अब्दुल्ला आणि त्याची बायको एका छोट्याशा पडक्या घरात कसेबसे दिवस कंठत होते। घरात दोन वेळच्या खायची पंचाईत होती। दिवसभर गावात राब राब राबून ते शेवटी जे मिळेल ते एकत्र करून कसंबसं पोट भरायचे। मुलं नसल्यामुळे अक्खा गाव ' वांझोटी' म्हणत असलं, तरी अब्दुल्लाचं त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं। गावात श्रीमंत लोक भरपूर होते आणि त्यांच्याकडे कामं करायला त्यांनी लांबवरून कोणाकोणाला गुलाम म्हणून विकत आणलं होतं। अब्दुल्ला अशाच एका गुलामांच्या तांड्यासोबत गावात आलेला होता आणि त्याला इतर गुलामांबरोबर गावाच्या वेशीबाहेर खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या तोडक्यामोडक्या घरांपैकी एका घरात जागा मिळाली होती। त्याची बायकोसुद्धा गुलाम होती आणि गावात अनेक घरात पडेल ते कामं करत ती नवऱ्याला आपल्या परीने हातभार लावत होती।
गावातले श्रीमंत लोक या गुलामांना अतिशय वाईट वागणूक देत असत। सगळे गुलाम दिवस दिवसभर राबून थकून जात, पण उरलेलं अन्न आणि महिन्यातून एकदा एक कपड्यांचा जोड यापुढे त्यांना काहीही मिळत नव्हतं। समुद्रात जाऊन त्यांना सकाळची अंघोळ करावी लागे आणि एका त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या विहिरीतून पाणी काढून प्यावं लागे। खजुराच्या झाडावरून काढलेल्या खजुरांमधला एकही त्यांना मिळत नसे आणि उंटीणींच दूध काढल्यावर त्यातला एकही थेंब त्यांच्या वाट्याला येत नसे।
एके दिवशी अब्दुल्लाला छोट्याश्या चुकीपायी त्या श्रीमंत मालकाने चाबकाने फाटकावलं आणि शिव्या घालत हाकलून दिलं। या अपमानामुळे अब्दुल्ला आतून धुमसत होताच, त्यात घरी आल्यावर त्याला खायला काहीही उरला नसल्याचा समजला आणि त्याच्या रागाचा बांध फुटला। गावाबाहेर स्मशानात कोणीतरी कबरीवर काही अन्न ठेवलंय का, ते शोधायला शेवटी तो बाहेर पडला। चालताना स्वतःच्या नशिबाला आणि त्या मालकाला तो यथेच्च बोल लावत होता। अल्लाहला आमची काळजी नाही कारण आम्ही अल्लाहचे नावडते आहोत, असा त्याने अल्लाहला सुद्धा दोष दिला। आपल्याच तंद्रीत चालता चालता अचानक त्याला समोर एक पांढरी आकृती दिसली आणि तो घाबरला।
' कोण आहे? आणि इथे काय करतोयस?' त्याने उसनं अवसान आणून जमेल तितक्या मोठ्या आवाजात प्रश्न केला।
' मी घुल आहे। या स्मशानात माझा राज्य चालतं। इथे दफन केलेल्या प्रत्येक प्रेताचा मांस मीच खाऊ शकतो। इथे कोणीही रात्री येत नाही ।।तू का आलायस?'
घुल हे स्मशानात निवास करणारं पिशाच्च साक्षात आपल्याशी बोलताय हे बघून अब्दुल्ला प्रचंड घाबरला। त्या थंडीत त्याच्या अंगावर घामाच्या धारा वाहू लागल्या। तोंडातून शब्द फुटणं बंद झालं आणि श्वास लागून अब्दुल्ला खाली बसला। त्या पिशाच्चपासून आपली सुटका व्हावी म्हणून त्याने कसंबसं हातापाया पडून माफी मागायला सुरुवात केली।
' मी जिवंत माणसं खात नाही। घाबरू नकोस। पण इतक्या रात्री इथे कशासाठी आलास?' पिशाच्च अब्दुल्लाला सावरत म्हणालं आणि त्याने अब्दुल्लाला एका कबरीवरच्या दगडावर बसवलं।
' मी भुकेलेलो आहे। घरात खायला काहीच नाही। इथे कबरीवर कोणीतरी काही जेवण ठेवून गेलं असेल तर घेऊन जाणार होतो'
पिशाच्च ते ऐकून थोडासा हळवं झालं। त्याने क्षणार्धात आजूबाजूला असलेल्या कबरींवरचं जेवण अब्दुल्लाच्या समोर ठेवलं आणि चुटकीसरशी एका कपड्यात ते गुंडाळून दिलं। अब्दुल्लाची भीती आता थोडी थोडी चेपली होती, त्यामुळे त्याने घुलला विचारला, ' माझ्या आयुष्यात असलेली दुःख दूर होतील का? नाहीतर आत्ताच मला मारून टाक आणि तुझी सोय कर' ' काय झालं?' अब्दुल्लाने आपली सगळी कर्मकहाणी सांगितली।
घुल विचारात पडला। त्याने अब्दुल्लाला विचारलं, ' माझा एक काम करशील का? तू मला मदत कर, मी तुला मदत कारेन। एका महिन्यात गावात फक्त तुझाच राज्य असेल' ' कसा?' ' रोज तू मला मध्यरात्रीनंतर एक ताजं प्रेत आणून दे, मी त्या बदल्यात तुला १० सोन्याच्या अशर्फी देईन. ' आता अब्दुल्ला विचारात पडला. रोज गावातल्या एकाच तरी खून करावा लागणार आणि कोणालाही ना समजू देता ते प्रेत इथवर आणावं लागणार हे त्याच्या मनात स्पष्ट होत होतं।' हि घे माझी चादर..... ही पांघरलीस की तू कोणालाही दिसणार नाहीस......' आपली मंतरलेली चादर त्याने अब्दुल्लाच्या हातात ठेवली।
अब्दुल्ला परत आला तेव्हा भुकेने व्याकूळ असलेली त्याची बायको नुसता पाणी पिऊन आणि पोटाला घट्ट कपडा बांधून झोपली होती। त्याने तिला उठवून भरपेट जेवू घातलं। त्याचबरोबर आपल्याला स्मशानात मिळालेली मंतरलेली चादर त्याने तिला दाखवली।घुल बद्दल सावकाशीने सांगू, असा विचार करत त्याने तिला जवळ घेतला आणि तेलदिवे विझवले।
दुसऱ्या दिवसापासून गावातली मुलं, तरुण व्यक्ती आणि स्त्रिया एक एक करत गायब व्हायला लागल्या। त्यांचा काहीही मागमूस ना राहिल्यामुळे गावात चिंतेचं वातावरण पसरलं। रात्री कुलूप, कड्या, कोयंडे आणि काय काय लावत सगळे झोपायला लागले आणि तरीही कोणी ना कोणी दुसऱ्या दिवशी नाहीस झालेलं दिसायचं। गाव हळू हळू रात्री जागायला लागलं आणि दिवसा झोप काढायची सवय लावून घ्यायला लागलं, ज्यामुळे गुलामांना थोडाफार आराम मिळू लागला। रात्री कोणताही गुलाम गावात नसायची जुनी प्रथा तिथे होती, कारण गुलामांना काळी जादू येते अशी गावाची समजूत होती।
अब्दुल्लाने आपल्या घरात एक तळघर खोदलं आणि त्यात तो अशरफया लपवून ठेवायला लागला। बायकोने विचारल्यावर ' स्मशानात श्रीमंत लोक कबरीवर वाहतात त्या मी आणतो' अशी थाप त्याने बायकोच्या गळी उतरवली। अब्दुल्ला रोज रात्री १२ ते २ घरातून गायब व्हायचा, पण मंतरलेल्या चादरीमुळे कोणालाही त्याबद्दल काहीही माहिती नव्हती। २-३ महिन्यांनी पुरेश्या अशरफया जमल्या की एखाद्या जहाजातून पळून जायचा त्याचा विचार होता।
एके दिवशी त्याने एका मध्यमवयीन माणसाला मारून त्याला खांद्यावर घेतलं आणि चादरीत स्वतःला लपेटून तो रस्त्यावर आला। परंतु त्या मेलेल्या माणसाच्या डोक्यातून रक्त गळायला लागलं आणि स्मशानापर्यंत रस्त्यात ते ठिबकत गेलं। सकाळी गावातल्या लोकांना ते दिसलं, आणि त्यांनी त्या ठिबक्यांचा मागोवा घेत स्मशान गाठलं। स्मशानातला समंध आपल्या गावातल्या लोकांना मारून नेतो, अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांनी मशिदीतल्या इमाम साहेबांना पाचारण केलं।
प्रत्येक कबरीवर अल्लाह असं लिहिलेली रेशमी चादर अंथरायची आणि स्मशानाला अल्लाह कोरलेल्या लाकडाचं कुंपण घालायचं अशी त्यांनी सूचना दिली आणि अक्ख्या गावाने स्वतः ते काम दिवस मावळायच्या आत पूर्ण केलं। त्या रात्री अब्दुल्लाने एका लहान मुलाला मारल आणि तो स्मशानाकडे निघाला। स्मशानात सामसूम होती। घुल कुठेही दिसत नव्हतं। अब्दुल्लाने अनेकदा हाक मारूनही काहीही प्रतिसाद आला नाही। शेवटी त्या मुलाच ते प्रेत एका खड्ड्यात त्याने ढकलून दिलं आणि परतीची वाट धरली।
घरी आल्यावर अचानक बायकोने आपल्याला मूल होणार असल्याची गोड बातमी त्याला दिली। त्या सगळ्यामुळे हरखून जाऊन त्याने रातोरात बंदरावरच्या जहाजाच्या एका खलाश्याशी वाटाघाटी करून जहाजात जागा मिळवली। खूप आधीपासून त्याचा तसा विचार असल्यामुळे त्याने उंची कपडे चोरून घरात लपवून ठेवलेले होते. ते घातल्यामुळे त्यांना बघून ते गुलाम आहेत असं कोणालाही वाटलं नाही. जहाज सकाळी निघाल आणि अब्दुल्ला आणि त्याची बायको दूरच्या एका देशात उतरले. तिथे अशरफया विकून त्यांनी छोटंसं दुकान सुरु केलं आणि आनंदात राहायला लागले।
९ महिन्यांनी बायकोला एके दिवशी प्रसूतीकळा येऊन तिने एक मुलगा जन्माला घातला। त्या मुलाने जन्मल्या जन्मल्या आपल्या आईच्या शरीराचे लचके तोडले आणि काही क्षणात तिला फस्त केलं। अब्दुल्ला मिठाई वाटून घरी आल्यावर त्याने ते भयंकर दृश्य बघितला आणि हंबरडाच फोडला। त्या मुलाकडे बघत ' तू कोण आहेस?' असं त्याने प्रश्न केला......
त्या तान्ह्या मुलाचा उत्तर ऐकून अब्दुल्लाच्या मणक्यात एक शिरशिरी गेली। ते मूल म्हणालं, ' मी घुल आहे.....मला रोज रात्री एक ताजं ताजं प्रेत आणून द्यायचं आणि अश्रफी घेऊन जायचं....ठीक आहे?'
भयानक कथा आहे.
भयानक कथा आहे.
घुल भयंकर
घुल भयंकर
धन्यवाद !
धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.
https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/
बापरे.... जबरदस्त कथा !
बापरे.... जबरदस्त कथा !