रेशीमगाठी

Submitted by एविता on 27 June, 2020 - 12:23

रेशम कि डोरी।

मी आता आई होणार हे कळलं तेंव्हा काही काळानंतर मी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि मग घरी राहू लागले. ऋषिन मात्र ऑफिस मधून दर दीड दोन तासांनी फोन करायचा आणि मी कशी आहे याची विचारपूस करायचा. मी आणि ऋषीन एकाच ठिकाणी एकाच प्रोजेक्ट वरती काम करायचो. कधी तरी त्याला काही अडलं तर मला विचारायचा. तो भावनिक होता आणि समजूतदार ही होता. एकदा असंच त्यानं मला काहीतरी विचारलं आणि मी चिडले आणि फोन आपटला. माझ्या आताच्या स्थितीत मी जरा जास्तच चिडचिड करत होते.

"का चिडलीस?" असं त्यानं घरी आल्यावर विचारलं तेंव्हा माझ्या आताच्या स्थितीला तुझे उद्योगच जबाबदार आहेस असं मी त्याला म्हंटले तर "इस बिज़नेस में आप मेरी बराबर कि पार्टनर है, पार्टनर..." असं म्हणत हसत सुटला. माझा चिडका स्वभाव त्याला माहिती होता पण तो शांत आणि समंजस होता. शब्दाने शब्द वाढत जातात आणि आवाज चढत जातो हे आम्हा दोघांनाही माहित म्हणून संवाद आता विसंवाद होतोय हे त्याच्या लक्षात पटकन यायचं आणि तो लगेच त्याला कलाटणी द्यायचा. मला ते जमायचं नाही. मी तर माझ्या आई आणि बहिणीशी पण वाद घालायचे. अर्थात् नंतर सॉरी म्हणून सावरून घ्यायचे पण एकदा काच तडकली की तडकली.

एकदा असंच ऋषिन आणि मी विसंवादाच्या सीमेवर पोचलो आणि तो म्हणाला, " आता कळलं एवीता, लग्नात मी तुझ्या बाबांच्या पाया पडलो तेंव्हा ते मला'ऑल द बेस्ट' असं का म्हणाले."

माझ्या लक्षात पटकन काही आलं नाही. नंतर लक्षात आलं आणि " क्काय....?" असं म्हणत मी त्याला पकडायला गेले तेंव्हा मी पुढं काही म्हणायच्या आत माझ्या ओठावर ओठ ठेऊन त्यानं माझं तोंड बंद केलं.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला म्हणाले" ऋ... तू माझं नाव का बदललं नाहीस रे..? एवढं तुला आवडतं माझं नाव?.. सांग ना.."

" अगं माझ्या मनात होता बदलायचा विचार, मी तांदळावर लिहिणारच होतो, पण नाव बरच मोठं होतं म्हणून विचार बदलला." त्याने मला जवळ ओढत उत्तर दिलं.

मला उत्सुकता लागली. " हो? मोठ्ठं नाव..? सांग बरं काय लिहिणार होतास ते...? सांग लवकर.. "

" राहू दे एवी, एवीतेवी तुझं आहे तसं ठेवलंय तर राहू दे. मला तुझच नाव जास्त आवडतं. काय बेस्ट नाव ठेवलंय ग तुझं तुझ्या बाबांनी..! ऑसम..! " माझ्या केसात नाक खुपसून तो म्हणाला " अल्फाबेट ए वरून एकदम व्ही वर...! झेड पर्यंत का नाही गेले काही कळलं नाही."

" पुरे आता चेष्टा," मी बोलले, "सांग लवकर काय ते तुझं मोठ्ठं नाव..."

" सांगतो," तो म्हणाला, " मी लिहिणार होतो,.... तडकेश्वरी....."

मी त्याच्या छातीवर गुद्दे मारले. त्यानं मला करकचून धरलं. " मी पण तुझं नाव बदलणार होते, " मी म्हणाले, " मर्कटेश्वर ठेवणार होते..."

" त्यांनी काही फरक पडला नसता. आपण माकडाचे पूर्वजच आहोत..." तो उत्तरला.

माझे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसं माईला बोलावून घेऊ या आता असं तो म्हणाला. माई म्हणजे माझ्या सासूबाई. माझा चिडका स्वभाव त्यांना माहित होता आणि असंच एकदा त्यांच्या बरोबर वाद झाला होता तेंव्हा ऋषिन अगदी शांत बसला होता. " तुझ्या डोक्यावर ही मिरे वाटणार रे बाबा" असं म्हणत दुसऱ्या दिवशी त्या इंदूरला, इशानकडे, ऋषिनच्या मोठ्या भावाकडे निघून गेल्या. इशान त्यांचा जास्त लाडका. इकडे येत असत तेंव्हा इशान, माझ्या मोठ्या जाऊबाई इरा आणि नातू इप्सित यांच्या बद्दलच जास्त बोलत असत. इरा माझ्याशी अगदी छान वागायची. मोठी जाऊ म्हणून "जाऊ बाई जोरात" असा काही प्रकार नव्हता. इशानचे लग्न ठरवून झाले होते आणि माझा प्रेम विवाह म्हणून त्या अशा वागायच्या असा माझा कयास. माझ्या लग्नात त्यांना दिलेली पैठणी आम्ही अगदी येवल्याहून आणली होती. पण त्यांना रंग आवडला नाही. नंतर त्या डोहाळ जेवणात नेसल्या होत्या एकदा. ऋषीन वर त्यांचा जीव नव्हता असं नव्हे. शेवटी तो शेंडेफळच.. माई आल्या की अगदी त्यांच्या अवती भोवती करायचा. " मम्माज बॉय "! सगळे हजबंडज् असेच असतात बहुतेक.... आपल्याला कुठे मम्म्माज गर्ल बनता येतं...? आईशी सूत जुळत येतं तो पर्यंत बोहोल्यावर चढायची वेळ येते. सासूला नुसतंच म्हणायचं आई, आणि ते ही बहुवचनात... अहो आई.. ए आई म्हणण्यात जो गोडवा आहे तो अहो आई म्हणण्यात कसा येणार? सो फॉर्मल... कशा जुळतील मग नाती...?

संध्याकाळी ऋषिनने इंदूरला फोन केला. " माई, तू येतेस ना? एविता वाट बघतेय तुझी..." अं...? हां.. हां... हो.. हो का..? बर... ठीक आहे. तसच करू. चल.." त्याने फोन बंद केला.

" काय रे, काय म्हणाल्या माई?" मी विचारलं.

" ती तुलाच यायला सांगतेय, ती येणार नाही म्हणाली. एविता आली तर बरं वाटेल, शिवाय इरा पण मदतीला आहे असं म्हणत होती.." तो उत्तरंला.

" माझ्याशी बोलल्या पण नाहीत," मी मुसमुसले. " जाऊ दे... मी माझ्या आईलाच बोलावून घेते. तेच बरं..."

रात्री ऋषीन जेवण झाल्यावर गझल ऐकत बसला होता. निदा फ़ाज़लीनी लिहिलेली ती गझल....

बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ,
याद आता है चौका-बासन, चिमटा फुँकनी जैसी माँ।

बाँस की खुर्री खाट के ऊपर हर आहट पर कान धरे,आधी सोई आधी जागी थकी दुपहरी जैसी माँ।

चिड़ियों के चहकार में गूँजे राधा-मोहन अली-अली,
मुर्गे की आवाज़ से खुलती, घर की कुंडी जैसी माँ।

बीवी, बेटी, बहन, पड़ोसन थोड़ी-थोड़ी सी सब में,
दिन भर इक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ।

बाँट के अपना चेहरा, माथा, आँखें जाने कहाँ गई,
फटे पुराने इक अलबम में चंचल लड़की जैसी माँ।

ज्युनिअर ऋषीनने माझ्या पोटात आतून एक धडक दिली. बाप रे... ही बालकं आता लाथा मारतात आणि नंतर आईच्या अवती भोवती घोटाळतात. या लाथांचं प्रायश्चित्त घेतात बहुतेक....दिन भर इक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ।... किती कष्ट घेते आई एका बाळाला वाढवताना... जन्म देताना तर अगदी मरणाच्या दारातूनच परत येते ती... बाळाचा श्वास आणि आईचा श्वास एकसाथ चालत असतो. बाँट के अपना चेहरा, माथा, आँखें जाने कहाँ गई.... खरंच... आपल्या हाडामांसाचा गोळा... माईना ऋषीनला मोठं करताना किती त्रास झाला असेल... सो व्हॉट इज रॉंग इफ ही इज मामाज बॉय....? मला पण माझा मुलगा आईभक्त असलेला आवडेलच की....

माझं वागणं चुकतंय बहुतेक. ऋषीनचं आडनाव मी लावतेय आता... माई माझ्या आईसारख्याच... कितीही माझ्याशी वाईट वागल्या तरी मलाच समंजसपणा दाखवावा लागेल. या नात्याची उकल करावी लागेल. ही नातीगोती म्हणजे रेशमाच्या धाग्यांची गुंतागुंत... ती सोडवताना वेळ लागणार च.. लागू दे वेळ... जगजीत सिंग म्हणतो ना.." गांठ अगर लग जाए तो फ़िर रिश्ते हो या डोरी...लाख करे कोशिश खुलने में वक्त तो लगता है.... माईना ह्या ओळी माहिती नसतील कदाचित पण मला तरी ठाऊक आहेत ना....

मी उठले. आईला फोन करायचा नाही असं ठरवलं. परवा सकाळचं इंदूरचं फ्लाईट बुक केलं.
मला मोबाइल हाताळताना बघून ऋषीन जवळ आला.

" आई ना फोन करतेस का?" त्याने विचारलं.
" फ्लाईट बुक करतेय.." मी सांगितलं.
" व्वाव.. आपण जाऊ त्यांना एअरपोर्टवर घ्यायला..केंपेगोवडाला जायला वेळ लागतो..कधीची फ्लाईट आहे?"
"डे आफ्टर टूमॉरो"
" अरे व्वा! मेरी सास आ रही हैं मेरी सांस को देखने के लिए, ऐ ट्रैफिक हट जाओ दे दो राह जाने के लिए...."
" हे दोन वेळा सास सास काय ते कळलं नाही. दुसरी पण सासू आहे का तुला...?"
" मेरी मां," मला हात जोडत तो म्हणाला, " पहिलं सास म्हणजे तुझी आई आणि दुसरं सांस आहे.. सा नाकातून.. सां.. म्हणजे श्वास.. तू माझा श्वास आहेस ना.."

" चलो... उठो.." मी हसत म्हणाले, " बटरिंग बहुत हो गया.. मुझे नींद अा रही है..."
" तेरी निंदिया रे.." तो गाऊ लागला,. " आय हाय तेरी निंदिया रेे.."
" बिंदिया आहे ते.." मी म्हणाले.
" बरं बाई.. काय फरक आहे सांग. तुझी निंदिया आणि बिंदिया दोन्हींचा मी आशिक..." त्याने माझे हात पकडले.

तिसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. सगळं आवरलं आणि एअरपोर्ट वर जाण्यासाठी आम्ही निघालो. माझी ट्रॉली बॅग बाहेर आणली आणि कुलूप लावलं. हा गाडी बाहेर काढत होता. त्याने माझी बॅग बघितली आणि त्याचे डोळे विस्फारले.
" अगं ही बॅग कशाला..? आपण आई ना आणायला चाललोय... सोडायला नाही.."

" ऋ...मी इंदूरला चालली आहे. माईकडे" मी त्याला सांगितलं, " मला बोलावलंय ना त्यांनी... मी आले तर बरं वाटेल असं म्हणाल्या ना...? म्हणून जातेय. हे बघ माझं तिकीट". मी पर्स उघडली आणि तिकीट दाखवलं.

त्यानं तिकीट हातात घेतलं आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. तो वळला, डिकी उघडली आणि माझी बॅग आत टाकली. दार उघडून तो व्हीलच्या मागे बसला. मी बसले, आणि त्यानं मला घट्ट धरलं.

" एवि.. तुम औरतोंको समझना मुश्किल ही नहीं नामुमकिन है... " तो म्हणाला आणि कार सुरू केली.j

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर...प्रत्येक नात्यात कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचं असतं, नाहीतर नाती तुटायला वेळ नाहि लागत.

@pravintherider. Thank you so much for appreciation. Will take up next part as suggested in a few days. See you soon.

आई आणि पत्नी ...पुरूषांसाठी सर्व काही !
किती परफेक्ट समजलेत तुम्हाला !

आणि हो .. नवराही.

आणखीन हे सगळं अतिशय तरल शब्द-रंगांनी रेखाटले आहेत!