मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
प्रवीणने टांग्याच्या गोष्टीची आठवण करून दिली म्हणून मी आज माझ्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे.
त्या वेळेस गावातल्या गावात एका ठिकाणाहून दुसरीकड़े जाण्यासाठी टांगे असायचे. सायकल रिक्षाही होत्या पण आम्हां सर्व मुलांना टांग्यामध्ये बसायला आवडायचे. आमच्या घरापासून जवळच चौकामधे झाडाच्या सावलीमध्ये टांगा स्टॅन्ड होता. तेव्हा टांग्यांना नंबर द्यायचे. पण नंबर द्यायची पद्धत फार नवलाची.
दर वर्षी टांग्यांची शर्यत व्हायची. शर्यतीच्या आधी एक आठवडा सगळे टांगेवाले टांग्यांना रंगरंगोटी करायचे. घोड्यांना चांगले खाऊपिऊ घालायचे. आम्ही मुले तेव्हा जाऊन कोण कशी सजावट करतो आहे ते बघायला जायचो. काही टांगेवाले जरा जास्तच घोड्याची आणि टांग्याची तयारी करायचे शर्यतीसाठी त्यामुळे त्या आठवड्यात टांगे लवकर मिळायचे नाहीत.
तेव्हा आमच्या इथे कसलीतरी जत्रा भरायची ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये. नक्की आठवीत नाही. आम्ही सगळे लोकं झुंडीने जत्रेला जायचो. जत्रेची तर गम्मत जम्मत असायचीच. पण आम्ही वाट बघायचो टांगा शर्यतीची. जत्रेच्या गंमतीवर गोष्ट लिहीन लवकरच कधितरी.
साधारणतः चार वाजता सगळे टांगे यायला सुरुवात व्हायचे. येताना जोरजोरात पोंगा वाजवायचे. प्रत्येक टांगेवाला आपला पोंगा वेगळा शैलीमध्ये वाजवायचा कि कि ज्याने तो ओळखू येईल. वेगवेगळे रंग लावलेले, सजवलेले टांगे, घोड्यांना रंगीत लगाम, घोड्याच्या डोक्यावर लावलेले तुरे असे फार जमतीशीर दृश्य असायचे. टांगेवाले पण ठेवणीतले कपडे घालून यायचे. जत्रेतील सगळे लोक जमा व्हायचे आणि गर्दी ओसंडायची.
शर्यत सुरु होण्यापूर्वी आयोजिकांची धावपळ उडायची. ते आरडा ओरडा करून सगळे टांगे ओळींमध्ये उभे करायचे पण धावपट्टी मोकळी करणे फार जिकिरीचे काम. परत परत कोणी ना कोणी तरी मधेच घुसायचे मग परत आरडा ओरडा. तसेच त्या दिवशीही झाले. गडबड गोंधळा मध्ये एका कुटुंबातील एक लहान मुलगी गर्दी मध्ये धावपट्टी च्या एका बाजूला आणि तिचे सगळे कुटुंब दुसऱ्या बाजूला गेले. ती मुलगी आपल्या आई वडिलांना शोधात राहिली आणि इकडे धावपट्टी मोकळी झाली म्हणून शर्यंत सुरु झाली तुतारी वाजवून. आणि त्याच वेळेस त्या मुलीला धावपट्टीच्या पलीकडे गर्दी मध्ये तिचे कुटुंब उभे दिसले. तिचे आई वडील पण आपली एक मुलगी दिसत नाही म्हणून शोधक नजरेने आजूबाजूला बघत होते. जसे त्या मुलीला तिचे आईवडील दिसले तिने जोरात धावपट्टी वर पळायला सुरुवात केली कसलीही पर्वा न करता, आता पर्यंत सर्व टांग्यानी पण वेग घेतला होता.
झाले. आता काय करायचे. अनेक लोकं धावले पुढे. आणि त्यामुळे तर आणिखीनच धांदल उडाली. एक मुलगा जोरात पळाला पुढे. त्याने त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती कसली त्याच्या हाती लागते आहे. काही लोक शर्यत थांबवा म्हणून टांग्यांकडे पळाले. आम्हीहि पुढे गेलो. काय होते आहे ते बघायला. असे होते गडबड गोधळामध्ये. माणूस चुकीच्या हालचाली करतो.
घोड्यांना गर्दीची सवय होती म्हणून ठीक झाले. कसेबसे टांग्या वाल्यांनी टांगे थांबविले. तरी एक टांगा दोन लोकांवर जाऊन धडकला पण कोणालाही काही झाले नाही म्हणून बरे. मग परत सगळे टांगेवाले शर्यतीच्या जागी गेले. पण आयोजकांनी या वेळेला लोकांना बरेच मागे उभे राहायला सांगितले. त्या मुळे मी जरा नाराज झाले कि आता काही दिसणार नाही म्हणून.
पुन्हा एकदा शर्यत सुरु झाली आणि सगळे टांगे जोरात निघाले. खरे म्हणजे जरा दूर उभे असल्याने शर्यत चांगली दिसली. पूर्ण दृश्य चांगले दिसले आणि अजूनही आठवते मला.
नंतर जो टांगा जिंकला तो प्रथम क्रमांकाची पाटी लावून जवळ चक्कर मारीत आला. त्याच्या पाठीमागे नंतरच्या क्रमाने टांगे होते.
नंतर कधी १ नंबरच्या टांग्यामध्ये बसायला मिळालं तर खूप अप्रूप वाटायचे. एकदा तर आम्ही एक टांगा ठरवून त्यात बसणार इतक्यात मला १ नंबरचा टांगा येताना दिसला म्हणून मी आईला हट्ट करून होता तो टांगा सोडून द्यायला भाग पाडले. आई संतांपली पण मी काही हट्ट सोडला नाही. शेवटी १ नंबर टांगा आला व आम्ही त्याच टांग्यात बसून गेलो.
गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.
सहिये टांगा रेस लावून
सहिये टांगा रेस लावून टांग्यांचे नंबर..
आवडली टांग्याची गोष्ट, आता
आवडली टांग्याची गोष्ट, आता जत्रेची गोष्ट सांग
माझं लहानपण कल्याणला गेलं.
माझं लहानपण कल्याणला गेलं. तिथेही असंच टांग्यांचं पासिंग होत असे. त्याआधी आणि नंतर काही दिवस छान सजवलेले टांगे बघायला मिळत. लंपनच्या पुस्तकातही दुंडाप्पाच्या टांग्याची आणि त्याच्या पासिंगची गोष्ट आहे.
मस्त गोष्ट आज्जी
मस्त गोष्ट आज्जी
प्रवीणने टांग्याच्या गोष्टीची
प्रवीणने टांग्याच्या गोष्टीची आठवण करून दिली म्हणून मी आज माझ्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे... धन्यवाद.
माझी आजी पण अशाच गोष्टी सांगत.
मी लहान असताना आई वडिल पंढरपूरला आणि गाणगापुर ला घेवून गेले की मी हट्टाने टांग्या मध्ये बसत असे.
आजी काळजी घ्या
आजी काळजी घ्या
अशाच गोष्टी अजून खूप ऐकायच्या (वाचायच्या) आहेत
नंबर द्यायची पद्धत फार भारी
नंबर द्यायची पद्धत फार भारी आणि पद्मा आजीची गोष्ट पण
छान गोष्टं. पण आता कल्याणला
छान गोष्टं. पण आता कल्याणला शेवटचे चारपाच टांगे उरले असावेत.
आजी छान आहे गोष्ट. आता
आजी छान आहे गोष्ट. आता जत्रेतल्या गमती.
Srd, खरं आहे. मला कल्याण
Srd, खरं आहे. मला कल्याण सोडून आता पंचवीस वर्षे होऊन गेली. गोष्टीच्या निमित्ताने टांग्यांच्या पासिंगची मजा आठवली.
वाडी कुरुंदवाड मध्येहि होते
वाडी कुरुंदवाड मध्येहि होते
आता बंद पडले
मस्त गोष्ट आज्जी
मस्त गोष्ट आज्जी
मी पण बहुदा शेवटचे टांग्यात बसलो ते कल्याण ठाणे कुठेतरी
तो असा दुडकत जाणारा घोडा, त्याच्या डोक्यावरचा तालात हलणारा लाल हिरवा दिमाखदार तुरा, त्याची वाऱ्यावर उडणारी आयाळ आणि मधेच शेपटीचा फटकारा
आठवून एकदम भारी वाटलं
मी अमेरिकेत एका ठिकाणी टांगा
मी अमेरिकेत एका ठिकाणी टांगा पाहिला होता . शहराचे नाव आठवत नाही .
आशुचँप, आमच्या कल्याणलाच
आशुचँप, आमच्या कल्याणलाच असणार बघा नक्की!
ठाण्यातही होते पूर्वी
आम्ही कल्याणला गमतीने म्हणायचो की कल्याणला येणारी पाहुणे मंडळी, आजोळी येणारी नातवंडे हे टांगेवाल्यांचं मुख्य गिऱ्हाईक आहे.
छान आठवण
छान आठवण
मी पण बहुदा शेवटचे टांग्यात
मी पण बहुदा शेवटचे टांग्यात बसलो ते कल्याण ठाणे कुठेतरी
>>>
आमच्याईथे वाशीला मिनी सीशोअरला असतात टांगे. पोरीला गार्डनला त्या रस्त्याने घेऊन गेलो की हट्ट धरायची. एक दोन फेरीत तिचे मन भरायचे नाही. त्यात टांग्याचे मीटर टॅक्सीच्या दहापट धावणार. एका फेरीचे तीस रुपये. बरं फेरी म्हणजे ईथून चढलो तिथून उतरलो अशी संपून जायची म्हणून पोरगी ऊतरायचीच नाही. तिच्यासोबत मलाही बसावे लागायचे तर तो सुरुवातीला माझेही पैसे लावायचा. पण पहिल्याच दिवशी ते दमदाटी करून मी बंद केले आणि फक्त पोरीचेच पैसे घ्यायला लावायचो. पण तरीही खर्चा व्हायचाच. लवकरच लक्षात आले की यापेक्षा घरी घोडा पाळणे परवडेल. मग हळूहळू त्या रस्त्याने पोरीला गार्डनला नेणे बंदच केले. काही दिवस टांगा सुटताच तिची सवय मोडली, क्रेझ सुटली.
घरी घोडा कसा पाळावा ... धागा
घरी घोडा कसा पाळावा ... धागा उघडल्यास मी सल्ला देऊ शकेन..