(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)
बऱ्याच दिवसांनी मांजर पार्किंग मधून लिफ्ट कडे निघाले होते.तितक्यात हँडस अप म्हणून कपाळावर बंदूक रोखावी तसं कोपऱ्यातून धावत उगवलेल्या सिक्युरिटी च्या माणसाने कपाळावर थर्मल गन रोखली.गेले अनेक दिवस स्वयंपाकघर ते बेडरूम इतकाच प्रवासाचा अनुभव असल्याने मांजर या गन बद्दल अगदीच विसरून गेले होते.घाबरून दोन्ही हात वर करणार तितक्यात '96.पुढे सरका' म्हणून खेकसून सिक्युरिटी वाल्याने मागच्या सुंदरीवर थर्मल बंदूक रोखली.सुंदरीने काळा मास्क, काळे हातमोजे, काळा कुर्ता, पोपटी लेगिंग, काळा चष्मा घातला होता.पार्किंग मध्ये अंधार असल्याने ही बहुतेक कोणावर किंवा भिंतीवर आपटून दात पाडून घेईल का या कल्पनेने मांजर मनात खुदखुदले.
लिफ्ट मध्ये वेगळीच कथा होती.भिंतीवर एका थर्माकोल मध्ये इयर बड खोचून ठेवले होते.लिफ्ट मध्ये सर्वत्र 'इयर बड ने मजल्याचे बटन दाबून इयर बड खाली कचऱ्यात टाका,एकमेकांपासून लांब राहा, खोकू नका, शिंकू नका,वाकू नका, टेकू नका,मिठी मारू नका, हात मिळवू नका, बाहेर पडताना रांगेत जा' अश्या कागदी पाट्या होत्या.एरवी सुंदर नितळ आरश्यात मनसोक्त बघायची लिफ्ट हीच एक संधी असे.हा आरसा खूप प्रेमळ आणि लकी पण आहे.यात वजन कमी दिसतं. पण आज सगळे आरसे पाट्या लावून झाकले होते.लोकांचा ऑफिसात जायचा अर्धा मूड इथेच पंक्चर झाला.
ऑफिसात आल्यावर परत एकदा थर्मल बंदूक प्रयोग झाला आणि सॅनिटायझर चे तीर्थ पायाने बटन दाबून हातावर ओतले आणि मांजर जागेवर एकदाचे बसले.मागच्याच आठवड्यात त्याला मेल ने बोलावणे आले होते. या मेल मध्ये सुद्धा एखाद्या शुद्ध मराठी खानावळीत लावाव्या तश्या भरपूर पाट्या होत्या. 'कृपया स्वतःचे डबे व नाश्ता आणावा'. 'कृपया स्वतःचे पाणी आणावे.' 'कृपया ऑफिसात आल्यावर कोणाच्याही जागेवर जाऊन हाय हॅलो करत बसू नये.' 'आम्ही चहा कॉफी मशीन चालू ठेवतोय पण कृपया सारखे चहा कॉफी मशीन कडे जाऊ नये.' 'कृपया डबे खायला एका वेळी फक्त 10 जण कॅफेत यावे.' 'एसी चालू करणार नाही.कृपया अपेक्षा ठेवू नये.' 'अपेक्षा' नावाच्या त्या बाईला 24 मार्च पासून कोणीच कुठेच ठेवत नव्हते.वैतागली असेल बिचारी.मांजराचा फालतू जोक मारण्याचा स्वभाव ऑफिसात आल्यावर परत उफाळून आला.
मीटिंग चालू झाली. मांजराला घरून काम करणाऱ्या सर्वांनी 'ऑफिस कसे आहे, खाणे मिळते का, बाहेरची चहा टपरी चालू आहे का, सिगरेटवाला अण्णा उघडा आहे का' इत्यादी महत्वाचे प्रश्न विचारून झाल्यावर कामाची बोलणी चालू झाली.निल्या च्या 2 वाक्यानंतर कुकर ची शिट्टी ऐकू आली.4 वाक्यानंतर मिक्सर चा आवाज चालू झाला.
'काय बेत आज?'
'बटाट्याची पिवळी भाजी, खीर, पोळी आणि मस्त मिरची ठेचा.या सगळे जेवायला.'
मांजर मनात फार कळवळले.आज त्याच्या डब्यात दोडके होते.(पाणीदार भाजी.गुड फॉर वेट लॉस वगैरे वगैरे..)
पिंकी कॉल मध्ये बोलत असताना मागे तिच्या मुलाचा शाळेचा क्लास चालू होता.
मन्या व्यवस्थित बोलत होता पण त्याच्या घरचे कोणती तरी 5 मिनिटाला एक खून होणारी वेब सिरीज बघत होते. त्याचा आवाज येत होता.
अमर च्या बोलण्या मागे हॉरर सिनेमा सारखा घोंघावणारा वादळाचा आवाज येत होता.
'कुठे जाऊन बसलायस रे भूत च्या सेटवर?'
'अरे टेकडीवर आलोय.इथे खेडेगावात घरी रेंज येत नाही इंटरनेटची.'
'पूर्ण दिवस टेकडीवर बसून काम करणार?'
'हो रे.फोल्डिंग गादी आणि डबा घेऊन आलोय गाडीतून.काय प्रॉब्लेम नाही.मस्त शांत आहे.छान काम होतं.'
आपल्या मीटिंग मध्ये मिळाला नाही तरी दिवसभरात, रात्री सर्व आवरल्यावर यांना कामाला शांत अवसर मिळेल आणि काम पूर्ण होईल हे आता मांजराला माहीत होतं.
रोज 'खूप गजबज आहे, सारखं लक्ष उडतं' म्हणून काम संध्याकाळ नंतरच छान होत होतं.पण आज आजूबाजूला कोणी नाही, आपण एकाकी बेटावर येऊन पडलोय या भावनेने मांजराचं मन लागेना.तो उठून कँटीन मध्ये गेला.
कँटीन मध्ये प्रत्येक टेबलवर एक रिकामं खोकं उभं ठेवलं होतं.दोनच जण एका टेबल पाशी बसून अंतर ठेवायला.मांजराला जुने दिवस आठवले.4 जणांच्या एका टेबल पाशी खुर्च्या ओढून बसलेले 7 जण, दुपारी खुर्च्या मिळवायला चाललेली स्पर्धा, कोण किती वेळात जेवण आवरतं याचा उभ्या उभ्या घेतलेला चोख अंदाज.ओळखीच्या लोकांकडे नजरेनेच टेबल साठी लावलेला नंबर.पंगतीत मागे उभं राहावं तसं मागे उभं राहून बसलेल्यांच्या पानातला शेवटचा घास संपला की टेबलवर घातलेली झडप.या कँटीन ने इतके कमी लोक आज पहिल्यांदाच पाहिले असतील.
समोर सेल्स चा शिऱ्या एकटाच एका टेबलवर काळीकुट्ट कॉफी पित बसला होता.कामाचा ताण जितका जास्त तितका कॉफी चा रंग काळा काळा होत जातो.'5 दिन मे गोरापन' जाहिरात करणाऱ्या क्रीम सारखे 'प्रोजेक्ट येऊ घातले->प्रोजेक्ट चालू->सुरुवातीचा अभ्यास चालू->प्रोजेक्ट जोरात चालू->प्रोजेक्ट उद्या करून पूर्ण पाहिजे' अश्या स्ट्रेसनुसार कॉफी च्या गोरापान ते काळाकुट्ट रंगाच्या स्टेज चे शेडकार्ड सर्वांच्या डोक्यात फिट होते.
मांजर शिऱ्या च्या समोर बसला.टेबलवर मध्ये ठेवलेल्या खोक्यांमुळे समोरच्याशी बुवा...कुक चा खेळ खेळत गप्पा माराव्या लागत होत्या.
'काय झालं रे?काळी कॉफी म्हणजे आग लागलीय ना कामात?'
'अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नाही कस्टमर.त्याला आम्ही एक आठवडा आपल्या सॉफ्टवेअर च्या नव्या व्हर्जन ला अपग्रेड हो म्हणून त्याच्या मागे लागलोय.'
'चांगलंच आहे ना नवं व्हर्जन, मग का नाही घेत ते लोक?'
'मागच्याच वर्षी आपण त्यांना खूप चांगलं पटवून जुनं व्हर्जन विकलं.नवं महाग आहे.आता या स्थितीत खर्च कमी करायचेत.कसं घेतील?'
'वा रे वा.म्हणजे ते बिचारे शर्ट जाऊन बनियानवर आहेत आणि आपण नवं व्हर्जन घ्यायला लावून बनियान पण काढून घ्यायचा?'
'आपण एकदम फेअर प्रॅक्टिस वाले लोक.बनियान काढून नाही घ्यायचा.तो ओला आहे, फाटका आहे, त्यात पाल घुसलीय हे पटवून त्याला स्वतःच काढायला लावायचा.'
'हे म्हणजे तो बिचारा त्याचं बनियान आपल्याला देणार..'
'तो श्रीमंत घरचा आहे.त्याच्याकडे कपाटात 2 बनियान जादा चे असतात.आपले पगार व्हायचे तर त्याने बनियान म्हणजे लेटेस्ट व्हर्जन चे पैसे काढून दिलेच पाहिजेत.'
शिऱ्या कॉफी संपवून कपाळावर आठ्या पसरवत उठला.
'पगार' म्हटल्यावर मांजराला पटले.आणि तो बदामी रंगाची कॉफी पीत विचार करत बसला.आता जेवणाची वेळ जवळपास होत आली होती.आणि 'जेवणानंतर' हा कामाचा खूप महत्त्वाचा आणि एकाग्र वेळ असतो (असे मांजराला वाटते.)त्यामुळे मांजर गेटबाहेर चक्कर मारायला निघाला.
बाहेर रांगेत खूप गिफ्ट आणि किराणा दुकानं आहेत.त्यापुढे 4 ब्युटी सलोन.त्यांच्यापुढे परदेशी जंक फूड ची दुकानं.एरवी इथे कायम वर्दळ असते.पण आज सर्व सुनसान होतं.आपण मॅट्रिक्स मधल्या सारखं एका वेगळ्याच समांतर जगात आलोय, सगळं चालू आहे पण आपल्याला ते बंद दिसतंय असं काहीतरीच वाटायला लागलं.त्यामुळे मांजर जरावेळ कट्ट्यावर बसला.अजून काहीतरी चुकलं होतं. काय बरं?अरे हो.एरवी या कट्ट्यावर बसायला जागाच नसते.चार ऑनलाईन शॉपिंग साईट चे डिलिव्हरी वाले टेम्पो घेऊन येतात आणि इथे पार्सल वाटायला पार्सल पसरून कट्ट्यावर बसतात.(इथे तरी त्यांना ऐसपैस कट्टा मिळतो.अजून पुढे गेलं तर त्यांना एका रिकाम्या पाईपलाईन मध्ये बसून पार्सल वाटावी लागतात.)
शेजारी बसलेला मुलगा ओळखीचे हसला.हा तर आपला नेहमीचा पार्सल देणारा कुरियर वाला.
'काय, आज पार्सल नाहीत?'
'नाय ना.एकदम ऑफ शिजन.डिस्काउंट, मेगा सेल सगळं टाकून पण लोक शॉपिंग करत नाय.'
'करतील हो.थोडी ऑफिस भरू द्या.गणपती दिवाळी जवळ येऊ द्या.'
मांजराला खूप वाईट वाटत होतं.महायुद्ध संपल्यावर आपण ओस पडलेल्या गावातून फिरत असल्यागत.हे असं नाही चालणार.आपण,आपल्या सारख्यानी कंझ्यूमरीझम चालू ठेवायचा.इकॉनॉमी परत वर यायलाच पाहिजे.नाहीतर या आजाराने आपल्या अंगात न येता पण आपल्याला हरवलं असं होईल.
काहीतरी ठरवून मांजर झपाझप चालत गेटमधून परत ऑफिसमध्ये आला.त्याने दोन तीन शॉपिंग साईट उघडून सर्वात उपयोगी वस्तूंची डील बघून त्या खरेदी करून टाकल्या.एक मोठी व्हॉटसप पोस्ट लिहायला घेतली.त्यात बरेच मोठे शब्द टाकून शेवटी एका प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ माणसाचं नाव ठोकून दिलं आणि पोस्ट 3 मोठ्या ग्रुपवर पसरवून दिली.एखादी परिणामकारक गोष्ट कधीही तोंडाने बोलू नये.तो मूळ मुद्दा आणि ती गोष्ट जिंक्स होते.ती व्हॉटसप किंवा फेसबुकवर बोलावी.
इकॉनॉमी नॉर्मलवर येईल तेव्हा येईल, मांजर मात्र त्याच्या नेहमीच्या चक्रम आणि उद्योगी स्वभावाच्या नॉर्मलवर आलं होतं!!
छान जमलेय.
छान जमलेय.
हाहा !! लय भारी जमलीये ..
हाहा !! लय भारी जमलीये ..
अवांतर : इमॅजिनेशन असेल तर ठीक आहे , पण खरंच जात असशील हापिसात तर काळजी घे , म्हणजे घेतच असशील
काल्पनिक आहे गं
काल्पनिक आहे गं
काही कंपन्या मधल्या ऐकीव गोष्टींवर
पण आम्हालाही बोलावतीलच जुलै पासून बहुतेक.
आपण,आपल्या सारख्यानी
आपण,आपल्या सारख्यानी कंझ्यूमरीझम चालू ठेवायचा.इकॉनॉमी परत वर यायलाच पाहिजे.>> हे आजच्या मांजरकथेचे सार आहे!
बाकी, ते सुनसान रस्ते, बंद माॅल आणि दुकानं हे सगळं पाहून खरंच उदास वाटत रहातं. घरून काम करायला मिळतंय म्हणून आनंद मानावा की घरून काम करत असल्यामुळे flexibility च्या नावाखाली कामाचे तास कळत नकळत वाढले आहेत याचं दुःख करावं हेच कळेनासं झालंय. दुसरा काही विरंगुळा नसल्यागत आमचं मोठं मांजर तिन्ही त्रिकाळ online आणि कृतीशील असतं!
मस्त जमलंय
मस्त जमलंय
मस्त!
मस्त!
मस्त...हिन्जवडी ची आठवण येतेय
मस्त...हिन्जवडी ची आठवण येतेय.. canteen table reservation आणि ऑनलाइन पार्सल वाले एकदम बरोबर चितारले आहेत.. युद्धानंतर च भकास पण वाचुन काळजात चर्र झाल..पण ते खरच खर आहे...
भन्नाट... हा भाग पण खूप मस्त.
भन्नाट... हा भाग पण खूप मस्त.
भारी ए !
भारी ए !
Pages