अवकाश स्पर्धा - भाग १

Submitted by सतिश म्हेत्रे on 27 May, 2020 - 01:45

टीप
1. या व येणार्‍या लेखांमध्ये सोविएत यूनियन ला रशिया म्हणून संबोधण्यात येईल.
2. अग्निबाणाला रॉकेट म्हटले जाईल.

पार्श्वभूमी(थोडक्यात)

    4 ऑक्टोबर 1957 रोजी स्पुटनिक-1 ला घेवुन आर-7 हे रॉकेट अवकाशात झेपावले आणि एका नव्या युगाची (अवकाशयुग) सुरवात झाली. स्वतःला “तंत्रज्ञानातील महासत्ता” आणि रशियाला “पिछाडलेला देश” समजणार्‍या अमेरिकेसाठी हा मोठा धक्का होता. मात्र या घटनेने रशियाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. दिवसातून सात वेळा अमेरिकेवरून “बीप बीप” करत जाणार्‍या स्पुटनिक बाबत अमेरिका काहीच करू शकत नव्हती

असे नव्हते की अमेरिकेने या क्षेत्रात काम सुरू केले नव्हते. त्यांनी क्षेपणास्त्रे विकसित करायला दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटापासूनच सुरवात केली होती. दुसरे महायुद्ध संपल्यावर जर्मनीचे व्ही-2 रॉकेट्स आणि त्या रॉकेट्सना तयार करणारे वर्ह्नर वॉन ब्राउन व त्याची टीम हे अमेरिकेसाठीच काम करत होते. युद्धकाळात वर्ह्नर वॉन ब्राउन व त्याच्या टीमने व्ही-1 आणि व्ही-2 या रॉकेट्स ची निर्मिती केली होती आणि युद्धाच्या शेवटी त्यांचे व्ही-2 पेक्षा मोठ्या आणि जास्त वस्तूमान वाहून नेणार्‍या रॉकेटवर काम सुरू केलेले होते. युद्ध संपताना वर्ह्नर वॉन ब्राउन व त्याच्या टीमकडे दोन पर्याय होते. एकतर ते रशियाकडे शरणागती पत्करू शकत होते किंवा अमेरिकेकडे. रशियाकडून कशी वागणूक मिळेल याची खात्री नसल्याने त्यांनी अमेरिकेकडे स्वतःहून शरणागती पत्करली.

अमेरिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी अमेरिकन प्रथम अमेरिकन अभियंत्यांना त्यांनी विकसित केलेल्या रॉकेट्स, त्याचे इंजिन्स याबद्दल प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. नंतर त्यांना रेडस्टोन (Redstone) या वर्गातील क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे काम देण्यात आले. त्यातूनच पहिले अमेरिकन बॅलिस्टिक मिसाईल PGM-11 Redstone विकसित करण्यात आले. तिकडे अमेरिकन हवाईदलाचेही या क्षेत्रात प्रयन्त सुरू होतेच. ते अॅटलास (Atlas) या क्षेपणास्त्रावर काम करत होते. अमेरिकन नाविकदलही व्हॅनगार्ड (Vanguard) या वर्गातील क्षेपणास्त्रे विकसित करत होते.

1955 मध्ये अमेरिकन सरकारने वैज्ञानिक उपग्रह (सायंटिफीक सॅटलाइट) प्रक्षेपित करण्याची घोषणा केली. त्यावेळी तो उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी त्यांच्या कडे 3 उमेदवार होते.

1. अमेरिकन आर्मी (वर्ह्नर वॉन ब्राउन व त्याची टीम अमेरिकन आर्मी साठीच काम करत होते) – रेडस्टोन (Redstone) रॉकेट
2. अमेरिकन हवाईदल - अॅटलास (Atlas) रॉकेट
3. अमेरिकन नौदल – वाईकिंग (Viking) आणि ऐरोबी (Aerobee) रॉकेट्स

एक गोष्ट लक्ष्यात असू द्या की ज्यावेळी या निविदा मागविण्यात आल्या त्यावेळी कोणतेच रॉकेट त्यावेळी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम नव्हते. या तिन्ही प्रकल्पांचा विचार केला तर नौदलाचा प्रकल्प हा वैज्ञानिक संशोधनासाठी होता. बाकीचे दोन हे प्रामुख्याने लष्करी बाबींसाठी होते. त्यामुळे वैज्ञानिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रकल्प अमेरिकन नौदलाकडे सोपवण्यात आला. आणि त्या प्रकल्पाचे नाव ठेवण्यात आले प्रोजेक्ट वॅनगार्ड ( आणखीन एक' गोष्ट म्हणजे अमेरिकन आर्मीला हा प्रकल्प दिल्यास सरकरविरुध्द जनतेचा रोष निर्माण होण्याची जास्त शक्यता होती- कारण, वर्ह्नर वॉन ब्राउन. तसेच ,रशियावरून लष्करी उपग्रह गेल्यावर रशियाचा काय प्रतिसाद असेल याचा काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे नौदलाच्या मुख्यतः वैज्ञानिक असणार्‍या प्रकल्पाला स्विकारण्यात आले. ) पण त्याच वर्षी वर्ह्नर वॉन ब्राउन च्या टीम ने ज्युपिटर-सी (Jupiter-सी) या उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी सक्षम अश्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेचे दुर्दैव हे की त्यात उपग्रह मात्र नव्हता.

 वॅनगार्ड प्रकल्प
- या प्रकल्पाचे प्रामुख्याने तीन मुद्दे होते
1. आंतरराष्ट्रीय भौगोलिक वर्षामध्ये ( 1 जुलै 1957 ते 31 डिसेंबर 1958 ) अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करणे.
2. अंतराळात वैज्ञानिक प्रयोग करणे.
3. उपग्रहाला ट्रॅक करणे (मागोवा घेणे)

या प्रकल्पा अंतर्गत तयार करण्यात आलेला पहिला उपग्रह होता वॅनगार्ड टी.व्ही. 3 (Vanguard TV 3) आणि त्याचे वजन होते फक्त 1.4 किलो. या उपग्रहाला ट्रॅक करण्यासाठी मिनीट्रॅक (Minitrack) या ट्रॅकिंग प्रणालीची निर्मिती करण्यात आली. हा उपग्रह सप्टेंबर 1957 मध्ये प्रक्षेपित करण्याचे ठरविण्यात आले होते पण सतत काही ना काही कारणासाठी प्रक्षेपण दिन पुढे ढकलण्यात आला. पण मध्येच 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाने स्पुतनिक प्रक्षेपित करून अमेरिकेला व वॅनगार्ड टीमला धक्का दिला. समाधानाची बाब एवढीच होती की मिनीट्रॅक ही प्रणाली व्यवस्थित काम करत होती व तिच्या सहाय्याने ते स्पुतनिक ला ट्रॅक करू शकत होते.

   वॉन ब्राउन कडे यावेळी उपग्रह प्रक्षेपित करू शकेल असे रॉकेट होते. यावेळी त्याने पुन्हा एकदा अमेरिकन सरकारकडे उपग्रह प्रक्षेपित करू देण्याची परवानगी मागितली आणि त्याने उपग्रह प्रक्षेपित करण्याची संधी दिल्यास 60 दिवसांत आम्ही उपग्रह प्रक्षेपितही करू असेही संगितले. मात्र त्याची ही मागणी धुडकावण्यात आली. पुन्हा एकदा ही अमेरिकेची चुक ठरणार होती.

 अमेरिकेची नाचक्की
   रशियाच्या स्पुतनिकला प्रतिसाद देण्यासाठी वॅनगार्ड प्रकल्पाचा वेग वाढवण्यात आला. 6 डिसेंबर 1957 रोजी वॅनगार्डचे प्रक्षेपण करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात ते एक चाचणी उड्डाण होते. ज्याच्या मध्ये खूप सार्‍या गोष्टी पहिल्यांदाच तपासण्यात येणार होत्या आणि सर्व व्यवस्थित गेले तर उपग्रह कक्षेत स्थिरवणार होता. वॅनगार्ड टीमने हे उड्डाण म्हणजे एक चाचणी उड्डाण असल्याचे खूप वेळा स्पष्ट केले होते पण या उड्डाणाला “अमेरिकेचे रशियाला उत्तर” म्हणून पूर्ण पश्चिमी जगात (भांडवलशाही जगात) पाहिले गेले.

प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी खुप सार्‍या वृत्तवाहिन्यांचे पत्रकार उड्डाणाच्या ठिकाणी हजर होते. 6 डिसेंबर च्या दुपारी 4 वाजुन 44 मिनिटे आणि 34 सेकंदांनी रॉकेट चे इंजिन सुरू झाले खरे मात्र दोनच सेकंदात बंद पडले आणि जेमतेम 4 फुट उडलेले रॉकेटचे धूड लॉन्चपॅड वर कोसळले. पुर्ण रॉकेट आणि लॉन्चपॅडचा काही भाग यामध्ये नष्ट झाले. पण जमिनीवर कोसळलेला उपग्रह मात्र अजूनही काही प्रमाणात सुस्थितीत होता व त्याने “बीप बीप” असा संदेश जमिनीवरूनच पाठवणे सुरू केले.

हा स्फोट आणि आणि अमेरिकेला उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेले अपयश सार्‍या जगाने पाहिले. या घटनेने जगभर अमिरिकेचे हसे उडाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेची कधी नव्हे अशी नाचक्की झाली. दुसर्‍या दिवशी वृतपत्रांनी या उपग्रहाला “फ्लॉपनिक”, “पफनिक”, “स्टेयपूतनिक” अशी खुप गमतीशीर नावे दिली. यातच 3 नोव्हेंबर 1957 रोजी रशियाने स्पुतनिक 2 सोबत “लायका” नावाच्या कुत्रीला देखील अवकाशात धाडले. आता मात्र उपग्रह प्रक्षेपित करण्याची संधी वॉन ब्राउन (अमेरिकन आर्मी) ला देण्यात आली. (आता आर्मीला संधी देण्याचा मार्ग खुला झाला होता. कारण, रशियाने प्रक्षेपित केलेले दोन्ही उपग्रह आर-7 या क्षेपणास्त्राचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेले होते. ) मात्र त्यात त्याला जर अपयश आले तर पुढील प्रयत्न पुन्हा अमेरिकन नौदल करणार होते.

यावेळी मात्र अमेरिकेच्या उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या प्रयत्नांना यश आले आणि 31 जानेवारी 1958 ला अमेरिकन आर्मीने पहिला अमेरिकन उपग्रह “एक्सप्लोरर-1”(Explorer-1) अवकाशात प्रक्षेपित केला. अवकाश स्पर्धेमध्ये अमेरिका आता खर्‍या अर्थाने उतरली होती. ही अवकाश स्पर्धा खुप सार्‍या गोष्टींना चालना देणार होती आणि येत्या 12 वर्षात "इतक्या लवकर असे घडेल असा कोणी विचारही केला नसेल" अशी गोष्ट घडणार होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवकाश विज्ञानाच्या प्रगतीचा आणि त्या क्षेत्रातल्या स्पर्धेचा रोचक इतिहास! छान केलंत ही लेखमाला सुरु केलीत ते. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!