे वेली पाहिल्या असतील तर काही फुले कारली वगैरे मागे घेऊन जन्माला येतात तर काही नुसतीच जन्माला येतात असे बघितले असेल. नीट पाहिले तर दोन्ही फुलांची आतली रचना वेगवेगळी असते. मादी फुले ओव्हरी घेऊन जन्माला येतात. परागीभवन झाले तर ओव्हरीचे रूपांतर फळात होते, नाहीतर ओव्हरी गळून पडते.

सीताफळाबाबत मात्र काहीतरी वेगळीच माहिती आता वाचनात आली. याच्या एका फुलात नर व मादी दोन्ही असतात. आधी मादी सक्रिय होते आणि नंतर त्याच फुलातील नर. ह्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की एका फुलातील मादी सक्रिय झालेली असताना आजूबाजूच्या फुलांतील नर सक्रिय असावे लागतात. तरच परागीभवन होऊन फळधारणा होते. या प्रॉब्लेममुळे सीताफळात ब्रशच्या साहाय्याने परागसिंचन केल्यास फळधारणा वाढू शकते. निसर्गावर सोडल्यास रामभरोसे काम होणार जे बागायतदारांना परवडणार नाही. रसायने वापरली तर फळे फुटतात. त्यामुळे तेही करता येत नाही. सध्यातरी कृत्रिम परागीभवनावर बागायतदारांचा भर आहे असे वाचले.

मी जी बारकुंडी फुले नर समजत होते ती मालन्यूट्रिशनमुळे बारकुंडी राहिली असणार. योग्य न्यूट्रिशन मिळाल्यावर फुले जोमात येऊन बाळ झाले Happy Happy

फोटो सर्वच एकसे एक. अस्मिताचे फोटो दिसत नाहीये. वर्षा फोटो दिसत नाहीये.

साधना मस्त स्टोरी सीताफळाची. सुंदर फोटो.

साधना तुमच्या आंबोली घराच्या परिसराचा एक व्हिडीओ youtube वर बघितला. मस्त परिसर. बांबू झाडं बघून माहेरी असलेलं बांबू बन आठवलं. घर मात्र तुम्ही नीट दाखवलं नाही त्यात.

आवडीचा धागा पण हल्ली कुणी फिरकतच नाही ह्या धाग्यावर त्याचे वाईट वाटते. साधनाताई माहिती छान दिलीत.

छान माहिती साधना.अंजूच्या प्रतिसादामुळे मधेच आंबोलीला जाऊन आले.अहा एकदम मस्त!. तुतीचे झाड आहे ना.मस्त.

अंजू, मला एकेरीच हाक मार गं... >>> चालेल.

तुतीचे झाड आहे ना.मस्त. >>> हो हो तुती जबरदस्त, लिहायला विसरले.

जरा पाऊस कमी होउदे, मग घर दाखवते. आता बाहेरून झाकून घेतलेय. >>> चालेल.

इथे आजही तुफानी पाऊस आहे. >>> बाब्बो, मज्जा येतेय पावसाची की कंटाळा आलाय.

साधनाताई सीताफळाची स्टोरी आणि फोटो मस्तच.

<< आवडीचा धागा पण हल्ली कुणी फिरकतच नाही ह्या धाग्यावर त्याचे वाईट वाटते. साधनाताई माहिती छान दिलीत. >> +1

बाब्बो, मज्जा येतेय पावसाची की कंटाळा आलाय>>>
अग आता शेतीची कामे सुरू करायची आहेत मला पण पाऊस काही करायला देतंच नाही. आता बस कर बाबा बोलावेसे वाटतेय Happy Happy

आणि पावसाची मजा पर्यटकांनाच ग. बाकी रहिवासी कसेतरी राहतात. आमच्या ह्या घरात पावसाळ्यात आम्ही कधी आलोच नाही. त्यामुळे इथे काय त्रास आहे ते कधी कळले नाही.

घरावर पत्रे व त्यावर कौले असे आहे. पावसात वातावरणातील पाणी इतके वाढते की पत्रे आतून ओल पकडतात. पुरेशी ओल पकडली की त्याचे थेंब होतात, पुरेसे थेंब जमले की टीप टीप बरसा पाणी सुरू होते. मग ते घरभर कुठेही होऊ शकते. दोन्ही बेडरूममधल्या गाद्या फोमच्या आहेत म्हणून आहेत. कापसाच्या गाद्या बाराच्या भावात गेलेल्या आहेत. आणि थंडी इतकी की 1 ब्लॅंकेट व 3 सोलापुरी चादरी पांघरून घेऊनही वाजतेच. इथे आल्यावर आधी रूम हिटर ऑर्डर केला. त्यामुळे आम्ही जगलो व आमचे कपडे रोज वाळले. हिटर यायच्या आधी कपडे धुणे बंद केले होते. 4-4 दिवस वाळत ठेवले तरी जसेच्या तसे ओले.

आताही अगदी थंड हवा होऊन पाऊस ओततोय बाहेर. मला शेतावर जायचे होते आज जीवामृत द्यायला. पण आता कुठे जाणार ह्या पावसात?

पावसात बारीक चण्याएव्हढे बेडूक आणि इतर किडे फिरतात सगळीकडे. कवचवाल्या व कवचहीन गोगलगाया कुठेही भेटतात घरात. प्रकाशहीन काजवेही फिरतात. एक काजवा माझ्या बेडमध्ये झोपतो, सकाळी उठतो माझ्याआधी. ऐशु सांगते की त्याला मी खूप आवडत असणार म्हणून ... Happy Happy

आंबोलीतील पाऊस एक दिवस मज्जेचा आहे. पण कायम सजा आहे. अर्थात सवयीचा प्रश्न आहे. इथेही लोक राहताहेत. (तूंबाडची आठवण झालेली सुरवातीला) आम्हाला सवय झालीय तशी. पण ऐशु अधून मधून वाडीला जायचा हट्ट धरते. तिथे जाऊन उन्हात दोन तास घालवले की तिला बरे वाटते. आणि खरेच मलाही बरे वाटले होते, 2 महिन्यानंतर अचानक धुकेविरहित हवा, नो पाऊस, सूर्य वगैरे पाहून.. आता वाडीलाही कोविड पेशंट सापडताहेत. त्यामुळे आता कुठेही न जाता घरात गप्प बसून राहायचे.

पावसाळा संपला की भरपूर कामे आहेत. पण संपेल तेंव्हास Happy Happy

बाकी तशी खूप मज्जा केली आम्ही. पहिल्यांदा रानातली अळंबी खाल्ली, तीही भरपूर. घरचे अळू कित्ती खाल्ले देवालाच ठाऊक.. भाजी आणि वडी दोन्हीचे अळू आहे. दारात पेरू आहेत, त्याचे पेरु हाताने तोडून खायचे सुख अनुभवले. आताही पेरू लगडलेत पण आतून खराब आहेत. गणपती वगळता इतर सण तितकेसे पाहता आले नाहीत कारण पावसामुळे गावातल्या घरी जाणे होत नव्हते. गणपतीचे सगळे दिवस मजा केली, विसर्जन केले. हे आधी कधीच मिळाले नव्हते. घरातील मुलींना ऐशु शिकवतेय. अडाणी दिसणाऱ्या मुली किती स्मार्ट आहेत हे कळतेय. आणि त्यांना शिक्षणाची किती ओढ आहे हेही कळतेय. मुलीच मागे लागतात पुढचे शिकव म्हणून.

एकूण मज्जानू लाईफ सुरू आहे. ऑफिस इतक्यात बोलावणार नाहीये, त्यामुळे भरपूर दिवस मज्जानू लाईफ सुरूच राहणार आहे.

हो ग साधना! ४ दिवस येणार्‍यांना कित्ती मज्जा वाटते.पण जे तिथे कायम रहातात्,त्यांना काय त्रास होत असेल? आंबोलीला बरेच वर्षांपूर्वी हॉटेलच्या खिडकीतून धुक्याचा ढग खोलीत शिरला,त्यावेळी मला वाटलेलेला नवलमिश्रित आनंद आणि लेकाला वाटलेली भिती अजूनही आठवते. आंबोली पहावी पावसाळ्यात.हे मी पर्यटकाच्या भूमिकेतून म्हणतेय.

Pages