अन्नपुर्णा आणि अण्णा-१ (वसंत शिंदे)

Submitted by हरिहर. on 19 May, 2018 - 20:21

साल आठवत नाही. कॉलेजचे दिवस होते ईतकं सांगीतलं तरी पुरेसं होईल. 'ईंजीनिअर’ केलं की पोराचं आयुष्य मार्गी लागतं, आणि बोर्डींगला किंवा होस्टेलला पोरगं ठेवलं की त्याला शिस्त लागते असं आई-बापांना वाटायचा काळ होता तो. आई-बापही भाबडे होते त्या काळी. त्या मुळे आमची रवानगी सहाजीकच ईंजीनिअरींगला आणि बाड-बिस्तरा होस्टेलला जाऊन पडला. गाव, शाळा सुटलेली. शहर, कॉलेजची ओळख नाही. त्या मुळे सुरवातीच्या दिवसात कॉलेजच्या आवारात आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या अनोळखी रस्त्यांवरुन 'मोरोबा’सारखा चेहऱा करुन निरर्थक भटकायचो. मोरोबा म्हणजे आमचा घरगडी. निव्वळ शुंभ. त्याला कितीही आणि काहीही काम सांगीतलं की तो वेंधळ्यासारखा मान हलवत हो-हो म्हणायचा आणि काम करताना मनाला येईल तिच आणि तेवढीच कामे करायचा. वडीलांनी त्याला का ठेवला होता कुणास ठाऊक. बहुतेक आम्हाला द्यायला एक शिवी जास्त म्हणून त्याची नियुक्ती असावी. आमच्या हातून काही वाह्यातपणा घडला की ते चिडत. वडील चिडले की त्यांचा आवाज चढत नसे पण त्याला विशिष्ट धार चढे. मग ते ओरडत "मोऱ्या, गाढवा देव अक्कल वाटत होता तेंव्हा काय शेण खायला गेला होतास का?" त्यांचा आवाज ऐकूण आतमधे माझा आणि अंगणात मोरोबाचा चेहरा भेदरुन जाई. जणू काही खरच देव अक्कल वाटताना मी शेण खायला गेलो होतो आणि मोरोबा मला वाढायला आला होता. खुपदा "मोऱ्या" म्हणून वडील ओरडले की ते मला ओरडले की मोरूला ते समजायला वेळ लागत असे. पण कॉलेज आणि हे नविन शहर पाहीलं की वाटायचं, या पेक्षा वडीलांचा राग आणि मोऱ्याची शुंभ संगत परवडली. बरं होस्टेलवर तरी जरा बरं वाटावं? पण तिथेही 'सिनिअर्स' नावाच्या प्राण्यांचा वरचष्मा. त्यांच्याशी जमवून घ्यायचं म्हणजे त्यांचा 'बारक्या' व्हायचं. "बारक्या, सिग्रेटी आण", "बारक्या, पानपट्टी आण" "बारक्या, बिअर आण" हे चालवून घ्यायचं. जरा बुड टेकलं की यांची ऑर्डर सुटलीच. तेही करायला हरकत नाही. पण हे सगळं मैत्रीत नाही, गुलामासारखं. आपल्या बापाच्यान काही हे जमेना. हळू हळू लक्षात आलं की मी एकटाच नाही या चक्रात अडकलेला. ईतर गावावरून आलेल्या मुलांचीही काही फारशी वेगळी स्थिती नाहीए. मग कळत नकळत आम्हा 'गावकऱ्यांचा' एक ग्रुप तयार झाला. एकमेकांना आधार मिळाला. पुण्यातल्या मुलामुलींचे कपडे पाहून स्वतःच्या कपड्यांची लाज वाटेनाशी झाली. गावाकडचा इरसालपणा जागा झाला. शेतातल्या मातीतली रग डोकं वर काढू लागली. आत्मविश्वास वाढला. मुळात होताच. हरवलेला परत सापडला ईतकंच. पुण्यातल्या मुलांमधे खरंतर काही दम नाही हे जाणवलं. आणि मग आम्ही यथावकाश होस्टेलला सरावलो, कॉलेजला निर्ढावलो.

'कॉलेजचे दिवस' म्हणजे कॉलेजचेच दिवस. त्याला दुसरी ऊपमा नाही. कशानेही भाराऊन जायचं वय आणि झपाटून टाकणारा चित्रकलेसारखा विषय, त्यामुळे वर्षभर प्रत्येकजण कशाने ना कशाने तरी भारावलेला किंवा झपाटलेलाच असायचा. "विचारांना ठाम दिशा मिळाल्याशिवाय आपल्याला रंगांमधून पुरेपुर व्यक्त होता येत नाही" असं कुठं वाचनात आलं की कुणी 'विवेकानंद वाचायला घ्यायचा, तर कुणी "भुकेने कळवळल्याशिवाय चित्रात वेदना ऊतरत नाही" असं कुठल्याशा पुस्तकात वाचुन चार-चार दिवस ऊपाशी रहायचा प्रयोग करी. आज मागे वळून पहाताना वाटतं "अहा! काय मजेचे दिववस होते ते आयूष्यातले!" कोणती गोष्ट गांभीर्याने घ्यावी आणि कोणती सहज याची त्यावेळेची आमची गणिते फार फार वेगळी होती. आयूष्याच्या मधल्या काळात एकदम बदलून गेली. आणि आज परत तिच खरी वाटायला लागली आहेत. असो. तर होस्टेलची आणि आमची काही पत्रीका जुळली नाही त्यामुळे आम्ही कॉलेजच्या जवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला. एक प्रश्न तर सुटला पण दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न बाकीच होता. शिक्षणाच्याच काय कोणत्याच निमित्ताने कधी गाव सोडलं नव्हतं आजवर. त्यामुळे ‘खायचे हाल’ फक्त कादंबऱ्या आणि मोठ्या लोकांची आत्मचरीत्रे वाचूनच माहीत होता. पण जेंव्हा मेस नावाची ओळख झाली आणि वैतागलो. महिनाभरात किमान तिन मेस बदलल्या. वजन किलोभराने तरी कमी झालं असावं. मेसला भरलेले पैसे तिन वेळा वाया गेले ते वेगळेच. वर्गात बसलेलो असलो तरी डोक्यात ‘आज जेवणाचं काय?’ हाच प्रश्न असायचा. मग रोज एका मित्राबरोबर गेस्ट म्हणून त्याच्या मेसला जेवायला जायचो. वाटलं, एक तरी आवडेल. पण छे. मित्रही मला वैतागले होते. अशातच एकाने सांगीतलं “ईथे जवळच एक अन्नपुर्णा नावाची मेस आहे. कुणी जास्त फिरकत नाही तिकडे पण बघ प्रयत्न करुन. तेवढी एकच खानावळ राहीलीय आता.” त्याच दिवशी मी अन्नपुर्णा शोधत गेलो. फारसं कठीण गेलं नाही. अन्नपुर्णा चांगलीच नावाजलेली होती. मला कळेना मित्र का टाळतात ही मेस ते. अन्नपुर्णेसमोर ऊभा राहीलो. चांगला ऐसपैसे बैठा बंगला होता. समोर छान मेहंदीचं कुंपण होतं. कुंपणाच्या आत तिन चार पुर्ण वाढलेली बदामाची झाडे होती. छोटसं पोर्च होतं. पोर्चच्या पुढील भागात पितळी अक्षरात ‘अन्नपुर्णा’ लिहिलं होतं. म्हणजे अन्नपुर्णा हे बंगल्याचं नाव होतं तर. मला वाटलं, मी चुकून भलतीकडेच आलो. पायऱ्या उतरून पोर्च मध्ये गेलो. नेहमीपेक्षा जरा जास्तच रुंद असलेलं सागवानी दार पुर्ण ऊघडंच होतं. बेल वाजवावी की नको याचा विचारच करत होतो ईतक्यात एका पन्नाशीच्या स्रीने आवाज दिला “या, आत या” मी निमुट आत गेलो. डाव्या बाजूला सोफा, टिव्ही, सेंटरटेबल वगैरे होतं तर ऊजव्या बाजुला साधारण दहा जण बसतील असा डायनिंग टेबल होता. मी सोफ्यावर बसलो होतो ईतक्यात आतुन दुसरी एक पन्नाशीची स्री बाहेर आली. गोरी पान, चंदेरी केस, तू प्रसन्न हसु, चेहऱ्यावर एक आपुलकीचा भाव. मला तर त्या पहाताच आवडल्या. खुप दिवसांची ओळख असावी अशा आवाजात त्यांनी विचारलं “काय काम होतं बाळ?” मला समजेनाच की मेस बाबत कसं विचारावं? कारण मी ज्या हॉलमध्ये बसलो होतो तो पाहून हे लोक सधन असणार हे कळत होतं. शोकेसमध्ये बरेच कप, बक्षिसे, पदकं, सन्मान वगैरे ठेवले होते. मित्रांनी फिरकी घेतली की काय? मी चाचरत म्हणालो “नाही, कुणी तरी खोडसाळपणे खानावळ म्हणून हा पत्ता दिला होता. त्या मुळे आलो होतो. माफ करा.” मी ऊठायच्याच तयारीत होतो ईतक्यात त्या म्हणाल्या “जेवायला येणारेस का तू? कधी पासून? बरं तू असं कर, पहिल्यांदा दोन घास खावून घे मग बोलू.” त्यांनी आत पाहून “यमूताई” म्हणून हाक मारली. यमूताई बाहेर आल्या. “याचं पान वाढा” म्हणत त्या मला म्हणाल्या “तू जेव पोटभर मग बोलू” मी निमुटपणे ताटावर बसलो. यमूताईंनी जेवण वाढलं. माझा गोंधळ अजून वाढला होता. समोरच्या ताटाकडे पाहीलं. अत्यंत साधे पदार्थ दिसत होते. पण वाढलं फार सुंदर होतं. एका वाटीत आमटी, एकात भाजी, कोशींबीर, चटणी आणि घडीच्या पोळ्या. भुक लागलीच होती. विचार केला पहिल्यांदा जेवून घेऊ. काय होतय ते नंतर पाहू. पहिला घास घेतला आणि जाणवलं, हेच तर शोधत होतो. किंचीत चिंच-गुळ टाकलेली आमटी, भाजी कसली होती ते आठवत नाही, चोचवलेल्या काकडीची कोशीबींर आणि मऊ पोळ्या. जेवण झालं. असं वाटलं की खुप दिवसांनी जेवलो. तिथे बाजूलाच ठेवलेली बडीशेप खात होतो तोच काकू आल्या. त्यांनी विचारलं “आवडलं जेवण?” मी मान डोलावली. त्यांनी सकाळची आणि संध्याकाळची वेळ सांगीतली जेवणाची. मी हो म्हणून निघालो. पैसे किती होतील, सुट्टी असते का, किती खाडे हिशोबात धरता वगैरे काही विचारायचं सुचलच नाही. सरळ फ्लॅटवर आलो आणि तानून दिली. जेवणाची तृप्ती अनूभवत राहीलो. ही माझी आणि काकूंची पहिली भेट. हा बंगला मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं व्यक्तीमत्व ‘गजानन सरपोतदार यांचा. पुना गेस्ट हाऊसही त्यांचेच. काकू हौस म्हणून मेस चालवायच्या. त्यामुळे प्रत्येक पदार्थ हा मायेने बनवला, वाढला जायचा. ब्राम्हणी पध्दतीचे जेवण असल्याने मराठी पोरे तिकडे फारसी फिरकत नसत. याच मेस मध्ये माझी आणि अण्णांची पहिली भेट झाली. अण्णा म्हणजे मराठी चित्रपटातले कसलेले नट वसंत शिंदे. आणि मग ही ओळख वयाच्या मर्यादा पार करत जिवलग मैत्रीध्ये बदलली. अण्णा पडद्यावर जेवढे मिश्किल होते त्याच्या कैक पटीने जास्त ते प्रत्यक्ष आयुष्यात मिश्किल होते. आजही त्यांची आठवण आली तर चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू फुटते आणि मग डोळ्यात पाणी ऊभे रहाते. याच फार मोठ्या कलाकाराच्या आठवणी सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. पण आज ईतकच पुरे. आठवणी पुढच्या लेखात...

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा बंगला खरच अस्तित्वात आहे का? वणॆन वाचून माझ्या डोळ्यासमोर एक बंगला आला जो नळस्टॉपकडून डेक्कनला जाताना लागतो.
पुभाप्र

ट्युलिप,
हो हा बंगला आहे. कलानगर, धनकवडी.
पण वर ऊल्लेख केलेली कोणतीही व्यक्ती आता हयात नाही. अण्णा (वसंत शिंदे) १९९९ लाच ८७ वय असताना गेले.

लेखनशैली मस्त आहे हो तुमची, अगदी डोळ्यापुढे घटना घडतायत असं वाटायला लागतं. गेल्या आठवड्याभरात सगळेच लेख वाचले , मिसळपुराण सोडून बाकीचे अगदी हातून सोडवत नव्हते.
भरपूर लिहा आणि वाचकांना वाचनाची मेजवानी द्या!!
पुलेशु

विक्रममाधव,
लिहिताना काही जमुन जाते काही नाही साधत. तुम्हाला आवडले माझे लेखन, छान वाटले.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चांगली मेस मिळणे यासारखे भाग्य नाही. आणि ती नाही मिळाली तर हॉस्टेल लाइफ मेस होउन जातं.

मस्त लिहिलंय.

मस्त लिहिलंय हेही!
मेसचे हाल काय सांगावे. सुरुवातीला २ वर्षं जिथे रहात होते तिथलीच रात्रीची मेस लावणं कंपल्सरी होतं. ते जेवण जेवून जेवून आपोआपच मनात एक ' लो' स्टॅंडर्ड सेट झाला होता. भूकही कमी झाली आपोआप. वजन खाली गेलं. तिसऱ्या वर्षी जागा बदलली आणि अर्थातच मेसही. ती मात्र चांगली मिळाली! दोन वर्षांत त्यांचीही पातळी खालावली, पण बरीच होती म्हणायची.
मोठ्या होस्टेलच्या तळमजल्यावर जर मेस असेल तर संपूर्ण होस्टेलमध्ये स्वैपाकाचा एक प्रकारचा मसालेदार वास भरून राहिलेला असतो. तो खूप डिप्रेसिंग वाटतो कधीकधी.

लेख अप्रतिमच... शालीदा आता माबोवर नाहीत याच वाईट वाटत.
त्याचा ब्लॉग फॉलो करते म्हणा.
तरिही इथे त्याचे लेख , कथा आणि पक्षी निरिक्षणाचे फोटो सगळच मिस करते.

सिध्दी,
शालीदांच्या ब्लॉग ची माहिती द्याल का?
धन्यवाद

सिध्दी,
शालीदांच्या ब्लॉग ची माहिती द्याल का?
धन्यवाद
+1

धन्यवाद अज्ञातवासी.
दिनेश जी यांच्या पण ब्लॉगची लिंक असेल तर द्या plz >>>> मलाही हवी आहे.

धन्यवाद अज्ञातवासी.
दिनेश जी यांच्या पण ब्लॉगची लिंक असेल तर द्या plz >>>> मलाही हवी आहे.

Pages